सुरवातीला सहलीसाठी आलेली अडथळ्यांची शर्यत पार करून आम्ही अखेर सकाळी ९ वाजता पठाणकोट छावणी रेल्वे स्टेशनला पोहचलोच.
पुढच्या भटकंतीसाठी ठरविलेली गाडी रेल्वे स्थानकाबाहेर येऊन थांबल्याचा तासाभरापूर्वीच फोन आला होता. स्थानकाबाहेर येऊन गाडीचा मालक, चालक यांची भेट झाली. सर्व सामान टेम्पो ट्रॅव्हलरच्या टपावर चढवल्या गेले.
गाडीचा मालक आम्ही रद्द केलेली छोटी गाडी घेऊन दुसऱ्या पर्यटकांना घेण्यास आला होता. आम्हाला भेटून तो लगेच निघून गेला.आणि आमचा प्रवास हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेकडे प्रवास सुरु झाला . १०-१५ मिनिटातच पंजाबची हद्द सोडून आम्ही हिमाचल प्रदेशच्या हद्दीत प्रवेश केला. वाटेत नूरपूर हे मोठे ठिकाण. येथून डलहौसी, धर्मशाळा वगैरे ठिकाणी जाण्यासाठी फाटे फुटतात. येथे एके ठिकाणी ओळीने काही ढाबे होते. त्यातल्याच एकावर गाडी थांबवली. गरम गरम आलू-प्याज , पनीर, मिक्स पराठे सोबत दही, भाजी, मॅगी असा पोटभर नाश्ता झाला व पुढे निघालो.
पठाणकोट पासून धर्मशाळा अंतर साधारण ८०किमी असून वळणावळणाच्या घाटरस्त्यामुळे दोन अडीच तास लागतात. पठाणकोट (पंजाब) ते जोगिंदरनगर (हि.प्र.) या दरम्यान छोटी (Narrow Guage ) रेल्वे धावते. या मार्गावरील कांगडा स्टेशन पासून धर्मशाळा फक्त १७ किमीवर आहे परंतु रेल्वे खूपच धीम्या गतीने चालते व या मार्गावर फेऱ्याही कमी आहेत त्यामुळे रोडने प्रवास करणे सोईस्कर. विमानाने धर्मशाळेला पोहचायचे असेल तर जवळचे गग्गल/कांगडा विमानतळ अवघ्या १५ किमीवर आहे.
नूरपूरहून धर्मशाळेला पोहचण्यास दोन तास लागणार आहेत. तोपर्यंत धर्मशाळेविषयी थोडेसे जाणून घेऊया.
धर्मशाळेची भौगोलिक दृष्ट्या दोन भाग पडतात. एक अप्पर धर्मशाळा आणि दुसरा लोअर धर्मशाळा. मॅक्लिओडगंज हा भाग अप्पर धर्मशाळा म्हणून ओळखला जातो. बहुतेक पर्यटन स्थळे याच भागात आहेत. लोअर धर्मशाळेत काही हिंदू, बौद्ध मंदिरे, क्रिकेट स्टेडियम, युद्ध वीर स्मारक उद्यान इ. पाईन -देवदार वृक्ष यांच्या सानिध्यात सुंदर धबधबे , ओढे आणि थंड वातावरण यामुळे धर्मशाळा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते.
१९०४ च्या दरम्यान धर्मशाळेच्या फोर्सिथगंज आणि मॅक्लिओडगंज या भागात व्यापार, व्यववसाय भरभराटीला होता. कांगडा जिल्ह्याचे सरकारी कार्यालय केंद्र म्हणूनही याची ओळख होती. परंतु ४ एप्रिल १९०५ रोजी आलेल्या पहाटेच्या भूकंपात संपूर्ण परिसर उध्वस्त झाला. रिश्टरस्केलवर ७.८ च्या या विनाशकारी भूकंपात २०००० हुन अधिक लोक मृत्युमुखी पडले, ५३ हजाराहून अधिकचे पशु गमावले तर लाखाहून अधिक इमारतींची पडझड झाली.
यानंतर सरकारी कार्यालये येथून इतरत्र हलविली गेली. येथे राहिले फक्त कारागृह आणि पोलीस स्टेशन. त्यानंतर १९४७ पर्यंत ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी हे फक्त विश्रांतीसाठीचे ठिकाण बनले. १९५९ मध्ये भारत सरकारने १४ व्या दलाई लामा, तेन्झिन ग्यात्शो यांना राजकीय आश्रय देण्याचा निर्णय घेतल्यानंतर चित्र बदलायला सुरुवात झाली. दलाई लामा यांच्या सोबत हजारो तिबेटी निर्वासित आले. त्यांची संस्कृती टिकवण्यासाठी या भागात तिबेटी लोकांनी अनेक धार्मिक तसेच शैक्षणिक स्थळे उभारली. यानंतर परत एकदा या भागात व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनाला गती येण्यास सुरुवात झाली.
आमचे हॉटेलही याच भागात नड्डी येथे आरक्षित केलेले होते. साधारण ११ वाजता मॅक्लिओडगंजपासून जवळच असलेल्या नड्डी येथील हॉटेलवर (ड्रॅगन रिसॉर्ट) पोहचलो.
नड्डी सूर्यास्त बघण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण. हॉटेलच्या दोन इमारती आहेत त्यामधली प्रत्येक मजल्यावर दोन रूम असलेली एक इमारत दोन दिवसांकरिता आमच्यासाठी राखीव होती. तळ मजल्याची गच्ची म्हणजे पहिल्या मजल्याचा भला मोठा सज्जा, पहिल्या मजल्याची गच्ची म्हणजे दुसऱ्या मजल्याचा सज्जा आणि परत दुसऱ्या मजल्याची गच्ची म्हणजे सर्वाना एकत्र येण्याची जागा.
आमची दुसऱ्या मजल्यावरची प्रशस्त रूम. थंड पडू नये म्हणून सर्व फर्निचर, भिंती व छत लाकडी.
बाल्कनी व गच्चीतून दिसणारा नजारा
आज आमच्याकडे भटकंतीसाठी अर्धाच दिवस होता. सकाळी पोटभर नाश्ता झाला असल्याने दुपारचे जेवण टाळून, ताजेतवाने होऊन लगेच बाहेर पडलो. नड्डीहून मॅक्लिओडगंज जाताना वाटेतच दल सरोवर आहे. देवदार वृक्षांची किनार लाभलेले एक लहानसे नयनरम्य ठिकाण. जातायेता केव्हाही येथे उतरता येणार असल्याने गाडीतूनच बघत पुढे निघालो.
१०-१५ मिनीटांत (३ किमी) 'सेंट जॉन चर्च इन वाईल्डनेस' येथे पोहचलो. रस्त्याच्या कडेलाच घनदाट देवदार वृक्षांच्या झाडीत असलेले हे चर्च पाद्री जॉन यांना समर्पित आहे. १८५२ मध्ये निर्मित चर्चची दगडी इमारत अतिशय देखणी असून खिडक्यांना बेल्जियम काचेची सुंदर तावदाने आहेत.
काही फोटो
चर्चच्या मागच्या बाजूस १८६३ मध्ये मरण पावलेल्या ब्रिटिश व्हॉइसराय आणि गव्हर्नर जनरल जेम्स ब्रूस (1861-63) यांचे त्यांच्या विधवा पत्नीने उभारलेले थडगे/स्मारक आहे. जेम्स ब्रूस हे ब्रुसचाआठवा वंशपरंपरागत कुलप्रमुख (8 thEarl of Elgin)होते. ते धर्मशाळेच्या सौंदर्याच्या अक्षरश: प्रेमात पडले होते. स्कॉटलँड या त्यांच्या मूळ ठिकाणची सुंदरता व तितकेच सुंदर असलेले हे ठिकाण त्यांना मंत्रमुग्ध करीत असे.
१९०५ च्या भूकंपात मरण पावलेल्या ब्रिटिश सैनिकांची थडगीही येथे आहेत
आज नवरात्रीचा नववा दिवस. रंग गुलाबी . एक ग्रुप फोटो बनतोच. चर्चच्या आवारात देवदार वृक्षांच्या पार्श्वभूमीवर आमचा ग्रुप फोटो
येथून पुढे तीन किमीवर मॅक्लिओडगंजची बाजारपेठ सुरु झाली. तिबेटी लोकांच्या वस्तीमुळे लहान ल्हासा (तिबेटमधील ल्हासा)म्हणूनही ओळखले जाते. बौद्ध मठ आणि बुद्ध मूर्तींचे समूह हे येथील पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे..रस्ते अरुंद असले तरी वाहने अत्यन्त शिस्तीत चालविल्या जात असल्याने गोंधळ नव्हता. काही ठिकाणी वाहतूक पोलीस वॉकीटॉकीद्वारे दुसऱ्या टोकाच्या पोलिसांशी संपर्क साधत एकतर्फी रहदारी सोडून गर्दीला नियंत्रित करीत होते. येथून पुढे निघालो. मॅक्लिओडगंजपासून अवघ्या २-३ किमी अंतरावर आपण भागसुला पोहचतो. येथे प्राचीन भागसु नाग मंदिर आहेजे जे सर्प देवता व शंकराला समर्पित आहे. सध्याचे भागसू नाग मंदिर 19व्या शतकाच्या सुरुवातीला 1 ल्या गुरखा रायफल्सने बांधले आहे असे कळते.
मंदिराच्या मागेशनी मंदिर आहे.
मंदिराच्या बाजूलाच पाण्याचा नैसर्गिक स्रोत असलेला तलाव आहे ज्यात भाविक स्नान करू शकतात.
मंदिरापासूनच पुढे काही पायऱ्या व चढाव चढून गेल्यावर सुंदर धबधबा दिसतो. हा भागसु धबधबा म्हणूनच ओळखला जातो. भेट देण्यासाठी पावसाळ्यानंतरचा काळ उत्तम असला तरी हा बाराही महिने वाहणारा धबधबा आहे. धबधब्यात न उतरताही लांबूनसुद्धा याचे दृश्य सुंदर दिसते. आम्ही मात्र अगदी नदीच्या पात्रात उतरून याचा आनंद घेतला. थंडगार पाण्यात पाय बुडवताच दिवसभराचा प्रवासाचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला.
कालचक्र मंदिर
मॅक्लिओडगंजच्या मुख्य चौकातून जाणाऱ्या एका चिंचोळ्या गल्लीत असलेले हे तिबेटी शैलीतील सुंदर मंदिर. तळ मजल्यावर एका खोलीत विशाल मंत्र चक्र असून बाहेर अनेक छोटी मंत्र चक्र आहेत. मंत्र चक्र फिरवल्याने प्रत्यक्ष मंत्र घोष न करताही पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. भिंतींवर सुंदर म्युरल्स आहेत. सार्वजनिक शिक्षण प्रसार केंद्र म्हणून या मंदिराचा उपयोग केला जातो.
येथून जवळच दलाई लामा टेम्पल आहे पण संध्याकाळचे पाच वाजत आले होते आणि आम्हाला सूर्यास्त बघायला नड्डीला पोहचायचे होते त्यामुळे तिकडे जाणे रहित करून मुख्य चौकात आलो. येथे खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स आहेत पण भागसुनागला मोमोज खाल्ले असल्याने भूक नव्हती. फक्त आईस्क्रीम घेतले आणि गाडीकडे निघालो.
वाहनांची गर्दी होती पण रहदारीत कुठे अडकलो नाही. सूर्यास्त होण्याचा अर्धा-पाऊण तास आधीच नड्डी सूर्यास्त पॉइंटला पोहचलो. येथून आमचे हॉटेल हाकेच्या अंतरावर असल्याने आता पुढे गाडीची आवश्यकता नव्हती म्हणून गाडी हॉटेलला पाठवून दिली. मुख्य रस्त्यापासून थोडेसे खालच्या बाजूला डोंगराच्या उतारावर सूर्यास्ताची वाट बघत फोटोग्राफीही सुरु होती. छोटे छोटे दगड एकमेकांवर रचण्याचा खेळही सुरु होता.
हळू हळू सूर्य अस्ताला जाऊ लागला. आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी मोक्याच्या जागा पकडल्या.
क्षणाक्षणाला आकाशाच्या छटा बदलू लागल्या.
सूर्य अस्ताला गेला आणि आम्ही परत फिरलो. हॉटेलवर पायी परतेपर्यंत अंधारही पडायला सुरवात झाली.
रूमवर जाऊन ताजेतवाने झालो व परत सर्व शेकोटीच्या कार्यक्रमाला एकत्र आलो. दिवसभरातले अनुभव, गप्पागोष्टी, गाणी, नाच यात तास-दीड तास कसा निघून गेला कळलेच नाही.
सहलीत नव्यानेच सामील झालेले दाम्पत्य विजय-वनिता यांनी "ऐ मेरी जोहरा जबीं तुझे मालुम नहीं तू अभी तक है हसी और मै जवान" गाणे म्हणत सुंदर नृत्यही केले.
अचानक आलेल्या काही अडचणींमुळे यावेळी सहलीत तीन वेगवेगळी कुटुंबे सामील झालेली होती. या कार्यक्रमामुळे मात्र सर्वांची भीड चेपली व तीन परिवाररांचा मिळून आता एकच मोठा परिवार बनला होता.
जेवणाचे टेबल लागले होते. जेवण आटोपून सर्व आपापल्या रूमकडे वळले.
क्रमश:
प्रतिक्रिया
5 Dec 2022 - 4:09 pm | गोरगावलेकर
संपादकांना विनंती की लेख भटकंती विभागात पाठवावा.
5 Dec 2022 - 4:36 pm | श्वेता२४
फोटो खूपच सुंदर आले आहेत. हॉटेल व तेथून दिसणारे पर्वताचे दृश्य मस्तच. पु.भा.प्र.
5 Dec 2022 - 8:14 pm | Bhakti
काय डोंगार.. काय झाडी.. काय हाटेल..एकदम ओके :)
मस्तच!
देवदार झाडी, आईस्क्रीम,दगडाचा खेळ मस्त मस्त!
5 Dec 2022 - 8:45 pm | कंजूस
आता फोटोग्राफीची (camera)कमाल दिसली.
6 Dec 2022 - 3:49 pm | अनुस्वार
लेख आणि विशेषतः छायाचित्रे उत्तम.
हिमाचल प्रदेशात अनुभवलेली एक विशेष गोष्ट म्हणजे नागमोडी वळणांची रस्त्यावर रेलचेल असली तरी तिथले चालक 'हॉर्न'चा अत्यंत मर्यादित वापर करतात.
8 Dec 2022 - 1:33 am | टर्मीनेटर
वाचतोय, छान चालू आहे सफर 👍
वरती कंजूसकाका म्हणालेत की,
खरंच फोटो बघताना त्यातले रंग नैसर्गिक नाही वाटले त्यामुळे दुर्दैवाने camera ची कमाल दिसली असेच म्हणावेसे वाटतंय. एक विनंती करावीशी वाटते आहे की कृपया कुठलेही फिल्टर न वापरता (Enhancement न करता) फोटो काढावेत, निसर्गाने केलेली रंगांची उधळण पाहण्यात जी मजा असते ती अशा फोटोंमुळे कमी होते. ही टीका नाही, मनापासून जे वाटले ते लिहिले.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
8 Dec 2022 - 2:01 pm | श्वेता२४
की, हिमाचल प्रदेशात तुम्ही जिथे फिरलात तिथे स्थलदर्शनासाठी स्थानिक वाहतूकीचा पर्याय कोणता आहे? जसे की, रिक्षा, टॅक्सी किंवा बाईक रेंटल इ. ?
9 Dec 2022 - 11:56 am | गोरगावलेकर
श्वेता२४, Bhakti, कंजूस, अनुस्वार प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
टर्मीनेटर:आपली सूचना निश्चितच लक्षात ठेवीन
श्वेता२४:हिमाचल प्रदेशात तुम्ही जिथे फिरलात तिथे स्थलदर्शनासाठी स्थानिक वाहतूकीचा पर्याय कोणता आहे?
खरं तर आम्ही सहलीच्या सर्व दिवसांसाठी गाडी आधीच ठरविली होती त्यामुळे या गोष्टीचा विचारच केला नाही. टॅक्सी, बाईक मिळते असे वाचले आहे. संपूर्ण सहलीत रिक्षा मात्र क्वचितच दिसल्या. (ओला,उबेर आहे का माहित नाही)
9 Dec 2022 - 1:43 pm | प्रचेतस
अतिशय तपशीलवार वर्णन आणि त्याला सुरेख फोटोंची जोड. इथला निसर्ग, इथले स्थापत्य, इथले जेवण सर्वच भारी.
10 Dec 2022 - 2:04 pm | कर्नलतपस्वी
छानछान, आवडले.
15 Dec 2022 - 2:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
हा पण भाग मस्तच!! पुभाप्र.