अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मांडवगण हे नदीच्या प्रवाहात वेढलेले गाव आहे.मांडव्य ऋषींची तपोभूमी आणि समाधी स्थान असल्याने गावाचे नाव मांडवगण आहे.
गाव सिद्धेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध मंदिरात प्रवेशद्वारातून आत येताच जुने प्रचंड मोठे वड-कडूनिंबाचे वृक्ष ही तपोभूमी असल्याची ग्वाही देतात. त्यासमोरच उंचच उंच जुन्या विटांच्या बांधकामात बांधलेली दिपमाळ आहे.अतिशय भव्य असे मंदिर आधुनिक रंगसंगतीत सजवले आहे.
विविध कळस आकर्षक आहेत.मंदिराच्या बाहेरच एक ओढा वाहतो तसेच दोन बारव पाण्याची गरज पुरवतात.पुढे 'गढीआई' -लक्ष्मीनारायण मंदिर अशा नावाने ओळखले जाणारे मंदिर पाहायला गेलो.
यादव कालीन हेमाडपंथी बांधकाम असलेले मंदिर पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली आहे.
अतिशय सुबक बांधकाम असलेले मंदिर अर्धवट बांधलेले आहे.मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुबक कोरीवकाम डोळ्यांचे पारणे फेडते.यामधील दगडाचे तोरण, दोन्ही दारांवर व्याल इतर शिल्प माळा सुरेख वाटतात.आतील सभामंडपात भारयक्ष यांनी पेललेले अनेक खांब आणि विविध आकारांचे छत आहेत.
गर्भगृहात देवीची मुर्ती आणि सर्वात जुनी विष्णु लक्ष्मीची ५-६ फूट उंच मूर्ती जरी भग्न अवस्थेत असली तरी मूर्तीचे सौंदर्य लपत नाही.मूर्ती भवती वराह , नृसिंह हे विष्णूचे अवतार,गदा हे आयुध सहज ओळखता येते.परकीय आक्रमणामुळे अतोनात नुकसान पाहून मनाला हळहळ वाटते.
त्यानंतर मंदिराच्या बाहेरील बाजूंचे पद्धतशीर ,योग्य प्रमाणात चढवलेले खांब पाहिले.पुनश्च पुरातन स्थापत्यशास्त्राचा अभिमान वाटतो.
एक अलौकिक वारसा नितांत सुंदर अनुभवल्याचा आनंद घेत परत निघालो.मन भरल्यामुळे आजुबाजुची साधीच फुले,तूरीची झाडे, दुतर्फा झाडी आणखिनच सुंदर भासू लागली.
-भक्ती
फोटो युट्यूबवर स्लाईड शोमध्ये केलेत,त्याची लिंक.
लक्ष्मीनारायण/गढीआई
प्रतिक्रिया
28 Nov 2022 - 3:20 pm | गोरगावलेकर
छान आहे मंदिर. माहिती आणि फोटो सुरेख.
नगरकडचा भाग फारसा पाहण्यात नाही. काही दिवसांपूर्वी बरेचशे पूर पहिले जसे शनी शिंगणापूर, तुळजापूर, गाणगापूर,पंढरपूर इ. तेव्हा प्रवासात नगरहून जाणे झाले पण थांबण्याचा योग आला नाही. बघूया कधी जमते ते.
29 Nov 2022 - 12:30 pm | Bhakti
धन्यवाद ताई,टर्मिनेटर यांचा नगर कट्टा धागा नक्की पहा भेटीवेळी.
हे ठिकाण जरा आडवाटेला आहे,रस्त्याला ७०% मार्क मिळतील.
खरं सांगू का तुम्हाला, मलाच आश्चर्य वाटतेय.आजूबाजचा परिसर बराच दुर्लक्षित केला जातो.जवळपास चिक्कार ऐतिहासिक , भौगोलिक, शिल्प कोरीवकाम , आधुनिक बांधकाम, आधुनिक प्रेक्षणीय स्थळे आजूबाजूलाच एका दिवसाच्या टप्प्यात होण्यासारखे आहेत.
29 Nov 2022 - 3:45 pm | गोरगावलेकर
टर्मिनेटर यांच्या नगर कट्ट्याची नोंद घेतली आहेच. आपल्यालाही नवीन भटकंतीसाठी शुभेच्छा. लेख टाकत रहा. आमच्यासारख्या भटक्यांना निश्चित उपयोग होईल. तूर्तास काही कारणाने २-३ महिने तरी भटकंती बंद. दरवर्षीप्रमाणे यंदाही एक मोठी हिवाळी सहल झाली आहे पण भटकंती विभागात लेख टाकता येत नसल्याने लेख देण्याचे टाळत आहे.
29 Nov 2022 - 6:14 pm | Bhakti
ओह...
प्रचेतस यांचा भटकंती विभागात समाविष्ट झाला काय माहिती?
वशिला ;)
29 Nov 2022 - 6:15 pm | Bhakti
*लेख समाविष्ट झाला
28 Nov 2022 - 6:36 pm | कुमार१
माहिती आणि फोटो सुरेख.
28 Nov 2022 - 7:51 pm | कंजूस
फोटो, विडिओ छान आहेत.
29 Nov 2022 - 9:20 am | प्रचेतस
फोटो आणि माहिती आवडली. मंदिर यादवकालीन दिसते आहे. फोटो मात्र युट्युब ऐवजी थेट इथे टाकलेले जास्त आवडतात कारण ते व्यवस्थित बघता येतात शिवाय बर्याच ठिकाणी ऑफिसात युट्युब ब्लॉक असल्याने तेथे बघता येत नाहीत.
29 Nov 2022 - 12:31 pm | Bhakti
सुचना नक्की लक्षात घेईन :)
29 Nov 2022 - 9:24 pm | टर्मीनेटर
तुमचाही लेख भटकंती विभागात समाविष्ट झालाय... चुकून किंवा काही अन्य कारणाने पहिल्यांदा दुसऱ्या विभागात प्रकाशित करावा लागल्यास नंतर तो धागा विशिष्ट विभागात हलवता येतो 😀
असो, ठिकाणाची छोटेखानी ओळख आवडली, बाकी प्रचेतस म्हणाल्याप्रमाणे फोटोज इथेच बघायला मिळाले असते तर जास्त मजा आली असती. अर्थात आता तुमचा धागा भटकंती विभागात असल्याने तुम्ही तो संपादित करून फोटोज समाविष्ट करू शकता!
30 Nov 2022 - 6:56 am | गोरगावलेकर
धागा भटकंती विभागात हलवला गेला. सध्या इतर विभागात लेख देऊन भटकंती विभागात लेख हलविण्याबद्दल मलाही आपल्याकडून मदतीची अपेक्षा.
29 Nov 2022 - 9:38 am | श्वेता व्यास
छान फोटो आणि व्हिडीओ.
29 Nov 2022 - 12:24 pm | Bhakti
सर्वांना धन्यवाद !
4 Dec 2022 - 5:38 pm | चौथा कोनाडा
व्वा खुप च छान !
व्हिडोज आवडले !
नगर भागात वीटांची दीपमाळ हे वैशिष्ट्य दिसते. कर्जतच्या राशीनच्या देवी मंदिराच्या बाहेर अशाच वीटांच्या दीपमाळा आहेत !
आसू : व्हिडो / प्रचि काढताना आडवे काढल्यास जास्त भाग दिसून आम्हा मिपाकरांना जास्त आनंद घेता येईल !
4 Dec 2022 - 6:59 pm | Bhakti
ओह नक्की!