भाग १उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पूर्वतयारी
आमची ट्रेन दुपारी दोन वाजता पोचणार होती. जेवणाची वेळ होती. उदयपूर रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर नटराज डायनिंग हॉल म्हणून प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. येथे पारंपारिक राजस्थानी व गुजराती थाळी अडीचशे या दराने मिळते तिथे कायमच प्रचंड गर्दी असते . हॉटेलवर जाता जाता तिथे जेवावे की हॉटेलवर जेवावे याबद्दल माझे आणि मिस्टरांच्या बोलणे झाले. तेव्हा आधी रूमवर जाऊन फ्रेश होऊन तिथेच काय असेल ते जेवण जेवायचे, असा निर्णय आम्ही घेतला. ट्रेनमध्येच हॉटेल मालकाला फोन लावून जेवणाच्या व्यवस्थेबद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या इथे प्युअर व्हेज जेवण आणि नाश्ता ऑर्डर प्रमाणे तयार करून देण्यात येईल असे सांगितले. त्यांचे रुफटॉप रेस्टॉरंट होते त्यामुळे त्यांना दोन व्हेज थाळीची ऑर्डर मी दिली. ट्रेन वेळेत पोहोचली. रिक्षाने आम्ही हॉटेलवर पोहोचलो. इथल्या रिक्षा ऐसपैस असतात व मागे सामान ठेवण्यासाठी जागा असते. आम्हाला हॉटेल सापडण्यासाठी फारशी अडचण आली नाही .
मी आत गेले त्यावेळी गेस्ट हाऊस बद्दल माझे फारसे काही चांगले मत झाले नाही. आपला निर्णय चुकला की काय असे मला वाटून गेले .तथापि ज्यावेळी आम्ही तिथे आत मध्ये गेलो आणि रूम्स बघितल्या तेव्हा मात्र बरे वाटले आणि आपला निर्णय योग्यच होता याची खात्रीही पटली. हॉटेल आतून मात्र छान होते. ही जुनी हवेली आता हॉटेलमध्ये रुपांतरीत केली होती. रुम अतिशय स्वच्छ, ऐसपैस होती. एक मोठा लार्ज किंग साईज बेड आणि बाजूलाच तळ्याकाठच्या भिंतीकडे एक छोटा सिंगल बेड होता. शिवाय छोटेसे डायनिंग टेबल, दोन टेबलड्रॉवर व डबल कपाट अशी सुटसुटीत खोली त्यांनी आम्हाला दिली होती. खोलीच्या खिडकीतून दिसणारे लेक पिचोलाचे दृश्य अतिशय नेत्र दीपक आणि मनमोहक होते.
रुमचे फोटो
/>
रुम फोटो 1
/>
रुम फोटो 2
रुम फोटो 3
/>
खिडकी उघडल्या उघडल्या बाहेर तळेच होते. थोडक्यात तळ्याच्या काठावर असणारी ही रूम होती. खोली आम्हाला प्रचंड आवडली. चेक-इनचे सोपस्कार पार पाडून आम्ही आमचे सामान खोलीमध्ये लावून घेतले. पटकन आंघोळी केल्या आणि आवरून साधारण तासाभरात आम्ही हॉटेलच्या गच्चीवर पोहोचलो. तिथूनदेखील तळ्याचे सुंदर नयनरम्य असे दृश्य दिसत होते. प्रचंड भूक लागलेली असल्याने आम्ही प्रथम जेवणाचा आस्वाद घेतला. बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, गरम गरम चपात्या, गुलाबजाम ,मसाला पापड व जीरा राईस असा साधा परंतु रुचकर बेत होता. मस्त तळ्याच्या दृश्याचा आस्वाद घेत आम्ही जेवलो. फोटोग्राफी करण्यात आणि हॉटेल मालकाशी बोलत बसण्यामध्ये थोडा वेळ गेला.
जेवणाचे फोटो
/>
ट्रेन उशीरा पोहोचत असल्यामुळे मी आज फारसा काही बेत ठेवला नव्हता. आज फक्त बगोर की हवेलीमध्ये पारंपरीक कार्यक्रम पहायचा असे ठरवले होते. हा राजस्थानी पारंपरीक लोककलेचा प्रेक्षणीय कार्यक्रम दररोज सायंकाळी 7.00 ते 8.00 वाजता असतो. तिकीट ऑनलाईन व ऑफलाईन उपलब्ध आहेत. ऑनलाईन तिकीटे https://dharoharfolkdance.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. मी ऑनलाईन बुक केले. कारण मर्यादित तिकीटे असतात व लवकर संपतात. जर जास्त प्रेक्षक असतील तर रात्री 8.00 ते 9.00 असा अतिरीक्त शो ठेवतात पण ते काही निश्चित नसते.
आता सहा वाजत आले होते. त्यामुळे आम्ही बगोर की हवेलीकडे जाण्याचे ठरवले. बगोर की हवेली हे गणगौर घाटाच्या जवळच असलेली एक जुनी हवेली आहे. इथे काही पारंपरिक जुन्या काळातली शस्त्रे, वस्तु वगैरे असे संग्रहालय पण आहे. हे संग्रहालय सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघडे असते. पन्नास रुपये तिकीट दर आहे. तथापि सिटी पॅलेस जर बघायचं असेल तर हे म्युझियम टाळले तरी चालते असे मी एका रिव्ह्यूमध्ये वाचले होते. परंतु येथे संध्याकाळी होणारा पारंपारिक कार्यक्रम पाहणे ही मात्र डोळ्यांसाठी आणि मनासाठी एक पर्वणी आहे. श्री व श्रीमती दीक्षित गेल्या 17 वर्षापासून हा कार्यक्रम येथे सादर करत आहेत. तिकीट दर अत्यंत नाममात्र आहेत, असेच मी म्हणेन. येथे कलाकार ज्या दर्जाची कला सादर करतात, ते पाहिल्यानंतर त्यांच्यासमोर आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.
उत्तर राजस्थान, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थान, दक्षिण राजस्थान व मध्य राजस्थान या सर्व प्रदेशातील पारंपारिक लोककलांवर आधारित नृत्यप्रकार, गायन, पपेट शो असा हा कार्यक्रम आहे. साधारण एक तास चालतो. इथे भारतीय पद्धतीची बैठक व्यवस्था आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर काम चालते. त्यामुळे लवकर जाऊन शक्यतो पुढच्या जागांवरती बसले तर कार्यक्रम अतिशय व्यवस्थित पाहता येतो.
बैठक व्यवस्था 1
/>
बैठक व्यवस्था 2
/>
आम्ही ऑनलाईन तिकीट काढले होते तरीही भली मोठी रांग होती आणि आम्हाला बरेच मागे थांबावे लागले. साधारण साडे सहा च्या दरम्यान त्यांनी प्रेक्षकांना आत सोडण्यास सुरुवात केली. शुटींग/फोटो करीता आपल्याला कॅमेरा (मोबाईलचा असला तरी) वापरायचा असेल तर शंभर रुपये अतिरिक्त भरावे लागतात. आम्हाला चांगली जागा मिळाली. साधारण 7.00 वाजता वेळेत कार्यक्रम सुरू झाला. ‘केसरीया.....बालमा.....पधारो म्हारे देस.....’ या अवीट गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा कार्यक्रम इतका सुंदर असतो की कलेची आवड नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सुद्धा दाद दिल्याशिवाय राहवणार नाही. माझ्या नवऱ्याला अशा कार्यक्रमांमध्ये फारसा रस नाही. मुलगाही तसा लहानच आहे. तथापि दोघेही अक्षरश:स्तिमित होऊन त्या कलाकारांचे सादरीकरण बघत होते. डोक्यावर खूप सारे हांडे घेऊन नाचणाऱ्या स्त्रिया, हंड्यामध्ये आग असतानाही नाचणाऱ्या स्त्रिया, काचांवरती नृत्य करणाऱ्या, ताटली वरती नृत्य करणाऱ्या स्त्रिया, गणगौरीचा-महिषासुरु मर्दिनीचे परंपरागत नृत्य करणारे पुरुष..... ते बघून सर्वचजण टाळ्या वाजवून कलाकारांना प्रोत्साहन व दाद देत राहिले व कार्यक्रम उत्तरोत्तर अधिकच रंगतदार होत गेला.
काही फोटो.....
/>
क्र.1
/>
क्र.2
/>
एक गंमतीची गोष्ट म्हणजे या गणगौरीच्या नृत्यात महिषासुर व गौरीच्या संवादात ते दोघे ज्या चालीत एकमेकांना हाळी मारतात ती चाल म्हणजे जीवा-शीवाची बैलजोड........जाई बीगीनं आपली पुढं......या गाण्याची जी चाल आहे तीच आहे. हे सादरीकरण परंपरागत असून विशिष्ट जातीतील पुरुष पिढ्यानपिढ्या परंपरेने पुढे सादर करत आले आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र आम्ही अतीव समाधानाने तिथून उठलो . आम्ही तिथल्या सर्व कलाकारांनी पर्सनली जाऊन भेटलो व त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्यासोबत फोटो हि काढले. आजचा दिवस सार्थकी लागला असंच वाटलं आम्हाला. त्यामुळे उदयपूर फिरायला जाणाऱ्यांनी हा कार्यक्रम चुकवू नये असे आग्रहाने सांगेन.
साधारण आठच्या सुमारास बाजूलाच असलेल्या गणगौर घाटावरती पोहोचलो. लेक पिचोलाच्या काठावरती असे बरेच घाट आहेत. जसे की आमराई घाट, गणगौर घाट हे त्यापैकी काही प्रसिद्ध घाट आहेत. या काठावरती आजूबाजूचे दृश्य बघत आपण तासंतास बसू शकतो. कारण संध्याकाळी लेक पिचोलाच्या काठावर असलेल्या सर्व हवेलींमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई होते आणि हे दृश्य इतके सुंदर असते की आपण नुसते पाहत राहतो. जवळच असलेल्या साई कॉफी शॉप मधून आम्ही कोल्ड कॉफी घेतली आणि त्याचा आस्वाद घेत आम्ही घाटावरती साधारण तासभर बसलो. फोटो काढले.
काही फोटो....
/>
बगोर की हवेली
/>
गणगौर घाट
/>
तळ्याकाठची रोषणाई
/>
कोल्ड कॉफी
/>
रात्री नऊच्या सुमारास आम्ही रूमवर परत आलो. जेवण उशिरा झालेले असल्यामुळे आता जेवायची इच्छा नव्हती. उद्या आम्हाला सिटी पॅलेस बघायला जायचं होतं त्यामुळे लवकर उठायचे होते. हॉटेल मालकाला नाश्त्याची ऑर्डर देऊन ठेवली आणि आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो.
दुसरे दिवशी सकाळी आम्ही उठून 8 वाजेपर्यंत आवरले. छोटूने रुममध्ये गरमागरम पोहे, आलू पराठा,दही,आचार व चहा असा अतीशय रुचकर नाश्ता आणून दिला. रुममधल्या डायनिंग टेबलच्या खिडकिमधून समोरचे तळे व पॅलेसचे मस्त दृश्य दिसत होते. पोटभर नाश्ता करुन आम्ही सकाळी 9 च्या दरम्यान स्थलदर्शनासाठी बाहेर पडलो. इथे सांगण्याची गोष्ट म्हणजे सिटी पॅलेस परिसरात नाश्त्याचे ऑप्शन कमी आहेत. पोहे,उपमा, पराठा,मॅगी व सॅंडविच एवढेच पर्याय कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असतात. दुकाने कळकट्ट आहेत. आम्हाला सकाळी सकाळी समोसा/कचोरी खावीशी वाटत नाही व एकंदरीत तिथली दुकाने पाहून आम्ही थांबलेल्या हॉटेलवरच नाश्ता करणे पसंत केले.
/>
नाश्त्याचा फोटो
/>
/>
आज आम्हाला जगदीश मंदिर, सिटी पॅलेस, लेक पिचोलाची बोट राईड व करणी माता मंदिर ला रोप वे ने जायचे होते. करणी माता मंदिरच्या रोप वे मधून सायंकाळच्या वेळी सिटीचे मनमोहक दृश्य दिसत असल्याने आम्ही सूर्यास्ताच्या दरम्यान तिथे जायचे ठरवले होते.
आम्ही हॉटेलमधून चालत 5 मनिटात जगदीश मंदिरात पोहोचलो. इथल्या छोट्या छोटया गल्ल्यांमधून चालत फिरणे हा एक सुखद अनुभव आहे.जगदीश मंदिरात प्रवेश फी नाही. हे भगवान कृष्णाचे मंदिर आहे. इथे मुख्य मंदिरात मूर्तीचे फोटो घेण्यावर बंदी आहे. त्यामुळे तिथला फोटो घेतला नाही. परंतू मंदिरावर अतीशय सुंदर कोरीव काम व नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. हे सर्व पाहण्यात 1 ते 1.5 तास सहज जातो.
काही फोटो –/>
/>
फोटो क्र.1
/>
फोटो क्र.2
/>
फोटो क्र.3
/>
फोटो क्र.4
/>
फोटो क्र.5
/>
मंदीर पाहून मन अतिशय प्रसन्न झाले. इथून आम्ही सिटी पॅलेसकडे निघालो. सिटी पॅलेस इथून चालत 5-7 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याचा वृत्तांत पुढील भागात........
प्रतिक्रिया
30 Nov 2022 - 3:52 pm | कंजूस
पुन्हा जावेसे वाटत आहे. हॉटेल रूम तर अगदी आवडली. करणी माता रोपवे म्हणजे साजन बागेत? तिथे आम्ही सकाळी गेलो होतो . बागेत पेरू आणि आवळे झाडांखाली पडलेले होते.
सुंदर भाग आहे या मालिकेचा.
30 Nov 2022 - 5:06 pm | सौंदाळा
अतिशय सुंदर कोरीव काम आहे. हे मंदिर किती जुने आहे?
खोली आणि दृश्य पण सुंदर आहे. प्रवसात सुखद धक्के बसले की अगदी मज्जा येते.
30 Nov 2022 - 5:22 pm | कर्नलतपस्वी
सुदंर वर्णन. फोटोही छान आहेत. पुढील भाग लवकर येऊ द्यात.
30 Nov 2022 - 5:53 pm | श्वेता२४
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
@कंजूस सर करणी माता मंदिर चे रोपवे ची तिकिटे हि दूध तलाईच्या इथे खालीच मिळतात. साजन बाग कुठे आहे ते काही मला माहित नाही.
@सौंदाळा खरंच प्रवासामध्ये असे सुखद धक्के मिळाले की प्रवास हा अविस्मरणीय होतो. जगदीश मंदिर हे साधारण 1621 साली कधीतरी बांधले गेले.
@कर्नल साहेब पुढचे भाग आहे लवकरात लवकर टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन काय चाललंय
30 Nov 2022 - 6:00 pm | श्वेता२४
टायपींग मिस्टेक. कृपया दुर्लक्ष करावे
2 Dec 2022 - 8:03 am | कर्नलतपस्वी
आम्ही फक्त काय टेकआहे तेवढेच बघतो. मिस्टेक ला मिस करतो.
मंदिर सॅण्ड स्टोन मधे आहे. बहुतेक कोटा असवा.
यावर खुप बारीक नाजुक काम करता येते पण तेवढाच हा दगड नाजुक असतो.
हाच दगड बहुतेक खजुराहो मधे वापरलंय.
2 Dec 2022 - 11:39 am | श्वेता२४
कर्नसाहेब. लेखक व कवी आहात त्यामुळे शब्दांवर तुमचे भारी प्रभुत्व आहे. हे मंदीर पाहत असताना आम्ही गाईड घेतला नव्हता. त्यामुळे याबद्दल मला विस्तृत माहिती नाही. त्यामुळे दगड किंवा कलाकुसरीबाबत इतर अुषंगिक माहिती फारशी नाही.
30 Nov 2022 - 10:20 pm | गोरगावलेकर
मंदिराचे फोटो अप्रतिम. हॉटेलही छानच मिळाले आहे.
1 Dec 2022 - 8:41 am | प्रचेतस
हा भागही मस्त, फोटोही आवडले. जगदीश मंदिर भव्य आणि देखणे आहे. गजथर, अश्वथर, नरथर, देवथर स्पष्ट आहेत. नागर शैलीतले मंदिर सुरेख आणो मूर्तीही अगदी देखण्या आहेत.
1 Dec 2022 - 12:30 pm | श्वेता२४
@गोरगावलेकर प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद
@ प्रचेतस हो. मंदीर खरंच भव्य व देखणे आहे. मंदीराच्या अगदी समोर उंचीवर गरुडाची भव्य व सुंदर मूर्ती आहे. परंतू त्याचा फोटो काढण्यास मनाई होती. मंदीराचा मेंन्टेनन्स चांगला आहे. देऊळ साधारण ६०० वर्षे जुने असले तरी येथे तोडफोड काही झालेली दिसून येत नाही. जी इतरत्र अनेक ठिकाणी पाहिली.
2 Dec 2022 - 4:21 pm | सस्नेह
मंदिरे सुरेख आहेत. हा सर्व भाग पूर्वी पाहिला असल्याने स्मृती जाग्या झाल्या.
2 Dec 2022 - 5:30 pm | चौथा कोनाडा
अप्रतिमच ! सुंदर भटकंती वर्णन ! आणि प्रचि एक नंबर !
धरोहर शो भारी दिसतोय. (आमच्या शॉर्ट टुर मध्ये पाहू शकलो नव्हतो !)
जगदिश मंदिरावरची शिल्पकला डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
त्यांचे फोटो जबरदस्त आलेले आहेत.
वाह, बहोत खुब !
4 Dec 2022 - 5:41 am | पर्णिका
दोन्ही भाग आवडले.
जयपूर भेटीवेळीच रॉयल राजस्थान अतिशय आवडले होते, संपूर्ण ट्रीपभर ‘केसरीया.....बालमा.....पधारो म्हारे देस’ हे गाणे अक्षरशः मंत्रमुग्ध करत होते.
राजस्थानी पारंपरीक कार्यक्रम छान वाटतोय. कधी उदयपूरला भेट दिली तर बघायला आवडेल.
पिल्लू गोड आहे तुझे, श्वेता ! 😊
5 Dec 2022 - 10:51 am | श्वेता२४
मन:पूर्वक धन्यवाद.
7 Dec 2022 - 1:57 pm | पराग१२२६३
हे सर्व वाचून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. ३२ वर्षांपूर्वी हा भाग पाहिला होता राजस्थान सहलीमध्ये. पण स्वतंत्रपणे न गेल्यामुळं संपूर्ण उदयपूर शांतपणे पाहता आलं नव्हतं. पण राजस्थानला पुन्हा जावसं वाटत आहे हे वाचून.
7 Dec 2022 - 4:14 pm | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
8 Dec 2022 - 1:16 am | टर्मीनेटर
वाचतोय, रॉयल राजस्थानच्या आठवणी ताज्या होत आहेत.
हे सर्व प्रांत मनमुराद अनुभवण्यासाठी किमान तीन वेळा राजस्थानला जावे असे माझे वैयक्तिक मत!
तुम्ही 'नटराज' ची थाळी मिस केलीत हे वाचून वाईट वाटले, खूप छान असते ती! (बाकी अन्य काही प्रेक्षणीय ठिकाणेही तुम्ही बघितली नाहीत किंवा तिथे जाण्याचे टाळलेत हे पहिल्या भागात वाचले तेव्हाही असेच वाईट वाटले होते, पण ते असो... प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या 😀)
हा भागही आवडला, पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
8 Dec 2022 - 10:15 am | श्वेता२४
नटराज थाळी मिस झाली ती वेळेअभावी. परंतु दुसऱ्या एका ठिकाणी आम्ही पारंपारिक पद्धतीचे उत्कृष्ट असे जेवण जेवलो त्याचा उल्लेख पुढे येईलच. मी सुद्धा राजस्थान तीन टप्प्यात करायचा असे ठरवले आहे .कारण एकंदरीतच या क्षेत्रफळाचा आवाका बघता एका ट्रिपमध्ये राजस्थान पाहणे अन्यायकारक ठरेल असे मला वाटते. बाकी उदयपूर मधली काही ठिकाणी आता जरी मिस झाली असले तरी आम्ही उदयपूरला पुन्हा जाणार आहोत .त्यावेळी केवळ उदयपूर फिरणे हे टार्गेट असेल. बाहुबली हिल्स, सज्जनगड मान्सून पॅलेस आणखीन हे काही गोष्टी पाहण्याच्या राहून गेले आहेत ते कदाचित त्यावेळी करू.
16 Dec 2022 - 12:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त चाललेय मालिका!! हा ही भाग आवडला.
प्रचि एकदम मस्त आली आहेत. हॉटेल रूम चांगली मिळाली की अर्धे काम होते आणि जेवणखाण वेळेवर आणि चांगले मिळाले की डोके शांत राहुन ट्रिपचा आनंद घेता येतो नाहीतर चिड्चिड होउन मूडची वाट लागते :) सुदैवाने तुमचे उत्तम नियोजन कामी आलेले दिसते आहे.
16 Jan 2023 - 12:08 pm | श्वेता व्यास
हॉटेल उत्तम मिळालेले दिसते.
मंदिराचे फोटो छान आहेत.
18 Jan 2023 - 12:30 pm | चंद्रसूर्यकुमार
मस्त. चार वर्षांपूर्वी उदयपूरला गेलो होतो त्या आठवणी ताज्या झाल्या. धरोहर शो खूपच आवडला. विशेषतः कठपुतली आणि सगळ्यात शेवटी एक बर्यापैकी वयस्क स्त्री डोक्यावर हंडे घेऊन नाचते ते बघून थक्क व्हायला झाले. सुरवातीला एका हंड्यापासून सुरवात करून शेवटी ७-८ हंडे घेऊन ती नाचू शकत होती!!
धरोहरचा युट्यूब व्हिडिओ इथे द्यायचा आगाऊपणा करत आहे. तो व्हिडिओ हा काही 'स्पॉईलर' असणार नाही कारण तो शो इतका सुंदर आहे की व्हिडिओ बघितला तरी प्रत्यक्षात तो शो बघण्याचा अनुभव अगदीच बिनतोड आहे/असणार आहे.