कार्यबाहुल्यामुळे हा भाग लिहिण्यास खूपच उशीर झाला..
पहिल्या भागाची लिंक देत आहे..
संध्याकाळी ७:०० च्या दरम्यान हंपीमधून बाहेर पडलो. मुक्कामाच्या हॉटेलमध्ये परततानाच वाटेतील एका छोट्या हॉटेलमध्ये उत्तप्पा खाल्ला, कारण जेवण करण्याइतपत भूक कोणालाच नव्हती. दिवसभराचा प्रवास आणि भटकंतीमुळे सगळेच खूप दमले होते. त्यामुळे रात्री थोड्याफार गप्पा मारून ९:०० वाजता सर्वजण झोपी गेलो.
पहाटे ५:३० ला मला जाग आली. झोप व्यवस्थित झाल्यामुळे फ्रेश वाटत होते. हॉटेल मध्ये एक फेरफटका मारला. तिथेच न्याहारी करून बाहेर पडायचे असे ठरले असल्याने न्याहारी किती वाजता सुरु होते याची चौकशी करून रूमवर आले. तो पर्यंत बाकीचे उठले होते. ८ वाजेपर्यंत सगळ्यांच्या अंघोळी वगैरे आटपून सर्वजण तयार झाले. हॉटेलच्या पूरक नाश्त्यामध्ये इडली, उडीद वडा, पोहे आणि अननस शिरा असे पदार्थ होते. सर्वच पदार्थ रुचकर होते. पण मला त्यातील उडीद वडा खूप आवडला. वडा जितका कुरकुरीत होता तितकाच स्पोन्जी सुद्धा होता. वडा साम्बारावर ताव मारून पुढील हंपी दर्शनासाठी निघालो. सर्वात आधी पाहिलं ते कृष्णमंदिर.
ओरिसाचा राजा गजपती याचे साम्राज्य आंध्र व तेलंगणातील काही भागापर्यंत होते. साम्राज्य विस्तार करण्यासाठी इ.स. १५१२ मध्ये कृष्णदेवरायाने ओरिसावर चाल करून तो भाग आपल्या साम्राज्यास जोडला. या स्वारीमध्ये त्याने तेथील बाळकृष्णाची मूर्ती आणली व तिच्यासाठी हे मंदिर बांधले. [बालकृष्णाबरोबरच तहानुसार रायाने आपली तिसरी पत्नी म्हणचेच गजपती राजाची कन्या जगन्मोहिनीशी (हिला पद्मावती सुद्धा म्हणतात) विवाह करून तिला विजयनगरात आणले. या उत्कल लढाईनंतर रायाने सपत्नीक तिरूमल येथे जाऊन व्यंकटेशाचे दर्शन घेतले होते. या भेटीत त्याने व्यंकटेशास हिरे, माणके तसेच त्याच्या तिरुमलादेवी आणि चिन्नादेवी या दोन्ही पत्नींनी चांदीची ताटे आणि पेले दिले होते. त्यानंतर रायाने तिरूमल मंदिरामध्ये दोन पत्नीन्सोबत पंचधातूंच्या मुर्त्या घडवून घेतल्या, ज्या आजहि व्यंकटेश मंदिरात पाहायला मिळतात. इथे एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे रायाने यावेळेस नवपरिणीत वधू जगन्मोहिनीची मूर्ती का बरे घडवली नसेल? उपलब्ध साहित्यात या दर्शन भेटीमध्ये तिचा कुठेच उल्लेख नाही.]
कृष्ण्मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये एक उंच दगडी चौकट आहे. या चौकटीवर एका बाजूला विष्णूचे दशावतार आणि दुसऱ्या बाजूला पोपट, मोर, सारिका इ. पक्षांची शिल्पे कोरली आहेत. हि सर्व शिल्पे एका वेलबुट्टीने बांधली आहेत. चौकटीच्या वरच्या भागावर नागपाश आहेत. बहुदा वाईट शक्तींना बाहेर रोखण्यासाठी तशी योजना असावी.
प्रवेश्द्वारावरची चौकट
चौकटीवरील नाग पाश
प्रवेशद्वारावर गोपूर आहे. या गोपुरावर कृष्ण्देवरायाच्या कलिंग स्वारीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच मुख्य मंदिर आहे. मंदिरासमोर बलीशीला आहे. (बाळकृष्णाला बळी दिल्याचे यापूर्वी कधी ऐकले नव्हते.) अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. ५० खांबांवर हे दोन्ही मंडप तोलले आहेत. खांबावर गरुड, हनुमान, विष्णूचे इतर अवतार तसेच कृष्णलीला कोरल्या आहेत. या मंडपांच्या तिन्ही बाजूना बाहेरून मोठमोठाली व्यालशिल्पे आहेत.
व्यालशिल्पे
गर्भगृहामध्ये बाळकृष्णाची मूर्ती होती, पण ती सध्या एका संग्रहालयामध्ये आहे. मुख्यमंदिराच्या उजव्या बाजूस एक छोटे गणेश मंदिर आहे. गणेश मूर्ती नाहीये पण मूर्तीच्या चबुतऱ्यावरील उंदीरमामा स्पष्ट दिसतात.
गणेश मंदिर
गणेश मुर्तीखालील चबुतरा
बाळकृष्ण मंदिराच्या मागे उजव्या बाजूस रुक्मिणी मंदिर देखील आहे. अग्न्येय दिशेस पाकशाला आहे व मंदिराच्या चहुबाजूनी पूजापाठ यज्ञविधी करण्यासाठी ओवऱ्या आहेत. दक्षिण भारतामध्ये कोणत्याही मंदिर परिसरात पुष्करणी तलाव असतोच. भाविकांना पूजा अथवा देवास जलाभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी उपलव्ध व्हावे म्हणून हे तलाव बांधतात. नवीन भाविकांना पुष्करणी सहज शोधता यावी म्हणून मंदिराच्या मुख्य भिंतीवर अथवा प्रवेश भिंतीवर एक मत्स्यशिल्प कोरलेले असते. या माशाचे तोंड ज्या दिशेला असते, त्या दिशेस पुष्करणी असते. कृष्ण्मंदिरासमोर देखील पुष्करणी तलाव आहे.
पुष्करणीची दिशा दाखवणारे मत्स्यशिल्प
पुष्करणी
मंदिरासमोरून एक रस्ता जातो, या रस्त्याच्या पलीकडे एक दगडी आयताकृती दानपेटी आहे. दानपेटीच्या दर्शनी बाजूवर चक्र, गंध, शंख व चंद्र, सुर्य अशी व्यंकटेशाची चिन्हे आहेत. दानपेटीला दोन दगडी झाकणे आहेत आणि पैसे टाकण्यासाठी दोन चौकोनी भगदाडे आहेत. लोकसहभागातून मंदिराचे बांधकाम करता यावे म्हणून ती दानपेटी ठेवली होती असे आम्हाला गाईडने सांगितले.
दानपेटी
पैसे टाकण्याची जागा
पुढील ठिकाण चालत जाण्या इतपत अंतरावर होते, त्यामुळे गाडी कृष्ण मंदिराशेजारीच पार्क केली आणि आम्ही चालत निघालो. जाताना एका बाजूला केळीच्या बागा होत्या आणि दुसऱ्या बाजूला भग्नावशेष विखुरलेले होते. वाटेत एके ठिकाणी चौकोनी दगडी कमान लागली. तत्कालीन करवसुलीचे ते ठिकाण होते. कमानीमधून बाहेर पडून ५ ते ७ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला हम्पी मधील मुख्य आकर्षण असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंह मूर्तीने लक्ष वेधून घेतले. ६.७ मी उंची असलेली ही मूर्ती एकपाषाणी आहे.
आर्य कृष्णभट्ट नावाच्या मुर्तीकराने इ.स. १५२८ मध्ये ही मूर्ती घडवली आहे. सप्तफणी शेषाच्या ललितासनामध्ये नरसिंहस्वामी विराजमान आहेत. डाव्या मांडीवर लक्ष्मी होती पण सध्या नाहीशी आहे. सध्या हि मूर्ती विनाछत उघड्यावरच आहे. पण पूर्वी येथे एक ६ खांबी मंदिर होते आणि मंदिराला चंदनी छत देखील होते, परंतु आक्रमकांनी ते छत जाळून टाकले व खांब आणि लक्ष्मीची मूर्ती देखील उद्ध्वस्त केली . आगीच्या ज्वालांची झळ लागून नरसिंहाच्या छातीवर काळा डाग पडला व तडे देखील गेले आहेत. मंदिरातील सहा खांबांपैकी सध्या २ च खांब शिल्लक आहेत. हि मूर्ती उठून दिसते ती नरसिंहाच्या विलाक्ष्ण उग्र डोळ्यांमुळे! खोबणीतून बाहेर आलेले चेंडूच्या आकाराचे गोल गरगरीत मोठे डोळे, विक्राळ सुळे, रुंद जबडा यामुळे मूर्ती अधिकच उग्र भासते. नरसिंह मूर्तीचे पाय देखील तोडले गेले होते आणि ते इतस्ततः विखुरले होते, पुरातत्व विभागाने ते जोडले आणि त्यांना आधार म्हणून गुढघ्यावर एक पट्टा लावला आहे असे आम्हाला गाईडने सांगितले होते. परंतु अभ्यासकांच्या मते तो पट्टा अलिकडचा नसून योगपट्ट आहे.
लक्ष्मीनृसिंह मूर्ती शेजारीच बडवी लिंग मंदिर आहे. बडवी म्हणजे गरीब. एका गरीब स्त्रीने स्वखर्चाने हे मंदिर बांधले आहे. आतमध्ये एक पाषाणी भव्य असे शिवलिंग आहे. शिवलिंग कायम पाण्यात असते. पृवी तिथे तुंगभद्रेचे पाणी येत होते, त्यासाठी चिंचोळी दगडी वाट केली होती. परंतु सध्या पाईपलाईन द्वारे पाणी सोडले जाते. शिवलिंगाच्या साळुंकीवर त्रिनेत्र कोरले आहेत. एका सध्या रेषेने हे नेत्र दाखवले आहेत, यावरून तिथे आणखी काही कोरीव काम करायचे होते, परंतु ते काही कारणास्तव राहून गेले असावे..
बडवी लिंग
येथे एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे ज्या आक्रमकांनी नृसिंह मंदिराचे एवढी नासधूस केली त्यांनी शेजारीच असणार्या बडवी लिंगास धक्का देखील कसा लावला नाही ! याचे कारण काय असावे? शिवलिंग मानवी स्वरुपात नसल्याने तो देव नसून फक्त एक शिल्प आहे असे वाटल्याने सुरक्षित राहिले असावे कि या प्रकारास कुठे तरी शैव वैष्णव संघर्षाची किनार आहे ते त्या नरसिंहास व भोलेनाथासच ठाऊक !!
क्रमशः
प्रतिक्रिया
14 Sep 2022 - 4:54 pm | टर्मीनेटर
मस्तच 👍
हे नव्यानेच समजले! पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
15 Sep 2022 - 2:02 pm | नागनिका
हे समजल्यापासून जिथे कुठे प्राचीन, मध्ययुगीन मंदिर असेल तिथे मासा शोधण्याचे नवीन काम लागले :)
15 Sep 2022 - 2:05 pm | प्रचेतस
मला वाटतं हे फक्त हंपी स्पेसिफिक असावे, इतर कुठेही मला असे दिसले नाही.
15 Sep 2022 - 2:11 pm | नागनिका
मलाही नाही दिसले, पण हंपी मध्ये मात्र आहे.. विठ्ठल मंदिर आणि कमल महाल परिसरात देखील आहे.
14 Sep 2022 - 5:06 pm | कॅलक्यूलेटर
छान लिहिलंय.फोटो पण मस्त. कुडाळ संगम जायच राहून गेल. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
14 Sep 2022 - 7:06 pm | Nitin Palkar
वर्णन आणि प्रचि दोन्ही सुंदर.
14 Sep 2022 - 8:27 pm | मुक्त विहारि
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
15 Sep 2022 - 3:34 am | पर्णिका
दोन्ही भाग आवडले.
सुरेख फोटो आणि सविस्तर माहिती !
15 Sep 2022 - 6:42 am | प्रचेतस
हम्पीविषयी जितके लिहावे, वाचावे तितके कमीच, दर वेळी काहीतरी नवीन बघायला मिळते.
15 Sep 2022 - 6:44 am | कर्नलतपस्वी
छान,विस्तृत वर्णन. दोन्ही भाग आवडले.
15 Sep 2022 - 12:10 pm | Bhakti
हा देखील भाग आवडला.
15 Sep 2022 - 2:03 pm | नागनिका
सर्वांचे आभार..
15 Sep 2022 - 2:57 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान. हा भाग पण आवडला.
👌
15 Sep 2022 - 4:09 pm | तर्कवादी
ते म्हणजे न्यू जॉईनीला लाँग सर्विस अवॉर्ड देण्यासारखे झाले असते ना :)
15 Sep 2022 - 5:44 pm | नागनिका
पुतळा नाही बनवला तरी बरोबर घेऊन तरी जाऊ शकत होता ना..
पण यामागे सुद्धा एक कारण असावे.. जगन्मोहिनी नाखुषीने आली होती विजय नगरात.. काही अभासाकांच्या मते तिने रायावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता..
15 Sep 2022 - 11:40 pm | सुखी
हंपी मध्ये परिवारासमवेत राहायला हॉटेल कुठले चांगले आहे? बजेट ३-४ हजार दिवशी जास्तीत जास्त
16 Sep 2022 - 2:37 pm | नागनिका
कर्नाटक टुरिझम चे हॉटेल्स चांगले आहेत.. हंपी मध्ये त्यांचे हॉटेल मयुरा भुवनेश्वरी म्हणून आहे, ते चांगले आहे.. समजा तिथे नाही मिळाले बुकिंग तर होस्पेट मध्ये त्यांचेच मयुरा विजयनगरा म्हणून देखील हॉटेल आहे.. स्टाफ व रूम सर्विस चांगली आहे दोन्ही ठिकाणी.
22 Sep 2022 - 12:39 pm | अथांग आकाश
छान माहिती! सुंदर फोटो!! लेख आवडला!!
22 Sep 2022 - 5:45 pm | श्वेता व्यास
खूप सुंदर फोटो आणि वर्णन!
22 Sep 2022 - 5:49 pm | चौथा कोनाडा
सुंदर भटकंती वर्णन आणि त्याला साजेसे प्रचि !
खुप छान !
19 Oct 2022 - 4:08 pm | गोरगावलेकर
अनेकदा हंपीला जायचे ठरवते पण दरवेळी हुलकावणी मिळते. आपण छान माहिती दिलीत. फोटोही छान आहेत