मिपाकरांनी आत्तापर्यंत हंपी बद्दल इथे बर्याच वेळा वाचले असेल. त्यामुळे लिहावे कि नको असे मनात द्वंद्व चालू होते. परंतु दक्षिण भारताच्या सामाजिक व राजकीय वैभवाचा सुवर्ण इतिहास सांगणाऱ्या हंपी नगरीबद्दल कितीही वाचले, ऐकले तरीही कमीच !!
काही ठिकाणे अशी असतात कि तिथे जाण्यासाठी खूप मोठा पुण्यसंचय असावा लागते. हंपी त्यातीलच एक! बहुदा आमचा तेवढा संचय झाला होता म्हणूनच तिकडे जाण्याचा योग आला.
नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये सहकुटुंब हंपी दर्शन झाले. ६ दिवसांची सहल होती. त्यातील ३ दिवस हम्पीसाठी होते (हंपी साठी तीनच दिवस दिले याचा खूप पश्चाताप होत आहे). उर्वरित ३ दिवस बदामी, पट्टदक्कल, ऐहोळे, कुडल संगम असा प्रवास केला.
रामायणातील काही प्रसंग इथे घडले आहेत. प्रभू रामचंद्रांचा सहवास या क्षेत्रास लाभला असला तरी, हंपी ओळखली जाते ती सम्राट कृष्णदेवरायामुळे. मौर्य, चालुक्य, होयसळ, काकतीय, संगम इ. अनेक राजघराण्यांनी इथे राज्य केले, पण देवरायाच्या कालखंडात या शहराने जे वैभव अनुभवलं असेल ते खचितच इतर कोणताही राजा करू शकला नसता.
विजय नगर जिल्ह्यामध्ये असलेले हम्पी हे होस्पेट पासून १५ किमी लांब आहे. हम्पी मध्ये राहण्यासाठी अनेक चांगली हॉटेल्स आहेत, परंतु के. एस. टी. डी. सी. चे हॉटेल्स उत्तम पर्याय आहेत. खुद्द हंपी मध्ये देखील के. एस. टी. डी. सी चे हॉटेल आहे परंतु आम्हाला तेथील बुकींग मिळाले नसल्यामुळे होस्पेटमधील ‘मयुरा विजयानगरा’ या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो. हॉटेलच्या रूम्स प्रशस्त, हवेशीर आणि आरामदायी आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक रूमच्या दर्शनीय भिंतीवर हम्पी मधील ऐतिहासिक स्मारकांचे वॉलपेपर त्या रूमची शोभा वाढवतात.
हॉटेलमधील खोली
या हॉटेलपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर तुंगभद्रा धरण आहे. हॉटेलचे चेक-इन दुपारी एक वाजता होते. आम्ही साधारण १२:३० वाजता हॉटेल मध्ये पोचलो होतो. सुदैवाने रूम्स रिकाम्या असल्यामुळे आम्हाला वापरता आल्या, व फ्रेश होऊन हंपीकडे जाण्यास निघालो. जाताना सुरुवातीला कमलापूर लागते. कमलापूर मधील हॉटेलमध्ये कर्नाटकी राईस प्लेट खाल्ली. चव ठीकठाक होती. भूक लागल्यामुळे चवीशी फारसं देणं-घेणं नव्हतं. जेवण आटोपून हंपी दर्शनाला निघालो, त्यावेळेस साधारण तीन वाजले होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत जेवढे बघणे शक्य आहे, तेवढे बघायचे असे ठरवले.
गळ्यामध्ये सरकारी ओळख पत्र असलेले भरपूर गाईड हम्पी मध्ये आहेत. त्यातीलच एक गाईड आम्ही निवडला. सुदैवानं आमचा गाईड मराठी भाषा चांगल्या पद्धतीने बोलू आणि समजू शकत होता.
हंपीला जाताना आपले स्वागत होते ते प्रचंड शिलांपासून पासून बनलेल्या टेकड्यांनी! या शिळा लगोरी प्रमाणे एकावर एक अशा रचलेल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला या प्रकारच्या आवाढव्य लगोऱ्या पाहून एकदा तरी मनात असा विचार येतो की, यातील एक जरी शिळा हलली तर काय होईल!! पण हा विचार फार काळ टिकत नाही. कारण भव्य प्रस्तरांनी बनलेली हेमकूट टेकडी आपले लक्ष वेधून घेते. एका पौराणिक कथेनुसार कुबेराने या क्षेत्रावर सुवर्ण नाण्यांचा वर्षाव केला होता, म्हणून या टेकडीला हेमकूट असे म्हणतात.
हेमकूट टेकडी
या हेमकूट टेकडीवर कडलेकालू गणेशाचे मंदिर आहे. भरपूर शिल्पांकित खांब असलेला सभामंडप व गणेश मूर्ती असलेले गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभा मंडपातील खांबांवर विविध वाद्य वाजवणाऱ्या परदेशी कलाकारांची शिल्पे कोरली आहेत. मंदिराच्या गर्भगृहामध्ये अखंड पाषाणात कोरलेली, एका दृष्टीक्षेपात न मावणारी भव्य अशी गणेश मूर्ती आहे. या मूर्तीची उंची जवळपास ४.५ मीटर इतकी आहे. हंपी वर एकेकाळी संगम घराण्याची देखील सत्ता होती. हे संगम घराणे विरुपाक्ष शिवाचे निस्सीम भक्त होते. विरूपाक्ष मंदिराकडे जाण्याचा प्राचीन मार्ग हेमकूट टेकडीवरील कडलेकालू गणेश मंदिरावरूनच जातो. संगम राजे कोणत्याही मोहीमेपूर्वी विरुपाक्षाचा आशीर्वाद घेत असत. राजा आपल्या कुटुंबकबिल्यासह याच मार्गाने येत असे. प्रथम श्री कडलेकालू गणेशास अभिषेक करून, हेमकूट उतरून विरुपाक्ष शिवाचे दर्शन घेत असे.
श्री. कडलेकालू गणेश मंदिराचे खांब
खांबांवरील काही शिल्पे
वाद्य वाजवणारे परदेशी कलाकार
एक वेगळीच मुद्रा
मल्लयुद्ध करणारे युवक
बहामनी सुलतानाच्या आक्रमणाच्या खुणा हम्पी मध्ये सर्वच ठिकाणी दिसतात. या महाकाय अशा गणेश मूर्ती मध्ये सोने, हिरे अशी संपत्ती लपवली असेल असे वाटून, गणेशाच्या उदराला छेद देण्यात आला आणि त्याचा एक तुकडा वेगळा करण्यात आला. पण हा तर एक भरीव पाषाण आहे असे लक्षात आल्यानंतर चिडलेल्या सुलतानाने तेथील शिल्पांकित थांब उध्वस्त केले. पुरातत्व खात्याने दुसरा पाषाण लावून गणेशाचे छेडलेले उदर जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता, परंतु खूप प्रयत्न करूनही मूळ मूर्तीचे texture त्या पाषाणाला देता आले नसल्यामुळे तो पाषाण तिथे अजूनही पडून आहे.
श्री. कडलेकालू गणेशाची मूर्ती
उदरास छेद दिलेला स्पष्ट दिसत आहे
हेमकूट टेकडीवर काही ठिकाणी उखळासारखे खळगे आहेत. बहुदा त्या खांब रोवण्यासाठी केलेल्या खाचा असाव्यात. काही कारणाने ते काम अपूर्ण राहिलेले असावे. या टेकडीवरून विरुपाक्ष मंदिराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
टेकडीवरील खळगे
हेमकुट टेकडीच्या डाव्या बाजूला ऋष्यमुक पर्वत तर उजव्या बाजूला मातंग पर्वत आहे.
हेमकुटावरुन दिसणारा ऋष्यमुक पर्वत
हेमकुट टेकडीवरून विरुपाक्ष मंदिरात जाण्याचा प्राचीन मार्ग बंद असल्याने टेकडीला वळसा घालून मंदिराकडे जावे लागते. जातानाच्या मार्गावर अनेक लहान-सहान मंदिराचे भग्नावशेष इतस्त: विखुरलेले दिसतात. विरुपाक्ष मंदिरास जाण्यासाठी जवळपास ४०० मीटर रस्ता पायी पार करावा लागतो. या रस्त्याच्या डाव्या बाजूला हेमकूट टेकडी व उजव्या बाजूला प्राचीन बाजारपेठेचे अवशेष दिसतात. बाजारामधील दुकानांची रचना दुमजली आहे. सध्या फक्त या दुकानांचे खांबच शिल्लक आहेत. या बाजारात पूर्वी सोने, चांदी, हिरे यांचा व्यापार होत असे. विजयनगरच्या वैभवात या व्यापारीसंकुलाचा खूप मोठा हातभार होता. शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरून बाजारपेठेची भव्यता जाणवते. आणि नकळतपणे सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्यांच्या लखलखाटात उजळलेल्या विरुपाक्ष मंदिराच्या गोपुराचे कल्पनाचित्र डोळ्यासमोर आणून मन रोमांचित होते. अशा रोमांचित मनाने मंदिरात जाण्यासाठी आम्ही देवरायाने बांधलेल्या भल्यामोठ्या गोपुराकडे प्रस्थान केले.
विरुपाक्ष मंदिरासमोरील बाजार
विरुपाक्ष मंदिराची स्थापना ७व्या शतकात होयसळांनी केली . चालुक्य राजांनी मंदिरामध्ये भर घातली. १५व्या शतकामध्ये हंपी विजयनगराची राजधानी झाली आणि सम्राट कृष्णदेवरायाने मंदिरास गोपुरे व तटबंदी बांधून वैभवास आणले. मंदिरामध्ये एकूण ३ गोपुरे आहेत. त्यापैकी पूर्वाभिमुख असलेले गोपूर हे मुख्य प्रवेशद्वार आहे. ९ मजली शिल्पांनी खचाखच भरलेल्या या गोपुराची उंची ५० मीटर इतकी आहे.
मुख्य गोपूर
गोपुराच्या डाव्या बाजूला ‘कालारि शिवाचे’ शिल्प आहे. मार्कंडेय मुनींचे प्राण हरण करण्यासाठी कालपुरुष आला असता, त्याच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी शंकराने कालपुरुषाशी युद्ध केले व त्यास हरवले अशी कथा या २ फूट लांबीच्या शिल्पामध्ये मांडली आहे. देवरायाच्या या वैशिष्ट्यपूर्ण गोपूर शैलीस त्याच्या नावावरून ‘रायगोपुरे’ असे म्हणतात. दक्षिण भारतामध्ये हमखास अशी गोपुरे आढळतात.
कालारि शिव शिल्प
गोपुरातून आत गेल्यावर डाव्या बाजूस त्रिकाळदर्शनाचे प्रतिक असलेला त्रिमुख नंदी आहे. व उजव्या बाजूला एका भिंतीवर विजयनगराचे ध्वजचिन्ह आहे. या ध्वजावर चंद्र, सुर्य, वराह व उलटा खंजीर आहे. चंद्र सुर्य हे काळाचे प्रतिक आहे, वराह विष्णूचे व खंजीर विजयाचे प्रतिक आहे. ‘ विष्णूच्या कृपेने आचंद्र्सुर्य आम्ही विजय मिळवत राहू’ असा या ध्वजाचा अर्थ.
ध्वजचिन्ह
ध्वजा शेजारीच कृष्णदेव रायाचा जुन्या कन्नड लिपीतील शिलालेख आहे. भक्कम तटबंदी असलेल्या या मंदिराच्या चारही बाजूनी भरपूर ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यामध्ये सतत धार्मिक कार्य चालू असते.अग्नेयेकडे मुद्पाकखाना आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर दीपस्तंभ व बलीस्तंभ आहे. नंदिमंडप , सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहामध्ये प्रसन्न विरुपाक्ष विराजमान आहेत. या शिवलिंगाची दैनंदिन पूजा होत असते. दीपावली दरम्यान तिकडे नुकताच दीपोत्सवही साजरा झाला होता.
दीपस्तंभ व बलीस्तंभ
रंगमंडपामध्ये रंगीत भित्तीचित्रे आहे. यामध्ये शिव पार्वती विवाह, राजाचे युद्ध, अर्जुनाचा मत्स्यभेद अशी चित्रे चितारली आहेत. या चित्रांनी अशी काही मोहिनी घातली होती कि त्यांचे फोटो घेण्याचे भान सुद्धा राहिले नाही.
मंदिराच्या बाह्य भिंतीवर शिव पूजनाचा महिमा कोरला आहे. यामध्ये सर्व योनीतील सजीव शंकराची उपासना करत आहेत असे दाखवले आहे. या शिल्पामध्ये कन्नाप्पा नयनार चे देखील शिल्प आहे. कन्नप्पा नयनार हा निस्सीम शिवभक्त होता. तो रोज सरोवरातून ताजी कमलफुले शंकरास अर्पण करत असे. एकदा त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी शंकराने त्याला कमल फुलांच्या ऐवजी नेत्रकमळ वाहण्यास सांगितले. कन्नप्पाने किंचितही विचार न करता कट्यारीने एक डोळा काढला व शिवलिंगास लावला. दुसरा डोळा काढल्यानंतर अंध झाल्याने तो योग्य ठिकाणी लावता येणार नाही असे पाहून त्याने खुणेसाठी आपला एक पाय शिवलिंगावर ठेवला. आणि दुसरा डोळा काढणार इतक्यात शंकर प्रकट झाले व त्यांनी प्रसन्न होऊन कान्नप्पास डोळे देऊन आशीर्वाद दिला.
या भित्तीशिल्पाच्या पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला दक्षिणेकडे काही परिवार देवतांची मंदिरे आहेत व एक पुष्करणी तलाव आहे. याच बाजूला ७ ते ८ पायर्यांचा एक दगडी जीना आहे. हा जीना वर चढून गेल्यावर एक अंधारी खोली आहे. या खोलीच्या एका भिंतीवर फुटभर लांबीचा एक झरोका आहे आणि त्यासमोरील भिंत पांढऱ्या रंगाने रंगवली आहे. या भिंतीवर झरोक्यामधून मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुराची उलटी प्रतिमा दिसते. एका फुटभर झरोक्यामधून ५० मीटर उंच गोपुराची संपूर्ण उलटी प्रतिमा पडण्याचे तंत्रज्ञान अचंबित करणारे आहे. (वैज्ञानिक भाषेमध्ये या तंत्रज्ञानास पिन होल कॅमेरा तंत्र म्हणतात.)
अशा वास्तू बांधणारे स्थपती हे मनुष्य नसतीलच असे वाटते. दैवी देणगी असल्याशिवाय असल्या कलाकृती जन्म घेत नाहीत. एवढी अफाट बुद्धिमत्ता, कौशल्ये यांचा मध्येच कुठे ऱ्हास झाला या प्रश्नाने खूप पोखरून काढले. आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगावा कि वर्तमान काळातील निष्क्रीयतेबद्दल चिंता व्यक्त करावी या प्रश्नाचा विचार करत संध्याकाळी मुक्कामी पोहोचलो.
क्रमशः
प्रतिक्रिया
12 Jan 2022 - 8:43 pm | कंजूस
अगोदर कितीही लेख आले तरी आपल्याला काय दिसले, काय आवडले हे लिहावेच.
फोटोंसह वर्णन झटपट आणि छान आहे.
15 Jan 2022 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडले...लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
15 Sep 2022 - 6:53 am | कर्नलतपस्वी
आपले लेख सुंदरच असतात. त्यांच्या मांडणीतून शांत व विचारपूर्वक लिहिल्याचेप्रतीत होते.
12 Jan 2022 - 8:43 pm | गोरगावलेकर
साधारण याच ठिकाणांची आमची २०२० ची हिवाळी सहल कोरोनामुळे रद्द झाली. प्रत्यक्ष नाही तरी या लेखातून तुमच्याबरोबर माझीही भटकंती होते आहे असे वाटले.
12 Jan 2022 - 8:45 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान सुरूवात. फोटोही छान आहेत.
12 Jan 2022 - 10:06 pm | कर्नलतपस्वी
छान लिहिले आहे, फोटो पण उत्तम आहेत. सृष्टी एक पण दृष्टी अनेक त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने छानच लिहीतात व सर्व मीळून एक छान प्रवास वाचकानां घडतो.
12 Jan 2022 - 10:38 pm | चौथा कोनाडा
अगोदरचे लेख (आणि आंजावरचे इतरही ) वाचले असले तरीही हा लेख आवडला !
हॉटेलची माहिती दिलीत,
अश्या टिप्सने लेख मोहीम आखण्यासाठी अतिशय उपयोगी आहे !
धन्यवाद !
बाकी वर्णन आणि प्रचि सुंदरच ! +१
13 Jan 2022 - 10:52 pm | नागनिका
संपूर्ण हंपी व्यवस्थितपणे पाहायचे असेल तर ८ ते १० दिवस लागतात.. आणि अभ्यासायचे असेल तर कित्येक महिने..
13 Jan 2022 - 9:11 am | Bhakti
मस्त सुरुवात.
13 Jan 2022 - 10:24 am | सौंदाळा
मस्त
हंपीवर कितीही वाचले, पाहिले तरी कमीच पडते. तेव्हा बिनधास्त आणि सविस्तर लिहा.
पुभाप्र
13 Jan 2022 - 10:56 am | अनिंद्य
.... हंपी नगरीबद्दल कितीही वाचले, ऐकले तरीही कमीच !!.....
अनुमोदन.
छान लेख, पु. भा. प्र.
13 Jan 2022 - 12:11 pm | प्रचेतस
मस्त सुरुवात.
हंपीबद्दल जितकं वाचावं तितकं कमीच, जितकं पाहावं तितकं कमीच.
तुम्हास येथे कृष्णदेवराय असे म्हणावयाचे आहे का? कारण संगम घराण्यात देवराय नावाचे दोन राजे होऊन गेले होते. त्यांच्या कारकिर्दीतही येथील मंदिरे उभारली जातच होती पण खर्या अर्थाने साम्राज्य कळसास पोहोचले ते कृष्णदेवरायाच्या काळातच.
हा मार्ग हल्लीच बंद केलेला दिसतोय. इकडील दरवाजाने विरुपाक्ष मंदिराच्या आवारात जाता येत असे. कोविडमुळे की कशामुळे बंद केलेला असावा असे वाटते.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात.
13 Jan 2022 - 3:53 pm | नागनिका
हो कृष्णदेवरायच.
हेमकूटावरून विरुपक्षाकडे जाण्याचा मार्ग अलीकडेच बंद झाला आहे. कारण माहित नाही.
13 Jan 2022 - 1:21 pm | टर्मीनेटर
झकास सुरुवात 👍
मलाही हंपीला केव्हापासून जायचे आहे पण अजून योग आला नाही, दोनदा हुलकावणी मात्र मिळाली 😀
तुम्ही होस्पेट पर्यंतचा प्रवास कसा केलात आणि हंपीतली भटकंती कुठल्या वाहनाने केलीत हे देखील सांगितलेत तर ते इच्छुकांना मार्गदर्शक ठरेल.
धन्यवाद.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!
13 Jan 2022 - 3:59 pm | नागनिका
तांत्रिक सहाय्य केल्या बद्दल तुमचे आभार !
आमचा १२ जणांचा गृप होता.. त्यामुळे संपूर्ण प्रवासास traveller गाडी केली होती.
14 Jan 2022 - 9:57 pm | मुक्त विहारि
अशी वर्णने वाचतांना, परत परत, एकच प्रश्र्न मनांत येतो की, हिंदू कधी एकत्र येणार?
15 Jan 2022 - 12:51 am | रंगीला रतन
वाचतोय
पुभाप्र
15 Jan 2022 - 6:19 am | कंजूस
पाहिले. धरणाजवळ आहे. स्वत:चे वाहन असल्यास उपयोगी आहे.
17 Jan 2022 - 4:43 pm | नागनिका
धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी तुंगभद्रा dam बोर्डाकडून बसेस आहेत. ५० रुपयाचे तिकीट काढून आपण दृश्य पाहून येऊ शकतो.
15 Jan 2022 - 9:34 am | चंद्रसूर्यकुमार
सुंदर. लेख आणि फोटो खूप आवडले.
25 Jan 2022 - 12:28 pm | श्रीगणेशा
हंपीला काही वर्षांपूर्वी गेलो होतो. व्यवस्थित पाहायचं असेल तर तुम्ही म्हणता तसं ३ दिवस कमी पडतील. आम्ही दोन मुक्काम केले होते.
एवढं सुंदर असूनही, हंपी मधे कोणतं तरी नैराश्य वास्तव्यास राहिले आहे असं जाणवतं. कदाचित एवढं वैभव, आर्थिक व सांस्कृतिक, अचानक कसं हरवलं असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
31 Jan 2022 - 1:43 pm | नागनिका
हंपी मधे कोणतं तरी नैराश्य वास्तव्यास राहिले आहे असं जाणवतं. कदाचित एवढं वैभव, आर्थिक व सांस्कृतिक, अचानक कसं हरवलं असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
अचूक निरीक्षण..
विध्वंसामध्ये खूप नकारात्मकता असते.. आणि इतक्या वर्षानंतरही ती जाणवते.
4 Feb 2022 - 12:10 am | विकास...
छान माहिती आणि फोटोस .
हंपीला अजून तरी जाणे जमले नाही. बहुतेक एकटच जावे लागेल
..
हंपी ला जाऊन चालत फिरायचे का ? आपल्याला उन्हाचा त्रास होतो म्हणून विचारलं
15 Sep 2022 - 2:07 pm | नागनिका
तिथे टमटम (६ सीटर ), ट्रक्स सारखी वाहने आहेत.. ते करू शकता..
5 May 2022 - 12:34 pm | तर्कवादी
लेख व फोटोज आवडलेत.
मध्यंतरी हंपी नावाचा मराठी चित्रपट आला होता. चित्रपट फारसा चांगला नाही मात्र गाणी आणि हंपीदर्शन यामुळे बघण्याजोगा आहे.
भूतकाळाचा अभिमान निश्चितच बाळगावा, पण वर्तमान काळात निष्क्रिय आहोत असे नाही. त्याकाळची अफाट बुद्धीमत्ता व कौशल्ये नाकारता येणार नाहीच पण आता निर्बुद्ध झालो आहोत असेही नाही. यासगळ्या विकासामागे नेहमी अर्थकारण असते, अर्थकारण बदलते तशी विकासाची दिशा बदलते आणि समाजकारण बदलते तसे अर्थकारण बदलते.
त्याकाळी लोक अधिक धार्मिक होते, धर्म हा समाजकारणाची व अर्थकारणाची मुख्य प्रेरणा होता. विचार करा एखादे मंदिर वा लेणी उभारण्याकरिता किती मनुष्यबळ लागत असेल त्यामुळे किती लोकांना काम मिळत असेल. तसेच मंदिर वा लेणी ई बांधणारा राजा हा समाजात लोकप्रिय होत असावा, जितकी राजघराण्याची लोकप्रियता अधिक, राज्याची भव्यता जास्त तितके जास्त व भव्य मंदिर उभारले जाणे हे त्याकाळी साहजिक होते. तसेही शेती व व्यापार वगळता करण्यासारखी इतर कामे कमीच असावीत मग हातांना काम देणार कसे ?
आता त्या कौशल्यांची जागा बहुतांशी तंत्रज्ञानाने घेतली आहे. पण तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता, तसेच ते योग्यप्रकारे वापरण्याकरिता ही बुद्धिमत्ता लागतेच. काही महिन्यांपुर्वी मी कोयनानगरला फिरायला गेलो होतो. तिथे नेहरु उद्द्यानातील संग्रहालयात कोयनेची यशोगाथा ही ध्वनीचित्रफित पाहिली .. अशी धरणे , वीजनिर्मीती केंद्रे, सरदार पटेलांचा पुतळा , पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे कृत्रिम उपग्रह, अनेक मोठे कारखाने, त्यातले भव्य ऑटोमेशन, रेल्वे ई (मोठी यादी होवू शकेल) ही आजच्या काळातील निर्मिती आहे. आताच्या अर्थकारणातील प्रेरणानुंसार ही निर्मिती झाली आहे. त्यांना दुर्लक्षुन आता आपण निष्क्रिय आहोत अशी खंत बाळगणे योग्य होणार नाही.