अमरनाथ यात्रा-२

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
17 Aug 2022 - 3:20 pm

https://www.misalpav.com/node/50542/backlinks

https://www.misalpav.com/node/50577/backlinks

जम्मू ते बालटाल प्रवासातील काही छायाचित्रे.

mipa*****mipa

mipa**mipa

mipa**mipa

mipa*****mipa

mipa*****mipa

mipa**mipa

पुर्वी बालटाल मार्गावरून जाण्यास फक्त सेना आणी इतर सुरक्षाबल व त्यांचे कुटुंबीय यानांच परवानगी होती. इतर यात्री पहलगाम मार्गा वरूनच यात्रा संपुर्ण करायचे. बालटाल मार्ग कठीण असल्याने यात्रेकरू कमीच,आजच्या एवढी गर्दी नव्हती.मी गेलो तेव्हा बालटाल वरून एक दिवसात यात्रा पुर्ण करावी लागत असे.सकाळी जाऊन संध्याकाळी बालटाल मुक्कामी परत यावे लागत असे. गुफे जवळ रहाण्याची परवानगी कुणालाही नव्हती.संध्याकाळी चार वाजेपर्यंत सर्वांना परतीचा प्रवास सुरू करणे अनिवार्य होते.कै.श्री गुलशन कुमार,(टि सीरीज) यांचे लंगर यात्रेच्या कालावधीत अविरत चालत असे. फक्त काही साधू व लंगरचे सेवादार संगमावर राहू शकत होते. साधूंची स्वतःची तात्पुरती सोय (Make shift arrangement) होती तर लंगरची आपली पक्की, जोत्यावर बांधलेली चाळवजा बॅरक होती.इथे पोहोचताच भाविकांना गरम पाणी, चहा,भजी दिले जायचे व दर्शन घेऊन परत आल्यावर गरमा गरम स्वादिष्ट भोजनाची सोय होती. कष्टसाध्य यात्रा सुफळ संपूर्ण झाली या आनंदात भोजन अधिक स्वादिष्ट लागायचे.दमलेले भाविक दुप्पट उत्साहात परतीचा प्रवास सुरू करायचे.अर्थात ही माहिती मी संगमावर आल्यानंतरच कळाली.

आसो,यात्रा सुरू करूयात. कॅम्प मधे यात्रेबद्दल सर्व माहीती दिली, अंतर किती,पायवाटेवर काय काळजी घ्यावी,परत येण्याची वेळ वगैरे.सुरक्षाबलाचे काही जवान यात्रेकरूंना मदती साठी बरोबर असायचे.

आताचे बालटाल शिबीर

mipa*****mipa

जुलाईचा महीना होता तरी कडाक्याची थंडी होती. हिमखंडातून येणारे वारे थंडीत भर टाकत होते. तापमान साधारण दहा बारा डिग्री सेल्सियस पर्यंत होते. सहा महिन्यापासून याच भागात असल्यामुळे वातावरणाशी गट्टी होती.इतर भागातून आलेले यात्री कुडकुडताना दिसले. गरम शर्ट,स्वेटर,कानटोपी,लोकरीचे पाय व हात मोजे,स्नो गाॅगल्स,जंगल शूज,पाठीवर छोटा पिठ्ठू (Haversack) त्यामधे खाण्याचे पदार्थ,चहा,साखर व दुध पावडर व एक जोडी कपडा.पिठ्ठूलाच जोडून उष्णता रोधक (Insulated) गरम पाण्याने भरलेली बाटली.शरीराच्या उघड्या भागावर बोरोलीन चोपडले. फक्त तोंडाचाच भाग उघडा होता. ठिक सहा वाजता कॅम्प सोडला व सिंध नदीच्या काठाने पायी प्रवास सुरू केला.झुंजूमुजू झालं होतं पण सुर्योदयाला वेळ होता. बालटाल मार्ग कसला पायवाट,खूप चढ उतार,कठीण चढाई एकच तट्टू चालू शकेल एवढीच रुंदी.एका अंगाला उचंच उंच,दृष्टीक्षेपात न येणारी गीरीशीखरे तर दुसऱ्या बाजूस एका नजरेत न दिसणार्‍या खोल दर्‍या. छायाचित्रावरून स्पष्ट कल्पना येईल.

थोडे आवन्तर, सिन्द नदी मध्ये Trout fish एकल बोन, गोड्या पाण्यतले मासे भरपूर सापड्तात. या भागात मासे कमी लोक पसम्त करतात. वुलर्,डल झील आणी छोट्या छोट्या नद्या मधे खुप मासे पकड्ले. शाकाहारी कमळाच्या देठाची भाजि,कोशिम्बीर खुप छान बनवतात. दम आलू तर सगळ्यानाच माहित आसेल.

mipa*****mipa

mipa*****mipa

सुरूवातीलाच साठ अंश कोनातली चढण,चिखल,निसरडा रस्ता. पायवाटेवर धुळीचा सामना करवा लागतो. दमा, श्वासाचे रोगी याना त्रास होवू शकतो. भगवान शीव आणी खीर (क्षिर)भवानी माता का जयकारा करत स्थानिक लोकांनी तर आम्ही जय भवानी जय शिवाजी गर्जत पहीले पाऊल टाकले. यात्रेकरूंची गर्दी नव्हती. त्यावेळच्या पायवाटांपेक्षा आताचे रस्ते खुपच रूंद व समतोल आहेत. छायाचित्रां वरून रस्ता किती कठीण व चाळीस वर्षापुर्वी कसा असेल याची चांगलीच कल्पना येते. तुरळक मानवी वस्ती होती पण आता यात्रेकरूंची संख्या वाढल्याने अर्थार्जन वाढले म्हणून येथील वस्ती वाढली आहे.त्यावेळी चहा नाष्ट्याची दुकाने नव्हती. आज मात्र बरेच ठिकाणी लंगर,चहाची दुकाने आहेत.पुर्वेकडून सूर्योदय होत होता.बर्फाच्छादित गिरीशीखरे झळाळत होती. उन्हाळ्यात बकरवाल लोक डोन्गरावर राहायला येतात व थन्डीत पायथ्याशी परत येतात.

mipa*****mipa

स्नोगाॅगल्स डोळ्यावर चढवले.इथे येवून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे निसर्गाशी मस्ती करायची नाही,महागात पडते. बालटाल समुद्र सपाटी पासुन नऊ हजार फुटावर आहे.आम्ही बारा हजार फुटावर रहात असल्यामुळे फारसा फरक जाणवत नव्हता.मैदानी भागातून आलेल्या यात्रेकरूच्या चेहर्‍यावर मात्र तणाव स्पष्ट दिसत होता.
Identity disc प्रत्येक सैनीकाला दोन आल्युमिनीयम च्या चकत्या मिळतात. त्यावर नाव, नम्बर आणी धर्म लिहिलेला आसतो. एक हातावर तर एक गळ्यात बान्धायची आसते. नुक्ताच एका ३४ वर्शापूर्वी सइयाचिन हिम्खन्डात हरवलेल्या सैनीकाचा शोध लागला.

सर्वांनी चालायला सुरवात जोमात केली पण अनुभव आणी सवय नसल्यामुळे लवकरच छाती भरून आली श्वास उखडला,पाच दहा मिनिटातच काही यात्रेकरू थांबले तर काही चक्क खाली बसले. काहिंना फाजील आत्मविश्वास नडला.आमचा ग्रुप मात्र दमदार, नियंत्रीत पावले उचलत हळुहळू पुढे चालला होता.त्यावेळेला नैसर्गिक प्राणवायूवरच निर्भर रहावे लागत असे.आता प्राणवायूचे सिलेंडर मीळतात. त्यावेळेस पायवाट खुपच अरूंद, जेमतेम एक खच्चर चालू शकत होते.एकाच वेळेस एकच जण जाऊ शकत होता. पुढे चालणाऱ्या यात्रेकरूस ओलांडून जाणे दुरापास्त होते.तट्टूची सवारी आली तर डोंगराला चिटकून उभे राहीले तरी पाठ तट्टूला घासायची. बराच वेळ चालल्यावर लाकडाची झोपडीवजा पाच सात घरे दिसली. घड्याळात साडेसात वाजले होते. डोमील गावा जवळ पोहोचलो होतो,अदांजे पाच एकशे फुट अधीक उंचीवर आलो असू. त्यावेळेस कुठलीही पाटी,मैलाचे दगड असे काहीच नव्हते.आता मात्र जागोजागी फलक लावले आहेत.

mipa*****mipa

डोमील गावा पर्यन्त पोहोचलो, भुक लागली होती, एक कशमीरी तीन दगडाची चुल मांडून चहा विकायला बसला होता.अजुन बोहनी झाली नव्हती.आम्हीच पहिले गिर्‍हाईक होतो.विसावलो, नाष्टा केला चहा प्यायलो.गंमत म्हणून त्याच्या हुक्क्याचे दोन कश मारले.सिगरेट पाकीट दिले, चायवाला खुश झाला.चहाचे पैसे घेतले नाही.बरोबरचे साथीदार दृष्टीक्षेपात आले. चौदा किलोमीटर जायचे एवढेच माहीती,दोनच कि.मी.अंतर कापले होते.आजुन लांब पल्ला गाठायचा होता.पुढचा पडाव बरारी गाव होता पाच कि.मी अंतरावर,पोटपुजा झाली,श्वासाची गती सामान्य झाली एक दिर्घ श्वास घेत पुढ्च्या प्रवासा साठी पाऊले उचलले.

mipa*****mipa

मोठे डोंगर,खोल दरी आणी यांच्या मधे लपंडाव खेळणारी पाऊलवाट. मार्तंड तापहिन होता पण शरीर गरम झाले होते.अंगावरचे स्वेटर कमरेवर आले. दर एक तासाने थांबायचे ग्रुप एकत्र झाला की पुन्हा वाटचाल सुरू करायची असे ठरवून पावलांनी गती पकडली.आता डोगंर उतारावर बकरवाल आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन वर चढताना दिसत होते. आमची गती हळू जरी होती पण जसजसे उंचावर जात होतो दम तुटल्यावर थांबावेच लागत होते. डोमेल पासुन बरारी टॉप पर्यंत संपूर्ण तीव्र चढ होता.खड्या चढाई ची अम्हाला सवय असून सुदूधा वारंवार दम घेण्यास थांबावेच लागत होते.आमची चालण्याची गती खुपच कमी झाली.निसर्ग सौंदर्याचा पहात, आस्वाद घेत मजल दरमजल अमरनाथ,पवित्र गुफा जवळ करत होतो.

mipa*****mipa

डोगंरातल्या घळीत अजुनही बर्फ जमलेलेच होते.त्यातुन छोटे छोटे पाण्याचे ओहळ उतारावरून मैदाना कडे वेगाने वहात होते. एकास एक मिळून आपली ताकद वाढवत होते. खाली खोल दरी मधे हिमनदी त्यांना आपल्या पोटात सामावून घेत जास्त वेगाने पुढे जात होती. चित्र उतारावर हिरव्यागार कोवळ्या गवतावर शेळ्या मेढ्या,तट्टू ताव मारत होते.निसर्गाचे एका बाजुला रौद्र तर दुसरीकडे मखमली,मन- भावन रूप एकाच वेळेस दिसत होते.

तीन साडेतीन तास लागले असावेत. घामाघूम झालो होतो.अंगातले कपडे बर्‍यापैकी घामानं भिजले होते.बिस्कीट,नमकिन एकमेका बरोबर वाटून घेतले,पाण्यात ओ आर एस मीसळले,तहान भागली आणी स्फुर्ती सुद्धा आली.पूर्वानुभव कामाला आला.बाकीच्यांची वाट पहात बसलो. श्वासात श्वास आला.थोड्याश्या खाण्याने भुक नाही भागली पण ताजेतवाने झालो.आमच्याकडे सामान होते,"चहा बनवू या",मित्र म्हणत होते पण शरीराचे तापमान हळुहळू कमी व्हायला सुरुवात झाली होती.थंड पडण्याच्या अगोदर निघायला हवे होते.बरोबरचे अजून दिसत नव्हते. ही यात्रा शारीरिक क्षमते बरोबर मानसिक शक्तीपरीक्षणच आहे असे म्हटंले तर वावगे ठरणार नाही.उंच डोंगर आणी खोल दरी मधली छोटीसी पायवाट, तीव्र चढउतार, प्राणवायुची कमतरता व इतर यात्रेकरूंचे अनुभव यात्रा सुरू करण्या आगोदर मनात धाकधूक निर्माण करतात. बरारी टाॅप नंतर मात्र चढाई जवळ जवळ संपली होती. बर्फाच्छादित हिमखंड दृष्टीक्षेपात आला.

**********mipa**********

तापमान सात आठ डिग्री असावे. आतापर्यंत मातीच्या अरूंद पायवाटे वरून चालत होतो.सरळ चढण होती.हातात काठी व दुसरीकडे आधाराला डोंगराची भिंत असल्या मुळे तोल जाण्याची शक्यता कमी, पाय घसरला तरी सावरता येत होते. आता तीव्र उतार (Slope) पार करायचा होता.उतारावर चालणे, डोंगर चढण्या पेक्षा जास्त अवघड. गुडघ्यावर जोर येतो,अपोआपच चालण्याची गती वाढते,तोल सांभाळत चालणे मुश्किल. गुडघ्याच्या वाट्या दुखायला लागतात. तोंडावर कधी आपटू याचा नेम नाही.

सह्याद्रीची चढाई व हिमालयावर चढाई यात खुपच फरक आहे असे माझे मत आहे.एक मुख्य फरक म्हणजे सह्याद्री काळा कभिन्न, राकट, ज्वालामुखीतून जन्मलेला, गर्द झाडी,मुबलक प्राणवायू.मजबूत कडे कपारी ट्रेकर्स चे दोस्त.हिमालय नाजुक,भुसभुशीत,घसरगुंडीसारखा,पाण्यातून डोके वर काढलेला. रौद्र, हिरवळ कमीच, ती सुद्धा विशिष्ट उंचीपर्यंत पुढे धवल,शुभ्र आणी "नंगा". बर्फाच्छादित शिखरे राजाच्या मुकुटा सारखी चमकतात म्हणूनच की काय याला हिमराज म्हणतात असे वाटले.आसो. सह्याद्रीतले जंगल डोळ्याला थंडावा देते तर हिमालयात सूर्याची बर्फावरील परावर्तित किरणे एका क्षणात दृष्टिहीन करू शकतात. मैलभर पसरलेल्या हिमखंडातून पायी चालणे एक वेगळाच थरारक अनुभव.सात आठ महिन्यांपासून पडलेल्या बर्फाचे थर गोठून टणक झाले होते. हलकेच डोके अपटले तरी कपाळमोक्ष नक्कीच झाला म्हणून समजावे.जरा लक्ष इकडे तीकडे झाले तर दिवसा तारे दिसणारच.थंड जखम (Cold blunt injury) भयंकर दुःखदायक.आणलेल्या काठीचा खरा उपयोग इथेच झाला. काठीच्या खालच्या टोकाला शंकूच्या आकाराचा ठोकलेला अणकुचीदार टोक बर्फात रूतवत चालायचे. इथेपण प्राणवायूची कमी भासते. उतार आणी नंतर सपाटी वरचा प्रवास आसल्यामुळे फारशी दमछाक होत नव्हती.चालण्याची गती बर्‍यापैकी जलद होती.आठ किलोमीटर अंतरा करता चार साडेचार तास लागले पण पुढील चार किलोमीटर करता तास दिड तासच लागला.

सुचीपर्णी वृक्ष एखाद्या सुरक्षा रक्षका सारखे ठायी ठायी उभे असलेले दिसले.थोडंफार हिरवळ हिमखंडाच्या आसपास उमटून दिसत होती.जास्त इकडे तीकडे न बघता काळजीपूर्वक पावले टाकत होतो. स्नोगाॅगल्स घातले होते तरीही सूर्याची परावर्तित किरणे डोळे दिपवत होती, दृष्टिहीन होण्याची दाट शक्यता त्यामुळे खाली बघून चालणे सुद्धा धोकादायक. मजल दरमजल मजल करत बारा वाजण्याच्या सुमारास संगमावर, लंगर जवळ पोहचलो. त्या ठिकाणी बरीच चहल पहल होती.पक्की बसकी पण उतरत्या छपराची चाळवजा एकच इमारत दिसली. हेच ते गुलशन कुमार यांनी चालवलेला भंडारा,लंगर होता. ओट्यावर भाविक प्रसाद (जेवण) घेत होते. त्याच्या चेहर्‍यावर यात्रेचा मुख्य टप्पा सुरक्षीत पार पडल्याचे व इष्ट देवाचे मनसोक्त दर्शन घडल्याचा आनंद साफ दिसत होता. मस्तपैकी चहा ,भजी खाल्ली व भोलेबाबाच्या दर्शनासाठी प्रस्थान केले.

पुढिल भागात भेटूयात.................

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

17 Aug 2022 - 10:09 pm | शाम भागवत

हाही भाग मस्त!
छायाचित्रांमुळे नीट कल्पना आली. ही कधी काढली आहेत?

कर्नलतपस्वी's picture

18 Aug 2022 - 6:49 am | कर्नलतपस्वी

आमचे नातेवाईक या वर्षी यात्रा कंपनी बरोबर अमरनाथ यात्रेला गेले होते. त्यांनी फोटो पाठवलेत. व काही आंतरजालावर उपलब्ध आहेत ते घेतले.
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

प्रचेतस's picture

18 Aug 2022 - 9:27 am | प्रचेतस

हाही भाग मस्त झालाय कर्नलसाहेब. लिहिते राहा, पुढच्या भागाची वाट पाहात आहेच.

निनाद's picture

18 Aug 2022 - 9:52 am | निनाद

खूप छान लेखन. छायाचित्रांमुळे तुमच्या सोबत आमचे ही भटकणे होते आहे.
पुढच्या भागाची वाट पाहात आहोत.

सौंदाळा's picture

18 Aug 2022 - 10:24 am | सौंदाळा

वाचतोय.
पुभाप्र

कर्नलतपस्वी's picture

18 Aug 2022 - 12:59 pm | कर्नलतपस्वी

प्रचेतस सर,निनाद,सौदांळा जी प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Aug 2022 - 9:10 am | ज्ञानोबाचे पैजार

पुढचे भाग लवकर येउद्या.

फोटूंची साईझ वाढवता आली तर बघा, इतके बारीक फोटो बघायला माझ्या सारख्या म्हातार्‍याला फारच त्रास होतो.

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

20 Aug 2022 - 9:42 pm | कर्नलतपस्वी

मागच्या खेपेला मोठे टाकले तर धागा उघडायला उशीर व्हायचा. बघतो प्रयत्न करतो.

किल्ली हरवली म्हणून उशीर होतोय. आता सं मं नी दुसरी बनवून दिली आहे.