रात्री-अपरात्री हातातलं पुस्तक बाजूला न ठेवता आल्यानं जागत बसावं आणि सहज दोन-अडीच उलटून जावेत. घर-दार झोपलेलं. आपल्या पोटात मात्र भुकेचा आगडोंब. हातातलं पुस्तक ठेवूनही काहीतरी खायला शोधलंच पाहिजे, अशी आणीबाणी आणणारा. अशा वेळी तुम्ही काय खाता?
बिस्किटं? चिप्स? चिवडा? हॅट. पोट तर भरत नाहीच. शिवाय पित्ताला आमंत्रण. आणि खरं सांगायचं तर काही खाल्ल्याचं समाधानही मिळत नाही. अशा वेळी मी हमखास पोह्यांचा आश्रय घेते.
पोहे पुरेश्या दुधात भिजवावेत. साय असल्यास उत्तम. त्यावर पोह्यांच्या साधारण एक द्वितीयांश तरी दही घालावं. चवीपुरतं मीठ आणि तवंगासकट फोडणीची मिरची / लसणीचं तिखट / तळलेली सांडगी मिरची किंवा मग चक्क लाल तिखट. चमच्यानं किंवा हातानं. आपापल्या मगदुरानुसार कालवावेत. आणि ओरपावेत. परब्रह्म.
सकाळी सिंकमधे पडलेली खरकटी वाटी / कुंड्या / पातेलं बघून आईची दणदणीत हाक आलीच पाहिजे - जागलात वाटतं काल? उठा आता महाराणी...
दहीपोहे हा निव्वळ रात्रीच्या उपाशी जागरणांशी असोसिएट केलेला पदार्थ नसून माझ्या बाबांच्या वात्सल्याशीही तो निगडीत आहे. बर्याचदा संध्याकाळी बाहेरून गिळून आल्यावर 'हॅ, मला नाहीये भूक. मला नकोय जेवायला' असा आत्मविश्वासपूर्ण पुकारा करून मी परत कॉम्प्युटर / सिनेमा / टीव्ही / पुस्तक / फोन यात घुसते आणि माझी आई श्यामची आई नसल्यामुळे तीही बिनदिक्कतपणे मला वगळून स्वैपाक उरकून जेवणं उरकूनही घेते. पण साधारण साडेअकरा-बाराच्या सुमारास या कुशीवरून त्या कुशीवरून करताना किंवा पुस्तकात लक्ष न लागल्यामुळे इकडेतिकडे बघताना भूक लागल्याचं माझ्या लक्षात येतं. आईला हाक मारून उपयोग नसतो. कारण ती जागी असली तरी ढीम हलणार तर नसतेच; खेरीज 'मगाशी विचारलं तेव्हा तुला भूक नव्हती, आता का? ये बाहेरून खाऊन रोज...' इत्यादी प्रेमळ वाक्योच्चाराची दाट शक्यता असते.
अशा वेळी मॅच वगैरे चालू असल्यामुळे बाबा जागे असले, तर प्रश्नच मिटला. ते मस्तपैकी दहीपोहे कालवतात. त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही. आईच्या 'अहो, हे काय हे..' वगैरेकडे सोईस्कर काणाडोळा करून आमचं जागरण एकत्र साजरं होतं. दहीपोह्यांच्या साक्षीनं.
दिवाळीच्या दिवशी सकाळी मात्र हेच दहीपोहे माझ्यासाठी लीगसी असतात. पेण किंवा रत्नागिरीहून आलेले लालसर रंगाचे पोहे. गिरणीत नव्हे, भट्टीत फुलवलेले. त्यांची चव निराळीच लागते. त्यावर सायीचं दही, फोडणीची मिरची, मीठ आणि किंचित साखरही. फराळाच्या ऐवजी मी नि आई हे पोहेच खातो. आईच्या माहेरी तिला पहिल्या आंघोळीच्या सकाळी असे दहीपोहे खायला आवडत. कदाचित आजीच्या माहेरच्या गरिबीचाही धागा त्याच्याशी जोडला गेला असेल. नाहीतर दिवाळीच्या दिवशी सोन्यासारखा फराळ सोडून दहीपोहे कोण खातो? कारणं काहीही असोत. आईनं ही आठवण कधीतरी सांगितल्यापासून मीही अगदी उद्मेखून आईच्या दहीपोह्यातच सामील असते. त्या दिवशी आमची युती!
रविवार सकाळ आणि पोहे हाही एक अविभाज्य संबंध. पुरवण्यांचा पसारा घालून, एकीकडे 'रंगोली'मधली गाणी ऐकत पोहे हाणल्याशिवाय रविवार सुरूच होत नाही.
बाकी पोहे हे कांदेपोहेच असायला हवेत असं काही नाही. बटाट्याच्या काचर्याही पोह्यात सुरेख लागतात. पण मग पोह्यात 'ती' गंमत येत नाही. वांगीपोहे मात्र माझ्या आवडीचे. तेलात नीट खरपूस तळलं गेलेलं वांगं पोह्यासोबत असं काही जमून येतं की ज्याचं नाव ते. मटारच्या मौसमात मटार घातलेले पोहे त्याच्या रंगामुळे साजरे दिसतात. पण दाणे मधेमधेच येतात... ('गाढवाला गुळाची चव काय? मटार मधेमधे येतो म्हणे. सोलताना खातेस तेव्हा नाही का मधे येत?' इति आईसाहेब!) देशावर तर पोह्यात शेंगदाणे घालतात. पण कित्ती खरपूस तळले तरी पोह्यात शेंगदाणे? छ्या:! एक वेळ कांदा नसेल, तर कोबी घालून पोहे करीन मी - छान लागतात - पण पोह्यात शेंगदाणे? आपल्याला नाई बा पटत.
दडपे पोहे हाही माझ्या प्रेमाचा पदार्थ. स्वैपाघरातून पाटा लुप्त झाल्यामुळे ते दडपून वगैरे ठेवले जात नाहीतच. पण तरी नाव मात्र दडपे पोहेच. पोह्यावर साधी हिंग-जिरं-मोहरीची फोडणी ओतून ते कालवून घ्यायचे आणि मग त्यात पात्तळ चिरलेला कच्चा कांदा, भरपूर कोथिंबीर आणि खवलेला ओला नारळ, हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ, साखर, लिंबू (कुणी कुणी टोमॅटोपण घालतात म्हणे. पण ही नक्कीच अर्वाचीन ऍडिशन असणार. आपण परंपराप्रिय!) मिसळायचं. हातानं. हे महत्त्वाचं. आणि मग दातांना व्यायाम देत देत ते खायचे. काहीसे चामट असले तरी बेफाम स्वादिष्ट. चावून चावून दात दुखायला लागतात, हिरड्या सोलवटतात - असले नाजूक नखरे अंगात असतील, तर मात्र पोह्यांना मुकलात. याच पोह्यांच्या आणि एका व्हर्जनमधे ओल्या खोबर्याच्या ऐवजी ताक शिंपडतात. माझ्या डाएट-दिवसांमधे मी बर्याचदा हीच वापरत असे. पण खरं सांगू का, कुठल्याही लो-कॅलरी पदार्थासारखाच तिच्यातही राम नाही. आणि एका आवृत्तीत पोह्यांना फोडणी देतच नाहीत. आपला काळा (किंवा गोडा) मसाला, कच्चं तेल आणि किसलेलं सुकं खोबरं. बाकी कांदा, मिरची, मीठ, साखर, लिंबू. कालवा आणि खावा. मात्र यात भाजून चुरून टाकलेला पोह्याचाच पापड 'मस्ट'.
पोह्यांच्या याच प्रेमापायी मला कोळाचे पोहे नामक फक्त वाचनातूनच भेटलेला पदार्थ खाण्याची नुसती असोशी लागून राहिलेली होती. 'इतकं नारळाचं दूध कोण काढत बसेल? आणि मग डाएटचं काय? इतके काही छान नाही लागत गं ते पोहे..' यावर आईनं माझी बोळवण केलेली. शेवटी मी 'रुचिरा' की कुठल्याश्या पुस्तकातून हुडकून एकदाचे ते पोहे केले. कच्चे पोहे, त्यावर तितकंच नारळाचं दूध. साधारण एक चतुर्थांश वगैरे चिंचेचा कोळ. मीठ. गूळ. हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आयत्या वेळी मिक्स करून खायचे. पण स्वतः नारळाचं दूध काढण्याचा खटाटोप केल्यामुळे की काय कुणास ठाऊक, खरंच तितकेसे चांगले नाही लागले.
पोह्याचं डांगर हा तर सर्वज्ञात आणि लोकप्रिय प्रकार. मला मात्र तो तितकासा आवडत नाही. त्यातली पापडखाराची चव पुढे आली - आणि ती बर्याचदा येतेच - की सगळा रसभंग होतो. त्यापेक्षा पोह्याच्या पिठाची एक सात्विक चवीची आवृती मला प्यारी. साधारण चमचाभर पीठ आणि कपभर दूध असं एकत्र कालवावं. थोडा गूळ घालावा. कालवताना जपून कालवावं लागतं मात्र. गुठळ्या राहून चालत नाही. तसंच हावरटासारखं चमच्याभरापेक्षा जास्त पीठ घालूनही चालत नाही. ते हा हा म्हणताना फुगून बसतं. आणि पंचाईत होते. रसायन नेमक्या पोताचं आणि चवीचं जमलं, तर मात्र जे काही समाधान होतं, की बस. कम्फर्ट फूड का काय म्हणतात ते हेच, अशी खात्री पटते.
बोरकर कुठेसे म्हणून गेलेत - मला मेल्यावर समुद्रात टाका. मी जन्मभर माशांवर जगलो. त्यांना एक दिवस तरी माझ्यावर जगू द्या...
त्यांचं ठीक आहे. काहीतरी मार्ग तरी होता. मी पोह्यांचं हे ऋण कसं फेडणार?
प्रतिक्रिया
30 Apr 2009 - 8:26 pm | स्वाती दिनेश
मी पोह्यांचं हे ऋण कसं फेडणार?
यस मेघना, हे बाकी अगदी खरं..
पोहे आवडले,(तसेही ते कसेही आवडतातच म्हणा..)
स्वाती
30 Apr 2009 - 8:27 pm | श्रावण मोडक
पोहे छानच लागले. आईच्या हातच्या दडप्या पोह्यांची आणि चिवड्याची आठवण जागी झाली. रात्री डबा हुडकणे आले.
पोहे मी अनेकदा नुसतेच खातो. काही सोपस्कार न करता. त्यात बेळगावकडचे पोहे असतील तर विचारूच नये. बेळगावकडचे पोहे आणि चुरमुरे. ऑफिसच्या खालचा भेळवाला बेळगावहून चुरमुरे मागवतो. मग त्याच्याकडं मी सगळं खाऊन झाल्यावर मसालापुरी न घेता ओंजळभर चुरमुरेच खातो.
30 Apr 2009 - 8:31 pm | मुक्तसुनीत
लेखाबद्दल, त्याच्या गुणवत्तेबद्दल मनात कसलाही किंतु नाही. दिलखुलास आवडलेले लेखन.
"पोहे" हा विषय निघाला, त्याच्या प्रकारा-उपप्रकारांची चर्चा सुरू झाली की क्षणार्धात मन भूतकाळात जाते. मायेच्या माणसांच्या आठवणी येतात. गळ्यात थोडेसे काहीतरी अडकल्यासारखे होते. हे सर्व अशा लेखामुळे होते.
30 Apr 2009 - 9:20 pm | बिपिन कार्यकर्ते
सच्ची!!! क्या बोले तुम मियाँ!!! आउर मेघना का क्या बोलना भई, सह्हीच लिहिलंय...
आजच दहीपोहे खाल्ले सकाळी, तरी गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं झालं :(
बिपिन कार्यकर्ते
4 May 2009 - 4:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी अस्संच झालं बघ मेघना!
आमच्याकडे रात्री रोज एक संवाद नक्की होतो, उद्या सकाळी काय खायचं! आणि त्यावर उत्तर ठरलेलं असतं, "व्हेन इन डिफीकल्टी, मेक पोहे". चारेक दिवस झाले सकाळी पोहे खाऊन की कानावर येतंच, "बरेच दिवस झाले नाही पोहे खाऊन!"
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
30 Apr 2009 - 8:37 pm | सखी
पोहे रुचकर व लेख नेहमीसारखा खुसखुशित झाला आहे. खरचं ह्या पोह्यांनी ब-याच रात्री झोप यायला मदतच केली आहे :)
30 Apr 2009 - 8:55 pm | निखिल देशपांडे
वा काय पोह्यांची आठवण काढली तुम्ही....आता लगेच आइला उद्या दडपे पोहे करायला सांगतो
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
30 Apr 2009 - 9:36 pm | पिवळा डांबिस
जुन्या अनेक आठवणी जाग्या केल्यात.....
आजोळी नरकचतुर्दशीच्या पहाटे केलेले वेगवेगळ्या पद्धतीचे पोहे - दूधपोहे, कोळाचे पोहे, गूळचून घालून केलेले पोहे, ताजं खोबरं शिवरलेले तिखट पोहे.....
हुबळी-धारवाडच्या बाजूला खाल्लेले भरल्या मिरच्या घालून तेलाच्या फोडणीत कडक हिंग मारून केलेले पोहे....
आणखी एक प्रकार सांगतो...
माझ्या लग्नानंतर मला माहिती झाला...
सोडे घालून केलेले तिखट पोहे!!!
एकदा खाल तर पुन्हापुन्हा कराल!!!:)
पोहेआख्यान मुळात मस्तच! त्यात मेघनासारखे पुराणिकबुवा लाभल्यानंतर तर काय मग विचारायलाच नको!!
जियो!!!
30 Apr 2009 - 9:45 pm | मेघना भुस्कुटे
गूळचून घालून केलेले पोहे म्हंजे? मला सांगा ना, मी करून बघीन.
30 Apr 2009 - 9:36 pm | शाल्मली
नेहमीप्रमाणेच खुसखुशीत लेख.
आणि पोह्यांबद्दल तर काय सांगावं? ते तर कसेही छानच लागतात. त्यातही दडपे पोहे आणि फ्लॉवर-मटार पोहे तर फारच खास!
--शाल्मली.
30 Apr 2009 - 9:41 pm | मेघना भुस्कुटे
हे फ्लॉवर-मटार पोहे कसे करायचे? की फोडणीतच फ्लॉवरपण घालायचा नि वाफवून घ्यायचा? मी नाही कधी खाल्ले. पण आता नक्की करून बघीन. धन्यु!
30 Apr 2009 - 9:48 pm | शाल्मली
फ्लॉवरचे लहान तुरे आणि मटार फोडणीत घालून ते जरा परतायचे आणि झाकण ठेऊन एक वाफ काढायची. बाकी नेहमीसारखेच करायचे. मटार तुम्हाला आवडत नाहीत ना.. मग नुसता फ्लॉवर घालून करा. मस्त लागतात.
--शाल्मली.
30 Apr 2009 - 9:37 pm | चकली
सुंदर लेख.
चकली
http://chakali.blogspot.com
30 Apr 2009 - 9:37 pm | चतुरंग
ह्या दडप्या पोह्यांच्या उल्लेखाने उसळून वर आल्या ;). टेनिसच्या अन क्रिकेटच्या मॅचेस बघत रात्ररात्र जागताना भरलेले पोह्याच्या चिवड्याचे बकाणे, दही पोहे, दूध-गूळ-पोहे, फोडणीचे पोहे सगळं सगळं आठवलं. पोह्यात खमंग तळून घातलेले दाणे आणि वरुन खोबरे हा माझा वीक पॉईंट आहे, कोणे एकेकाळी हे पोहे मी कढईभर चेपायचो (हल्ली जमत नाही असलं काही! ;) )
मेघनाताई, तुमची लेखणी अशी फोडणीच्या खमंग मिरचीसारखी चालली ना की अस्वस्थ व्हायला होतं. कायकाय जुन्या आठवणी जागवता बॉ तुम्ही! पण मस्त वाटतं हे मात्र खरं.
वर मुसु म्हणतात तसा दिलखुलास आवडलेला लेख! :)
चतुरंग
30 Apr 2009 - 9:52 pm | प्राजु
खरंच आहे.
पोह्याचं ऋण कसं फेडणार?
पोह्याच्या पाकृ इतक्या आहेत आणि दरवेळी ती पाकृ वेगळी वाटते. माझी आई लावलेले पोहे करते.
थोडे पातळ पोहे, एका वाटीत पातळ तूप घेऊन, त्यात तिखट, मिठ, साखर मिसळावे. आणि त्या पोह्यांवर ओतून हाताने कालवावे. वरून फक्त आणि फक्त कोथिंबीर. व्वा!!! ब्रह्मानंदी टाळी का काय म्हणतात तेच होतं. :)
दातांना उत्तम व्यायाम, आणि जसजसे पोहे चावले जातात, तसतशी तूप आणि तिखटाची चव जीभेवर अशी काही रेंगाळत रहाते... काय विचारावं??
लेख आवडला हे सांगणे न लागे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Apr 2009 - 10:13 pm | श्रावण मोडक
संध्याकाळी साडेचार-पाचची वेळ असावी. वळवाचं चिन्हं असावं. मेघनाच्या या लेखासारखंच काही तरी वाचण्यासाठी असावं. स्पीकरवर काही सुरेख गाणी, उडत्या चालीची - रुपेरी वाळूत सारखी - लागलेली असावीत. लावलेल्या पोह्यांची वरून कोथिंबीर भुरभुरलेली बशी, समोर चांगला ग्लासभर चहा किंवा फक्त आणि फक्त दुधाची किंचीत कडवट कॉफी. एक चमचा पोह्यांचा, एक घोट चहा किंवा कॉफीचा...
स्वगत: किती महिने झाले हे करून? छ्या. मेच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस यासाठी ठेवावे लागणार. वळवाचं चिन्ह पाहून.
30 Apr 2009 - 10:22 pm | बिपिन कार्यकर्ते
ए भौ.... राहू दे ना... का अजून जळवायलाय आमाला..... पुढच्या वेळी सरळ विमानतळावरून तुझ्या घरी येईन हे सगळं खाईन आणि मगच टळेन...
बिपिन कार्यकर्ते
30 Apr 2009 - 11:51 pm | श्रावण मोडक
स्वागत! खाल्ल्यावर टळशील ना ;) , मग ये!!!
1 May 2009 - 12:08 am | बिपिन कार्यकर्ते
हो रे... पण परत येईन...
बिपिन कार्यकर्ते
30 Apr 2009 - 9:55 pm | शितल
पोहे.. कसे खाल्ले तरी मला आवडतात.
दडपे पोहे आणि गुळ चुरून ओले खोबरे घातलेले हातसडीचे कोकणातील लाल पोहे म्हणजे स्वर्गच. :)
30 Apr 2009 - 10:25 pm | अनामिक
मेघनाताई लै भारी जमलेत पोहे! पोहे हा माझा वीक पॉईंट.
प्राजुताई म्हणते त्याप्रमाणे, लावलेले पोहे हा माझाही जीव की प्राण... त्यात दुरुस्ती म्हणून मी ते थोडेशे भाजून घेतो आणि पोहे लावताना त्यात थोडी धने-जिरे पुड (तिखटा मिठा बरोबर ) घालतो... पोहे खुसखुशीत तर होतातच पण खमंगही होतात. वरुन बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर.... खुप सह्ही लागतात. सध्या बर्याचदा हे पोहे म्हणजे माझे जेवण असते.
तुमच्या लेखामुळे अजून एक आठवले ते सातु लावलेले पोहे (सातुचे पोहे). आई दर उन्हाळ्यात घरी सातुचे पीठ करायची/करते. वर लिहिल्याप्रमाणेच पण सातुचे पीठ घालून केलेले पोहे म्हणजे काय विचारुच नका. या पोह्यात भरपूर कांदा घातला तर अजून छान लागतात. उन्हाळ्यात संध्याकाळी चहाबरोबर हे पोहे खायचो त्याची आठवण झाली.
तसेच लहान असताना दुध - साखर - पोहे खायचो तेही आठवले!
-अनामिक
30 Apr 2009 - 10:52 pm | भडकमकर मास्तर
लै बेस्ट लेख..
रविवार सकाळ आणि पोहे हाही एक अविभाज्य संबंध. पुरवण्यांचा पसारा घालून, एकीकडे 'रंगोली'मधली गाणी ऐकत पोहे हाणल्याशिवाय रविवार सुरूच होत नाही.
आपल्याला तर आप्लंच घर दिसायला लागलं...
30 Apr 2009 - 10:55 pm | भाग्यश्री
ओह गॉड.. तू का लिहीतेस असं??? वजन वाढायला तू कारणीभूत आहेस हा! :)
मस्तच जमलाय! अफाट आवडला! आत्ताच्या आता पोहे करणार! :)
मात्र मला आणि नवर्याला तळलेले दाणे पोह्यात भयंकर आवडतात! दाण्याशिवाय पोहे नाहीत..
बाकीचे बरेच ऐकलेले पण न केलेले प्रकार कळले.. करून पाहाणार!
www.bhagyashree.co.cc
1 May 2009 - 12:09 am | नंदन
लेख अतिशय आवडला. तळकोकणात दिवाळीच्या दिवशी नैवेद्य असतो तो 'नवीन' पोह्यांचा. भाताचे पीक नुकतेच आलेले असते, त्याच्याच पोह्यांचा देवाला निवेद दाखवून दिवाळी सुरू होते. लालसर रंगाचे गावठी पोहे आणि त्यात घातलेले गूळ-खोबरे ही तर नरकचतुर्दशीची मंगलप्रभातच. बाकी रंगोली - पोहे - आल्याचा चहा - मटा/लोकसत्ता पुरवण्या (एकेकाळी याही वाचनीय असत) हे वर्णन नॉस्टॅल्जिक करून गेले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
1 May 2009 - 12:59 am | चित्रा
नेहमीच्या पोह्यात दाणे अजिबात आवडत नसणारी एक तरी अजून व्यक्ती मिळाली याचा आनंद झाला.
नेहमीप्रमाणे छान लेख.
1 May 2009 - 1:57 am | धनंजय
पोहे हे माझेसुद्धा फास्ट-फूड आहे. दहीपोहे सकाळी घाईत डब्यात भरतो. रात्री-अपरात्री फोडणीचे पोहे करतो...
कुठलेही भावना'प्रदर्शन' न करता भावुक करणारा हा लेख फारच आवडला.
(न-दडपलेले दडपे पोहे आता केलेच पाहिजेत...)
1 May 2009 - 1:57 am | चित्रादेव
मला तर लालसर जाडे पोहे जे कोकणातून आलेले असत त्यात फक्त आई ओले किसलेले खोबरे, गूळ असे मिक्स करून दिवाळीच्या दिवशी बनवत असे ते खूप आवडतात. ते लाल पोहे नुसते चहात भिजवून पण मस्त पोट भरायचे लहानपणी. पण सकाळी सकाळी नुसते कांदेपोहे म्हणजे ऍसीडिटीला आंमत्रण खात्रीने.
1 May 2009 - 2:05 am | जृंभणश्वान
पोहे खायलाच पाहिजेत आता लगेच !
शंगदाणे कसे आवडत नाहीत, मला तर शेंगदाण्याशिवाय पोहे गळ्याखाली उतरणे अवघड आहे.
नियमितपणे पोहत जा.
1 May 2009 - 10:22 am | बिपिन कार्यकर्ते
=))
बिपिन कार्यकर्ते
1 May 2009 - 2:11 am | घाटावरचे भट
मेघनातै, पोहे पुराण आवडले. पण...
असहमत. अशा पोह्यांची खुमारी काही निराळीच आहे. असो, आवड आपली आपली...
बाकी वर रंगारावांनी म्हटल्याप्रमाणे मी देखील कालिजातून परत आल्यावर कढईभर पोहे चेपत असे आणि आईकडून 'बकासूर मेला!!' अशी कांप्लिमेंट मिळाली की मगच तृप्त होत असे....जुन्या आठवणी जाग्या झाल्या. उत्तम लेखाबद्दल अभिनंदन.
1 May 2009 - 3:31 am | शोनू
कर्नाटकात भाजलेले पोहे, फोडणी ( अन इतरही प्रकार) कुटून त्याची पूड करतात ती कुट्टवलक्की या नावाने मिळते. त्यात ताजं खोवलेलं खोबरं, चालत असेल तर बारीक चिरलेला कच्चा कांदा अन थोडं खोबर्याचं तेल मिसळून कालवून खातात. काय मस्त लागतो तो प्रकार.
1 May 2009 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार
सुगरणतै भारीच लिहिलय बर का ;)
आपला आवडता पदार्थ म्हणजे तेल तीखट पोहे ! २४ x ७ कधीपण खावा, एकदम झकास.
आणी पोह्यात दाणे का बरे आवडत नाहीत ? ते तर पोह्यात जेव्हडे पोहे मस्ट आहेत तेव्हडेच मस्ट आहेत बॉ.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
1 May 2009 - 1:57 pm | अबोल
मेघना, जाडे पोहे घेऊन त्यात भरपूर ओले खोबरे व चवीप्रमाणे गुळ व मिठ घालावे व कालवून खावे.
1 May 2009 - 2:27 pm | सहज
मी पोह्यांचं (पक्षी:आईचे) हे ऋण कसं फेडणार?
पोहे झाले नाहीत असा आठवडा माझ्या आयुष्यात गेला नव्हता २००३ पर्यंत. २००३ मधे आई अचानक गेल्यावर मी पोहे सोडले ते सोडलेच.
नूडल इज टू चायनीज तसे पोहे इज टू मराठी फोक्स म्हणता येईल का? नुडल्स्च्या नावाने एखाद्या चायनीजला, बटाटा म्हणुन एखाद्या जर्मनला हा लेख टेम्प्लेट म्हणुन वापरता येइल :-)
1 May 2009 - 5:30 pm | मेघना भुस्कुटे
मला मेल्यावर समुद्रात टाका. मी जन्मभर माशांवर जगलो. त्यांना एक दिवस तरी माझ्यावर जगू द्या...
हे दळवींचं वाक्य नसून बोरकरांचं वाक्य आहे. पिडांकाकांची सूचना आणि नंदनचं अनुमोदन यावरून बदल केला आहे. :)
1 May 2009 - 7:17 pm | चन्द्रशेखर गोखले
मेघनाताई , खरं म्हणजे सुगरणीचा सल्ला किंवा आजचा पदार्थ वगैरे लेख मी कधीच वाचत नव्हतो. पण सहज म्हणुन आज हा तुमचा
पोह्यांवरील लेख वाचला आणि खूप खूप आवडला ! पोह्या सारख्या पदार्थावर इतका सुंदर लेख होउ शकतो.? आपली वर्णन करण्याची शैली छानच आहे . हल्लीच्या पिढीला दुधसाखर पोहे, दडपे पोहे , हात फोडणीचे पोहे हे पदार्थ माहितच नाहीत. भुक लागली म्हंटल्यावर आई हे असले चवदार पदार्थ करून द्यायची . हा लेख वाचुन ते दिवस आठवले..!
1 May 2009 - 8:39 pm | क्रान्ति
लेख पोह्याच्या कोणत्याही पाकृइत्काच खमंग आणि चविष्ट झालाय. पोह्याचे खरंच जितके प्रकार करू तेवढे कमीच! कोकणातल्या पोह्यांची चव अगदी खासच. आता पोह्यांची भूक लागली!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
4 May 2009 - 4:47 pm | साक्षी
पातळ पोहे चांगले भाजून घ्यावे. हे पोहे चांगले कुरकुरीत व्हायला हवेत. नंतर आयत्यावेळी त्यात तिखट, मीठ, चिमूटभर सा़खर आणि लिंबू पिळून कालवून खायचे. माझ्या सासुबाई असे पोहे करतात. त्याला चाचपोहे म्हणतात.
बाकी कोकणातल्या लाल पोह्यांची चव इथल्या शहरी पोह्यांना येत नाही. माझ्या आईच्या माहेरी देखील दिवाळीला पहिल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पोहे करण्याची पद्धत होती. त्या दिवशी ठाकर लोक दारावर येत, त्यांना पोहे देण्याची पद्धत होती असे आई सांगते. आई देखील अजूनही दिवाळीला पोहे करते आणि त्यामुळे आता मीही करते.
~साक्षी.
4 May 2009 - 7:37 pm | मेघना भुस्कुटे
वीकान्ताला 'लावलेले पोहे' लावून पाहिले. अप्रतिम प्रकार. या प्रकाराची भर माझ्या माहितीत घातल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
फ्लॉवर पोहेही करून चापले. तेही मस्त लागतात. त्यातले फ्लॉवरचे नाजूक तुरेही मस्त दिसत होते.
गूळचून घालून केलेले पोहे, सोडे घालून केलेले पोहे आणि चाचपोहे बाकी, नक्की करून बघणार. :)
बाय दी वे, एका मित्रानं सांगितलेल्या सुधारणेप्रमाणे कोळाचे पोहे करताना पोहे आधी भिजवून घेतात. आणि कोळ+नारळाचं दूध+मिरची+मीठ+गूळ या मिश्रणाला तूप-जिर्याची फोडणी देतात.
बाकी सगळ्या उत्साही प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार. :)
8 May 2009 - 5:54 pm | सुप्रिया
पोहेपुराण आवडले.
- सुप्रिया
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
8 May 2009 - 6:53 pm | लिखाळ
वा ! लेख एकदम आवडला :)
कादेपोह्यांवर साखर पेरुन खायला मला कधी कधी आवडते. तर कधी पोह्यांबरोबर मिरगुंड अथवा तिखट लिंबाचे लोणचे.. वाहवा!!
आता मटार-पोहे खात खात प्रतिसाद देतो आहे :)
-- लिखाळ.
8 May 2009 - 7:13 pm | संदीप चित्रे
मेघना,
>> दडपे पोहे हाही माझ्या प्रेमाचा पदार्थ. स्वैपाघरातून पाटा लुप्त झाल्यामुळे ते दडपून वगैरे ठेवले जात नाहीतच. पण तरी नाव मात्र दडपे पोहेच. पोह्यावर साधी हिंग-जिरं-मोहरीची फोडणी ओतून ते कालवून घ्यायचे आणि मग त्यात पात्तळ चिरलेला कच्चा कांदा, भरपूर कोथिंबीर आणि खवलेला ओला नारळ, हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ, साखर, लिंबू (कुणी कुणी टोमॅटोपण घालतात म्हणे. पण ही नक्कीच अर्वाचीन ऍडिशन असणार. आपण परंपराप्रिय!) मिसळायचं. हातानं. हे महत्त्वाचं. आणि मग दातांना व्यायाम देत देत ते खायचे. काहीसे चामट असले तरी बेफाम स्वादिष्ट. चावून चावून दात दुखायला लागतात, हिरड्या सोलवटतात - असले नाजूक नखरे अंगात असतील, तर मात्र पोह्यांना मुकलात.
>>
अहाहाहा.... सकाळी सकाळी का त्रास देते? दडपे पोह्यांच्या आठवणीने जीव वर-खाली होतोय ना !
मला तर नेहमीचा चिवडा आणि चकलीही खुसखुशीत असण्यापेक्षा जरा चिवट असलेले आवडतात :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
14 Aug 2009 - 4:00 pm | भाग्यश्री कुलकर्णी
माझाही दडपेपोहे हा वीक पा.आहे.ईथे इन्दोरात पोहे आणी जिलबी सगळीकडे मिळते.
14 Aug 2009 - 10:24 pm | नीधप
उद्या सकाळी दहीपोहे किंवा दूधगूळपोहे खायलाच हवेत.
>>पण कित्ती खरपूस तळले तरी पोह्यात शेंगदाणे? छ्या:! एक वेळ कांदा नसेल, तर कोबी घालून पोहे करीन मी - छान लागतात - पण पोह्यात शेंगदाणे? आपल्याला नाई बा पटत.<<
शेंगदाण्याशिवाय पोहे? म्हणजे देव नाही देवळात झालं की हो....
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 Aug 2009 - 7:25 am | अनिरुध्द
पोह्यांचे गुण काय वर्णावे महाराजा! केव्हाही भूक लागली की पोहे हे ठरलेलेच. मेघना कोळाचे पोहे जे तु खाल्लेस तेही अप्रतीम लागतच असतील. पण पोहे खरपूस भाजून खाल्लेस तर ते अजून छान लागतात. खाऊन बघच एकदा. आणि हो, त्याच्याबरोबर पोह्यांचा पापड तर हवाच बरं का.
27 Nov 2012 - 11:57 am | भलती भोळे
जिव्हा-ळ्याचे पोहे
27 Nov 2012 - 2:35 pm | नगरीनिरंजन
उत्तम जमलेल्या पोह्यांसारख्या लेखात शेंगदाण्यांबद्दलच्या अनुदार उद्गारांचा खडा लागला.
-एक बाणेदार दाणेप्रेमी.
27 Nov 2012 - 4:29 pm | सुबक ठेंगणी
अगं दडपे पोहे करताना पातळ पोहे थोडेसे भाजून घ्यायचे की चामट न लागता अगदी खुसखुशीत लागतात :)
पोह्याचं डांगर जाऊदेत पण पोह्याच्या पापडाच्या लाट्यांची मात्र मनापासून आठवण होते आहे. :(
27 Nov 2012 - 4:53 pm | मेघना भुस्कुटे
आभार मंडळी, हे सगळे लेख इथे गावतील.
23 May 2016 - 7:53 pm | एस
आईशप्पत! लिटरभर लाळ गळली हे वाचून. मी चाललो पोहे हादडायला!
23 May 2016 - 8:10 pm | मुक्त विहारि
वाखूसा.
23 May 2016 - 8:31 pm | मुक्त विहारि
घरापासून दूर असतांना आणि काही कारणांमुळे, थोडी काटकसर करणे भाग होते.अशावेळी झटपट होणारा आणि २-३ दिवस टिकणारा एक पदार्थ म्हणजे पोह्यांचा मसाला भात.
साहित्य : ३-४ बटाटे, २-३ कांदे, २-३ टोमॅटो, २-३ वांगी, मटार,कोळंबी(ऐच्छिक) आणि खूपसे पोहे.
कृती : पोहे पाण्यात भिजवत ठेवा आणि थोडे पाणी आणि त्यात मटार घालून उकळायला ठेवा. कोळंबी पाण्यातून काढा.
बटाटे चिरून फोडणीला टाका.ते शिजत असतांनाच कांदे चिर्रुन घ्या.कांदे चिरून झाले की ते पण फोडणीत टाका आणि वांगी टोमॅटो चिरायला घ्या.टोमॅटो चिरून झाले की मग ते पण ह्या कांद्या-बटट्याच्या भाजीत टाका आणि वांगी चिरायला घ्या.
आता कांदे-बटाटे-टोमॅटो ह्याचा मसत रस्सा तयार होत आला की थोडी साखर (उगीच आपली टाकली न टाकली, इतपतच. साखर घातल्यामुळे रश्श्याला रंग उत्त्म येतो.) आणि तिखट टाका.आता त्यात वांगी मिसळा आणि वागी बुडतील इतपत गरम केलेले पाणी टाका.एक उकळी आली की भिजवलेले पोहे टाका.
झाकण ठेवून एक-दोन वाफा काढा.
आता जोडीला, चिरलेली काकडी, उकडलेले बीट आणि अंडे घेवून जेवायला बसा.
जेवून झाले की अर्ध्या तासाने एक ग्लास फुल-क्रीम ताक प्या आणि जोडीला एखादे केळे असेल तर फारच उत्तम.
पोह्यांच्या जागी, चूरमूरे वापरले तरी चालतात.(निदान मला तरी चालायचे.)
=======================================
"मी पोह्यांचं हे ऋण कसं फेडणार?" ह्या मताशी सहमत.
26 May 2016 - 3:43 pm | प्रियाजी
मेघना, आत्ताच साईन ऑफ करून झाल्यावर सहज तुमचा लेख उघडला आणि वाचून तोडांत लाळ जमा झाली आहे. आता पोहे करणे आलेच. मु़ख्य म्हणजे कॉमेंट टाकणे जरूर वाटल्याने परत साईन इन केले.वाचन खूण साठवली आहे. तुमच्या ब्लॉगवर जाउन डोळ्यांनी फेण्याही मन्मुराद खाल्या. उरलेला ब्लॉग नंतर वाचीन म्हणते. लेखन स्टाईल पण खुसखुशीत. मीही टोमॅटो पोहे करते ते केले की नक्की ईथे कृती डकवीन. परत एकदा थन्क यु.
27 May 2016 - 11:20 am | जयन्त बा शिम्पि
आमच्याकडे आम्ही ' पोह्यांच्या चकल्या " करुन पाहिल्या. अतिशय छान व तळून काढल्यावर खायला कुर्कुरीत ! ! सहज कोणालाही करता येतील. !
28 May 2016 - 9:11 am | विवेकपटाईत
आज सकाळी आत्ताच म्हणजे मी पोहे केले. अजून खायचे आहे. आमची सौ.चे म्हणणे आहे, मी पोहे छान करतो. पोह्यात फ्लावर, शिमला मिरची , बटाटा कांदे आणि कोथम्बीर आणि कढीपत्ता टाकून केला.