१९ फेब्रुवारी २०२२
दुर्गराज राजगड हा तसा अगदी हृदयाच्या जवळचा किल्ला, रायगडापेक्षाही प्रिय.....नेहमीचं आपलासा वाटणारा, कोवळ्या वयात चालत सर केलेला व मुक्कामी राहिलेला हा पहिला किल्ला म्हणूनही असेल कदाचित पण राजगड हा नेहमीच सर्वात वेगळा वाटत आलाय. राजगडाला २००९ पासून वर्ष-दोन वर्षातून एखादी फेरी होतेच होते पण कोरोनाआधी दीड वर्षं व कोरोनातील दीड वर्ष असा 3 वर्षांचा खंड पडल्यामुळे ह्या वर्षीची शिवजयंती राजगडावरचं साजरी करायची असा ठाम निश्चय केला व मित्रांच्या साथीनं तो अंमलातही आणला.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वेल्हे गावाच्या साधारण आग्नेयेस सुमारे १६ किलोमीटर वर समुद्रसपाटीपासून सुमारे १३२२ मीटर उंचीवर हा किल्ला आहे. पायथ्यापासून किल्ल्याची उंची साधारणपणे ६०० मीटर एवढी भरते. १९ फेब्रुवारीच्या भल्या पहाटे ३.३० वाजताच दिवस सुरू झाला. आन्हिकं तत्परतेनं उरकून, मित्रांना वेळेवर तयार राहण्यासाठीच्या सूचना देऊन ठीक ४.४५ ला गाडीला स्टार्टर मारला.
दोन मित्रांना घ्यायला गावातील मुख्य चौकात पोहोचलो तर तिथे स्थानिक राजकारणी मंडळींनी शिवजयंती साजरी करण्याची जोरदार तयारी करून ठेवली होती. प्रचंड मोठ्या LED स्क्रीन्स आणि विद्युत रोषणाई यांची टेस्टिंग सुरू होती. पहाटेच्या शांत वातावरणात तो अप्रतिम असा नजरा पाहत थोडा वेळ रेंगाळलो. छत्रपतींच्या पुतळा व चौथरा यांची ही नजरबंदी करणारी सजावट पूर्ण झाली होती. तिथे ही राजांना मुजरा करायला हजेरी लावली.
पण या सर्व अनपेक्षित गोष्टींमुळे गडाकडे प्रयाण करण्याची ठरवलेली नियोजित वेळ टळून थोडा उशीरचं झाला पण ५.३० च्या आसपास गाडी मार्गाला लागली. चंदननगर-येरवडा-कॅम्प-स्वारगेट-कात्रज घाट-नसरापूर फाटा-मार्गासानी-साखरमार्गे गुंजवणे गावात साधारण सकाळी ७ वाजेच्या आसपास पोचलो. गाडी पार्क करून एका स्थानिक हॉटेलात नाश्ता उरकला व लगोलग गडाच्या वाटेला लागलो.
गडावर जाण्याचे चार-पाच मार्ग जरी असले तरी प्रामुख्याने रुळलेले दोन मुख्य मार्ग आहेत. पाली दरवाजा आणि गुंजवणे चोर दरवाजा. पाली दरवाजा हा गडावर येण्याचा मुख्य राजमार्ग असून दोन दरवाजे पार करून किल्ल्यावर पोहोचता येते. पाली गाव किल्ल्याच्या पश्चिमेला आहे, तर गुंजवणे हे गाव गडाच्या ईशान्येला आहे. पाली गावाकडे जाणारा रस्ता नव्याने केला गेलाय, तिथे तिठ्यावर पुर्वी ती वाट समजून येत नसल्याने गुंजवणेकडे जाताना गल्लत होत नसे, पण आता या गडावर जाणाऱ्या दोन्ही वाटा निवडण्यात थोडीफार फसगत व्हायला लागलीय, असो, कुठूनही गेलात तरी गडावर पोहोचता येतेच त्यामुळे काळजी नसावी.
पण सध्या प्रचलित आणि लोकप्रिय असलेली वाट गुंजवणे गावातून चोर दरवाजा मार्गे पद्मावती माचीवर येते. आम्हीही गुंजवणे गावातून चोर दरवाजा मार्गेचं चढाई सुरू केली. रस्त्यात जागोजागी स्थानिकांनी लावलेली काठ्या, पाणी, सरबत विकणारी अनेक तात्पुरती उभी केलेली दुकाने आहेत. प्रत्येकाला त्यांच्याकडून आग्रह होत असतो, सकाळच्या वेळी हे जरा त्रासदायक प्रकरण वाटत पण एकदा उन्हे चढू लागली की त्यांच्या तिथे असण्याचा आधारच वाटतो.
असो......मजल-दरमजल करीत, आलेल्या इतर हायकर्सशी गप्पा मारीत, सुवेळा माचीच नेढे डाव्या हाताला ठेवत आमची चढाई सुरू होती. सुरवातीच्या मध्यम चढाईनंतर पठार लागतं. इथे थोडा वेळ आराम करूनच पुढच्या चढाईला सुरुवात करावी कारण हे पठार ओलांडुन गेल्यावर सुरू होते ती खडी चढाई व अवघड,बिकट होत जाणारी वाट. दरीच्या तोंडावर रेलिंग लावलेली, सरळ उभ्या खडकात खोदून काढल्यासारखी व पावसाळ्यात वरून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्याने बनलेली अशी अनुभवी हायकर्सचाही घाम काढणारी वाट चढून जावी लागते. चोर दरवाजाच्या जवळ जाता-जाता अक्षरक्ष: काटकोनात चढाई करावी लागते. या भागात बसवलेल्या रेलिंग्समुळे मोठा आधार मिळतो अन्यथा रोप लावल्याशिवाय हा टप्पा चढणे-उतरणे म्हणजे कर्मकठीण काम.
हा टप्पा पार करून आपण चोर दरवाजाच्या छोट्याशा प्रवेशद्वारात पोचतो व तिथून बांधीव पायऱ्या चढून पद्मावती माचीवर पोचतो. भलामोठा पद्मावती तलाव इथे आपलं स्वागत करतो. पद्मावती माची पुष्कळ लांब-रुंद असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती येथेच होती. पुर्वीच्या बांधकामांचे अनेक अवशेष इथे दिसतात. गडावरील मुख्य देवता पद्मावती, तिचे मंदिर पद्मावती माचीवर आहे.पद्मावती मंदिराचाही जीर्णोद्धार झालेला आहे. समोरच पर्यटकांसाठी काही खोल्या बांधलेल्या आहेत. सईबाईसाहेबांच्या समाधीचा चौथराही आपल्याला इथेच पाहायला मिळतो.
याशिवाय पूर्वी सदर (काहीजणांच्या मते तट सरनाईकाचं घर तथा कचेरी) देखील येथेच होती, पण नंतरच्या काळात ती भुईसपाट झाली ती आता पुन्हा नव्याने बांधून काढली आहे, सदरेच्या बाजुलाच अंबरखाना आणि त्यापाठीमागे एक टाके आहे. सदरेच्या समोरच्या बाजूला दारुगोळा कोठार आहे.
सदरेच्या थोडं पुढं आल्यावर दोन वाटा फुटतात. चढणीची एक वाट बालेकिल्ल्याकडे तर दुसरी संजीवनी माचीकडे जाते, सदरेखालून सरळ बालेकिल्ल्याला समांतर पण बरीच खालून जाणारी वाट सुवेळा माचीकडे जाते. याच माचीवर, निसर्गाचा आविष्कार असलेले नैसर्गिक नेढे म्हणजेच खडकाला नैसर्गिकरीत्या पडलेलं आरपार छिद्र, पाहायला मिळते.
सुवेळा माचीची वाट ही सुंदर आहे, काही ठिकाणी एका बाजूला तर काही ठिकाणी दोन्ही बाजूला दरी, या वाटेवरून थोडं पुढे चालत गेल्यास उजव्या हाताची टेकडी आपल्याला झुंजार बुरुजावर घेऊन जाते, भाटघर धरण परिसर, संपुर्ण भोर परिसर इथून न्याहाळता येतो व तिथून पुन्हा खाली येऊन सुवेळा माचीकडे जाता येते. तटबंदी, नेढे, एक भुयारवजा जागा आणि औरंगजेबाच्या वेढ्याच्यावेळी अतुलनीय शौर्य गाजवून धारातिर्थी पडलेल्या संताजी शिळीमकर या वीराची वीरगळ अशा गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.
गडाच्या पश्चिम दिशेस असलेली संजीवनी माची ही तिच्या तिहेरी चिलखती तटबंदी व वैशिष्ट्यपुर्ण बुरुज बांधकामामुळे दुर्गबांधणी शास्त्रातील एक वेगळा अध्याय ठरावा अशी आहे. ही माची लांबीला अडीच किलोमीटर तरी नक्कीच भरेल. साधारण, दोन-तीन टप्प्यांमधे उतरत गेलेली, प्रत्येक उतरत्या टप्पावर चिलखती बुरुजांचे कोंदण असलेली अशी ही माची. माचीच्या रस्त्यावर अनेक उद्धवस्त बांधकामांचे अवशेष दिसत राहतात.
आधीच्या गडफेऱ्यांमध्ये या दोन्ही माच्या व्यवस्थित पाहून झाल्या होत्या त्यामुळे तिकडं जाणार नव्हतो मग कितीही वेळा गडावर गेलं तरी चुकवू नये अशा जागी म्हणजे बालेकिल्ल्याकडे आम्ही आमचा मोर्चा वळवला.
राजगडाचा बालेकिल्ला म्हणजे एक महान थोर प्रकरण आहे. राजगडाच्या सर्वात उंच भागात हा जादुई बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. हलणाऱ्या रेलिंग्जच्या आधाराने सरळ काटकोनात चढाई करत जावं लागतं. काही ठिकाणी एकावेळी एकचं जण चढू किंवा उतरू शकतो इतकी अरुंद जागा आहे. छत्रपतींचं स्मरण करतचं हा टप्पा चढून जावा लागतो. ही चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा महादरवाजा लागतो. हा दरवाजा आजही अगदी उत्तम स्थितीत आहे. महादरवाजावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्हं कोरलेली दिसली.
बालेकिल्ल्याला उंच तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही बांधले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननी मंदिर लागत. इथून पुढे गेल्यावर अर्धचंद्राकार तलाव लागतो. तळ्याच्या समोरच उत्तर बुरुज आहे. इथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या वरील भागात भगवा ध्वज फडकत असतो. असं सांगितलं जातं की त्या बुरुजाखालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते जी मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. बालेकिल्ल्यावरून संपूर्ण १२ कोसाचा घेर असलेल्या राजगडाचं संपूर्ण दर्शन होत. सर्व माच्या व परिसर इथून स्पष्ट दिसतात.
आजूबाजूचा परिसर अगदी डोळ्यांचे पारणे फिटावे असा सुंदर दिसतो, तोरणा-सिंहगड स्पष्ट ओळखू येतात. वातावरण स्वच्छ असेल तर पुरंदर ही दिसतो इथून.
शिवाय बालेकिल्ल्यावर सर्वात महत्त्वाचं व प्रेरणादायी, नतमस्तक व्हावं असं ठिकाण म्हणजे छत्रपतींचा राहता राजवाडा, काही भग्न अवस्थेतल्या इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष दिसतात ज्याठिकाणी साक्षात छत्रपती, माँसाहेब जिजाऊसहित राहिले, याच वाड्याने सईबाईसाहेबांचा मृत्यू पाहिला, जिथे शंभूराजे, रामराजे खेळले, बागडले, संपुर्ण राणीवसा, कुटुंबकबिल्यासहित खुद्द छत्रपती जिथे नांदले अशा जागी आपण उभे आहोत हे नुसतं आठवून ही अंगावर रोमांच उभे राहतात. शिवजयंतीला नतमस्तक होण्यासाठी जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम जागा म्हणजे राजगड हे त्यावेळेस मनापासून पटते.
असा हा तब्बल सव्वीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणुन भार वाहिलेला शिवकालातील एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला, सईबाईसाहेबांचा मृत्यू, अफजलखानाच्या स्वारीवेळी जिजाऊमाँसाहेबांचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडाला निघालेले महाराज, पुण्याला आपल्या मगरमिठीत घेऊन बसलेल्या शाईस्तेखानावर छापा घालण्यासाठी चालणारी खलबतं व नंतर त्याची बोटे छाटून विजयी मुद्रेने किल्ल्यावर परतणारे महाराज, आग्र्याहून सुटका करवून घेऊन भगव्या कफणीत जिजाऊंच्या भेटीला आलेले महाराज, पोटच्या गोळ्याचे, शंभूराजांचे, जिवंतपणी पार पडणारे क्रियाकर्म आणि घातले जाणारे दिवस स्थितप्रज्ञपणे पाहणारे महाराज, रामराजेंच्या जन्माचा आनंद साजरा करणारे महाराज....
महाराजांची अशी अनेक रूपे पाहण्याचं, त्यांच कर्तृत्व अनुभवण्याचं, इतर कुठल्याही किल्ल्याच्या नशिबी नसणारे भाग्य राजगडाला लाभलं. स्वराज्याची बाल्यावस्था ते सुवर्णकाळ अनुभवलेला व नंतरच्या पडत्या काळात ही ताठ मानेने उभा राहून राज्याला आधार देण्याचं काम केलेला हा बेलाग, बुलंद राजगड.
बालेकिल्ल्याचा थरार अनुभवून पुन्हा शिवरायांचं स्मरण करीतच आम्ही बालेकिल्ला उतरून पुन्हा पद्मावती माचीकडे आलो. गडावरील शिवजयंती उत्सवाची जोरदार तयारी इथे सुरू होती, सईबाईसाहेबांच्या समाधीचा चौथराही फुलांनी सजवला होता. शिवरायांची पालखी सजवण्यात आली होती. संपुर्ण परिसर स्वच्छ केला गेला होता. वातवरणात वेगळाच उत्साह भरून राहिला होता. शिवज्योतीची मशाल घेऊन जाणारे मावळे पावला-पावलांवर दिसत होते.
अशा सर्व भारलेल्या वातावरणात आम्ही श्रीमंत राजगडाचा निरोप घेऊन परतीची वाट धरली. आल्यामार्गेच परत जायचे होते, आता चढण नसली तरी सरळ उतार उतरून जायचं आणि दगड मातीच्या, छोटे छोटे खडे पसरलेल्या वाटेवरून न घसरता, तोल सांभाळत उतरून जाणं नक्कीच सोपं नव्हतं, त्यात सूर्य नारायण अगदी डोक्यावर येऊन आग ओकत होता. थोडं थांबत, बसत हळू हळू आम्ही गड उतरत होतो. दरम्यान गडावर जाणाऱ्या इतर शिवभक्तांची जुजबी चौकशी ही करत होतो, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले वय वर्षे ४ पासून साठी-पासष्टीला टेकलेले अनेकजण भर उन्हात छत्रपतींचा जयघोष करीत चढणं तुडवत होते. लहान-लहान दमलेली मुलं ही उत्साहाने किती लांब आहे अजून किल्ला विचारात होती, आम्ही ही त्यांचा उत्साह वाढवत होतो. साधारण दीड तासात आम्ही पुन्हा पार्किंगच्या जागी पोहोचलो देखील होतो.
जवळच्या हापशावर हात-पाय धुवून, थोडा वेळ बसून आम्ही परतीचा मार्ग धरला. जेवणासाठी खेड-शिवापूर गाठलं. तीन वाजायच्या आसपास तिथं पोचलो, टेबल लगेच मिळाल्यामुळे भरपेट आडवा हात मारून लगोलग घराकडे प्रयाण केलं. शहराच्या ट्रॅफिक मधून वाट काढीत, संध्याकाळी सहाच्या आसपास मोहिमेची यशस्वी सांगता झाली.
शिवजयंतीच्या पवित्र दिवशी संकल्प केल्याप्रमाणे श्रीमंत राजगडाचं दर्शन अगदी निर्विघ्नपणे पार पडल्याचा आनंद काही औरच होता.
प्रतिक्रिया
4 Aug 2022 - 8:32 pm | कंजूस
वर्णन आवडलं. कोठारांचे फोटो?
10 Aug 2022 - 12:59 am | पर्णिका
वाचतांना अंगावर रोमांच उभे राहिले.
लेख फारच सुंदर झाला आहे, फोटोंनी बहार आणली.
डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं, मस्तच !
16 Aug 2022 - 3:39 pm | गोरगावलेकर
वर्णनही सुंदर. लागोपाठ आलेल्या भटकंतीच्या अनेक घाग्यांमुळे प्रतिक्रिया कमी असाव्यात का?
16 Aug 2022 - 5:18 pm | मुक्त विहारि
आणि सुंदर फोटो
19 Aug 2022 - 6:13 pm | विनोदपुनेकर
खूप सुंदर फोटो आणि वर्णन पण अप्रतिम,
वैयक्तिक माझ्या सर्वात आवडता किल्ला म्हणजे वास्तुपुरुष राजगड, प्रत्येक वेळी गेले की नवीन भासतो राजगड,
गणपती विसर्जन झाले की हिरवागार राजगड पाहायला जाणार आहे ते फोटो इथे शेयर करायला आवडेल