काल दुर्दैवाने मला केजीएफ नावाचा एक अत्यंत बंडल सिनेमा पहावा लागला. पहातानाच इतका सुन्न आणि बधीर झालो होतो की सिनेमा कधी संपला, मी कधी घरी गेलो, कधी जेवलो आणि कधी झोपलो ते समजलेच नाही. सकाळी उठलो तर बायको म्हणाली “रात्री झोपेत गरुडा... गरुडा... असे बरळत होतास”
पण आता साधारण बारा तासांनी मी पूर्णपणे शुद्धीत आलो आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आत्यंतिक काळजीने इश्वराला स्मरुन सत्यनिष्ठेची शपथ घेउन मी हा संदेश लिहित आहे. सिनेमाची स्टोरी वाचण्याकरता जर तुम्ही हा धागा उघडला असेल तर पुढे वाचू नका. ही केवळ एका पामर प्रेक्षकाची कैफियत आहे.
या सिनेमातत साधारण सेकंदाला एक या सरासरीने माणसे मरतात. हिरोला संपूर्ण सिनेमात जेवढे डायलॉग आहेत तेवढे सगळे एकदम म्हटले तर दिड ते दोन मिनिटे फार होतील. त्याच्या डायलॉग मधिल अक्षरांच्या संख्येपेक्षा दहा पटीने जास्त माणसे त्याने या सिनेमात मारली असावी.
सगळ्या सिनेमात हिरो जे काही करतो ते स्लो मोशन मधेच. म्हणजे गाडीतून उतरतो स्लो मोशन मध्ये, हातोडीने समोरच्या बंदुकधारी व्यक्तीला मारतो स्लो मोशन मध्ये, हिरॉइनला भेटतो स्लो मोशन मध्ये इतकेच काय सिनेमाभर तो बोलतो ते देखिल स्लो मोशन मधेच बोलतो.
या सिनेमात हिरॉइन सोडून सगळेच दाढीवाले आणि एका पेक्षा एक कुरुप लोक. एकच चांगले दाखवले आहे की हिरॉइन सुध्दा गुंडच असते, इतर सिनेमांसारखी सतीसावित्री बनुन हिरोला सुधारायचा वगेरे प्रयत्न ती अजिबात करत नाही. या अख्ख्या सिनेमात रंगित कपडे फक्त त्या हिरॉइनने घातले आहेत. बाकीचे लोक बहुतांशवेळा काळ्या किंवा अतिशय मळकट घाणेरड्या कपड्यातच वावरत असतात.
मनुष्य जेवढा जास्त कुरुप असेल आणि जितका हिडीस अभिनय करत असेल तेवढा मोठा तो व्हिलन असे साधारण लक्षात ठेवले तर हिरो कोण आणि व्हिलन कोण हे ओळखायला सोपे पडते.
सिनेमाभर साधारण लाखभर बंदुकीच्या गोळ्या दोन्ही बाजुंनी उडवल्या असतील, पण यातली एकही गोळी आपल्या हिरोला लागत नाही पण त्याने मारलेल्या एकाच गोळीत समोरचा मनुष्य निपचितच पडतो. याशिवाय तलवारी, हतोडी कुदळ फावडे इत्यादी शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण आपल्या हिरोने गर्भावस्थेतच घेतलेले असावे असे सिनेमा पहाताना वाटते.
एक मात्र मानले पाहिजे, इतके सिनेमे पाहिले पण मनोज कुमार सारख्या दिग्गज अभिनेत्यालाची जी गोष्ट जमली नव्हती ती या सिमाताल्या हिरोने करून दाखवली आहे. कुत्र्याला "हाड" म्हणताना माणसाच्या चेहर्यावर जे भाव असतात साधारण तसेच भाव चेहर्यावर घेउन हा आपला हिरो संपूर्ण सिनेमाभर वावरला आहे. म्हणजे सीन कोणताही असो याचे भाव "हाड" असेच. ते सुध्दा सिनेमाभर. काय सातत्य.. काय सातत्य? कमाल... कमाल....
कॅमेरामनला तर बहुतेक सर्व प्रेक्षकांनी त्याच्या मागच्या जन्मी दगडाने ठेचुन मारला असावा. या जन्मी त्याचाच बदला घेण्या करता त्याने या सिनेमात कॅमेरा हातात धरला आहे. प्रत्येक फ्रेम मधे प्रेक्षकांच्या डोळ्याला जास्तिजास्त त्रास होईल याची त्याने पुरेपुर दक्षता घेतली आहे. साधारण हिच व्यथा पार्श्वसंगितकाराची असावी. त्याने तर बहुदा मागच्या सात जन्मांचा सुड एकदमच उगवला आहे.
स्टोरी बद्दल तर काही बोलायलाच नको. खरेतर मला तर ती नीटशी समजलीच नाही. साधारण पाच मिनिटाला एक फ्लॅशबॅक या गतीने ही स्टोरी आपल्या टाळक्यावर येउन आदळते. त्यात सगळे लोक आपले डायलॉग अस्पष्ट आणि तोंडातल्या तोंडात बोलतात. पैसे वाचवण्या करता ते बहुदा सर्वांना एकाच माणसाने डबिंग केले असावे. हिरो व्हिलन त्यांची माणसे सगळे सिनेमाभर एकाच आवाजात आणि एकाच टोन मध्ये बोलत असतात.
आणि बर का? हा सगळा सुडाग्नी एका भागात शमलेला नाही म्हणून की काय प्रेक्षकांचा बदला घेण्याकरता याचा दुसरा भागही आलेला आहे.
तो पाहून जिवंत राहिलेला कोणी महामानव मला अजूनही भेटलेला नाही. दुसरा भाग कसा असेल याच्या नुसत्या कल्पनेने सुध्दा माझ्या अंगावर साडेसात मिनिटे शहारे येत होते.
हा दुसरा भाग पहायची दुर्बुद्धी कोणालाही न होवो हिच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना. .
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
10 Jun 2022 - 10:50 am | श्रीगुरुजी
केजीएफ - कपाटातल्या गोळ्या फाटल्या
10 Jun 2022 - 12:19 pm | तुषार काळभोर
कालचा तुमचा दिवस संध्याकाळ लैच बेक्कार गेली!
माझी सहानुभूती... :(
कमल हासनचा विक्रम बराच बरा आहे म्हणे!
हंबीरराव थोडा लाऊड आहे, पण सौदेंडीयन पिक्चरपेक्षा हा नक्कीच उजवा आहे.
नवा टॉप गन बघायचा राहिलाय. पण १९८६चा Maverick एकदम आवडता असल्याने आताचा Maverick बघून निराशा होईल की काय अशी भीती वाटते.
10 Jun 2022 - 1:20 pm | sunil kachure
साधा मोबाईल घेताना पण इंटरनेट वर विविध मॉडेल,त्यांची विविध शॉपिंग ॲप वर किंमत, review बघून मनात एक फिक्स करून दुकानात जावून तोच मोबाईल घेतो.
अनेक मॉडेल बघून डोक्याचे भजे करून घेत नाही.
थिएटर मध्ये सिनेमा बघायला जायच्या अगोदर तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही.
निष्काळजी पना केलात त्याची शिक्षा तुम्हाला मिळाली.
10 Jun 2022 - 1:33 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क. ह्या पेक्षा तळजईच्या जंगलात भटकण्याचा ऊपाय बरा होता. असो. हा दाढीपट भयानक आहे ह्या बद्दल काहीही शंका नाही.
10 Jun 2022 - 1:36 pm | कंजूस
तेव्हा इतरांना त्यात काय आहे कळणार?
--------------
बाकी या सिनेमात थोडीच वाक्ये आहेत म्हटल्यावर हिंदी आहे का मराठी हे विचारून उपयोग नाही.
फारेण्ड'साहेबाना टक्कर आहे.
10 Jun 2022 - 4:47 pm | कुमार१
माझी पण सहानुभूती... :(
10 Jun 2022 - 6:41 pm | तर्कवादी
या भेटा मला.. एकदम फ्री !! अर्थात मी चित्रपटगृहात जावून बघण्याचा पराक्रम गाजवलेला नाही.. घरी प्राईमवर पाहिलेत दोन्ही भाग..
तर त्याचे असे झाले मी एकदा पहिला भाग पंधरा मिनटात सोडला होता (प्राईमवर).. पण नंतर काही काळाने बायकोने कुठून तरी ऐकले की खूप छान सिनेमा आहे.. झाले मग दोन्ही भाग बघितलेत. पहिला तरी बरा इतका दुसरा बेकार आहे. प्रत्येक दृष्य खूप जास्त नाट्य, एरियल शॉट, स्लो मोशनम भरपूर पार्श्वसंगीत, याने भरलेले आहे. बहुतेक कोणतेही दृश्य सलगपणे येत नाही. मध्येच एका ठिकाणचे दृष्य व मध्येच दुसर्या ठिकाणचे दृष्य असे काहीतरी बेकार एडिटिंग करुन आणलेले अतिनाट्य अंगावर येते (उदा. एकाच वेळी के जी एफ मध्ये काहीतरी घडत असते त्याचवेळी मुंबईत काहितरी घडते म्हणून दोन दोन सेकंद दोन्हीकडची दृश्ये आपल्या माथी मारलीत)
प्रत्येक गोष्टीचा अतिरेक इतका की अतिरेक शब्दही खूपच छोटा वाटतो... नायक नायिकेला हवा मिळावी म्हणून पंखा बंद पडलेला असताना हेलिकॉप्टर हवेत उडवायला लावतो .. संसदेत जावून एका मंत्र्याची हत्या करतो ..
फक्त भव्य दिव्य सेट हीच काय ती कौतुकास्पद बाब चित्रपटात आहे...
बाकी पुष्पा पासून अशा दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणारे यश हे ट्रेण्डिग असले तरी भविष्यात असल्या चित्रपटातला अतर्क्यपणा कमी केल्याशिवाय हा टेण्ड टिकेल असे मला वाटत नाही.
दाक्षिणेतून जय भीम हा आशयघन व हृदयस्पर्शी चित्रपट आला होता , बाहुबली मध्ये दाक्षिणात्य शैलीतला पांचटपणा थोडाफार असला तरी कथानक दमदार होते, पटकथा अतर्क्य घटनांनी भरलेली नव्हती, अभिनय चांगला होता.. चित्रपट अंगावर येत नव्हता. त्यामुळे सगळे दाक्षिणात्य चित्रपट एकाच माळेचे मणी नाहीत.
14 Jun 2022 - 8:26 am | ज्ञानोबाचे पैजार
पहिला भाग बरा म्हणावा असा अघोरी दुसरा भाग दिसतो आहे.
"संसदेत जावून एका मंत्र्याची हत्या करतो" हे अगदिच अतर्क्य आहे आणि असा खुन करुन तो सहज संसदेतुन निघुन जात असेल. असल्या महामानवांकरता सुक्षाव्यवस्था वगेरे अत्यंत किरकोळ बाबी असतात
हा भाग न पहाणेच इष्ट...
मनःपूर्वक धन्यवाद.
पैजारबुवा,
14 Jun 2022 - 1:52 pm | तर्कवादी
अगदी.. पहिल्या भागात "गली गली" हे छान गाणे पण आहे. ते ऐकायला आणि बघायलाही बरे वाटते. दुसर्या भागात एकही चांगले गाणे नाही.
10 Jun 2022 - 8:36 pm | कपिलमुनी
नवीन जनरेशन चे पिक्चर काय म्हाताऱ्याना झेपत नाय...
पुष्पा असो की के जी एफ .
यांना राम लखन, करण अर्जुन टाईप बघायची सवय ..
10 Jun 2022 - 8:44 pm | अमरेंद्र बाहुबली
मुनीवर तुम्ही हा सिनेमा पाहीलाय का? मी नवीन जनरेशनचा आहे नी मला तरी आजिबात झेपला नाही हा सिनेमा. पण जसा गुंडा सिनेमा स्टोरी न पहाता फक्त ”स्पूफ काॅमेडी” म्हणून पाहतात लोक तसा मीही पाहीला.
10 Jun 2022 - 10:06 pm | कपिलमुनी
नवीन म्हणजे २०००+ जन्म का ?
10 Jun 2022 - 10:16 pm | अमरेंद्र बाहुबली
९०+ (१९९३)
12 Jun 2022 - 11:24 pm | तर्कवादी
हे घ्या मग नवीन जनरेशनचं गाणंही ऐका.. एकदम ओरिजिनल टॅलेंट आहे ..युट्युबवर २७ लाख वेळा पाहिले गेले आहे.. घ्या यालाही डोक्यावर :)
13 Jun 2022 - 12:41 pm | चौथा कोनाडा
छान, अस्सल देशी स्वाद !
13 Jun 2022 - 12:41 pm | चौथा कोनाडा
छान, अस्सल देशी स्वाद !
14 Jun 2022 - 9:47 am | ज्ञानोबाचे पैजार
नवीन जनरेशन ची गाणी काय म्हाताऱ्याना झेपत नाय...
बुरी नजर वाले असो की बारीक बारीक पाणी पड .
यांना इस्पायडरम्यान, जबसे हुवी है मुहोब्बत, इस्कुल के टैम् पे बघायची सवय ..
पैजारबुवा,
17 Jun 2022 - 3:12 pm | चौथा कोनाडा
अधेमधे बदल म्हणून बघायला "बुरी नजर वाले" छाप गाणी बारी वाटतात.
'झुकेगा नही साला" सारखे चलनी नाणे एन्कॅश करतात त्याचं कौतुक वाटतं
11 Jun 2022 - 5:25 pm | मदनबाण
पैजारबुवा आणि प्रतिसादक मंडीळीचे मत पाहुन आता हा चित्रपट टाळला बरा ! :)))
माझा अमुल्य वेळ वाचवल्या बद्धल विशेष आभार ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Megha Chhaye Aadhi Raat...
12 Jun 2022 - 4:34 pm | चौथा कोनाडा
आम्ही पण हा दुःखद अनुभव टिव्ही पडद्यावर टप्प्या टप्प्याने घेतला. आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत.
दुसरा भाग बघितलं नाही हे वेगळे सांगायला नकोच.
12 Jun 2022 - 7:03 pm | कंजूस
Goldmine असं काही नाव आहे. पाच मिनीटे पाहात होतो जेवताना. पण मुलगी झाली म्हणून एक दाढीवाला पुढे सरसावतो आणि बायका आक्रोश करतात. चानेल बदलून जेवण चालू ठेवले. म्हातारे असल्यामुळे असे प्रसंग पाहवत नाही.
13 Jun 2022 - 6:10 pm | सस्नेह
डोळे थाडकन उघडून त्यात झणझणीत अंजन पडले परीक्षणाचे !
...तरी ट्रेलर बघतानाच मला संशय आला होता हे प्रकर्ण विचित्र दिसतंय म्हणून !
14 Jun 2022 - 8:04 pm | प्रचेतस
मीही पहिल्या १०/१५ मिनिटात हा सिनेमा पाहणे सोडले.
15 Jun 2022 - 9:07 am | पद्मश्री चित्रे
लेकाने घरी लावल्यामुळे थोडा बघितला.. पण सारखे वाटणारी दाढीधारी माणसं,काळोख,हाणामारी,कमी संवाद आणि ते पण अस्पष्ट.. यामुळे काहीच समजलं नाही. पंधराव्या मिनिटाला समजून घेण्याचा प्रयत्न सोडला.. हे असलं आता डोक्याला झेपत नाही हेच खरं..
15 Jun 2022 - 10:05 pm | अमरेंद्र बाहुबली
आज केजीएफ - २ पाहीला.
पहीला तरी बरा होता म्हणावा लागेल.
ह्या सिनेमातील ठळक घडामोडी-
- हिरो छातीत गोळी खाऊनही जिवंत असतो.
- हिरो बद्दल पोलिस डिपार्टमेंटला काहीच माहीती नसते. पण पोलिस स्टेशन मध्ये चहा देनार्या मूलाला सगळं माहीत असतं.
-हिरोची आई नी केजीएफ झोपडपट्टीतील मूलाची आई ह्यांच्यातला घोळ समजता समजत नाही. ( पहिल्या पार्ट मध्ये दाढीवाल्यांनी घोळ घातला होता)
- हिरो एकटा कितीही लोकाना मारतों
- २ लीटर ची दारू बाॅटल पित असतो.
- भरपूर सिगरेट्स ओढत असतो. खरं तर हे गुण पाहून हा हिरे असेल का?
- हिरोईनीला “ठेऊन” घेतो नी तसं स्वतच जाहीर करतो.
- अर्र…. महत्वाचं राहीलं संसदेत घुसून पंतप्रधाना समोर माजी पंतप्रधानाला गोळ्या घालतो.
- सर्व सोनं घेऊन भारताची सागरी सिमा पार करतो.
- भारत सरकार सोमालीया/ अफगान बरं म्हणावं ह्यापेक्षा कमजोर असतं.
- आणखीनही अचाट प्रकार आहेत.
17 Jun 2022 - 3:33 pm | प्रसाद_१९८२
- भारत सरकार सोमालीया/ अफगान बरं म्हणावं ह्यापेक्षा कमजोर असतं.
--
सिनेमा ज्या काळात घडतो त्या काळात भारतात कॉंग्रेसचे शासन होते. आणि त्या काळात असे काही घडत असेल तर त्यात आश्चर्य ते काय ?
17 Jun 2022 - 7:45 pm | अमरेंद्र बाहुबली
त्यावेळी पाकचे दोन तुकडे केलेले काॅंग्रेसने, लाहोर पर्यंत सैन्य गेलेलं. वाजपेयी किंवा सध्याचा काळ असता तर समजू शकलो असतो.