सुखोईवर ब्रह्मोस

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
22 Apr 2022 - 8:34 pm
गाभा: 

भारतीय हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानावरून ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात 19 एप्रिल 2022 ला यशस्वी चाचणी घेतली गेली. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ब्रह्मोस हे जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) आणि लक्ष्यावर अचूक मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारतीय भूदलात आणि नौदलात आधीच सामील करण्यात आलेले आहे. भारतीय नौदलातील युद्धनौकांवर ते तैनात करण्यात आलेले असून सध्या या क्षेपणास्त्राच्या पाणबुडी आवृत्तीचाही विकास केला जात आहे. त्याचबरोबर लढाऊ विमानांवरून डागता येऊ शकणाऱ्या आवृत्तीचा विकास आता पूर्ण होत आला आहे.

ब्रह्मोसच्या अन्य आवृत्त्यांच्या तुलनेत हवाईदलासाठीच्या आणि पाणबुडीवरील आवृत्यांच्या विकासासाठी जास्त कालावधी लागला. त्याला कारणही तसेच आहे. अन्य आवृत्त्यांमध्ये हे क्षेपणास्त्र हवाईदल आवृत्तीपेक्षा आकाराने मोठे आहे. त्यामुळे त्याला लढाऊ विमानावरून वाहून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे या क्षेपणास्त्राचा आकार आणि वजन कमी करण्याची आवश्यकता होती. हे करताना क्षेपणास्त्राची लांबी कमी करण्यासाठी त्याच्यावर बसवण्यात आलेले पहिल्या टप्प्यातील बुस्टर काढून टाकण्यात आला. कारण हवाई आवृत्तीच्या ब्रह्मोसला लढाऊ विमानावरून डागायचे असल्यामुळे त्याला तशीही पहिल्या टप्प्यातील बुस्टरची आवश्यकता नव्हती. लढाऊ विमानाच्या गतीमुळे आपोआपच त्याला सुरुवातीच्या टप्प्यातील गती प्राप्त होत असते. तसेच ब्रह्मोसच्या हवाई आवृत्तीचे वजन मूळच्या ब्रह्मोसपेक्षा अर्ध्या टनाने कमी करण्यात आले; पण हे करत असताना या क्षेपणास्त्राच्या अंगभूत वैशिष्ट्यांवर कोणताही परिणाम होणार नाही याचीही काळजी घेतली जात होती.

प्रक्षेपित करतेवेळी सुखोईपासून ब्रह्मोस विलग झाल्यानंतर 100 ते 150 मीटरपर्यंत ते जमिनीच्या दिशेने जाऊ लागते. त्यानंतर काही सेकंदातच क्षेपणास्त्राचे मुख्य इंजिन प्रज्वलित होऊन त्याला अपेक्षित गती देते आणि क्षेपणास्त्र काही सेकंदातच आवाजाच्या वेगापेक्षा 2.8 पट अधिक वेगाने लक्ष्याच्या दिशेने जाते.

ब्रह्मोस एकीकृत करण्यासाठी सुखोईमध्येही काही सुधारणा कराव्या लागल्या आहेत. विमानातील शस्त्र नियंत्रण करणाऱ्या आज्ञावलीचे (सॉफ्टवेअर) आधुनिकीकरण करतानाच विमानाच्या सांगाड्याला अधिक मजबूत करावे लागले आहे. हे बदल करण्यासाठी भारताने दोन सुखोई-30 एमकेआय विमाने रशियाकडे पाठवली होती. त्याचबरोबर ब्रह्मोससारखे वजनदार क्षेपणास्त्र वाहून नेण्यासाठी सुखोईवर नवा लाँचर बसवावा लागला आहे. हा लाँचर मात्र स्वदेशी बनावटीचा आहे.

ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे विमानापासून ते विलग झाल्यावर त्याला त्या विमानातूनच लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. हवेतून डागताना उपयुक्त ठरणाऱ्या Free Fall Systemचीही चाचणी यावेळी घण्यात आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने सुखोई जमिनीपासून 1,000 ते तब्बल 46,000 फुटांवरून उडत असतानाही ब्रह्मोसला सहजतेने प्रक्षेपित करता येते.

ब्रह्मोस अगदी अचूक (पिनपॉईंट) लक्ष्यभेद करू शकत असल्याने त्याच्या सामिलीकरणामुळे भारतीय हवाईदलाची सामरिक पोच आणि समुद्रावर प्रभुत्व गाजवण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. सुखोई-30 एमकेआय विमानावर जोडणी केल्यामुळे ब्रह्मोसचा पल्ला आपोआपच सुमारे 12 पटींनी वाढणार आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी कमीतकमी वेळेत पोहचून अतिशय अचूक मारा करताना सुखोईला मात्र आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत आणि शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणांच्या टप्प्याच्या बाहेर राहून आपले उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. भारतीय हवाईदलातील 40 विमानांवर ब्रह्मोस संलग्न केली जाणार आहेत.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2022/04/blog-post_22.html

प्रतिक्रिया

साहना's picture

23 Apr 2022 - 3:49 am | साहना

> भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ब्रह्मोस हे जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) आणि लक्ष्यावर अचूक मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे.

ब्राम्होस चा सर्वांत मोठा फायदा म्हणजे ह्यांची निर्यात भारत इतर चीन विरोधी देशांना करेल. निर्यात होणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पल्ला फक्त ३०० KM असू शकतो पण जास्त पल्ल्याची अस्त्रे भारत आपल्या वापरासाठी करणार आहे. त्याशिवाय हायपरसॉनिक व्हर्जन सुद्धा लवकरच विकसित होणार आहे.

ब्राम्होस च्या निमित्ताने भारताने अनेक प्रकारची तंत्रज्ञाने विकसित केली आणि वेगाने केली. ह्याच धर्तीवर आणखीन खाजगी-सरकारी यंत्रणा जवळ येऊन शस्त्रास्त्रांची निर्मिती करतील आणि त्यामुळे ह्या महत्वाच्या क्षेत्रांत भारत फक्त आत्मनिर्भर नाही तर मोठा निर्यातदार सुद्धा बनू शकतो. DRDO चा अनागोंदी कारभार भारतीय सुरक्षा यंत्रणेसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. हि निस्तरणे मोदी सरकारची प्राथमिकता राहिली आहे.

निर्यात करणारी अस्त्रे चालली पाहिजेत नाहीतर अनेक वेळा झाकली मूठ सव्वालाखाची नियमा प्रमाणे बहुतेक शस्त्रे फक्त कागदावर चालतात. रशियन सैन्याची ढिसाळता पाहून हा मुद्दा आणखीन लक्षांत घ्यावासा वाटतो.

वामन देशमुख's picture

23 Apr 2022 - 7:59 am | वामन देशमुख

निर्यात करणारी अस्त्रे चालली पाहिजेत नाहीतर अनेक वेळा झाकली मूठ सव्वालाखाची ...

मुद्दा पटला आणि आवडला!

वामन देशमुख's picture

23 Apr 2022 - 8:04 am | वामन देशमुख

पराग१२२६३,

तुमच्या लेखांवर नेहमीच जरी प्रतिक्रिया देत नसलो तरी तुमचे लेख मी आवर्जून वाचतो. संरक्षण तंत्रज्ञानाविषयीच्या ज्ञानात भर पडत राहते, लिहित रहा.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

23 Apr 2022 - 8:12 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान लेख.

चीन बाद.
पाकिस्तान बाद..
अफगाणिस्तान बाद.
बांगलादेश,बाद.
रशिया च संबंध आला की सर्व युरोपियन राष्ट्र बाद.
कोरिया, जपान,इस्त्रायल,अमेरिका,हे तर घेणार नाहीत.
ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड नी आता पर्यंत बंदूक पण आपल्या कडून घेतली.
मग विकणार कोणाला .

सुबोध खरे's picture

23 Apr 2022 - 1:38 pm | सुबोध खरे

@sunil kachure

After ASEAN Region, next could be a Gulf country
Discussions with UAE for the sale of the BrahMos is in advanced stages. As reported earlier, the Gulf nation was among the first from that region expressing interest in buying the BrahMos Missile and had also expressed interest in the indigenous Akaash Missile.

Another country from the region which has shown interest is Saudi Arabia

Among the ASEAN member countries, discussions are going on with Indonesia, Vietnam, Thailand, Malaysia and Singapore.

South American nations like Brazil, Chile, and Argentina too have been identified as some countries in the region which have been in talks with the Indian Ministry of Defence for the BrahMos.

And South Korea, South Africa, and Egypt, too are interested.

https://www.financialexpress.com/defence/first-ever-missile-export-from-...

जेम्स वांड's picture

23 Apr 2022 - 6:51 pm | जेम्स वांड

कारण फिलिपीन्स ह्या देशाने ऑलरेडी भारताला $३७५ मिलियन किमतीची ब्राह्मोस मिसाईलची ऑर्डर दिली आहे अशी बातमी आहे ही

आता फिलिपीन्स आणि चीनचे असलेले साऊथ चायना सी वरतून वाकडे संबंध मला वाटतं जगजाहीर आहेत, त्यामुळे ह्या डील नंतर भारताने चीनला हळूहळू का होईना आवळायला सुरुवात केली आहे म्हणायला हरकत नाही....

पराग१२२६३'s picture

23 Apr 2022 - 12:45 pm | पराग१२२६३

धन्यवाद वामन देशमुख आणि ॲबसेंट माइंडेड

सुबोध खरे's picture

23 Apr 2022 - 1:35 pm | सुबोध खरे

बाह्मोस या क्षेपणास्त्राचे असंख्य फायदे आहेत.

१) हे भारतातच निर्मिती केलेले आहे त्यामुळे त्याचे कितीही संख्येने उत्पादन करता येणे शक्य आहे

२) एतद्देशीय असल्याने ते बरेच स्वस्त आहे. आतापर्यंत बाह्मोसच्या काही डझन पेक्षा जास्त चाचण्या झाल्या असतील (कदाचित तीन आकड्यात).

मी नौदलात विक्रांतवर असताना १९९० साली भारताकडे हॅरीयर हि विमाने होती आणि त्यावर असलेले सी इगल हे क्षेपणास्त्र त्या वेळेस २ कोटी रुपये किमतीचे होते. त्यामुळे त्याच्या आपण प्रत्यक्ष चाचण्या घेतलेल्याच नव्हत्या. १९९१ साली केवळ ४० कोटी डॉलर्स ( ८०० कोटी रुपयांसाठी) आपण आपले सोने गहाण ठेवण्याची नामुष्की आली होती. आणि त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली तोवर ते कालबाह्य झालेले होते (त्याची एक्सपायरी डेट होऊन गेलेली होती म्हणून त्याची चाचणी घेतली त्यात ते नापास झाले होते) या गोष्टी ब्रिटनला कळवल्यावर त्यांनी क्षेपणास्त्र "कालबाह्य झाल्यामुळे चाचणीत नापास झाले" म्हणून हात वर केले होते. त्यावेळेस नौदलाचे सैनिक क्षेपणास्त्रे डागणीचा सराव करत असत ती सोव्हिएत युनियन कडून घेतलेली असत. हि क्षेपणास्त्रे आपण अदलाबद्ल (barter) सारख्या व्यवहारात होत असे. तेंव्हा आपण रशियाला केळी निर्यात करायचो. एक क्षेपणास्त्राची चाचणी SSN २ (STYX)केल्यावर माझा एक गनरी ऑफिसर मित्र म्हणाला डॉक्टर या क्षेपणास्त्राच्या पैशात आपण अख्ख्या मुंबईला अर्धा डझन केळी खायला घालू शकलो असतो.

गेल्या ३१ वर्षात भारताने ब्रिटन अमेरिकेच्यापेक्षाही उत्तम क्षेपणास्त्रे बनवुन दैदिप्यमान प्रगती केलेली आहे. कारण बाह्मोस हे मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष उत्पादन होणारे सुपर सॉनिक श्रेणीतील जगातील एकमेव क्षेपणास्त्र आहे.

३) याच्या सुखोई विमानावरून डागण्याची चाचण्या होऊन ते प्रत्यक्ष वायू दलात सामीलही केलेले आहे. याची एक स्क्वाड्रन तंजावर येथे तैनात आहे. तंजावर येथे आता वायू दलाची पहिली लढाऊ विमानांची तुकडी निर्माण करण्यात आली आहे. हि तुकडी समुद्रावरील युद्धासाठी खास निर्मिती केलेली असून या तुकडीतील सुखोई विमानांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे बसवलेली आहेत. तंजावर पासून अंदमान समुद्रात असलेला निकोबार हा वायुदलाच्या तळ सर्वात सरळ आणि जवळ आहे. याचा उपयोग युद्धात मलाक्काच्या चिंचोळ्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवताना होईल कारण तंजावर वरून उडालेली विमाने सरळ निकोबारच्या तळावर इंधन भरून थेट मलाक्काच्या चिंचोळ्या सामुद्रधुनीवर जाऊ शकतील आणि तेथुन चीन कडून येणाऱ्या मालाच्या जहाजांवर आणि चीनला पुरवठा होणाऱ्या तेलावर संपूर्ण नियंत्रण मिळवता येईल.

४) याशिवाय अंदमान निकोबार बेटांवर ब्राह्मोस क्षणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत/ आली आहेत ( असा माझा कयास आहे). नुकतीच अंदमान बेटावरून वाढीव टप्पा (४५० किमी) असणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची अतिशय यशस्वी चाचणी करण्यात आली. https://frontline.thehindu.com/dispatches/india-successfully-tests-exten...'s,km%20(which%20will%20be%20further

५) हीच क्षेपणास्त्रे आता आपण फिलिपाइन्सला विकून त्याबदल्यात परकीय चलन किंवा अनेक उपयुक्त वस्तू मिळवू शकतो.

६) मागे लिहिल्याप्रमाणे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना आपण डागल्या क्षेपणास्त्राविरुद्ध त्यांची प्रणाली फुसकी ठरली आहे याची धडकी भरली आहे. याचा एक मोठा डावपेचात्मक फायदा मिळेल.

७)First ever missile export from India! After ASEAN nation, next could be UAE
https://www.financialexpress.com/defence/first-ever-missile-export-from-...

वामन देशमुख's picture

23 Apr 2022 - 1:49 pm | वामन देशमुख

बाह्मोस हे मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष उत्पादन होणारे सुपर सॉनिक श्रेणीतील जगातील एकमेव क्षेपणास्त्र आहे.

विशेषतः ही माहिती आवडली.

पराग१२२६३'s picture

23 Apr 2022 - 5:51 pm | पराग१२२६३

सुबक जी, आपले स्वानुभवावर आधारित सविस्तर मत वाचनीय आहे. धन्यवाद.

पराग१२२६३'s picture

23 Apr 2022 - 5:53 pm | पराग१२२६३

वरील प्रतिक्रियेत कृपया सुबोध जी असं वाचावं.

sunil kachure's picture

23 Apr 2022 - 2:02 pm | sunil kachure

चीन आणि पाकिस्तान brahmos मुळे आता थोडे दबकुन वागतील.

भारता विरुद्ध कारवाया करताना 100 वेळा विचार करतील.

टर्मीनेटर's picture

23 Apr 2022 - 6:25 pm | टर्मीनेटर

भारतीय हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानावरून ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात 19 एप्रिल 2022 ला यशस्वी चाचणी घेतली गेली.

अभिमानास्पद घटना!
लेख आवडला 👍

sunil kachure's picture

23 Apr 2022 - 8:18 pm | sunil kachure

New york times thoda चाळला तर अशी माहिती मिळत २००३ मध्येच brahmos ची टेस्ट घेतली आहे.
ग्लोबल टाइम्स २००७ ला च brahmos तयार केले आहे असे सांगतो.आणि वर कॉमेंट पण करतो की चीन च्या सुरक्षेला ह्या missile पासून काहीच धोका नाही.
नक्की detail माहिती काय आहे.

धर्मराजमुटके's picture

23 Apr 2022 - 8:28 pm | धर्मराजमुटके

चीन आणि पाकिस्तान brahmos मुळे आता थोडे दबकुन वागतील.

भारता विरुद्ध कारवाया करताना 100 वेळा विचार करतील

तुमची ही प्रतिक्रिया वाचून संभ्रमात पडलो होतो. ह्या प्रतिक्रियेवर तुमचा स्वतःचा किती दिवस विश्वास बसेल हाच विचार करत होतो तोपर्यंत अपेक्षेप्रमाणे तुमची दुसरी प्रतिक्रिया आली :)

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

23 Apr 2022 - 8:36 pm | सौ मृदुला धनंजय...

माहितीपूर्ण लेख.

मदनबाण's picture

25 Apr 2022 - 7:10 pm | मदनबाण

उत्तम माहिती !
अजुन एक घेतलेली चाचणी :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodies