गुजरात सहल २०२१_ भाग १-प्रस्तावना व मांडवी
गुजरात सहल २०२१_भाग २-श्वेत रण व भुजोडी
गुजरात सहल २०२१_भाग ३-भूज, द्वारका
गुजरात सहल २०२१_भाग ४- पोरबंदर, माधवपूर,सोमनाथ (प्रभास पाटण)
गुजरात सहल २०२१_भाग ५- सासन गीर
गुजरात सहल २०२१_भाग ६-जुनागड
गुजरात सहल २०२१_भाग ७-अडलज वाव व अहमदाबाद
सहलीचा दहावा दिवस
सकाळी नाश्ता आटोपून मोढेरा येथील सूर्य मंदिर पाहावयास निघालो. अहमदापासून जवळपास १०० किमी तर मेहसाणा पासून २५ किमीवर पाटण या ठिकाणी हे मंदिर आहे. सव्वा दोन अडीच तासात आम्ही मंदिराजवळ पोहचलो. माणशी रु.२५/-चे तिकीट काढून आवारात प्रवेश केला.सूर्य देवाला समर्पित हे मंदिर सन १०२६ मध्ये राजा भीमदेव प्रथम याने बांधले आहे. गर्भगृह, सभामंडप व कुंड असे तीन भागात मंदिर आहे. मंदीर आभासी रेखा कर्कवृत्तावर आहे.
हे कुंड सूर्यकुंड किंवा रामकुंड म्हणूनही ओळखले जाते. कुंडात स्नान करूनच मंदिरात प्रवेश करावा अशी श्रद्धा असावी. कुंडाच्या सभोवती सुंदर दगडी पायऱ्या आहेत. १०८ हा आकडा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो व त्याचे प्रतीक म्हणून १०८ छोटीछोटी मंदिरे यावर बांधली आहेत असे वाचल्याचे स्मरते.
मुख्य मंदिराकडे पायऱ्या चढून आल्यावर दोन स्तंभ दिसतात. कधीकाळी हे दोन्ही स्तंभ मंदिराच्या तोरणाचे भाग राहून मंदिराची शोभा वाढवीत असावेत.
यातून पुढे गेल्यावर लागतो तो सभामंडप.
सभामंडपाला रंग मंडप किंवा नृत्य मंडप असेही संबोधले जाते. सभामंडपाला ५२ खांब असून ते रामायण, महाभारतातील दृशांनी सुशोभित करण्यात आली आहेत. ५२ खांब वर्षाचे ५२ आठवड्यांचे प्रतीक असावे . सर्वसाधारण सभामंडप व गर्भगृह लगतच असतात परंतु येथे दोघांचे बांधकाम काही अंतरावर असल्याचे दिसते. सभामंडप हा गर्भगृह बांधकामाच्या नंतरच्या काळात बांधला गेला असावा.
छताचा घुमट
स्तंभ, छत व छताचा भार पेलणारे यक्ष किंवा किन्नर
सभागृहानंतर विलग असलेल्या गर्भगृहात आपण जातो.
गर्भगृहामध्येही दोन भाग दिसतात. एक म्हणजे प्रदक्षिणा मार्ग असलेले मंदिर व व दुसरा त्या समोरील मंडप. मंडपाला आठ खांब असून त्यावर सुंदर कोरीव काम आहे. मंदिर अशा तर्हेने बांधलेले आहे की सूर्य ज्या दिवशी विषुव वृत्तावर असतो त्यादिवशी सूर्याची पहिली किरणे मंदिरातील मूर्तीवर पडतील तसेच दुपारी सूर्य माथ्यावर असताना मंदिराची सावली पडणार नाही. सध्या येथे कुठलीही मूर्ती नाही. मंदिराच्या बाह्य भिंतीवर तीनही बाजूनी तसेच कोनाड्यांमध्ये सूर्याच्या बारा प्रतिमा आहेत ज्या बारा महिन्याचे प्रतीक आहेत. बाह्य भिंतीवर इतरही मूर्ती आहेत जसे अष्ट दिक्पाल, विश्वकर्मा, वरूण, गणेश सरस्वती इ. मंदिराला छत नाही. आक्रमणांमध्ये याची नासधूस झाली असावी किंवा नैसर्गिक आपत्तीत ते नष्ट झाले असावे.
मंदिराच्या बाह्य भिंतींवर काही मैथुन शिल्पेही दिसतात तसेच मंदिरात गर्भगृहाच्या मंडपात अगदी छताजवळील पट्टीतही अशी शिल्प आहेत. निर्बंधांमुळे फोटो देणे शक्य नाही.
सभागृहाच्या उत्तरेला एक छोटेसे शिवमंदिर आहे.
मंदिराच्या आवारात वस्तू संग्रहालय आहे. येथे बांधकामातील अनेक दगडी अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात.
साधारण दोन तास येथे वेळ देऊन पाटण येथील रानी कि वाव पाहण्यास निघालो. येथून ३६ किमी व गाडीने एक तासापेक्षाही कमी अंतरावर हे ठिकाण आहे. वाटेत दुपारच्या जेवणासाठी थांबल्याने आम्हास वेळ झाला त्यामुळे दुपारी तीनच्या सुमारास येथे पोहचलो.
पाटण ही अनेक शतके सोळंकी वंशाची राजधानी होती व त्याकाळी ती अन्हीलवाड नावाने ओळखली जात होती. सन १०६३ मध्ये पायऱ्यांची ही विहीर राणी उदयमतीने आपले पती राणा भीमदेव प्रथम यांच्या स्मरणार्थ बांधली.
नंतरच्या काळात जवळून वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या पुरात वाहून आलेल्या गाळामुळे विहिरीचा पश्चिमेकडील पाणी असलेला काही भाग वगळता पूर्णपणे गाडल्या गेली. कदाचित येथे कठडा असल्याने हा भाग बुजला गेला नसावा. कालांतराने गाडलेला भाग पूर्णपणे विस्मृतीत गेला.
आमच्या गाईडच्या सौजन्याने उत्खननापूर्वीचा मिळालेला एक फोटो
विहिरीला सात स्तर असून आपल्याला पायऱ्या उतरून चौथ्या स्तरापर्यंत पोहचता येते. भितींवर विष्णूचे दशावतार, देवी, मातृका, सुरसुंदरींची देखणी शिल्प आहेत. यांच्याबद्दल काही सांगण्यापेक्षा त्यांची सुंदरता फोटोंमधूनच बघूया.
वस्त्र ओढणारे खोडकर माकड
पायऱ्या उतरताना डाव्या बाजूस असेलेले शिल्प पाटणच्या प्रसिद्ध पटोला साड्यांची रचना दाखवतात.
हा विहिरीचा पाणी असलेल्या बाजूकडून घेतलेला फोटो
साडेचार वाजले होते. अहमदाबादला पोहचण्यासाठी घाई करावी लागणार होती कारण संध्याकाळी अहमदाबाद रेल्व स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड रहदारी असते. ज्यांना एका दिवसात मोढेरा सूर्य मंदिर व रानी की वाव दोन्ही ठिकाणे बघायची असतील त्यांनी आसपासच किंवा मेहसाना भागात मुक्काम करणे सोईस्कर. कारण ही दोन्ही ठिकाणे येथील कलाकुसरीचा आनंद घेत सावकाश बघण्याची आहेत. अहमदाबादपासून जाण्याचा किंवा येण्याचा एका बाजूचा प्रवास वेळ वाचल्यास उत्तमच.
गांधीधामधुन एकत्रित सुरु झालेली सहल मांडवी,कच्छचे श्वेत रण, भूज, जामनगर, द्वारका,पोरबंदर, सोमनाथ, सासन गीर, जुनागड, गिरनार, अहमदाबाद, अदलज, मोढेरा, पाटण असा प्रवास करत अहमदाबाद रेल्वे स्थानकावर समाप्त झाली. प्रत्येक ठिकाणची स्थानिक भटकंती वगैरे पकडून अडीच हजार किलोमीटरचा प्रवास झाला.
प्रतिक्रिया
18 Feb 2022 - 10:25 pm | कर्नलतपस्वी
अप्रतिम फोटो, सर्व वस्तू sand स्टोन मध्ये आहेत आसे वाटते. या वस्तू आणि खजुराहो शिल्प समकालीन. धन्यवाद.
18 Feb 2022 - 10:48 pm | कंजूस
एकत्र एवढी फोटोंसह माहिती देणाऱ्या मालिकेबद्दल धन्यवाद.
-------
भारतात मोजकीच सूर्यमंदिरं आहेत की जिथे सूर्याची मूर्ती आहे.
वैष्णवांना राग आहेच.
लखुंडीतली अखंड तीनफुटी मूर्ती सरकारने वेळीच मंदिरातून काढून जवळच्या संग्रहालयात ठेवली आहे. इजिप्तमध्ये एका फराहोने नेहमीच्या आमूनऐवजी सूर्याला महत्त्व दिल्याने त्यासही विरोध झाला आणि नाश केला.
20 Feb 2022 - 7:35 am | गोरगावलेकर
मी ६-७ वर्षांपूर्वी उत्तराखंड मधील कटरमल येथील सूर्य मंदिर पाहिले. तेथेही मूर्ती नाही पण टेकडीवरील हे मंदिर/ मंदिर समूह सुरेख आहे.
19 Feb 2022 - 11:02 am | चौथा कोनाडा
अ प्र ति म !
🌞
मजा आली लेखमाला वाचायला !
19 Feb 2022 - 12:06 pm | कॅलक्यूलेटर
तुमची लेखमाला वाचल्या नंतर. जानेवारी मध्ये आम्ही पण कच्च, भुज, मेहसाणा आणि पाटण ला जाऊन आलो. वेळेअभावी गिरनार
सोमनाथ आणि बाकी ठिकाणे आता परत कधीतरी.इतकी सुंदर लेखमाला लिहिल्याबद्दल तुमचे आभार.
21 Feb 2022 - 8:14 am | गोरगावलेकर
येऊ द्या फोटोसाहित आपल्याही सहलीचा वृत्तांत
20 Aug 2022 - 11:52 am | नयना माबदी
can i get contact No of travel agency from where you book Traveller for the trip and hotel name of Kaccha where you stay in village style hotel.
20 Feb 2022 - 7:32 am | गोरगावलेकर
@ कर्नलतपस्वी, , चौथा कोनाडा प्रतिसादाबद्दल धन्यवाद
20 Feb 2022 - 10:56 am | प्रसाद_१९८२
शिल्पकला आहे.
20 Feb 2022 - 11:06 am | Bhakti
मला फक्त कोणार्क सूर्य मंदिर ठाऊक होते खूप पूर्वी पाहील होत. मस्त आहे सूर्य मंदिर!गुजरात सहलीसाठी या लेखमालिकेची खूप मदत होणार!मस्तच!
21 Feb 2022 - 8:16 am | गोरगावलेकर
आणि आपल्या सहलीस शुभेच्छा
20 Feb 2022 - 11:06 am | Bhakti
मला फक्त कोणार्क सूर्य मंदिर ठाऊक होते खूप पूर्वी पाहील होत. मस्त आहे सूर्य मंदिर!गुजरात सहलीसाठी या लेखमालिकेची खूप मदत होणार!मस्तच!
20 Feb 2022 - 11:08 am | राघवेंद्र
मस्त झाली ट्रीप. सर्व भाग वाचले. खूप माहिती मिळाली.
पुढील सहलीला शुभेच्छा !!!
21 Feb 2022 - 8:26 am | गोरगावलेकर
@ प्रसाद_१९८२, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@ राघवेंद्र, लेखमाला आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
21 Feb 2022 - 9:27 am | प्रचेतस
ही लेखमाला फारच सुरेख.
वने, मध्ययुगीन राजवाडे, प्राचीन मंदिरे, पर्वत, नैसर्गिक आश्चर्ये, समुद्रकिनारे अशा विविधांगांनी नटलेल्या स्थळांची तुम्ही केलेली ही सफर आम्हा वाचकांसाठी एक पर्वणीच ठरली.
21 Feb 2022 - 12:47 pm | कर्नलतपस्वी
भटकंती हा माझा पण आवडता छंद आहे. आपला देश इतका समृद्ध आहे की सात जन्म सुद्धा पुरणार नाहीत. त्यामुळे जो कोणी भटकंती ला जाईल त्याने वर्णन आणि फोटो जरूर शेअर करावेत म्हणजे आम्हाला पण जावुन आलो आहोत आसे वाटेल.
सुंदर मालिका. धन्यवाद आणि अभिनंदन
21 Feb 2022 - 1:04 pm | अनिंद्य
रानी बाव आणि मंदिर परिसर छान राखला आहे.
सुंदर चित्रे.
पु ले शु.
21 Feb 2022 - 1:46 pm | सौंदाळा
सुंदर सफर
खूप मजा आली.
पहिल्या भागात तुम्ही अशा भटकंतीची गरज, त्याचे प्लॅनिंग वगैरे सांगितले होते ते आठवून संपूर्ण प्रवास आणि लेखमाला सार्थकी लागली.
पुलेशु
21 Feb 2022 - 3:24 pm | स्मिता श्रीपाद
सगळी लेखमाला अप्रतिम.... तुमच्यासोबत आम्हिही फिरलो असे वाटले....
मस्त मस्त मस्त
21 Feb 2022 - 3:57 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान झाली लेखमालिका.
धन्यवाद.
22 Feb 2022 - 8:19 am | गोरगावलेकर
@प्रचेतस, कर्नलतपस्वी, अनिंद्य, स्मिता श्रीपाद, ॲबसेंट माइंडेड ...
आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आभारी आहे. प्रतिसादांमधून मिळालेली माहिती, सूचना सर्वच माझ्या नवीन भटकंतीसाठी मार्गदर्शक ठरतील. धन्यवाद
22 Feb 2022 - 12:17 pm | टर्मीनेटर
मस्त झाली लेखमाला 👍
मोढेरा सूर्यमंदिर खूप छान आहे, हा लेख वाचून मागे मी archeology शी संबंधित एका फेसबुक ग्रुपवर ह्या सूर्यमंदिराविषयी लिहिलेली पोस्ट आठवली.
https://www.facebook.com/groups/1424720167832570/permalink/2663818083922...
एका दिवसात सूर्यमंदिर आणि रानी की वाव बघणे फार घाई गडबडीचे होते ह्याच्याशी पूर्ण सहमत. आम्ही पण वेळेअभावी फक्त सूर्यमंदिर पाहिले होते, रानी की वाव बघायला पुन्हा जावे लागणार!
सुंदर लेखमालिकेसाठी धन्यवाद 🙏
24 Feb 2022 - 12:54 pm | मार्गी
वा! एका अप्रतिम वास्तुचं दर्शन घडवलंत. खूप सुंदर! धन्यवाद.
12 Mar 2022 - 12:00 pm | गोरगावलेकर
@टर्मीनेटर. फेसबूकववरील आपली पोस्ट पहिली. छान आहे. फोटो अप्रतिम
@मार्गी. प्रतिसादाबद्दल धन्यवाद