आधीचा भाग खालील लिंकवर वाचता येईल.
गुजरात सहल २०२१_भाग ४- पोरबंदर, माधवपूर,सोमनाथ (प्रभास पाटण)
आज सहलीचा सहावा दिवस.
सकाळी सोमनाथमधील दोन ठिकाणे पाहून गीरच्या दिशेने प्रवास सुरु झाला . रस्त्याच्या बाजूने आमराई दिसत होती. केशर आंब्यांच्या बागा आहेत असे समजले. अकरा वाजता भोजदे, सासन गीर येथील आमचे बुकिंग असलेल्या 'गीर विहार रिसॉर्ट'ला पोहोचलो. अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे. मोठा परिसर, सुंदर बगीचा, स्विमिंग पूल, अद्ययावत कॉटेज, उत्कृष्ठ जेवण. शिवाय जंगल सफारीसाठी आपल्याला 'सिंह सदन' ला जावे लागते ते ठिकाण येथून फक्त दहा मिनिटावर आहे.
आज आमच्या जंगल सफारीची वेळ दुपारी ३ ते संध्याकाळी ६ असल्याने आमच्याकडे वेळ होता. सर्व जणी स्विमिंग पुलला पळालो. येथे फक्त आमचा महिलांचाच ग्रुप होता. स्विमिंग येत नसले तरी पोहण्याची रिंग घेऊन सगळ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. येथे सायकलीही आहेत ज्यावर काहींनी रपेट केली.
दुपारचे जेवण आटोपून आम्ही सिंह सदनला पोहचलो.
आमचे सफारीचे आगाऊ बुकिंग झालेले होते. काउंटरला बुकिंगची पावती दाखवल्यावर आम्हाला गाडी नंबर व कुठल्या मार्गाने जायचे त्या मार्गाचा नंबर असलेला परवाना मिळाला. गाडीबरोबर एक गाईडही आपल्यासोबत असतो. तीन तासाच्या एका जीप सफारीची फी रु.४५००/- इतकी असून त्यात परवाना फी, जिप्सी चार्जेस, गाईड आणि टॅक्स सर्व खर्च समाविष्ट असतात. बुकिंग करतांना सहाच्या पटीत माणसे असतील तर बराच खर्च वाचतो. कारण एकट्यासाठीही संपूर्ण जिप्सीचा खर्च द्यावा लागतो. किंवा तेथे जाऊनच इतर लोकांसोबत मिळून सफारीचे बुकिंग करावे. प्रत्येक गाडीला GPS असते त्यामुळे ठरविक मार्गानेच प्रवास करावा लागतो. सफारीचे असे १३ मार्ग असून प्रत्येक मार्ग २४ किमी ते ३२ किमी इतक्या अंतराचा आहे.
आशियन सिंहाची घटती संख्या बघून १९६५ मध्ये शासनाने जवळपास ११५० चौ.किमीच्या अभयारण्याची रचना केली. एक दशकानंतर यातील जवळपास २६० चौ.किमीचे क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करून प्रवेश ठिकाण सासन गीर निश्चित करण्यात आले.
सासन गीर पासून काही अंतरावर आणखी एक 'देवलिया पार्क " नावाचा झोन निर्माण करण्यात आला आहे. हमखास सिंह दिसण्याचे हे ठिकाण. येथे काही हेक्टरच्या बंदिस्त जागेत सिंह सोडलेले असतात . येथे बसने अगदी कमी किमतीत अर्ध्या तासाची सफारी करता येते.
विनंतीनुसार आमच्या तीनही गाडयांना एकच मार्ग (चार नंबर) मिळाला. तीन-सव्वातीनला सिंह सदनहुन गाड्या आपापल्या मार्गाकडे रवाना झाल्या . जंगलात प्रवेश करण्याच्या चेक पोस्टला परवाना बघून आत सोडल्या गेले. कच्चा, उंचसखल दोन्ही बाजूने झाडी असलेला रस्ता सुरु झाला. अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे दिसत असली तरी प्रामुख्याने सागवान वृक्षांचेच जंगल आहे. जंगलात सिंहांव्यतिरिक्त हरीण, कोल्हे, तरस बिबट्या, नीलगाय असे विविध प्राणी आहेत. पाणवठ्यांच्या बाजूने पक्षीदर्शनही होऊ शकते.
जंगलात शिरून थोडा वेळ होऊन गेला. सगळ्यांच्या नजरा सिंह बघण्यासाठी भिरभिरत होत्या पण दिसत होती फक्त चितळ (ठिपक्यांवाली हरिणे). कधी दोन-तिनच्या संख्येने तर कधी समूहाने. विटकरी रंग व पांढरे ठिपके असलेल्या या हरणांच्या फक्त नरांना शिंग असतात ती दरवर्षी गळतात व पुन्हा उगवतात.
क्वचित कुठेतरी मोरही दिसत होते.
एके ठिकाणी एक सुंदर सांबर झाडीतून डोकावून आमच्याकडे बघत होते. चितळांप्रमाणेच यांचीही शिंगे दरवर्षी नवीन येतात. याच्या शिंगाना पुढे एक व मागे दोन टोके असतात. नर सहसा एकटा असतो व माद्या कळप करून राहतात.
दोन तास होऊन गेले. सिंहाचे मात्र दर्शन नाही. रूटचा शेवटचा पॉईंट आला. कमलेश्वर डॅम पॉईंट. सिंचनाच्या उपयोगासाठीचे हे धरण हिरन नदीवर आहे. या पॉइंटला एक उंच मनोरा बनविला आहे ज्यावरून धरणाचे पाणलोट क्षेत्र व आजूबाजूच्या परिसराचे नयनरम्य दर्शन होते.
मनोरा
मनोऱ्याहून दिसणारा परिसर
संध्याकाळचे साडेपाच वाजले. परतीचा प्रवास सुरु झाला. सहाला जंगलाच्या चेक पॉइंटला पोहचायचे होते. आजची सफारी छानच झाली होती पण सिंह दिसला नसल्याने थोडे निराश झालो होतो. चेक पॉइंटला पोहचण्यासाठी शेवटची पाच मिनिटे बाकी होती आणि अचानक ती दिसली! सिंहाची एक मादी आणि सोबत दोन इवलेसे छावे .
आधी केव्हातरी तिने शिकार केली असावी आणि आता पिलांना भरवण्यासाठी ती आली असावी. एका ठिकाणी तिने बसकण मारली. पिले मात्र दुडू दुडू पळत झाडामागे गेली आणि मेजवानीवर ताव मारू लागली .
काही गाड्या पुढे निघून गेल्या होत्या . आमच्या नशिबात मात्र आज सिंह दर्शन होते. क्रिकेटच्या खेळात शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून विजय मिळाल्यावर जो आनंद होत असेल तोच आज मिळाला होता. वेळ संपली होती. गाड्या चेकपोस्ट पार करून सिंह सदनला आल्या. सिंह सदन बाहेर चहा-नाश्ता, कपडे, भेटवस्तू वगैरे मिळणाऱ्या दुकानाची रांग आहे. मस्तपैकी चहा घेतला. थोडीफार खरेदी करून रिसॉर्टला परत आलो.
येऊन फ्रेश झालो. आठ वाजले होते. रिसॉर्टतर्फे स्थानिक कलाकारांचा करमणुकीचा कार्यक्रम होता तो पाहण्यासाठी येऊन बसलो.
आज सहलीचा सातवा दिवस.
ठरल्याप्रमाणे सकाळी सहालाच सिंह सदनसाठी रवाना झालो. तिकीटाची येथील पद्धत आता माहिती झालेली होती. एकच जण तिकीट काउंटरला थांबला. थंडी असल्याने बाकीचे सगळे चहासाठी परत कालच्याच ठिकाणी गेले. कालचे परमिट जपून ठेवा असे गाईडने सांगितले होते त्याचा फायदा झाला. कालचे परमिट दाखविल्याने आज आम्हाला नवीन रूट मिळाला. काल दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या. गाडीत आपल्या पाण्याच्या बाटल्या नेऊ देत नाहीत. निघण्याच्या वेळी दहा रुपये भरून त्यांची बाटली घ्यावी लागते जी आल्यावर परत केल्यास आपले पैसेही परत मिळतात. कॅमेरा वापरणार असू तर एंट्री चेक पॉइंटलला रु.२००/- फी भरावी लागते.
एंट्री चेक पॉइंट
आज नशीब जोरदार होते. पहिल्या दहा मिनिटातच सिंह दिसला. थोडेसे दुरून का होईना पण दर्शन झाले. या मादीने बहुतेक नुकतीच एका मोठ्या म्हशीची शिकार केली असावी व आता तिचे लचके तोडत असल्याचे दिसत होते.
थोडे पुढे गेल्यावर जवळच्याच एका कृत्रिम पाणवठ्यावर वनराज पाणी पीत असल्याचे दिसले. जवळपास गाड्या थांबूनसुद्धा अगदी शांतपणे पाणी पिऊन स्वारी आरामात चालत जंगलात नाहीशी झाली.
एका ठिकाणी जुनागड-वेरावल ही मीटर गेज रेल्वे लाईन पार केली. सासन गीर हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
कालच्यासारखे आज चितळ दिसत नव्हते. सकाळच्या वेळी सिंह किंवा इतर शिकारी श्वापदे पाणी पिण्यासाठी बाहेर पडतात. त्यामळे हरीण किंवा छोटे प्राणी थोडे उशिराच बाहेर पडतात. थोडे पुढे गेलो आणि अजून एक सिंहाची मादी डाव्या बाजूने झाडीतून पळत दिसेनाशी झाली व काही अंतरावर परत एकदा रस्त्याच्या बाजूला येऊन दर्शन दिले.
वाटेत एक घर व त्याच्या बाजूला मोरांचा मोठा थवा दिसला. साधारणपणे एका थव्यात एक मोर(नर) व ४-५ लांडोर (मादी) असतात असे वाचले होते. पण येथे तर मोर भरपूर व लांडोर अगदीच कमी दिसत होत्या. जंगलात काही वनरक्षकांची घरे आहेत तसेच पशुपालन करणाऱ्या काही लोकांचीही घरे आहेत. शासनातर्फे खुप लोकाना येथून स्थलांतरित करण्यात आहे. परंतू अजूनही काही लोक येथून जाण्यास तयार नाहीत. बहुतेक 'मालधारी' जमातीचे उपजीविकेसाठी दुग्ध व्यवसाय करणारे लोक येथे आहेत.
एका ठिकाणी आमची चाहूल लागताच दोन रानडुक्कर फोटो काढायला वेळही न देता जंगलात नाहीशी झाली. माकडेही बऱ्याच ठिकाणी झाडांवर उद्या मारताना दिसत होती. नदीच्या बाजूने जातांना दूरवर एक मगरही दिसली परंतु फोटो घेता आला नाही.पुढे एक मुंगूस झर्रकन एका झाडावर चढलेला पहिला.
अर्धा रस्ता पार केल्यावर व परतीच्या वाटेत मात्र चितळं दिसायला लागली.
वेळ संपली तसे सिंह सदनला परत आलो. चहा घेतला. आज "मिठी-कडक" सांगावे लागले नाही. नाश्त्याची वेळ संपत आली होती म्हणून आधी खाऊन नंतर रूमवर आलो.
दोन्ही सफारी व गीर विहार रिसॉर्टचा एक मस्त अनुभव घेऊन साडेअकराला चेक आऊट केले.
पुढचे ठिकाण जुनागड.
क्रमश:
प्रतिक्रिया
24 Jan 2022 - 8:07 am | निनाद
हा भाग तर खास आवडला
24 Jan 2022 - 9:14 am | प्रचेतस
लैच भारी.
सिंहांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणे ही पर्वणीच. गीर विहार रिसोर्ट अतिशय सुंदर दिसतंय. ह्या भागात आता सफारी करणे आलेच.
24 Jan 2022 - 10:02 am | कर्नलतपस्वी
तुमच्या बरोबर आमची पण वारी
धन्यवाद
24 Jan 2022 - 4:03 pm | राजेंद्र मेहेंदळे
एक एक भाग वाचत होतोच, पण हा भाग फोटोंमधील वन्यजीवांमुळे जास्त आवडला. पुभाप्र.
24 Jan 2022 - 4:29 pm | टर्मीनेटर
मस्तच 👍
हा भागही खूप आवडला.
सासण गीर इथे जंगल सफारीत सिंह पाहिले होते, पण गिरनार परिक्रमेच्यावेळी जंगलातून पायी चालत जाताना झालेले वनराजाचे दर्शन हा माझ्यासाठी एक कधीही न विसरता येण्याजोगा अनुभव आहे.
गिरनार पर्वत रात्रीच्यावेळी चढायला सुरुवात केल्यास सांबर, चितळ आणि नीलगायी आजूबाजूला दर्शन देऊन जातात.
पुढच्या ठिकाणी म्हणजे जुनागडला तिथला प्रसिद्ध 'कावा' (हर्बल टी) प्यायला असाल अशी अपेक्षा आहे.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!
24 Jan 2022 - 5:30 pm | Bhakti
मस्तच!
24 Jan 2022 - 8:32 pm | चौथा कोनाडा
व्वा, एक नंबर !
+१
सगळे प्रचि आणि तपशील खासच आहेत. ट्रीप नियोजनाला उपयोगी पडतील !
25 Jan 2022 - 12:30 am | श्रीगणेशा
सफारीत वन्यप्राण्यांचे व्यवस्थित फोटो घेणं अवघड. छान फोटोज्!
25 Jan 2022 - 6:50 am | गोरगावलेकर
निनाद, प्रचेतस, कर्नलतपस्वी, टर्मीनेटर, Bhakti, चौथा कोनाडा, श्रीगणेशा सर्व प्रतिसादकांचे आभार.
27 Jan 2022 - 10:21 am | नचिकेत जवखेडकर
खूप छान छायाचित्रे आणि वर्णन! गुजरातला अजून एकदाही जायचा योग नाही आलेला. आता ट्रिप प्लॅन करताना तुमच्या लेखमालेचा नक्की उपयोग होईल!
29 Jan 2022 - 10:55 pm | MipaPremiYogesh
खुप छान माहिती
23 Feb 2022 - 7:34 pm | जुइ
सुंदर फोटो आणि तितक्याच सहज शैलितील वर्णन आवडले. इतर भाग सवडीने वाचते.
24 Feb 2022 - 4:59 am | गोरगावलेकर
नचिकेत जवखेडकर, MipaPremiYogesh,
जुई, प्रतिसादाबद्द सर्वांचे आभार