गुजरात सहल २०२१_भाग ३-भूज, द्वारका

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
9 Jan 2022 - 11:39 pm

भाग २ येथे वाचा
------------------------
आज सहलीचा तिसरा दिवस. अर्धा दिवस भूजमध्ये भटकंती करून द्वारकेसाठी प्रवास करावयाचा होता. पण अंतर जास्त असल्याने वाटेत जामनगरलाच मुक्काम करणार होतो. ठरल्याप्रमाणे सकाळी नऊला नाश्ता आटोपून भुजकडे निघालो. वाटेत एका ढाब्यावर चहा घेतला. ढाब्यासमोर खाटा टाकलेल्या होत्या. माणसे येऊन बसली की लगेच प्रत्येकाच्या हातात बशी दिली जात होती व किटलीतून थेट बशीत चहा दिला जात होता. हीच पद्धत नंतर अनेक ठिकाणी दिसली. (चहा रु.१०/-प्रति बशी) चहा मात्र सर्व ठिकाणी उत्तम मिळाला.
आज प्रथम प्राग महालाला भेट दिली. सन १८६५ मध्ये प्रागमलजी २ यांच्या काळात सुरु झालेले महालाचे काम प्रागमलजी ३ यांच्या काळात सन १८७९ मध्ये झाले. कोरीव नक्षीकाम केलेले सुंदर खांब व मूर्ती हि येथील विशेषता. इटालियन मार्बल व राजस्थानातील रेतीचे दगड वापरण्यात आले आहेत. महालाचे काम करण्यासाठी अनेक इटालियन कारागीर असल्याने बांधकामावर तेथील शैलीचा प्रभाव आहे.
(प्रवेश तिकीट दर रु.२०/- , कॅमेरा ५०)

फुलांना कोणी हात लावू नये म्हणून रक्षणार्थ साप

पहिल्या मजल्यावर भव्य दरबार नजरेस पडतो.

महालाला लागूनच ४५ फूट उंचीचा मनोरा असून त्यामध्ये घड्याळ बसविण्यात आले आहे.

याच आवारात अजून एक महाल असून तो "आईना महल" नावाने ओळखला जातो.
कला व संस्कृतीची आवड असणारे महाराव लखपतजी यांच्या काळात सन १७५० ते १७६० च्या दरम्यान हा महाल बांधण्यात आला. लखपतजी यांचे कारागीर रामसंग मलम यांनी स्थानिक कला शैली व त्यावर यूरोपीय कलाकारी यांचा वापर करून अतिशय सुंदर कलाकृती निर्माण केल्या. रामसंग मलम यांनी १७ वर्षे हॉलंडला राहून तेथील कला व कसब आत्मसात केले होते.
महालात अनेक झुंबर, कारंजी, व अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दरवाजे दिसतात. रामसंग मलंग यांच्या काही विशेष कलाकृतीही येथे आहेत. जसे हिंदू पंचांग दर्शविणारे लोलक असलेले घडयाळ, हिरे-मानके जडीत तलवार व ढाल, प्रत्येक पाऊल टाकल्यावर अत्तर उडवणारी पादत्राणे इ.
पहिल्या मजल्यावर हिरा महाल, फव्वारा महाल असे हॉल आहेत. हिरा महालमधील पलंगाच्या बाजूने सोन्याच्या फुलांची कलाकुसर केलेल्या चौकटीतील आरसे आहेत.
(तिकीट दर : रु.२०/- प्रत्येकी , कॅमेरा रु.१००/- मोबाईल रु.२०/- प्रत्येकी.)

महालात एका ठिकाणी मस्तानीचेही चित्र दिसले

कच्छ संग्रहालय
भूजच्या हमीरसार तलावाच्या काठावरील रस्त्याला लागूनच कच्छ मधील हे सर्वात जुने संग्रहालय. महाराव केंगारजी ३ यांच्या काळात मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांच्या हस्ते याची कोनशिला बसविण्यात आली होती . येथे अनेक पारंपरिक वस्तू शिल्प, उत्खननात सापडलेले अवशेष इ. चे प्रदर्शन आहे.

रामकुंड
ही एक पारंपरिक पायऱ्यांची विहीर असून बाजूच्या भिंतींवर विष्णूचे दशावतार कोरलेल्या मूर्ती आहेत. संग्रहालयाच्या जवळच रामधून मंदिराच्या मागे एका अरुंद बोळात ही विहीर आहे.

येथेच एका धर्मादाय संस्थेमार्फत फक्त २० रुपयात पोटभर जेवण पुरविले जाते. जेवणाची वेळ झालेलीच होती. आम्हीही येथेच जेऊया का असा विचार करत होतो. तेव्हड्यात ड्रायव्हर बोलला गरजू लोकांसाठी ही सुविधा आहे त्यांना याचा लाभ घेऊ द्या. मी तुम्हाला भूजमधील प्रसिद्ध थाळी मिळते तिथे घेऊन जातो तेथे जेवा. (आमचा ड्रायव्हर भुजचाच रहिवासी होता)
दहा मिनिटात आम्ही "उमियाजी डायनिंग हॉल" ला पोहोचलो. लोक रांगेत उभे होते पण पाचच मिनिटात आमचा नंबर लागला. अप्रतिम थाळी जेवायला मिळाली. चार भाज्या, पोळी, पुरी, बाजरीची भाकरी (रोटलो), डाळ-भात , कितीतरी प्रकारचे लोणचे, कोशिंबीर, पापड, गोड पदार्थ, ताक, बटाटा वडा आणि असेच काही पदार्थ. कितीही खा. एकेक पदार्थ चाखता चाखताच पोट भरले. (थाळी रु.१८०/- प्रत्येकी)

दुपारी अडीचला भुज सोडले.येथून थेट द्वारकेला न जाता वाटेत जामनगरलाच मुक्काम करण्याचे ठरले होते. कारण अंतर जास्त होते. जामनगरच सात तास अंतरावर दाखवत होते. निघायच्या आधी गाडीतले शेवटच्या सीटवरचे सामान टपावर गेले. ड्रायव्हरने सीट आडवे पाडून मस्त बैठक तयार करून दिली. पुरुष मंडळींचा रमीचा डाव सुरु झाला. महिलाही हळू हळू पेंगल्या . जामनगरच्या आधी कच्छ सोडून कधी सौराष्ट्रात प्रवेश केला ते कळलेच नाही. वाटेत चहापाणी झाले.रहदारी जास्तच होती. आमचे हॉटेल जामनगरच्या थोडे पुढे महामार्गाला लागूनच होते. रात्रीचे साडेदहा वाजले पोहचायला. थोडेसे खाऊन बाहेर हिरवळीवर थोडीशी शतपावली केली आणि झोपायला गेलो.

आज सहलीचा चवथा दिवस.
जामनगर म्हणजे आमचा केवळ एक थांबा होता . येथे भटकंती करायची नव्हती. सकाळी नऊला नाश्ता करून द्वारकेसाठी निघालो. तीन तासाचा प्रवास होता. साडे बाराला आमचे बुकिंग असलेल्या हॉटेलला पोहचलो. आजचे हॉटेल होते गुजरात टुरिझमचे 'तोरण टूरिस्ट बंगला'. अगदी वाजवी दर , अगत्यशील कर्मचारी , स्वच्छता,टापटीप सगळेच आवडले. जेवणाची सोयही आहे. पोहचायला थोडा उशीरच झाला होता. आधी सांगून ठेवले असते तर लगेच जेवण मिळाले असते. आताही म्हटलात तर बनवू पण लवकर पाहिजे असेल तर एका खानावळीचा पत्ता देतो असे म्हटले. भुजप्रमाणेच येथील "श्रीनाथजी डाईनिंग हॉल " मध्ये चांगले जेवण मिळाले. (थाळी रु.१५०/-)

हॉटेलहून निघण्याआधी आज काय काय बघता येईल याची माहिती करून घेतली होती. बेट द्वारकेचे मंदिर ५ वाजता उघडते त्या आधी वाटेतला शिवराजपूर बीच बघता येणार होता. थोड्याच वेळात १०-१२ किमी वरील बीचवर पोहचलो. येथेही माणशी रु.३०/- प्रवेश फी आकारल्या गेली. बीचवर एक दीपगृह आहे. व किनाऱ्याने एक खडकांची रांग आहे. पुढे चालत गेल्यावर काही वॉटर स्पोर्ट्सही आहेत असे कळले. आम्ही पाण्यात उतरून थोडासा फेरफटका मारला , थोडावेळ तेथील खडकांवर थांबलो आणि परत फिरलो.

येथून २५ किमीवरील ओखा येथे पोहचून बेट द्वारकासाठी फेरी बोट पकडायची होती. चारपर्यंत आरामात पोहचलो. आम्हाला सोडून गाडी पार्किंगमध्ये गेली. एकामागे एक फेरी बोट येथून सुटतच असतात.

धक्क्यावर जातांना

आम्हीही लागलेल्या बोटीवर पटकन चढलो. पण पूर्ण भरल्याशिवाय बोट निघणार नव्हती. बोटीच्या सर्वबाजूने असणाऱ्या बाकड्यावर काही जण बसले. बाकीचे सर्व उभे . जवळपास सव्वाशे माणसे कोंबली. तेव्हा कुठे बोट सुटली. (तिकीट एका बाजूने रु.२०/-. स्वतंत्र बोट करायची झाल्यास जाऊन येऊन रु.५०००/-)
बोट सुटली आणि असंख्य पक्षी डोक्यावर घिरट्या घालायला लागले. प्रवाशांनी फेकलेला खाऊ टिपण्यासाठी त्यांची एकाच झुंबड उडत होती. डोक्यावर, कपड्यांवर टपटप करून पक्षांची घाणही पडायला लागली. कसेतरी डोक्यावर रुमाल, ओढणी टाकून उभे राहिलो. साधारण २० मिनिट वेळ लागला बेटावर पोहचायला.

ओखा ते बेट द्वारका रोडने जाण्यासाठी समुद्री सेतूचे काम सुरु आहे.

मंदिराचे प्रवेशद्वार

मंदिरात जायच्या आधी एका खिडकीवर चप्पल तर दुसऱ्या खिडकीवर कॅमेरा/मोबाईल सर्व जमा करावे लागते.
असं मानलं जातं की सुदामा आणि श्रीकृष्ण यांची भेट याच ठिकाणी झाली होती म्हणून याला भेट द्वारका (बेट द्वारका) म्हटले जाते. मंदिर ५०० वर्ष जुने असून सोबत आणखीही काही देव देवतांची (शिव, विष्णू, हनुमान, देवी) छोटी छोटी मंदिरे येथे आहेत .
आतमध्ये पंडे लोकांचा सुळसुळाट आहे. बरोबर काही लोकांना हेरून बाजूला काढतात आणि त्यांचा कार्यभाग साधून घेतात. पटापट दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो व परत बोटीने ओखा येथे पार्किंग केलेल्या गाडीत येऊन बसलो.
संध्याकाळचे सहा वाजले होते. २० किमी अंतरावरील नागेश्वर ज्योतिर्लिंग बघायचे ठरले. नागेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. पौराणिक कथेनुसार हे ठिकाण ज्या जंगल परिसरात आहे तेथे दारुका व दारूकी हि राक्षस जोडी राहात होती. व त्यांच्या नावावरून या जंगलास दारुका वन म्हटले जायचे व त्यावरूनच द्वारका हे नाव आले आहे.
मंदिराच्या बाहेर २६ मीटर उंचीची शंकराची मूर्ती आहे.

हा फोटो जालावरून साभार

येथे जास्त वेळ न थांबता आम्ही द्वारकेला पोहचलो.
येथील मुख्य मंदिर म्हणजे द्वारकाधीश मंदिर किंवा जगत मंदिर. असे मानले जाते की मूळ मंदिर २५०० वर्षांपूर्वीचे आहे. सांध्याचे मंदिर १५ ते १६व्या शतकातील असावे. मंदिराच्या शिखरावर एक खूप मोठा ध्वज फडकताना दिसतो. मंदिर दर्शनासाठी रात्री नऊपर्यंत उघडे असते. आजच दर्शन झाल्याने आता उद्या सकाळी लवकरच पुढच्या प्रवासाला निघता येणार होते.
मंदिरात फोन, कॅमेरा, वा कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मज्जाव आहे.
मंदिराच्या बाहेरून घेतलेला एक फोटो

क्रमश:

प्रतिक्रिया

निनाद's picture

10 Jan 2022 - 7:10 am | निनाद

खुप छान ट्रिप आणि सुरेख फोटोज. वाचतो आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Jan 2022 - 8:30 am | चंद्रसूर्यकुमार

मस्त फोटो आणि प्रवासवर्णन.

अक्षय देपोलकर's picture

10 Jan 2022 - 8:30 am | अक्षय देपोलकर

मस्तच चाललंय....
खूप उपयोग होणारे ह्या धाग्यांचा भटकंती करताना...

रात्रीचे चांदणे's picture

10 Jan 2022 - 8:56 am | रात्रीचे चांदणे

गोरगावलेकर, नेहमीप्रमाणे उत्तम प्रवास वर्णन आणि उत्तम फोटोज. तुमच्या सिक्कीमच्या प्रवासाचा धागाही येउद्या.

गोरगावलेकर's picture

10 Jan 2022 - 11:25 am | गोरगावलेकर

सिक्कीम सहलीबद्दलही लिहिण्याच्या निश्चितच प्रयत्न राहील.

कर्नलतपस्वी's picture

10 Jan 2022 - 9:08 am | कर्नलतपस्वी

उत्तम फोटो उत्तम लेखन धन्यवाद.

प्रचेतस's picture

10 Jan 2022 - 9:15 am | प्रचेतस

हा भागही आवडला.
प्राग महाल, कच्छ संग्रहालय आणि तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू खूपच भारी आहेत.

गुजरातमधील समुद्र आणि तिथले किनारे दोन्ही काळे असा दमणचे किनारे पाहून समज झाला होता पण बेट द्वारका, शिवराजपूरचे निळेशार पाणी आणि शुभ्र सोनेरी पाहून येथील किनारे देखील सुंदरच आहे हे समजले.

तुमच्या ह्या सहलीमधून एकदम हटके ठिकाणे बघायला मिळत आहेत. भुजमध्ये लगानचं शूटिंग झालं होतं ते येथून जवळच असेल असे वाटते.

लगानचे काही शूटिंग मांडवीच्या विजय विलास पॅलेसलाही झाले आहे.

Bhakti's picture

10 Jan 2022 - 10:06 am | Bhakti

खुपचं सुंदर!

राघवेंद्र's picture

10 Jan 2022 - 10:15 am | राघवेंद्र

खूप सुरेख वर्णन आणि मस्त चालू आहे ट्रिप

प्राग महालचे फोटो फार आवडले !

पु भा प्र

चौथा कोनाडा's picture

10 Jan 2022 - 11:08 am | चौथा कोनाडा

तुमची भटकंती धागे म्हणजे मोठी मेजवानीच !
💞
नेहमी प्रमाणे सुपरमस्त फोटो आणि झकास प्रवासवर्णन !

कंजूस's picture

10 Jan 2022 - 11:18 am | कंजूस

उपयुक्त माहिती. धन्यवाद.

-------

या भागाचे म्हणजे सौराष्ट्र धार्मिक ठिकाणं आहेत आणि ते म्हातारपणासाठी राखून ठेवले आहे. द्वारकाधीश मंदिर ( आणि नाथद्वारा) इथे दर्शनाच्या दहा वेळा असतात. कृष्णदेव जागा होतो, मग निश्ता, मग जेवण,वामकुक्षी, शेवटी झोप असे अर्धा एक तास देऊळ उघबडे/बंद करायच्या वेळा असतात. गर्दी होते. पत्रकात वेळा छापलेल्या असतात. पण. . . आता कोरोना काळात त्यांनी तो कार्यक्रम बदलून देऊळ अधिक वेळ उघडे ठेवले आहे.

गोरगावलेकर's picture

10 Jan 2022 - 12:14 pm | गोरगावलेकर

उदयपूर सहलीत नाथद्वारा जाऊन आले आहे. भयंकर गर्दी असते येथे. अक्षरश: चेंगरा चेंगरी.

गोरगावलेकर's picture

10 Jan 2022 - 11:24 am | गोरगावलेकर

@ निनाद, चंद्रसूर्यकुमार, अक्षय देपोलकर प्रतिसादाबद्दल धन्यवाद

टर्मीनेटर's picture

10 Jan 2022 - 11:53 am | टर्मीनेटर

सुरेख झालाय हा भाग 👍
फोटोही अप्रतिम आहेत. प्राग महाल विशेष आवडला!
महाराष्ट्रा बाहेर खाण्या-पिण्याची* चंगळ होणारी भारतातली माझ्या पहिल्या पसंतीची ठिकाणे

  1. पंजाब
  2. गुजरात
  3. राजस्थान

गुजराती थाळी हा भोजन प्रकार आवडतोच, त्यात काठीयावाडी जेवण विशेष आवडीचे.

(* कागदोपत्री बंदी असली तरी गुजरातमध्ये त्याचीही आबाळ होत नाही 😀)

गोरगावलेकर's picture

10 Jan 2022 - 12:15 pm | गोरगावलेकर

सिक्कीममध्ये सुद्धा पिणाऱ्यांसाठी चंगळ असते. गोव्याप्रमाणेच येथे या बाबतीत स्वस्ताई आहे.
सहलीत तिघांनी ऑनलाईन परवाना घेतलेला होता. पण कोणीही खरेदीला गेले नाही. संपूर्ण सहल नो ड्रिंक्स , नो नॉनव्हेज. (१००/- रुपये भरून सात दिवसासाठी टुरिस्ट परवाना मिळतो. सात दिवसानंतर परत नूतनीकरण करता येते. )

गोरगावलेकर's picture

10 Jan 2022 - 12:31 pm | गोरगावलेकर

परवान्याबद्दल लिहिले ते गुजरातच्या नियमावलीबद्दल आहे

गुजरात पर्यटन विकासाच्या दृष्टीने उचलले गेलेले ते महत्वाचे पाऊल आहे 👍
अर्थात सरकारला हे शहाणपण उशिराने सुचुन त्यातून महसूलही मिळू लागला असला तरी त्या आधीही सर्व काही उपलब्ध होत होतेच 😀
असो, चांगल्या धाग्यावर विषयांतर व्हायला नको म्हणुन इथेच थांबतो 🙂

सौंदाळा's picture

10 Jan 2022 - 12:08 pm | सौंदाळा

हा भागही मस्तच
सर्वच फोटो सुंदर आहेत.

गोरगावलेकर's picture

10 Jan 2022 - 12:12 pm | गोरगावलेकर

@ कर्नलतपस्वी Bhakti, राघवेंद्र, अनिंद्य, चौथा कोनाडा प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

10 Jan 2022 - 2:58 pm | ॲबसेंट माइंडेड ...

हा भागही सुंदर.

तमिळनाडूतील त्रिची, श्रीरंगम, कुंभकोणम, तंजावूर, कांचिपूरम हा भाग फिरला आहात का?

तामिळनाडूतले कन्याकुमारी सोडले तर सर्वच भाग अजून बघायचा राहिला आहे. तुम्ही सांगितलेली सर्व ठिकाणे नोंद केली आहेत. बघूया कधी नंबर येतो या ठिकाणांचा

गोरगावलेकर's picture

12 Jan 2022 - 9:37 am | गोरगावलेकर

@ सौंदाळा, ॲबसेंट माइंडेड ... प्रतिसादाबद्दल धन्यवाद

पराग१२२६३'s picture

14 Jan 2022 - 11:32 pm | पराग१२२६३

२०१० मध्ये सौराष्ट्रात पहिल्यांदा जाणं झालं. त्यानंतर नाही झालेलं. तेव्हाच्या भेटीत द्वारका, सोमनाथ पाहणं झालं होतं. भूज अजून राहिलं आहे. वरील वर्णन वाचून संधी मिळताच भूजला भेट देण्याचं ठरवलं आहे आता.

रंगीला रतन's picture

15 Jan 2022 - 12:39 am | रंगीला रतन

मस्त..... पुभाप्र.

MipaPremiYogesh's picture

20 Jan 2022 - 9:05 am | MipaPremiYogesh

मस्त लेख आणि माहिती..

गोरगावलेकर's picture

23 Jan 2022 - 10:08 am | गोरगावलेकर

पराग१२२६३, रंगीला रतन, MipaPremiYogesh प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार

सर्व भाग पाहिले. सगळे फोटो झ का स्स्स्स !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kallolam... :- Padi Padi Leche Manasu

कर्नलतपस्वी's picture

23 Jan 2022 - 7:53 pm | कर्नलतपस्वी

सेना अस्पताल भुजमधे आमचा मित्र सकाळी लवकर उठून आंघोळीला गेला. आंघोळ सुरू असतानाच एकदम भुकंप झाला आणी संपूर्ण इमारत जमिनदोस्त झाली. दोर बळकट म्हणून वाचला स्लँब च्या तुकड्या खाली सहा तास फक्त ओल्या अतंरवस्त्रावर पाणी, जेवणाशीवाय , बाहेर काढल्यानंतर टाँवेल वरच बराच वेळ बसावे लागले.
आता म्हणतात की भुज चे पुनर्वसन पहिल्या पेक्षा छान झाले आहे.