दिवाळी अंक २०२१ : पाकळी

Primary tabs

Richard Nunes's picture
Richard Nunes in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

तिचं नाव नीना...
मी तुम्हाला तिचं खरं नाव सांगत नाही हे तुम्हालाही माहीत असणार. नाहीच सांगता येणार मला…
पण तिच्या आणि माझ्या भेटीची गोष्ट सांगायला हरकत नाही.
नीनाची आणि माझी पहिली भेट झाली ऑकलंडला. कामानिमित्त माझ्या न्यूझीलंडला बऱ्याच फेऱ्या व्हायच्या. माझं रुटीन तसं ठरलेलं. बहुधा महिन्याच्या शेवटच्या बुधवारी दुपारी ऑकलंडला पोहोचायचं...शुक्रवारी रात्रीचं फ्लाईट घेऊन परतायचं. कधी फारच काम निघालं तर शनिवारी निघायचं.
मुक्कामही ठरलेला. कंपनीचं हयात हॉटेलबरोबर कॉन्ट्रक्ट होतं. ब्लू हेवन आणि क्वीन्स रोडच्या कोपऱ्यावर, एका सुंदरशा छोट्या टेकडीवर ह्या हॉटेलचा विस्तार होता. आता ह्या हॉटेलचं नाव बदललंय असं ऐकतो. बऱ्याच वर्षांत फिरकलो नाही तेथे....
हॉटेलच्या रूममधून ऑकलंडच्या बेमधील, म्हणजे खाडीमधील, निळाशार पाण्याचा तुकडा तेवढा नजरेला पडायचा. आकाशाची निळाई लाटावर पांघरून पसरलेल्या सागराच्या त्या तुकड्याला खाडी म्हणणं म्हणजे न्यूझीलंडच्या पाणी-संस्कृतीचा पाणउतारा म्हणायला हवा. पण तेवढं कौतुक बघायला मला तरी कुठे वेळ होता म्हणा!
माझं संध्याकाळचं रुटीनही सहसा बदलत नसे. काम आटोपून हॉटेलला परतायचं, फ्रेश व्हायचं आणि हॉटेलच्या रेस्तराँमध्ये रात्रीचं जेवण घ्यायचं. एखादा सहकारी बरोबर असला, तर सिटीमधील कुठलं तरी हॉटेल धुंडाळत फिरायचं!
जेवण मात्र रमतगमत व्हायचं. बऱ्याच वेळेला मी एकटाच असायचो. माझं टेबलही ठरलेलं. अगदी पाठीमागचं. म्हणजे रेस्तराँमध्ये येणारे जाणारे दिसतील अशा अंगाने मी बसायचो. येणारे लोक न्याहाळत, त्यांच्या बोलण्यावरून ते कुठचे असतील त्याचा तर्क लढवत. रेड वाइनचे घुटके घेत. तेवढीच करमणूक!
अशाच एका सुस्त संध्याकाळी नीना नजरेस पडली. ती सरळ माझ्याकडेच येत होती. कमनीय बांधा, सडपातळ, सावळा रंग आणि कमालीचा हसतमुख आणि प्रसन्न चेहरा. प्रथमदर्शनी एवढं मनात रुतलं.

"सर, काय घेणार आज?"
"अं?" मी भानावर आलो. तिच्याकडे परत पाहिलं आणि तिच्या शर्टावर लावलेल्या नावाच्या पट्टीने खुलासा झाला. ही ह्याच हॉटेलमध्ये काम करते तर! बहुदा नवीन भरती झाली असावी, कारण अगोदर कधी हिला पाहिल्याचं स्मरत नव्हतं.
"तुझं नाव नीना?"
"होय सर...काय घेणार तुम्ही आज?" जणू काही आमची वर्षानुवर्षाची ओळख आहे ह्या सलगीने ती बोलत होती.
मेनूवर तशा फारशा डिशेस नसायच्या. चार पाच मेन्स, तेवढीच स्टार्टर्स आणि डिझर्ट.
वाइनचं सिलेक्शन मात्र चांगलं होतं. मी मेनूवरील एक रेड वाइन सांगितली.
"सर, तुम्ही ही पीननव्हा टेस्ट केलीय? न्यूझीलंडची आहे.." मेनूवरील दुसऱ्या एका वाइनच्या नोंदीवर बोट ठेवून ती म्हणाली.
मी तिच्याकडे जरा नवलानेच बघितलं.
"सर, मी हॉस्पिटॅलीटी शिकतेय. त्यामध्ये वाइनचा अभ्यासही येतो." तिनं खुलासा केला. "ही वाइन थोडी लाइट आहे. तुम्हाला आवडेल."
"ठीक आहे. आज तुझी पसंती! त्याबरोबर काय खायचं तेही तूच ठरव."
"थँक्स सर. You won’t be disappointed."
दोन मिनिटात ती वाइनची बाटली घेऊन आली आणि मला ग्लासात थोडी चाखायला दिली. वाइन खरोखर उत्तम होती.
"गुड चॉइस.." मी म्हणालो.
मंद हसत तिने माझा ग्लास भरला आणि ती किचनच्या दिशेने परतली.
यथावकाश माझं जेवण आलं. इतर पाहुण्यांची सरबराई करताना तिची होणारी लगबग पाहत मी माझी वाइन आणि जेवण संथपणे संपवलं.
बिलाची रक्कम माझ्या रूमच्या खात्यावर वळती करायचं सांगून मी निघणार, तेवढ्यात ती किचनमधून पळत पळतच आली.
"आवडलं ना जेवण?" एवढ्या आपुलकीनं तर आपल्या घरात देखील विचारत नाहीत!
"तर...मस्तच होतं. तुझी शिफारस मी नक्कीच लक्षात ठेवीन." मी हसत उत्तरलो.
ती खळखळून हसली.
"गुड नाइट. उद्या परत भेटू या."
मीही प्रतिसाद म्हणून ‘गुड नाइट’ केलं आणि रूमवर परतलो.

ही आमची पहिली भेट!
नंतरच्या भेटीही अशाच. रेस्तराँच्या सेटिंगमध्ये! फरक एवढाच की एरवी तासाभरात जेवण आटोपून रूमवर जाऊन ताणून देण्याऐवजी मी कळत नकळत दोन-अडीच तास रेस्तराँमध्ये घालवू लागलो होतो. नीनाला न्याहाळत.. तिच्या हालचाली, बोलण्यातील मोकळेपणा, खळाळून हसण्याची तिची लकब.. मी तिच्यावर फिदा होतोय हे मला जाणवत होतं.

आमच्या हेड ऑफिसला जास्त काम असल्यामुळे एकदा माझी ऑकलंडवारी एका आठवड्याने लांबली. नेहमीप्रमाणे मी संध्याकाळी रेस्तराँमध्ये पोहोचलो. नेहमीची वर्दळ, माझी नेहमीची जागा आणि नेहमीचा मेनू.
इतक्यात नीना लगबगीने आली. तेच हसू, तीच आदब...
"गेल्या आठवड्यात आला नाहीत.. मी वाट पाहात होते." वाट पाहत होती? मी जरा चमकलोच.
आपण नको ते बोलून गेलो हे तिच्या ध्यानात आलं. आपला चेहरा मला दिसू नये ह्या उद्देशाने तिने मान झुकवली. पण क्षणात ती सावरली. मी काहीतरी थातूरमातूर कारण सांगितलं. मला काय हवं, नको ते विचारून किचनमध्ये पसार झाली.
तिलाही माझ्याविषयी नाजूक भावना असतील की काय, असे विचार माझ्या मनात घोळत राहिले. कदाचित नसतीलही. पण आपल्या विचाराला लगाम घालू देईल ते मन काय कामाचं? मात्र इतर पाहुण्यापेक्षा ती माझ्या टेबलाशी जास्त वेळ घालवायची, हे मात्र निश्चित. काही ना बाही विषय काढून बोलत राहायची.

एका खेपेत एक गमतीशीर प्रसंग घडला.
"तुमच्या रेस्तराँमध्ये तोच तोच मेनू किती महिने चालवताय.. कधी बदलण्याचा विचार आहे की नाही?" मी विचारलं.
"शेफ बदलला की मेनू बदलणार. आणि शेफ काही बदलायचा चान्स दिसत नाही." ती मस्त हसत म्हणाली.
"मग दुसरा काही इलाज?"
"सिटीमध्ये आहेत की इतर हॉटेलं."
"पण तशी कंपनी नाही ना.."
"मग विचारायचं की...!" आणि ती पुन्हा खळाळून हसली आणि माझी वाइन आणायला किचनमध्ये गेली.
वाईनच्या प्रत्येक घुटक्यागणिक मी तिचं वाक्यही घोळवत राहिलो - ‘मग विचारायचं की...’
त्या दिवशी आलेली किंचित नशा त्या वाइनची की त्या वाक्याची, ते मात्र गुलदस्त्यात राहिलं.
बिलावर सही करताना मी विचारलं, "उद्या सिटीतील रेस्तराँमध्ये जाऊ म्हणतो.. येशील?"
‘येशील’ विचारताना मी वर पाहिलं, अगदी तिच्या डोळ्यात. तिचा चेहरा थोडा गोरामोरा झाल्यासारखा वाटला. उत्तर देण्यासाठी तिने घेतलेले चार-पाच सेकंद काही मिनिटांसारखे वाटले.
‘येईन’ असं पुटपुटून ती झटक्यात तिथून निघून गेली. मी तरंगत रूमवर पोहोचलो.

दुसऱ्या दिवशी कामावरून परतायला मला जरा उशीरच झाला. दरवाजा उघडून आत आलो, तो दरवाजाच्या फटीतून सरकवलेली एक चिठ्ठी नजरेस पडली. नीनाने रेस्तराँ बूक केलं होतं आणि सिटीमध्ये ती कुठे माझी वाट पाहात थांबणार होती, त्याचा तपशील दिला
होता. मी उडालोच! लवकर फ्रेश होऊन लगबगीने त्या ठिकाणी पोहोचलो खरा, पण उशीर झाला होता. वाट पाहून ती कंटाळली होती. रेस्तराँ सिटीपासून जरा लांब होतं. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत आणखी उशीर होणार होता. आणि बुकिंगची वेळही निघून गेली होती. ती
नाराजी जरी लपवू पाहत असली, तरी चेहरा थोडंच मेंदूचं ऐकतो?
मी सॉरी वगैरे बोलण्याच्या भानगडीत पडलो नाही.
"तुला माहिताय.." मी म्हटलं, "आजपर्यंत मी तुला फक्त हॉटेलच्या युनिफॉर्ममध्ये पाहिलंय. ह्या जीन्स आणि हा फुलाफुलांचा टी-शर्ट तुला खूप उठून दिसतो. Beautiful!"
"खर्रच?"
"तर काय! In fact, तू युनिफॉर्ममध्ये खूप स्मार्ट दिसतेस, पण आता तू अधिक मोहक दिसतेस."
"एखाद्याला हरबऱ्याच्या झाडावर चढवण्यात तू तरबेज दिसतोस," ती हसत म्हणाली.
चला, नाराजी तर दूर झाली!
"चल, आपण आज जरा भटकंती करू या... आणि कुठेतरी वडापाव खाऊन घेऊ या!" मी म्हटलं.
"वेडा आहेस का ऑकलंडमध्ये वडापाव शोधत हिंडायला? चल, मला एक कबाब कॉर्नर माहित आहे. तेथे जाऊ या."

त्या संध्याकाळी नीनाची आणि माझी खरी ओळख झाली. तीनेक तास आम्ही रस्ता फुटेल तसे भटकत होतो. नीना भरभरून बोलत होती... तिच्या आवडीनिवडी, तिचं बालपण, शाळेमधील तिचं खेळातलं प्राविण्य.. न्यूझीलंडमध्ये हॉस्पिटॅलिटी विषयात तिची प्रगती.. कवितेची आवड.. एक ना अनेक. आठवणी सांगताना ती रंगून जायची, भावुक व्हायची आणि काही क्षण शून्यात गेल्यासारखी शांत व्हायची.
"तू कविता लिहितेस?"
"नाही जमत मला. मला वाचायला आवडतं, पण लिहायला पेन हातात घेतलं की शाई गोठून जाते असं वाटतं."
"बॉल पेन वापरायचं.." माझा विनोदी प्रयत्न!
"खरं सांगू, मी फाउन्टन पेन वापरते! मला आवडतं."
'मला नाही आवडत बोटाला शाई लागलेली!"
"बोटाला लागलेला प्रत्येक डाग हा तुमची चूक झाल्याचा दाखला नसतो, तर तुम्ही केलेल्या प्रयत्नांची पावती असते."
"वा! शेक्सपियर?" मी अजूनही मस्करीच्या मूडमध्ये होतो
"म्हण तुला बरं वाटत असेल तर. बोटावरचे डाग धुऊन काढता येतात. काळजावरच्या डागांना ती इजाजत नाही."
"वा, चांगला शेर झाला की.. आणि तू म्हणतेस तुला कविता जमत नाही!"
ती बळेबळेच हसल्याचं मला वाटलं.
आम्ही एका कपड्याच्या दुकानासमोर उभे होतो. आतमध्ये सुरेख ड्रेसेस लावलेले होते. तेथील एका सुंदर प्रिंटेड डिझाईनच्या ड्रेसकडे माझं लक्ष गेलं.
"हा घ्यायचा तुला? तुला खूप मस्त दिसेल."
"खरंच सुंदर आहे. पण मी ड्रेसेस जास्त पसंत करत नाही. मुंबईत मला सलवार कमीझ प्यारी होती. येथे ती वापरता येत नाही, तेव्हा शर्ट आणि ट्राउझर्स झिंदाबाद!" सोबत तिचं बोनस मोहक हास्य!
"कधीतरी बदल म्हणून ड्रेस घाल ना! मला हा ड्रेस तर भारी आवडलाय."
"आणि दुकान बंद आहे. तर महाशय, आपण जरा पुढे चालत राहू या का?" ती कृत्रिम अदबीने म्हणाली.
आणि आम्ही चालत राहिलो.. वेळेचं भान हरपून.. हेही तिनेच मला सांगितलं.

"उद्या ऑफिस नाहीये का? चल, मला बस स्टॉपपर्यंत सोड आणि तू हॉटेलला जा."
हॉटेलच्या बाहेर होणाऱ्या आमच्या अनेक भेटींची सुरुवात ही अशी आश्वासक झाली होती!
प्रत्येक भेटीत नीनाच्या जीवनाच्या पाकळ्या अलगद उलगडत होत्या. माझ्या रुक्ष आणि निरस जीवनात ती ओअ‍ॅसिस फुलवीत होती, नव्हे तीच ओअ‍ॅसिस बनली होती.
डिसेंबरचा महिना होता. वर्षअखेर असल्यामुळे ह्या वेळी मी चारएक दिवस ऑकलंडमध्ये होतो. दक्षिण गोलार्धातील अगदी दक्षिणेकडील ऑकलंडमधील सूर्यास्तच रात्री साडेआठला व्हायचा आणि आणखी तासभर किंवा त्यापेक्षा जास्त संधिप्रकाश असायचा. त्यामुळे ऑफिस
सुटल्यावर बर्‍यापैकी मोकळा वेळ मिळणार होता. आल्या आल्या मी नीनाला माझं शेड्युल सांगितलं.
"दोन दिवस रजा टाकशील? आपल्याला थोडा वेळ मिळेल." मी विचारलं.
"ख्रिसमस असल्यामुळे रेस्तराँ खूप बिझी आहे, तरीहि मी मॅनेजरला विचारते."
हो-नाही करत मॅनेजरने गुरुवारी सुट्टी दिली. मला ती बातमी सांगताना तिच्या चेहऱ्यावरील आनंद तिला लपवता येत नव्हता!

ह्या वेळी हयगय करून चालणार नव्हतं. मी सिटीमधील स्काय टॉवरमधील ऑर्बिट ३६० ह्या फिरत्या रेस्तराँमध्ये बुकिंग केलं. अगदी पावणे-सहाचं. म्हणजे जेवणानंतर आम्हाला आणखी दोन-तीन तास निवांत मिळणार होते.
नीना रेस्तराँमध्ये पोहोचली आणि मी तिच्याकडे बघतच राहिलो. कपड्याच्या दुकानात मला आवडलेल्या ड्रेससारखाच, पण अधिक पायघोळ ड्रेस तिने परिधान केला होता. केसाचा बन न बांधता ते खांद्यावर रुळले होते. चेहऱ्यावर अगदी हल्कासा मेकअप.. नसल्यात जमा असा.
"आत जायचं की येथेच मला बघत थांबायचंय?"
"हो.. चल ना." मी दरवाजा उघडून धरला.
वेटरने आम्हाला आमचं टेबल दाखवलं. मेनू पाहण्याऐवजी मी नीनालाच पारखत होतो.
"अरे, मागव ना! मी दुपारी जेवलेसुद्धा नाही!"
"तू हॉस्पिटॅलिटीवाली ना? मग तूच काय ते ठरव."
मेनूचा अभ्यास करत तिने काय ते ठरवलं आणि ऑर्डर दिली. तोपर्यंत मी तिच्या चेहऱ्यावरील बदलत जाणाऱ्या रेषांचा अभ्यास करत राहिलो.

ऑर्बिटच्या फिरत्या माळ्यावरून संपूर्ण ऑकलंडची स्कायलाइन बघत, वाइनचे घुटके घेत आणि आलेल्या डिशेसचा आस्वाद घेत आम्ही जेवण संपवलं. नीनाचं नेहेमीप्रमाणे जेवण कमी आणि बोलणं भरभरून असं चाललं होतं. अचानक तिच्या लक्षात आलं..
"अरे, मीच बडबडतेय मघापासून."
"आपण पहिल्यांदा भेटल्यापासून.." मी दुरुस्ती सुचवली.
"होक्का! ठीक आहे. मग मी आता बोलतच नाही कशी. तूच बोल."
"मी काय बोलणार? तुझ्या प्रांतात घुसखोरी कशाला?"
"पण काहीतरी सांगण्यासारखं असेल ना तुझ्याकडे?"
मी क्षणभर गप्प राहिलो.
"हो, आहे की.."
"मग सांग पटकन"
"मी आईला तुझ्याबद्दल सांगितलं."
नीनाच्या चेहर्‍यावरील अवखळपणा क्षणात गायब झाल्याचं मला जाणवलं.
"का गं? मी आईला सांगितलेलं आवडलं नाही तुला?"
"तसं नव्हे, पण जरा घाई होतेय असं नाही वाटत तुला?"
"नाही वाटत."
पुढची अनेक मिनिटं शांततेत गेली. मी निनाकडे निरखून पाहत होतो आणि ती मान खाली घालून माझ्याकडे पाहण्याचं टाळत होती.. की ती लाजली होती? काहीच कळत नव्हतं.
वेटर आम्हाला आणखी काही हवं नको ते विचारायला आला होता. मी बील मागितलं. बील भरून मी उठलो.
"चल, निघू या."
सूर्याची रेंगाळणारी किरणं आणि बाहेरील मोकळी हवा अंगावर घेतली की मूड पालटेल, असा माझा होरा होता.
सूर्य अजून पुरता कलायला वेळ होता. आम्ही नेहमीप्रमाणे दिशाहीन चालत होतो. शेवटी तिनेच सांगितलं, "चल, वॉटरफ्रंटला जाऊ या. तेथे मॅरीटाइम म्युझियमजवळ बसू या."

समोर निळंशार पाणी. त्यात डोलणाऱ्या शेकडो छोट्या बोटी. कलता सूर्य. समुद्रावरून वाहणारं आणि शरिराला गुदगुल्या करणारं वारं.. निसर्ग किती भरभरून द्यायला तयार असतो, पण आमची ओंजळ अशी का कमी पडते?
"अगं बोल ना. काहीही बोल."
तिचं अचानक गंभीर होणं मला समजत नव्हतं.
"नीना.." मी तिच्या हाताला स्पर्श केला. माझा पहिला स्पर्श.
ती शहारली. असं का? ती खरं तर मोहोरायला हवी होती. आणि तिचा हात कमालीचा गार का वाटावा?
"नीना, तुला बरं वाटत नाहीये का? तुला घरी सोडू का?"
नको, तिनं मानेनच सांगितलं.
"काय होतंय तुला?"
"मला खूप भीती वाटतेय." अरे, हिचा स्वर तर कापरा येतोय...
"काही घाबरू नकोस. मी आहे नं.."
तिनं स्वत:होऊन माझा हात तिच्या हातात घेतला आणि ती आर्तपणे पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या त्या इवल्याशा बोटीकडे पाहत राहिली.
"किनारा जवळ आहे म्हणून ह्या बोटींची मिजास आहे" थोड्या वेळाने ती अगदी स्वतःशीच बोलल्यासारखी पुटपुटली.
‘अगं, किती नाजूक आहेत त्या. कशाला खोल दर्यातील लाटाबरोबर झगडायला जातील?"
"लाटांचं मला सांगू नकोस. लबाड असतात. खेळवतात, भुलवतात आणि ओढून नेतात खोलात. वाऱ्याशी संधान असतं त्याचं. नाजूक, कणखर. .सगळ्यांना नाचवतात आणि थकवून थकवून घेऊन जातात तळाला." तिच्या डोळ्यात एक वेगळीच झाक होती.
मी हळुवार तिला कवेत घेतलं. एका निरागस बाळासारखी ती माझ्या खांद्यावर डोकं रेलून निर्धास्त झाली. बराच वेळ. सूर्य पुरता कलून जाईपर्यंत...
काळोख पडू लागला होता. मघाशी निळंशार दिसणार्‍या पाण्यावर आता एक काळसर छटा आली होती. पाण्यावर अजूनही डोलणाऱ्या त्या इवल्याशा बोटी छायाप्रकाशाच्या खेळातील नाचणाऱ्या प्रतिमा वाटत होत्या. हवेत सुखद गारवा आला होता आणि माझा जड
झालेला खांदा पूर्ण भिजला होता.

माझी हालचाल होताच नीनाने मान उचलली. आसवं अजूनही तिच्या डोळ्याच्या तटावर खोळंबून असावीत आणि त्यांना दटावून गप्प करण्यातदेखील ती पटाईत असावी.
जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात ती उठायचा प्रयत्न करू लागली.
मी हात धरून तिला उठवलं. तिच्या हाताचा स्पर्श अजूनही गारच वाटला.
"नीना, तुझा हात इतका गार कसा गं?"
"कारण तुझा हात गरम आहे म्हणून! Its relative! सापेक्ष म्हणतात त्याला मराठीत." तिने नेहेमीच्या खट्याळ आवाजात मला सुनावलं. ती परत अगदी मोकळी झाली होती. जणू मधल्या तास-दीड तासात काही घडलंच नव्हतं!
तिला घरी सोडून मी टॅक्सीने हॉटेलला पोहोचलो. बिछान्यावर डोकं ठेवताच घोरणारा मी त्या रात्री मात्र संध्याकाळच्या साऱ्या घटनांची संगती लावता लावता थकून गेलो आणि त्या लाटा मलाच थकवून तळाला ओढून नेत असल्याची दु:स्वप्नं पाहत कधीतरी पहाटे झोपून
गेलो.

सकाळी ब्रेकफस्टसाठी रेस्तराँमध्ये गेलो होतो, पण नीना दिसली नव्हती. दिवस जरा घाईगर्दीचाच गेला. ‘कॅजुअल फ्रायडे’ म्हटलं की कामं रमतगमत होतात. पण मला सारं आटोपून संध्याकाळच्या फ्लाइटने निघायचं होतं. ‘बरं नसेल का तिला?’ हा विचार अधूनमधून डोकावत होता. विमानतळावर जाताना कालची संध्याकाळ सारखी आठवत होती. इतक्या दिवसांनी आलेली संधी खरं तर खूप रोमॅन्टिक घालवता आली असती. पण संभाषण भलत्या रुळावर गेलं आणि आपल्याला ते सावरता आलं नाही, ही रुखरुख होती. पुढच्या भेटीत हे कसं निस्तरावं ह्याची मनात तालीम करता करता मी एअरपोर्टला पोहोचलोदेखील होतो. तळमजल्यावर चेक-इन आटोपून मी एस्कलेटरवरून डिपार्चर लेव्हलवर पोहोचलो, तर समोर साक्षात नीना!

"नीना, तू! What a pleasant surprise!"
उत्तरादाखल नीनाने मला घट्ट मिठीच मारली. त्या मिठीत आवेग होता, व्याकूळता होती आणि पुढील भेटीपर्यंतच्या विरहाची वसुलीदेखील असावी!
"अगं सोड.. लोक आपल्याकडे बघताहेत"
"बघू देत." ती माझ्या कानात पुटपुटली. कालचे निसटून गेलेले क्षण ती अशी पकडू पाहात होती.
"आज येथे कशी आलीस?"
"येऊ नये? वाटलं यावं... आले."
"कॉफी?"
"चालेल, पण तुला उशीर नाही ना होणार?"
"माझं प्री-इमिग्रेशन’ झालंय. आणि आत जाऊन लाउंजमध्ये एकटा बसण्याऐवजी येथे बाहेर, तुझ्या सोबतीत.."
तिने स्वतःहोऊन हात पुढे केला. मी तिचा हात धरून कॉफीशॉपकडे चालू लागलो.
"आज तुझा हात उबदार वाटतोय."
"आणि तुझा गार...सापेक्षतावाद घालायचा आहे का, की मुकाट्याने कॉफी पिणार आहेस?"
"तुझ्याकडे बघत बसणार आहे.. कॉफी कधीही पिता येईल."
ती गोड हसली.
आम्ही असेच हातात हात घालून तासभर बसून होतो. माझ्या फ्लाइटची वेळ जवळ येत चालली होती.
"चल, मी निघू आता?"
"जायलाच पाहिजे?"
"माझ्या नावाने आता पीए सिस्टिमवर ठणाणा होईल बघ!"
ती नाइलाजाने उठली.
"अरे, विसरलेच होते.." तिने पर्समधून एक एन्व्हलप काढून माझ्या हाती दिलं.
"काय गं?"
"फूल नाही, पण फुलाची पाकळी.."
"काही स्फोटक तर नाही ना? नाहीतर सिक्युरिटीवाले काढून घेतील." मी हसत म्हणालो.
"फक्त एक अट पाळायची.. पाळशील?"
"तू सांगशील तसं"
"हे एन्व्हलप घरी गेल्यानंतरच उघडायचं. प्रॉमिस?"
"प्रॉमिस!" मी हात पुढे केला
"जाऊ मी?" माझा हात घट्ट दाबत ती म्हणाली.
"अंहं... येऊ मी, असं म्हणायचं असतं."
तिचे डोळे भरून आल्यासारखे वाटले. ती पुन्हा मला आवेगाने बिलगली. आणि तिने माझ्या गालावर हळूवार ओठ टेकले. कालची भरपाई अजून शिल्लक होती तर!

मी इमिग्रेशनच्या गर्द काचेआड होईपर्यंत ती रेलिंगला खिळल्यासारखी स्तब्ध उभी होती.
तिने दिलेलं एन्व्हलप माझ्या हॅन्डबॅगेतून मला खुणावत होतं, पण मी मोह आवरला. तिला शब्द दिला होता. घरी गेल्यानंतरच उघडीन असा.
कधी नव्हे ते फ्लाइट लेट झालं. इमिग्रेशनला लांब रांग, बॅगेज हॉलमध्ये दिरंगाई... आणि टॅक्सी मिळेपर्यंत आणखीन त्रागा. पण हे काही आजच झालं असंही नव्हतं. वेळोवेळी येणारे हे अनुभव. पण आज मात्र मी चिडचिडा होतोय असं झालं होतं.
एकदाचा घरी पोहोचलो. फ्रेश होऊन बिछ्यान्यात घुसलो आणि नीनाने दिलेलं एन्व्हलप उघडलं.
आतमध्ये एक कार्ड होतं, आणि एक पत्र!
कार्ड अगदी अनोखं होतं. बाहेरून कोरं आणि आतमध्येदेखील संपूर्ण कोरं. त्यात समोरच्या बाजूला लालभडक गुलाबाची एकच पाकळी. मला हसू आलं. ‘फूल नाही, पण फुलाची पाकळी...’ असंच काहीतरी म्हणाली होती ती!
माझी नजर पाकळीच्या कडेवर गेली. गुलाबाच्याच छोट्या काट्याने ती पाकळी कार्डला अडकवलेली होती. का कोण जाणे, समुद्रकिनार्‍यावर तिच्या गार हाताचा स्पर्श झाला, तेव्हा जाणवलेल्या संवेदना माझ्या कण्यातून सर्रकन उतरल्या.
मी पत्र उघडलं. तीन-चार पानाचं... समासासाठी पानाची डावी कड दुमडून अगदी सुवाच्य अक्षरात लिहिलेलं... तेही शाईनं लिहिलेलं. मी वाचायला सुरवात केली -

राजा,
माझ्या वेडेपणामुळे आजची संध्याकाळ परत कधीही घरट्यात न फिरकणाऱ्या पाखरासारखी आपल्याला पारखी झाली. तुला सॉरी म्हणणार होते, पण कुठेतरी वाचलं होतं - Love means never having to say you are sorry. एरीक सेगल असणार
बहुधा...
मध्यरात्र उलटून गेली आहे. Typical Auckland weather! बाहेर वादळ घोंगावतंय. पाऊस कोसळतोय. मीदेखील पार उन्मळून पडलीय.
काल रात्री आपण परत फिरलो, तेव्हाच तुला पत्र लिहून माझं मन तुझ्या पुढ्यात मोकळं करायचं असं मी ठरवलं होतं. खरं तर आपण समुद्रकिनारी बसलो होतो तेव्हाच तुझे हात हाती असताना, तुझ्या डोळ्यात डोळे घालून मी सारं काही सांगणार होते. पण धीर नाही
झाला. तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून मी खूप खूप रडले. अगदी मुक्याने... तशी सवय झाली होती मला, ती कामाला आली, इतकंच.
तुझ्या कुशीत शिरून अजूनही मला रडायचं होतं आणि रडता रडता लहान बाळासारखं झोपी जायचं होतं...काही स्वप्नं जागेपणी पडतात त्यापैकी हे एक समज.
आता तुला मी नेमकं काय सांगणार आहे ते मलाही ठाऊक नाही. जसं आठवेल तसं सांगणार आहे.
आपण भेटल्यापासून मीच बडबडत होते. माझ्या अनेक गोष्टी मी तुला अनेकवार सांगितल्या आहेत आणि तूदेखील शहाण्या मुलासारखा जणू काही पहिल्यांदाच ऐकतो आहे असा चेहरा करून ऐकत आला आहेस! किती रे समजूतदार तू...
एक मात्र सांगते. मी तुला सांगितलेल्या गोष्टीत एकही खोटं सांगितलं नाही... नाही, चुकलं. फक्त एक छोटा अपवाद सोडून. तेही सांगणारच आहे तुला मी.
पण हेही खरं आहे की मी तुला अजून सगळं काही सांगितलं नाही. कोर्टात म्हणतात ना.. truth, but not the whole truth. मात्र आज the whole truth, and nothing but the truth...
शाळेत एका मैत्रिणीनं निबंधात बायबलमधील एक वाक्य लिहिलं होतं, ते माझ्या अगदी लक्षात आहे. 'only the truth will set you free' . सत्य सांगून कशापासून मुक्ती मिळणार आहे ते मलाही ठाऊक नाही.

कुठून सुरवात करू?
तुझ्या आईपासून?
मला ड्रेसेस का घालावेसे वाटत नाही तेथून?
मला बॉल पेनऐवजी शाईवालं फाउंटन पेन का आवडतं त्यापासून?
मी एकटीच न्यूझीलंडला का आले तेथून?
माझा स्पर्श तुला गार का वाटला असावा त्यापासून?
...की मी विधवा कशी झाले त्यापासून?

कुठूनही सुरुवात केली, तरी ह्या स्टोरीचा अंत कसा आणि कुठे होणार त्याची मला सतत वाटणारी भीती आता पूर्ण निघून गेली आहे. कदाचित माझ्या मैत्रिणीच्या निबंधातील वाक्य एका अर्थाने आज पूर्णत्वास जाणार असेल - maybe the truth will set me
free...
शाळेच्या शेवटच्या वर्षापासून सांगते. कारण ह्याच वर्षी माझ्या जीवनाची दिशा दगडावरील कोरलेल्या रेषेसारखी बटबटीत झाली.
शाळेच्या शेवटच्या वर्षी मी प्रेमात पडले. अगदी आकंठ बुडाले. मनोहर त्याचं नाव. आमच्याच शाळेत होता. छान कविता करायचा. कॉमर्स करायचंय म्हणून कॉलेजला मात्र तो दुसरीकडे गेला, पण निम्मा वेळ त्यानं आमच्या कॉलेजच्या कट्ट्यावर बसून काढली. आणि उरलेला निम्मा वेळ टपोरी मित्रांच्या संगतीत. दोन-तीन वर्षांत मनोहरचा मन्या झाला. वर्षभरात गल्लीचा मन्यादादा झाला आणि आणखी थोड्याच
दिवसांत मोहल्ल्याचा मन्याभाई झाला. मोटरसायकल, गळ्यात जाडसर चेन, हातात कडं... पार बदलून गेला. एक दिवस लग्न करायचं म्हणून अडून बसला. आमच्या आणि त्याच्याही घरच्या विरोधाला न जुमानता आमचं लग्न पार पडलं.

वर्ष-दोन वर्षं तशी विनाविघ्न गेली.
पण हळूहळू तो गुन्हेगारी विश्वात रुळत गेला. मी खूप समजावलं, प्रेम दिलं, आदळआपट केली, पण भाईगिरीचं वलय, दरारा आणि त्यातील थरार हेच त्याचं जीवन बनत चाललं होतं. घरात खूप पैसा यायचा. मला नकोसा वाटणारा. गुंडगिरीतून कमावलेला. खंडणी,
मांडलई, protection money... अगदी सुपारी घेण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. माझ्या पसंती-नापसंतीला कवडीची किंमत नव्हती. मी नोकरी करायचे म्हणून तो चिडायचा. "कशासाठी आणि कुणासाठी कमावतोय मी हे?" विचारायचा. मीही अगदी निग्रहाने "माझ्यासाठी तरी नाही.." म्हणायचे. कदाचित भाईची बायको नोकरी करते हा त्याला त्याच्या भाईगिरीवरील कलंक वाटत असावा.

कधी मित्रांना घेऊन घरी यायचा. सारे दारू प्यायचे. शिवराळ बोलायचे. एकदा मी विरोध दर्शवला आणि मनोहरने सर्वांच्या देखत माझ्या मुस्कटात मारली. त्याचंही बरोबर होतं म्हणा.. भाई म्हटलं की जरब, धाक, दहशत असलीच पाहिजे. बाहेर आणि घरातदेखील.
एकदा मी कामावरून परतताना गल्लीतल्या एका नवख्या माणसाने माझी छेड काढली. मनोहरने त्याला धुतलाच, वर गाजर मोडावेत तसे त्याचे दोन्ही हात मोडले आणि माझ्या पायावर नाक घासायला लावले. त्याला सोडून दिल्यावर मलाही चोप मिळाला, कारण ही घटना मी त्याला सांगितली नव्हती.

जसे दिवस जाऊ लागले, तसा मनोहर अधिक गुंतत गेला, सराईत बनला. आठवड्यातील तीन-चार दिवस तरी बेपत्ता असायचा. पोलिसात त्याच्यावर डझनभर गुन्हे दाखल झाले होते. खंडणी, अपहरण, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र... कितीतरी कलमं मला तोंडपाठ होती.
रात्री-अपरात्री पोलीस यायचे. घराची झडती घ्यायचे. मला काहीबाही प्रश्न विचारायचे. मनोहर गायब असायचा. माझी झोप उडाली होती. डोळ्याभोवती काळी वर्तुळं झाली होती. अकाली वार्धक्य काय असते ते मी अनुभवत होते. कुठे जायची सोय नव्हती. माहेर तर कधीचच तुटलं होतं आणि ‘हिच्यामुळे आमचा मनोहर बिघडला’ असं सासरकडील मंडळीचं ठाम मत बनलं होतं. मी स्वतःला दोष देत कुढत होते.

आमच्या नात्यातला गोडवा कधीच सरला होता. कटुता तेवढी वाढत होती. तो जेव्हा घरी यायचा, तेव्हा जबरी करायचा. किंचितही विरोध दाखवला की मला बदडून काढायचा. एरवीही जरा मनाविरुद्ध झालं की त्याचा फ्यूज उडायचा. माझे केस ओढून माझं डोकं भिंतीवर आपटायचा. वेताच्या छडीने माझ्या पाठीवर, पायावर, शरीराचा जो भाग जवळ असेल त्यावर रट्टे मारायचा. जळत्या सिगारेटचे चटके द्यायचा. मानेवर, मांड्यावर, दंडावर, पोटऱ्यावर.... माझ्याशी क्रूर वागण्याचे नवीन नवीन प्रकार त्याने शोधून काढले होते.
मला ड्रेसेसची खूप आवड होती, ती अशी सुटली. मांडीवरील आणि पोटऱ्यावरील डाग कमी होईपर्यंत दुसरा इन्स्टॉलमेंट तयार असे.
एकदा वैतागून सगळे ड्रेसेस बोहरणीला देऊन टाकले!

तो गुरुवारचा दिवस मला लख्ख आठवतो. रात्री जेवण आटोपून मी झोपायची तयारी करत होते. इतक्यात दरवाज्यावर जोरजोरात थापा पडू लागल्या. पुन्हा पोलिसांची धाड असावी असं मला वाटलं, पण मनोहर आणि त्याचे साथीदार होते. त्यांच्या हातात दोन-तीन छोट्या बॅगा होत्या. त्यामधून पैशाची बंडलं डोकावत होती. बॅगा पलंगाखाली भिरकावून सारे जण खोलीभर पसरले. दारूच्या बाटल्या निघाल्या. सोबत आणलेल्या मटन आणि चिकनच्या डिशेस बाहेर आल्या. रात्रभर पार्टी चालली. मला एवढंच कळलं की कोणत्या तरी बिल्डरला
धमकावून मोठी खंडणी मिळाली आहे.

पहाटेच्या सुमारास पार्टी संपली. सारे निघून गेले आणि उग्र दर्प, शर्टावरील रक्ताचे ताजे डाग मिरवत मनोहर माझ्याशी झोंबाझोंबी करू लागला. मला सकाळी कामाला जायचं आहे एवढंच मी म्हणाले आणि भडका उडाला. कदाचित त्याला त्याच्या पौरुषत्वाचा अपमान वाटला असावा. सारा मोहल्ला आपल्या तालावर नाचतो आणि ही काय मला आव्हान देते असंही वाटलं असेल. कधी नव्हे एवढा मार मी त्या रात्री खाल्ला. माझ्या नाकातोंडातून रक्त ओघळत होतं, माझ्या साऱ्या बरगड्या दुखत होत्या. मला बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. मी विव्हळत होते आणि मनोहर घाण शिव्या देऊन मला डिवचत होता. मी कशीबशी पलंगावर आडवी झाले. धाड्कन दरवाजा आपटून घेत मनोहर बाहेर चालता झाला. कधीतरी वेदनेने थकून माझा डोळा लागला. मात्र तोपर्यंत येथून कुठेतरी पळून जावं की आपल्याच जिवाचं बरंवाईट करून घ्यावं, ह्या द्वंद्वात माझं मन दोलायमान होत होतं.

सकाळी अकराच्या सुमारास दारावर थाप ऐकू आली. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. परत थाप पडली आणि पाठोपाठ दरवाजा किलकिला झाला. दारात मनोहरचा साथीदार होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि तो हादरला.
"ताई, काय झालं? कुणी मारलं तुमाला? भाई कुठाय?..." त्याचे प्रश्न संपत नव्हते. त्याचं नाव मला माहित नव्हतं, पण सारे त्याला टिटो हाक मारायचे एवढं ठाऊक होतं. "टिटो, मन्याभाईशिवाय कोण माझ्या अंगाला हात लावेल?" मी क्षीणपणे विचारलं.
"असा कोन करते...हैवान हाय साला.." इरसाल शिवी देत टिटो म्हणाला.
"डाकटर हाणू?" मी खुणेनच नाही म्हणाले, फक्त थोडं गार पाणी मागून प्याले.
"वो अब पैलेवाला मन्याभाय नै राहा. बहुत बदल गया. बहुत लालची. घरमे बीबीको कुटताय और बाहर छोकरीके पीछे भागताय. आपुनको नै पसंद." टिटो मनोहरला शिव्या घालत तासभर माझ्या सोबतीला बसून राहिला. त्याच्या तोंडाचा पट्टा सतत सुरू होता.
मनोहरविषयी त्याच्या मनात आधीपासूनच राग आणि असूया असावी. माझं निमित्त होऊन ते सारा द्वेष उफाळून येत असावा.
"सालेको ठोकना चाहिये.." बोलता बोलता टिटो फटकन बोलून गेला. मी चमकले.
"टिटो, काय बोलतोस तू?"
"नय तो क्या? फोकट का हिस्सा मांगता, बीबीको पिटता वो कैसा मर्द?" मी त्याच्याकडे पाहत राहिले. आणखी थोडा वेळ बरीचशी बडबड करून झाल्यावर टिटोने ऑफर दिली.
"ताई, सिर्फ मुंडी हिलाव, मी पाहून घेतो."
"काय करशील?"
"गायब करेन. कुणाला पून नाय कळणार. एकदम शीक्रेट." मी मिनिटभर टिटोकडे टक लावून पाहत बसले..
..आणि मी मुंडी हालवली..
टिटो झटक्यात निघून गेला. मी काय करून बसले त्याची जाणीव होताच मी कोसळले. हमसून हमसून रडले. पण तीर सुटला होता. रडत रडत ग्लानी येऊन मी झोपून गेले.

दोन दिवसांनी टिटो परत आला. तोपर्यंत मी थोडीशी चालू-फिरू लागले होते.
"ताई, काम झालं. आता बिनधास्त रावा."
"काय केलंस टिटो? मनोहर...कसा..आहे..?" माझ्या पायातलं सारं बळ निघून गेलं होतं.
"ताई, तुमी नय विचारलेलं बरं. तुम्हाला जितकं कमी माहीत, तेवढं तुम्हाला आणि पोलिसांना सोप्पं."
"तरीपण.."
"काहीच नाही. मी त्या बॅगा नेऊ?"
मी हो म्हणताच टिटोने पलंगाखालच्या बॅगा बाहेर ओढल्या. त्यातील एका बॅगेत आणखी बंडलं कोंबत तो म्हणाला, "ही कुठेतरी लपवून ठेवा. तुमच्या कामाला येईल." आणि आणखी एक शब्दही न बोलता दोन बॅगा घेऊन टिटो निघून गेला. त्याची मोटरसायकल नजरेआड
होईपर्यंत मी दरवाज्याच्या फटीतून पाहत राहिले.

आठवडाभर मी कामाला जाऊ शकले नाही. पण त्या दिवसात हे शहर सोडून जाण्याचा माझा निर्णय पक्का झाला. माझ्या मैत्रिणीची बहीण न्यूझीलंडला शिकायला होती. न्यूझीलंडची ती इतकी तारीफ करायची की मनोमन माझ्या मनात न्यूझीलंडशिवाय पर्याय येत नव्हता.

मनोहर कधीतरी मला डॉलर्स बदलून आणायला देत असे. आमच्या ऑफिसच्या पाठच्या गल्लीत खेळण्याचं एक छोटं दुकान मला माहीत होतं. खेळणी निमित्त होतं. तेथून पैशाचेच व्यवहार जास्त व्हायचे. तेथील कॅशियर माझ्या ओळखीचा झाला होता. जास्त बोलायचा
नाही. कधी अडचण आली तर ‘अरेंज करतो’ हे त्याचं पालुपद असायचं.

रिक्षात पैशाची बॅग घालून मी त्या दुकानात पोहोचले.
"भाई, एवढे पैसे न्यूझीलंडला माझ्या बहिणीकडे पाठवायचे आहेत. तिला घर घ्यायला हवेत." मी गोड हसत म्हणाले. कशाला पैसे पाठवायचे आहेत ह्याचाशी त्याला काय देणं घेणं नव्हतं.
"अरेंज करतो. पण वेळ लागेल. चालेल?"
"किती?"
"दोन-तीन आठवडे."
"चालेल."

त्याने पैसे मोजून घेतले. मैत्रिणीने तिच्या बहिणीचे डीटेल्स दिले होते, ते मी त्याच्याकडे सुपूर्द केले आणि घरी परतले.
घरी पोलीस माझी वाट पाहात होते. खाडीच्या कर्दळीत मनोहरचं प्रेत सापडलं होतं.
माझा बांध फुटला. हजारो मधमाश्या माझ्या सर्वांगाला डसत असल्यासारखी मी सैरभैर झाले. एका महिला पोलिसाने मला धरून एका ठिकाणी बसवलम, पाणी दिलं आणि प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.
टिटोचं बरोबर होतं. मला काहीच माहित नसल्यामुळे माझ्याकडून पोलिसांना कोणताच क्लू मिळत नव्हता. माझ्या शरीरावरील ताजे व्रण पाहून मनोहर मला मारहाण करायचा का हाही प्रश्न त्यांनी विविध अंगांनी विचारला. मी होकारार्थी उत्तर दिलं. इतर अनेक प्रश्न आले. मी त्याला शेवटी कधी पाहिलं, त्याला कोण शत्रू आहेत का, त्याचे मित्र कोण, तुमचा संशय कोणावर आहे वगैरे वगैरे. पोलिसांचा हा ससेमिरा महिनाभर पुरला. मनोहर हा हिस्टरी शीटर होता, म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार. तेव्हा त्याचा मृत्यू म्हणजे तेवढीच डोकेदुखी कमी, असं त्यांनाही वाटत असावं.

मात्र शेवटच्या खंडणी प्रकरणातील पैशाच्या वाटणीवरून गँगमध्ये बेबनाव झाल्याची कुणकुण पोलिसांना लागली आणि तपासाची दिशा पूर्ण बदलली. कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीकोनातून आता मी सर्टिफाइड विधवा बनले. हेच माझं प्राक्तन आणि माझ्या इथपर्यंतच्या जीवनाची फलश्रुति.

ज्या आठवड्यात न्यूझीलंडचा व्हिसा आला, त्याच्या पुढच्या आठवड्यात मी ऑकलंडला पोहोचले आणि इकडच्या शुद्ध हवेत एक दीर्घ श्वास घेतला. एका नव्या जीवनाची सुरुवात..
आणि तू भेटलास...
दीड-एक वर्ष झालं असेल नाही आपल्या पहिल्या भेटीला? हॉटेलमध्ये येणाऱ्या शेकडो पाहुण्यासारखा तू एक पाहुणा. पण का कोण जाणे, कुठेतरी एक नवीन पालव उमलू पाहात होतं. तुझा प्रतिसाद मिळत गेला आणि माझी स्वप्नं परत फुलपाखरासारखी रंगीबेरंगी झाली. तू माझ्यात गुंतत होतास आणि मी सुखावत होते.
कधीतरी सहेतुक वा अहेतुक, तू मला स्पर्श करशील, कधीतरी हातात हात घालून आपण भटकू, कधीतरी तू हळूच माझं चुंबन घेशील.. किती आतुरलेली मी.. आणि तू तर इतका संयमी.. हात गार का लागतोय विचारत होतास!
तुला कधी कळलं नसेल, पण तुझं वेळापत्रक मला पाठ होतं. तू हॉटेलमधून ऑफिसला जायचास, त्या वेळी काहीतरी कारण काढून मी फ्रंट डेस्कला असायचे. तुझी संध्याकाळी यायची वेळ झाली की माझ्या डोळ्यात फुलपाखरं हुंदडायची. तू जेवून रूमवर गेलास की प्रचंड उदासी यायची.
पाहुण्यापासून मित्र आणि पुढे प्रेयस हा प्रवास लांबला खरा, पण बेहद लाजवाब झाला.

..जेवताना तू आईचा विषय काढलास आणि मी थिजले. पॅरालीसीस झालेल्या माणसासारखी माझी अवस्था झाली. माझ्या दिवास्वप्नात ह्या वास्तवाचा विचार मी कधी केलाच नव्हता. माझं डोकं ठणकू लागलं होतं.
काय सांगणार होतास तू आईला?
माझी मैत्रीण ड्रेस घालत नाही, कारण तिच्या मांड्यांवर सिगारेटच्या चटक्यांचे डागआहेत?
तिच्या पोटरीवर आणि पाठीवर वेताच्या छडीनं मारल्याचे वळ आहेत?
ती विधवा आहे?
आणि ती विधवा अशासाठी आहे की तिच्या नवऱ्याला गायब करण्याची सुपारी तिनेच दिली होती?

तुझ्या आईच्या नजरेत तू तिचं लाडकं पाडस आहेस आणि राहणार आहेस. आणि मी तिच्या पाडसाचा घास घ्यायला टपून बसलेली एक नरभक्षक वाघीण आहे किंवा हडळ आहे म्हण हवं असल्यास.
माझ्यामुळे माझे आईवडील, माझे सासूसासरे आणि ज्यावर मी जिवापलीकडे प्रेम केलं तो मनोहर.. कुणीही सुखी झालं नाही. what chance would you have?
स्वप्नांची फूलपाखरं मनात बागडवत नाचणारी मी.. ती स्वप्नंदेखील त्या फुलपाखरांसारखी दोन-तीन दिवसाचं आयुष्य लाभलेली शापित आहेत, हे सत्य मी कसं डोळ्याआड होऊ दिलं?
ही सेल्फ-पिटी नाहीये. मला स्वतःची निर्भर्त्सनादेखील करायची नाहीये. मी चुकले.. परत एकदा चुकले, हे सत्य मी स्वीकारणार आहे. माझ्या ह्या कोळिष्टकात तू हकनाक गुरफटलास, ह्याचं मला दुख: आहे. Love means never having to say you are sorry असं तो एरिक सेगल लिहून गेला, तरीही मला तुझी मनापासून क्षमा मागायची आहे - I am sorry.
मी सकाळीच हॉटेलचा राजीनामा दिलाय. मी हे शहर सोडून जातेय. पुन्हा कधी आपले मार्ग एक होतील की नाही याबाबत मी काहीही अपेक्षा ठेवणार नाहीये. भेटलोच तर अगदी कडकडून तुझी गळाभेट घेईन. तुझी बायको सोबत असली तरी! नाहीच भेटलो तर तू दिलेले क्षण आयुष्यभर जपून ठेवीन.

हे पत्र शाईने लिहित आहे. हे फाउंटन पेन मनोहरने कॉलेजला असताना मला भेट दिलं होतं. गळतं कधीकधी. बोटाला शाईचे डाग लागतात. पण पुसता येतात ना ते...
आता पहाट होतेय. पाऊस कधीचाच थांबलाय. बाहेर सारं शांत आहे. माझ्या मनातील मळभदेखील त्या पावसाबरोबर वाहून गेलंय...
हवेत गारवा आलाय. माझे हात मलाच गार वाटू लागले आहेत...माझ्या उर्वरित आयुष्याची नांदी असावी.
आटोपतं घेते.. अलविदा!
फक्त तुझीच,
नीना.

ता.क. - हो, एक गोष्ट सांगायची राहिली. मी तुझ्यापासून आता एकही गोष्ट लपवून ठेवली नाही.
The truth, the whole truth....फक्त एकच अपवाद – माझं खरं नाव नीना नाही.’

पत्र वाचून संपलं. सुन्नपणे मी कितीतरी वेळ पत्रावर आणि कार्डवर बघत राहिलो.
मनात विचार आला, दुसऱ्या दिवशीचं फ्लाइट घेऊन परत ऑकलंडला जावं, तिला शोधावं आणि तिला कवेत घेऊन सांगावं की तू जशी आहेस तशी मला आवडतेस. भूतकाळाची भुतं गाडून आपण पुन्हा सुरुवात करू या.
मी हॉटेलला फोन लावला. नीना खरोखरच तडकाफडकी राजीनामा देऊन गेली होती.
हॉटेलकडे Forwarding address नव्हता. तिच्या घरचा फोन कट केला होता. तिचा संपर्क होऊ नये ह्याची तिने पुरेपूर काळजी घेतली होती.
काळजावर दगड ठेवून मी ते पत्र फाडून टाकलं.
आता गुलाबाच्या फुलाची सुकलेली एक पाकळी आणि कडक झालेला काटा गुलाबाचा तेवढा माझ्याकडे शिल्लक आहे.

-रिचर्ड न्युनिस

(रिचर्ड न्युनिस हे मूळचे मुंबईजवळील वसई येथील, पण  गेली तेहेतीस वर्षे ते कामधंद्यानिमित्ताने परदेशी आहेत. सध्या वास्तव्य ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे. मुंबईतील सिडेनहॅम कॉलेज मधून कॉमर्स मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाऊंटची पदवी मिळवली आणि पुढे इंग्लंड मधील ब्रॅडफर्ड युनिव्हर्सिटी मधून मास्टर्स (एम.बी.ए.) केले. नोकरीनिमित्त त्यांचा जगभर प्रवास झाला आहे. त्यांना वाचनाची आणि लिखाणाची आवड आहे. त्यांनी अनेक कथा, कविता आणि एकांकिका लिहिल्या आहेत.)

ललित/वैचारिक लेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Nov 2021 - 11:15 am | मुक्त विहारि

असाच एक मनुष्य बघीतला आहे ...

त्यामुळे जास्त भावली

Richard Nunes's picture

6 Nov 2021 - 6:27 pm | Richard Nunes

आभारी आहे!
कथा ही शेवटी आपल्या भोवताली घडणाऱ्या असंख्य घटनांचा कँलिडोस्कोप असतो

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Nov 2021 - 12:25 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान आहे कथा.

Richard Nunes's picture

6 Nov 2021 - 6:27 pm | Richard Nunes

आभार!

टर्मीनेटर's picture

2 Nov 2021 - 1:39 pm | टर्मीनेटर

रिचर्ड,
आपले मिपावर स्वागत आहे. कथा खूप आवडली.
धन्यवाद 🙏:

Richard Nunes's picture

6 Nov 2021 - 6:28 pm | Richard Nunes

आभार!

श्वेता व्यास's picture

2 Nov 2021 - 2:34 pm | श्वेता व्यास

दिवाळी अंकाच्या निमित्ताने अजून एक दर्जेदार कथा वाचावयास मिळाली, धन्यवाद रिचर्ड न्युनिस आणि मिपा

Richard Nunes's picture

6 Nov 2021 - 6:28 pm | Richard Nunes

आभारी आहे!

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Nov 2021 - 10:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

फारच सुरेख शेवट पर्यंत खिळवून ठेवलेत
आता इथे नियमित लिहित जा

पैजारबुवा,

जरूर लिहीत राहीन! (तुम्ही वाचायची तयारी ठेवा!☺️)

सौंदाळा's picture

5 Nov 2021 - 11:36 pm | सौंदाळा

कथा लिहायची सांगायची पध्दत बेहद्द आवडली.
विश्राम बेडेकर यांची 'रणांगण' आणि अनंत सामंत यांची 'एम टी आयवा2 मारू' यांची आठवण झाली.
पुढील कथेची आतुरतेने वाट बघत आहे.

Richard Nunes's picture

6 Nov 2021 - 6:32 pm | Richard Nunes

जरूर येथे भेटत राहीन!

रंगीला रतन's picture

6 Nov 2021 - 4:54 pm | रंगीला रतन

भन्नाट कथा. खूप आवडली.

Richard Nunes's picture

6 Nov 2021 - 6:32 pm | Richard Nunes

आभारी!

सुखी's picture

16 Nov 2021 - 2:37 pm | सुखी

खिळवून ठेवलत... छान कथा

Richard Nunes's picture

16 Nov 2021 - 5:00 pm | Richard Nunes

आभारी!

शलभ's picture

16 Nov 2021 - 6:37 pm | शलभ

मस्त कथा.

तुषार काळभोर's picture

16 Nov 2021 - 7:02 pm | तुषार काळभोर

काळजावर दगड ठेवून मी ते पत्र फाडून टाकलं.
आता गुलाबाच्या फुलाची सुकलेली एक पाकळी आणि कडक झालेला काटा गुलाबाचा तेवढा माझ्याकडे शिल्लक आहे.
>>
आता तो काटा टोचून टोचून तिची आठवण करून देणार.. काही जखमा कुरवाळत बसण्यात आनंद असतो का ? :)

सुचिता१'s picture

24 Nov 2021 - 12:06 am | सुचिता१

कथा खुप आवडली. शेवट पर्यंत खिळवून ठेवते.
पुढील लेखनास अनेक शुभेच्छा!!!

स्मिताके's picture

24 Nov 2021 - 3:15 am | स्मिताके

सुंदर कथा. आपले आणखी लेखन वाचायला आवडेल.

रुपी's picture

24 Nov 2021 - 5:06 am | रुपी

खूप छान कथा. आवडली.

Bhakti's picture

24 Nov 2021 - 7:09 am | Bhakti

सुंदर कथा! सुरूवातीला अवखळ हवा,शेवटी बोचरी होणारी बदल!

राघव's picture

24 Nov 2021 - 5:37 pm | राघव

उत्तम लेखन. आवडलं.

चौथा कोनाडा's picture

24 Nov 2021 - 5:52 pm | चौथा कोनाडा

खुप छान ! लेखनशैली जबरदस्त आहे !

💖

आणखी कथा वाचायला आवडतील !
येवूं द्यात !

मनस्विता's picture

28 Nov 2021 - 11:32 pm | मनस्विता

तुमच्या शब्दांच्या माध्यमातून कथा डोळ्यासमोर चितारली गेली. अजून अशाच कथा वाचायला मिळू दे.