दिवाळी अंक २०२१ : महाभारतातील सौंदर्यस्थळे

प्रचेतस's picture
प्रचेतस in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्।
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्।।

नारायण, नरश्रेष्ठ नर आणि देवी सरस्वती ह्यांना वंदन करुन जय ह्या ग्रंथाचे पठण करावे.

महाभारतातील हा पहिला श्लोक. महाभारतातील सर्व १८ पर्वांच्या सुरुवातीला हा श्लोक येतो. नारायण म्हणजे विष्णू, नर म्हणजे अर्जुन आणि बुद्धिदेवता सरस्वती या तिघांचा उल्लेख यात आहे. हा श्लोक सौतीने रचलेला असावा असे वाटते.

गतवर्षी सुरू झालेल्या पहिल्या लॉकडाउनमध्ये पुन्हा एकदा महाभारत वाचायला सुरुवात केली. ह्या वेळी मात्र वाचता वाचता जे श्लोक आवडले, ते लिहून ठेवत गेलो, मूळ संस्कृत श्लोकांशी ताडून पाहत गेलो आणि टिपणं काढून ठेवत गेलो. सध्या अनुशासनपर्वापर्यंत आलो आहे, वाचण्याचा वेग मात्र आता मंदावला आहे. दोनेक महिन्यात संपूर्ण महाभारत वाचणे पूर्ण होईल. नंतर अवशिष्ट राहील ते हरिवंश अर्थात खिलपर्व, ते नंतर सुरु करेन.

वाचता वाचता महाभारतातील अनेक सौंदर्यस्थळे सापडत गेली, त्यातली काही निवडक येथे लिहीत आहे.

महाभारतातील कूट श्लोक.

महाभारतात जागोजागी आकड्यांच्या मिषाने दिलेले कूट श्लोक आहेत, सर्वाचे वर्णन येथे देणे शक्य नाही. नमुन्यादाखल उद्योगपर्वात विदुराच्या तोंडी आलेला हा श्लोक पुढे दिला आहे.

एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता | बुद्धिर्बुद्धिमतोत्सृष्टा हन्याद्राष्ट्रं सराजकम् ||
एकया द्वे विनिश्चित्य त्रींश्चतुर्भिर्वशे कुरु | पञ्च जित्वा विदित्वा षट्सप्त हित्वा सुखी भव ||

धनुर्धराने सोडलेला बाण एकालाच ठार करील किंवा करणारही नाही, परंतु एखाद्या मुत्सद्द्याची बुद्धी सर्व राष्ट्राचा विनाश करते, म्हणून एकाने दोहोंचा निर्णय करून चाराने तिघांना ताब्यात ठेवावे, पाचांवर विजय मिळवून सहांना समजून सातांचा त्याग करून सुखी व्हावे.

धनुर्धराने सोडलेला बाण एकालाच ठार करील किंवा करणारही नाही, परंतु एखाद्या मुत्सद्द्याची बुद्धी सर्व राष्ट्राचा विनाश करते, म्हणून एकाने (सुबुद्धीने) दोहोंचा (कर्तव्य-अकर्तव्याचा) निर्णय करून चारांनी (साम, दाम, दंड, भेद) तिघांना (शत्रू, मित्र, तटस्थ) ताब्यात ठेवावे, पाचांवर (पंचेद्रिये) विजय मिळवून सहांना (संधी, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव व आश्रय) समजून सातांचा (स्त्री, जुगार, मृगया, मद्य, कठोर भाषण, कठोर दंड व द्रव्याचा अपव्यय) त्याग करून सुखी व्हावे.

कूट श्लोकाचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे शांतिपर्वात आलेले राजदंडाचे वर्णन.

नीलोत्पलदलश्यामश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः |
अष्टपान्नैकनयनः शङ्कुकर्णोर्ध्वरोमवान् ||

जटी द्विजिह्वस्ताम्राक्षो मृगराजतनुच्छदः |
एतद्रूपं बिभर्त्युग्रं दण्डो नित्यं दुरावरः ||

नीलकमलाच्या पाकळीप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या ह्या दंडाला चार दाढा, चार हात, आठ पाय असून अनेक डोळे आहेत, ह्याचे कान शंकूसारखे असून केस डोक्यावर सरळ उभे राहिलेले आहेत. याला जटा असून दोन जिव्हा आहेत, ह्याचे डोळे ताम्रवर्णी असून ह्याने सिंहाच्या कातड्याचे वस्त्र धारण केले आहे, अशा प्रकारचे उग्र रूप धारण करणार्‍या ह्या दंडाचा प्रतिकार करणे कुणालाही शक्य नाही.

ह्याचा अर्थ लावणे तसे अवघड. विविध टीकाकार त्यांच्या त्यांच्या परीने ह्या श्लोकांचा अर्थ लावत असतात. चार दाढा म्हणजे दंड, कैद, फटके आणि देहांत शासन ह्या चार शिक्षा, चार भुजा म्हणजे दंड घेण्याचे चार प्रकार - सुवर्ण, चांदी किंवा वस्तूंच्या स्वरूपातला दंड, जप्ती इत्यादी प्रकार, आठ पाय म्हणजे न्यायदानातल्या आठ पायर्‍या म्हणजे फिर्याद, तक्रार, जबानी, सुनावणी,कबुली, नाकबुली, पुरावे, निर्णय इत्यादी. अनेक डोळे म्हणजे राजा व त्याच्या अमात्यांचे कारभारावर लक्ष असून कुणावरही अन्याय न होऊ देता यथोचित न्याय देणे हे पाहणे. शंकूसारखे निमुळते कान म्हणजे सर्व बाजूंचे म्हणणे योग्य प्रकारे ऐकून घेणे, मस्तकावर उभे राहिलेले केश म्हणजे आश्चर्याचे चिन्ह, जटा असणे हे न्यायदानातीन गुंतागुंतीचे लक्षण, दोन जिभा म्हणजे वादी प्रतिवादींचे प्रतीक, तर सिंहाचे कातडे म्हणजे समर्थपणे केलेल्या न्यायदानाचे प्रतिक.

आदिपर्वात आणि शांतिपर्वात अनेक ठिकाणी कूट श्लोक पाहायला मिळतात.

महाभारतातील मतांचा उल्लेख

सांख्यं योगः पांचरात्रं वेदाः पाशुपतं तथा ।
ज्ञानान्येतानि राजर्षे विद्धि नानामतानि वै ।।

महाभारतात शांतिपर्वात आलेला हा श्लोक त्या काळी प्रचलित असलेल्या सांख्य, योग, पांचरात्र, वेदान्त आणि पाशुपत अशा भिन्न मतांचा उल्लेख करतो. अर्थात त्या काळी चार्वाक मत (नास्तिक मत), पाखंड मत हीदेखील प्रचलित होतीच. वरील श्लोकांत असलेल्या पंचमतांत सांख्य, योग, वेदान्त ही प्राचीन मते तर पांचरात्र (विष्णू/श्रीकृष्ण) यांची सगुण भक्ती करणारी तर पाशुपत हे शिवास प्रथम स्थान देणारी अशी दोन मते नंतरची आहेत.

महाभारतात आलेल्या पशूंच्या संदर्भातले काही श्लोक

वनांची आणि वाघांची महती

वनं राजा धृतराष्ट्रः सपुत्रो; व्याघ्रा वने सञ्जय पाण्डवेयाः |
मा वनं छिन्धि सव्याघ्रं मा व्याघ्रान्नीनशो वनात् ||

निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्यते वनम् |
तस्माद्व्याघ्रो वनं रक्षेद्वनं व्याघ्रं च पालयेत् ||

(संजया), राजा धृतराष्ट्र व त्याचे पुत्र हे एक वन आहे, पांडव हे त्या वनातील वाघ आहेत, वाघामुळे वन संरक्षित होते, कारण वाघांच्या भीतीमुळे ते कोणी तोडून साफ करत नाही आणि वनामुळे वाघ संरक्षित होतात, कारण वनाबाहेर हिंडणारा वाघ मारला जातो. त्यामुळे वनाला उजाड करू नका व वाघांना वनातून घालवू नका.

उद्योगपर्वातील हा श्लोक वनांची आणि वाघांची महती सांगतो, जे आजही यथार्थ आहे.

गेंड्याचा आलेला उल्लेख

एष गाण्डीमयश्चापो लोकसंहारसम्भृतः |
रक्ष्यते दैवतैर्नित्यं यतस्तद्गाण्डिवं धनुः ||

एष कृत्ये समुत्पन्ने तत्तद्धारयते बलम् |
सहस्रशतसङ्ख्येन प्राणेन सततं ध्रुवम् ||

गेंड्याच्या कण्यापासून बनवलेला हा चाप लोकसंहारार्थ उत्पन्न केला असून देव त्याचे नित्य रक्षण करतात, याच्यापासूनच ते गांडीव धनुष्य तयार झाले, जसेजसे कार्य उत्पन्न होते तसेतसे ह्या धनुष्याच्या ठिकाणी सामर्थ्य उत्पन्न होते, शत सहस्र धनुष्यांइतके सामर्थ्य याच्या अंगी असून ते अविनाशी आहे.

अर्जुनाच्या गांडीव धनुष्याच्या निर्मितीविषयी हा श्लोक त्या काळी भारतवर्षात गेंडे अस्तित्वात होते हे सांगतो.

त्रिशुंड मंदिरातले गेंड्याचे शिल्प

a

टोळधाड

भारतीय युद्धात बाणांना टोळांची/ टोळधाडीची उपमा कित्येक श्लोकांमधून दिलेली दिसते.

रुक्मपुङ्खाः सुतीक्ष्णाग्रा मुक्ता हस्तवता मया |
छादयन्तु शराः पार्थं शलभा इव पादपम् ||

सोन्याची पिसे लावलेले, तीक्ष्ण टोकांचे मी हे सोडलेले बाण टोळांनी झाड जसे झाकून टाकावे तसे पार्थाला झाकून टाकोत.

मार्जारमूषकसंवादः

शांतिपर्वात मार्जारमूषक संवाद नावाचे एक बोधप्रद उपाख्यान आहे, जे मूळातून वाचण्यासारखे आहे. त्यातला एक श्लोक रोचक आहे.

न कश्चित्कस्यचिन्मित्रं न कश्चित्कस्यचित्सुहृत् |
अर्थैरर्था निबध्यन्ते गजैर्वनगजा इव ||

न हि कश्चित्कृते कार्ये कर्तारं समवेक्षते |
तस्मात्सर्वाणि कार्याणि सावशेषाणि कारयेत् ||

कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रूही नसतो. मित्र आणि शत्रू हे कार्यपरत्वे निर्माण होत असतात. पाळीव हत्तींकडूनच रानटी हत्ती पकडले जातात, तद्वत एका कार्याची दुसऱ्या कार्याशी गाठ पडते आणि ते कार्य पार पडल्यावर ते करणाऱ्याकडे कोणीच पाहात नाही. तेव्हा सर्व कार्ये थोडीशी शिल्लक राहून करावीत.

आजही रानटी हत्ती पकडायचे असल्यास पाळीव हत्तींचा वापर केला जातो, ह्याचे उत्तम वर्णन चितमपल्लींच्या 'चकवाचांदण'मध्ये आलेले आहे.

श्वेतकाकीयधर्मा:

प्राण्यांच्या स्वभावानुसार रूपकात्मकरित्या राजनीती शिकवणार्‍या पुढील श्लोकाचे वर्णन पहा.
शत्रुराष्ट्रात गेलेल्या किंवा आपल्याच राज्यात सभोवताली असणार्‍या धोकादायक व्यक्तींपासून सावध कसे राहावे, हे युधिष्ठिरास समजावून सांगतांना भीष्म श्वेतकाकीयधर्माचा दृष्टांत देतात.

वसस्व परमामित्रविषये प्राज्ञसंमते |
भजस्व श्वेतकाकीयैर्मित्राधममनर्थकैः||
ज्यांच्यापासून अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे, अशा लोकांमध्ये तू कुत्रा, मृग आणि काक यांच्या नैसर्गिक स्वभावधर्माचा अंगीकार करून मित्रभावाने राहा.

श्वेतकाकीयधर्मा-
श्वा (कुत्रा) - नित्य जागरूक
एत (हरीण) - सदैव भीतीची शंका बाळगणारे
काक (कावळा) - सदैव सूक्ष्म दृष्टीने पाहणारा.

नित्य जागरूकत्व, नित्य भयचकितत्व, नित्य परइंगितत्व हे गुण राजाने सदैव अंगी बाळगलेच पाहिजेत.

व्याघ्रगोमायुसंवाद: (व्याघ्र - शृगाल संवाद)

सत्य असत्याचा निर्णय करणारा वाघ आणि कोल्हा यांच्यामधील एक उत्कृष्ट संवाद शांतिपर्वात आहे. त्यातलाच एक रूपकात्मक श्लोक.

असत्याः सत्यसङ्काशाः सत्याश्चासत्यदर्शिनः |
दृश्यन्ते विविधा भावास्तेषु युक्तं परीक्षणम् ||

तलवद्दृश्यते व्योम खद्योतो हव्यवाडिव |
न चैवास्ति तलं व्योम्नि न खद्योते हुताशनः ||

तस्मात्प्रत्यक्षदृष्टोऽपि युक्तमर्थः परीक्षितुम् |
परीक्ष्य ज्ञापयन्ह्यर्थान्न पश्चात्परितप्यते ||

असत्य हे सत्यासारखे वाटते, तर खरोखरच सत्य हे बाह्याकरी असत्यासारखे वाटते, म्हणून त्यांचे काळजीपूर्वक परीक्षण करणे हेच युक्त असते. आकाशाला तळ आहे असे दिसते (क्षितिज) किंवा काजवा अग्नीच्या ठिणगीप्रमाणे दिसतो, वस्तुतः आकाशाला तळ नसतो आणि काजव्यामध्ये अग्नी नसतो. तात्पर्य, जी गोष्ट डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते, तिच्या बाबतीतसुद्धा काळजीपूर्वक परीक्षण करणे आवश्यक असते. चांगली परीक्षा करून त्या गोष्टीविषयीचा निर्णय सांगितला म्हणजे नंतर पश्चाताप करण्याची पाळी येत नाही.

श्रीवासवसंवाद:

महाभारतात अगदी हस्तमैथुनाचा, पशुमैथुनाचादेखील उल्लेख आलेला आहे. श्रीवासवसंवादात (लक्ष्मी-इंद्र संवाद) असुरांच्या सुरुवातीच्या स्थितीचे वर्णन करताना यांसंबंधी काही उल्लेख आलेले आहेत.

नैकेऽश्नन्ति सुसम्पन्नं न गच्छन्ति परस्त्रियम् |
सर्वभूतेष्ववर्तन्त यथात्मनि दयां प्रति |

नैवाकाशे न पशुषु नायोनौ न च पर्वसु |
इन्द्रियस्य विसर्गं तेऽरोचयन्त कदाचन ||

पंचपक्वान्नांचे भोजन ते कधीही एकटे करत नसत, ते कधीही परस्त्रीशी समागम करत नसत, सर्व पशूंशी आणि मनुष्यांशी ते दयेने वागत असत, ते कधीही आकाशात (हस्तमैथुन) किंवा पशूंच्या ठायी वीर्यपात करत नसत, तसेच पर्वकाळी स्त्रीसमागन करत नसत.

सरोवरातील जलचरांचे वर्णन

आरण्यकपर्वात सरोवरातील जलचरांचे वर्णन आले आहे, ते पुढीलप्रमाणे -

कदम्बैश्चक्रवाकैश्च कुररैर्जलकुक्कुटैः | कारण्डवैः प्लवैर्हंसैर्बकैर्मद्गुभिरेव च ||

कादंब,चक्रवाक,कुरर,पाणकोंबडे, कारंडव,बेडूक,हंस,बगळा, पाणकावळा.

महाभारतातील वनसृष्टीचे वर्णन

आम्रानाम्रातकान्फुल्लान्नारिकेलान्सतिन्दुकान् | अजातकांस्तथा जीरान्दाडिमान्बीजपूरकान् ||
पनसाँल्लिकुचान्मोचान्खर्जूरानाम्रवेतसान् | पारावतांस्तथा क्षौद्रान्नीपांश्चापि मनोरमान् ||

बिल्वान्कपित्थाञ्जम्बूंश्च काश्मरीर्बदरीस्तथा | प्लक्षानुदुम्बरवटानश्वत्थान्क्षीरिणस्तथा ||
भल्लातकानामलकान्हरीतकबिभीतकान् | इङ्गुदान्करवीरांश्च तिन्दुकांश्च महाफलान् ||

एतानन्यांश्च विविधान्गन्धमादनसानुषु |फलैरमृतकल्पैस्तानाचितान्स्वादुभिस्तरून् ||
तथैव चम्पकाशोकान्केतकान्बकुलांस्तथा | पुंनागान्सप्तपर्णांश्च कर्णिकारान्सकेतकान् ||

पाटलान्कुटजान्रम्यान्मन्दारेन्दीवरांस्तथा |पारिजातान्कोविदारान्देवदारुतरूंस्तथा ||
शालांस्तालांस्तमालांश्च प्रियालान्बकुलांस्तथा |शाल्मलीः किंशुकाशोकाञ्शिंशपांस्तरलांस्तथा ||

किती विविध वृक्षांचे वर्णन येथे आले आहे पहा ना - आंबा, अंबाडी, नारळ, तेंदू, मोळ, अंजीर, डाळिंब, लिंब, फणस, पपनस, केळी, खजूर,आम्लवेत, पारावेत, सोनचाफा, कदंब, वेल, कवठ, जांभूळ, शिवणी, बोरी, पिंपरी, उंबर, वड, अश्वतथ, खिरणी, बिब्बा, आवळा, हिरडा, बेहडा, हिंगण, करवंद,चाफा, अशोक, केतकी, बकुल, पुन्नाग, सप्तपर्ण, कण्हेर,केवडा, पाटल, कुडा, सुंदर, मंदार, नीलकमल, पारिजात,कोविदार, देवदारू, शाल, तमाल, पिंपळ, हिंग, शाल्मली, पळस, शिसवी, सर्जतरू.

दुर्गवर्णन

महाभारतात दुर्गवर्णन अनेक ठिकाणी आलेले आहे, दुर्गांचे प्रकारही काही ठिकाणी आलेले आहेत, पण येथे आलेले वर्णन जरा विशेष वाटले.

आवासस्तोयवान्दुर्गः पर्याकाशः प्रशस्यते |
परेषामुपसर्पाणां प्रतिषेधस्तथा भवेत् ||

आकाशं तु वनाभ्याशे मन्यन्ते गुणवत्तरम् |
बहुभिर्गुणजातैस्तु ये युद्धकुशला जनाः ||

उपन्यासोऽपसर्पाणां पदातीनां च गूहनम् |
अथ शत्रुप्रतीघातमापदर्थं परायणम् ||

ज्याच्यात पाण्याचा भरपूर साठा आहे असा दुर्ग निवासासाठी प्रशस्त होय. दुर्गात वास्तव्य केल्यामुळे शत्रूच्या आक्रमणाला पायबंद बसतो. मैदान दुर्गाच्या जवळ असण्यापेक्षा अरण्य जवळ असणे अधिक चांगले असे म्हणतात. अनेक गुणांनी संपन्न असलेल्या युद्धकुशल वीरांचा तळ दुर्गाच्या जवळच असावा. सैन्याचा तळ ठोकणे, पायदळ शत्रूला दिसू नये अशी योजना करणे आणि शत्रूचा हल्ला होताच तो परतवून लावणे हा संकटातून बाहेर पडण्याचा उत्कृष्ट मार्ग होय.

आता रूपकात्मक श्लोक थोडे बाजूला ठेवून आपण थेट महाभारतातल्या पात्रांशी संबंधित असलेल्या वर्णनात्मक श्लोकांकडे येऊ.

वर्णनात्मक श्लोक

पहिलाच श्लोक भीष्मांशी संबंधित. द्रौपदी वस्त्रहरणप्रसंगीचा 'अर्थस्य पुरुषो दासः' हा श्लोक बहुतेकांना माहितच आहे, ह्या वाक्यावर कित्येक टीकादेखील आहेत. हे वाक्य अर्थ (द्रव्य) किंवा पुरुषार्थ आहे किंवा कसे, याबाबत विविध मतांतरे आहेत. मात्र थेट खाल्लेल्या मिठाला जागण्यासंबंधी असलेला थेट उल्लेख भीष्मपर्वात युद्धप्रसंगी आहे.

अद्य ते पुरुषव्याघ्र प्रतिमोक्ष्ये ऋणं महत् | भर्तृपिण्डकृतं राजन्निहतः पृतनामुखे ||

हे पुरुषव्याघ्रा, राजा! आज मी सैन्याच्या अग्रभागी मरण पत्करून तू दिलेल्या अन्नाच्या घासाच्या ऋणातून मुक्त होईन.

एकच अर्थ, पण प्रसंग अगदी विरुद्ध असताना रचलेले श्लोक मोठे विशेष आहेत.

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः||

कृष्ण अर्जुनास युद्धास प्रवृत्त करत असल्याचा भगवद्गीतेला हा सुप्रसिद्ध श्लोक जवळपास सर्वानाच माहीत आहे. मात्र अगदी ह्याच अर्थाचा श्लोक विराटपर्वातदेखील आहे, जिथे गोहरणयुद्धप्रसंगी पलायन करणाऱ्या दुर्योधनाला अर्जुनाने अगदी असाच उपदेश केला होता.

म्हणजे प्रसंग दोन, ज्ञातिबांधवांचा वध होऊ नये म्हणून शस्त्रे गाळून बसलेला अर्जुन एकीकडे आणि दुसरीकडे त्याच्या सहा महिने आधीच्या उत्तरगोग्रहण प्रसंगी युद्धातून पलायन करणारा दुर्योधन.

न मोक्ष्यसे पलायंस्त्वं राजन्युद्धे मनः कुरु | पृथिवीं भोक्ष्यसे जित्वा हतो वा स्वर्गमाप्स्यसि ||

हे कुरुनंदना, पलायन करून तू काही सुटणार नाहीस, तेव्हा युद्ध कर, जिंकलास तर पृथ्वी भोगशील, मेलास तर स्वर्गाला जाशील.

ध्वजवर्णन

आता कौरव-पांडवांचे ध्वज कोणकोणते होते, ते पाहू.

कौरवसैन्यातल्या प्रमुख योद्ध्यांचे ध्वज

भीष्म - पाच तारकांची आकृती असणारा तालध्वज
अश्वत्थामा - सिंहपुच्छ ध्वज
द्रोण - कमंडलू आणि यज्ञवेदी
दुर्योधन - गज आणि क्वचित नाग
कृप - वृषभध्वज
कर्ण - गजशृंखला आणि नील कमल
कर्णपुत्र वृषसेन - मोर
शल्य - नांगर
जयद्रथ - वराह
कलिंगराज श्रुतायध - अग्नी
भूरिश्रवा - यज्ञयूप (यज्ञस्तंभ)
शल - रुप्याचा हत्ती
कोसलराज बृहब्दल- सिंह
अलंबुष - गिधाड

पांडवांच्या प्रमुख योद्ध्यांचे ध्वज

युधिष्ठिर - सोमध्वज - त्यावर नंद आणि उपनंद नामक दोन मृदंग
भीम - सिंहध्वज
अर्जुन - वानरध्वज
नकुल - शरभ
सहदेव - हंस
कृष्ण - गरुडध्वज (कृष्णाचा रथ युद्धात कधीच नव्हता. मात्र जयद्रथवधाप्रसंगी अर्जुन कदाचित त्याला मारण्यास असमर्थ ठरला, तर कृष्णाने स्वतः युद्धात उतरून कौरवसैन्याच्या संहार करण्याच्या उद्दिष्टाने दारुकास गरुडध्वज रथ सज्ज करुन ठेवण्यास सांगितला होता.)
दृष्टद्युम्न - कोविदार (कांचनवृक्ष)
शिखंडी - मेष
अभिमन्यू - कर्णिकार (पांगारा) आणि एका ठिकाणी पंख असलेल्या हरिणाचे चिन्ह असलेल्या ध्वाजाचादेखील उल्लेख आहे.
सात्यकी - सिंह
प्रतिविंध्य - यम
सुतसोम - वायू
श्रुतकीर्ती - इंद्र
शतानिक - अश्विनीकुमार
श्रुतकर्मा - अश्विनीकुमार
घटोत्कच - गिधाड आणि काही वेळा घुबड
प्रद्युम्न - मकरध्वज (हा युद्धात सहभागी नव्हता. मात्र एके ठिकाणी ह्याचे ध्वजाचे नाव आलेले आहे.)

भुलेश्वर मंदिरातील द्रोण (डावीकडे -कमंडलू ध्वज) - शिखंडी (उजवीकडे- मेषध्वज) युद्धप्रसंग

a

भीष्म (डावीकडे - तालध्वज), शिखंडी (मध्यभागी- मेषध्वज) आणि अर्जुन (उजवीकडे - वानरध्वज) युद्धप्रसंग

a

शल्य - नांगरध्वज
a

व्यूहरचना

आता महाभारतात आलेली व्यूहांची रचना पाहू.

व्यूह म्हणजे स्ट्रॅटेजिक मिलिटरी फॉर्मेशन. यांची रचना वेगवेगळ्या आकारांत असे. मात्र एक १३व्या दिवसाचा द्रोणाने रचलेला चक्रव्यूह आणि १४व्या दिवसाचे द्रोणांनीच एकात एक असे रचलेले चक्रशकट व्यूह, सूचिपद्मव्यूह आणि एक गुप्त व्यूह असे तीन वगळता इतर व्यूहांचा फारसा उपयोग झाला, असे महाभारतात नाही. शक्यतो मध्यभागातील किंवा मुखाकडील सैनिकच प्रथम लढाई करीत, असेच वर्णन आहे.

आता कोणकोणत्या दिवशी कोणकोणते व्यूह रचले गेले, ते पाहू या.

पहिला दिवस

कौरव - ह्या व्यूहरचनेच नाव दिलेले नाही, मात्र व्यूहाचे वर्णन उपलब्ध आहे.

सैन्याच्या अग्रभागी सर्व कौरव योद्धे, भीष्माच्या पाठीमागे दु:शासन, दुर्विषह, दुर्मुख, दु:सह, विविंशति, चित्रसेन, विकर्ण, सत्यव्रत, पुरुमित्र, जय, भूरिश्रवा, शल, त्यांचे वीस सहस्र अनुयायी योद्धे, शिबी, वसाती, शाल्व, अंबष्ठ, त्रिगर्त, केकय, सौवीर, कैतव्य, प्राच्य (पूर्वेकडील), प्रतिच्य (पश्चिमेकडील), उदीच्यवासी (उत्तरेकडील) १२ देशांतील लोक भीष्माचे रक्षण करत होते.
ज्या ठिकाणी मगधाचा राजा (जलसंध) होता, त्या ठिकाणी दहा हजार हत्तींचे सैन्य, त्या सैन्यात रथचक्ररक्षक आणि हत्तींच्या पायांचे रक्षण करणारे ६० लक्ष वीर होते.
त्याचप्रमाणे धनुष्य, ढाली, तलवारी हातात घेतलेले पायदळाचे अगणित सैनिक होते.

पांडव- वज्रव्यूह (ह्याची रचना पूर्वी इंद्राने रचलेली होती.)

अग्रभागी भीम
त्याच्या मागे दृष्टद्युम्न, नकुल, सहदेव, धृष्टकेतू, त्याच्या मागे अक्षौहिणी सेनेसह मत्स्यराज विराट हा भावांसह आणि पुत्रांसह होता.
नकुल, सहदेव हे दोघे भीमाचे चक्ररक्षक आणि अभिमन्यू व द्रौपदेय हे त्याचे पृष्ठरक्षक होते.
त्यांच्या पाठीमागे शिखंडी आणि अर्जुनाच्या पाठीमागे युयुधान सात्यकी आणि युधामन्यू आणि उत्तमौजा हे चक्ररक्षक होते.
मधल्या फळीत युधिष्ठिर हत्तींसह, त्याच्या मागे अक्षौहिणी सेनेसह विराट आणि द्रुपद, ह्या सर्व सेनेसह दृष्टद्युम्न युधिष्ठिराचे रक्षण करत होता.

दुसरा दिवस

पांडव - क्रौंचव्यूह (क्रौंचारुण व्यूह)

अग्रभागी अर्जुन, शिरस्थानी द्रुपद, कुंतीभोज आणि चैद्य नेत्रांच्या ठिकाणी, कंठस्थानी दाशार्णक, प्रभद्र, अनुपक आणि किरात.
व्यूहाच्या पृष्ठस्थानी पट्टचर, पौंड्र, पौरवक आणि निषाद यांनी वेढलेला युधिष्ठिर होता, भीम आणि दृष्टद्युम हे पंखांच्या स्थानी होते. द्रौपदेय, अभिमन्यू, सात्यकी, पिशाच, दरद, कुंडीविष, मारूक, धेनुक, तित्तीर, चोळ पांड्य हे उजव्या बाजूला तर अग्निवेश, हुंड, मालव, शबर, वत्स, नकुल, सहदेव हे उजव्या स्थानी होते.

पंखांच्या ठिकाणी १०००० योद्धे, मस्तकाच्या ठिकाणी एक लक्ष, पृष्ठस्थानी एक लक्ष वीस हजार,कंठ स्थानी एक लक्ष सत्तर हजार, पंखांच्या टोकांना आणि शेवटी गजसैन्य होते. विराट, केकय, काशीराज आणि शैब्य पृष्ठभागाचे रक्षण करत होते.

कौरव - महाव्यूह

भीष्म अग्रभागी, द्रोण हा कुंतल, दशार्ण, मागध, विदर्भ, मेकल आणि कर्णप्रावरणासह भीष्माच्या पाठीमागे.
गांधार, सिंधूसौविर, शिबी आणि वसाती आणि शकुनी हे द्रोणाचे रक्षण करत होते,

दुर्योधन सर्व भावांसह, आणि अश्वातक, विकर्ण, अंबष्ठ, कोसल, दरद, शक, मालव ह्यांसह शकुनीचे रक्षण करत होता.
भुरिश्रवा, शल, शल्य, भगदत्त, विंद, अनुविंद हे डाव्या बाजूचे तर सुशर्मा, सुदक्षिण, कंबोज, श्रुतायु आणि अच्युतायु हे उजव्या बाजुस उभे होते.
अश्वत्थामा, कृप, कृतवर्मा आणि सात्वत हे पाठीमागे तर त्यांचे पृष्ठरक्षक विविध राजे, केतुमान, वसुदान आणि अभिभू होते

तिसरा दिवस -

कौरव - गरुडव्यूह

मुखाशी भीष्म
द्रोण आणि कृतवर्मा हे नेत्रांच्या जागी
अश्वत्थामा आणि कृप हे शिरस्थानी
त्रिगर्त, कैकेय, वाटधान,भूरिश्रवा, शल, शल्य, भद्रक, जयद्रथासह सिंधू सौविर आणि पंचनद योद्धे कंठस्थानी
दुर्योधन आपल्या भावांसह आणि अनुयायांसह पाठीच्या जागी
अवंतीचे विंदानुविंद, शक, कांबोज आणि शूरसेन हे शेपटीच्या जागी
मगध आणि कलिंग व्यूहाच्या उजव्या बाजूस तर कारुष, विकुंज, मुंड, कुंडीविष हे कोसलराज बृहब्दलासह उजव्या बाजूस होते

पांडव - अर्धचंद्र व्यूह

भीमसेन उजव्या टोकावर, त्याच्या मागे विराट आणि द्रुपद, त्यांच्या नंतर नील, नीलाच्या मागे चेदी, काशी आणि करुष, आणि पौरवांसह धृष्टकेतू.
शिखंडी आणि दृष्टद्युम्न , पांचाल, प्रभद्रक आणि युधिष्ठिर मध्यभागी.
त्यांच्या मागे सात्यकी, द्रौपदेय, अभिमन्यू, इरावान, सुतसोम आणि केकय बंधू.
डाव्या बाजूला अर्जुन आणि श्रीकृष्ण हे होते

चौथा दिवस

कौरव - व्याल व्यूह

अग्रभागी भीष्म, भोवती द्रोण, दुर्योधन, बालहिक, दुर्मुषण, चित्रसेन, जयद्रथ आणि इतर राजांनी केलेले कडे.

पांडव - श्रेष्ठ व्यूह

अर्जुन अग्रभागी, प्रत्येक कर्णावर (बाजूवर) ४/४ सहस्र हत्ती, आणि महान योद्ध्यांनी वेढलेला असा होता.

पाचवा दिवस

कौरव - मकरव्यूह (ह्याचे वर्णन उपलब्ध नाही)

पांडव - श्येनव्यूह (ह्याचे वर्णन उपलब्ध नाही)

मुखाच्या जागी भीम, डोळयांच्या जागी शिखंडी आणि दृष्टद्युम्न, मस्तकाच्या जागी सात्यकी, तर कंठाच्या जागी अर्जुन
डाव्या बाजूला एक अक्षौहिणी सेनेसह द्रुपद तर दक्षिण बाजूस अक्षौहिणी सेनेसह कैक, द्रौपदेय आणि अभिमन्यू
पृष्ठभागी नकुल, सहदेवासह स्वतः युधिष्ठिर होता.

सहावा दिवस -

कौरव - क्रौंचव्यूह

मुखाच्या जागी द्रोण, नेत्रांच्या जागी अश्वत्थामा आणि कृप
मस्तकाच्या जागी कंबोज, बालहिक आणि कृतवर्मा, कंठाच्या ठिकाणी शूरसेन आणि दुर्योधन
मद्र, सौविर आणि केकयांसह भगदत्त हृदयाच्या स्थानी.
डाव्या बाजूस सुशर्मा तर उजव्या बाजूद तुषार, यवन, चुचुपांसह असलेले शक होते
श्रुतायु, शतायु, भूरिश्रवा हे व्यूहाच्या पृष्ठभागी होते.

पांडव - मकरव्यूह

द्रुपद आणि अर्जुन हे मस्तकस्थानी
सहदेव आणि नकुल हे डोळ्यांच्या ठिकाणी होते
भीमसेन हा मुखाच्या स्थानी होता, तर अभिमन्यू, द्रौपदेय, घटोत्कच, सात्यकी आणि युधिष्ठिर हे कंठाच्या स्थानी होते.
दृष्टद्युम्न आणि विराट हे पृष्ठस्थानी होते.
पाच केकय बंधू व्यूहाच्या डाव्या बाजूस तर चेकितान आणि धृष्टकेतू हे उजव्या बाजूस होते.
कुंतीभोज हा पायांच्या जागी तर सोमकांसह शिखंडी आणि इरावान शेपटाच्या जागी होते.

ह्याच दिवशी भीम आणि दृष्टद्युम्न हे दोघेच कौरवांनी वेढलेल्या सैन्याशी युद्ध करत असताना अभिमन्यू, केकय बंधू, द्रौपदीपुत्र आणि धृष्टकेतू हे त्यांच्या संरक्षणासाठी सूचिमुख व्यूह रचून गेले.

सातवा दिवस -

कौरव - मंडलाकार व्यूह

प्रत्येक हत्तींमागे ७ रथ, प्रत्येक रथांमागे ७ अश्व, प्रत्येक अश्वामागे १० धनुर्धर, प्रत्येक धनुर्धरामागे १० ढाली धारण करणारे योद्धे

पांडव - वज्रव्यूह (ह्याचे वर्णन उपलब्ध नाही मात्र युद्धाच्या पहिल्या दिवशी पांडवांनी हाच व्यूह रचला होता त्यामुळे रचना तीच असावी)

आठवा दिवस

कौरव -

ह्या व्यूहरचनेच नाव दिलेले नाही, मात्र व्यूहाचे वर्णन उपलब्ध आहे. वर्णनावरून ही एकरेषीय रचना दिसते.

अग्रभागी भीष्मांसह मालव, दाक्षिणात्य आणि अवंतीचे योद्धे
त्याच्या मागून द्रोण हा पुलिंद, पारद, क्षुद्रक यांसह
द्रोणाच्या पाठीमागे भगदत्त हा कलिंग आणि पिशाच यांसह
भगदत्तानंतर कोसलराज बृहब्दल हा मेकल, त्रिपुर आणि कुरुविंदासह
त्याच्या मागून त्रिगर्त हा काम्बोज आणि यवनांसह
त्रिगर्तानंतर अश्वत्थामा आणि त्याच्या मागून दुर्योधन हा भावांसह,दुर्योधनाच्या मागून कृप चालला होता.

पांडव - शृंगाटकव्यूह

दोन्ही शृंगांच्या स्थानी भीमसेन आणि सात्यकी हे हजारो रथांसह, घोड्यांसह आणि पायदळासह होते
त्या दोघांसह अर्जुन रक्षणार्थ होता
मध्यभागी युधिष्ठिर आणि नकुल सहदेव होते
त्यांच्या पाठीमागे अभिमन्यू, महारथ विराट आणि द्रौपदीचे पुत्र आणि घटोत्कच राक्षस होते.

नववा दिवस-

कौरव - सर्वतोभद्र व्यूह

व्यूहाच्या मुख्यस्थानी भीष्मासह कृप, कृतवर्मा, शैब्य, शकुनी, जयद्रथ आणि सुदक्षिण.
व्यूहाच्या उजव्या बाजूला द्रोण, भूरिश्रवा, शल्य, भगदत्त.
डाव्या बाजूला अश्वत्थामा, सोमदत्त, विंद, अनुविंद.
व्यूहाच्या मध्यभागी दुर्योधन आणि मागील बाजूस अलंबुष आणि श्रुतायु.

पांडव -

ह्या व्यूहरचनेच नाव दिलेले नाही, मात्र व्यूहाचे वर्णन उपलब्ध आहे.

युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव हे अग्रभागी होते, त्यांच्या सोबत दृष्टद्युम्न, विराट आणि सात्यकी.
शिखंडी, घटोत्कच, चेकितान आणि कुंतीभोज त्यांच्या पाठीमागे.
त्यांच्या सोबत युधामन्यु, केकय बंधू, अभिमन्यू आणि द्रुपद

दहावा दिवस -

कौरव - व्यूहाचे नाव नाही, पण प्रत्येक दिवशी भीष्म आसुर पैशाच आणि राक्षस अशा व्यूहांची रचना करत असे. हे आसुर, पैशाच, राक्षस ही व्यूहांची नावे नव्हेत, तर त्याचे प्रकार होत.

भीष्म अग्रभागी, त्याचे रक्षण करायला धृतराष्ट्र पुत्र, त्यांच्या पाठीमागे द्रोण आणि अश्वत्थामा, त्यांच्या नंतर गजसेनेसह भगदत्त आणि त्यांच्या मागून कृप आणि कृतवर्मा.
त्यांच्या मागे काम्बोजराज सुदक्षिण, मगधराज जयतसेन, सौबल शकुनी आणि कोसलराज बृहदबल आणि सैन्याच्या पिछाडीला सुशर्मा आणि इतर राजे होते.

पांडव - ह्या व्यूहरचनेच नाव दिलेले नाही, मात्र व्यूहाचे वर्णन उपलब्ध आहे.

शिखंडी अग्रभागी, भीम आणि अर्जुन हे शिखंडीचे चक्ररक्षक होते, द्रौपदीचे पुत्र आणि अभिमन्यू हे त्यांच्या पाठीमागे.
सात्यकी आणि चेकितान हे त्यांचे रक्षक तर त्यांच्या मागे दृष्टद्युम्न असून पांचालांनी त्याचे रक्षण केले होते. त्यांच्या मागे युधिष्ठिरासह नकुल सहदेव होते.
त्यांच्या मागे विराट आणि त्याच्या मागे द्रुपद होता आणि पिछाडीचे रक्षण करायला पाच केकय बंधू आणि धृष्टकेतू हे होते.

अकरावा दिवस -

कौरव - शकटव्यूह

अग्रभागी द्रोण
दक्षिण बाजूस जयद्रथ, कलिंगराजा आणि विकर्ण, त्यांच्या मागे शकुनी
डाव्या बाजूस कृप, कृतवर्मा, चित्रसेन, विविंशती आणि दु:शासन, त्यांच्या पाठीमागे सुदक्षिण, यवन, शक
दुर्योधन मध्यभागी, त्यासोबत कर्ण आणि त्याच्या पाठीमागे मद्र, त्रिगर्त, अंबष्ठ, मालव, शिबी, शूरसेन, शूद्र, मलद, सौविर, कितव.

पांडव - क्रौंचव्यूह
अग्रभागी अर्जुन होता इतकेच यात सांगितलेले आहे. मात्र हाच व्यूह दुसर्‍या दिवशी पांडवांनी व सहाव्या दिवशी कौरवांनी रचलेला होता ह्याचे वर्णन वर आलेच आहे.

बारावा दिवस -

ह्या दिवशी युधिष्ठिराला जिवंत पकडण्याच्या उद्देशाने कौरवांकडून दोन व्यूह रचले गेले.

संशप्तक - चंद्राच्या आकाराचा व्यूह. ह्यांनी अर्जुनाला आव्हान देऊन युद्धाच्या मुख्य स्थळापासून लांब बोलावले, जेणेकरून अर्जुन दूर जावा व द्रोणास युधिष्ठिरास पकडणे सुलभ जावे.

कौरव - गरुडव्यूह

मुखाच्या स्थानी द्रोण, दुर्योधन भावांसह शिरस्थानी, कृतवर्मा आणि कृपाचार्य नेत्रस्थानी.
कंठस्थानी भूतशर्मा, क्षेमशर्मा, करकाश, कलिंग, हंसपथ, शूरसेन, दरद, मद्र, केकय, सिंहल, प्राच्य,अभिरक, दशेरक, शक, यवन, काम्बोज.
व्यूहाच्या दक्षिणभागी भूरिश्रवा, शल्य, सोमदत्त आणि बालहिक तर व्यूहाच्या डाव्या बाजूस विंद अनुविंद, सुदक्षिण हे अश्वत्थाम्याला अग्रस्थानी करून उभे राहिले.
गरुडव्यूहाच्या पाठीमागील बाजूस कलिंग, अंबष्ठ, मागध, पौंड्र, मद्रक, गांधार, शकुन, वसाती होते तर शेपटाच्या बाजूस आपल्या पुत्रांसह कर्ण होता.
जयद्रथ, भीमरथ, संपाती, भूमींजय, जय, वृषक्राथ, नैषध हे व्यूहाच्या उरस्थानी होते.
व्यूहाच्या मध्यभागी भगदत्त होता.

पांडव - अर्धमंडलाकार व्यूह

तेरावा दिवस -

कौरव - चक्रव्यूह

इंद्रतुल्य असे सर्व राजे त्या ठिकाणी तैनात होते, चक्राच्या आरांच्या ठिकाणी तेजस्वी राजकुमार होते हे सर्व प्रतिज्ञाबद्ध (मारीन किंवा मरीन) त्या सर्वांनी सुवर्णमय ध्वज, लाल वस्त्रे आणि लाल अलंकार आणि सुवर्णमाला धारण केल्या होत्या. चंदन अगुरु यांचा लेप सर्वांगाला लावलेला होता. सर्व राजपुत्रांचा अग्रणी लक्ष्मण होता.
दुर्योधन व्यूहाच्या मध्यभागी होता, कर्ण, कृप आणि दु:शासनाने दुर्योधनाभोवती कडे केले होते.
अग्रभागी द्रोण आणि जयद्रथ, त्याच्या पाठीमागे अश्वत्थाम्याला नेता करून धृतराष्ट्राचे तीस पुत्र होते, त्याचप्रमाणे जयद्रथाच्या मागे शकुनी, शल्य आणि भूरिश्रवा होते.

ह्या वर्णनावरून व्यूहाची रचना कूट असावी असे वाटत नाही. ही रथाच्या चाकाची आकाराची रचना दिसते, भुलभुलैय्या नाही.

पांडव - ह्या व्यूहरचनेच नाव दिलेले नाही.

चौदावा दिवस -

कौरव - चक्रशकट व्यूह, सूचिपद्मव्यूह आणि आण़खी एक गुप्त व्यूह

आघाडीला धृतराष्ट्रपुत्र दुर्मुषण, दु:शासन आणि विकर्ण आणि द्रोण
बारा कोस लांब आणि पाच कोस रुंद व्यूह. त्या त्या ठिकाणी योग्य रितीने स्थापना केलेल्या अनेक शूर राजांनी आणि रथदळ, घोडदळ, गजदळ आणि पायदळ ह्यांच्या समूहांनी स्वतः द्रोणाने हा व्यूह रचला होता. चक्रशकट व्यूहाच्या पाठीमागील अर्ध्या भागात भेदण्याला अत्यंत कठीण असा (सूची) पद्मव्यूह नावाचा गर्भव्यूह बनवलेला होता, पद्मव्यूहाच्याही आत आणखी एक गुप्त व्यूह केलेला होता.
पद्मव्यूहाच्या अग्रभागी कृतवर्मा होता. त्यानंतर काम्बोजराज सुदक्षिण आणि जलसंध, त्याच्याही नंतर दुर्योधन आणि कर्ण होते, त्यांच्या मागून शकटव्यूहाच्या अग्रभागाचे रक्षण करणारे एक लक्ष सैनिक होते आणि त्यांच्याही पाठीमागे प्रचंड सैन्याने वेष्टिलेला जयद्रथ होता.
जयद्रथासोबत भूरिश्रवा, कर्ण, अश्वत्थामा, शल्य, वृषसेन आणि कृप होते.
द्रोणापासून जयद्रथाचे अंतर तीन ते सहा कोस होते. बरोबर एक लक्ष घोडे, साठहजार रथ , चौदाहजार हत्ती आणि एकवीसहजार चिलखतधारी योद्धे होते.

पांडव - ह्या व्यूहरचनेचे नाव दिलेले नाही. मात्र जयद्रथ वध हेच ह्या दिवशीचे एकमेव उद्दिष्ट असल्याने सरळ आक्रमण हेच धोरण आहे. मात्र कौरवांच्या व्यूहात शिरताना द्रोणांपासून युधिष्ठिराचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सात्यकी, भीम आणि धृष्टद्युम्न आदी महान पराक्रमी वीर हे मागे राहिले होते. नंतर मात्र सात्यकी आणि त्याच्या पाठोपाठ भीम हेदेखील कौरवांचा व्यूह उद्ध्वस्त करत सैन्यात खोलवर घुसले होते, ज्याचे वर्णन मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

पंधरावा दिवस - दोन्ही सैन्यांच्या व्यूहरचनेचे नाव दिलेले नाही.

सोळावा दिवस -

कौरव - मकरव्यूह

मुखभागी कर्ण, डोळ्यांच्या ठिकाणी शकुनी आणि उलूक, मस्तकाच्या स्थानी अश्वत्थामा, आणि ग्रीवाभागी दुर्योधनाचे सर्व भाऊ, मध्यभागी स्वतः दुर्योधन.
डाव्या पायाच्या जागी नारायणी सेनेच्या गोपालांसह कृतवर्मा, उजव्या पायाच्या जागी त्रिगर्त आणि दाक्षिणात्यांनी वेढलेला कृपाचार्य होता.
डाव्या पायाच्या पाठीमागच्या भागात मद्र देशातील सैन्याने वेढलेला शल्य आणि उजव्या पायाच्या पाठीमागच्या भागात एक हजार रथी आणि तीनशे हत्तींनी वेढलेला सुषेण उभा होता.
व्यूहाच्या शेपटीच्या भागात चित्र आणि चित्रसेन हे दोघे बंधू होते.

पांडव - अर्धचंद्रव्यूह

डाव्या बाजूस भीमसेन, उजव्या बाजूस धृष्टद्युम्न, मध्यभागी राजा युधिष्ठिर आणि अर्जुन. धर्मराजाच्या मागे नकुल व सहदेव उभे होते. पांचाल महारथी युधामन्यू आणि उत्तमौजा अर्जुनाचे चक्ररक्षक होते.
उरलेले राजे व्यूहाच्या वेगवेगळ्या भागात उभे होते.

१७व्या आणि शेवटच्या १८व्या दिवसांच्या व्यूहांचे वर्णन महाभारतात दिलेले नाही.

रणयज्ञाचे रूपक

युद्धाच्या आधी पांडवांकडून सामोपचाराचे कित्येक प्रयत्न झाले. कौरवपक्षाकडील भीष्म, विदुर, गांधारी आणि अगदी धृतराष्ट्रानेदेखील दुर्योधनाला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुर्योधनाने केलेली ही दर्पोक्ती पाहा. यातील रणयज्ञाचे रूपक विलक्षण सुंदर आहे.

दुर्योधन उवाच||

नाहं भवति न द्रोणे नाश्वत्थाम्नि न सञ्जये | न विकर्णे न काम्बोजे न कृपे न च बाह्लिके ||
सत्यव्रते पुरुमित्रे भूरिश्रवसि वा पुनः | अन्येषु वा तावकेषु भारं कृत्वा समाह्वये ||
अहं च तात कर्णश्च रणयज्ञं वितत्य वै | युधिष्ठिरं पशुं कृत्वा दीक्षितौ भरतर्षभ ||
रथो वेदी स्रुवः खड्गो गदा स्रुक्कवचं सदः | चातुर्होत्रं च धुर्या मे शरा दर्भा हविर्यशः ||
आत्मयज्ञेन नृपते इष्ट्वा वैवस्वतं रणे | विजित्य स्वयमेष्यावो हतामित्रौ श्रिया वृतौ ||
अहं च तात कर्णश्च भ्राता दुःशासनश्च मे | एते वयं हनिष्यामः पाण्डवान्समरे त्रयः ||
अहं हि पाण्डवान्हत्वा प्रशास्ता पृथिवीमिमाम् | मां वा हत्वा पाण्डुपुत्रा भोक्तारः पृथिवीमिमाम् ||
त्यक्तं मे जीवितं राजन्धनं राज्यं च पार्थिव | न जातु पाण्डवैः सार्धं वसेयमहमच्युत ||
यावद्धि सूच्यास्तीक्ष्णाया विध्येदग्रेण मारिष | तावदप्यपरित्याज्यं भूमेर्नः पाण्डवान्प्रति ||

दुर्योधन म्हणतो -

हे तात (धृतराष्ट्र), तू, द्रोण, अश्वत्थामा, संजय, भीष्म, कंबोज, कृप, बाल्हिक, सत्यव्रत, पुरुमित्र, भूरिश्रवा किंवा इतर कोणीही योद्धे ह्यांच्यावर विसंबून मी पांडवांना युद्धाचे आवाहन केले नाही, तर हे भरतश्रेष्ठा, मी आणि कर्णाने हा रणयज्ञ मांडला आहे. युधिष्ठिराला बळीपशु नेमून आम्ही दोघांनी यज्ञाची दीक्षा घेतली आहे. या यज्ञात रथ ही वेदी, खड्ग हे स्रुव, गदा ही स्रुक, कवच हेच यज्ञसभा, अश्व हे चार ऋत्विज, शर हे दर्भ आणि यश हेच हवि आहे. रणांत आत्मयज्ञाने यमाला यजन करून, शत्रूला मारून आम्ही विजय मिळवू व विजयलक्ष्मीने संपन्न होऊन परत येऊ. तात! मी, कर्ण, व बंधू दु:शासन मिळून आम्ही तिघे पांडवांचा संहार करू. एकतर मी पांडवांना ठार करून पृथ्वीचे राज्य करीन किंवा पांडव मला मारून पृथ्वीचा उपभोग घेतील. प्राण, धन व राज्य या सर्वांवर मी पाणी सोडीन, पण पांडवांसह मी कधीही राहणार नाही. पूजनीय धृतराष्ट्रा, तीक्ष्ण सुईच्या अग्रावर जेव्हढी भूमी मावेल, तेवढीही मी जिवंत असेपर्यंत पांडवांस देणार नाही.

कर्णाची युद्धसज्जता

आता युद्धास निघतानाची ही कर्णाची युद्धसज्जता पाहा. यातील वर्णनामुळे तत्कालीन योद्धे युद्धास बाहेर पडताना कशी तयारी करत असत, हे कळून येईल.

निबध्यतां मे कवचं विचित्रं; हैमं शुभ्रं मणिरत्नावभासि | शिरस्त्राणं चार्कसमानभासं; धनुः शरांश्चापि विषाहिकल्पान् ||

उपासङ्गान्षोडश योजयन्तु; धनूंषि दिव्यानि तथाहरन्तु | असींश्च शक्तीश्च गदाश्च गुर्वीः; शङ्खं च जाम्बूनदचित्रभासम् ||

एतां रौक्मीं नागकक्ष्यां च जैत्रीं; जैत्रं च मे ध्वजमिन्दीवराभम् | श्लक्ष्णैर्वस्त्रैर्विप्रमृज्यानयस्व; चित्रां मालां चात्र बद्ध्वा सजालाम् ||

अश्वानग्र्यान्पाण्डुराभ्रप्रकाशा; न्पुष्टान्स्नातान्मन्त्रपूताभिरद्भिः | तप्तैर्भाण्डैः काञ्चनैरभ्युपेता; ञ्शीघ्राञ्शीघ्रं सूतपुत्रानयस्व ||

रथं चाग्र्यं हेमजालावनद्धं; रत्नैश्चित्रं चन्द्रसूर्यप्रकाशैः | द्रव्यैर्युक्तं सम्प्रहारोपपन्नै; र्वाहैर्युक्तं तूर्णमावर्तयस्व ||

चित्राणि चापानि च वेगवन्ति; ज्याश्चोत्तमाः संहननोपपन्नाः | तूणांश्च पूर्णान्महतः शराणा; मासज्य गात्रावरणानि चैव ||

प्रायात्रिकं चानयताशु सर्वं; कन्याः पूर्णं वीरकांस्यं च हैमम् | आनीय मालामवबध्य चाङ्गे; प्रवादयन्त्वाशु जयाय भेरीः ||

कर्ण म्हणतो -

नानाविध, सुवर्णमय, शुभ्र आणि मण्यांनी व रत्नांनी झगमगणारे कवच मला बांधा त्याचप्रमाणे सूर्यासारखी प्रभा असलेले शिरस्त्राण, धनुष्य आणि अग्नीप्रमाणे व विषारी सर्पाप्रमाणे भयानक असलेले बाण तयार ठेवा, माझ्यासाठी सोळा भात्यांची योजना करा, त्याचप्रमाणे दिव्य धनुष्ये, खड्गे, प्रचंड गदा आणि सोन्याप्रमाणे चित्रविचित्र व निमुळते टोक असलेला शंख आणा. ही हत्तीची सोन्याची सुंदर शृंखला आणि नीलकमलाचे चिन्ह असलेला माझा सुंदर ध्वज मऊ वस्त्रांनी साफ करून आणा. तसेच चांगल्या रितीने गुंफलेली आणि लाह्यांनी माळलेली सुंदर माळ तयार करून आणा. हे सूतपुत्रा, पांढऱ्या रंगाच्या मेघाप्रमाणे तळपणारे, धष्टपुष्ट, मंत्रांनी पवित्र केलेल्या पाण्याने स्नान घातलेले आणि झळाळणाऱ्या सोन्याच्या अलंकारांनी युक्त असे श्रेष्ठ आणि वेगवान घोडे ताबडतोब आण. उत्कृष्ट, सोन्याच्या सरांनी मढविलेला, चंद्रसूर्याप्रमाणे प्रकाशणाऱ्या रत्नांनी वैचित्र्यपूर्ण दिसणारा, युद्धासाठी योग्य अशा वस्तूंनी युक्त आणि ज्याला घोडे जोडलेले आहेत, असा रथ सत्वर घेऊन ये. त्याचप्रमाणे नाना प्रकारची आणि वेगवान धनुष्ये, प्रहार करण्यासाठी योग्य अशा उत्कृष्ट प्रत्यंचा, बाणांनी भरलेले मोठे भाते, आणि शरीरावर धारण करण्यासाठी योग्य अशी वस्त्रे मिळवून घेऊन ये. तसेच रणांत प्रयाण करण्यासाठी आवश्यक अशा त्या सर्व गोष्टी, दह्याने भरलेला काशाचा आणि सुवर्णाचा घट आणून, शरीरावर हार घालून विजयासाठी सैनिकांनी भेरी वाजवाव्यात.

भीमाने केलेल्या गजयुद्धांचे वर्णन

आता भीमाने केलेल्या गजयुद्धांचे वर्णन पहा. भुलेश्वर येथील एका शिल्पपटांत भीमाने केलेल्या गजयुद्धाचे विलक्षण सुंदर शिल्प आहे.

भीष्मपर्वात भानुमानाच्या हत्तीशी केलेले भीमाने केलेल्या युद्धाचे वर्णन थेट 'लॉर्ड ऑफ द रिन्ग्स'मधल्या लिगोलसने केलेल्या ओलिफंटच्या युद्धाशी तंतोतंत जुळते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी यूट्यूबवर जाऊन 'legolas vs oliphant' ही क्लिप बघावी.

आरुरोह ततो मध्यं नागराजस्य मारिष | खड्गेन पृथुना मध्ये भानुमन्तमथाच्छिनत् ||

सोऽन्तरायुधिनं हत्वा राजपुत्रमरिंदमः | गुरुभारसहस्कन्धे नागस्यासिमपातयत् ||

छिन्नस्कन्धः स विनदन्पपात गजयूथपः | आरुग्णः सिन्धुवेगेन सानुमानिव पर्वतः ||

ततस्तस्मादवप्लुत्य गजाद्भारत भारतः | खड्गपाणिरदीनात्मा अतिष्ठद्भुवि दंशितः ||

स चचार बहून्मार्गानभीतः पातयन्गजान् | अग्निचक्रमिवाविद्धं सर्वतः प्रत्यदृश्यत ||

त्यानंतर हे मारिषा! महाबाहू भीमाने प्रचंड गर्जना करून आणि हातात खड्ग धारण करून भानुमानाच्या उत्कृष्ट हत्तीचे दोन दात पकडून त्यांच्यावरून उडी घेतली आणि मोठ्या वेगाने तो त्या हत्तीच्या पाठीवर चढला.
तेव्हा कलिंगराजाच्या पुत्राने भीमावर शक्ती फेकली, त्या शक्तीचेही भीमाने आपल्या रुंद खड्गाने दोन तुकडे केले आणि खुद्द भानुमानावरही खड्गाने वार केला. शत्रूंना वठणीवर आणणाऱ्या त्या भीमाने हत्तीवर आरूढ होऊन युद्ध करणाऱ्या राजपुत्राचा वध केला आणि अत्यन्त सामर्थ्यशाली अशा खड्गाने हत्तीच्या स्कंधावरही घाव घातला. नदीच्या प्रचंड वेगाने पर्वत आपल्या शिखरासह कोसळावा तद्वत त्या कळपाचा प्रमुख असलेला हत्तीचा स्कंध तुटून तो जखमी होऊन चीत्कार करत खाली कोसळला.
त्यानंतर हे भारता! त्या हत्तीवरून उडी मारून भरतकुलात जन्म घेतलेला आणि थोर सत्त्वाचा भीम हातात खड्ग घेऊन व कवच घालून धरणीवर उभा राहिला. सभोवताली हत्तींचा संहार करून आणि त्यांना जमीनदोस्त करून त्याने निरनिराळ्या मार्गांवर संचार केला आणि सर्व बाजूंना गरगर फिरवलेल्या अग्निचक्राप्रमाणे तो दिसू लागला.

द्रोणपर्वात भीमाचे भगदत्ताच्या प्रसिद्ध सुप्रतिक हत्तीशी झालेल्या युद्धाचे वर्णन तर अतिशय सुरेख आहे. विशेष म्हणजे हे श्लोक मात्र भांडारकर प्रतीत नाही. कुंभकोणम प्रतीत हे श्लोक मला शोध घेताना आढळले.

तस्मिन्निपतिते वीरे सम्प्राद्रवत सा चमूः।
सम्भ्रान्ताश्वद्विपरथा पदातीनवमृद्गती॥

तेष्वनीकेषु भग्नेषु विद्रवत्सु समन्ततः।
प्राग्ज्योतिषस्ततो भीमं कुञ्जरेण समाद्रवत्॥

येन नागेन मघवानजयद्दैत्यदानवान्।
तदन्वयेन नागेन भीमसेनमुपाद्रवत्॥

स नागप्रवरो भीमं सहसा समुपाद्रवत्।
श्रवणाभ्यामथो द्वाभ्यां संहतेन करेण च॥

व्यावृत्तनयनः क्रुद्वः प्रमथन्निव पाण्डवम्।
वृकोदररथं साश्वमविशेषमचूर्णयत्॥

पद्भ्यां भीमोऽप्यथो धावंस्तस्य गात्रेष्वलीयत।
जानन्नञ्जलिकावेधं नापाक्रामत पाण्डवः॥

गात्राभ्यन्तरगो भूत्वा करेणाताडयन्मुहुः।
लालयामास तं नागं वधाकाङ्क्षिणमव्ययम्॥

कुलालचक्रवन्नागस्तदा तूर्णमथाभ्रमत्।
नागायुतबलः श्रीमान्कालयानो वृकोदरम्॥

भीमोऽपि निष्क्रम्य ततः सुप्रतीकाग्रतोऽभवत्।
भीमं करेणावनम्य जानुभ्यामभ्यताडयत्॥

ग्रीवायां वेष्टयित्वैनं स गजो हन्तुमैहत।
करवेष्टं भीमसेनो भ्रमं दत्त्वा व्यमोचयत्॥

पुनर्गात्राणि नागस्य प्रविवेश वृकोदरः।
यावत्प्रतिगजायातं स्वबलं प्रत्यवैक्षत।
भीमोपि नागगात्रेभ्यो विनिःसृत्यापयाज्जवात्॥

ततः सर्वस्य सैन्यस्य नादः समभवन्महान्।
अहो धिङ्गिहतो भीमः कुज्जरेणेति मारिष॥

तो वीर (भीमसेनाने मारलेला म्लेंच्छ) धरणीवर पडताच त्या सैन्यातील घोडे, हत्ती आणि रथारुढ सैनिक यांचा एकच गोंधळ झाला आणि पादचारी सैनिकांना तुडवीत ते सैन्य इतस्ततः पळू लागले असता प्रागज्योतिषाच्या राजाने (भगदत्ताने) हत्तीवर बसून भीमावर चाल केली. ज्या हत्तीच्या योगाने इंद्राने दैत्यांवर आणि दानवांवर विजय मिळविला, त्याच्याच वंशातील हत्तीला घेऊन प्रागज्योतिषाधिपाने भीमावर आक्रमण केले. त्या श्रेष्ठ हत्तीने अचानक भीमावर हल्ला केला. अत्यंत क्रोधाने आणि डोळे गरगरा फिरवून आपल्या दोन पायांनी तसेच वळविलेल्या सोंडेने जणू काही भीमाला ढवळून काढीत त्या हत्तीने भीमाचा रथ त्याच्या घोड्यांसह संपूर्णपणे चिरडून टाकला.

भीमही पायांनी धावत त्या हत्तीच्या अंगाखाली लपला आणि अंजलिकावेधाचे ज्ञान असल्यामुळे तेथून दूर झाला नाही. हत्तीच्या अंगाखाली जाऊन तो पुन्हा पुन्हा त्याला हाताने मारू लागला आणि आपल्या वधाची इच्छा करणाऱ्या त्या हत्तीला जणू काही लीलेने खेळवू लागला. तेव्हा भीमाला तुडविण्याच्या इच्छेने दहा हजार हत्तींचे बळ असलेला असा तो ऐश्वर्यवान हत्ती अतिशय त्वरेने कुंभाराच्या चाकाप्रमाणे गरगर फिरू लागला. त्या वेळी भीम त्याच्या अंगाखालून निघून त्या सुप्रतीक हत्तीच्या समोर उभा राहिला, आणि हत्तीने त्याला सोंडेने खाली वाकवून गुडघ्यांनी मारण्याला प्रारंभ केला. त्याचप्रमाणे त्याच्या मानेला विळखा घालून त्याला ठार मारण्याची इच्छा केली. भीमसेनाने गोल फिरून त्याच्या सोंडेचा विळखा सोडविला. आणि पुन्हा त्याच्या अंगाखाली प्रवेश केला. त्याने काही काळ आपल्या सैन्यातून दुसऱ्या एखाद्या हत्तीच्या आगमनाची वाट पाहिली, आणि नंतर हत्तीच्या अंगाखालून बाहेर पडून तो मोठ्या वेगाने दूर निघून गेला.
तेव्हा हे मारिषा ! 'अरेरे ! भीम हत्तीकडून मारला गेला !' असा प्रचंड आवाज सर्व सैन्यातून उमटला.

भीमाने केलेल्या गजयुद्धाचे हे शिल्प

a

भीम-विशोक संवाद

एक अर्जुन वगळता अक्षय्य भाते कुणाकडेच नव्हते. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की युद्धात इतरांचे बाण, आयुधे कशी संपत नाहीत. ह्याचे उत्तर महाभारतातच ठिकठिकाणी आहे. प्रत्येक रथाच्या मागे आयुधांनी भरलेल्या गाडेच्या गाडे मागे असत. ह्या दृष्टीने भीम आणि त्याचा सारथी विशोक ह्याचा कर्णपर्वातील संवाद वाचनीय आहे.

एतद्दुःखं सारथे धर्मराजो; यन्मां हित्वा यातवाञ्शत्रुमध्ये |

नैनं जीवन्नापि जानाम्यजीव; न्बीभत्सुं वा तन्ममाद्यातिदुःखम् ||

सोऽहं द्विषत्सैन्यमुदग्रकल्पं; विनाशयिष्ये परमप्रतीतः |

एतान्निहत्याजिमध्ये समेता; न्प्रीतो भविष्यामि सह त्वयाद्य ||

सर्वांस्तूणीरान्मार्गणान्वान्ववेक्ष्य; किं शिष्टं स्यात्सायकानां रथे मे |

का वा जातिः किं प्रमाणं च तेषां; ज्ञात्वा व्यक्तं तन्ममाचक्ष्व सूत ||

विशोक उवाच||

षण्मार्गणानामयुतानि वीर; क्षुराश्च भल्लाश्च तथायुताख्याः |

नाराचानां द्वे सहस्रे तु वीर; त्रीण्येव च प्रदराणां च पार्थ ||

अस्त्यायुधं पाण्डवेयावशिष्टं; न यद्वहेच्छकटं षड्गवीयम् |

एतद्विद्वन्मुञ्च सहस्रशोऽपि; गदासिबाहुद्रविणं च तेऽस्ति ||

भीम उवाच||

सूताद्येमं पश्य भीमप्रमुक्तैः; सम्भिन्दद्भिः पार्थिवानाशुवेगैः |

उग्रैर्बाणैराहवं घोररूपं; नष्टादित्यं मृत्युलोकेन तुल्यम् ||

अद्यैव तद्विदितं पार्थिवानां; भविष्यति आकुमारं च सूत |

निमग्नो वा समरे भीमसेन; एकः कुरून्वा समरे विजेता ||

सर्वे सङ्ख्ये कुरवो निष्पतन्तु; मां वा लोकाः कीर्तयन्त्वाकुमारम् |

सर्वानेकस्तानहं पातयिष्ये; ते वा सर्वे भीमसेनं तुदन्तु ||

आशास्तारः कर्म चाप्युत्तमं वा; तन्मे देवाः केवलं साधयन्तु |

आयात्विहाद्यार्जुनः शत्रुघाती; शक्रस्तूर्णं यज्ञ इवोपहूतः ||

भीमसेन म्हणतो-

हे सारथ्या! मला ह्या गोष्टीचे फार दुःख होत आहे की धर्मराज मला सोडून स्वतःच शत्रूच्या सैन्यात गेला. मला माहीत नाही की तो अजूनपर्यंत जिवंत आहे की नाही. अर्जुनाचाही समाचार मला अजून कळला नाही. यामुळे मला आज अधिक दुःख होत आहे. ठीक आहे, आता मी अत्यंत विश्वस्त होऊन शत्रूच्या प्रचंड सेनेचा विनाश करीन. या ठिकाणी एकत्र आलेल्या या सेनेला युद्धभूमीत नष्ट करून मी तुझ्याचबरोबर आज प्रसन्नतेचा अनुभव घेईन. हे सुता ! तू माझ्या रथावर ठेवलेल्या बाणांच्या सर्व भात्यांची देखरेख करून, यथायोग्य जाणून , मला स्पष्टपणे सांग, की आता त्यामध्ये किती बाण शिल्लक राहिले आहेत? कोणकोणत्या जातीचे बाण शिल्लक आहेत आणि त्यांची संख्या किती आहे?

विशोक म्हणतो -

हे वीरश्रेष्ठा! आता आपल्याजवळ साठ हजार मार्गण आहेत, दहा हजार क्षुर आणि भल्ल आहेत, दोन हजार नाराच शिल्लक आहेत आणि हे पार्था! हे तीन हजार प्रदर उरले आहेत. हे पांडुनंदना! आता इतकी शस्त्रे शिल्लक आहेत की, सहा बैल जुंपलेला गाडासुद्धा त्यांना ओढू शकणार नाही. हे विद्वान पुरुषा! या हजारो शस्त्रांचाचा तू प्रयोग कर. अजून तुझ्याजवळ अनेक गदा, तलवारी आणि बाहुबलाचे सामर्थ्य आहे. अशाप्रकारे अनेक प्रास, मुद्गर, शक्ती आणि तोमर उरलेले आहेत. तू ही आयुधे संपण्याची भीती बाळगू नकोस.

भीमसेन म्हणतो -

सूता ! आज या युद्धभूमीकडे जरा दृष्टी टाक. भीमसेनाने सोडलेल्या अत्यंत वेगवान बाणांनी राजांचा विनाश करत असता, सर्व रणक्षेत्राला आच्छादून टाकले आहे, ज्यामुळे सूर्यसुद्धा अदृश्य झाला आहे आणि ही भूमी यमलोकाप्रमाणे भयंकर वाटू लागली आहे. सूता ! आज लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व राजेलोकांना माहीत झाले आहे की, भीमसेन युद्धसागरात बुडून गेला आहे, किंवा त्याने एकट्यानेच सर्व कौरवांना युद्धात जिंकले आहे. आज युद्धभूमीत सर्व कौरव मरावेत किंवा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व लोकांनी मी भीमसेन रणभूमीत पडलो आहे असे सांगावे. मी एकटाच या सर्व कौरवांना मारून टाकीन किंवा हेच सर्व लोक मला भीमसेनाला पीडित करतील. जे उत्तम कर्मांचा उपदेश करणारे आहेत, ते देव माझे केवळ एकमेव कार्य सिद्ध करोत. ज्याप्रमाणे यज्ञात आवाहन केल्यानंतर इंद्र सत्वर पदार्पण करतो, त्याप्रमाणे शत्रुनाशक अर्जुन येथे येवो.

युद्धात वापरण्यास अप्रशस्त असलेल्या बाणांचे वर्णन

महाभारतात युद्धात वापरण्यात अप्रशस्त असलेल्या बाणांचे वर्णन द्रोण्पर्वात आलेले आहे, ते पाहा.

न तत्रासीदधर्मिष्ठमशस्त्रं युद्धमेव च |
नात्र कर्णी न नालीको न लिप्तो न च वस्तकः ||

न सूची कपिशो नात्र न गवास्थिर्गजास्थिकः |
इषुरासीन्न संश्लिष्टो न पूतिर्न च जिह्मगः ||

ऋजून्येव विशुद्धानि सर्वे शस्त्राण्यधारयन् |
सुयुद्धेन पराँल्लोकानीप्सन्तः कीर्तिमेव च ||

तदासीत्तुमुलं युद्धं सर्वदोषविवर्जितम् |
चतुर्णां तव योधानां तैस्त्रिभिः पाण्डवैः सह ||

त्या ठिकाणी धर्माला सोडून आणि अप्रशस्त रितीचे युद्ध मुळीच झाले नाही. कर्णी (काटेरी), नालीक (छोटा परंतु खोलवर घुसणारा), लिप्त (विषाने माखलेला), बस्तिक (बस्तीत रुतून राहणारा), गवास्थि (गाईच्या हाडाप्रमाणे रुंद फाळ असलेला, गजास्थिज (हत्तीच्या हाडाप्रमाणे रुंद), संश्लिष्ट (दुहेरी जखम करणारा), पूति (दुर्गंधी किंवा जखम ज्यामुळे वाढते असा), किंवा जिह्यग (वक्र रेषेत जाणारा) असा कोणताही बाण वापरलेला नव्हता.

उचित युद्धाच्या द्वारा श्रेष्ठ लोकांची आणि लौकिकाची प्राप्ति करून घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या त्या सर्व वीरांनी सरळ आणि अत्यंत शुद्ध अशीच शस्त्रे धारण केली होती. त्यावेळी तुझ्या चार योद्ध्यांचे (हार्दिक्य कृतवर्मा आणि दुर्योधनाचे तीन भाऊ) त्या तीन पांडवांसह (धृष्टद्युम्न आणि नकुल,सहदेव) अत्यंत तुंबळ आणि सर्व दोषांपासून मुक्त असेच युद्ध झाले.

तत्कालीन राजांची दिनचर्या

शांतिपर्वात राजधर्माविषयी विपुल उपदेश असला तरी राजांची रोजची दिनचर्या कशी असावी हे त्यात येत नाही. मात्र ही दिनचर्या कशी असावी ह्याची कल्पना द्रोणपर्वात आलेल्या युधिष्ठिराच्या दिनचर्येवरून येते. ह्यातील काही अतिशयोक्त वर्णने वगळता तत्कालीन भरतखंडातील राजांची दिनचर्या काहीशी अशीच असावी, असे मानण्यास हरकत नसावी.

सञ्जय उवाच||

तयोः संवदतोरेव कृष्णदारुकयोस्तदा |
सात्यगाद्रजनी राजन्नथ राजान्वबुध्यत ||१||

पठन्ति पाणिस्वनिका मागधा मधुपर्किकाः |
वैतालिकाश्च सूताश्च तुष्टुवुः पुरुषर्षभम् ||२||

नर्तकाश्चाप्यनृत्यन्त जगुर्गीतानि गायकाः |
कुरुवंशस्तवार्थानि मधुरं रक्तकण्ठिनः ||३||

मृदङ्गा झर्झरा भेर्यः पणवानकगोमुखाः |
आडम्बराश्च शङ्खाश्च दुन्दुभ्यश्च महास्वनाः ||४||

एवमेतानि सर्वाणि तथान्यान्यपि भारत |
वादयन्ति स्म संहृष्टाः कुशलाः साधुशिक्षिताः ||५||

स मेघसमनिर्घोषो महाञ्शब्दोऽस्पृशद्दिवम् |
पार्थिवप्रवरं सुप्तं युधिष्ठिरमबोधयत् ||६||

प्रतिबुद्धः सुखं सुप्तो महार्हे शयनोत्तमे |
उत्थायावश्यकार्यार्थं ययौ स्नानगृहं ततः ||७||

ततः शुक्लाम्बराः स्नातास्तरुणाष्टोत्तरं शतम् |
स्नापकाः काञ्चनैः कुम्भैः पूर्णैः समुपतस्थिरे ||८||

भद्रासने सूपविष्टः परिधायाम्बरं लघु |
सस्नौ चन्दनसंयुक्तैः पानीयैरभिमन्त्रितैः ||९||

उत्सादितः कषायेण बलवद्भिः सुशिक्षितैः |
आप्लुतः साधिवासेन जलेन च सुगन्धिना ||१०||

हरिणा चन्दनेनाङ्गमनुलिप्य महाभुजः |
स्रग्वी चाक्लिष्टवसनः प्राङ्मुखः प्राञ्जलिः स्थितः ||११||

जजाप जप्यं कौन्तेयः सतां मार्गमनुष्ठितः |
ततोऽग्निशरणं दीप्तं प्रविवेश विनीतवत् ||१२||

समिद्धं स पवित्राभिरग्निमाहुतिभिस्तथा |
मन्त्रपूताभिरर्चित्वा निश्चक्राम गृहात्ततः ||१३||

द्वितीयां पुरुषव्याघ्रः कक्ष्यां निष्क्रम्य पार्थिवः |
तत्र वेदविदो विप्रानपश्यद्ब्राह्मणर्षभान् ||१४||

दान्तान्वेदव्रतस्नातान्स्नातानवभृथेषु च |
सहस्रानुचरान्सौरानष्टौ दशशतानि च ||१५||

अक्षतैः सुमनोभिश्च वाचयित्वा महाभुजः |
तान्द्विजान्मधुसर्पिर्भ्यां फलैः श्रेष्ठैः सुमङ्गलैः ||१६||

प्रादात्काञ्चनमेकैकं निष्कं विप्राय पाण्डवः |
अलङ्कृतं चाश्वशतं वासांसीष्टाश्च दक्षिणाः ||१७||

तथा गाः कपिला दोग्ध्रीः सर्षभाः पाण्डुनन्दनः |
हेमशृङ्गी रूप्यखुरा दत्त्वा चक्रे प्रदक्षिणम् ||१८||

स्वस्तिकान्वर्धमानांश्च नन्द्यावर्तांश्च काञ्चनान् |
माल्यं च जलकुम्भांश्च ज्वलितं च हुताशनम् ||१९||

पूर्णान्यक्षतपात्राणि रुचकान्रोचनांस्तथा |
स्वलङ्कृताः शुभाः कन्या दधिसर्पिर्मधूदकम् ||२०||

मङ्गल्यान्पक्षिणश्चैव यच्चान्यदपि पूजितम् |
दृष्ट्वा स्पृष्ट्वा च कौन्तेयो बाह्यां कक्ष्यामगात्ततः ||२१||

ततस्तस्य महाबाहोस्तिष्ठतः परिचारकाः |
सौवर्णं सर्वतोभद्रं मुक्तावैडूर्यमण्डितम् ||२२||

परार्ध्यास्तरणास्तीर्णं सोत्तरच्छदमृद्धिमत् |
विश्वकर्मकृतं दिव्यमुपजह्रुर्वरासनम् ||२३||

तत्र तस्योपविष्टस्य भूषणानि महात्मनः |
उपजह्रुर्महार्हाणि प्रेष्याः शुभ्राणि सर्वशः ||२४||

युक्ताभरणवेषस्य कौन्तेयस्य महात्मनः |
रूपमासीन्महाराज द्विषतां शोकवर्धनम् ||२५||

पाण्डरैश्चन्द्ररश्म्याभैर्हेमदण्डैश्च चामरैः |
दोधूयमानः शुशुभे विद्युद्भिरिव तोयदः ||२६||

संस्तूयमानः सूतैश्च वन्द्यमानश्च बन्दिभिः |
उपगीयमानो गन्धर्वैरास्ते स्म कुरुनन्दनः ||२७||

संजय म्हणतो -
हे राजा, कृष्ण आणि दारुक यांचे अशा रीतीने संभाषण चालू असता रात्र निघून गेली आणि नंतर पहाटे राजा युधिष्ठिर जागा झाला. हातांनी टाळ्या वाजवून गायकांनी, मागधांनी, मंगलकाव्ये म्हणणाऱ्या मधुपर्किकांनी, वैतालिकांनी (चारण)आणि सूतांनी काव्यपठण करून पुरुषश्रेष्ठ युधिष्ठिराला संतुष्ट केले. नर्तकांनीही नृत्य केले आणि मधुर आवाजाच्या गवयांनी कौरव वंशाच्या स्तुतिपर अशी गीते गोड गळ्याने गायली. मृदंग, झान्जा, भेरी, पणव, आनक (ढोल), गोमुख (ताशे), आडंबर (लहान ढोल), शंख, दुन्दुभी ही मोठ्या आवाजांची वाद्ये ही सर्व आणि इतरही वाद्ये अत्यंत आनंदित झालेल्या त्या वादकांनी वाजवली.

त्या मेघगर्जनेसारख्या प्रचंड आवाजाने गगनाला स्पर्श केला आणि झोपलेल्या राजांत श्रेष्ठ अशा युधिष्ठिराला जागे केले. अत्यंत मूल्यवान अशा उत्कृष्ट बिछान्यावर सुखाने झोपलेल्या आणि नंतर जागा झालेल्या राजाने उठून आवश्यक गोष्टींसाठी स्नानगृहाकडे प्रयाण केले.

नंतर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले, स्नान केलेले आणि तरुण असे एकशेआठ स्नान घालणारे स्नापक भरलेले सुवर्णाचे जलकुंभ घेऊन उपस्थित झाले. छोटेसे वस्त्र नेसून युधिष्ठिर भद्रासनावर (चौरंगावर) सुखासीन झाला आणि मंत्रयुक्त व चंदनमिश्रित उदकाने त्याने स्नान केले. सामर्थ्यपूर्ण आणि योग्य शिक्षण घेतलेल्या सेवकांनी औषधांच्या उटण्याने त्याच्या अंगाला मर्दन केले आणि सुगंधयुक्त पाण्याने त्याला सचैल स्नान घातले.

राजहंसासारखे शुभ्र सैलसर वस्त्र युधिष्ठिराने पाणी गाळून जाण्यासाठी मस्तकावर गुंडाळले. शरीराला हरीचंदनाचा लेप लावून, पुष्पमाला घालून आणि सुंदर वस्त्र नेसून महाबाहू युधिष्ठिर पूर्वेकडे तोंड करून हात जोडून बसला. सज्जनांचा मार्ग अनुसरणाऱ्या त्या कुंतीपुत्राने जप केला. नंतर अतिशय विनयाने त्याने प्रज्वलित अग्नी असलेल्या अग्निशालेत प्रवेश केला. पवित्र अशा समिधांनी आणि मंत्रानी पावन केलेल्या आहुतींनी अग्नीची पूजा करून नंतर तो त्या अग्निगृहातून बाहेर पडला.
त्यानंतर नरशार्दूल अशा त्या राजाने दुसऱ्या भागांत जाऊन वेदवेत्त्या आणि वयस्कर ब्राह्मणश्रेष्ठांचे दर्शन घेतले ते ब्राह्मण संयमी, वेदविद्येचे व्रत पूर्ण केलेले आणि अवभृतस्नान केलेले होते. तसेच सूर्योपासना करणारे असे दुसरे एक हजार आठ ब्राह्मण असून त्यांचे एक हजार सेवकही होते. त्यांना अक्षता आणि पुष्पे देऊन आणि स्वस्तिवाचन करावयास सांगून महाबाहू अशा त्या युधिष्ठिराने मध, घृत, तसेच उत्कृष्ट फळे देऊन शिवाय प्रत्येक ब्राह्मणाला एकेक सोन्याचे निष्क दान केले.

तसेच त्या पांडुपुत्राने त्या ब्राह्मणांना शृंगारलेले शंभर घोडे, वस्त्रे आणि त्यांना हव्या असलेल्या दक्षिणा, तसेच प्रदक्षिणा घालून भरपूर दूध देणाऱ्या पिंगट रंगाच्या सवत्स धेनूही दिल्या त्या गायींची शिंगे सुवर्णजडीत होती आणि त्यांचे खुर रुप्याने मढविलेले होते. त्याचप्रमाणे सोन्याची स्वस्तिके, भोजनपात्रे, अर्धपात्रे, तसेच पुष्पमाला, पाण्याच्या घागरी, प्रदीप्त अग्नी, शिगोशिग भरलेली अक्षतांची भांडी, महालंगे, रोचन आणि उत्कृष्ट अलंकार घातलेल्या शुभ्र कुमारी, दही, घृत, मध, जल, मंगलसूचक पक्षी आणि इतरही ज्या ज्या वस्तूंची पूजा केली होती, त्या सर्व वस्तूंचे दर्शन घेऊन आणि त्यांना स्पर्श करून कुंतीपुत्र युधिष्ठिराने बाहेरच्या भागात गमन केले.

या दुसऱ्या भागांत युधिष्ठिर उभा असतां सेवकांनी विश्वकर्म्याने बनविलेले उत्कृष्ट आणि दिव्य आसन त्याच्यापुढे मांडले. ते आसन सोन्याचे असून त्याचे नाव 'सर्वतोभद्र' असे होते. मोती आणि वैडुर्य यांनी ते जडविलेले होते. अत्यंत मूल्यवान अशा बैठकी त्यावर घातलेल्या होत्या, वर आच्छादन होते आणि ते आसन एकंदरीतच ऐश्वर्यसंपन्न होते.

तो महात्मा युधिष्ठिर त्या आसनावर विराजमान झाल्यानंतर सेवकांनी नाना तऱ्हांचे अत्यंत किंमती आणि शुभ्र धवल दागिने त्याच्यापुढे केले. महाराजा! मोत्यांची भूषणे धारण केलेल्या कुंतीपुत्र युधिष्ठिराचे सौंदर्य शत्रूच्या दुःखात भर घालणारेच ठरले. चंद्रकिरणांची शोभा धारण करणाऱ्या, सोन्याचे दंड असलेल्या आणि अत्यंत सुंदर अशा युधिष्ठिरावर ढाळल्या जाणाऱ्या चवऱ्यांनी तो विजांनी वेष्टिलेल्या मेघाप्रमाणे खुलून दिसला. सूत त्याचे स्तवन करीत होते. बंदीजन त्याला प्रणाम करत होते आणि गंधर्व त्यांची गीते गात होते. अशा तऱ्हेने कौरवपुत्र युधिष्ठिर तेथे सुखासीन झाला होता.

आतापर्यंत हे जे वर उल्लेखलेले आहे, ती महाभारतरूपी अथांग सागरातून काढलेली केवळ काही मोजकी रत्ने. महाभारत ही अशा रत्नांची खाणच आहे. हवी तितकी वेचून काढा, तरीही संपत नाहीत. त्यांचा केवळ अंश उपसणे हीच माझी मर्यादा. इतके बोलून विस्तारभयास्तव आता थांबतो.

संदर्भः

संस्कृत श्लोक- महाभारत भांडारकर संशोधित प्रत, कुंभकोणम प्रत. (https://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata)
मराठी अनुवाद - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी प्रत, चिपळूणकर मंडळी प्रत, किसारी मोहन गांगुलीकृत महाभारताचा इंग्रजी अनुवाद

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

2 Nov 2021 - 5:13 pm | सोत्रि

ऐन दिवाळीत 'सौदर्यस्थळं', तीही महाभारतातील म्हणून उत्सुक झालो. पण प्रचेतस नाव वाचून सौदर्यस्थळ काय असावीत याचा अंदाज आला. ;)

प्रचेतस यांनी निराश केले नाही!

- (सौदर्यस्थळ शोधणारा) सोकाजी

पाषाणभेद's picture

2 Nov 2021 - 6:47 pm | पाषाणभेद

अतिशय शांततेने वाचण्याजोगा माहितीपुर्ण लेख.
आता ओझरता वाचला अन आवाका लक्षात आला. सवडीने आस्वाद घेत वाचतो.
नंतर काही शंका असल्यास विचारतो.

लॉकडाऊन मधल्या वेळेचा सद उपयोग केला तुम्ही.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 1:54 pm | मुक्त विहारि

हेच लिहायला आलो होतो

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 5:38 pm | मुक्त विहारि

हेच लिहायला आलो होतो

असे लेखन शक्य नाही छान लेख .

सरनौबत's picture

2 Nov 2021 - 11:51 pm | सरनौबत

जबरदस्त अभ्यासपूर्ण लेख! शांतपणे आणि निवांतपणे पुनःपुन्हा वाचावा असा अप्रतिम

सुक्या's picture

3 Nov 2021 - 12:07 am | सुक्या

सुंदर . . लेख पुर्ण वाचला ... खुप वेळ लागला पण एका चांगल्या विषयावरील अभ्यासपुर्ण लेख वाचायला मजा आली ...

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Nov 2021 - 12:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

त्यांचा लेख वाचणे ही एक मेजवानीच असते.
ह्या माणसाने भांडारकरांचे महाभारत कोळून प्यायले आहे.
त्या शिवाय श्लोकांची अशी वर्गवारी लावता येणार नाही.
कुट श्लोक फारच आवडले, श्वेतकाकीयधर्मा चा अर्थ सहज समजण्यासारखा नाहीये

निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्यते वनम् |
याची प्रचिती सध्याच्या काळात येत आहे.

तस्मात्प्रत्यक्षदृष्टोऽपि युक्तमर्थः परीक्षितुम्
या करता "दिसते तसे नसते म्हणुन जग फसते" असे आता आपण म्हणतो

प्रत्येक दिवसांच्या व्युह रचनांचे वर्णन वाचताना मजा आली.

आतापर्यंत हे जे वर उल्लेखलेले आहे, ती महाभारतरूपी अथांग सागरातून काढलेली केवळ काही मोजकी रत्ने. महाभारत ही अशा रत्नांची खाणच आहे. हवी तितकी वेचून काढा, तरीही संपत नाहीत. त्यांचा केवळ अंश उपसणे हीच माझी मर्यादा. इतके बोलून विस्तारभयास्तव आता थांबतो.

याच्याशी शतशः सहमत, महाभारत खरोखरच अथांग आहे

पैजारबुवा,

चित्रगुप्त's picture

3 Nov 2021 - 1:00 pm | चित्रगुप्त

वल्ली, कमालीचा अभ्यासपूर्ण लेख. अफाट लेखन. तुमच्यासारखे लोक मिपावर सक्रीय आहेत हे मिपावाचकांचे परमभाग्य आहे.
हा लेख सावकाशीने समजून घेत घेत पुन्हा पुन्हा वाचायला हवा.
गजयुद्धाच्या शिल्पात वरल्या बाजूला असलेला उलटा हत्ती हा भीमाने फेकलेला आहे असे मानावे का ? गेल्या आठवड्यात मी फ्रान्समधील सुप्रसिद्ध 'लास्को' Lascaux या आदिमानवाने बनवलेल्या भित्तीचित्रांची गुफा बघून आलो आहे. त्यात फक्त एक घोडा असा उल्टा चित्रित केलेला आहे. त्याबद्दल विविध तर्क मांडण्यात आलेले आहेत. (मी पण एक मजेशीर तर्क केला आहे)
निरनिराळ्या प्रकारच्या ध्वजांची, बाणांची, व्यूहरचनांची यथायोग्य कल्पना देणारी चित्रे किंवा शिल्पे बघणात आली आहेत का? मला तशी रेखाटने करायला आवडेल. याबद्दल नंतर विचार करूया.
वाचनखूण साठवतो आहे. पुन्हा वाचून अजून लिहीन.

प्रचेतस's picture

3 Nov 2021 - 5:21 pm | प्रचेतस

धन्यवाद काका.

गजयुद्धाच्या शिल्पात वरल्या बाजूला असलेला उलटा हत्ती हा भीमाने फेकलेला आहे असे मानावे का

हो, द्रोणपर्वात भीमाने हत्ती उचलून फेकून दिल्याची वर्णने आली आहेत. शिवाय हे शिल्प झूम करुन पाहिल्यास हत्तीच्या पायाभोवती भीमाच्या हाताची मूठ दिसेल. हाताचा अर्धा पुढचा भाग हा मूर्तीभंजकांनी भग्न केला आहे.

बाकी लास्को गुहेबद्दल अवश्य लिहा.

निरनिराळ्या प्रकारच्या ध्वजांची, बाणांची, व्यूहरचनांची यथायोग्य कल्पना देणारी चित्रे किंवा शिल्पे बघणात आली आहेत का?

बाणांची वेगवेगळी रचना तर बर्‍याच ठिकाणी दिसते. व्यूहांची चक्रव्यूह सोडून इतर रचना दिसत नाही शिवाय चक्रव्यूहांची जी शिल्पे आहेत ती लॅब्रियान्थ स्वरुपाची आहे त्यात आरे दिसत नाहीत. महाभारतात उल्लेख आलेली व्यूहरचना आरांच्या (नेहमीच्या चाकांच्या) स्वरुपाची आहे.

अत्यंत अभ्यासपूर्ण आणि उत्कृष्ट लेखन. प्रचु रॉक्स..

Bhakti's picture

3 Nov 2021 - 2:23 pm | Bhakti

खरच महाभारतातील हे विविध रत्नांची खाण असलेले श्लोक आणि तुम्ही पेरलेले सरल शब्दमोती,असा सुंदर अलंकार असा हा लेख आहे.

सौंदाळा's picture

3 Nov 2021 - 3:06 pm | सौंदाळा

उत्तम माहितीचा खजिना.
लेख ३ टप्प्यात वाचला. या विषयावर अजुन लिहा ही विनंती

नीलकंठ देशमुख's picture

3 Nov 2021 - 3:39 pm | नीलकंठ देशमुख

माहितीपूर्ण लेख.ओझरता वाचला
खूप अभ्यास आहे हे दिसतेच आहे. निवांत पणे वाचायला
हवा .ग्रेट

गामा पैलवान's picture

3 Nov 2021 - 3:43 pm | गामा पैलवान

प्रचेतस,

अप्रतिम लेख. तुमचा दांडगा व्यासंग स्पष्ट दिसतो. आभार! :-)

श्वेतकाक संबंधी एक शंका आहे. श्वा + एत ही संधी श्वैत होणार ना ?

आजूनेक शंका आहे. मी ही सध्या जमेल तसं महाभारत वाचतोय. अशोक कोठारेंनी अनुवादित केलंय. इथे खंड उपलब्ध आहेत : http://www.esahity.com/23092343238123512366234023812350.html

या खंडांच्या अनुवादात गोमांसभक्षणाचे अनेक उल्लेख आले आहेत. हे पितरांचं आवडतं खाद्य असल्याने ब्राह्मणांना खावं लागतं, असंही वर्णन आहे. ब्राह्मणांना यज्ञासाठी मांस लागतं हे ऐकून होतो. परंतु गोमांसासंबंधी इतका स्पष्ट उल्लेख फक्त कोठारेंच्या अनवट प्रतींतच सापडला.

तर प्रश्न असा की प्राचीन काळी ब्राह्मण मांस खात होते का? हे मांसभक्षण यज्ञाच्या वेळेस त्यापुरतं मर्यादित होतं की इतर वेळेसही खाल्लं जायचं? तसंच मांस आवडतं म्हणून खाणं वेगळं आणि यज्ञात आहुती दिलेल्या पशूच्या शरीरातला विशिष्ट भाग ( उदा. : प्लीहा ) खाणं वेगळं. यासंबंधी काही निर्देश आढळतो का?

धर्मव्याध कत्तल केलेल्या पशूंचे मांस प्रथम ब्राह्मणांना देत असे, असा उल्लेख आहे. तो कितपत खरा धरायचा?

आ.न.,
-गा.पै.

प्रचेतस's picture

3 Nov 2021 - 5:44 pm | प्रचेतस

श्वेतकाक संबंधी एक शंका आहे. श्वा + एत ही संधी श्वैत होणार ना ?

माझ्या मते श्व नसून श्वा असल्यामुळे श्वा एत = श्वेत असे होत असावे. व्याकरणाची पुस्तके बघावी लागतील असे दिसते. मात्र संस्कृत स्रोतांत श्वेतकाकीय असाच उल्लेख आहे.

प्राचीन काळी ब्राह्मण मांस खात होते का?

हो नक्कीच खात होते. गवालंभ (गोहत्या) सर्रास होत असे. मात्र महाभारतकाळात काळात गोमांसभक्षण कमी होऊन लोक इतर मांसभक्षणाकडे वळले असे मानता यावे.
रंतिदेवाच्या लग्नात गवालंभाचे वर्णन आहे. युधिष्ठिराने केलेल्या अश्वमेधात तसेच सभापर्वात ब्राह्मणांना पशूंच्या मांसाने तृप्त केल्याची वर्णने आहेत. ब्राह्मण मांसभक्षण कधीही करीत असत मात्र यज्ञाच्या वेळी हे शास्त्रसंमत आणि उचित असे. शांतिपर्वात मात्र मांसभक्षणाचे समर्थन आणि लगेचच त्याचा निषेध हे दोन्ही आलेले आहेत, शिवाय अहिंसेचा पुरस्कार आलेला आहे जो जैन बुद्ध धर्मानंतर आलेला दिसतो. यज्ञातील हवन केलेल्या पशूचा विशिष्ट भाग खाण्याबद्द्ल असे उल्लेख नाहीत, हवि देऊन उरलेला भाग खाणे हेच शास्त्रसंमत असे, मात्र युधिष्ठिराच्या अश्वमेधाच्या वर्णनात अश्वाची वपा (आतडी) काढून तिचा वास घेतल्याचे वर्णन आहे. महाभारत काळात मात्र ब्राह्मण मांसभक्षण करत असत हे निर्विवाद.

धर्मव्याध कत्तल केलेल्या पशूंचे मांस प्रथम ब्राह्मणांना देत असे, असा उल्लेख आहे. तो कितपत खरा धरायचा?

धर्मव्याधाच्या कथेत तसा उल्लेख नाही असे वाटते. कथा परत एकदा वाचावी लागेल. एक मात्र नक्की व्याध मांस विक्री करत असे, स्वतः मात्र खात नसे.

गामा पैलवान's picture

8 Nov 2021 - 3:41 am | गामा पैलवान

प्रचेतस,

पहिल्याप्रथम विलंबाने प्रतिसाद देतोय म्हणून क्षमा असावी. विषयाला धरून नसलेल्या शंकेचं समाधान केल्याबद्दल आभार.

माझ्या मते ज्या पशूचं दूध पितात त्याचं मांसभक्षण निषिद्ध असावं. पण या दाव्याच्या पुष्ट्यर्थ माझ्याकडे कसलाही संदर्भ नाही. तुमच्यासारख्या जाणकारांनी प्रकाश टाका तरंच तड लागेल.

आ.न.,
-गा.पै.

प्रचेतस's picture

15 Nov 2021 - 10:22 am | प्रचेतस

माझ्या मते ज्या पशूचं दूध पितात त्याचं मांसभक्षण निषिद्ध असावं.

हे मी तरी कुठे वाचलेलं नाही मात्र महाभारतात गोमांसभक्षणाची कित्येक उदाहरणे आहेत. मात्र प्रत्यक्ष त्याकाळी गोहत्येचे प्रमाण बरेच घटले असावे असे वाटते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Nov 2021 - 5:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

मला लेख वाचतानाच दम लागला, आणि तुम्ही महाभारत वाचताय? अर्थात वल्ली म्हणजे अभ्यासपुर्ण लेखन वाचायला मिळणार ह्याची हमीच असते. मग हा लेखही त्याला अपवाद कसा असेल?
एकदा वाचुन समजत नाहिये(अर्थात दोष माझाच आहे), सवडीने पुन्हा २-३ वेळा वाचीन.

श्रीगुरुजी's picture

3 Nov 2021 - 5:41 pm | श्रीगुरुजी

अत्यंत व्यासंगी लेखन!

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Nov 2021 - 6:18 pm | ॲबसेंट माइंडेड ...

खुप अभ्यासपुर्ण लेख. फार आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2021 - 1:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस सर, अतिशय अभ्यासपूर्ण केलेलं लेखन आहे. महाभारतासारख्या किंचित रुक्ष वाटणा-या विषयाला इतक्या तन्मयतेने वाचणे, समजून घेणे आणि त्याचा अर्थ काढून माहितीपूर्ण लेखन करणे याला खूप संयम लागतो. अभ्यास लागतो आणि तितकीच त्या विषयाची गोडी लागते. आपलं लेखन मी दोनदा वाचलं आहे. आपला अभ्यासाचा आवाका मोठा आहे. अनेक माहिती नवनवी कळते. आमच्यासारख्या अशा लेखनापासून दुर राहू पाहणा-या वाचकाची महाभारताची जिज्ञासा वाढवते. तहे दिलसे शुक्रीया प्रचेतसेठ.

महाभारतातील ती पात्रे, युद्धरचना, ते कौशल्य ते शस्त्र, राजांच्या दिनचर्या. अगदी तपशीलवार माहिती मिळते. महाभारतातील अर्जूनालाच कृष्ण उपदेश करतो असे ऐकलेले पण त्याने विराटपर्वात दुर्योधनालाही असा उपदेश केलेला दिसतो ही माहिती मला नवीन होती. ढोबळपणाने जीतकी माहिती महाभारताबद्दल असते ती सोडून. लेखातील सर्वच माहिती नवीनच आहे. भिमाने केलेले गजयुद्ध, व्यव्हरचना. शिल्पचित्रे त्यातले तपशील युद्धपुरक आणि त्याची माहिती देणारी वाटली. माझ्याकडून वाचण्यात निसटले असेल तर अभिमन्यु कोणत्या व्ह्यू रचनेत अडकला. आणि सांगोवांगी ज्या गोष्टी ऐकण्यात येतात की त्याने उदरात असतांना अर्धवट युद्ध रचनेबद्दल ऐकलेले त्यामुळे तो अडकला त्याबद्दल अजून काही पुरक शिल्पे आणि माहिती असेल तर नक्की द्यावी.

बाकी त्या काळात असलेली फळांबद्दल माहिती आपण दिलेली आहेत. धान्य म्हणून काय होते त्याची माहिती दिसली नाही त्याबद्दल काही उल्लेख असेल तर नक्की सांगावीत. सैन्य ते, भाते, बाण, असलेले ध्वजवर्णने. सगळंच अद्भूत आहे, कदाचित आपल्या लेखनातील काही सौंदर्यस्थळे आपलं कौतुक करतांना सुटली असेल पण लेखन खुपच माहितीपूर्ण झाले आहे, लेखनाने खुप आनंद दिला. मनापासून आभार. ग्रेट. लिहिते राहा वल्लीसेठ.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

8 Nov 2021 - 7:44 am | तुषार काळभोर

अजून काय लिहिणे... कौतुक करण्यास सर समर्थ आहेत.

प्रचेतस's picture

15 Nov 2021 - 10:19 am | प्रचेतस

अभिमन्यु कोणत्या व्ह्यू रचनेत अडकला. आणि सांगोवांगी ज्या गोष्टी ऐकण्यात येतात की त्याने उदरात असतांना अर्धवट युद्ध रचनेबद्दल ऐकलेले त्यामुळे तो अडकला त्याबद्दल अजून काही पुरक शिल्पे आणि माहिती असेल तर नक्की द्यावी.

अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला होता. चक्रव्यूहाचा भेद फक्त श्रीकृष्ण, अर्जुन, प्रद्युम्न आणि अभिमन्यू इतकेच योद्धे जाणत होते. प्रद्युम्न युद्धात सहभागी नव्हताच, अर्जुनाला संशप्तकांनी युद्धाचे आव्हान देऊन कृष्णार्जुनांना मुख्य रणभूमीपासून दूरवर नेले होते त्यामुळे उरला फक्त अभिमन्यू, त्याने चक्रव्यूहाचा भेद केलाच मात्र शंकराच्या वरदानामुळे जयद्रथाने इतर पांडवांना अडवले व त्यांना आत शिरता आले नाही. त्याने उदरात असताना अर्धवट युद्ध रचनेबद्दल ऐकले होते हे महाभारतात आहेच मात्र ते प्रक्षिप्त असावेसे वाटते.

धान्य म्हणून काय होते त्याची माहिती दिसली नाही त्याबद्दल काही उल्लेख असेल तर नक्की सांगावीत

धान्याची वर्णने महाभारतात पुष्कळ आहेत.

श्राद्धविधीस वर्ज्य असलेले पदार्थ शांतीपर्वात येतात. पुलाव हा फारसी/अरबी शब्द असे आपण मानतो मात्र ह्याच पुलाव सदृश पदार्थाचे वर्णन यात आले आहे. पुलक ह्या शब्दाद्वारे.

अश्राद्धेयानि धान्यानि कोद्रवाः पुलकास्तथा |
हिङ्गु द्रव्येषु शाकेषु पलाण्डुं लशुनं तथा ||

श्राद्धविधीस धान्यांमध्ये (धान्यांपासून तयार केलेले) कोद्रव आणि पुलक आणि मसाल्यांमध्ये कांदा लसूण हे वर्ज्य समजावेत.
कोद्रव आणि पुलक हे भातापासून तयार केलेले पदार्थ आहेत.

आश्वमेधिकपर्वात युधिष्ठिराच्या अश्वमेधात कुठले भोजन बनत होते ह्याचे वर्णन आले आहे.

भक्ष्यखाण्डवरागाणां क्रियतां भुज्यतामिति |
पशूनां वध्यतां चापि नान्तस्तत्र स्म दृश्यते ||

यज्ञात खांडवराग करण्यात किती माणसे गुंतली होती आणि किती पशूंचा वध होत होता ह्याचा थांगच लागत नव्हता.

खांडवराग- हरीण, वराहादी पशूंचे मांस आणि कंदमूळे, फळे वगैरे दूध दही तूपाच्या मिश्रणात कालवून तयार केलेला एक विशिष्ट पदार्थ.

उद्योगपर्वात विविध सामाजिक आणि आर्थिक स्थिती असलेल्या लोकांच्या खाद्यांचे वर्णन आले आहे.

आढ्यानां मांसपरमं मध्यानां गोरसोत्तरम् |
तैलोत्तरं दरिद्राणां भोजनं भरतर्षभ ||

श्रीमंतांचे अन्न मुख्यतः मांसापासून तयार केलेले पदार्थ असतात, मध्यमवर्गीयांना गोरसापासून तयार केलेले पदार्थ म्हणजे दूध, दही तूप वगैरे तर गरीब लोक मुख्यतः तेलापासून तयार केलेले पदार्थ खातात.

ह्याशिवाय महाभारतात कित्येक ठिकाणी यव (जवस), तांदूळ, सातू, गव्हापासून केलेल्या पदार्थांचे वर्णन आलेले आहे. अश्वत्थामा पाण्यात सातूचे पीठ मिसळून केलेला पदार्थ दूध समजून पीत असे हे तर बहुतेकांना परिचित आहेच.

जेम्स वांड's picture

6 Nov 2021 - 2:14 pm | जेम्स वांड

महाभारतातील सौंदर्यस्थळे दाखवण्याच्या नादात तुम्ही चक्क मिपाला एक सौंदर्यस्थल बहाल केलेत.

हे सौंदर्यस्थल कृष्णाप्रमाणे ज्ञानी व धीरगंभीर आहे, अर्जुनाप्रमाणे तळपणारे आहे, भीष्म- विदुरासम ज्ञानी आहे, कर्णाप्रमाणे तेजोनिधी आहे, कुंती प्रमाणे सात्विक आहे, भीमप्रमाणे सशक्त आहे आणि वेदव्यास मुनींप्रमाणे व्यासंगी आहे.

जबरदस्त लेख.

अजून अजून लिहा की देवाहो, खरोखर फंडू लेख, तुमचे लेखन अन देवदत्त पटनाईकचे नरेशन असा एक कार्यक्रम जर बघितला ऐकला तर मी त्यानंतरच्या क्षणी सुखासुखी मरायलाही तयार असेन ह्याहून जास्त मला काही म्हणायचे नाहीए.

:)

- (आयुष्याच्या कुरुक्षेत्रीचा योद्धा) वांडो

प्राची अश्विनी's picture

10 Nov 2021 - 2:04 am | प्राची अश्विनी

किती अभ्यासपूर्ण लेख! संग्रही ठेवतेय हा. असेच लिहित रहा.

अनन्त अवधुत's picture

10 Nov 2021 - 4:28 am | अनन्त अवधुत

अत्यंत अभ्यासपूर्ण लेख.

महाभारत ही अशा रत्नांची खाणच आहे.

हालेख पण दिवाळी अंकातले एक रत्न आहे, परत परत पहावे असे.

युगंधर मध्ये शिवाजी सावंतांनी सगळ्या १८ दिवसांच्या व्यूहांची माहिती दिली आहे. लेख वाचून आठवले.

मित्रहो's picture

10 Nov 2021 - 12:17 pm | मित्रहो

आधी वाचनखूण साठविली आणि मग संपूर्ण लेख वाचला. बापरे काय काम केले आहे. पहिल्याच श्लोकाचा

धनुर्धराने सोडलेला बाण एकालाच ठार करील किंवा करणारही नाही, परंतु एखाद्या मुत्सद्द्याची बुद्धी सर्व राष्ट्राचा विनाश करते

अर्थ वाचला जागा झालो. केवढ मोठ काम केले आहे. त्या साऱ्या व्यूहरचना, भीमाचे गजयुद्ध सारीच माहिती कशी इंटरे्टींग आहे.
खूप खूप धन्यवाद हा लेख म्हणजे मिपाचा कधी खजिना करायचा झाला तर त्यातला खूप मौल्यवाण हिरा आहे.

उत्तम माहितीपूर्ण लिखाण ! सवड मिळताच पुन्हा शांतपणे वाचीन.

बाकी महाभारत या विषयामुळे मी काही काळापूर्वी डॉ. हिम्मत सिंग यांचा कुरुक्षेत्रावरील अभ्यासा वरचा व्हिडियो पाहिला होता तो इथे देतो. [ हा व्हिडियो परत शोधताना त्यांचाच दुसरा व्हिडियो देखील मिळाला तो देखील इथे देत आहे. ]

मदनबाण.....

अनिंद्य's picture

12 Nov 2021 - 1:17 pm | अनिंद्य

@ प्रचेतस,

भरजरी लेख !

या सृष्टीत आहे ते सर्व महाभारतात आहे आणि जे इथे लिहिले नाही ते सृष्टीतही नाही असा काहीसा श्लोक आहे ना ? ते पूर्ण पटावे एवढे विषयाचे वैविध्य तुम्ही रेखाटले आहे.

सरोवरातील जलचर आणि वनसृष्टीची वर्णनं, युधिष्ठराची दिनचर्या विशेष आवडली.

पु ले शु

कुमार१'s picture

12 Nov 2021 - 4:25 pm | कुमार१

उत्तम माहितीपूर्ण लिखाण

अभिजीत अवलिया's picture

12 Nov 2021 - 9:15 pm | अभिजीत अवलिया

अतिशय अभ्यासपूर्ण लेख

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2021 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा

अभ्यासु आगोबाचा ,अभ्यासू लेख. :)

सुखी's picture

13 Nov 2021 - 12:39 pm | सुखी

अप्रतिम लेख __/\__

चौथा कोनाडा's picture

13 Nov 2021 - 5:04 pm | चौथा कोनाडा

खुप माहितीपूर्ण लेख ! लेखातले श्लोक आणि तपशिल थक्क करुन जातात !
🙏
प्रचेतस सर _/\_

नूतन's picture

14 Nov 2021 - 1:15 am | नूतन

अतिशय माहितीपूर्ण आणि समजेल असं लिहिलं आहे. सावकाशपणे पुन्हा पुन्हा वाचावा म्हणून वाचनखूण साठवली आहे .

प्रचेतस's picture

15 Nov 2021 - 10:23 am | प्रचेतस

सर्वांचे मनःपूर्वक आभार.

जुइ's picture

16 Nov 2021 - 2:04 am | जुइ

महाभारतातील युद्धाची तयारी आणि व्यूह रचनेची वर्णन आवडले. लेख अतिशय माहितीपूर्ण झाला आहे.

कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2021 - 6:39 pm | कर्नलतपस्वी

आभ्यास तुम्ही केलात पण आम्हा वाचकांच्या ज्ञानात भर पडली. एक लेख जो संग्रही ठेऊन नतंर रवंथ करावयास हवे. एक दोन वाचनात काम भागणार नाही. तुम्ही एक वेगळाच दृष्टिकोन उजागर केलात त्याबद्दल धन्यवाद. मी लेख काँपी करून पुन्हा शांतपणे वाचणार आहे.

टर्मीनेटर's picture

1 Dec 2021 - 4:52 pm | टर्मीनेटर

अतिशय अभ्यासपुर्ण लेख 👍

अर्जुनाच्या गांडीव धनुष्याची निर्मिती, श्वेतकाकीयधर्म, व्यूहरचना, युद्धात वापरण्यास अप्रशस्त असलेल्या बाणांचे वर्णन ही माहिती विशेष आवडली.

“आतापर्यंत हे जे वर उल्लेखलेले आहे, ती महाभारतरूपी अथांग सागरातून काढलेली केवळ काही मोजकी रत्ने. महाभारत ही अशा रत्नांची खाणच आहे. हवी तितकी वेचून काढा, तरीही संपत नाहीत. त्यांचा केवळ अंश उपसणे हीच माझी मर्यादा. इतके बोलून विस्तारभयास्तव आता थांबतो.”

ह्या लेखासाठी विस्तारभय वाटणे ठीक आहे, पण आता महाभारतावर एक मालिका लिहुन त्या खाणीतील अन्य रत्नांचीही ओळख आम्हा वाचकांना करून द्यावी अशी तुम्हाला आग्रहाची विनंती 🙏

आघी लेख वरवर वाचला होता पण नीट निवांतपणे वाचुन, समजुन मग प्रतिसाद देण्यासारखे लेखन असल्याने प्रतिसाद देण्यास उशीर झाला!