शिक्षण दोन प्रकारे होत असतं - औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिक म्हणजे शाळा व महाविद्यालयात होणारे. ह्या प्रकारात शिस्त असते आणि ते आखीव पद्धतीने दिले जाते. पण याची एक मर्यादाही असते. ती म्हणजे " ऐका, पाठ करा आणि परीक्षेत उतरवा" या त्रिसूत्रीवर ते चालते. त्यात निरीक्षण आणि चौकसपणा यांना फारसे स्थान नसते. हे शिक्षण ठराविक वयोमर्यादेत होते.
याउलट अनौपचारिक शिक्षणाचे आहे. ते समाजात वावरताना सतत होऊ शकते. त्याला कुठलीही वयोमर्यादा नाही; किंबहुना ते आयुष्यभर चालू राहते. ते घेण्यासाठी इच्छाशक्ती हा एकच गुण पुरेसा असतो.
आता या धाग्याचा हेतू सांगतो.
समाजात आपला अनेकांशी कामानिमित्त संपर्क येतो. त्यातल्या प्रत्येकाचे अनुभवविश्व वेगवेगळे असते. त्यानुसार प्रत्येकाकडे दुसऱ्याला सांगण्यासारखी कुठली ना कुठली उपयुक्त माहिती असते. काही प्रसंगात आपण अशा माहितीचे आदानप्रदान सहज करू शकतो - अगदी गप्पा मारता मारता. आता अशा नव्याने कळलेल्या माहितीचा स्वीकार आणि उपयोग करायचा की नाही, हे मात्र संबंधित व्यक्तीवर अवलंबून असते. काही जण असा स्वीकार करून ती शिकलेली गोष्ट आचरणात आणतात, तर अन्य काही त्याकडे सरळ दुर्लक्ष करतात. एवढेच नाही, तर काही जण सांगणाऱ्या व्यक्तीस नाउमेद देखील करतात.
या संदर्भात माझे काही अनुभव सांगतो.
१. रिक्षाने चाललो होतो. एका मोठ्या चौकात ती सिग्नलला थांबली. इथला सिग्नल पुन्हा हिरवा होण्याचा कालावधी तीन मिनिटे होता. माझ्या चालकाने इंजिन चालू ठेवले होते आणि गाडी न्यूट्रलला आणली होती. तरीसुद्धा त्याने डाव्या हाताने क्लच पूर्ण दाबून ठेवला होता. अशा विनाकारण दाबून ठेवण्याने इंधन जास्त जळते असे मी एका लेखात वाचले होते.. गाडी न्यूट्रलला असल्याने एकतर पुन्हा क्लच दाबायची गरज नव्हतीच. त्यात अशा कृतीने आपण हाताच्या बोटांनाही उगाच ताण देतो. म्हणून सहज ती गोष्ट या चालकांना सांगितली. पण त्यांनी काही माझे ऐकले नाही. उलट "काही फरक पडत नाही हो त्याने" ,असे मला सुनावले. अर्थातच मी गप्प बसलो.
२. कार्यालयातील हा एक प्रसंग. काही कारणाने एका कार्यपुस्तिकेतील ३० पानांच्या छायाप्रती काढायच्या होत्या. मी एका कारकुनास ते सांगितले. पुस्तिका त्यांचे हाती देत म्हणालो, " झेरॉक्स काढताना त्या पाठपोट काढा म्हणजे १५ कागदांत काम होईल". माझा सांगण्याचा हेतू हा की १५ कागद वाचवावेत. त्या गृहस्थांना काही ते पटले नाही. ते लगेच मला म्हणाले, " अहो, जरी पाठपोट प्रती काढल्या तरी तो माणूस पैसे तेवढेच घेणार ना; मग आपण कशाला त्याचा कागद वाचवायचा ?" आता मी पुढे काहीही न बोलता गप्प बसलो. कागदाची बचत म्हणजे वृक्षांची बचत, असली बडबड त्यांच्यापुढे करण्यात अर्थ नव्हता !
….
आता एका प्रसंगात मला कसे शिकायला मिळाले ते सांगतो. टुरिस्ट कारने प्रवास करीत होतो. एकीकडे चालकाशी गप्पा. त्यांचे शालेय शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले होते. पुढे परिस्थितीमुळे ते थांबवून बरीच अंगमेहनतीची कामे करीत ते मोठे झाले. आता जिद्दीने २ कारचे मालक झाले होते. त्यातली एक ते स्वतः चालवायचे तर दुसरीवर नोकर चालक ठेवला होता. त्या नोकराचे काही लबाडीचे अनुभव ते मला सांगत होते. दिवसअखेरीस तो गाडीतील गिऱ्हाईक पोचवून या मालकांना गाडी परत देई. असे काही नोकर एव्हाना बदलून झाले होते. हे नोकर त्यांच्या प्रवासातील गाडीच्या छोट्यामोठ्या खोट्या तक्रारी सांगत आणि दुरुस्तीसाठी पदरचे पैसे घातल्याचे सांगून ते मालकाकडून उकळत. त्यापैकी एक ठरलेली थाप म्हणजे एक चाक पंक्चर झाल्याची. त्याचे सहसा बिल मिळत नाही आणि मालक कशी खातरजमा करेल ? या गाड्यांचे स्पेअर चाकही तसे जुनेच झालेले असते.
सुरवातीस मालकांनी नोकरावर विश्वास ठेवून त्याला पंक्चर चे पैसे दिले. मात्र वारंवार असे होऊ लागल्यावर ते शहाणे झाले ! आता ते नोकरास गाडी सोपविण्याआधीच चारही चाकांच्या आतल्या बाजूस विशिष्ट ठिकाणी खूण करून ठेवतात. जर का खऱ्या पंक्चरसाठी चाक उतरवले तर ती खूण खात्रीने पुसली जाते. अशा प्रकारे पंक्चरचा खरेखोटेपणा सिद्ध होतो.
वरवर दिसायला किती साधी गोष्ट आहे ही. पण ते ती अनुभवातून शिकले होते आणि ती ऐकून माझेही बसल्याबसल्या शिक्षण झाले. हे खरे अनुभवजन्य शिक्षण.
…….
तुमच्यापैकी अनेकांना असे दोन्ही प्रकारचे अनुभव आले असतील- अनौपचारिक शिकण्याचे आणि शिकविण्याचे. ते इथे जरूर लिहा. त्यातून आपल्या सर्वांचेच अजून शिक्षण होईल ही आशा आहे.
*******************
प्रतिक्रिया
16 Oct 2019 - 5:58 pm | कंजूस
शिकायचंच नाही त्याला शिकवता येत नाही.
16 Oct 2019 - 7:53 pm | सुबोध खरे
१) गाडी न्यूट्रल ला असताना क्लच दाबून ठेवला तर इंधन जास्त जळत नाही. हातावर ताण येतो हे बरोबर.
२) माझ्या एका मित्राचा ट्रकचा व्यवसाय आहे.त्याचे टाटा टॉरस नावाचे तीन ऍक्सलचे ट्रक आहेत. सुरुवातीला त्याचे चालक त्याला शेंड्या लावत असत. तो पण अनुभवातून शिकला याचे एक उदाहरण. माझ्या समोरच त्याला त्याच्या एका चालकाचा फोन आला साहेब ट्रक चा ऍक्सल मोडला त्याचे १५००० रुपये होतील. याने त्याला विचारले तू कुठे आहेस? तो म्हणाला खंडाळा घाटाच्या सुरुवातीला. हा म्हणाला तू तिथेच थांब मी येतो २ तासात.
आणि हा शांत पणे माझ्याशी गप्पा मारू लागला. मी त्याला विचारले अरे तुला जायचे नाही का? तो म्हणाल थांब जरा काय घाई आहे?
दहा पंधरा मिनिटात त्या चालकाचा फोन आला साहेब ते मेकॅनिकने अड्जस्ट केले आहे ८०० रुपये होतील. हा म्हणाला करून घे.
मित्र मला म्हणाला सुरुवातीला हे चालक लोक मला शेंडी लावायचे आता मी पण शिकलो आहे. मी तिथे येतो म्हणल्यावर त्याने सारवासारव केली.
लोक तुम्हाला शेंड्या लावायला टपलेले आहेत अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत
पुन्हा केंव्हा तरी.
16 Oct 2019 - 10:24 pm | सुचिता१
सुरस, रम्य कथा वाचायला आवडेल.
16 Oct 2019 - 10:49 pm | तुषार काळभोर
अगदी असाच अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.
पंधरा सोळा वर्षांपूर्वी आमच्या घरी ११०९ ट्रक होता. एकदा ट्रक ची ट्रिप नाशिक बाजूला गेलेली असताना ड्रायव्हरचा फोन आला, की ट्रक घाटातून खाली उतरताना रस्त्याच्या कडेला पलटी झालेला आहे. क्रेन बोलावून सरळ करावा लागेल. पंधरा वीस हजार रुपये खर्च होईल.
माझ्या मोठ्या भावाने त्याला सांगितलं की मी गाडी घेऊन निघतोय, तीन चार तासांमध्ये पोहचतो तिथे. त्यावेळी मात्र माझ्या भावाला या गोष्टी माहिती नव्हत्या. त्यामुळे त्याला ते खरं वाटलं होतं आणि तो खरोखर निघाला होता. पण गाडीची व्यवस्था करेपर्यंत अर्धा तास लागला. थोड्यावेळाने ड्रायव्हरचा फोन आला, की एक ट्रॅक्टर चालला होता. त्याच्या मदतीने दोरी बांधून ट्रक सरळ केलेला आहे. आणि मी आता पुढे निघालो आहे.
विशेष म्हणजे, परत आल्यानंतर पाहिलं तर ट्रक वर एक ओरखडा सुद्धा नव्हता. याविषयी ड्रायव्हरला विचारले तर त्याचे स्पष्टीकरण होतं, हे रस्त्याच्या कडेला गवतामध्ये पलटी झाल्यामुळे गाडीचं काहीच नुकसान नाही झालं.
वाहतूक व्यवसायचा कसलाच अनुभव नसल्याने अशा गोष्टी काही वेळा घडल्या आणि अर्थातच दोन-तीन वर्षांनंतर हा व्यवसाय बंद करावा लागला.
17 Oct 2019 - 8:14 am | गवि
अगदी. हेच म्हणणार होतो.
पण महत्वाची बाजू अशी की सिग्नलवर, न्यूट्रलला असताना जो क्लच दाबून बसतो त्याला ती सवयच असणार. हीच गोष्ट कार, बस यांच्या क्लचवर काही प्रमाणात पाय ठेवून चालवणाऱ्या लोकांसाठी लागू. वाहन पळत असताना ही सवय अधिक इंधन खाण्यास कारण ठरते हा महत्वाचा मुद्दा. तेव्हा बेस्टच्या बसेसमध्ये ड्रायव्हर केबिनमध्ये लिहिलेलं असतं "क्लचवरील पाय उठवा" ते सवय मोडण्याच्या दृष्टीने.
17 Oct 2019 - 9:27 am | गवि
काही कार मॉडेल्समध्ये क्लचच्या बाजूला सोयीचे रेस्ट पेडल देतात ते बरं पडतं.
16 Oct 2019 - 8:26 pm | कुमार१
असे मी एका पर्यावरण लेखात वाचले होते. तज्ज्ञांचे मत वाचायला आवडेल.
16 Oct 2019 - 8:28 pm | कंजूस
ट्रकचा मालक, गंडवणारा पगारी नोकर हा फार्मुला सरदार लोक अजिबात वापरत नाहीत. कारण स्वत:ची वस्तू म्हटली की ती व्यक्ती अगदी जपून वापरते, दुसऱ्याची वापरताना बेपर्वा राहते .
16 Oct 2019 - 8:35 pm | सुबोध खरे
ट्रकचा ताफा असेल तर मालक स्वतः किती चालवणार?
अन ट्रक चालवणे हि सोपी गोष्ट नाही.
मालक लोक व्यवसाय वाढला कि सहसा स्वतः ट्रक चालवतच नाहीत
17 Oct 2019 - 12:39 am | जॉनविक्क
जी फुकट शिकायला लागते/ मिळते त्याला अहंकार दुखावला जाण्याची हलकीशी झालर असतेच असते त्यामुळे मी शिकवायच्या फँदात न पडता समोरच्याची फजिती करणे हाच हेतू अधून मधून ठेवतो.
पोजिटिव्ह थापेबाजीपेक्षा निगेटिव्ह सुस्पष्टतेल सामोरे जाणे मला जास्त पसंत आहे( हे विधान राजकीय अर्थाने केलेले नाही याची सुज्ञ नसणार्यांनी कृपया नोंद घ्यावीच)
17 Oct 2019 - 9:23 am | कुमार१
सुबोध, गवि : क्लचचे माहितीसाठी
कंजूस, पैलवान : अनुभवकथन
जॉन : अहंकाराचा मुद्दा विचार करण्याजोगा.
17 Oct 2019 - 11:31 am | कुमार१
माझे एक ठरलेले रिक्षाचालक होते. ते त्यांच्या गाडीला पोटच्या मुलीप्रमाणे जपतात. ती नेहमी स्वच्छ, नियमित देखभाल केलेली असते. त्यांना फोन केला असता रात्री अपरात्री देखील येण्यास तयार असतात. या चालकांची एकच वाईट सवय म्हणजे गाडीतून तंबाखूच्या पिंका रस्त्यावर टाकत राहणे. अक्षरशः दर पाव किमीला एक पिंक टाकतात.
वर्षभर त्यांच्याबरोबर प्रवास झाल्यावर जवळीक झाली होती. आता मी तो थुंकायचा विषय काढायचे ठरवले.
दरम्यान आमच्या भागात एक सुखद घटना घडली. सुमारे ३०० रिक्षाचालकांनी रस्त्यावर न थुंकण्याची जाहीर शपथ घेतली आणि या घटनेला वृत्तपत्रात ठळक प्रसिद्धी मिळाली.
आता मला आमच्या चालकांबरोबर प्रवासाचा योग आला. मग हळूच सुरवात केली, "तुमची गाडी एक नंबर आहे, तुम्ही कधीही व कुठेही येता, मीटर प्रमाणेच चालता… हे खूप आवडते. आता फक्त एक सुचवतो. तेवढे थुंकणे आणि एकूण तंबाखूच सोडता येईल का ? तंबाखू तुमच्या तब्बेतीसाठी आणि थुंकणे आपल्या स्वच्छ भारतासाठी !"
पुढे मी त्या ३०० चालकांच्या शपथेचा उल्लेख केला. मला वाटले की त्यावरून ते हा मुद्दा गांभीर्याने घेतील.
पण…..
झाले उलटेच ! माझ्या बोलण्यावर ते फाडकन म्हणाले, " मी तंबाखूवाला आहे. मी कशाला त्या शपथविधीत सहभागी होऊ ? लै लहानपणी हे व्यसन लागलेय, नाय सुटणार".
यावर मी फक्त बघा प्रयत्न करून, एवढेच म्हणालो.
….
प्रबोधन ही गोष्ट महाकठीण असते एवढे मात्र यातून शिकलो.
17 Oct 2019 - 12:42 pm | नाखु
आवडला, फुकटात मिळालेल्या पुस्तकांची किंमत नसते तर सल्ला शिकवण दूरच!!
या रिक्षाचालक महोदयांनी तुमच्या सल्ल्यावर सुद्धा पिंक टाकली !!
17 Oct 2019 - 6:06 pm | धर्मराजमुटके
काठियावाड मधे एक विनोद प्रसिद्ध आहे.
"बायडी ने छोडू पण बीडी ने छोडू."
कारण बीडी ची सवय लहानपणापासूनच आहे. बायको तर नंतर आली आहे.
17 Oct 2019 - 8:59 pm | फेरफटका
चला, म्हणजे तुमचं तरी शिक्षण झालं ह्यातून. हे ही नसे थोडके. :)
17 Oct 2019 - 3:16 pm | जॉनविक्क
कारण जो पर्यंत चुकीची भरपाई करायची
वेळ येत नाही तोपर्यंत दुसर्याने दिलेले ज्ञान अहंकार दुखावते म्हणूनच रिक्षावाल्याने आपली सूचना योग्य असूनही गांभीर्याने घेतली नाही.
हेच जर पेट्रोल संपत आले असते आणी जवळपास पंपही नाही अशी स्थिती असती तर आपला सल्ला नक्कीच मानला गेला असता. किंबहुना मिपावर या मानवी स्वभावाचे उथळ आणी ओंगळवाणे प्रदर्शन विना न्यूनगंड करणाऱ्या अशा बऱ्याच स्त्री व काही पुरुष सदस्यही आहेत असे निरीक्षण आहे. अर्थात सगळेच प्रदर्शन करतील असे नाही.
17 Oct 2019 - 3:28 pm | कुमार१
फक्त हे नीट कळले नाही :
म्हणजे पेट्रोल भरायचा सल्ला की अन्य ?
17 Oct 2019 - 6:33 pm | जॉनविक्क
आणी त्याला पेट्रोल मर्यादितच उरले आहे हे माहीत असेल व पेट्रोल पंप दृष्टीस येत नसेल तर तुमचा क्लच वर दिलेला सल्ला तो त्याला त्याचा मी चालक मालक आहे रिक्षाचा मला जास्त कळते हा अहंकार दुखावणार नाही व तो ते मनावर घेईल
17 Oct 2019 - 6:36 pm | जॉनविक्क
व हीच बाब एखाद्या संस्थळाच्या साहित्य संपादकसही लागू होउ शकते
17 Oct 2019 - 6:53 pm | सुधीर कांदळकर
पण एका साध्या प्रश्नाचे न्रागावता प्रामाणिक उत्तर द्याल?
आपण इंजिनचलित दुचाकी चालवतांना शिरस्त्राण वापरता का?
पुढे माझा एक अनुभव देत आहे.
तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा कार्यालयात जेवणासाठी डबा उघडून जेवायला सुरुवात केली. भाजीत मीठच नव्हते. तिथे कामाला बाई होत्या. मीठ मागवले.
त्यांनी एक मोठ्ठी बशी आणली. म्हणाल्या मीठ संपले तरी हे आहे ते देते. आणि दोनतीन चमचे होतील एवढे जाडे मीठ वाढले.
मी खेकसलो. हे एवढे जाडे मीठ भाजीत घालू?
बाईंना हसू फुटले. पाच मिनिटे.
बाई हसल्यावर मला आपण कुठेतरी चुकतो आहोत असे वाटले आणि धोरणीपणाने चूप बसलो.
बाईंनी आतून रिकामी वाटी आणली आणि मीठ वाटीने रगडून बारीक करून दिले.
बाईंनी रिकाम्या वाटीतून अक्कलच वाढली होती.
17 Oct 2019 - 7:33 pm | कुमार१
?
>>>>
कायदा झाल्यापासून ISI वाले आणले आहे !
17 Oct 2019 - 9:15 pm | कुमार१
जॉन, आता मुद्दा बरोबर समजला.
सुधीर, मीठ-वाटी शिक्षण छान.
फेफ, सहमत.
माझे एक शिक्षक सांगायचे, "आपण एखादा विषय शिकवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे तो विषय आपल्या स्वतःचा पक्का होतो".
त्यामुळे फसलेल्या प्रबोधनातून सुद्धा काही गोष्टी मनात दृढ होतात.
18 Oct 2019 - 6:47 pm | चौकटराजा
आपल्याला अनेक वेळा असे आढळते की चवदा पन्धरा वर्षाची मुले दुचाकी च्या गराज वर काम करतात व ज्ञानाच्या बाबतीत आप्ल्या पेक्शाही पोचलेली असतात. भारत रत्न पं भीमसेनही जोशी यान्ची मर्सिर्डीस कार होती व तिचे खडा न खडा रिपेरिगचे त्यान अनुभवाने ज्ञान होते. खरे तर आपण कन्वेन्शनल शिक्षणातच फार तो़कडे ज्ञान घेतो.बोलघेवडे पणा जास्त असलेले. माझ्या एका अर्किटेकट मित्राला विचारले " ४० वर्षाच्या प्रॅक्टीस मध्ये तू ट्रिगॉनॉमेट्री किती वेळा वापरली त्याचे उत्तर होते एकदाही नाही ! आपल्याला वाहन चालकाचा परवाना घेताना ८ चा आकडा काढायला सांगातात ,असा प्रसंग आयुष्यात परत कधीही येत नाही कारण आपण सुरक्षा म्हणून खाली पाय टेकूनच गाडी वर जर घ्यायचा झाला तर तितका जवळचा टर्न घेतो.
आपल्या इथे मिपावर काही लोक असे आहेत की त्यांनी नक्की कोणते औपचारिक शिक्षण घेतले असा पेच पडावा . माणसाने गुरू व्हायच्या ऐवजी आयुष्यभर विद्यार्थी राहायचा छंद करावा असे मी तरी मानतो .
18 Oct 2019 - 7:21 pm | सुबोध खरे
औपचारिक शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्ञान अद्ययावत होत जाते त्याच्या बरोबर आपल्याला काळाच्या पुढे राहता येते.
खरे तर आपण कन्वेन्शनल शिक्षणातच फार तो़कडे ज्ञान घेतो.
याचे कारण शिक्षण पद्धतीचा दोष नसून हा आपल्या गुणांना अवास्तव महत्त्व देण्याच्या शर्यत परायण मनोवृत्तीचा दोष आहे.
फियाटचा उत्तम मेकॅनिक आता काम नाही म्हणून उपाशी बसलेला दिसतो. परंतु फियाटचा अभियंता मात्र नव्या गाडीचे तंत्रज्ञान नवी पुस्तके वाचून शिकून अद्ययावत राहू शकतो. मेकॅनिक मात्र नवीन गाडी त्याच्याकडे दुरुस्तीला आली तरच त्याबद्दल शिकू शकतो.
पुस्तकी ज्ञानाबद्दल एका तर्हेचा दुस्वास आपल्याकडे वाढीला लागलेला आहे.
केवळ शेतकीचे पुस्तकी शिक्षण घेऊन शेती करता येत नाही हि कितीही वस्तुस्थिती असली तरी पारंपरिक शेती करून आपला देश उपाशी होता आणि आजही पारंपरिक शेती हि आतबट्ट्याचीच आहे
हरित क्रांतीमुळेच देशात अन्न धान्याची सुबत्ता आली हे विसरून पढिक पंडित म्हणून शेतकी तज्ज्ञांना हिणवण्याची आपली परंपरा आपल्याला कूपमंडूक बनवित आहे आणि पुस्तकी ज्ञानाला प्रात्यक्षिकाची जोड देऊन शेतीत अफाट प्रगती केलेला वाळवंटी देश इस्रायल कुठच्या कुठे पुढे गेला आहे.
माझ्या एका अर्किटेकट मित्राला विचारले " ४० वर्षाच्या प्रॅक्टीस मध्ये तू ट्रिगॉनॉमेट्री किती वेळा वापरली त्याचे उत्तर होते एकदाही नाही
याच आर्कीटेक्ट मित्राला ट्रिग्नॉमेट्रीच्या मूलभूत ज्ञाना शिवाय आर्कीटेक्ट होता येईल का हे विचारून पहा.
आपले पुस्तकी ज्ञान अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा नवी हुशार पिढी आपल्याला केंव्हा कालबाह्य बनवेल ते सांगता येणार नाही.
तेंव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणून गेले आहेत "दिसामाजी काही तरी लिहीत जावे प्रसंगी अखंडित वाचित जावे"
यावरील प्रतिसाद हा वैयक्तिक नाही सर्वसाधारण आहे हे कृपया लक्षात घ्यावे.
18 Oct 2019 - 9:00 pm | जॉनविक्क
21 Oct 2019 - 4:03 pm | तुषार काळभोर
बहुत काय लिहावे!
खूप वर्षांपासून हे सांगायचं होतं-
तुमची राजकीय सोडून इतर सर्व मते अन् प्रतिसाद बुकमार्क करून ठेवण्यासारखी आहेत.
(तुमची राजकीय मते चुकीची आहेत असं नव्हे, ती माझ्या मतांहून वेगळी आहेत, म्हणून..)
तुमच्यासारखा व्यासंग, विस्तृत व दीर्घ अनुभव, वाचनाची व ज्ञानार्जनाची आवड आणि अफाट स्मरणशक्ती, सडेतोडपणा आणि इतक्या सगळ्यांसोबत असणारी विनयशीलता यांचा हेवा वाटतो.
अतिरिक्त - तुमच्या मराठीच्या आवडीचं प्रचंड कौतुक वाटतं! महाराष्ट्रापासून सलग इतकी वर्षे दूर राहूनही कित्येक कवितांच्या ओळी, अभंगांच्या ओळी तुम्हाला मुखोद्गत असतात. सेना, नौदलात काम केलेले मोजके काही लोक ओळखीचे आहेत. एक सुभेदार मेजर, एक सेना कॅप्टन, एक नौदलातील अधिकारी (हे सर्व निवृत्त), एक मित्र तटरक्षक दलामध्ये आहे. सर्वांचं मराठी बिघडलंय. त्यावर हिंदी अन् इंग्रजीचा प्रचंड प्रभाव आहे. सवयीमुळे किंवा विनाकारण हिंदी - इंग्रजी शब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या मराठीच्या वापराचं कौतुक वाटतं.
असो.
@कुमार साहेब, अवांतरसाठी क्षमस्व. अगदीच राहवलं नाही, म्हणून बोललो.
18 Oct 2019 - 7:03 pm | कुमार१
अगदी बरोबर !
.
>>>
लाखमोलाचे बोललात, धन्यवाद !
19 Oct 2019 - 8:49 am | सुधीर कांदळकर
+१
छान..
शिकविल्यामुळे गृहीते आणि गृहीतके पुन्हा नव्याने तपासता येतात. त्यातल्या खाचा खोचा, कळीचे शब्द, मुद्दे वगैरे नव्याने कळतात.
एका शिकवणीत मी जडत्त्वाचा नियम शिकवत होतो. नवे बदल तपासण्यासाठी त्याचे पाठ्यपुस्तक वाचले. त्या नवीन अभ्यासक्रमात 'अनलेस अॅन एक्स्टर्नलल फोर्स इस अॅप्लाईड' हे नवे शब्द होते जे आमच्या वेळच्या अभ्यासक्रमात नव्हते.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नातूनही काही नवे निघते.
प्रख्यात वैज्ञानिक कोपर्निकस विद्यापीठात शिकवीत असतांना एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की फक्त बाह्यग्रहच का वक्री मार्गाने फिरतात. म्हणजे पूर्वोदयानंतर बाह्यग्रह क्षितीजापासून उंच ऊंच दिसूं लागतांना जाता अचानक काही दिवस खाली खाली का जातांना दिसतात?
तेव्हाचे गृहीतक असे होते की अंतर्ग्रह वर्तुळाकार कक्षेत तर बाह्यग्रह पेरीसर्कलाकार (हे केवळ चित्राने स्पष्ट करता येईल) कक्षेत फिरतात. या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही म्हणून कोपर्निकसने राजीनामा दिला. आर्थिक दुरवस्था आली तरी विश्लेषण, चर्चा सुरू ठेवल्या. त्यानंतर सर्व ग्रहांच्या कक्षा दीर्घवर्तुळाकार असतात हे त्याच्या ध्यानात आले. नंतर त्याने त्याचा सुप्रसिद्ध सूर्यकेंद्री विश्वाचा सिद्धान्त शोधून काढला. केवळ एका विद्यार्थ्याच्या शंकेमुळे या संशोधनाला चालना मिळाली.
19 Oct 2019 - 9:17 am | कुमार१
** त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नातूनही काही नवे निघते.
>>>>
+ ११११
विद्यार्थी हे देखील शिक्षकाचे गुरू असतात !
….
मध्ये रंजन केळकर यांच्या म टा तील लेखातून एक शिकायला मिळाले.
'सूर्योदय' व 'सूर्यास्त' हे शब्द आता शास्त्रीय दृष्ट्या बरोबर नाहीत. ते जेव्हा वापरात आले तेव्हा असा समज होता की पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्याभोवती फिरतो !
पण वास्तव उलटे असल्याने आता हे शब्दप्रयोग बरोबर नाहीत. पृथ्वी वरच्या लोकांना 'सूर्यदर्शन' झाले / संपले असे म्हणणे योग्य.
19 Oct 2019 - 9:27 am | चौकटराजा
मुम्बई मेट्रो च्या सर व्यवस्थापक अश्विनी भिडे यांची मेट्रो ची तांत्रिक माहिती ज्या तपशील वार दिली आहे एका मुलखतीत त्यावरून आपला हा विश्वास बसणार नाही ही या बाई मराठी साहित्य हा विषय घेऊन पदवी व नंतर आय ए एस झाल्या आहेत !
19 Oct 2019 - 6:07 pm | सुधीर कांदळकर
'सूर्योदय' व 'सूर्यास्त' हे शब्द आता शास्त्रीय दृष्ट्या बरोबर नाहीत.
हे विधान पटले नाही. उदय आणि अस्त यांच्या व्याख्या बदलल्या की हे शब्द बरोबर ठरतील.
19 Oct 2019 - 7:28 pm | कुमार१
सुधीर,
मला असे वाटते....
पृथ्वी तुलनेने स्थिर सूर्याभोवती फिरत असल्याने त्यांनी तसे म्हटले असावे.
21 Oct 2019 - 5:05 pm | कुमार१
औपचारिक शिक्षणाचे त्याचे परीने महत्व आहेच. ते कोणी नाकारीत नाही. ते आपल्यातील प्रत्येकाचे व्यवसायनुसार वेगवेगळे असते.
कुठलेही अनौपचारिक शिक्षण हे सर्वांनाच व्यवहारज्ञानासाठी उपयुक्त ठरते. केवळ याच उद्देशाने हा धागा आहे.
22 Oct 2019 - 9:13 am | चौकटराजा
औपचारिक शिक्षण हे अधुनिक काळाचे मूल आहे. फार पूर्वी वास्तूशास्त्राची कॉलेजेस असतील का ? तरीही आजच्या वास्तुविदाना चकित करतील अशा रचना जगभर झाल्या आहेत. कोणतेही औपचारिक संगीताचे शिक्षण ना घेता केवळ श्रवण क्षमता व आवड या जोरावर ( केवळ ७२ थाटांचे ज्ञान वयाच्या १५ वर्षापर्यंत त्यांना गुरूकडून घ्यावे लागले ) उच्च स्थान गाठलेले डॉ. बालमुरली कृष्णा हे संगीतातील प्रयोग करणारे महान कलाकार आहेत . वास्तुकलेच्या एकूण ३७ विषयापैकी एक विषय आहे सावली शास्त्र म्हणजे कोणत्या बिल्डिंग ची सावली कशी पडेल ? मला नाही वाटत कोणताही आजचा वास्तुविद या शास्त्राचा उपयोग करून डिझाईन बनवतो .कारण हे शास्त्र असे सांगते की दक्षिण गोलार्धातील व उत्तर गोलार्धातील खिडकीची कॅनोपी की सारखी असणार नाही ! प्रत्यक्षात डिझाईन असते का असे ?
22 Oct 2019 - 9:21 am | चौकटराजा
वरील प्रकारच्या सावलीचा अभ्यास करून कॅनोपी डिझाइन आजच्या वास्तुविदाला थ्री डी स्टुडिओ मॅक्स वापरून सहज शक्य आहे , त्या सॉफ्टवेअर मध्ये वर्षभरात तुमच्या बिल्डींगची सावली कशी पडेल याचा प्रत्यय मी स्वतः घेतला आहे आमच्य इमारतीच्या बाबतीत . त्यासाठी मात्र तुमच्या घराचे पृथ्वीवरचे को ऑर्डिनेट्स तुम्हाला ठाऊक हवेत. मी आज च्या फ्लॅट मध्ये राहातो त्याची निवड मी असा अभ्यास करून केली आहे की अतिशय तापदायक उन माझ्या घरात कधीही न येता प्रकाश मात्र येतो.
22 Oct 2019 - 10:05 am | सुबोध खरे
औपचारिक शिक्षण हे अधुनिक काळाचे मूल आहे
साफ चुकीचे गृहीतक
नालन्दा, विक्रमशिला, तक्षशिला येथे असणारी प्रचंड ग्रंथ भंडारे काय दर्शवितात?
मधल्या इस्लामी अंधयुगात शिक्षण म्हणजे कुराण त्याच्या अलीकडे पलीकडे काहीच नाही या वृत्तीमुळे हि प्राचीन परंपरा खंडित झाली
अन्यथा कौटिल्याचे अर्थशास्त्र पासून पाणिनीचे व्याकरण चरक आणि सुश्रुत संहिता हि पुस्तके काय सांगतात?
आज हि चरक आणि सुश्रुत संहिता हि पुस्तके आयुर्वेदिक शिक्षणाचा आधारच आहेत.
युरोपात सुद्धा मोठ्या प्रमाणावर ग्रंथालये आणि विदयापीठे शिक्षणाचे कार्य करतच होती
https://en.wikipedia.org/wiki/List_of_libraries_in_the_ancient_world
बाकी न्यूटनने लिहिलेली गणित आणि भौतिकशास्त्रावरची पुस्तके किंवा इतर शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तके काय दर्शवतात?
22 Oct 2019 - 10:17 am | कुमार१
मात्र येतो.
>>> अगदी प्रकाशमान आहेत बुवा, हेवा वाटतो !
22 Oct 2019 - 1:57 pm | कुमार१
आताच दुसऱ्या धाग्यावर एका साध्या प्रश्नातून अनौपचारिक शिक्षण असे झाले :
* प्रश्न :
आगगाडीचे "अप" आणि "डाऊन" कसे ठरवतात?
* उत्तर:
मध्य रेल्वेचे उदा घेतो.
तिचे मुख्यालय मुंबई. त्यामुळे तिथून तिच्या विभागात अन्यत्र सुटणारी गाडी 'डाऊन' आणि नेहमी विषम क्रमांकाची ( २२१०५)
आता तीच गाडी जेव्हा मुंबईकडे परतीचा प्रवास करेल तेव्हा झाली 'अप' आणि सम क्रमांकाची ( २२१०६).
… असे साधेसोपे पण महत्त्वाचे अनुभव जरूर लिहा.
22 Oct 2019 - 5:00 pm | चौकटराजा
आपण सांगितलेले पैकी खेरीज एल वही किंवा फुली म्हणजे लास्ट व्हेकल ,तसेच टर्मिनस ( सी एस टी) , जंकशन,( कल्याण ) क्रॉस जंक्शन ( अंबाला ) सेंट्रल (लोणावळा ) . इंजिनावर कोड मध्ये नाव व त कोणत्या वर्कशॉप चे आहे यावरून ते ब्रॉड गेज वरचे की मीटर की नॅरो , पॅसेंजर की गुडस , डीझेल की विद्युत हे की कळते .
22 Oct 2019 - 5:35 pm | कुमार१
>>>
शेवटच्या डब्यावर LV असे लिहिणे का चालू झाले, याची रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितलेली एक कथा अशी:
पूर्वी एका ट्रेनच्या मधल्या डब्यांची जोडणी तुटली. मग इंजिनबरोबरची अर्धगाडी पुढे निघून गेली आणि मागची 'अनाथ' मागेच राहिली.
आता प्रत्येक स्थानकावर एक निरीक्षक प्रत्येक गाडी इंजिन ते LV डबा असे पाहिल्यावरच 'ओके' चा संदेश पाठवतो.
8 Nov 2019 - 12:30 pm | कुमार१
लग्नानंतर जेव्हा वेगळा संसार थाटला तेव्हाचा एक प्रसंग लिहितो. घर लावून वगैरे झाले होते. सकाळी उठून किराणा दुकानात पोहे आणायला गेलो.
दुकानदाराने विचारले, "कुठले पोहे?" मला एकदम कळलेच नाही. पुन्हा मी म्हणालो, अहो, पोहे द्याना, त्यात कुठले काय विचारता?"
मग ते म्हणाले, " जाड की पातळ?"
मी: कुठले नेतात नेहमी ?
मग त्यांनी मला मूलभूत गोष्ट सांगितली. जर कांदेपोहे करायचे असतील तर जाड, आणि चिवडा करायचा असेल तर पातळ.
… असे हे माझे पोहे शिक्षण ! वयाच्या २७व्या वर्षी झाले.
9 Sep 2021 - 9:27 am | कुमार१
*"असे हे माझे पोहे शिक्षण ! वयाच्या २७व्या वर्षी झाले
>>>
पोहे शिक्षण अजूनही चालूच आहे !
नुकताच आलेला अनुभव. दुकानातून दहा-बारा वस्तू घेतल्या तेव्हा घाईत त्यांनी बांधलेली प्रत्येक गोष्ट नीट तपासून घ्यायची राहिली.
त्यांना अर्धा किलो जाड पोहे असे सांगितले होते. घरी येऊन पाहतो तर ते बारीक आकाराचे, जवळपास मोठा तांदूळ असावा असे.
मग गृहमंत्र्यांनी सांगितले,
" त्याला दगडी पोहे म्हणतात !"
आता हे पोहे जरा जास्त काळ भिजत ठेवून मग फोडणीला देत आहे.
9 Sep 2021 - 10:19 am | Bhakti
:)
आमच्या ह्यांना डाळीतला फरक मुळीच कळत नाही.. त्यामुळे बरेचदा तूर डाळीची खिचडी खावी लागते ;)
आजचा प्रसंग डझनभर फळं घेतले, स्वतः मोजून पाहिले तर १० च भरले....हसत हसत मोजून दाखवले..
बायकांना शेंडी लावणं अवघड आहे... हे ह्यांना कोण सांगणार.
9 Sep 2021 - 10:30 am | कुमार१
सहमत.!
9 Sep 2021 - 10:36 am | Bhakti
यातील पोह्याचे उदाहरण ही सहज शिक्षण ( informal)यात समाविष्ट होतात.
औपचारिक (formal) साचेबंद
अनौपचारिक (non-formal) साचेबंद नसते,वातावरण सापेक्ष
9 Sep 2021 - 10:47 am | कुमार१
सहज शिक्षण हा शब्द प्रयोग आवडला.
रच्याकने...
डाळींच्या बाबतीत थोडी भर घालतो. आमच्या घरी 95 टक्के वेळेस मूग डाळ असते. तूर डाळ व हरभरा डाळ फक्त सणाच्या निमित्ताने आणावी लागते.
तेव्हा त्या दोन्ही जर मी एकत्र घेऊन आलो तर मग त्यांच्या डब्यांमध्ये भरताना मला नीट पाहावे लागते.
अजूनही त्या दोन्हींमध्ये गंडण्याचीच शक्यता वाटते
9 Sep 2021 - 11:01 am | कुमार१
>> याचे एखादे छानसे उदाहरण तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल
9 Sep 2021 - 1:38 pm | Bhakti
उदाहरण १
सहज शिक्षण-आई वडिलांकडून भाषेचा वारसा
औपचारिक शिक्षण -शाळेत एखादी भाषा शिकणे
अनौपचारिक शिक्षण-इंटरनेटहून प्रयत्नाने भाषा शिकणे.
उदाहरण २
सहज शिक्षण-सुईत दोरा टाकून टाका मारणे
औपचारिक शिक्षण-मोजणी करून ड्रेस शिवायला शिकणे
अनौपचारिक शिक्षण-मोजणी न करता अक्युरेट पिशवी वगैरे शिकणे.
9 Sep 2021 - 1:40 pm | कुमार१
आवडली उदाहरणे.
9 Sep 2021 - 1:44 pm | Bhakti
:)