वॉटरगेट (भाग ४)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
14 May 2021 - 7:37 pm
गाभा: 

वॉटरगेट (भाग १)
वॉटरगेट (भाग २)
वॉटरगेट (भाग ३)
______________________________________________________________________________

या आरोपींच्या खात्यात बरेच पैसे जमा झाले होते. ते धनादेश अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरातून खात्यात भरले गेले होते. परंतु त्या धनादेशांचा माग काढल्यानंतर समजले की ते धनादेश CRFEP व काही रिपब्लिकन देणगीदारांच्या खात्यातून आले होते. तसेच होवॉर्ड हंट W. H. अशी एक नोंद जेम्स मॅकॉर्ड या आरोपीच्या दैनंदिनीत सापडली. हा हंट पूर्वी सीआयए साठी काम करीत होता व तो नंतर अध्यक्षांचा विशेष सल्लगार असलेल्या चार्ल्स कोलसनसाठी काम करीत होता.CRFEP च्या ज्युडिथ होबॅकनेच एफबीआयला याविषयी माहिती दिली होती.

डीप थ्रोटकडून वुडवर्ड-बर्नस्टीन यांना याविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या पैशांचा माग काढण्यास सुरूवात केली व मागोवा घेत ते CRFEP पर्यंत पोहोचले. यात त्यांना एक नाव सापडले ते म्हणजे गॉर्डन लिडी. पकडल्या गेलेल्या ५ आरोपीत लिडी नव्हता, परंतु वुडवर्ड-बर्नस्टीन हे जसे खोलवर माहिती शोधत गेले तशी या प्रकरणातील लिडीची भूमिका जास्त स्पष्ट होत गेली.


गॉर्डन लिडी - वॉटरगेट प्रकरणाचा सूत्रधार

यातील गॉर्डन लिडी हे एक रोचक प्रकरण आहे.

वॉटरगेट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जी. गॉर्डन लिडी याचे नुकतेच ३० मार्च २०२१ या दिवशी निधन झाले. तो निक्सन समर्थक होता व निक्सनचा राजकीय सहकारी होता. त्यापूर्वी तो आधी लष्करात होता व नंतर काही काळ गुप्तचर संस्था एफबीआय मध्ये एजंट होता. तो अत्यंत वाचाळ व वादग्रस्त होता. टोकाचे उजवे विचार, कट्टर साम्यवाद विरोध हे त्याचे वैशिष्ट्य. राजकीय विरोधकांच्या हत्या कराव्या, डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांवर बॉम्ब टाकावे, युद्धाला विरोध करणार्‍यांचे अपहरण करावे अशी त्याची टोकाची गुन्हेगारी स्वरूपाची मते होती.

वॉटरगेट इमारतीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयात गुपचुप घुसून तेथील कागदपत्रे चोरून आणावी, तेथील दूरभाष संभाषण चोरून ऐकण्यासाठी हेरगिरी करणारी उपकरणे बसवावीत ही त्याची योजना निक्सनने मान्य केली व त्यातूनच पुढील रामायण घडले. ही योजना शेवटी निक्सनवरच बूमरँग झाली.

या प्रकरणात कारस्थान रचणे, दरोडा, बेकायदेशीर वायरटॅपिंग हे आरोप लिडीवर सिद्ध होऊन त्याला तुरूंगवासाची शिक्षा मिळाली. एकूण ५२ महिने तुरूंगात शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका झाली व नंतर त्याला १०० दिवस एकांतवासात काढावे लागले.

"मी माझ्या अध्यक्षांसाठी हे पुन्हा एकदा करेन" असे त्याने काही वर्षांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

तुरूंगवासातून सुटका झाल्यानंतर तो एका रेडिओ टॉक शोचा अँकर झाला. तो शो खूप वादग्रस्त व लोकप्रिय झाला होता. त्याने काही काळ सुरक्षा सल्लागार, लेखक, अभिनेता अशीही कामे केली. जाडजूड मिशा, टक्कल इ. मुळे त्याचे व्यक्तिमत्व चमकदार झाले होते.

आपल्या रेडिओवरील टॉक शो मध्ये तो शस्त्र पुरविणार्‍या दलालांना कसे मारावे याच्या युक्त्या सांगायचा. त्याच्या कारची नंबरप्लेट "H2OGATE" अशी होती. न्यू जर्सीतील होबोकेन या गावात त्याचा जन्म १९३१ मध्ये झाला होता व त्याचे बालपण त्याच गावात गेले होते. त्याच्या आजूबाजूला बहुतांशी जर्मनी वंशाचे अमेरिकन होते. त्याच्या शालेय वयात हिटलर, त्याची नाझी विचारसरणी, त्याची उजवी विचारसरणी जगभर प्रसिद्ध झाली होती. अमेरिकेतील जर्मन वंशावरही या विचारसरणीचा प्रभाव असणार होता. त्याचे शालेय वयातील जर्मनवंशीय मित्र आणि घरात काम करणारी जर्मन वंशाची महिला यांच्यामुळे त्याच्या मनात अ‍ॅडॉल्फ हिटलरविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. लहान वयातच त्याच्या मनावर हिटलरचा प्रभाव निर्माण झाला होता. हिटलरची रेडिओवरील भाषणे ऐकून त्याला स्फूर्ती मिळत असे. राष्ट्र सामर्थ्यवान झाले तर राष्ट्रातील सर्व नागरिक सामर्थ्यवान होतील असे त्याने आपल्या "Will" या आत्मचरित्रात लिहिले होते. त्याच्या आत्मचरित्रावर आधारीत १९८२ मध्ये एक चित्रपट तयार झाला होता ज्यात रॉबेर्ट कॉनरॉडने काम केले होते.

लहानपणी त्याला उंदरांची भीति वाटत होती. आपली भीति घालविण्यासाठी त्याने ११ वर्षांचा असताना एक उंदीर मारून भाजून खाल्ला होता. त्याने १९६८ मध्ये न्यूयॉर्क मधून निवडणुक लढविली होती, परंतु त्यात त्याला तश आले नव्हते. १९६८ मध्येच त्याने निक्सनची प्रचारयंत्रणा सांभाळली होती. निक्सनने १९६९ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रेझरी विभागाचा विशेष सहाय्यक या पदावर लिडीची नेमणूक झाली होती. काही काळाने तो व्हाईट हाऊसमध्ये आला व नंतर निक्सनच्या १९७२ मधील निवडणुकीची प्रचारयंत्रणा त्याच्यावर सोपविण्यात आली होती.

या दरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या "प्लंबर" नावाच्या एका गटाचा त्याला प्रमुख करण्यात आले. निक्सन प्रशासनातून त्रासदायक ठरणारी माहिती बाहेर पाठविणारे स्रोत शोधणे हे या गटाचे उद्दिष्ट होते. डेमोक्रॅटिक पक्षातील प्रमुख निक्सन विरोधकांना निष्प्रभ करणे हे सुद्धा या गटाचे उद्दिष्ट होते.

त्याने आपल्या एका योजनेसाठी एका महिलेची नेमणूक केली होती. कोणत्याही परिस्थितीत तो तिच्याविषयी गुप्तता राखेल व तिचे नाव समोर येणार नाही याची तिला खात्री पटवून देण्यासाठी त्याने पेटत्या सिगारेट लायटरवर आपला हात धरला होता. या प्रकारात त्याचा तळहात खूप भाजला होता. परंतु त्या महिलेची खात्री न पटल्याने तिने त्याचे काम स्वीकारले नाही.

रिपब्लिकन पक्षाच्या एका राष्ट्रीय अधिवेशनात त्याने अत्यंत वादग्रस्त सूचना केल्या होत्या. व्हिएटनाम युद्धाला विरोध करणार्‍या निदर्शकांचे अपहरण करून त्यांना मेक्सिकोमध्ये न्यावे, शोध पत्रकार जॅक अ‍ॅन्डरसनची हत्या करावी, ब्रुकिंग इन्स्टिट्युशन नावाच्या साम्यवादी विचारवंतांच्या संस्थेवर बॉम्ब टाकून ती उद्ध्वस्त करावी अशा भयंकर सूचना त्याने केल्या होत्या, ज्याला कोणीही समर्थन दिले नव्हते.

लिडी, होवार्ड हंट आणि अजून ५ जणांना सप्टेंबर १९७२ मध्ये वॉटरगेट प्रकरणी अटक करण्यात आले होते. हे सर्वजण १९७३ मध्ये दोषी सिद्ध झाले.

वॉटरगेट इमारतीतील घुसखोरीचा दुसरा प्रयत्न फसल्यानंतर लिडीने जॉन डीनला सांगितले होते "जर कोणाला मला गोळ्या घालायच्या असतील, तर गोळ्या खाण्यासाठी मी कोणत्या कोपर्‍यात उभे राहू तेवढेच फक्त मला सांगा.". CBS वृत्तवाहिनीच्या "60 Minutes" या कार्यक्रमात मुलाखत देताना त्याने सांगितले होते की निक्सन पुरेसे निष्ठुर नाहीत व त्यांनी व्हाईट हाऊसमधील संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग नष्ट करायला पाहिजे होते.

निर्भीड, अतिउत्साही, प्रतिगामी विचारांचा पुरस्कर्ता अशी लिडीची प्रतिमा होती. त्याचा व्हर्जिन्यामधून प्रसिद्ध होणारा WJFK नावाचा रेडिओ टॉक शो अनेक वर्षे लोकप्रिय होता. त्याने लिहिलेल्या काही पुस्तकांची चांगली विक्री झाली होती. मायामी व्हॉईस नावाच्या एका मालिकेतही त्याने काम केले होते. काही महाविद्यालयात त्याने अतिथी व्याख्याता म्हणून व्याख्याने दिली होती. सुरक्षा सल्लागार म्हणूनही त्याने काम केले होते.

वॉटरगेट प्रकरणातील आपल्या भूमिकेचा त्याला कायमच अभिमान वाटत होता.

__________________________________________________________________________________

CREEP (Nixon's Committee to Re-Elect the President) - निक्सनच्या पुनर्निवडीसाठी स्थापण्यात आलेली समिती
Slush Money - लाच देण्यासाठी, छुप्या गुन्हेगारी कृत्यांसाठी गुपचुप वेगळे काढून ठेवलेले पैसे
Hush Money - माहिती न देता तोंड बंद ठेवावे यासाठी दिली गेलेली लाच


(क्रमशः)

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

14 May 2021 - 7:59 pm | चंद्रसूर्यकुमार

रोचक. या मनुष्याविषयी काहीही माहिती नव्हती.

चा व्हर्जिन्यामधून प्रसिद्ध होणारा WJFK नावाचा रेडिओ टॉक शो अनेक वर्षे लोकप्रिय होता.

माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी हे JFK या नावाने प्रसिध्द होते. WJFK या टॉक शो चे नाव त्यांच्याशी संबंधित होते का? म्हणजे त्यांच्यावर टीका करायच्या उद्देशाने वगैरे?

श्रीगुरुजी's picture

14 May 2021 - 8:16 pm | श्रीगुरुजी

नक्की कल्पना नाही. यातील W म्हणजे Washington आणि J म्हणजे Junkies कारण सुरूवातीच्या काळात हे रडिओ स्टेशन स्पोर्ट्सशी संबंधित होते. FK म्हणजे काय याची कल्पना नाही.

विकीवर खालील माहिती मिळाली.

WJFK-FM (106.7 MHz "106.7 The Fan") is a commercial radio station licensed to serve Manassas, Virginia, and serving the Washington metropolitan area. WJFK-FM airs a sports radio format and is owned and operated by Audacy, Inc.

On October 3, 1988, the station flipped to an album-oriented rock format as WJFK. The station became the Washington affiliate for the syndicated Howard Stern Show. This marked Stern's return to the market for the first time since he was let go from rival rock station WWDC in 1982.

Over time, WJFK began adding other talk shows targeted at young men, similar to Stern. Eventually WJFK had switched over to a full-time hot talk format. Programs on the station during this era include Stern, Don and Mike, Opie & Anthony, G. Gordon Liddy, The Greaseman, Bill O'Reilly, Ron & Fez and the Sports Junkies. In 1991, Infinity began to simulcast WJFK programming on co-owned AM 1300 in Baltimore. That station switched its call letters to WJFK, so 106.7 added an FM suffix and became WJFK-FM.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 May 2021 - 8:31 pm | चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद.

शाम भागवत's picture

14 May 2021 - 7:59 pm | शाम भागवत

छान.
पटापट लिहीताय, वाट पहायला लावत नाही आहात. यासाठी धन्यवाद.

कॉमी's picture

14 May 2021 - 8:27 pm | कॉमी

मस्त भाग !

तुषार काळभोर's picture

15 May 2021 - 8:56 am | तुषार काळभोर

राजकीय विरोधकांच्या हत्या कराव्या, डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांवर बॉम्ब टाकावे, युद्धाला विरोध करणार्‍यांचे अपहरण करावे अशी त्याची टोकाची गुन्हेगारी स्वरूपाची मते होती.
>>>
हा तर उजवा कम्युनिस्ट झाला!

कुमार१'s picture

15 May 2021 - 11:29 am | कुमार१

मस्त भाग !

मस्त चालली आहे लेखमाला
वाचतोय

मुक्त विहारि's picture

15 May 2021 - 12:17 pm | मुक्त विहारि

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

संजय पाटिल's picture

15 May 2021 - 5:16 pm | संजय पाटिल

बर्‍याच दिवसांपासून या प्रकरणाबद्दल कुतूहल होते.
सविस्तर माहीति बद्द्ल धन्यवाद!