हंपी: भाग ७ - अंतःपुर, पद्ममहाल आणि गजशाळा

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
5 Apr 2021 - 8:35 pm

हंपी: भाग १ - चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं

हंपी: भाग २ - राजवाडा परिसर

हंपी: भाग ३ - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार

हंपी: भाग ४ - दारोजी अस्वल अभयारण्य

हंपी: भाग ५ - विरुपाक्ष मंदिर आणि हेमकूट टेकडी

हंपी: भाग ६ - कृष्ण मंदिर, लक्ष्मीनृसिंह आणि बडवीलिंग मंदिर

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हंपीचे भग्नावशेष मुख्यतः दोन भागांत विभाजित झालेले आहेत, पवित्र परिसर (sacred centre) आणि शाही परिसर (Royal centre). पवित्र परिसरात मुख्यतः मंदिरे तर शाही परिसरात राजवाडे, महाल, मंत्रालये इत्यादी आहेत. तसं बघायला गेलं तर हंपीच्या विस्तीर्ण परिसरात जिथे नजर जाईल तिथं काहीना काही अवशेष आहेतच. ह्याच शाही परिसरात आहे अंतःपुर अर्थात राणीवसा.

अंतःपुर / राणीवसा (zenana enclosure)

शाही परिसरात असलेले हे अंतःपुर हे राजपरिवारातील स्त्रियांची निवासस्थाने असलेला खाजगी भाग. चारही बाजूंनी तटबंदीने संरक्षित असलेल्या अंतःपुराला दोन प्रवेशद्वारे असून आतमध्ये राण्यांची निवासस्थाने, सुप्रसिद्ध पद्ममहाल, जलमहाल आणि पुष्करीणी आहेत. तटबंदीवर संरक्षणासाठी चार कोपर्‍यात चार उंच निरिक्षण मनोरे (watch tower) आहेत, पैकी आज तिथला एक मनोरा पूर्णपणे नष्ट झालेला असून तीन आजही अस्तित्वात आहेत. हे दुमजली मनोरे इंडोइस्लामिक शैलीत बांधलेले आहेत

हजारराम मंदिर, शाही राजवाड्यांवरुन पुढे जाताच अंतःपुर आहे. अंतःपुरात राजाशिवाय इतर कोणालाही प्रवेश नसे व पहार्‍यावर हिजड्यांची नेमणूक केली जात असे. ह्याशिवाय अंतःपुरात देवदासींनाही प्रवेश असे. पोर्तुगीज प्रवासी दुमिंगुश पाईश ह्याच्या वृत्तांतात ह्या स्त्रियांचे वर्णन आले आहे.

पाईश लिहितो,

देवळातल्या मूर्तीला नैवैद्य दाखवताना मूर्तीपुढे स्त्रियांचे नृत्य होते, ह्या स्त्रिया देवाला वाहिलेल्या (देवदासी) असतात. त्या देवाला अन्न इत्यादी आवश्यक वस्तू देतात. ह्या स्त्रियांना झालेल्या मुलीही देवदासीच ठरतात. ह्यांचे चारित्र्य स्वैर असते. शहरांतल्या चांगल्या भागात प्रमुख मार्गांवर त्या राहतात. अशा स्त्रियांच्या वस्तीतील घरे उत्तम प्रतीची असतात. अधिकारी आणि श्रीमंत वर्गातील अंगवस्त्रे म्हणून राहणार्‍या या स्त्रियांना बराच मान मिळतो. कोणताही सद्गृहस्थ काहीही ठपका न येता यांच्याकडे उघडपणे जाऊ शकतो. या स्त्रियांना राजाच्या अंत:पुरातही प्रवेश असतो. त्या तिथे राजस्त्रियांमध्ये राहून त्यांच्या समवेत तांबूल सेवन करतात. इतर कोणाही व्यक्तीला हे करता येत नाही मग तिचा दर्जा कितीही मोठा असो.

पाईश पुढे तांबुल (विड्याचे) वर्णन करतो ते असे,

हा विडा म्हणजे मिरवेल किंवा आपल्याकडचे आयव्हिसासारख्या वनस्पतीचे एक पान असते. हे पान येथील लोक नेहमी खातात, त्यांच्याबरोबर तोंडात सुपारी धरतात. ही आपल्याकडील मेंडलर फळासारखी मात्र जास्त टणक असते. ती श्वासदुर्गंधी घालवते आणि अनेक तर्‍हेने गुणकारी असते. खाण्याचे रिवाज आपल्यापेक्षा वेगळे असणार्‍या या लोकांना ती अनेक प्रकारे उपयुक्त आहे. काही लोक मांसाहारी आहेत पण ते गाय, डुक्कर सोडून इतर सर्व प्रकारचे मांस खातात. त्यांचेदेखील दिवसभर पान खाणे चालूच असते.

निरीक्षण मनोर्‍यांनी संरक्षित असलेले तटबंदीयुक्त अंत:पुर

a

तटबंदी व निरीक्षण मनोरा

a

पाईशच्या वृत्तांतात अंतःपुराचे वर्णन पुढीलप्रमाणे येते.

राजाला (कृष्णदेवरायाला) तीन कायदेशीर बायका असून याच तीन प्रमुख आहेत. ह्या प्रत्येक राणीचा निराळा महाल असून प्रत्येकाच्या दासदासी, नोकरचाकर आणि स्त्री अंगरक्षक आहेत. सर्व नोकर स्त्रिया आहेत. या ठिकाणी पुरुषांना मज्जाव आहे. फक्त महालांवर पहारेकरी म्हणून हिजडे आहेत. राजाच्या मर्जीतील उच्चपदस्थ वृद्ध पुरुष सोडल्यास ह्या स्त्रिया इतर कोणाही पुरुषांच्या दृष्टीस पडत नाहीत. जेव्हा त्यांना बाहेर जावयाचे असते तेव्हा पडद्याने आच्छादित केलेल्या पालखीत त्यांना घेऊन जातात. पालख्यांबरोबर चांगले तीनशे ते चारशे हिजडे असतात आणि इतर सर्व लोक लांब अंतरावर उभे राहतात. प्रत्येक राणीकडे भरपूर पैसा आणि तितक्याच प्रमाणात मोती, बाजूबंद, बांगड्या, रत्ने इत्यादी ऐवज असल्याचे आम्हास सांगण्यात आले. प्रत्येक राणीजवळ साठ दासी असून त्याही हिरे, मोती, माणके यांनी सजलेल्या असतात असे म्हणतात. या दासी धरुन अंतःपुरात एकूण बरा हजार स्त्रिया आहेत. ह्यामध्ये ढाल तलवार चालवणार्‍या, कुस्ती खेळणार्‍या, तुतारी शिंगे अशा आपल्यापेक्षा वेगळी वाद्ये वाजवणार्‍या अशा स्त्रिया आहेत. तसेच भोई आणि परीट कामासाठादेखील स्त्रियाच आहेत आणि राजाकडील व्यवस्थेप्रमाणे इथे अंतःपुरात देखील कामाची व्यवस्था आहे, एव्हढेच की ती सर्व कामेदेखील स्त्रियाच करतात. तिन्ही पट्टराण्यांकडे तंटा किंवा नाराजी होऊ नये म्हणून तिघींनाही सर्व गोष्टी सारख्या प्रमाणात मिळतात. तिन्ही राण्यांमध्ये स्नेहभाव असून त्या स्वतंत्र राहतात यावरुन एव्हढे लोक राहणारे वाडे सामावणारे हे आवार किती मोठे असेल याची कल्पना येईल.

पाईश पुढे लिहितो,

खुद्द राजा महालातच पण वेगळा राहतो. आपल्या कोणत्याही राणीस भेटण्याची इच्छा झाल्यास तो हिजड्याकरवी तसा निरोप पाठवून तिला बोलवून घेतो. राणी राहते तिथे अंतःपुरात हिजडा जात नाही. दारावरील स्त्री रक्षकांना तो राजाचा संदेश असल्याचे सांगतो. नंतर राणीची एखादी वरिष्ठ दासी येऊन राजाचा काय निरोप आहे ते पाहते आणि मगच राणी राजाकडे येते किंवा राजा राणीकडे जातो आणि इतरांना काहीही सुगावा लागू न देता तो पाहिजे तितका वेळ राणीच्या सान्निध्यात राहतो. हिजड्यांपेकी काही लोक राजाच्या खास मर्जीतील आहेत. ते राजाच्या शयनगृहातच झोपतात आणि त्यांना पगारही भरपूर मिळतो.

राणीच्या राजवाड्याचे भग्नावशेष

a

संरक्षण मनोरेयुक्त तटबंदी

a

तटबंदी आणि पुष्करिणी

a

संरक्षण मनोरा व बाजूस असणारे रंगा मंदिर

a

ह्या अंत:पुरातच आहे एक अद्वितीय वास्तु ,ती म्हणजे पद्ममहाल

पद्ममहाल (Lotus Mahal)

पद्ममहाल ही अत्यंत देखणी वास्तु, अंतःपुरात प्रवेश करताच इंडो इस्लामिक शैलीत बांधलेली ही दुमजली इमारत आपले लक्ष वेधून घेते. राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित येण्यास पद्ममहालाचा वापर केला जात असावा असे मानण्यात येते. तालिकोटच्या लढाईत रामरायाचा पराभव झाल्यानंतरच्या ६ महिन्यांच्या विजयनगरच्या विध्वंसात वाचलेल्या मोजक्या वास्तूंपैकी ही एक ती बहुधा तिच्या इंडोइस्लामिक शैलीमुळेच. अर्धोन्मिलित कमलांप्रमाणे उमललेल्या एकामागे एक असलेल्या महिरपींच्या रचनेमुळेच हिला कमलमहाल अर्थात पद्ममहाल हे नाव मिळाले.

सर्व बाजूंनी देखण्या महिरपी असणार्‍या ह्या दुमजली पद्ममहालाला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना आहे. वरच्या मजल्यावरही महिरपीयुक्त सज्जे असून त्यावर पडदे टांगण्यासाठी सोयी आहेत. ह्या वास्तुच्या छताची रचना मंदिराच्या शिखरांप्रमाणे केलेली आहे.

पद्ममहाल

a

पाईशच्या वर्णनात अंतःपुरातील एका दुमजली वास्तूचे वर्णन येते, हंपीच्या शाही परिसरातील अवशेषांत एकांवर एक दालने असलेली एकच वास्तू आहे, पाईशच्या वर्णनात असलेल्या वास्तूशी पद्ममहालाचे थोडेफार साम्य आहे.

पाईश लिहितो,

या निवासात प्रवेश करताच डाव्या बाजूला एकावर एक अशी दोन दालने आहेत, ती येणेप्रमाणे- खालचे दालन जमिनीच्या पातळीपेक्षाही खाली आहे, त्याला सोन्याचा मुलामा दिलेल्या तांब्याच्या दोन पायर्‍या आहेत. येथून ते छतापर्यंत आतून सोन्याचा पत्रा जोडलेला आहे. ह्याचा बाहेरील भाग घुमटाप्रमाणे आहे. या निवासस्थानाला चार बाजू असलेली मंडपी असून ती विणलेल्या वेताची आहे. त्यावर माणिक, हिरे, मोती इत्यादिंचे रत्नखचित नक्षीकाम केलेले आहे. तिच्यावर दोन सोन्याचे गोल टांगलेले आहेत, या सुवर्णगोलांवरील जडावाचे काम बदामी आकाराचे आहे, त्यांच्यावर बारीक मोत्यांचे घट्ट्विणीचे जाळीदार नक्षीकाम केलेले आहे. घुमटावर देखील असेच गोल आहेत. या दालनात एक पलंग होता ज्याच्या पायावरील नक्षीकाम मंडपीप्रमाणे होते. पलंगाच्या उभ्या आडव्या दांड्या सोनेरी होत्या आणि त्यावर काळ्या मखमलीची गादी होती. त्याच्या चोहोंबाजूस वीतभर उंचीचा कठडा असून त्या कठड्याला मोती लावलेले होते. पलंगावर दोन तक्के असून इतर कोणतेही आच्छादन नव्हते. वरच्या दालनात काय होते ते मी सांगू शकणार नाही कारण मी ते पाहिले नाही. मी फक्त उजवीकडील खालचे दालन पाहिले. या प्रासादात कोरीव पाषाणाचे स्तंभ असलेले एक दालन आहे, वरपासून खालपर्यंत भिंतीसहित हे दालन हस्तीदंताचे बनलेले असून वरच्या तुळयांना आधार देणार्‍या गुलाब व कमलपुष्पांचे हस्तिदंती काम केलेले आहे. त्याची कारागिरी इतकी चांगली आहे हे असे काम इतरत्र आढळणे कठिण, याच बाजूस ह्या राज्यात येणार्‍या सर्व लोकांच्या, अगदी आम्हा पोर्तुगीजांपर्यंत- आयुष्याची धाटणी दाखविणार्‍या तसबिरी रंगवलेल्या आहेत. अंतःपुरातील राण्यांना त्यामुळे बाहेरील देशांतील रितिरिवाजाची माहिती होते. अंध व भिकारी ह्यांच्यासुद्धा तसबिरी आहेत. इथे दोन सोन्याची सिंहासने असून पडदे असणारा एक चांदीचा पलंग आहे. या ठिकाणी मला एक हिरव्या गारेचा लहानसा तुकडा दिसला. याला फार महत्वाचा समजतात. या पाट्याजवळ म्हणजे राजवाड्याच्या प्रवेशद्वार असलेल्या कमानीखाली एक कुलुप लावलेला लहान दरवाजा होता. या ठिकाणी आत पूर्वीच्या एका राजाचा खजिना आहे असे आम्हांला सांगण्यात आले.

पद्ममहाल

a

पद्ममहाल समोरुन

a

पद्ममहाल एका वेगळ्या कोनातून

a

महिरपी रचना

a

ही देखणी वास्तू पाहून झाल्यावर आपण अंतःपुराच्या मागील भागातून बाहेर पडताच एक देखणी आणि सुपरिचित वास्तू आपल्याला सामोरी येते ती म्हणजे हत्तीपागा.

गजशाळा (Elephant Stable)

हंपीतील सुस्थितीत असलेल्या वास्तूंपैकी एक म्हणजे हत्तीपागा. घुमटाकार शिखरं असलेली हि लांबच लांब इमारत. विजयनगरच्या सम्राटांचे शाही हत्ती ठेवण्यासाठी असलेली ही गजशाळा उर्फ हत्तीपागा. एकूण ११ प्रचंड कक्ष असलेल्या ह्या गजशाळेची मधला कक्ष हा मोठा असून त्याच्यावर हिंदू पद्धतीच्या शिखराची रचना जी आज भग्न झालेली आहे. तर ह्या कक्षाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी पाच पाच कक्ष असून प्रत्येकीचे शिखर घुमटाकार असलेल्या इस्लामिक शैलीत आहे. त्या घुमटांवर कमलपुष्पांच्या रचनेने फेर धरला आहे.

गजशाळेतील कक्षांच्या आतील बाजूस गजांना बांधण्यासाठी धातूचे आकडे असून ते आजही पाहता येतात, प्रत्येक कक्षात मागच्या बाजूस माहुतांना आत येण्यासाठी एक लहानसा दरवाजा आहे.

गजशाळा

a

a

गजशाळा

a

विजयनगरच्या गजांचे वर्णन करतांना पाईश लिहितो,

हत्तींवर झालरी असलेल्या मखमली, जरतारी झुली घातलेल्या असून शिवाय इतरही रंगीबेरंगी वस्त्रे भरपूर घातलेली असतात. वस्त्रांना दोन्ही बाजूंना लावलेल्या घटांच्या नादाने आसमंत भरुन जातो. हत्तींच्या गंडस्थळावर राक्षसमुखाची किंवा इतर अनेक मोठ्या प्राण्यांची चित्रे चितारलेली आहेत. चुणीदार अंगरखा घातलेली तीन/चार माणसे हत्तींच्या पाठीवर बसलेली असून त्यांच्या हातात ढाली, बरच्या असतात, जणू काही ते स्वारीसाठी सज्ज झालेले आहेत.

गजशाळा

a

ही गजशाळा बघून आम्ही परत फिरलो, अंतःपुर ओलांडून आलेल्या मार्गाने तटबंदीच्या बाहेर आलो. तिथेच एक पुरातत्वखात्याचे एक लहानसे खुले संग्रहालय आणि कार्यालय आहे. संग्रहालयात विजयनगरच्या भग्नावशेषांतील काही मूर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. शनिवार असल्याने संग्रहालय बंद होतं त्यामुळे आत काही जाता आलं नाही मात्र बाहेरुन जितक्या मूर्ती दिसल्या तितक्या पाहता आल्या.

संग्रहालयातील मूर्ती

a

अंतःपुर नकाशा

a

इथवर येईतो दुपारचे तीन साडेतीन वाजले होते, उन्ह अगदी रणरणत होतं. आता आमचा पुढचा टप्पा होता ते इथलं जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर त्याविषयी पुढच्या आणि शेवटच्या भागात.

क्रमशः

प्रतिक्रिया

कंजूस's picture

5 Apr 2021 - 8:48 pm | कंजूस

फोटो आणि या स्थानाचे पाइशच्या पुस्तकातले उतारे यामुळे लेख वाचनीय होतच आहे शिवाय पुन्हा जावेसे वाटत आहे.

फोटो आणि या स्थानाचे पाइशच्या पुस्तकातले उतारे यामुळे लेख वाचनीय होतच आहे.
पद्ममहल काय सुंदर असेल तेव्हा...
अप्रतिम!

चांदणे संदीप's picture

6 Apr 2021 - 2:29 pm | चांदणे संदीप

शिवाय पुन्हा जावेसे वाटत आहे.

+१

वल्लींना विनंती आहे की आपल्या सोबत मिपाकरांची एक वारी घडवून आणावी.

सं - दी - प

हा कमल महाल, कमलापुरचे संग्हालय आणि विठ्ठल मंदिर यासाठीचे मिळून एकच प्रवेश तिकिट मिळते ते त्याच दिवशी चालते. एका दिवशी हे तिन्ही पाहून उरलेला भाग दुसरे दिवशी करावा.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Apr 2021 - 9:07 pm | ॲबसेंट माइंडेड ...

अतिसुंदर.
पद्ममहल आणी गजशाळा देखणी आहे. माहीतीही छान.

गोंधळी's picture

5 Apr 2021 - 9:10 pm | गोंधळी

लॉकडाउनमध्ये अशा जागी अडकुन रहायला आवडेल.

पहिल्या पासून पुर्ण वाचुन सविस्तर रिप्लाय देतो...

तोपर्यंत पुढील भागासाठी शुभेच्छा ..

तुस्सी ग्रेट हो

पाहिल्यास ती वरती पातळ (कमी जाड) होत बाहेर वळलेली दिसेल. उमलणाऱ्या कमळासारखी. इथे एकेकाळी कमळाच्या पाकळ्यांची रचनाही असावी.

सुंदर, तपशीलवार. त्या काळचे चित्र डोळ्यापुढे येते. प्रत्यक्ष तिथे उभे राहिल्यास काय विलक्षण वाटत असेल.

लगे रहो.

चांदणे संदीप's picture

6 Apr 2021 - 2:44 pm | चांदणे संदीप

अप्रतिम लेख!
विठ्ठल मंदीराच्या भागाची आता वाट पाहणे आले.

सं - दी - प

वर्णन-चित्रे सुंदर. सगळा भाग राखलाही उत्तम आहे, फोटोतून कल्पना येते.

पाईशच्या नोंदींनी विशेष विस्तृत माहिती मिळते. हंपीच्या राज्यकर्त्यांच्या राण्यांसाठी परदा प्रथा होती याचे आश्चर्य वाटले. कार्नाडांच्या Battle of talakota आणि अन्य काही कानडी-इंग्रजी नाटकांमुळे दक्षिणेत अशी प्रथा असेल असे वाटलेच नाही :-)

जगप्रवासी's picture

8 Apr 2021 - 1:12 pm | जगप्रवासी

आणि फोटो सुद्धा छान आहेत.

पद्ममहल - काय सुंदर वास्तू आहे.

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2021 - 5:26 pm | चौथा कोनाडा

तटबंदी व निरीक्षण मनोरा, विविध कोनातून पद्ममहालाचे फोटो, पद्ममहालाच्या महिरपी रचनेचा क्लोजअप, गजशाळा सगळेच फोटो अप्रतिम !
पाइशचे उतारे वाचतच राहवे असे वाटते. पुस्तका
पालख्यांबरोबर चांगले तीनशे ते चारशे हिजडे असतात हे वाचून थक्क व्हायला होते !
नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर लेखन !
💖
प्रचेतस _/\_

पद्ममहल आणि गजशाळा अप्रतिम आहेत.
आजुबाजुचा सगळा परिसर पण अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसतोय

गोरगावलेकर's picture

10 Apr 2021 - 10:52 am | गोरगावलेकर

अतिशय छान लेख.
खूपच नविन माहिती मिळाली. फोटो सुंदरच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2021 - 12:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय सुंदर लेखन, पद्ममहाल आवडला. राजेरजवाड्यांचे वर्णन ऐकून त्यांच्या आयुष्याचा हेवा वाटावा असेच सर्व आहे. पाईशच्या वर्णनाने लेखाला चार चांद लागले आहेत, खुपच विस्तृत अशी माहिती आहे, आवडली. छायाचित्रही सुंदर आहेत. आभार.

-दिलीप बिरुटे

वाचायला घेते पहिल्या भागा पासून