आधीची लिंकः http://www.misalpav.com/node/6314
दिवसाचे दोन सरळसोट तुकडे झालेले. हापिस आणि घर. हापिसातल्या वेळाला एक अलिप्त कोरा-करकरीत वास. नव्या छत्रीवर पहिल्यांदा पाऊस पडला की जसा येतो, तसल्या करकरीत वॉटरप्रूफ पोताचा. अजून फारश्या मैत्र्याही नाही झालेल्या. नुसतंच गोड हसून साजरं करणं. उत्साहात जिम जॉइन केल्यामुळे सगळ्या दिवसालाच कॅलरीजचा धाक. मशीनमधली कितवीतरी कॉफी घेतानाही 'साखरेचा क्यूब टाकू की नको' असा धाक आणि मोहाच्या सीमारेषेवरचा प्रश्न दर वेळी. सामोशाच्या काउंटरवरून अंमळ चिडचिड करतच स्वतःला फ्रुट बोलच्या नीरस-नॉन ग्लॅमरस पर्यायाकडे वळवणं. काळोख पसरायला लागायच्या वेळी ऐन रहदारीच्या रस्त्यावरून परतताना घराचं कुलूप काढण्यासाठी स्वतःला एनकरेज करत, वाटेवरच्या लायब्ररीचं लॉलिपॉप दाखवत दाखवत जाणं.
'अमेरिकन लेज्' आणि तत्सम इझी कम्फर्ट एस्केप्सच्या जाळ्यात सापडण्याची हीच नेमकी वेळ.
त्या दिवशी मात्र चाळा म्हणून रस्ता थोडा बदलला तर भाजीवाल्यांची एक अलीबाबा-गुहाच समोर आल्यासारखी झाली.
उच्चमध्यमवर्गीयांच्या वस्तीत असतात तसली मोनोपॉलीनं माजलेली, महागडी, ब्रोकोली + पालक + टोमॅटो + कोबी + फरसबी इतपतच माना टाकलेले पर्याय असलेली दुकानं नव्हती ती. दुकानं नव्हेतच. गाळे. भाजीवाल्यांचे गाळे.
मोडाची कडधान्यं टोपल्यांत घेऊन बसलेल्या माम्या. हिरवीगार चवळई-माठ-अंबाडी-चाकवत-मेथी-पालक, शेपू-कोथिंबीर-पुदिना. बामणी पोपटी मिरच्या नि फटाकड्या हिरव्यागार मिरच्या. त्यांच्या मधोमध आले-लिंबाचा ढीग. ताजा फडफडीत कढीपत्ता. भलेथोरले भोपळ्याचे नि कोहळ्याचे तुकडे, काळीभोर वांगी, ताजी लसलसती गवार नि घेवडी. झालंच तर कांद्याची नि लसणीचीही पात. शेवग्याच्या शेंगा. लालसर रताळी. इवले इवले कांदे. काय न् काय. भरपूर आरडाओरडा. ओयस्तो पिशव्या भरभरूनही इथे-तिथे रेंगाळणारी गिर्हाइकं. रस्त्यात मधेच टाकलेले सडक्या पाल्याचे ढीग नि त्यातून वाट काढत हिंडणारं एक चुकार ढोर.
सगळं यथासांग. परिपूर्ण. लंपनच्या भाषेत सर्वांगसुंदर.
हरखलेच मी. एकदम मूड बदलून गेला. काय घेऊ न् काय नकोसं झालेलं. पर्समधे होत्या-नव्हत्या त्या सगळ्या पिशव्या भरून हावरटासारखी भाजीच भाजी घेतली. हातात लळत-लोंबत पिशव्या आणि डोक्यात 'आता काय बरं करू जेवायला?'
मग रस्ता बदलून संध्याकाळींचा पॅटर्न ठरूनच गेला. घरात कसली पिठं-मिठं आहेत ते नीट पाहायची सवय लागली. जिरं संपलंय, आठाच्या आत गेलं तर कोपर्यावर ताजं डोसा बॅटर मिळतं, फ्रीजमधली कोथिंबीर पिवळी पडायला लागलीय, गूळ चिरला तर सोईचं होईल का, असल्या नोंदी डोक्यात आपसूक होत गेल्या. घरी गेल्यावर तसं फार श्रमाचं -वाटणाघाटणाचं-नवलपरीचं काही करायचं त्राण नसेच. नसतंच. पण 'मरू दे, एक वडासांबार खाऊ नि कॉफी ढोसू की झालं'प्रकारचा माझा निरुत्साह ओसरून गेला. जे काही करायचं ते झटपट होणारं नि सोपं तर हवंच, पण भाज्या असलेलं-कमी तेलाचं-चविष्ट हवं असा आग्रह आला त्या जागी. आठवड्यात एकदा तरी उसळ, एक तरी पालेभाजी नि ऑलमोस्ट रोज कोशिंबीर करायचीच असं ठरून गेलं. मग वाणसामानही मीच बघून आणायला सुरुवात केली. या खेपेला भुईमुगाचं तेल घेतलं, तर पुढच्या खेपेला ठरवून सूर्यफुलाचं. ताजं नाचणीचं पीठ मिळालं की लगेच घेऊन ठेवायचं. मग कधी मिळेल त्याची शाश्वती नाही. साबुदाणा एकसारख्या रंगाचा असला तरच खिचडीत गंमत. रवा अगदी जिवापाड बारीक असला की उपम्याचा सत्यानाश होतो. घराजवळच्या सुपरमार्केटात मटकी सटीसहामाशी कधीतरीच मिळते. न कंटाळता चौकशी करत राहायचं.
सुगरणींना डाव्या हाताचा मळ वाटणारी, पण माझ्याकरता भलतीच गंमतशीर असलेली ऍडव्हेंचर्सपण केली. मटकीला मोड आणले (पहिल्या फटक्यात!), दुधाला विरजण लावलं (दोनदा दूध नुसतंच फाटून फुकट गेलं. :(), तव्याला चिकटणार्या धिरड्यांच्या पिठात थोडा रवा घालून धिरडी यशस्वी केली. काही काही सपशेल फसलेले प्रयोग, काही अपघाती यश, थोडी नासधूस, पण खूप सारी धमाल.
इतके दिवस फसलेले बेत लिहिले, आता थोडे यशस्वी झालेले. हे बेत नुसतेच 'बोलाची कढी-'छापाचे नव्हेत. खरंच करून बघितलेले.
डाळ-पालक, भात नि काकडीची कोशिंबीर
साहित्य:
साधारण तीन माणसांना जेवायला पुरेलश्या हिशेबानं -
पालकाची जुडी (निवडायला सोप्पी!)
लसणीच्या सताठ पाकळ्या
एक टोमॅटो चिरून
एक हिरवी मिरची
कढीलिंबाची चार पानं
अर्धी-पाऊण वाटी तूरडाळ
फोडणीचं साहित्य नि चमचाभर मालवणी मसाला (नसला तर लाल तिखट चालतं.)
दीड वाटी तांदूळ भातासाठी.
दोन लहान काकड्या.
वाटीभर दही.
कोथिंबिरीच्या चार काड्या.
डाळ-तांदुळाचा कुकर लावताना, पालक निवडून-धुऊन-बारीक चिरून घ्यायचा आणि डाळीतच घालायचा. हिरवी मिरचीपण एक उभी चीर देऊन, देठ काढून डाळीतच घालायची. वास मस्त लागतो तिचा डाळीला.
कुकर झाला, की भात तसाच गरम राहायला ठेवून द्यायचा नि डाळ-पालक काढून रवीनं घुसळून किंवा पळीनं घाटून घ्यायचा. जिरं-मोहरीची फोडणी करून त्यात लसणीच्या पाकळ्या चांगल्या लालसर करून घ्यायच्या. मग कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून परतून घ्यायचा. मग मसाला किंवा तिखट. त्याला तेल सुटलं, की डाळ-पालकाचं ते गरगट घालायचं. मीठ घालून आपल्याला हवं तितपत दाटसर होईपर्यंत थोडं पाणी घालून उकळायचं. डाळ-पालक तयार. (शेजारच्या काकींनी ही भाजी / आमटी केली की, आमच्या बाल्कनीपर्यंत दरवळ येई आणि मी कासावीस होत असे. त्यांच्याकडून पाकृ यथासांग शिकून झाली, आईच्या समोर उभं राहून करवून घेऊन झाली, तरी रामा शिवा गोविंदा! तशी चव काही केल्या येत नसे! कशी येणार? त्यांच्याकडचं तिखट म्हणजे मालवणी मसाला. आणि आमच्या ब्राम्हणी मिसळणात नुसतंच लाल तिखट! शेवटी बिचार्या भाजी केली न चुकता मला वाटीभर आणून द्यायला लागल्या. हल्ली मी या उसनवारीची मजल थेट मसाल्यापर्यंत मारून त्यांच्याच चवीची भाजी करायला लागले आहे.)
ही भाजी मला थोडी मसालेदार आवडते. पण काही जणांना नेमका तोच मसाल्याचा वास नडू शकतो. त्यांनी नुसतं लाल तिखट किंवा तेही वगळून नुसतंच हिरव्या मिरचीच्या वासावर भागवलं तरी भाजी चांगली लागते. हवं तर फोडणीत आल्याचं पातळ काप घालायचे. त्याचाही मस्त वास येतो.
काकडीची कोशिंबीर तर अगदीच सोपी. काकडी चिरून घ्यायची नि मिरचीचा एखादा तुकडा जाडा-जाडा चिरून घालायचा (काढायला सोपा). मीठ नि चिमटीभर हिंग लावून दहा मिनिटं ठेवायचं नि मग पिळून पाणी काढून टाकायचं. (या पाण्यात थोडं ताक मिसळून किंवा न मिसळताही नुसतंच प्यायला मला खूप आवडतं.) मग अगदी आयत्या वेळी दही आणि चिमटीभर साखर मिसळायची. वरून कोथिंबीर बारीक चिरून घालायची.
वाफाळलेला भात (डाएट करत नसलात तर वरून तूप. :(), उकळता डाळ-पालक आणि काकडीची कोशिंबीर.
सर्वांगसुंदर! :)
प्रतिक्रिया
14 Apr 2009 - 4:05 pm | श्रावण मोडक
प्रगतीच्या चवखुणा छान जमल्या आहेत.
काकडीच्या कोशिंबिरीतून मिरच्या का काढायच्या बुवा? त्या उलट अगदी बारीक कात्रीनं कापून टाकाव्यात. काकडीसोबत छान जिभ जाळत जातात. एरवी तिखट खाणारी मेघना हे कॉम्प्रोमाईज करते?
14 Apr 2009 - 4:07 pm | मेघना भुस्कुटे
मी एकटीच नाही ना हो राहत. :(
याआधीही लिहिलं आहे मी महाराष्ट्राच्या कोस्टल एलिमेंटबद्दल. त्याचसाठी बरं.
14 Apr 2009 - 4:11 pm | चतुरंग
मोडाची कडधान्यं टोपल्यांत घेऊन बसलेल्या माम्या. हिरवीगार चवळई-माठ-अंबाडी-चाकवत-मेथी-पालमोडाची कडधान्यं टोपल्यांत घेऊन बसलेल्या माम्या. हिरवीगार चवळई-माठ-अंबाडी-चाकवत-मेथी-पालक, शेपू-कोथिंबीर-पुदिना. बामणी पोपटी मिरच्या नि फटाकड्या हिरव्यागार मिरच्या. त्यांच्या मधोमध आले-लिंबाचा ढीग. ताजा फडफडीत कढीपत्ता. भलेथोरले भोपळ्याचे नि कोहळ्याचे तुकडे, काळीभोर वांगी, ताजी लसलसती गवार नि घेवडी. झालंच तर कांद्याची नि लसणीचीही पात. शेवग्याच्या शेंगा. लालसर रताळी. इवले इवले कांदे. काय न् काय. भरपूर आरडाओरडा. ओयस्तो पिशव्या भरभरूनही इथे-तिथे रेंगाळणारी गिर्हाइकं. रस्त्यात मधेच टाकलेले सडक्या पाल्याचे ढीग नि त्यातून वाट काढत हिंडणारं एक चुकार ढोर.
झक्कास वर्णन बाजाराचं चित्र उभं राहिलं डोळ्यांपुढे.
सक्काळी सक्काळी ब्रेकफास्टलाच ओरपावा डाळपालक असं वाटायला लागलं! मस्त पाकॄ!! :)
चतुरंग
14 Apr 2009 - 4:17 pm | पर्नल नेने मराठे
बामणी पोपटी मिरच्या
हेय काय? :D
चुचु
14 Apr 2009 - 4:30 pm | विसोबा खेचर
मेघना मॅडम यांचे मिपावर पुनरागमनाबद्दल आभार...
लेख नेहमीप्रमाणेच मस्त! :)
तात्या.
14 Apr 2009 - 4:32 pm | मेघना भुस्कुटे
कैच्या कैच काय तात्या? पुनरागमन कसलं? मधे थोडे दिवस वेळ नव्हता फक्त.
14 Apr 2009 - 5:03 pm | सुप्रिया
लेख नेहमीप्रमाणेच मस्त!
हेच म्हणते.
-सुप्रिया
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
14 Apr 2009 - 4:35 pm | आनंदयात्री
>>हापिसातल्या वेळाला एक अलिप्त कोरा-करकरीत वास. नव्या छत्रीवर पहिल्यांदा पाऊस पडला की जसा येतो, तसल्या करकरीत वॉटरप्रूफ पोताचा.
क्या बात है !! या वाक्यातच जिंकलं !!
14 Apr 2009 - 5:52 pm | परिकथेतील राजकुमार
हेच म्हणतो.
माझ्या आधी माझ्या मनातली प्रतिक्रीया हजर ;) धन्यु रे यात्री.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 Apr 2009 - 5:03 pm | स्वाती दिनेश
मोडाची कडधान्यं टोपल्यांत घेऊन बसलेल्या माम्या. हिरवीगार चवळई-माठ-अंबाडी-चाकवत-मेथी-पालमोडाची कडधान्यं टोपल्यांत घेऊन बसलेल्या माम्या. हिरवीगार चवळई-माठ-अंबाडी-चाकवत-मेथी-पालक, शेपू-कोथिंबीर-पुदिना. बामणी पोपटी मिरच्या नि फटाकड्या हिरव्यागार मिरच्या. त्यांच्या मधोमध आले-लिंबाचा ढीग. ताजा फडफडीत कढीपत्ता. भलेथोरले भोपळ्याचे नि कोहळ्याचे तुकडे, काळीभोर वांगी, ताजी लसलसती गवार नि घेवडी. झालंच तर कांद्याची नि लसणीचीही पात. शेवग्याच्या शेंगा. लालसर रताळी. इवले इवले कांदे. काय न् काय. भरपूर आरडाओरडा. ओयस्तो पिशव्या भरभरूनही इथे-तिथे रेंगाळणारी गिर्हाइकं. रस्त्यात मधेच टाकलेले सडक्या पाल्याचे ढीग नि त्यातून वाट काढत हिंडणारं एक चुकार ढोर.
मस्त.. आवडलंच वर्णन एकदम आणि पाकृही झकास !
स्वाती
14 Apr 2009 - 5:05 pm | निखिल देशपांडे
हापिसातल्या वेळाला एक अलिप्त कोरा-करकरीत वास. नव्या छत्रीवर पहिल्यांदा पाऊस पडला की जसा येतो, तसल्या करकरीत वॉटरप्रूफ पोताचा
सुरवात मस्त झालीये...
आणी ते बाजाराचे वर्णण आवडले....
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
14 Apr 2009 - 5:10 pm | मैत्र
लेख छान आहे ... पण नेहमी असणारा खुसखुशीत पणा थोडासा कमी आहे. पण तात्या म्हणतात तसं पुनरागमनाचा आनंद जास्त आहे ...
सगळ्या पाककृतींमध्ये लसूण सढळ हस्ते आहे. नाहीच घालता आला तर तोंडीलावण्यात घेतला आहे.. याचं रहस्य काय ?
आता मात्र नियमित पणे येऊ द्या 'उर्फ सुगरणीचा सल्ला '
14 Apr 2009 - 5:20 pm | मेघना भुस्कुटे
खरं सांगू का? मला त्या 'खुसखुशीतपणा'चं जरा ओझंच झालं होतं. दर लेखात आपल्या काहीतरी चावर्या क्लृप्त्या करायचं बंधन वाटायला लागलं होतं. म्हणून मग 'खाणंपिणं' इतकंच सूत्र ठेवलं आणि लिहिलं जे मनाशी आलं ते.
बाकी लसणीबद्दल तुमचं खरंय. :) पण मला आवडते लसूण. पुलंनी कुठेसं म्हटलंय ना - मराठ्यांच्या मुखश्वासदर्पानंच (आणि पर्यायानं कांदा-लसणीच्या गंधानं) मुघल पळाले - ते माझं अतिप्रिय वाक्य. लसणीखेरीज काही गंमत नाही. :)
14 Apr 2009 - 6:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मेघना, बदल एकदम आवडला आहे. माझ्या अगदी डोक्यात आलेलंच होतं हे वाचताना, ललित लिखाण उत्तमच. पाकृ आवडती आहेच. मी कधी पालक कधी मेथी घालते. आणि मूडप्रमाणे, लाल मिरच्या, बोर मिरच्या, लसूण यांचं प्रमाण बदलते; तेवढाच रुचीपालट.
तूप डाएट म्हणून टाळत असलीस तर तेलाऐवजी तूपात फोडणी कर, तेवढ्या कमी कॅलरीज आणि तूपाची चवही येते.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
14 Apr 2009 - 6:24 pm | चतुरंग
लेखनशैलीतल्या बदलाबद्दल लिहायचे राहून गेले. ही नवीन धाटणीही मनोरंजक आहे.
(अवांतर - साजूक तूप हे व्यवस्थित बनवलेले असले तर शरीराला अतिशय पोषकच असते. भातावर तूप टाळू नये -ते उत्तम डाएट आहे. त्याऐवजी एखादा मेदूवडा कमी खा! ;) )
चतुरंग
14 Apr 2009 - 9:00 pm | मेघना भुस्कुटे
व्यवस्थित बनवलेले म्हणजे काय? माझ्या माहितीप्रमाणे तुपात तेल्याइतक्याच कॅलरीज असतात. शिवाय लोकांना वाटतं, तसं गाईचं तूप कमी कॅलरीजचं आणि म्हशीचं जास्त - असंही नसतं. गाईच्या दुधापासून म्हशीच्या दुधापेक्षा कमी तूप निघतं, इतकंच.'
पण मग तेलापेक्षा तूप का श्रेष्ठ? की वर आदिती म्हणालीय तसा तुपाचा वास येतो म्हणून?
15 Apr 2009 - 3:13 pm | भडकमकर मास्तर
साजुक तुपावरून सकाळच्या फॅमिली डाक्टर या पुरवणीत तुपाचे पाठीराखे डॉ.बालाजी तांबे आणि तुपाचे दुश्मन कोणतेतरी कार्डिऑलॉजिस्ट यांची मस्त धुमश्चक्री आठवली.......
...
अवांतर : लेख छान आहे. :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
14 Apr 2009 - 5:29 pm | चकली
छान जमलाय. अतिशय आवडला.
चकली
http://chakali.blogspot.com
14 Apr 2009 - 5:37 pm | शितल
मस्त लिहिले आहेस.:)
14 Apr 2009 - 5:42 pm | सखी
मेघना - खरचं बाजाराचं चित्र उभं राहिलं डोळ्यांपुढे... आणि लगेच जाऊन ताजी भाजी आणावीशी वाटतेय. सकाळी सकाळी वाचुनच भूक लागली.
हल्ली मी या उसनवारीची मजल थेट मसाल्यापर्यंत मारून त्यांच्याच चवीची भाजी करायला लागले आहे.
जरा तो मालवणी मसाला पण सांग ना कसा करायचा ते.
14 Apr 2009 - 8:43 pm | मेघना भुस्कुटे
आईला विचारून लिहिते प्रमाण. उद्या-परवापर्यंत नक्की.
21 Apr 2009 - 12:12 pm | मेघना भुस्कुटे
मालवणी मसाला - आईच्या मालवणी मैत्रिणीच्या मावशीच्या सौजन्याने. (प्रमाण बहुतेक ३-४ किलो मसाल्याचं असणार. आपापल्या गरजेप्रमाणे गुणोत्तरात कमी-जास्त करून घ्या.)
१ किलो बेडगी मिरची
१ किलो संकेश्वरी मिरची
४०० ग्रॅ. हळद
२५० ग्रॅ. काळी मिरी
२५० ग्रॅ. खसखस
२५० ग्रॅ. बडीशेप
३० ग्रॅ. तमालपत्र
३० ग्रॅ. दालचिनी
३० ग्रॅ. लवंग
५० ग्रॅ. जायपत्री
५० ग्रॅ. वेलची (कुठली ते सांगितलं नाही, म्हणजे लहान वेलची असणार.)
५० ग्रॅ. चक्रीफूल
५० ग्रॅ. शहाजिरे
५० ग्रॅ. मेथी
५० ग्रॅ. दगडफूल
५ जायफळे
मिरच्या उन्हात खडखडीत वाळवून डेखं काढून घ्यायच्या. मग थोडक्या तेलावर नीट भाजून घ्यायच्या. जायफळाखेरीज बाकीचं सगळं साहित्यही वेगवेगळं भाजून घ्यायचं. न करपवता. आणि मग हे सगळं थंड करून दळून घ्यायचं.
14 Apr 2009 - 5:44 pm | अवलिया
वा! मस्त !! :)
--अवलिया
14 Apr 2009 - 8:25 pm | प्राजु
मोडाची कडधान्यं टोपल्यांत घेऊन बसलेल्या माम्या. हिरवीगार चवळई-माठ-अंबाडी-चाकवत-मेथी-पालक, शेपू-कोथिंबीर-पुदिना. बामणी पोपटी मिरच्या नि फटाकड्या हिरव्यागार मिरच्या. त्यांच्या मधोमध आले-लिंबाचा ढीग. ताजा फडफडीत कढीपत्ता. भलेथोरले भोपळ्याचे नि कोहळ्याचे तुकडे, काळीभोर वांगी, ताजी लसलसती गवार नि घेवडी. झालंच तर कांद्याची नि लसणीचीही पात. शेवग्याच्या शेंगा. लालसर रताळी. इवले इवले कांदे. काय न् काय. भरपूर आरडाओरडा. ओयस्तो पिशव्या भरभरूनही इथे-तिथे रेंगाळणारी गिर्हाइकं. रस्त्यात मधेच टाकलेले सडक्या पाल्याचे ढीग नि त्यातून वाट काढत हिंडणारं एक चुकार ढोर.
जबरदस्त!! डोळ्यांसमोर उभा राहिला बाजार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Apr 2009 - 8:57 pm | संदीप चित्रे
मेघना....
लेख तर आवडलाच पण एका प्रतिक्रियेच्या उत्तरातलं तुमचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे.
मनापासून सरसरून लिहिलं की शैली बिली भानगडी पाळत बसावं लागत नाही.
पाकृमधे योग्य मसाला वापरायला लागलात ते खूपच छान..
काहीही 'सर्वांगसुंदर' असण्यासाठी त्यातलं प्रत्येक अंग सुंदर असावंच लागतं ... जसं इथे मालवणी मसाला !!
तुमचं लेखन वाचायला नेहमीच आवडतं... विशेषतः 'निळी छटा अपरिहार्य' मी मधूनच कधीतरी पुन्हा (पुन्हा) वाचतो :)
14 Apr 2009 - 9:07 pm | शाल्मली
मस्त!! लसणीसारखाच चुरचुरीत लेख.
आणि बाजाराचं वर्णन तर छानच.. बाजार डोळ्यांसमोर आला.
अजूनही येऊदे.
--शाल्मली.
14 Apr 2009 - 10:12 pm | कपिल काळे
छान लेखन.
14 Apr 2009 - 11:02 pm | पिवळा डांबिस
मस्तच!!
उत्साहात जिम जॉइन केल्यामुळे सगळ्या दिवसालाच कॅलरीजचा धाक...
परतताना घराचं कुलूप काढण्यासाठी स्वतःला एनकरेज करत, वाटेवरच्या लायब्ररीचं लॉलिपॉप दाखवत दाखवत जाणं...
हल्ली मी या उसनवारीची मजल थेट मसाल्यापर्यंत मारून त्यांच्याच चवीची भाजी करायला लागले आहे...
भले बहाद्दर!!!
शब्दांची अचूक निवड! जियो!!
मेघनाच्या लेखनाचा फॅन,
पिडांकाका
15 Apr 2009 - 12:07 am | भाग्यश्री
सहमत !!!
मस्त लिहीलंय !
14 Apr 2009 - 11:05 pm | नंदन
लेख आवडला. भाजीगल्लीचे वर्णन खासच. ग्रँटरोड स्टेशनजवळची ती अरूंद पण अशीच वेगवेगळ्या भाजीपाल्यांनी भरलेली मंडई आठवली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
15 Apr 2009 - 12:15 am | संदीप चित्रे
तू रोज नक्की किती वाचन करतोस?
तू दिलेले दुवे म्हणजे खजिनाच असतात !
15 Apr 2009 - 12:16 am | रेवती
मस्त लेख!
भाजी मंडईचं वर्णन वाचून लगेच भाजी आणायला जावेसे वाटले.
डाळ पालक मालाही आवडतो, तोही लसणीची फोडणी घालून.
मालवणी मसाला मात्र कधी वापरला नाहीये.
रेवती
15 Apr 2009 - 2:59 am | चित्रा
लेख आवडला.
अशीच पालकासारखी मेथीची लाल-मिरच्या आणि लसणीची फोडणी दिलेली भाजी आमच्या घरी प्रचंड खपते.
15 Apr 2009 - 11:15 am | स्मिता श्रीपाद
मस्तच लेख...
भाजीगल्ली फार आवडली..:-)
अजुन सल्ल्यांची वाट पाहाते आहे...
-स्मिता
15 Apr 2009 - 6:09 pm | स्वाती राजेश
आणि रेसिपी सुद्धा छान....
वर्णन झकास...
15 Apr 2009 - 7:35 pm | क्रान्ति
लेख आणि पाकृ दोन्हीही खमंग!
;;)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
14 Aug 2009 - 4:07 pm | भाग्यश्री कुलकर्णी
माझ्या नव-याला फार आवड्त हे .छानच आहे लेख नेहमीप्रमाणे.