हंपी: भाग १ - दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं
हंपी: भाग २ - दिवस पहिला- राजवाडा परिसर- भाग २
हंपी: भाग ३ - दिवस पहिला - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार
हंपी: भाग ४ - दिवस पहिला - दारोजी अस्वल अभयारण्य
हंपी: भाग ५ - दिवस दुसरा -विरुपाक्ष मंदिर आणि हेमकूट टेकडी
कृष्ण मंदिर अर्थात बाळकृष्ण मंदिर
कमलापूरवरुन जाताना हंपीच्या मुख्य रस्त्यावरच आहे हे कृष्ण मंदिर. रस्त्याच्या उजवीकडे राजवाड्यांचा विभाग (Royal Enclosure) आहे तर त्याच्या पुढे गेल्यास रस्त्याच्या डावीकडे पहिले मोठे मंदिर लागते ते कृष्ण मंदिर. विरुपाक्ष मंदिरापासून हे मंदिर अगदीच जवळ आहे.
कृष्ण मंदिर हे पंचायतन स्वरुपात असलेले एक भव्य मंदिर. हे मंदिर सम्राट कृष्णदेवरायाने इस १५१३ साली त्याच्या उत्कल स्वारीतल्या विजयाप्रीत्यर्थ बांधलेले आहे.
पोर्तुगीज प्रवासी फेर्नांव नूनीझच्या वृत्तांतात कृष्णदेवरायाच्या ओरिसा स्वारीचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे येतो.
कृष्णदेवरायाने गादीवर येताच आपला साम्राज्यविस्तार सुरु केला. ओरीसावर स्वारी करुन त्याने उदयगिरीच्या किल्ल्याला ३४००० पायदळ आणि ८०० हत्तींसह वेढा घातला. किल्ल्यात १०००० सैन्याची शिबंदी होती आणि किल्ला अतिशय मजबूत होता. सुमारे दीड वर्ष वेढा घालून रायाने किल्ल्यात जाण्याच्या असंख्य वाटा तयार केल्या,मोठमोठे दगड फोडून मार्ग तयार केले, किल्ल्यात जाणारी एकमेव वाट जी अतिशय अरुंद आणि दुर्गम होती ती त्याने सुगम करुन घेतली आणि किल्ला जिंकला आणि ओरिसाच्या राजाच्या आत्याला कैद केले.. उदयगिरीचा किल्ला जिंकल्यावर रायाने कोडवीडवर स्वारी करुन त्याला वेढा घातला. ओरिसाचा राजा तेराशे हत्ती, वीस हजार घोडदळ आणि पन्नास हजार पायदळासह चालून आला. हे पाहून रायाने शहरात काही सैन्य ठेवून नदीपाशी आपला तळ उभारला. ओरिसाचा राजा नदीच्या दुसर्या तीरावर ससैन्य उभा होता. तो नदी ओलांडून येत नाही हे पाहताच रायाने नदी ओलांडून त्याच्यावर स्वारी केली आणि घमासान लढाईत उत्कलराजाचा पराभव केला. राया नंतर कोंडापल्ली ह्या ओरिसाच्या राजधानीच्या ठिकाणी गेला आणि तीन महिने वेढा घातल्यावर त्याने राजधानी जिंकली. आणि ओरिसाच्या परागंदा राजास मी तुझी येथे रणभूमीवर वाट पाहात आहे असे कित्येक निरोप पाठवले, पण तो कधीच आला नाही, कोंडापल्लीस रायाने अनेक मंदिरांना देणग्या दिल्या. तिथे एक भव्य मंदिर बांधून त्याने एक शिलालेख रोविला तो असा, 'कदाचित ही अक्षरे जेव्हा मिटून जातील तेव्हा ओरिसाचा राजा विजयनगरच्या राजाशी सामना करेल, ओरिसाच्या राजाने जर ही अक्षरे मिटवली तर त्याच्या राणीस विजयनगरच्या राजाच्या घोड्यास नाल ठोकणार्या लोहारांच्या हाती दिले जाईल'.
ह्यानंतर ओरिसाच्या राजाने तह करुन सम्राट कृष्णदेवरायास आपली मुलगी दिली, रायाने पण तीचा पत्नी म्हणून स्वीकार करुन उत्कल राजाला नदीपलीकडचा मुलुख परत करुन नदीअलीकडचा मुलुख स्वतःकडे ठेवला.
कृष्णमंदिरातली मुख्य मूर्ती हि बाळकृष्णाची होती जी आज तेथील मंदिरात नसून चेन्नईच्या राज्य संग्रहालयात आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातील आतल्या भागावर कृष्णदेवरायाच्या ओरिसावरील स्वारीचे प्रसंग कोरलेले आहेत.
कृष्ण मंदिर
गोपुरातील आतील भागांवर असलेले विजयनगरच्या सैन्याचे शिल्पांकन
पंचायतन स्वरुपातल्या या मंदिरात काही उपमंदिरे, उपमंडल, पाकशाळा आहेत. मुख्य मंदिराच्या तलविन्यासात एक गर्भगृह जिथे बाळकृष्णाची मूर्ती होती, एक अर्धमंडप, महामंडप आणि तीन बाजूंना खुला असणारा भव्य सभामंडप आहे. हंपीतील बर्याच मंदिरांची रचना काहीशी अशीच आहे. मुख्य मंदिराच्या पुढ्यातच एक शिलालेख असून त्यावर मंदिर निर्माण आणि उत्कल प्रदेशावरील विजयाबद्दल लिहिलेले आहे.
कृष्ण मंदिर प्रांगण आणि शिलालेख
शिलालेख
कृष्ण मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या सभामंडपातील स्तंभावर असलेल्या प्रचंड व्यालमूर्ती. व्याल हे सिंहासारखे काल्पनिक पशू. हे दुष्ट शक्तींना प्रतिबंध करतात अशी समजूत.
स्तंभांवरील व्याल
स्तंभांवरील व्याल
कृष्ण मंदिरातील सभामंडपा हा अनेक स्तंभांवर तोललेला आहे. स्तंभांवर कृष्णाच्या जीवनातले असंख्य प्रसंग कोरलेले आहेत. हे मंदिर बाळकृष्णाचे असल्याने त्याचे गोकुळातील आणि मथुरेतील प्रसंगच येथे प्रामुख्याने आहेत.
कृष्णमंदिरातील सभामंडप
सभामंडप एका वेगळ्या कोनातून
बाळकृष्णास उखळाला बांधल्याचा प्रसंग
कालियामर्दन
सिंहासनावर बसलेल्या कंसाचा केश ओढून कृष्णाने केलेला वध
मंदिराच्या शिखरांवर गरुड, दशावतार अशी विविध शिल्पे आहेत.
मंदिराचे विस्तीर्ण प्रांगण
मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार आणि उपमंडप
मुख्य मंदिर आणि उपमंदिरं
मुख्य मंदिर, उपमंडप आणि उपमंदिर
मंदिर बघून बाहेर आलो, रस्त्याच्या पलीकडील बाजूस आहे तो असंख्य मंडपांनी, दुकानांनी युक्त असलेला कृष्ण बाजार, एकेकाळी गजबजून गेलेला हा कृष्ण बाजार आज भग्नावस्थेत आहे.
कृष्ण बाजार
कृष्णबाजारातील पुष्करिणी आणि दुकांनातील स्तंभ
ह्यानंतर आम्ही निघालो ते येथून अगदी जवळच असलेल्या हंपीतील प्रसिद्ध लक्ष्मीनृसिंहाकडे
लक्ष्मीनृसिंह अर्थात उग्रनृसिंह मंदिर
हंपीतील ही सर्वात विशाल मूर्ती. हंपी म्हटल्यावर दोन गोष्टी लगेच डोळ्यांसमोर येतात, एक विठ्ठल मंदिरातील दगडी रथ आणि दुसरी म्हणजे उग्रनृसिंहाची ही भव्य मूर्ती. ही उग्रनृसिंहाची मूर्ती लक्ष्मीनृसिंहाची होती, आजमितीस लक्ष्मी पूर्णपणे भग्न झालेली असून तिचा फक्त एक हात आपल्याला दिसतो. मूळचा लक्ष्मीनृसिंह हळूहळू उग्रनृसिंह म्हणून प्रचलित झाला.
६.७ मीटर उंच असलेली ही मूर्ती इस १५२८ साली सम्राट कृष्णदेवरायाच्या आदेशाने एका भव्यशिलाखंडावर कोरण्यात आली आणि कृष्णभट्टाच्या हस्ते हिची प्रतिष्ठापना करण्यात आली.
लक्ष्मी-नृसिंह
शेषनागाच्या वेटोळ्यावर बसलेली ही मूर्ती पद्मासनात असून तिच्या दोन्ही गुडघ्यांवर योगपट्ट आहे. नृसिंहाच्या मूर्तीवर शेषनागाने आपल्या सात फण्यांच्या साहाय्याने छ्त्र धरिले आहे. नृसिंह चतुर्भुज असून त्याचे चारही हात भग्न आलेले आहेत. त्याच्या डावी मांडीवर बसलेली लक्ष्मी आज पूर्णपणे नष्ट झालेली असून आज केवळ तिच्या उजव्या हाताचा भाग नृसिंहाच्या खांद्याच्या बाजूस लपेटलेला दिसतो. दाक्षिणात्य पद्धतीचा मुगुट घालून बसलेल्या नृसिंहाचे डोळे खोबणीतून बाहेर आलेले असून त्याच्या कराल दाढा विचकलेल्या आहेत. शेषनागाच्या वेटोळ्याच्या बाजूस मकरतोरण आहे.
लक्ष्नीनृसिंह
उजव्या बाजूस लक्ष्मीचा हात दिसत आहे.
ही मूळ मूर्ती कशी असावी ह्याची काहिशी कल्पना आपल्याला येथीलच विरुपाक्ष मंदिरातील स्तंभावर असलेल्या लक्ष्मीनृसिंहाच्या मूर्तीवरुन येते.
ह्या मूर्तीच्या शेजारीच आहे ते बडवीलिंग मंदिर
बडवीलिंग मंदिर
हे मंदिर अगदीच छोटेखानी पण इथले शिवलिंग हंपीतील सर्वात भव्य. दगडांवर रचलेल्या विटांचे शिखर असलेले हे चौकोनी लहानसे मंदिर. अगदी साध्याश्याच असलेल्या ह्या मंदिरात एकाच पाषाणापासून तयार केलेले ३ मीटर उंचीचे भव्य शिवलिंग आहे. शिवलिंगावर शंकराचे तीन डोळे कोरलेले आहेत. जवळच असलेल्या लहानश्या कालव्यामुळे हे शिवलिंग कायमच पाण्याने वेढलेले असते. एका गरीब शेतकरी स्त्रीने हे शिवलिंग स्थापित केले अशी दंतकथा आहे. बडवा म्हणजे गरीब म्हणूनच याचे नाव बडवीलिंग पडले असे मानतात.
लक्ष्नीनृसिंह आणि बाजूलाच असलेले बडवीलिंग मंदिर
बडवीलिंग मंदिर
पाण्याने वेढलेले भव्य शिवलिंग
शिवलिंगावर कोरलेले शंकराचे तीन डोळे
हंपीतील हा भाग आहे विलक्षण सुंदर, एका बाजूला शाही निवास तर दुसर्या बाजूस केळीच्या हिरव्यागार बागा. इथल्या कालव्यामुळे हा भाग अतिशय हिरवागार आहे. ही मंदिरे बघेपर्यंत जवळपास दीड वाजत आले होते, उसाचा रस पिवून आम्ही आता परत निघालो ते कमलापूरला दाक्षिणात्य पद्धतीच्या मेसमध्ये जेवायला, त्यानंतर जायचे होते ते शाहीभागात कमलमहाल, हत्तीपागा बघायला त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
प्रतिक्रिया
29 Mar 2021 - 11:45 am | प्रशांत
हा हि भाग आवडला,
पुढचा भाग लिहायला जास्त वेळ लावु नको.
29 Mar 2021 - 12:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
आता थांबू नका,
ह भाग आवडला, कृष्णदेवरायाचा इतिहास माहित नव्हता.
पैजारबुवा,
29 Mar 2021 - 12:47 pm | कपिलमुनी
भाग अतिशय आवडला !
लौकरच 2023 ला भेटूच पुढील भागात
29 Mar 2021 - 4:30 pm | प्रचेतस
लिहीन लवकरच :)
29 Mar 2021 - 4:54 pm | गणेशा
च्यायला २०१७ ला लिहिलेला काय पहिला भाग..
वल्ली मित्रा अभ्यास करतो कि एका एका शब्दावर छन्नी हातोडी चालवून कलाकुसर करत असतो...
नाही म्हणजे जसे चित्र तसेच शब्द म्हणुन
29 Mar 2021 - 1:15 pm | कंजूस
पण आला सहावा भाग.
होस्पेटकडून हंपीबाजारकडे ( विरुपाक्षच्या बाजूला, शेवटचा स्टॉप ) येणाऱ्या सर्व बसेस कमलापूरमार्गे राणीचे स्तानानागरवरून येतात. पण कारवाले अगोदरच्या तळ्याकडून डावीकडे वळतात व हे कृष्णमंदिर येते. इथेच कमलापुरकडचा मार्ग मिळतो.
शिलालेख - साधारणपणे अगदी वरती सूर्य चंद्र असतात राजाचा आदेश असला तर. इथे दिसले नाहीत.
29 Mar 2021 - 4:32 pm | प्रचेतस
हंपीत अगणित शिलालेख आहेत, मंदिरांच्या पुढ्यात, भिंतींवर, मात्र चंद्र सूर्य (यावच्चंद्रदिवाकरौ) जवळपास नाहीत.
29 Mar 2021 - 1:19 pm | कंजूस
कृष्णमंदिरावरच्या शिल्पांपेक्षा अधिक ठसठशीत आणि रेखीव वाटतात ना? उदाहरणार्थ उखळाला बांधलेला बाळकृष्ण.
29 Mar 2021 - 4:33 pm | प्रचेतस
हो, हजारराम मंदिर हे शाही निवासात असल्याने शिल्पे चांगली कोरली असावीत.
29 Mar 2021 - 1:22 pm | गवि
अभ्यासपूर्ण उत्तम लेख. पुभाप्र.
29 Mar 2021 - 1:36 pm | कंजूस
मथुरा,गोकूळ, वृंदावन इथे मी काही वर्षांपूर्वी गेलो होतो. मला तिथे पौराणिक - ऐतिहासिक स्थान असूनही वातावरण आवडले नव्हते. बाजारू वाटली जागा. त्या मानाने केरळातील मंदिरे फार प्रभाव टाकतात.
युट्यबवरचा एक नवीन विडिओ - मथुरा गोकूळ https://youtu.be/_OE2T8v1whY
29 Mar 2021 - 2:41 pm | टर्मीनेटर
कृष्णदेवरायाचा इतिहास आणि पेशन्स दोन्ही आवडले.. फोटोही मस्तच 👍
पूर्वनियोजन केले असताना हम्पीने ३ वेळा हुलकावणी दिली असल्याने आता एखाद दिवशी असेच काही न ठरवता अचानक निघायचा विचार आहे, त्यातही काही कारणाने अपयश आल्यास मात्र असे काही ठिकाण ह्या पृथ्वीतलावर अस्तित्वात नसून, ती एक काल्पनिक जागा आहे अशी मनाशी खूणगाठ बांधून तिकडे जाण्याचा विचारही कधी करणार नाही हे नक्की 😀
पुढचा भाग लवकर येउद्या, वाट बघतोय!
29 Mar 2021 - 4:34 pm | प्रचेतस
आवर्जून पाहिलंच पाहिजे असं ठिकाण, ट्रूली वर्ल्ड हेरिटेज.
29 Mar 2021 - 4:44 pm | कंजूस
आणि प्लानिंगसाठी युट्युब विडिओचा आधार घेऊ नका असं मी सुचवेन. कारण हंपी (सोलापूर -- विजापुरा--बदामी -पट्टडकल-ऐहोळे ---हंपी ---लखुंडी--- हुबळी/-गोवा इथून परत हारूट) आणि खजुराहो कुणालाच बरोबर विडिओत पकडता आलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे.
29 Mar 2021 - 6:02 pm | चौकटराजा
मैसुरू येथील एक प्रवासप्रेमी श्री सुदीश कोतीकल यानी हम्पीत दहा एक दिवस तळ ठोकून हंपी येथील गाईड श्री मन्जूनाथ याचे बरोबर हम्पी विन्चरून काढली आहे ! त्यान्चे प्रत्येकी साधारण ३० मिनिटाचे असे वीसेक विडिओ यू ट्यूब वर आहेत इतकेच नव्हे तर कर्नाटक राज्यातील आपल्याला माहीत नसल्या अनेक जागा ते अतिरिक विडिओ काढून दाखवीत आहेत. ( कर्नाटक हे माझे सर्वात लाडके राज्य एक प्रवासी म्हणून आहेच यात शंका नाही ) !
दोघांना एकेक लाख पगार आहे मग काढा गाडी व गाठा हंपी अशी अनेक जोडपी इथे येत असतात .त्यांना रस असलेले हिपपी आयलंड आता उध्वस्त करण्यात आले आहे ! अशा लोकांना तिथे सेक्रेड हंपी पाहण्याखेरीज गत्यंतर नाही !!
29 Mar 2021 - 6:31 pm | कंजूस
आहेत। तिकडे बिचारे कंटाळले की हंपीला येतात. मग त्या हिप्पी सेंटरचा युट्युबवाल्यांनी फारच बोभाटा केला.
अजूनही बेंगळुरू टु हम्पी व्हाट टु सी - सनराईज फ्राम १/२/३, हिप्पी सेंटर, आणि कुठल्या हाटेलात ठिय्या, आणि बेंगळुरू ट्राफिकला चार शिव्या असा किस्सा असतो.
29 Mar 2021 - 7:49 pm | कंजूस
फारच व्यापक ( डीटेल) आहेत. नवीन सामान्य पर्यटक घाबरेल.
वल्ली आणि तुम्हाला समजतील. बराच अभ्यास केलेला असल्याने.
साधी(!!) वेरूळची लेणी पर्यटक कशी अर्ध्या तासात उरकतात आणि घृष्णेश्वराला दर्शनाला जातात पाहा. काही पर्यटक फक्त शेवटच्या पाच लेण्या (३०-३४)पाहतात. असो. चालायचेच.
29 Mar 2021 - 8:54 pm | Bhakti
वेरूळ..
मी पण असंच पाहिलं होतं...पळत पळत.. फार चुटपुट वाटते अजूनही..
जिथे तिथे सेल्फी काढणारे पण महान पर्यटकपण असतात.(दृष्टी लागते हो..जाऊ द्या)
वेरुळ म्हणजे न भूतो न भविष्यती .. अजरामर ठेवा आहे.
पुन्हापुन्हा पाहून मन भरत नाही.
29 Mar 2021 - 3:39 pm | Bhakti
खरच आज मला खुप निवांत वेळ होता,हंपी वाचण्यासाठी होता काय असं वाटलं :)
..एका मागोमाग एक सर्व पाच भाग वाचले,खुपचं छान फोटो आणि माहिती वर्णन आहे.खुप नवनवीन कथाही समजल्या.रामायण, महाभारत तसेच इतर गोष्टी समजल्या.मूर्ती सौंदर्य,त्या बनवितांना बारकाईने केलेले काम या बद्दल नेहमी आनंद वाटतो..लवकर पुढील हंपी भाग येऊ द्या!
29 Mar 2021 - 3:50 pm | गणेशा
वा मित्रा वा ..
अप्रतिम
29 Mar 2021 - 5:47 pm | चौकटराजा
आपण श्री कृष्ण मंदिरात जायला लागलो की भव्य दरवाजा आहे.त्याची जी दगडी फ्रेम आहे त्याच्या डाव्या बाजूच्या उभ्या मेंबरवर विष्णूचे दहाही अवतार पाहायला मिळतात !
29 Mar 2021 - 6:40 pm | प्रचेतस
होय, त्याचेही फोटो मजकडे आहेत पण ते उभ्या पट्टीकेवर असल्याने इतके खास आले नाहीत.
29 Mar 2021 - 6:50 pm | सौंदाळा
सभामंडप एका वेगळ्या कोनातून
कृष्णबाजारातील पुष्करिणी आणि दुकांनातील स्तंभ
हे दोन फोटो अत्यंत आवडले.
माहिती अत्यंत मुद्देसूद आणि ओघवत्या शैलीत.
29 Mar 2021 - 6:54 pm | सौंदाळा
पाण्याने वेढलेले भव्य शिवलिंग
हे बघून हरिशचंद्र गडावरील गुहेतील पाण्यात असलेले शिवलिंग आठवले.
29 Mar 2021 - 9:05 pm | अनिंद्य
खूप दिवसांनी आला हा भाग. नेहेमीप्रमाणे उत्तम !
पु भा ल टा
30 Mar 2021 - 12:14 pm | कपिलमुनी
सहसा गडावरील , बीच वरचा सूर्यास्त सुंदर वाटतो,
हंपी मध्ये 2-3 दिवस मुक्काम करून तिथला सूर्यास्त बघावा , अतिशय सुंदर दिसतो, डिसेंबर जानेवारी असेल तर तांबडेलाल आकाशात हंपी फार सुंदर दिसते
30 Mar 2021 - 12:58 pm | गोरगावलेकर
फोटोही सुंदर. दिवाळीनंतर येथली सहल जवळपास निश्चित होती पण करोनामुळे हुलकावणी मिळाली.
30 Mar 2021 - 1:10 pm | चौथा कोनाडा
व्वा, अतिशय सुंदर लेखन ! प्रचि देखील अप्रतिम.
प्रचेतस _/\_
कृष्णदेवरायाची शौर्यगाथा थरारक आहे.
कोंडापल्लीची कहाणी रोचक आहे.
पाच सहा वर्षांपुर्वी विजयवाडा जवळ कोंडापल्ली किल्ल्याला भेट दिली होती त्याची आठवण झाली.
30 Mar 2021 - 3:24 pm | चांदणे संदीप
मी जवळपास मिसला होता हा लेख. इतकी वाट पाहून चांदण्याचा वर्षाव झाल्यासारखं वाटतंय.
हंपी-बदामी तसेच जवळपासच्या इतर ऐतिहासिक स्थळांना २००९ च्या जानेवारीत जाण्याचा योग आला होता. त्याच्यानंतर खूप प्रयत्न करूनही जमले नाही.
इथे गेल्यानंतर माझ्यासारखे सामान्य पर्यटक्/इतिहासप्रेमी फक्त प्रश्नांचे मोहोळ उठवून देतात. हा लेख आणि याआधीचे लेख वाचून माहितीत तर भर पडलीच पण पुन्हा एकदा तिथली सफर झाल्यासारखं वाटल. धन्यवाद वल्लीदा.
सं - दी - प
2 Apr 2021 - 1:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावरच्या रणधुमाळीत असे काही उत्तम लेखन आनंद देतात, सर्वप्रथम प्रचेतस उर्फ वल्ली आपले मन:पूर्वक आभार. लेखन आवडलं. खोबणीतून आलेल्या त्या नृसिंहाचे डोळे लैच भयंकर. दुसरं असं की पंचायतन स्वरुपातल्या या मंदिरात जी काही उपमंदिरे आहेत तिथे पंचायतन म्हणजे पाच मुर्त्या असे वाटते, त्या आहेत का ? असे वाटले. बाकी, लेखन माहितीपूर्ण आहे. छायाचित्रही सुंदर आहेत. बाकी, कृष्णमंदिर म्हटलं, की एखादी तरी सुंदर अशी बाळकृष्णाची मूर्ती हवी होती असे वाटले. अर्थात आपण म्हणता तशी ती, चेन्नईच्या राज्य संग्रहालयात आहे, त्याचे काही छायाचित्र बघायला मिळाले असते तर अजून आनंद झाला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आणि लेखनासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
2 Apr 2021 - 1:36 pm | प्रचेतस
धन्यवाद सर,
पंचायतनात एकही मूर्ती अस्तित्वात नाही. तालिकोटच्या लढाईत रामरायाचा पराभव झाल्यानंतर पाच शाह्या विजयनगरात घुसल्या आणि जवळपास ६ महिने लूटालूट विध्वंस सुरु राह्यला. येथील बहुतेक सर्व मंदिरांत गाभार्यात मूर्ती नाहीत, केवळ विरुपाक्ष मंदिर आणि वीरभद्र मंदिरात आणि अजून अपवादात्मक मंदिरात पूजाअर्चा सुरु आहे.
6 Apr 2021 - 6:28 pm | शशिकांत ओक
प्रचेतस,
आपल्या कॅमेराच्या डोळ्यातून हंपीच्या सुरम्य परिसरातील मंदिर शिल्पे आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन पहात आहे असा आनंद देणारा कलाप्रेमी म्हणून लौकिक आहे. त्याला साजेसे आपले हे लेखमालेचे कथन माहितीपूर्ण आहे.
शिवलिंग पाण्यात असते असे एक ठिकाण आपण लिहिलेले आहे. त्या बद्दल समजून घ्यायला आवडेल कि पूर्वी तिथे लिंग बुडेल इतपत पाण्याची काय सोय असावी?
6 Apr 2021 - 6:57 pm | प्रचेतस
विजयनगर शहरात ठिकठिकाणी सम्राटांनी कालवे खोदल्याचे आपल्याला दिसतात, हे शिवलिंग पूर्वी पाण्यात होते किंवा कसे हे आत्ता सांगता येणार नाही, मात्र तिथून जवळच एक भूमिगत शिवमंदिर आहे, जे नेहमीच पाण्यात असते.
2 Apr 2021 - 1:54 pm | ॲबसेंट माइंडेड ...
सुंदर लेख.
काही वेळापुर्वी तुमचा कार्ले लेण्यावरचा लेख वाचला आणी आता हा लेख वाचला. छान लिहीता तुम्ही. आता आधीचे भाग वाचतो.