सासवड सायकल राईड( १० जानेवारी , २०२१ )
आज सकाळी पुण्यावरून सासवड सायकल राईड साठी निघालो आतापर्यंत दोन वेळा माझी सासवड राइड हुकली होती त्यामुळे या वेळी मात्र कोणतेही कारण न देता सासवड राईड करायचीच असे मी मनाशी ठरवले होते. काल दिवसभर खूप पाऊस पडल्यामुळे हवेमध्ये गारवा होता. पहाटे पाचला मी सुरुवात केली स्वारगेटच्या समोर एका ठिकाणी चहा घेतला, पुण्यात एक बरे आहे चौका चौकात चहाची अहोरात्र सोय असते. त्यानंतर कॅम्प, गोळीबार मैदान, AFMC कॉलेज, रेस कोर्स ग्राउंड मागे टाकत हडपसरला पोचलो तिथली हॉटेल अजूनही उघडली नव्हती त्यामुळे नाश्ता वगैरे काही मिळाला नाही. हडपसर हुन सासवड चा रस्ता धरला, इथून पुढे एकेरी रस्ता सुरु झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचे दिवे डोळ्याना दीपवत होते . वाटेत सकाळी उठून व्यायाम करणारी मंडळी आणि एमपीएससी अकॅडमी ची मुलं -मुली ग्रुप मध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने धावत होती. वाटेत एका टपरीवर आराम करण्याची जागा मिळावी म्हणून परत एकदा चहा प्यायला आणि मग मात्र दिवे घाट चढायला सुरुवात केली. दिवे घाट तसा सोपा वाटला, घाटात ट्रक,बस आणि कारची वाहतूक अव्याहत चालू होती. वाटेत परत एकदा आराम करावा लागला . मागून धावत येणारी मुलं माझ्या पुढे जात होती . दिवे घाटातून काठो-काठ भरलेला मस्तानी तलाव लक्ष वेधून घेत होता. पेशव्यांच्या काळात मस्तानी तलावाजवळ यात्रेकरू थांबत आणि तलावाच्या मागील घळीतून चढून सासवड कडे जात असत. घाट संपतो तिथे विठ्ठलाची भव्य मूर्ती उभी आहे.
सासवड एक लहानसे शहर आहे. सकाळचे ८ वाजले होते अजूनही धुक्याची चादर दूर सारून सूर्य देव उठले न्हवते. घाट माथ्यापासून सासवड जेमतेम सहा किलोमीटर असून पूर्ण उतार असल्याने सायकल चालवावी लागत न्हवती. सासवड ला सहजपणे पोहोचल्यामुळे माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. एक स्वप्न पूर्ण झाले होते, बकेट लिस्ट चे ओझंही हलकं झाले होते. थकाव्यामुळे पोटात प्रचंड भूक लागली होती त्यामुळे तिथे एका रिक्षावाल्याला मिसळ साठी प्रसिद्घ हॉटेल कोणते ते विचारले. त्याने गावात मारुती मंदिराच्या समोर चंदू मिसळ सांगितले . परक्या गावात गेल्यावर जिथे ST चे ड्रायव्हर- कंडक्टर , रिक्षावाले चहा -नाश्ता घेतात तिथे निशंक पणे मी चहा -नाश्ता घेतो. चंदू मिसळवाले चे दुकान जवळ होतं, तिथे गेलो तर दुकानदार दरवाजा उघडत होते , त्याने ९ वाजता यायला सांगितले. तिथून जवळच माझ्या यादीतील कुंजीर वाडा ,पुरंदरे वाडा , भैरवनाथ मंदिर असलयाने मी ते पहायचे ठरवले .ह्या इमारती पेशव्यांच्या काळात बांधलेलया असल्याने त्यांची भव्यता आणि आखीव रेखीव पण वादादीत होता . मला पुढे संगमेश्वर मंदिर पण बघायचे होते म्हणून मी तशीच सायकल दामटवत कऱ्हा नदी पर्यंत गेलो, नदीवरील पुलावरून मी संगमेश्वर मंदिराचे चे दर्शन घेतले आणि फोटो काढले. ह्या देवळाचे शिखर इस्लामी पद्धतीच्या लहान- मोठे घुमट ने बांधले होते होते आणि प्रत्येक घुमटावर कळस होता . सायकल एका घराजवळ लॉक केली आणि देवळात गेलो. देऊळ खूप जुने आहे. परिसर स्वच्छ होता आणि मुख्य म्हणजे तिथे भिकारी किंवा विक्रेते यांचा गोंधळ नसल्याने अतिशय शांत परिसरात तुरळक दर्शनार्थी होते. तिथेही एवढ्या सकाळी प्री -वेडिंग शूटिंग चाललं होतं त्यांची लाइट्स, कॅमेरा, मेकअप आर्टिस्ट यांची लगबग काही वेगळीच होती. त्या देवळात बघण्यासारखे मूर्ती म्हणजे नंदीची मूर्ती आहे तो एक विशाल नंदी आहे. देऊळ पाहून झाल्यावर मी चंदू मिसळ कडे मोर्चा वळवला. अशा प्रकारच्या कळकटलेलया दुकानात पदार्थांची टेस्ट मात्र अगदीच भन्नाट काशी काय असते? हे मला अजूनही कोडं आहे . त्या दुकानावरून जरा पुढे गेले की वीर बाजी पासलकर यांची समाधी आहे, बाहेर माहिती चा फलक आहे. ही समाधी म्हणजे लहानसं मंदिरच आहे आत मध्ये चौथरा आणि त्याचे वरती काही दगड लावलेले आहेत. समाधी जवळ भाजी विक्रेत्यानी फळ भाजीच्या टोपल्या ठेवलेल्या होत्या. मराठा सैनिक मुळचे शेतकरी असल्याने त्यांचा समाधी शेजारी फळ-भाज्यांचा वास दरवळत राहिल्याने त्यांना मृत्यू नंतर हि शेतातल्या भाज्यांचा सहवास लाभला होता. पुढे एक सायकल चे दुकान पाहून थांबलो तर ते दुकान टायर पंचर चे निघाले . दुकानदार सायकल कडे निरखून बघत होता पुढे येऊन त्याने माझी आणि सायकल ची चौकशी केली , खेडेगावांमध्ये सगळीकडे शेतकरी मोटरसायकल वापरू लागल्याने सायकल दुकान बंद करून त्याना टायर पंचर, रिम आउट सारखी कामे करावी लागत होती.
सासवड हुन परत जाताना मात्र मी बाप देव घाटातुन जायचं ठरवलं होतं. कारण आल्या मार्गाने परत गेलं तर सायकलिंग मध्ये फाऊल धरतात. आतापर्यंत सूर्य जरा वर आला होता. बापदेव घाटाकडे जाताना वाटेत हिरव्यागार शेताच्या मधे लहान मंदिरं ,शूरवीरांच्या समाध्या, आणि दगडी चौथरे दिसत होते. शेतीचा रबी सिझन बहरात असल्यामुळे. रास्ता दुतर्फा ऊस, मका, कांदा , फ्लावर, टोमॅटो , गहू ची पिकं वाऱ्यावर डुलत होती आणि रस्त्याच्या कडेला भाजीविक्रेते टवटवीत भाजी विकायला बसले होते. १५ किलोमीटर नंतर बापदेव घाटाच्या पूर्वेचा चढ सुरु झाला . पुढे घाटाच्या टोकावर नागार्जुन मंदिराचा बस स्टॉप दिसला, तिथे पोहोचल्यावर क्षणाचाही विचार न करता मी स्टॉप मधील बाका वर आडवा पडलो आणि डोळे मिटून ५ मिनिटं शांत झोप घेतली. सायकलिंग चे एक तत्व आठवले जिथे बसायची सोय असेल तिथे उभे राहू नये आणि जिथे झोपायची सोय असेल तिथे बसू नये- सरळ आडवे पडावे. थोड्या वेळाने जाग आली त्यानंतर पुढचा पुढचा प्रवास सुरु केला. पुढे सगळा उतारच होता मग काय सायकल प्रचंड वेगाने घाट उतरत होती , घाट उतरल्यानंतर परत पुण्यातली गर्दी सुरु झाली. पुढे कात्रज वरून आज मला थोडं लांबचा प्रवास करून जायचं होतं कारण अंगात ताकद होती , हवेत गारवा होता आणि आल्या मार्गी परत जायचे न्हवते . मला वाटले होते कि रस्त्याला थोडा चढ़ असेल पण पाहतो तर धायरी फाट्यापर्यंत पूर्ण उत्तर होता. घराच्या जवळ पोहोचतच हॉटेलात राईस प्लेट खाल्ली आणि घरी जाऊन गरम पाण्याने अंघोळ करुन झोपी गेलो. कोरोनाचे सावट मनातून दूर झाल्याने माझी बकेट लिस्ट आज रिकामी व्हायच्या ऐवजी परत थोडी भरली होती.
प्रतिक्रिया
28 Jan 2021 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सायकल सासवड वृत्तांत भारी. वृत्तांतात फोटो पाहिजेत. सायकलवाल्या मित्र मंडळींचं आपल्याला कायम कौतुक वाटतं.
अभिनंदन आणि पुढील अजून मोठ्या टार्गेटसाठी शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
28 Jan 2021 - 11:34 pm | प्रचेतस
+१
29 Jan 2021 - 6:33 am | तुषार काळभोर
श्रेय : प्रा डॉ यांचा हा प्रतिसाद
2 Feb 2021 - 4:34 pm | Chandrashekhar ...
पुढिल प्रवासाचे फोटो नक्की टाकीन
9 Feb 2021 - 3:26 pm | Chandrashekhar ...
9 Feb 2021 - 3:29 pm | Chandrashekhar ...
9 Feb 2021 - 3:31 pm | Chandrashekhar ...
9 Feb 2021 - 3:40 pm | Chandrashekhar ...
9 Feb 2021 - 3:41 pm | Chandrashekhar ...
9 Feb 2021 - 3:43 pm | Chandrashekhar ...
9 Feb 2021 - 3:44 pm | Chandrashekhar ...
28 Jan 2021 - 9:54 pm | Bhakti
मस्त वर्णन!
30 Jan 2021 - 9:15 am | गणेशा
वर्णन छान.. अजून येऊद्या..
फोटो टाकत चला...
31 Jan 2021 - 7:10 pm | सिरुसेरि
सुरेख निरिक्षण आणी मस्त सायकल प्रवास वर्णन .
1 Feb 2021 - 12:58 pm | चौथा कोनाडा
सुंदर सायकल वृतांत !
आपणासह सर्वांचे हार्दिक अभिनंदन !
4 Feb 2021 - 6:09 am | चौकटराजा
वर्णन जसे पाहिले तसे शैलीचे असल्याने मस्त वाटले ! आपल्या व्रुतान्तामुळे अनेकाना प्रोत्साहन नक्कीच मिळेल . आपले लाडके अत्रुप्त आत्मा ( शीघ्र कवि भूषण ) व मन्गेश पाडगावकर हे सासवडचे जावई आहेत तर आचार्य अत्रे ( कवि केशवकुमार ) हे सासवडचेच त्यामुळे एकूण हे गाव तसे प्रसिध्धीस पावले आहे !! ))))