उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुका एका बेटासारखा पाण्याने वेढलेला आहे. बारदेश तालुक्याच्या उत्तरेकडील सीमेवर आहे शापोरा नदी तर दुसऱ्या अंगाला आहे म्हापसा नदी. बारदेश तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणावे असे गाव म्हणजे कोलवाळ. याच गावात कोलवाळ किल्ला गतकाळाची साक्ष देत उभा आहे.आदिलशाहाकडून होणारे आक्रमण रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी कोलवाळच्या परिसरात किल्ला उभारण्याची गरज भासली. सन १६३५ मध्ये हा किल्ला पोर्तुगीज तत्कालीन व्हाइसरॉयच्या आदेशावरून डी-मिगेल-डी-नोरोन्हा व कंडे-डी-लिन्हारेस यांनी बांधण्यास सुरवात केली व १६८१ मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला.सुरवातीला हा एकच बांधलेल्या किल्ल्याला फोर्ट नोवो (Forte Novo) असे नाव होते. काउंट ऑफ अल्वोर नावाच्या पोर्तुगीज अधिकाऱ्याने इथे आणखी दोन किल्ले १६८१ च्या सुमारास बांधले आहेत आणि त्यांची नावे फोर्ट डे असुम्काव डे तिवीम आणि फोर्ट डे मेयो दो तिवीम (Forte de Assumcao de Tivim and Forte de Meio do Tivim ) अशी ठेवली आहेत.या किल्ल्याचे पोर्तुगीज कागदपत्रातील नाव "Forte de Sao Miguel de Tivim’ or ‘De Meio" असे आहे.पण कोलवाळचा किल्ला म्हणजे एक किल्ला नसून तीन एकत्रीत बांधलेले किल्ले होय. या दोन नद्यांमधे सलग तटबंदी व खंदकाने जोडून पोर्तुगीजांनी हे तीन किल्ले एकत्र केले आहेत.ह्या किल्ल्याची उभारणी झाल्यानंतर तटबंदीमुळे या परिसरातील सिरसैम, असानोरा, पिरना, नानोडा आणि रेवोडा अशी बिचोलिम तालुक्यातील गावे, किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरील गावे म्हणून ओळखली जाउ लागली. या भिंतीच्या बाजूने तिसरा तटबंदी १६८१ मध्ये बांधण्यात आला होता आणि त्याला ‘नोसा सेन्होरा दे असुमकाओ दे तिविम’ (Nossa Senhora de Assumcao de Tivim’)म्हणून संबोधले जात असे. चौथे तटबंदी, 'नोसा सेन्होरा डी लिवमेंटो दे थिविम' ( ‘Nossa Senhora de Livramento de Tivim’ ), १७१३ मध्ये बांधली गेली. डोंगराच्या पायथ्याजवळील सेंट अॅन एज्युकेशनल संस्थेच्या प्रवेशद्वाराच्या मुख्य रस्त्याच्या दक्षिणेस सुमारे १०० मीटर अंतरावर एक लहान चॅपलच्या विरूद्ध बाजुला आपण या तटबंदीचे कोसळलेले अवशेष पाहू शकतो.
[ सेंट थॉमस, सेंट मिंगेल व सेंट क्रिस्तोफर असे तीन किल्ले बांधले. किल्ले बांधताना पोर्तुगीजांनी या किल्ल्यांना आपल्या कॅथलीक संतांची नाव दिली व तिन्ही किल्ल्यात त्यांच्या नावाने चर्च उभारले. या तीन किल्ल्यांपैकी शापोरा नदीकाठी बांधलेला सेंट थॉमस किल्ला पूर्णपणे नष्ट झाला असून थिवी गावानजीक असणाऱ्या सेंट क्रिस्तोफर किल्ल्याचा सध्या फक्त एक बुरुज शिल्लक आहे. त्यामुळे आज या परिसरात किल्ला म्हणून पाहण्यासारखे जे काही थोडेफार अवशेष शिल्लक आहेत ते फक्त कोलवाळ गावाच्या मध्यभागी असणाऱ्या सेंट मिंगेल किंवा मायकेल या किल्ल्याचे.]
शिवाजी महाराजांच्या बार्देश स्वारीतला हा एक महत्वाचा किल्ला. पोर्तुगीजांचे बार्देश परिसरातील हिंदू लोकांवर होणारे जबरदस्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी व पोर्तुगीजांच्या आश्रयाखाली लपून बार्देश परिसरात बंडखोर बनलेल्या देसायांना वठणीवर आणण्यासाठी शिवाजी महाराज नोव्हेंबर १६६७ मधे बार्देशवर चालून गेले. देसाई - केशव प्रभू यांचा निर्मुलन करण्यासाठी शिवाजी महाराज त्याचा माग घेत याठिकाणी आले. देसायांनी या भागात पोर्तुगीजांचा आश्रय घेतला होता. महाराजांनी या मोहिमेत बर्याच अत्याचारी पोर्तुगीजांना ठार मारले, त्यात त्यांनी फ्रान्सिस्कन रेक्टर फ्रेई मनोएल डी सेंट बर्नार्डिन यांच्यासह अनेक ख्रिश्चनांना तलवारीने कापून काढले. यावर घाबरलेल्या पोर्तुगीजांनी रीस मॅगोस व अग्वाद किल्ल्यात आश्रयासाठी धाव घेतली. असे म्हणतात की शिवाजीच्या सैन्याने अग्वाद किल्ल्याला वेढा घातला पण पुढे तो वेढा उठवला.
त्यावेळी शिवाजी महाराजांनी २० नोव्हेंबर १६६७ रोजी कोलवाळ व थिवीचा किल्ला ताब्यात घेतला व या परिसरात तीन दिवस वास्तव्य सुद्धा केले. पण मराठ्यांची पाठ वळताच पोर्तुगीजांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला.
सन १६८३ मधे संभाजी महाराज्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा एकदा या किल्ल्यावर आक्रमण केले. कोळवालच्या तिन्ही किल्ल्यात दारुगोळा होता. किल्ल्याच्या रक्षणासाठी पोर्तुगीजांनी गोवेकर ख्रिस्ती शिपाई ठेवले होते. मराठ्यांनी किल्ल्याला वेढा दिल्यानंतर पोर्तुगीजांनी दहा दिवस किल्ला लढविला. पण अडचण म्हणजे त्यावेळी किल्ल्यात पाण्याची सोय नव्हती. किल्ल्याबाहेरच्या विहीरीतून पाणी आणावे लागे. मराठ्यांनी त्या विहीरीत मेलेली जनावरे आणि विष टाकून किल्ल्यातील शिबंदीच्या मुख्य गरजेची अडचण केली. दुसरीकडून मदत येण्याची शक्यता नसल्याने पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली. यात कोलवाळ किल्ल्यात असणाऱ्या सेंट मायकेल चर्चला भयंकर मोठी आग लागली व चर्चचे नुकसान झाले. आज कोलवाळ किल्ल्ल्यासमोर जे चर्च आपल्याला दिसते ते नंतरच्या काळात नुतनीकरन करून नव्याने बांधलेले आहे. शिवाय मराठ्यांनी त्या चर्चमधील मुर्ती तोडल्या. ईतके वर्ष पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या देव देवतांच्या मुर्ती भग्न करुन जे अत्याचार केले होते, त्याची यानिमीत्ताने थोडी परतफेड झाली असे म्हणता येईल.
संभाजी महाराजांच्या गोवा स्वारी नंतर, पेशवेकाळात म्हणजे सन १७३९ मध्ये सावंतवाडीच्या भोसलेंनी ( खेम सावंत ) जयराम सावंत यांच्या नेतृत्वाखाली रामचंद्र सावंतच्या मदतीने सात ते आठ हजार सैनिक आणि घोडेस्वारांसह ५ मार्च १७३९ रोजी हल्ला केला आणि तिवीम किल्ल्या ताब्यात घेतल्या. ऑक्टोबर १७३९ मध्ये पोर्तुगीजांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात सांवतांच्या सैन्याने पोर्तुगीजांची कत्तल केली आणि १८ सप्टेंबर १७४० मध्ये पोर्तुगीजांनी निमुटपणे तहावर सह्या केल्या. पण पुढे दोनच वर्षात म्हणजे १३ जुन १७४१ ला मार्किस ऑफ लॉरिकलने तो परत जिंकून पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आणला. या किल्ल्यामधे पोर्तुगीज अधिकाऱ्यांची एक खास सैनिकी तुकडी ठेवलेली होती. सन १८४१ मधे हि सैन्याची तुकडी म्हापसा येथे हलवण्यात आली आणि तेव्हापासून या किल्ल्याचे महत्व हळू हळू कमी होत गेले. किल्ल्याचा बहुतांश भाग आज जरी उद्ध्वस्त झाला असला तरी त्याचे संरचनात्मक महत्त्व अद्यापही लक्षात येण्यासारखे आहे. शापोरा व म्हापसा या नद्यामार्गे चालणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी पोर्तुगीजाना या किल्ल्याचा खूप उपयोग होत असे.
कोळवाल किल्ला थिवीम-डीचोली या मुख्य रस्त्यावर गोव्याची राजधानी पणजीपासून २३ किमी तर म्हापस्यापासून फक्त ८ किमी अंतरावर आहे.
हा किल्ला गोवा राज्य सरकार संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केला आहे (Protected Monuments Of Goa).
तिवीमला कोकण रेल्वेचे स्थानक आहे.. म्हापसा- बिचोली रस्त्याने म्हपस्याकडे जाताना कोपरे (Coprem) गावातून उजवीकडे फुटलेल्या रस्त्यावर कोळवालचा किल्ला आहे.या किल्ल्याचा पसारा थिवीम ते कोळवाल असा तीन ते चार कि.मी. असा आहे.
खरेतर ईतका इतिहासाचा विस्तृत पट असणारा किल्ला पहायला आल्यावर काय स्थिती आहे ? गावात कुणालाही विचारल्यास इथे किल्ला नाही असे सांगतात, इतकी उदासीनता आणि ऐतिहासिक ठेव्याबद्दलची अशी प्रचंड आस्था स्थानिकांमध्ये पाहायला मिळते. यातील मुख्य किल्ला हा रेल्वेच्या पुलाशेजारी कोळवाल गावात आहे तर एक धनवा गावाजवळ आहे.या किल्ल्यात एक भुयार असून ते तिवीमच्या मैदानापर्यंत आहे असे म्हणतात. हे तिनही किल्ले रेवोरा गाव आणि कोळवाल या गावामधील पट्ट्यात आहेत.
एकेकाळी हा किल्ला नक्कीच वैभवशाली असेल कारण आज त्याच्या अवशेषांची रचना नजर खिळवून ठेवते.
त्याकाळी ह्या किल्ल्याचे संरक्षण करणारा एक मोठा खंदक होता. आजच्या त्याच्या खोलीवरून त्याचा दरारा जाणवतो. ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार अर्ध्यापेक्षा जास्त जमिनीत गाडले गेले असून बाजूने या अवशेषांना भग्न करतच रस्ता काढला आहे. या किल्ल्याच्या बांधकामात मराठा आणि पोर्तुगीज अश्या दोन्ही वास्तुकलांचा प्रभाव आढळतो.
या किल्ल्यात मराठ्यांचे वास्तव्य असताना, त्यांनी किल्ल्याच्या वास्तूशैलीत काही बदल केले. किल्ल्याच्या बांधकामात मुख्यता विटांचा व गरज भासेल तेथे दगड व मातीचा उपयोग केलेला पाहायला मिळतो. एखादा शत्रू किल्ल्यावर चाल करून आल्यास त्याला किल्ल्यात सहज प्रवेश मिळू नये यासाठी किल्ल्याच्या बाहेरील बाजूने असणाऱ्या भिंती जरा जास्त उंचीच्या आणि मजबुत अश्या बांधण्यात आल्या होत्या. किल्ल्याचे काही बुरुज आजही सुस्थितीत उभे असून पूर्वी या बुरुजांवर मराठा व पोर्तुगीजांनी त्यांच्या शासन काळात वापरलेल्या अनेक तोफा ठेवलेल्या होत्या. पण सद्य परिस्थितीत मात्र एकही तोफ किल्ल्यात दिसत नाही.
तरी सुद्धा पाच बाजू शाबूत असलेला अतिशय सुरेख असा जांभा दगडातील षटकोनी बुरुज तग धरून आहे.
याच बुरुजाला एक चोरदिंडी आहे.
भग्नावस्थेतील तटबंदीची भव्यता पाहून आपण थक्क होतो . दक्षिणेकडील बाजुला एक भुयार दिसते.
या किल्ल्याच्या आवारातच प्रवाशांचे संरक्षक संत मानल्या जाणार्या "सेंट क्रिस्टोफर चर्च ऑफ थिविम" हे चॅपेल दिसते. हि चर्च १६२७ मध्ये उभारली गेली.
ईथून तटबंदीच्या वर चढून आपण फिरु शकतो.
या अवशेषांच्या मागील बाजूस अर्धगोलाकार भूमिगत घुमट दिसतो, बहुतेक हा दारूगोळा साठवण्यासाठी वापरला जात असे.
या अवशेषांवरील विशाल वटवृक्षाची मुळं वाढलीत. यामुळे किल्ल्याचे चीरे एकत्र धरून राहीले असले तरी त्यामुळे तटबंदीचे नुकसानही होत आहे.
ऐतिहासिक नजरेतून याची सौंदर्यता तसूभरही कमी झालेली नाही. आज रस्ता तटबंदीला लागून गेला असून काही ठिकाणी बाकी बुरुजांच्या खुणा शिल्लक आहेत. तटावरच्या फांजीवरून आज जवळजवळ तीन-चार किमीचा रस्ता केला आहे. ज्यावरून वाहने धावतात. इथे ऐतिहासिक दोन त्रिकोणी खांबाचा संपूर्णतः जांभा चिरे रचून तयार केलेला एक पूल असून ह्यावरून बरीच लहान वाहन आज जातात. पुलाखालून बरंच पाणी जरी वाहून गेले असले तरी इतिहास पाहणारा हा पूल पाहण्यासारखा आहे. ह्या पुलाला दोन त्रिकोणी खांब असून पाण्याच्या निचराही तितकाच वेगात होतो. या किल्ल्याचा पसारा खूपच मोठा आहे मात्र किल्ल्याच्या परिसरात बऱ्याच प्रमाणात झाडी वाढल्याने तो पूर्णपणे फिरता येत नाही.
कोळवाल किल्ल्यातील भग्न इमारती मध्ये एक छुपी खोली,वरच्या भागात तिन दालने आणि उजव्या अंगाला तटबंदी आणि एक लहानसा दरवाजा दिसतो. किल्ल्यात एक विहीर असून ती भग्नावस्थेत आहे.
कोळवाल किल्ल्याशेजारी एक चर्च आहे आणि इथून पुढे थोडे जंगलात गेल्यास आणखी दोन किल्ले भग्नावस्थेत असल्याचे दिसतात, पण ते शोधणे अवघड आहे.हे तिनही किल्ले एकेकाळी एका खंदकाने जोडले होते, पण सध्या त्याचा कुठलाही पुरावा सापडत नाही.
एकूणच गावकर्यांच्या दुर्लक्ष्यामुळे किल्ल्याला दुरावस्था झाली होती. अनेकांनी ईथेले चिरे चोरुन त्याचा उपयोग स्वताच्या बांधकामात केला. मात्र आता चित्र पालटत आहे. जुन्या गावकर्यांनी या किल्ल्याला सुस्थितीत पाहिले होते, भुयार चांगल्या अवस्थेत होते. कोळवाल, थिवीम आणि रिवोरा या तिन्ही गावातील गावकरी एकत्र आले आणि त्यांनी पुरातत्वखात्याशी संपर्क साधला. सुदैवाने शासनानेही उत्तम प्रतिसाद देत एक समितीची स्थापन करुन हा किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषीत केला. मात्र खरी गरज आहे ती यापुढे दुर्गसंवर्धनाचे कार्य करण्याची. येणार्या काळात पुन्हा एकदा हा किल्ला आपल्या जुन्या वैभवाने पुन्हा उभारलेला असेल अशी आशा करुया.
( महत्वाची तळटीप :- काही प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
आपण माझे सर्व लिखाण येथे एकत्रित वाचु शकता.
भटकंती सह्याद्रीची
व्हिडीओतून कोलवाळ किल्ल्याची सैर
संदर्भः-
१) https://itsgoa.com/forts-in-goa-know-more-about-them/ हे संकेतस्थळ
२) शिवपुत्र संभाजी -डॉ. सौ कमल गोखले
३) www.durgwedh.blogspot.in हा श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग
४ ) पोर्तुगीज-मराठा संबंध- श्री. स.शं. देसाई
५) ‘Fortresses & Forts of Goa’- P P Shirodkar
६ ) ईंटरनेटवरुन मिळालेले संदर्भ
https://vatadya.blog
प्रतिक्रिया
23 Jan 2021 - 8:41 am | शशिकांत ओक
मराठा साम्राज्याचा भाग असूनही दुर्लक्षित राहिला. या भागात पीक काय येत असत? परदेशात विकायला सोईचे मसाल्याचे पदार्थ कितपत निर्यात केले जात होते? नैसर्गिक खोल पाण्याची बंदरे असल्याने वाहतूकदारांना नाविक तळ ठोकून व्यावसायिकांना मालाची वाहतूक व्यवस्था सक्षम असावी.
श्रमपूर्वक जमवलेली माहिती आणि प्रत्यक्ष भेट यातून आमच्या सारख्या हजारो वाचकांना त्या काळातील घटनांबद्दल माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. मंगेशी, शांतादुर्गा, अशी शैव मंदिरे पोर्तुगीजांनी कशी सोडून दिली याचे आश्चर्य वाटते.
23 Jan 2021 - 3:35 pm | प्रचेतस
एकदम अपरिचित किल्ला.
तुमच्या ह्या लेखमालेमुळे गोव्यातील किल्ल्यांची उत्तम सफर होते आहे.
24 Jan 2021 - 8:07 am | गवि
उत्तम लेखमाला.. !!! धन्यवाद..
24 Jan 2021 - 7:10 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
24 Jan 2021 - 7:40 pm | गामा पैलवान
दुर्गविहारी,
थिवीला किल्ला असेलसं आजिबात वाटंत नाही. अशा ठिकाणच्या विस्मृतीत गेलेल्या अवचित दुर्गाची ओळख करवून दिल्याबद्दल आभार. तुमचा ध्यास कौतुकास्पद आहे.
आ.न.,
-गा.पै.
24 Jan 2021 - 7:46 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
25 Jan 2021 - 12:56 pm | सौंदाळा
मुवि काकांशी बाडीस
25 Jan 2021 - 1:35 pm | शामसुन्दर
उत्तम लेख धन्यवाद..
25 Jan 2021 - 5:56 pm | गोरगावलेकर
आवडला हा भागही
26 Jan 2021 - 7:17 am | चित्रगुप्त
लेखमालेद्वारे बर्याचशा आजवर नावही न ऐकलेल्या किल्ल्यांची अद्भुत यात्रा घडून येते आहे. फोटोही छान आहेत. अनेक आभार.
2 Feb 2021 - 11:53 am | टर्मीनेटर
तुमची ही सुंदर लेख मालिका वाचून गोव्यातील किल्ले बघायला परवा पासून सुरुवात केली आहे. किती किल्ले पाहायला जमेल सांगू शकत नाही पण २ दिवसात ७ किल्ले बघून झाले आहेत.

काल हा कोलवाळ किल्ला बघितला, फारच दुरावस्था झाली आहे किल्ल्याची. आतल्या विहिरीत दारूच्या आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि पिशव्याचा ढीग जमला आहे.