गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, हिरव्या गर्द माडांच्या गर्दीतून डोकावणारे मंदिरांचे रंगीत कळस आणि चर्चेचे पांढरे मनोरे,मासळीचा स्वाद दुणा... आणि बरोबरची झिंग आणणारी पेयं.
सगळेच जण यांचा आस्वाद घेण्यासाठी कधी ना कधी तरी गोव्याला भेट देतातच. खरा गोवा या सगळ्यात आहेच, पण या सगळ्यापलीकडे एक गंभीर पुराणपुरुष गोवा आहे, जो तुम्हा आम्हाला २ दिवसांच्या बस टूरमध्ये अजिबात दिसत नाही. त्याला भेटण्यासाठी गोव्यातल्या सांदीकोपर्यातल्या गावांमधे जायला हवं. जंगलं धुंडाळायला हवीत आणि गांवकार लोकांच्या पुराण्या कथा ऐकायला हव्यात.
तब्बल ४५० वर्ष पोर्तुगीजांच्या अमलाखाली असणाऱ्या गोव्यात त्यांनी बांधलेले स्थापत्यशास्त्राचे आणि युद्धनीतीचे पुरावे देणारे अनेक किल्ले पाहण्यासारखे आहेत. दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांनी सुद्धा गोव्यात काही किल्ले व मंदिर बांधली आहेत. सह्य्राद्रीमधल्या दऱ्याखोऱ्यांत पायवाटा धुंडाळत केलेली भटकंती जितकी अंगातली रग शमवणारी असते तितकीच समुद्रकिनाऱ्यालगतची भटकंती मनाला रिझवणारी असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर माहिती देणारी अनेक पुस्तके आज उपब्लध आहेत पण गोव्यातील किल्ल्यांबद्दल याबाबतीत फारच उदासीनता आढळून येते. तेरेखोल, आग्वाद, रेइश मागूश, चापोरा असे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढेच गोव्यातील किल्ले सुपरिचित आहेत. त्यामुळे आंतरजालावर या किल्ल्यांची इंग्लिशमधून का होईना पण थोडी फार माहिती नक्कीच मिळते. पण काबो दि रामा, खोर्जुवे, जुवेम, कोळवाळ, राशोल, नाणूस, थीवी, मर्दनगड यासारखे अनेक गोव्यातील किल्ले अनेकांना तर नावाने देखील माहित नाहीत.
गोव्याचे एकूण क्षेत्रफळ ३,७०२ चौ. किमी एवढे असून येथे उत्तर गोवा व दक्षिण गोवा असे दोनच जिल्हे आहेत. यामधे उत्तर गोव्यात पेडणे, बार्देस, डिचोली, सत्तरी, तिसवाडी, फोंडा तर दक्षिण गोव्यात मार्मागोवा, सालसेत (साष्टी), धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण असे एकूण १२ तालुके येतात. अत्यंत निसर्गरम्य अशा ह्या राज्याच्या उत्तरेस महाराष्ट्र राज्य, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य तर पश्चिमेस अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे. गोमंतक भूमीला इतिहास देखील बहुत जुना. तिसऱ्या शतकात गोमंतक भूमी आधी मौर्य साम्राज्यात आणि त्यानंतर सातवाहन शासनाच्या अधिपत्याखाली होती. १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात गोवा पहिल्यांदा मुस्लीम राजसत्तेखाली आलं पण थोड्याच अवधीत म्हणजे १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात विजयनगर साम्राज्याने गोवा जिंकून घेतलं. पुढे जवळजवळ १५० वर्ष गोवा विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली सुखाने नांदल. पण १६ व्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे १५१० च्या आसपास पोर्तुगीजांनी पूर्वेकडील देशांशी मसाल्यांचा व्यापार करण्याच्या निमित्ताने गोव्यात आपले पहिले पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत म्हणजे सुमारे ४५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. त्यामुळे साहजिकच पोर्तुगीजांनी गोव्यात आपला लष्करी अंमल वाढवण्यासाठी या काळात येथे अनेक किल्ले बांधले. ३०, मे १९८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने गोवा हे जगाच्या नकाशावर एक पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येऊ लागले.
गोव्यातील सर्व किल्ल्यांचा एकत्रित नकाशा
महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यातील किल्ले तसे फारच लहान आहेत. पण डोंगरकपारीनं वेढलेल्या या राज्यात तब्बल ४२ किल्ल्यांची नोंद झालेली आहे. हे किल्ले या भूमीवरील गतकाळाचे, राजकारणाचे आणि अर्थव्यवस्थेचे उत्तम नमुने आहेत. पोर्तुगीजानी बांधलेले किल्ले गोव्यात सर्वत्र विखुरलेले आहेत. काही गोव्याच्या अंतरंगात नदीच्या मुखावर बांधलेले आहेत तर इतर बहुतेक सर्व समुद्रकिनाऱ्यांवर. काही सेंट आगुस्तीन टॉवरच्या अवशेषासारखे आकाराने प्रचंड मोठे आहेत तर काही छोटे असूनही वास्तूरचनेचा उत्कृष्ट उदाहरण असलेले आहेत. काही किल्ले आदिलशहाच्या वास्तुकलेची संपन्नता सांगतात, तर काही किल्ले पोर्तुगीजांच्या हुकमी चालींची. बेतूल आणि नानुज यासारखे किल्ले तर अगदी शिवाजी महाराजांशी नातं सांगतात. चला मग आता प्रत्येक किल्ल्याची थोडी सविस्तर माहिती घेऊ या.
आज पहिल्या किल्ल्याची माहिती घ्यायची आहे ती गोव्याची राजभवनाची "काबो पॅलेसची".
काबो पॅलेस / राजभवन
एकदा गोव्यात व्यवस्थित बस्तान बसल्यानंतर पोर्तुगीजांनी गोव्याचा कारभार एखाद्या मोक्याच्या शहरातून करायचे मनावर घेतले. सध्या पणजी शहर आहे त्या भागात म्हणजे तिसवाडी तालुक्यात समुद्रात घुसलेले टोक, ज्याला भुशीर म्हणतात, हि अतिशय सुरक्षित जागा हेरली. उत्तरेला मांडवीच्या तीरावर उभारलेला बळकट अग्वादचा किल्ला होता तर दक्षीणेला मार्मगोव्याचा किल्ला संरक्षण देण्यासाठी सज्ज होता. गर्द झाडीने वेढलेल्या या भुशीरावर एका राजवाड्याचे बांधकाम केले गेले. पोर्तुगीज भाषेत भुशीराला "काबो" असे म्हणतात. यावरुन या राजवाड्याला नाव पडले "काबो पॅलेस".स.न. १५४० मध्ये गोव्याच्या आठव्या गव्हर्नरला म्हणजे दि एस्टेव्हो दि गामा याला हा राजवाडा अधिक सुरक्षित असावा असे वाटले. आणि या परिसराला अधिक संरक्षण मिळावे म्हणून ईथे किल्ल्याची उभारणी करावी अशी कल्पना त्याने मांडली. याच परिसरातील जांभा दगड उकरुन या किल्ल्याची बांधणी झाली. दगड उकरलेल्या खड्यात पाणी साठवण्याची सोय करण्यात आली. पुढे स.न. १५९४ मध्ये या राजवाड्याला अधिकृतरित्या गव्हर्नरचे निवासस्थान म्हणून घोषीत केले गेले. पुढे याच परिसरात एक चॅपेल उभे केले गेले त्याला "नोसा सेन्होरा दि काबो" असे नाव दिले गेले.
या किल्ल्यावर जरी तोफा तैनात केल्या गेल्या असल्या तरी त्यांचा उपयोग कधीही न झाल्याने, या वास्तुत आर्चबिशपचा मुक्काम सन १६५० पर्यंत होता. पुढे सन १७९८ ते १८१३ या कालावधीत ब्रिटीशांनी या जागेचा ताबा मिळवला. फ्रेंचाच्याही या परिसराशी संबंध आलेला दिसतो. अर्थात त्या काळात बांधलेले कोणतेही अवशेष आज दिसत नाहीत. फक्त ईंग्रजकालीन खुण म्हणून एक लष्करी दफनभुमी अजून आहे.
आज मात्र या वास्तुचा पुर्ण कायापालट झाला आहे. आता या वास्तुला राजभवन म्हणून ओळखतात आणि गोव्याच्या राज्यपालांचे हे अधिकृत निवासस्थान आहे. भारतातील कोणत्याही राज्यपालाच्या निवासाला इतका चारशे वर्षाचा इतिहास लाभलेला नाही. ईथल्या दरबार हॉलमध्ये अनेक लोक एकाचवेळी बसु शकतात. तर डायनिंग हॉलमध्ये एकाच वेळी तीस लोक जेवण घेउ शकतात. एका बाजुला मांडवी नदी आणि एका बाजुला समुद्र यामुळे ईथे बसलेल्या व्यक्तीला, आपण जहाजाच्या डेकवर उभारलो असल्याची भावना होते.
एकंदरीत मुळ किल्लेपण हरवले असले तरी हा काबो राजवाडा बदलत्या काळातही आपला आब टिकवून आहे असेच म्हणावे लागेल.
( तळटीप :- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार)
आपण माझे सर्व लिखाण एकत्रित येथे वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची
संदर्भः-
१) जलदुर्गांच्या सहवासातः- प्र.के. घाणेकर
२) श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग
३) https://itsgoa.com/forts-in-goa-know-more-about-them/ हे संकेतस्थळ
४) पोर्तुगीज-मराठा संबंध- श्री. स.शं. देसाई
५) चला माझ्या गोव्यात- मिलींद गुणाजी
६) ईंटरनेटवरुन मिळालेले संदर्भ
प्रतिक्रिया
4 Dec 2020 - 2:55 pm | सौंदाळा
मस्तच,
गोव्याला खूप वेळा जाऊनसुद्धा तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच किल्ल्याची नावेही माहीत नाहीत.
पुढील भागांची वाट बघत आहे.
4 Dec 2020 - 3:29 pm | चौथा कोनाडा
माहित नसलेल्या वास्तू बद्दल सुरेख माहिती मिळाली.
धन्यवाद !
4 Dec 2020 - 3:33 pm | टवाळ कार्टा
गोव्यात निळेशार पाणी? कुठे नक्की?
4 Dec 2020 - 4:01 pm | कंजूस
कुणाबरोबर जातो त्याप्रमाणे पाण्याचा रंग बदलतो.
4 Dec 2020 - 3:50 pm | बाप्पू
माहितीपूर्ण लेख.. आणखी येउद्यात..
अवांतर : हा किल्ला किल्ल्यासारखा वाटला नाही. एखादे पॅलेस किंवा राजवाडा वाटतो.
10 Dec 2020 - 6:50 pm | दुर्गविहारी
प्रतिसादाबध्दल धन्यवाद !
अगदी बरोबर! याठिकाणी उभारलेल्या किल्ल्याचे कोणतेही अवशेष आज शिल्लक नाहीत.फक्त जो राजवाडा उभारला,त्याचेच आज राजभवनात रुपांतर केले आहे.
4 Dec 2020 - 4:02 pm | कंजूस
छान वेगळाच लेख. वाचूनच पोहोचलो तिकडे.
6 Dec 2020 - 6:48 am | चित्रगुप्त
अतिशय माहितीपूर्ण लेख आवडला. तेरेखोल, आग्वाद, रेइश मागूश वगैरे शब्द गूगलवर हुडकण्यासाठी त्यांचे स्पेलिंग लेखात दिले तर चांगले होईल. आत्ताच मी 'रेइश मागूश' असे मराठीत सर्चिता विशेष काही मिळाले नाही. उत्तम लेखमाला चालली आहे. अनेक आभार.

रेइश मागूश म्हणजे खालील किल्ला का ? Reis Magos असे स्पेलिंग दिले आहे.
6 Dec 2020 - 10:36 pm | दुर्गविहारी
प्रतिसादाबध्दल धन्यवाद ! आपली सुचना निश्चित लक्षात ठेवून योग्य ते बदल करेन.
हा अप्रतिम फोटो रेईश मागो किल्ल्याचाच आहे.पुढच्या आठवड्यात या रेइस मागो आणि ग्यास्पर दियश या पुर्ण नष्ट झालेल्या दोन किल्ल्यांची माहिती देणार आहे.
7 Dec 2020 - 9:15 am | अनिंद्य
खूप छान आलेख.
.... भारतातील कोणत्याही राज्यपालाच्या निवासाला इतका चारशे वर्षाचा इतिहास लाभलेला नाही.... हे मात्र तितकेसे बरोबर नाही.
10 Dec 2020 - 6:54 pm | दुर्गविहारी
आणखी कोणत्या राजभवनाला इतका प्राचीन इतिहास आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.
11 Dec 2020 - 8:08 pm | अनिंद्य
बहुदा मद्रास (चेन्नई). अर्थात आजच्या चेन्नईतले राजभवन जुन्याच्या अवशेषांवर बांधलेली नवीन इमारत आहे.
संदर्भ सापडला तर इथेच डकवतो.
7 Dec 2020 - 10:42 am | टर्मीनेटर
7 Dec 2020 - 10:43 am | टर्मीनेटर
माहितीपूर्ण लेख आवडला 👍
7 Dec 2020 - 2:19 pm | गोरगावलेकर
लेखात उल्लेखलेल्या किल्ल्यांपैकी फक्त एकच किल्ला पहिला आहे आहे तो म्हणजे तेरेखोल (Tiracol) . किल्ला जरी महाराष्ट्राच्या वेंगुर्ला तालुक्यात असला तरी तो गोवा सरकारच्या ताब्यात आहे. किल्ल्याचे रूपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आलेले आहे .
9 Dec 2020 - 11:33 am | अनिकेत वैद्य
गोवा पर्यटन विभागातर्फे ह्या वास्तूची सहल घडवली जाते. अधिक महिती इथे. (सद्ध्या कोविड महामारीमुळे बंद आहे.)
ह्या साधारण ३ तासांच्या सहलीत गोवा पर्यटन विभागाची एक माहितगार व्यक्ती आपल्यासोबत येऊन राजभवन परिसरातील विविध वास्तूंची माहिती सांगतात. वास्तूचे भौगोलिक स्थान, इथे वास्तू उभारण्यामागची कारणे, इतिहास, काही घटना ह्याबद्दल माहिती सांगतात. येथे एक संग्रहालय देखील आहे, त्यात गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासाबद्दल अनेक चित्रे आहेत.
ह्याच राजभवन मध्ये १९५९ मध्ये गोव्याच्या पोर्तुगीज गर्व्हनर (शेवटला पोर्तुगीज गव्हर्नर) साठी आणलेली मोठी कार अजूनही जतन करून ठेवली आहे.
10 Dec 2020 - 6:53 pm | दुर्गविहारी
बरोबर ! बहुतेक पर्यटक गोव्यात जाउन फक्त बीच, मंदिर किंवा चर्च आवर्जून जाउन पहातात.पण तांबडी सुर्लाचे प्राचीन मंदिर, किल्ले, राजभवन अशी हेरिटेज टुर आवर्जून करायला हवी.
9 Dec 2020 - 11:43 am | प्रचेतस
उत्तम माहिती.
लेख अर्थातच आवडला.
10 Dec 2020 - 7:20 pm | दुर्गविहारी
सौंदाळा,चौथा कोनाडा,बाप्पू, टवाळ कार्टा, कंजूस,चित्रगुप्त,अनिंद्य,टर्मीनेटर, गोरगावलेकर, अनिकेत वैद्य आणि प्रचेतस या सर्व प्रतिसादकांचा आणि असंख्य वाचकांना मनापासून धन्यवाद.
उद्या या मालिकेतील आणखी दोन किल्ल्यांची माहिती देणार आहे,एक रेइस मागो ज्यात उत्तम दर्जाचे चित्रप्रदर्शन आहे आणि सर्वपरिचित मिरामार बीचजवळ नष्ट झालेला गॅस्पर दियश या दोन किल्ल्यांची माहिती घेणार आहोत.
10 Dec 2020 - 11:10 pm | बाप्पू
धन्यवाद दुर्गविहारी जी. लेखनास शुभेच्छा.
उत्सुकतेने वाट पाहत आहे. !!