बेडसे लेणी व पवना जलाशय परिसर २०१७

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
10 Nov 2020 - 3:02 pm

कार्ले, भाजे, बेडसे या लेण्यांच्या त्रिकुटापैकी बेडसे लेणी बघायची बाकी होती. ही लेणी बघूनच २०१७ च्या नववर्षाच्या भटकंतीची सुरुवात करायचे ठरविले. गुगलवर थोडासा शोध घेतला आणि दिवसभराचा कार्यक्रम निश्चित केला. बेडसे लेणी पुर्वाभिमुख आहेत त्यामुळे सकाळच्या वेळी लेण्यांत चांगला प्रकाश असतो व लेणी बघण्यास चांगले पडते असे वाचल्याने आधी लेणी पाहून नंतर वेळ मिळेल त्याप्रमाणे बाकीची भटकंती करण्याचे ठरवले.
दोन्ही मुली व आम्ही दोघे सकाळी नऊला नवी मुंबईहून निघालो. लोणावळ्यात एका ठिकाणी नाश्टा केला

पुढे जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने निघालो. कामशेतहून उजवीकडे वळून पवनानगरच्या रस्त्याने साधारण १० किमी गेल्यावर करुंज गाव आहे. येथे उजवीकडे वळण घेऊन बेडसे गावातल्या रस्त्याने फक्त एक-दीड किमी गेल्यावर आपण लेण्यांच्या पायथ्याशी पोहचतो. लेण्या डोंगर माथ्यावर आहेत. वर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची सोय आहे. पायऱ्या सुरु होतात त्याचा बाजूलाच गाडी पार्क केली व पायऱ्या चढायला सुरुवात केली. पावसाळा उलटून तीन महिने उलटून गेले असल्याने आजूबाजूचा परिसर झाडीमुळे हिरवा व वाळलेल्या गवतामुळे सोनेरी दिसत होता. मधेच सुंदर रानफुले डोकावत होती.

जवळपास ४०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण लेणीपाशी पोहचतो. ह्या बौद्ध कालीन लेणीचा इतिहास फार जुना म्हणजे इ. स. पूर्व 100 वर्षापूर्वीचा आहे. येथे दोन मुख्य गुफा आहेत. पहिली गुफा ही चैत्यगृह (प्रार्थना स्थळ) असून येथे मोठा स्तूप आहे. दुसरी गुफा म्हणजे राहण्यासाठी खोल्या असलेले विहार आहे. चैत्यगृहात जाण्यासाठी खिंडीसारख्या चिंचोळ्या मार्गाने प्रवेश करावा लागतो. चैत्यगृहाच्या बाहेर दोन भव्य खांब असून वरील चौकोनी शीर्षभागात स्त्री-पुरुषांच्या घोडे व बैलांवर बसलेल्या जोड्या आहेत. दोन खांबांच्या बाजूसही कातळात कोरलेले दोन अर्ध खांब आहेत.
चैत्यगृहाला भाजे लेणी प्रमाणेच पिंपळाकृती कमान आहे. त्यामागे दोन्हीबाजूने ओळीने खांब असून मध्ये स्तूप आहे. (लेणीची ऐतिहासिक माहिती आंतरजालावर उपलब्ध आहेच तसेच काही माहितीपर लेख यापूर्वीच मिपावरही आलेले आहेत. माझा याबाबत अभ्यास नाही त्यामुळे आजच्या भटकंतीबद्दलच थोडीशी माहिती)

शिलालेख

विहार

लेणीच्या माथ्यावर

येथून दिसणारा नजारा

स्तंभांच्या वर असलेल्या शिल्पाकृती जवळून पाहातांना

येथील पाण्याचे टाके बघत असताना बाजूच्या भिंतीवर नजर गेली आणि हादरलोच. एक भला मोठा सर्प दिसला. नुकतीच त्याने शिकार केली होती आणि भक्ष गिळंकृत करीत असतानाच आमची चाहूल लागल्याने पळण्याच्या तयारीत असावा.

साधारण दीड तासात लेणी बघून खाली उतरलो. संपूर्ण वेळेत इतर एकही पर्यटक इकडे फिरकताना दिसला नाही. आता आलो त्या मार्गाने परत न जाता करुंज येथून उजवीकडे म्हणजेच पवना जलाशयाकडे जाण्यासाठी वळण घेतले. साधारण १०-१२ किमीवर जलाशयाच्या किनाऱ्यावरील एका कॅम्पिंगच्या ठिकाणी थांबलो. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती त्यानिमित्ताने मध्ये शिरलो. जेवणाची ऑर्डर दिली व जेवण तयार होईपर्यंत परिसरात भटकलो. येथून जलाशयाचा विस्तृत परिसर दिसतो. काही पायऱ्या उतरून गेलो की आपण थेट जलाशयाच्या पाण्यापर्यंत पोहचू शकतो.थोडावेळ थांबून आजूबाजूचा देखावा पाहण्यासाठी निश्चितच एक चांगले ठिकाण.

वाटेत दिसलेले पवना धरण.

कॅम्पिंग ठिकाणाचा परिसर.

पानांच्या जाळीतून डोकावणारा मोर

पवना जलाशय

येथून लोणावळ्याच्या दिशेने निघाल्यावर ३-४ किमी वरच दुधिवरे येथे प्रति पंढरपूर मंदिर आहे. कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी हे मंदिर साकारले आहे. दाट झाडी, समोर दिसणारा लोहगड व शांत वातावरण यामुळे हा परिसर खूपच छान वाटतो.

मंदिराचे छत

कामशेत ते प्रति पंढरपूर मंदिर रस्ता नकाशा

येथून पुढे दुधिवरे खिंड पार केल्यावर उजवीकडे एक रस्ता वळतो. थोड्या अंतरावर तीव्र चढण चढून गेल्यास थेट लोहगडाच्या पायथ्याशी पोहचता येते. लोहगड पाहिलेला असल्याने व आज वेळही नसल्याने डावीकडे वळून लोणावळा मार्गे परतीचा प्रवास सुरु केला.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

10 Nov 2020 - 4:30 pm | कंजूस

वेळेचं आयोजन करून फार धावपळ न करता मोजकी ठिकाणं पाहता हे आवडलं. फोटो सुंदर.

गोरगावलेकर's picture

10 Nov 2020 - 8:37 pm | गोरगावलेकर

आवडल्याबद्दल धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2020 - 5:29 pm | चौथा कोनाडा

झकास आटोपशीर वृतांत !
प्रचि नेहमी प्रमाणेच सुंदर आहेत.
पु वृ प्र.

गोरगावलेकर's picture

10 Nov 2020 - 8:37 pm | गोरगावलेकर

उत्साहवर्धक प्रतिसाद

गणेशा's picture

10 Nov 2020 - 6:36 pm | गणेशा

फोटो सुंदर,

तो साप तेथेच पाण्याच्या टाक्यात असतो बहुदा.. कारण तेथे तो २ दा पाहिला आहे (तोच होता का हे सांगता येणार नाही ).

गोरगावलेकर's picture

11 Nov 2020 - 7:50 am | गोरगावलेकर

दोन वेळा दिसला म्हणजे आपले येथे अनेकदा जाणे झाले असणार. पाणवठा त्यांचे हमखास शिकार मिळण्याचे ठिकाण असावे

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Nov 2020 - 7:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

छान भटकंती झाली. फोटोही मस्त.

पुण्याहुन निघाले की जुना मुंबई-पुणे रस्ता घेउन डावीकडे कामशेतकडे(काळे कॉलनी) वळुन प्रथम बेडसे लेणी, मग तिकोना, खाली उतरुन पुढे जाउन तुंग आणि पुढे पौड्कडे घाटातुन जाउन चांदणी चौकातुन पुन्हा पुणे असा मस्त वन डे करता येतो. अर्थात स्वतःची गाडी असल्यास आणि तयारीचे गडी बरोबर असल्यास.

गोरगावलेकर's picture

11 Nov 2020 - 7:51 am | गोरगावलेकर

तुम्ही सांगितलेला रूटही मस्त. पण मुंबईकरांसाठी हाच सोयीचा वाटतो आणि लहान थोर सगळेच भटकू शकतात. अगदीच तयारीचे गडी नसले तरीही.

एवढासा तिकोना पण ठाणे कल्याणकडून जायचं झाल्यास ( (ट्रेकिंगची जुनी पद्धत - एक रुपया तिकिट, चार रुपये बसगाडीची वाट पाहण्यात, पाच रुपये पायपीट)) बराच वेळ प्रवासात जातो.
प्रथम रेल्वेने लोणावळा. मग पौडमार्गे जाणारी बस तिकोनापाशी सोडते. वर जाऊन राहिलो. डोंगरावर एकटाच होतो. संध्याकाळी झेंड्याखाली बसून पवना धरणात तुंग पाहात बसलो. अंधार पडल्यावर डबा खाऊन तारे उगवायची वाट पाहिली. कसचं काय. एक्सप्रेसवेवरच्या ट्राफिकचे प्रखर लाइटस रात्री तीन वाजले तरी संपेचनात. मग सकाळी खाली उतरून लोणावळा बस मिळाली. अकराची परळ- पौड बस वाटेत दिसली. पण लोणावळ्याची साडेबाराची कर्जत प्यासेंजर गेलेली. मग फलाटावर माशा मारून पावणेपाचची डेक्कन एक्सप्रेस पकडून सातला घरी.
असे दोन दिवस घालवता आले तिकोनाच्या नावावर.
--------------
हल्लीचं ट्रेकिंग वेगळं. आलं मनात की मारले चारपाच फोन. टुविलरला किक मारायची. सवंगडीना घ्यायचे. वाटेत ढाबास्टॉप घेऊन थेट डोंगराच्या पायथ्याच्या गावाला पार्किंग. कोल्डड्रिंक पचवून गड 'मारायचा' खाली आले की गाडीला किक. थेट घरी.

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Nov 2020 - 12:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

ठाणे/कल्याणहुन तिकोना करायचा म्हणजे प्रथम ईंद्रायणी किवा डेक्कनने लोणावळा- मग लोकलने कामशेत- मग हायवे पार करुन जीप ने काळे कॉलनी किवा जर तो मेहेरबान झाला तर थेट तिकोनापेठ करेपर्यंत बारा वाजुन जातात. मग डबे वगैरे खाउन चढाई चालु करायची ,वर जाउन थोडा आराम केला की संध्याकाळच्या जेवणाची तयारी किवा खाली उतरुन पुन्हा बस्/जीप पकडुन तुंग च्या पायथ्याशी मुक्काम. दुसर्‍या दिवशी तुंग करुन पुन्हा बसने लोणावळा आणि परत असा छान ट्रेक होतो.

कंजूस's picture

11 Nov 2020 - 1:44 pm | कंजूस

जाउन थोडा आराम केला की संध्याकाळच्या जेवणाची तयारी किवा खाली उतरुन पुन्हा बस्/जीप पकडुन तुंग च्या पायथ्याशी मुक्काम.

तिकोनाला दोनचार जणच राहतील एवढीच जागा आणि तुंगला वर नाहीच ही माहिती काढलेली. त्यामुळे तुंग बादच केलं. पायथ्याशी वस्ती करत नाही. त्यात मजा नाही. शनिवारी रविवारी जात नसल्याने वर रिकामेच असते.

संजय क्षीरसागर's picture

11 Nov 2020 - 2:54 pm | संजय क्षीरसागर

फिरायची शून्य आवड आहे त्यामुळे तुमच्याबरोबर मस्त सहल झाली.

गोरगावलेकर's picture

12 Nov 2020 - 10:26 am | गोरगावलेकर

फिरायची शून्य आवड असूनही भटकंती आवडली हे विशेष!

फारएन्ड's picture

12 Nov 2020 - 11:57 pm | फारएन्ड

आवडले वर्णन.

गोरगावलेकर's picture

13 Nov 2020 - 9:32 pm | गोरगावलेकर

धन्यवाद फारएन्ड _/\_

श्रीरंग_जोशी's picture

14 Nov 2020 - 3:40 am | श्रीरंग_जोशी

आटोपशीर भटकंतीचे नेटके वर्णन व फोटोज आवडले.

गोरगावलेकर's picture

14 Nov 2020 - 8:32 am | गोरगावलेकर

आवडल्याबद्दल धन्यवाद!

प्रचेतस's picture

14 Nov 2020 - 6:36 am | प्रचेतस

सुंदर भटकंती.
बेडसे लेणी तिथल्या पर्सिपोलिटन धर्तीच्या स्तंभांमुळे विशेष आवडीची. मावळातील ह्या कार्ल, भाजे, बेडसे लेण्यांत प्रत्येकाची काही युनिक अशी वैशिष्ट्ये आहेत. कार्ले चैत्यगृह जगात सर्वोत्तम, भाजेमधली सूर्यगुंफा तिथल्या सूर्यगुंफेतील ग्रीक मिथिकल शिल्पामुळे एकदम अनोखी तर बेडश्याचे हे अद्भुत स्तंभ.

बेडसे लेणीचे चैत्यगृहाचे प्रवेशद्वार अर्धवट खोदले गेले असल्याने किंवा मुद्दामहून तो दगड तसाच राहू दिला असल्याने चैत्याचे सौंदर्य एकदम वाढले आहे. आत जाताच भला मोठा कॅनव्हास सामोरा येतो.. बेडसे लेणी पूर्वाभिमुख असल्याने सकाळी गेल्यास चैत्यगृहातील स्तूप उजळलेला दिसतो तर कार्ले लेणी पश्चिमाभिमुख असल्याने ती संध्याकाळी सोनसळी प्रकाशात नहात असते.

गोरगावलेकर's picture

14 Nov 2020 - 8:34 am | गोरगावलेकर

अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे _/\_

काही किरकोळ बदल जाणवले. पायथ्याला पायऱ्या सुरु होतात तेथे लोखंडी दरवाजा बसविण्यात आला आहे. बाजूलाच लेणीची माहिती सांगणारा फलकही दिसतो.

वर लेणीच्या बाहेरही असाच दरवाजा बसविला आहे.

लेणीचा एक फोटो

दोन वर्षांपुर्वी मुलांना घेऊन बेडसे लेणी बघयला गेलो होतो. दुपारची वेळ असल्याने सावली पाहून पायर्यांवर बसत, फोटो काढत वर पोहोचलो. लॉकडाउन मुळे लेणी बंद होती. बाहेर पुरातत्व खात्याने नेमलेला स्थानिक मुलगा मोबाईल वर वाचत बसलेला होता. त्याने लेण्याची थोडीफार माहीती दिली. तो माहीती देत असतानाच बाजूला लक्ष गेले तर दोन हात लांब काळा भुजंग सरपटत गेला. त्या मुलाला दाखवल्यावर त्यानेच सांगीतले की या लेणी आणि या टेकडीच्या परीसरात खुप नाग आहेत. खाली मुलांसोबत उतरतांना काळजी घ्या सांगायलाही तो विसरला नाही. कारण दगडी पायर्‍या आणि त्याच्या बाजुला घळीत नागाची पिल्ले खुप आहेत.
याच पायर्‍या चढतांना आम्ही खुप निष्काळजीपणे चढलो होतो, अर्थात अज्ञानात सुख असते. सो बेडसे लेणी जरा सांभाळूनच.