परवल की मिठाई ( फसलेली)

कंजूस's picture
कंजूस in पाककृती
24 Oct 2020 - 11:38 am

परवल की मिठाई. ( फसलेली.)
फोटो १
परवल की मिठाई गाजर कीस भरून.

'परवल की मिठाई' असं युट्युबवर शोधल्यास बरेच विडिओ सापडतील. मोठ्या तोंडल्यांसारखी ही परवलं दिसतात. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेशात पिकवतात. याची तोंडल्यांसारखीच भाजी करता येते. पण मिठाई? हो. वाराणसीकडचे विडिओ पाहिल्यास दिसेल. चांदीच्या वर्खात लपेटलेली हिरवी परवलं ताटात ठेवलेली दिसतात. यामध्ये खव्याचे सारण भरलेले असते. पण मुळात परवल चवीला कसे लागते या उत्सुकतेने एकदा प्रयोग केला तो यशस्वी झाला. पुन्हा एकदा वेगळे सारण ( खवा नसलेले) भरून केले. गाजर हलवा भरला. हिरवी परवलं त्यात गुलाबी गाजर हलवा, काळ्या मनुका आणि पिवळे बेदाणे घातलेला पदार्थ छान दिसतो. म्हटली तर मिठाई पण खरी भाजीच आणि थोडीशी साखर.

युट्युबवरच्या विडिओंतील कृतीत १) परवल उघडून बिया काढून उकडून घेणे, २) पाकात थोडा वेळ टाकून गोड करणे, ३) भाजलेला खवा आणि साखर घातलेल्या सारणाने परवल स्टफ करणे या तीनच सोप्या पायऱ्या आहेत. झटपट होते.

आमची पाककृती ( तिसरी) फसली कारण परवल थोडी पिकली. तसेच जास्ती वेळ ( १० मिनिटे) उकळल्याने फारच मऊ झाली, आकार गेला. गाजराचा हलवा भरण्याऐवजी (खवा नको म्हणून) कीस शिजवून भरला. तो इतका चांगला लागला नाही.

सारणाचे वेगळे पर्याय करून पाहा. चांगली गोष्ट म्हणजे यास साखर फार लागत नाही आणि तयार पदार्थ रंगीत दिसतो.
साहित्य :
परवल - चार पाच
एका गाजराचा कीस
तूप : दोन छोटे चमचे.
साखर : पाच छोटे चमचे.
मनुका, बेदाणे : दोन दोन चमचे. ( नाशिकचा हिरवा बेदाणा स्वस्त आणि मस्त.)

कृती
फोटो २
सोलून आणि बिया काढून.

१) परवलं तासून एक उभी चीर मारून आतील बियांचा मगज काढा.
फोटो ३
गाजराचा कीस आणि परवल.

२) साफ केलेली परवलं पाच मिनिटे पाण्यात उकळा. चिमुटभर सोडा पाण्यात टाकल्यास हिरवा रंग खुलेल.
३) ज्या पाण्यात शिजवली ते बरेचसे पाणी टाकून द्या आणि उरलेल्या थोड्याच पाण्यात दोन तीन चहाचे चमचे साखर ( चार परवलांसाठी) टाकून परवलांत जिरवा. हलवत राहून पाणी आटवून टाकल्यावर गोड परवल तयार होतील. हे अगदी लगेच होईल. वेगळा पाक केला नाही.
फोटो ४
साखरेत जिरवल्यावर.

४) सारण / स्टफिंग -
- मूळ पदार्थ भाजलेला खवा साखर आणि वेलची घालून वापरतात.
- गाजर हलवा भरता येईल.
- एका गाजराचा कीस तुपावर मनुका आणि बेदाणेसह तव्यावर परतून घेतला. ग्यास लहान ठेवून दोन चमचे साखर मिसळली. हे सारण भरले.
फोटो ५
सारण :- गाजर कीस प्रथम प्रेशर कुकरमध्ये दोन शिट्ट्या कोरडा उकडला. तव्यावर तूप टाकून काळ्या मनुका आणि बेदाणे थोडा वेळ परतून त्यावरच कीस परतला. दहा मिनिटे लागतील.

टीप : फार गोड नसलेली वेगळी मिठाई करून पाहा. सारणाचे वेगळे प्रकार भरून पाहता येतील. दोन दिवस टिकेल असं वाटतं. नाही आवडल्यास परवलांची भाजी करून संपवता येतील.
सध्या मिठाईंची दुकाने गिऱ्हाइक नसल्याने फारसे पदार्थ ठेवत नाहीत. त्यामुळे खवा वापरण्याचे टाळले.
*************************

मिसळपाव साइटवरचे माझे लेखन
इथे पाहता येईल.

========================

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2020 - 12:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तपशीलवार मिठाई कृती आणि फोटो आवडले.

-दिलीप बिरुटे

साहित्य संपादक's picture

24 Oct 2020 - 3:05 pm | साहित्य संपादक

प्रकाटाआ

तुषार काळभोर's picture

24 Oct 2020 - 3:06 pm | तुषार काळभोर

वाचायला सोप्पी पण करायला नाजूक वाटतेय.
खवा वापर्ल्यावर भारी होईल हे नक्की!

Gk's picture

24 Oct 2020 - 9:26 pm | Gk

छान

शेवयाची खीर भरून बघा

कंजूस's picture

25 Oct 2020 - 6:01 am | कंजूस

हो. याचा विचार केलेला. सूचना आवडली.
हा पदार्थ महाराष्ट्रात नवीन आहे. बरेच जण लक्ष घालतील तर लोकप्रिय होऊ शकेल.

प्रचेतस's picture

25 Oct 2020 - 9:29 am | प्रचेतस

पाकृचे प्रयोग आवडले.