श्रीगणेश लेखमाला २०२० - साध्यासुध्या आठवणी

नूतन's picture
नूतन in लेखमाला
25 Aug 2020 - 7:03 am

1

जादूच्या दिव्यातल्या राक्षसासारखी, आज्ञा करताच तत्क्षणी इच्छापूर्ती करणारी 'तू नळी' आज आपल्या सेवेस सादर आहे. नाटक, सिनेमा, भाषणं, गाणी.. अगदी कीर्तनदेखील आपण 'कधीही कुठेही' बघू शकतो, ऐकू शकतो. आज तंत्रज्ञानाचे असंख्य फायदे आहेत. पण सत्तरच्या दशकात हे शक्य नव्हतं.आजही जिथे 'लाइव्ह' शब्दाची जादू आहे, तिथे माझ्या लहानपणी साहजिकच आम्ही वाट पाहायचो ती मनोरंजनाची बहार असलेल्या गणेशोत्सवाची आणि नवरात्र शारदोत्सवाची.

त्या काळी गणेशोत्सव मंडळंही मोजकीच असत. त्यापैकी श्री गणेश मंदिर संस्थानचा गणेशोत्सव हा हलत्या चित्र देखाव्यासाठी, आगमन आणि विसर्जनाची लेझीमच्या तालावरची लयबद्ध मिरवणूक, तसंच दर्जेदार कार्यक्रमांसाठी ख्यात होता. विविध नामवंत वक्ते आपले विचार आणि नामवंत कलाकार आपली कला या कार्यक्रमातून सादर करत. मंदिर आणि आमचं घर यामध्ये केवळ रस्ता होता. अंगणातल्या कट्ट्यावर बसून कार्यक्रमाचा आनंद घेणं सहज शक्य होतं. पण कार्यक्रम सादर करणारे कलाकार जास्तीत जास्त जवळून बघता, ऐकता यावेत म्हणून वेळेआधीच अर्धा तास जाजमावर पहिली रांग पकडून बसायची कोण उतावीळ!

यापैकीच आठवणीतले दोन कार्यक्रम म्हणजे कथाकथन आणि मंतरलेल्या चैत्रबनात.

द मा. मिरासदारांची 'माझी पहिली चोरी', शंकर पाटलांची 'धिंड', व्यंकटेश माडगूळकरांची 'शिकार कथा' आणि शंकरराव खरातांची अशीच एक विनोदी कथा साभिनय ऐकणं मनात कायमचं कोरलं गेलं. या कार्यक्रमाच्या वेळी एक गंमत झाली. नामवंत कलाकारांच्या सह्या गोळा करणं ही त्यावेळी मोठी प्रतिष्ठेची गोष्ट. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर मीही माझी वही-पेन घेऊन गेले. गर्दीतून संधी साधून चौघांच्या सह्या मिळवल्या. मोठ्या खुशीत मी घरी येऊन बाबांना दाखवल्या.
बाबा सह्या बघत म्हणाले, "आणि भाव्यांची सही नाही ती घेतलीस?"
मी प्रश्नार्थक चेहरा करून विचारलं, "कोण भावे?"
बाबा म्हणाले, "अगं प्रसिद्ध लेखक पु.भा. भावे. आपल्या गावचे. तेही होते की तिथे."
मला हसू आलं. दिव्याखाली अंधार म्हणतात तो हा असा!
घर बदलताना ती मूल्यवान वही गहाळ झाली. हं....! असो.

गदिमा आपल्या ' मंतरलेले दिवस' या पुस्तकात म्हणतात,
लुटून नेसी काय काळा, सौख्य माझे मागले?
भोगले ते भोगले!

दुःखाप्रमाणे सुखही आपण भोगतोच (उपभोगतो) आणि ते आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ह्याचा अनुभव म्हणजे याच गदिमांच्या अर्थपूर्ण, चपखल शब्दांनी गुंफलेल्या गीतांचा 'मंतरलेल्या चैत्रबनात' नावाचा अतिशय सुंदर कार्यक्रम गणेशोत्सवात सादर झाला होता. माझ्या आठवणीप्रमाणे तो प्रयोग त्यांच्या प्रारंभीच्या काळात सादर झालेला प्रयोगांपैकी एक होता. 'नखांनखांवर रंग भरा' या गीताने सुरुवात होत शेवटपर्यंत कार्यक्रमात रंग चढत्या क्रमाने भरत गेला होता. रसिकांसाठी हा श्रवणसुखाचा अनुभव होता आणि आमच्या पिढीच्या मनात उत्तम शब्दसंगीताचं बीजारोपण होत होतं. शोभा जोशी, रंजना पेठे, अनुराधा मराठे, शैला दातार इत्यादी गायक कलाकार होते आणि त्यांचे वादक साथीदार त्यांना समरसून साथ देत होते. 'वन्स मोअर'मुळे कार्यक्रम संपला, तेव्हा खूप रात्र झाली होती. या वाद्यवृंदात ढोलकी वाजवणार्‍या कलाकाराने (त्याचं नाव श्री. मुखडे होतं, असं मला स्मरतंय.) बहारच आणली होती. माझा दादा तर तर त्यांच्यावर एवढा फिदा झाला की कलाकारांनी सामानाची बांधाबांध करायला घेतली, तेव्हा तो थेट मंचावरच चढला आणि त्याने ढोलकी वादकाला घरी यायचा आग्रह केला. रात्र खूप झाली होती, त्यामुळे ते आधी नाहीच म्हणाले, पण त्यांना आग्रह मोडवेना. घर समोरच असल्याने ते तयार झाले. घरी येऊन काॅफी पिऊन गेले. दादाच्या चेहर्‍यावरचा तेव्हाचा आनंद मी आजही विसरू शकत नाही.

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

25 Aug 2020 - 9:15 am | दुर्गविहारी

छान ! तो काळ गणपती काळातील उत्तमोत्तम कार्यक्रम असणाऱ्या बहराचा होता. सध्या डी. जे,, हिडीस नाच वगैरे प्रकार बघून गणपतीच्या काळात बाहेर पडणे टाळतो किंवा सरळ कोठेतरी डोंगरात जातो.

अन्या बुद्धे's picture

26 Aug 2020 - 3:10 pm | अन्या बुद्धे

अगदी करेक्ट

कंजूस's picture

25 Aug 2020 - 9:32 am | कंजूस

आवडल्या.

चौकटराजा's picture

25 Aug 2020 - 9:39 am | चौकटराजा

मी वाई येथे नोकरीस होतो. त्याकाळात आजच्या सारखी करमणुकीची पर्यायी साधने नव्हती. त्यात माझ्यावर आई वडिलांमुळे अगदी नावडीकर, वाटवे कुरवाळीकर अशा जुन्या गायकांच्या गीतांचे श्रवणाचे संस्कार झाले होते. साहजिकच चैत्रबन चा वाईतील कर्यक्रम मी चुकविणे शक्यच नव्हते. तो कार्यक्रम गणपति उत्सवात तेथील एक सरकारी वसाहती च्या एक लहानच्या पटांगणात होता. दोन तीन गाणी झाल्यावर जो पाउस सुरू झाला तशी गायक वादक , श्रोते यान्ची तारांबळ उडाली. कार्यलयाच्या एक मोठ्या हॉल मधे काही खुर्च्या टेबले होती. त्यात ज्याने त्याने आपापली जागा पटकाविली. अगदी कलाकरानी सुद्धा. कोणी एक गायक एका खुर्चीवर , तबला वाले पान्डुरन्ग मुखडे टेबलावर असा जामानिमा सिद्ध झाला. बाहेर पाउस ओतत होता. सुदैवाने वीज गेली नाही पण श्रोते व कलाकार यानी तशी अवघडलेपणात कार्यक्रम स्मरणीय केला हे विशेष !

गणेशा's picture

25 Aug 2020 - 9:44 am | गणेशा

छान..

लुटून नेसी काय काळा, सौख्य माझे मागले?
भोगले ते भोगले!

वा.
---

उरुळी कांचन ला गणपती मध्ये नाही, पण नंतर थंडीत, वसंत व्याख्यानमालेचे आयोजन व्हायचे. त्या सर्व आठवणी आठवल्या.
सही कोणाची घ्यायची असते हे तेंव्हा आमच्या गावी ही नव्हते.
परंतु,
महानायक प्रकाशित होण्या अगोदरचे विश्वास पाटलांचा त्या बद्दलचा अनुभव,
ना. धो. महानोर यांचा निसर्गाप्रती कविता आणि जैत रे जैत च्या सुंदर आठवणी..
टेंम्पो चालक ते सिनेअभिनेता हा मोहन जोशी यांचा प्रवास..
असे असंख्य व्याखाने आणि तिकडे जाऊन बसण्याची चढाओढ मस्त होती..
अश्या कित्येक लोकांचे विचार मनावर कोरले गेले ते कायमचेच.

टर्मीनेटर's picture

25 Aug 2020 - 12:17 pm | टर्मीनेटर

छान आठवणी!

सिरुसेरि's picture

25 Aug 2020 - 2:00 pm | सिरुसेरि

छान आठवणी . हे मंदिर कुठे आहे ?

नूतन's picture

25 Aug 2020 - 5:38 pm | नूतन

म्हणजे डोंबिवली पुर्वेचे गणेश मंदिर.

चौथा कोनाडा's picture

25 Aug 2020 - 2:47 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर आठवण ! दादाचा ढोलकीवादकांना आग्रह कर करून भर रात्री घरी नेण्याचा किस्सा तर अफारट आहे !
ते वय आणि तो भारून जाण्याचा काळच आगळा होता !
मला लहानपणी पाहिलेले कार्यक्रम आठवले !
मी ही त्रिकुटाचे कथाकथन तेव्हां ऐकले आहे. अप्रतिम असायचे !
लेख आवडला !

नूतन's picture

25 Aug 2020 - 5:41 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आपण सांगितलेल्या आठवणीही सुंदर.

अन्या बुद्धे's picture

26 Aug 2020 - 3:09 pm | अन्या बुद्धे

सुंदर आठवणी! छान लिहिलंय..

नूतन's picture

26 Aug 2020 - 3:15 pm | नूतन

धन्यवाद

बिपीन सुरेश सांगळे's picture

26 Aug 2020 - 11:26 pm | बिपीन सुरेश सांगळे

सुंदर लेखन शॉर्ट न स्वीट

चित्रगुप्त's picture

27 Aug 2020 - 12:57 am | चित्रगुप्त

छान लिहीले आहे. तुमच्या गणेशोत्सवाच्या आठवणी वाचून इंदौर मधल्या लहानपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी जागृत झाल्या. अनेक आभार.

सुमो's picture

27 Aug 2020 - 4:51 am | सुमो

आठवणी गणेशोत्सवाच्या.
छान लिहिल्याहेत.

पुलेशु.

नूतन's picture

27 Aug 2020 - 7:24 pm | नूतन

बिपीन,चित्रगुप्त आणि सुमो....प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार

स्मिताके's picture

27 Aug 2020 - 11:07 pm | स्मिताके

पण थोडक्यात का लिहिलेत? आणखी वाचायला आवडले असते.

सुधीर कांदळकर's picture

28 Aug 2020 - 5:23 pm | सुधीर कांदळकर

कथाकथनाबद्दल कथावे तितके थोडेच. पहिली चोरी ... वा! खरातांचे मात्र अनुभवले नाही.

तुम्हांला साध्या वाटल्या तरी या साधेपणामुळेच अमूल्य अशा आठवणी. धन्यवाद.

नूतन's picture

29 Aug 2020 - 7:30 pm | नूतन

धन्यवाद

अनिंद्य's picture

31 Aug 2020 - 10:50 am | अनिंद्य

छोटेखानी लेखानुभव आवडला.

.... लुटून नेसी काय काळा, सौख्य माझे मागले?
भोगले ते भोगले! ..... हे तर फार चपखल. अनुभवाचे वैभव हिरावून घेता येत नाही, अगदी खरे !

गणपती मंडळात विवीध गुणदर्शन कार्य्मक्रम असायचे रांगोळी स्पर्धा असायची.
मजा यायची.
आता तसे कुठेच दिसत नाही

नूतन's picture

31 Aug 2020 - 2:27 pm | नूतन

धन्यवाद अनिंद्यजी.

खूप सुंदर लेख! गणपती उत्सव त्या काळात सांस्कृतिक उत्सव असे!

प्राची अश्विनी's picture

30 Sep 2020 - 6:06 pm | प्राची अश्विनी

आठवणी आवडल्या.

नूतन's picture

4 Oct 2020 - 9:11 pm | नूतन

धन्यवाद