मी त्या वेळी चार-साडेचार वर्षांची असेन. आम्ही त्या वेळी मलकापूरला राहात होतो. मी सगळ्यांत धाकटी, शेंडेफळ. त्यामुळे सर्वांची लाडकी. वडील डॉक्टर. घरापासून दवाखाना जवळच होता. मलकापूर तसं खेडंच. घरापासून दूर एस टी स्टँड होता. रेल्वे नव्हती. घरापासून जरासं दूर एक देऊळ होतं. त्या देवळातच शाळा भरायची. प्राथमिक. शाळेत मुलं फारशी नव्हती. मी गंमत म्हणून कधीतरी शाळेत जाऊन बसायची. वडील डॉक्टर म्हणून गावात वडिलांचा दबदबा होता. डॉक्टरांची मुलगी शाळेत येऊन बसते याचं कौतुकच होतं. हरकत कुणीच घेत नसे. मी कंटाळा आला की शाळेतून उठून यायची. तसंही शाळेत अॅडमिशन वगैरे घ्यायचं माझं वय नव्हतंच. त्या वेळी मॉंटेसरी, बालवाडी असं काही मलकापुरात तरी नव्हतं. सर्वांत जवळचं जिल्ह्याचं शहर म्हणजे कोल्हापूर.
मी दिवसभर हिंडत असायची. शिवदेवी नावाची माझी मैत्रीण होती. बाळू नावाचा एक पोरगा मित्र होता. आम्ही तिघेही खेळायचो. भूक लागली की घरी जायचं, नाहीतर शिवदेवीकडेच जेवायचं. आई शोधत यायची जेवणाची वेळ झाली की. मी जशी मनात आलं की शाळेत जायची, तशी देवळातही जायची. देवाला नमस्कार करायचा. प्रदक्षिणा घालायची. त्याच्यावर आधीच वाहिलेलं फूल उचलून पुन्हा तेच त्याला वाहायची. (नाहीतरी आपण काय करतो? देवाचीच निर्मिती असलेल्या झाडावरचं फूलच देवालाच पुन्हा अर्पण करतोच ना?)
देवळात बसायचा कंटाळा आला की मी वडिलांच्या दवाखान्यात जायची. डॉक्टरसाहेबांची मुलगी म्हणून तिथले कंपाउंडर, नर्सबाई कौतुक करायच्या. उचलून घ्यायच्या. दवाखाना सरकारी होता. वडील सरकारी डॉक्टर होते. वडिलांच्या दवाखान्यात माझा मुक्त संचार असे. वडिलांची एक स्वतंत्र, प्रशस्त केबीन होती. तिथेच पडदा लावून तपासणीचं एक टेबल ठेवलेलं होतं. वडिलांसमोर एक मोठं टेबल होतं. त्यावर एक डेस्क कॅलेंडर, प्रिस्क्रिप्शन पॅड, बीपीचं मशीन असं ठेवलेलं असे. अर्थात हे मी आत्ता मोठेपणी सांगतेय. लहानपणी माझ्या दृष्टीने ते एक कसलं तरी मशीन हंतं.
तिथे आणखी एक वस्तू होती. बाउलसारखं एक पसरट भांडं होतं. त्या भांड्यात भरपूर नाणी ठेवलेली असत. वडिलांकडे पेशंट्स यायचे. त्यांनी दिलेले पैसे वडील त्यात ठेवायचे आणि त्यातूनच त्यांना उरलेले सुटे पैसे द्यायचे. त्या वेळी फी अगदी कमी होती. एखादा रुपया असेल. रुपये-आणे-पैशांत हिशेब चालायचा. त्या नाण्यांशी खेळायला मला खूप आवडायचं. ती चिल्लर ओतायची आणि पुन्हा भरायची हा माझा आवडता खेळ असायचा. वडील रागावले की मी हा खेळ आटोपता घ्यायची.
माझं जग फार लहान होतं. घर, दवाखाना, देऊळ, शाळा आणि बाळूचं शिवदेवीचं घर. वाहनं नव्हती. रस्ता रहदारीचा नव्हता. सगळं सेफ होतं. मुलं कुठे खेळताहेत याचा आईवडिलांना पत्ता नसायचा. माझ्या अंगात दिवसभर एकच फ्रॉक असायचा. पायांत चपला वगैरे नाहीत.
माझ्या ह्या लहानशा परिसरात एक आकर्षण होतं. तिथे एक 'गारीगारवाला' यायचा. तो ओरडायचा, "ठंडा मीठा लाया है। बरफवाला आया है।" त्याची एक हातगाडी होती. त्यावर एका पोत्याखाली बर्फ झाकून ठेवलेला असे. एक खिसणी असे. वेगवेगळ्या रंगाचं साखरेचं पाणी भरलेल्या बाटल्या असत. कांड्या असत. तिथली शाळेतली मुलं हे त्याचं गिऱ्हाईक होतं. मधल्या सुटीत मुलं त्याच्या गाडीभोवती गोळा होत. मग ती मुलं बर्फाचा गोळा मागत. तो एक कांडी घेत असे. पोत्याखालचा बर्फ दगडाने फोडत असे. तो बर्फाचा तुकडा खिसत असे. खिसलेला बर्फ कांडीभोवती हाताने सर्व बाजूंनी दाबून गोलाकार करत असे आणि त्या बर्फाच्या गोळ्यावर बाटलीतलं साखरेचं रंगीत पाणी टाकत असे. लाल, ऑरेंज, पिवळा, चॉकलेटी. मग तो रंगीत गोळा मुलाच्या हातात देत असे. त्याच्याकडून पैसे घेऊन पत्र्याच्या चौकोनी डब्यात टाकत असे.
तो गोळा बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत असे. वाटत असे, आपण पण तो गोळा घ्यावा आणि खावा. कसा लागत असेल? मी प्रयत्नपूर्वक लाळेचा आवंढा गिळत घरी परतत असे.
एके दिवशी मी हट्ट धरला. आईला म्हटलं, "मला तो बरफवाल्याकडचा गोळा खायचाय." आई म्हणाली, "शी.. तसलं काही खायचं नसतं. शहाणी मुलं खात नाहीत." वडील म्हणाले, "तो बर्फ शुद्ध, चांगल्या पाण्यापासून केलेला नसतो. त्याच्यावर टाकलेलं पोतं स्वच्छ नसतं. त्या बर्फवाल्याचे हात स्वच्छ धुतलेले नसतात. तो त्याच हाताने नाक पुसतो, विडी ओढतो. त्याच हातांनी नाणी घेतो. नाण्यांना तर कितीतरी जणांचे हात लागलेले असतात. त्याच हातांनी तो बर्फाचा खीस दाबतो. ते खाल्लं की पोटात जंत होतात. तू शहाणी ना? हट्ट करायचा नाही."
मी गप्प बसायची. मान डोलवायची, पण मनातून तो बरफवाला जायचा नाही. एके दिवशी मी कसलासा निश्चय केला. मी वडिलांच्या दवाखान्यात गेले. वडील हसून म्हणाले, "आली का माझी शोनी? गडबड करायची नाही हं. शांत बसायचं. बैस त्या खुर्चीवर. तुला कागद, पेन्सिल देऊ का? चित्र काढत बसतेस? फूल काढ." मी मान डोलावली. दिलेल्या कागदावर काहीबाही गिरबाटलं. माझं लक्षच नव्हतं चित्र काढण्याकडे. आणि मला फुलाच्या चित्राखेरीज दुसरं चित्र तरी कुठं काढता येत होतं? माझं लक्ष होतं वडिलांच्या टेबलावरच्या पैशाच्या बाउलकडे. वडील खाली मान घालून काहीतरी लिहीत होते. समोर पेशंट उभा होता. मी टेबलाजवळ गेले आणि बाउलमध्ये हात घालून सरळ त्यातले काही पैसे उचलले आणि फ्रॉकच्या खिशात घातले. ते किती होते कुणास ठाऊक! मोजता कुणाला येत होतं? 'मी जाते घरी'असं वडिलांना जेमतेम सांगून मी दवाखान्याबाहेर पडले.
दूरवर बरफवाला उभा होता. मी पळत त्याच्याकडे गेले. त्याच्या हातगाडीच्या उंचीला माझी हनुवटी लागत होती. बरफ कांडीची किंमत किती वगैरे विचारायचं मला कळतच नव्हतं. खिशातले सर्वच्या सर्व पैसे मी निष्पापपणे त्याच्यासमोर धरले. म्हटलं, "बर्फाचा गोळा द्या. लाल रंगाचा." त्याने ते पैसे न मोजताच पत्र्याच्या पेटीत टाकले.
त्याने हातात कांडी घेतली. खिसलेला बर्फ तिच्यावर दाबला. साखरेचं लाल रंगीत पाणी तिच्यावर टाकलं आणि कांडी माझ्या हातात दिली. माझ्या तोंडात चळ्ळकन् लाळ सुटली. मी आवंढा गिळला. मी कडेकडेने चावत चोखत तो बर्फाचा गोळा सावकाशपणे खायला सुरुवात केली. संपूर्ण परिसरात कुणीच नव्हतं. मी एकटीच होते. बर्फाचा गोळा मी डोळे मिटून खात होते. गोड गोड. गार गार. माझे ओठ आणि जीभ लाल झाली असणार. शाळेतल्या त्या मुलांची होते तशी. मी तृप्त झाले. शांत झाले.
मी घरी आले. जेवायची वेळ झाली. वडील जेवणासाठी दवाखान्यातून घरी आले. ताईने पानं मांडली. दादाने पाण्याचे तांब्ये भरून आणले. सगळे जेवायला बसलो. सगळे जेवताना गप्पा मारत होते. मी मात्र गप्पपणे जेवत होते. आईला वाटलं, शिवदेवीशी भांडण झालं म्हणून मी गप्प आहे.
वडिलांनी माझ्या तोंडाकडे पाहिलं आईनेही पाहिलं.
वडील म्हणाले, "ह्या रविवारी आपण कोल्हापूरला जाऊ या. सगळे जण पोटभर आइसक्रीम खाऊ या."
आईने हसून मान डोलावली.
माझ्या मनात खूप खूप विचार येत होते. मी पैसे घेतले आणि बर्फाचा गोळा खाल्ला हे वडिलांना कळलं असेल का? नसावं. नाहीतर ते मला रागावले असते. त्यांनी मला शिक्षा केली असती. कोण सांगणार त्यांना? शाळेतले गुरुजी? त्यांचा तो तिथे उभा असलेला पेशंट? की बरफवाल्यानेच सांगितलं? की वडिलांनी स्वतःच पाहिलं पैसे घेताना? न विचारता दुसऱ्याचे पैसे घेणं वाईट?
आई म्हणते, "आपण कुठलंही काम करत असताना आपल्याला वाटतं आपल्याला कुणीच पाहिलं नाही. पण देव आपल्याला पाहात असतो." मी पैसे घेताना, गोळा खाताना देवाने मला पाहिलं असेल का? मग तो मला शिक्षा करेल? मला भीती वाटली. रडू फुटलं. पण कुण्णाला काहीही सांगितलं नाही. देवाने नंतर बर्याच शिक्षा आयुष्यात दिल्या, पण कोणत्या चुकीची कोणती शिक्षा हे मानवाला सांगण्याची देवाची पद्धत नाही. त्यामुळे मला त्या चुकीची शिक्षा मिळाली का, हे मला समजलं नाही.
एक खरं - त्यानंतर लहानपणी मी इतक्यांदा दवाखान्यात गेले, पण पैशाच्या त्या बाउलला मी कधी हात लावला नाही.
प्रतिक्रिया
24 Aug 2020 - 8:59 am | सुधीर कांदळकर
झकास लेख. एकच आठवण छान रंगवून सांगितली आहे. मजा आली. धन्यवाद.
पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटणारा तो लाल गोळा पाहून सर्वच मुलांचे तसे होते. कारण बहुतेकांना तो खायची मनाईच असते. मी तर शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर खाल्ला होता. तो इतका थंड असतो हे अनुभवल्यावर धक्काच बसला होता.
24 Aug 2020 - 10:09 am | Bhakti
खरच मज्जा आली वाचतांना..तुमच बालपण समोर उभ राहिलं..पण शेवट असा संवेदनशील .ओहो..मस्तच
24 Aug 2020 - 12:59 pm | अन्या बुद्धे
अगदी साधं सोपं सुंदर जग. मुलाला झेपेल इतकाच वेग.. ओली माती, ठसा घ्यायला, पक्का करायला पुरेशी उसंत.
सुंदर लिहिलंत..
24 Aug 2020 - 1:17 pm | प्रचेतस
एकदम निरागस
खूप आवडलं लेखन.
24 Aug 2020 - 3:38 pm | टर्मीनेटर
आजीबाई मस्त लिहीलंय!
24 Aug 2020 - 4:04 pm | तुषार काळभोर
माझं गोळा खाणं उलट शाळा संपल्यावर सुटलं ;)
दहावीनंतर मग हळूहळू खराब पाण्याचा बर्फ, अस्वच्छ पोतं, माश्या, घाणेरडी सरबतं, गोळावाल्यचे अस्वच्छ हात, असलं सगळं कळायला लागलं. आता इच्छा नाही होत. पण तोपर्यंत मनसोक्त गोळे खाल्ले! तेपण काही न होता.
असो.
इथंच तर मेख आहे. कधी कधी एखाद्या चुकीची शिक्षा फार उशीराही मिळत असेल, जेव्हा अगदी पश्चाताप करण्याचाही उप्योग होणार नाही.
24 Aug 2020 - 8:40 pm | सिरुसेरि
लेख आवडला .
24 Aug 2020 - 11:31 pm | दुर्गविहारी
फारच सुंदर लिखाण !
बाकी हे वाचून त्यावेळी मलकापुर सारख्या छोट्या गावात आईक्रीमवाला हिंदीत बोलायचा हे मजेशीर आहे.त्यावेळी बहुधा नवनिर्माणवाले कोणी नसावेत. ;-)
बाकी कोल्हापुरला पांढर्या रंगाच्या ढकलगाडीमध्ये आईसकांड्या भरुन "पेरीना !! आईक्रीम पेरीना !!" असे ओरडत आईस्क्रीमवाला यायचा हि माझ्या बालपणीची आठवण.
25 Aug 2020 - 3:39 am | चित्रगुप्त
रम्य ते बालपण आणि त्यातल्या त्या आठवणी. खूप सुंदर लिहीले आहे.
तमाम दाढीवाले बाबाजी आणि त्यांचे चेले-चपाटे "वर्तमानात जगा" Be here and Now वगैरे संदेश देत असतात ते ऐकून वाटते, यांच्या जीवनात वारंवार आठवावे आणि त्यात रमून जावे, असे निरागस, रम्य बालपण आलेच नसावे का ? आणि भविष्याबद्दल बेत करण्यात, गोड स्वप्ने रंगवण्यातही नेमके काय चूक आहे ? प्रत्येकजण भूतकाळातले अपमान/त्रास यांच्या आठवणी आणि भविष्याची चिंता यातच सदा गुंतलेला असतो, असे हे लोक का समजतात ?
25 Aug 2020 - 7:34 am | प्रशांत
लेख आवडेश
25 Aug 2020 - 10:06 am | चौकटराजा
खूप लडिवाळ आठवणी !
आठवणीच्या आधी जाते
तिथे मनाचे गूढ पाखरू ... अशी वाचताना माझीही अवस्था झाली.
खूप खूप धन्यवाद ! नोकरीतील काही आठवणीही जमल्यास लिहा !
25 Aug 2020 - 1:40 pm | चौथा कोनाडा
मस्त लेख. तुमी नाणेघाटातुन तावुन सुलाखुन निघालात !
आठवण आवडली. धन्यवाद.
26 Aug 2020 - 11:24 pm | बिपीन सुरेश सांगळे
सुंदर लेखन
27 Aug 2020 - 6:03 am | सुमो
लिहिलंय आजी.
आवडल्या गेले आहे !
27 Aug 2020 - 4:28 pm | गोंधळी
तो बर्फ शुद्ध, चांगल्या पाण्यापासून केलेला नसतो. त्याच्यावर टाकलेलं पोतं स्वच्छ नसतं. त्या बर्फवाल्याचे हात स्वच्छ धुतलेले नसतात. तो त्याच हाताने नाक पुसतो, विडी ओढतो. त्याच हातांनी नाणी घेतो. नाण्यांना तर कितीतरी जणांचे हात लागलेले असतात. त्याच हातांनी तो बर्फाचा खीस दाबतो. ते खाल्लं की पोटात जंत होतात हे वर्णन अगदी खर असल तरि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व ते पदार्थ बिनधास्त खातो.
28 Aug 2020 - 1:00 pm | गवि
अशी निरागस चोरी बहुतेक प्रत्येकाने आपापल्या बालपणी केलेली असावी.
चोरी ती चोरीच पण जिथे एका नाण्याची किंमतही माहीत नसते अशा निष्पाप वयात तिला शिक्षा तरी काय करायची?
मीही लहानपणी पाचेक वर्षाचा असताना एका ओळखीच्या घरातून एक छोटीश्शी गणपतीबाप्पाची मूर्ती "घेतली" होती.
खरं तर चोरीच करायची तर तिथे "किंमत" तुलनेत जास्त असलेल्या इतर खूप वस्तू होत्या. ही मूर्ती अगदी अंगठ्याएवढी आणि प्लास्टरची बेगडी रंगाने रंगवलेली अगदी साधी स्वस्तातली मूर्ती होती. देवळाबाहेर पूजा सामानाच्या स्टॉलवर मिळतात तसली. चांदीबिंदी सोडाच, साधी पितळेची पण नव्हती.
ती मित्रांना दाखवली, ते मनातून आणि उघडही जळले. मोठ्या लोकांपर्यंत माहिती गेली. चौकशीत मी "रस्त्यात पडलेली सापडली" असं उत्तर दिलं.
हे सर्व चुकीचं आहे हे तरीही सतत जाणवत होतं. पण मूर्तीचा मोह खूप होता. नंतर मात्र पापाची जाणीव आणि मूर्ती मूळ घरात परत नेऊन ठेवण्याचा ऑप्शन न सुचल्याने दु:खपूर्ण मनाने एक फूल वगैरे वाहून शेवटची पूजा करुन पर्ह्यात विसर्जन केलं.
तर ते एक असो.
28 Aug 2020 - 1:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजी लेखन आवडलं.
-दिलीप बिरुटे
28 Aug 2020 - 6:03 pm | गणेशा
अप्रतिम.. आणि लेखाचे नावच अजाणता आहे, आणि लहान मुलांनी केलेली अशी चुक नक्कीच देवाने शिक्षा करावी अशी नक्कीच नाही असे वाटते.
लिखाण अप्रतिम आहे.. निरागसता, वातावरण सर्व छान शब्दबद्ध केले आहे.
तुमच्या गारीगारवाल्याच्या आठवणी ने
सायकलवर, मागे लाल पेटीत बर्फ आणि त्यात बर्फाचीच गारीगार आणणाऱ्या गारीगारवाल्याची आणि त्या रम्य बालपणाची मस्त आठवण आली.
बर्फाचा गोळा आमच्या आयुष्यात थोडा नंतर आला.
बाकी 5 रुपये चोरून, रबरी बॉल आणल्याने अंगठे धरावे लागले होते ते आठवले..
--
तुमचे सगळेच लिखान छान असते, हे पण तितकेच छान. आवडले.
5 Sep 2020 - 1:21 pm | आजी
सुधीर कांदळकर- अभिप्राय वाचून बरं वाटलं.धन्यवाद.
भक्ती-"वाचताना मजा आली.शेवट संवेदनशील.ओहो.मस्तच.आवडलं." हा अभिप्राय वाचून बरं वाटलं.
अन्या बुद्धे-"साधं,सोपं, सुंदर,जग." खरं आहे. अभिप्राय वाचून समाधान वाटले. धन्यवाद.
प्रचेतस-"एकदम निरागस.खूप आवडलं लेखन." याबद्दल धन्यवाद.
टर्मीनेटर- बरं वाटलं.धन्यवाद.
पैलवान-"आम्ही खूप गोळे खाल्लेले.काहीही झालं नाही." ....
मलाही काही झालं नाही.अहो, आपल्यात प्रतिकार शक्ती असतेच की.
सिरुसेरी- सुटसुटीत अभिप्राय आवडला.
दुर्गविहारी- धन्यवाद. पेरीना मलाही आठवतं.
चित्रगुप्त-रम्य ते बालपण"असं तुम्ही म्हटलंय. पण मला तरुणपण जास्त आवडत असे. "खूप सुंदर लिखाण"या तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
प्रशांत-"लेख आवडेश" धन्यवादेश.
चौकट राजा- धन्यवाद
चौथा कोनाडा-"आठवण आवडली" वाचून बरं वाटलं.
बिपीन सुरेश सांगळे-"सुंदर लिखाण" याबद्दल धन्यवाद.
सुमो-तुम्हाला आवडल्या गेलंय तर मग माझ्याकडून खरंच चांगलं लिहिल्या गेलंय असं दिसतंय.
गोंधळी-"बिनधास्त खायचं.दुर्लक्ष करुन" ... द्या टाळी.मी पण तसंच करते.
गवि-"अशी निरागस चोरी बहुतेक प्रत्येकाने आपापल्या लहानपणी केलेली असावी." खरंय. तुमच्या अशा निष्पाप चोरीबद्दल तुम्हीही लिहिलंय. आवडलं. छान लिहिलं आहे.
प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे-"आजी, लेखन आवडलं" अल्पाक्षरी अभिप्राय. धन्यवाद.
गणेशा- धन्यवाद.तुम्हीही अशी एक निरागस चोरी करून आंगठे धरण्याची शिक्षा भोगली. आवडली आठवण.
30 Sep 2020 - 6:13 pm | प्राची अश्विनी
छान. एकदम relatable ..