सुट्टी सुरू झाली की ओढ लागायची माझ्या गावाकडे जाण्याची. जिंतूर तालुक्यातलं एक छोटंसं गाव. माझे आजोबा निवृत्त झाल्यानंतर गावी जाऊन शेती करत होते. गावाच्या मध्यभागी आमचा एक मोठा वाडा होता. सगळीकडे सागवानी माळवद, भलीमोठी ओसरी आणि खेळायला मोठं पटांगण. दगड-मातीने बांधलेला वाडा, त्याच्या भोवतालच्या सगळ्या भिंती शेणाने सारवलेल्या. माळवदामुळे घरात नेहमी थंडावा असायचा. वाड्याच्या मध्यभागी चाळीस-पन्नास वर्षं जुनं कढीपत्त्याचं एक झाड होतं. आमचा तर दिवसातला अर्धा वेळ झाडावर नाहीतर झाडाचा आसपासच जायचा. हे झाड वाढतानाच तिरकं वाढलेलं होतं. त्यामुळे त्याच्यावर चढणं, झोका बांधणं खूप सोपं होतं.
माझी आजी वाडा फार नीटनेटका ठेवायची. तिच्या प्रत्येक कामात फार रेखीवपणा होता. एवढा मोठा वाडा, पण आजीने तो फार सुंदर ठेवला होता. वाडा सारवण्यातही तिची एक सौंदर्यदृष्टी असायची. ती म्हणायची, "लिंपलेल्या जागेवर सुकल्यानंतर दिसणाऱ्या रेषा एकसारख्या दिसायला हव्या." तिने स्वतः बांधलेलं न्हाणीघर एक अतिशय उत्तम रचना होती. न्हाणीघराच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला चुलीचं तोंड आणि आतल्या बाजूला त्यात चुलीचं वतल होतं, म्हणजे आपण पाणी तापवायला ठेवतो तो भाग. त्यामुळे अंघोळीला गेलेल्या व्यक्तीला न्हाणीघरातच पाणी मिळत असे आणि बाहेरून कोणी चुलीची लाकडं पुढे सरकवणं, नवीन लाकडं, तुराट्या, पराट्या काड्या टाकणं ही काम करू शकत असे. वाळलेल्या काड्या कोणत्या झाडाच्या, त्यावरूनही त्यांची नावं वेगवेगळी. तुरीच्या झाडाच्या तुराट्या, कापसाच्या पऱ्हाट्या आणि अंबाडीच्या सनकाड्या, ज्वारीच्या चिपाट्या. वाड्यात आजीने बनवलेलं तुळशी वृंदावन, झाडांसाठी केलेलं आळं, सांडपाण्याच्या नाल्या, गाय-बैलांचे गोठे हे सर्व इतक्या नीटनेटकं आणि स्वच्छ असायचं. माझ्या आजोबांचे एक मित्र म्हणायचे, “वहिनीबाई, तुमच्या वाड्यात तर थुंकायला जागा सापडत नाही!”
माझे आजी आजोबा पहाटे चार वाजताच उठायचे. माझे आजोबा फार उत्तम आणि पहाडी गळ्याचे भजनी होते, वारकरी होते. रोज सकाळी तंबोरा आणि चिपळ्या घेऊन ते भजन गात असत. सकाळी चार ते सहा भजन म्हणणं हा त्यांचा नित्यक्रम होता. त्याच वेळेला आजी जात्यावर दळण दळायची. दादांचे सूर, जात्याची घरघर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज.. मला ही वेळ फार आवडायची. दळण झाल्यावर आजी गोठ्यातल्या जनावरांना खायला टाकून तिथलं शेण गोळा करून टोपल्यात भरून ठेवायची. बाहेरची सगळी झाडझूड करून अंगणात शेणाचा सडा टाकायची. मीदेखील तिच्या कामात लुडबुड करीत असे. शेणाच्या गोवऱ्या थापून झाल्यावर आजी मला गोठ्याच्या पत्र्यावर उचलून ठेवायची. तिच्याकडून एक एक गोवरी घेऊन पत्र्यावर एका रेषेत मी त्यांना वाळायला ठेवत असे. गाई-बैलांवर आजी-दादा लेकरांसारखी माया करीत. घरात जेव्हा एखाद वासरू असायचं, तेव्हा आम्हाला खेळायला आणखी एक सवंगडी मिळत असे. दादांचं भजन संपलं की रेडिओ सुरू व्हायचा. तो तर जणू दैनंदिन जीवनाचा भागच होता. दादा म्हणायचे, "सातच्या बातम्या सुरू झाल्या, चला, निहारी द्या काहीतरी." त्यांचं खाणं होईपर्यंत आमचे शेतगडी तात्या घरी पोहोचलेले असायचे. ते वाड्यात आले की सरळ गोठ्याकडेच जायचे आणि बैलांना वावरात जायला तयार करायचे. आमच्याकडे दोन बैल होते - ढवळ्या आणि लाल्या. रंगावरून त्यांना आजोबांनी ही नावं दिली होती. आमच्या गाईंची नावं देवगुणी आणि बहुगुणी अशी होती. त्यांची ही नावं मला फार आवडायची.
गावाकडची सकाळची वेळ फार सुंदर. बहुतांश लोकांचा दिवस अगदी झुंजुमुंजू व्हायच्या आत सुरू होतो. अतिशय मंगल प्रसन्न वातावरण. त्या काळी रोज वासुदेव, राईंदर, माधुकरी मागणारे इत्यादी दारावर येत असत. त्यांना देण्यासाठी धान्याची एक वेगळी कोठीच ठेवलेली होती. त्यात आठवं आणि नीठवं अशी दोन माप ठेवलेली असायची, त्यानेच दारावर आलेल्या लोकांना भिक्षा वाढायची. त्यांना कधीही हाकलयचं नाही अशी पद्धत. माझे आजोबा म्हणायचे, "आपल्या कमाईत या सगळ्यांचाही हिस्सा असतो." दूध तर कधीच विकत आणलं जायचं नाही. घरची गाय दुभती नसेल, तर कोणीही चरवी भरून दूध आणून द्यायचं. लेकरं आली आहेत हे कळल्यावर तर खरवस, भुईमुगाच्या शेंगा, टहाळ असं भरभरून प्रेम मिळायचं.
स्वयंपाकाची चूल तर फार सुंदर लिंपलेली, तीन बर्नरच्या गॅससारखी तिची रचना होती. अलीकडच्या दोन जागी भाजी, पोळ्या इत्यादी पदार्थ होत असत. आणि पलीकडे जे छोटे छिद्र होतं, त्यावर पितळाची तवली ठेवलेली असायची. त्यात तुरीचं वरण, भात, दूध अशा मंद आचेवर तापवायच्या गोष्टी ठेवलेल्या असत. चुलीवरच्या स्वयंपाकाची भांडी फार काळी होतात. त्यामुळे आजी आधी या भांड्याला ओल्या मातीचा थर लावायची आणि मग ते चुलीवर ठेवायची. त्यामुळे फक्त मातीचा तरच काळा होत असे आणि त्यांना घासणं सोपं व्हायचं. या भांड्यात शिजणाऱ्या तुरीच्या वरणाचा, लाल रंगाचा तांदळाच्या भाताचा घमघमाट घरभर पसरायचा आणि मग भूक चाळवायची. आजीचा स्वयंपाक म्हणजे पर्वणीच असायची. मी आणि माझा भाऊ खेळून घरी आलो की हात-पाय धुऊन आजीच्या पुढ्यात बसायचो. एखादी पातळ भाजी ताटात वाढून द्यायची. त्याच्यासाठी वेगळी डिश, वाटी असं काही नाही. मग ताटाखाली एखादा चमचा लावला की ती भाजी सगळीकडे पसरायची नाही. चुलीवर टम्म फुगलेली पोळी, भाकरी काढून मला आणि माझ्या भावाला अर्धी अर्धी करून ताटात वाढायची. इतकी गरम लुसलुशीत पोळी दोन घासात संपायची. मग आम्ही असं किती जेवायचो याचा हिशेबच नाही. गरम गरम करून खाऊ घालणं हेच या माउलीच सगळ्यात आवडतं काम. प्रत्येक पदार्थाची चव इतकी अद्भूत, तिच्या हातचं थालीपीठ, करड खीर, हुरड्याचा खिचडा, रताळ्याची उकडहंडी, पुरणपोळ्या, गुळाचा सांजा असे किती पदार्थ सांगू! तिला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला मी कधीही पाहिलं नाही. माझ्या आजी-आजोबांना एकादशीचा उपवास असला की फक्त आमच्यापुरता स्वयंपाक असायचा, तरीदेखील ती तो फार मनातून बनवायची. तिच्या उपवासासाठी बनवलेली साबुदाण्याची खिचडी आम्हालादेखील घासभर मिळायची, तिची चव काही औरच. आजच्या काळाचा तुलनेत हे सगळ करण्यामागे त्यांची मेहनत खूप होती. पाटा-वरवंट्यावर वाटून, खलबत्त्यात कुटून, जात्यावर दळून, उखळात कांडून हे सगळे पदार्थ बनवले जायचे. त्यामुळे त्यांची चवही मनातून पुसली जात नाही.
मधल्या खोलीमध्ये भिंतीच्या मध्यभागी एक झरोका होता. त्याच्याजवळच एक लोखंडी पलंग टाकलेला होता. जेवण झाल्यावर त्या झरोक्याच्या जवळ बसून राहणं मला फार आवडायचं. घरात पंखा एकच, तोही टेबल फॅन. दोन खोल्यांच्या मध्ये तो फिरत राहायचा. पण झरोक्याच्या थंड हवेची मजाच वेगळी. झरोक्याच्या पलीकडे पलीकडच्या वाड्यातलं दृश्यदेखील दिसायचं. माझ्या एका मैत्रिणीचं घर. ती चुकून दिसेल म्हणून मी तिकडे बघत राहायची. त्यातून थंड वार यायचं. त्यात कधी झोप लागायची कळायचंच नाही.
माझी आजी सर्वार्थाने सुगृहिणी. उत्तम स्वयंपाकाबरोबर घरात स्वच्छता, टापटीप, वस्तू ठेवण्याची सौंदर्यदृष्टी, कलाकुसर यांचं ती भांडारच. तिच्या प्रत्येक कामात तिचं बुद्धिचातुर्य दिसून यायचं. नवनवीन गोष्टी आत्मसात करून त्याच कामाला आणखी देखणं बनवण्यात तिचं कसब होतं. ती स्वतः अतिशय नीटनेटकी राहते. शिवणकला, रांगोळी, भिंतीवरची चित्र या सगळ्यात ती फार पारंगत. दिवसभर आजी कामातच असायची. तिच्या दैनंदिनीचे आणखी दोन फार महत्त्वाचे भाग म्हणजे एक तिचा कुंकवाचा डबा आणि दुसरा पानाचा डबा. पितळ्याचा एक जाडजूड डबा, त्यात चांदीचा कुंकवाचा करंडा आणि मेणासाठी एक छोटी चांदीची डबी. त्यात एक छोटी फणी आणि अंबाड्याला लावायचा आकडा आणि लोकरीचा एक तुकडा असे. तिची सकाळची कामं आटोपल्यावर ती जेव्हा वेणीफणी करायची, तेव्हा फार निवांत वाटायची. माझे आजोबा वारल्यावर हा डबाही पोरका झाला. आजीच्या जेवणानंतर ती जेव्हा पानाचा डबा काढून बसायची, तेव्हाही अशीच निवांत वाटायची. पान खाऊन झाल्यावर खूपदा आजी तोच डबा डोक्याशी घेऊन गाढ झोपून जायची. आता कळतं अशी झोप लागणं एक वरदान आहे.
खूपदा मी आणि माझा भाऊ दादांसोबत शेतात जायचो. बैलगाडीचा प्रवास म्हणजे आजूबाजूंच्या गोष्टींचा आनंद घेत घेत निवांत करायची गोष्ट. आम्ही तर कितीदा गाडीतून उतरायचो, चढायचो. रस्त्यात कुठे बोरं, तुरीच्या शेंगा, मुगाच्या शेंगा, चिंचा जे मिळेल ते खात खात, रानफुलं, झाडांचे तुरे जमा करत करत मजेत हा रस्ता कटायचा. बाभळीची पिवळी फुलं मला फार आवडायची. मी त्यांना कानात घालून दिवसभर मिरवायची. घाणेरीची फुलं इतकी रंगीबेरंगी, त्यांचा वास सगळीकडे भरून राहायचा. लाजाळू झाड दिसलं की त्याला स्पर्श करून मिटवणं यात कोण आनंद मिळायचा. चिंचेच्या झाडाची कोवळी पान, रानकामुन्या, ज्वारीच्या पानावरची साखर हा सगळा रानमेवा खायला आम्हाला कसलीही आडकाठी नव्हती. मी आणि माझा भाऊ अर्धा रस्ता तर गाडीमागे पळण्यातच घालवायचो. दादा तात्यांच्या शेजारीच बसून असायचे. बैलाला जास्त मारलेलं, टोचवलेलं त्यांना आवडत नसे. बैलांशी ते फार गप्पा मारायचे. शेतात पोहोचलं की तात्या बैलांना मोकळे करायचे आणि लांब दाव्याला बांधून चरायला सोडायचे. दादा आणि तात्या मग खोपटीकडे जायचे. खोपटी म्हणजे शेतातल्या सगळ्या कामांचं केंद्रस्थान होती. तुराट्या, चिपाट्या, नारळाच्या झावळ्या यांच्यापासून ही खोपटी बनवलेली होती. तिच्या समोरच मोठी विहीर होती. त्या विहिरीवर मोटर बसवलेली होती. गेल्या बरोबर पहिल्यांदा मोटर लावणं हेच काम असायचं. त्याचं पाणी शेतात सगळीकडे पसरवण्यासाठी पाट केलेला होता. त्यातून पाणी व्हायला लागलं की मी आणि माझा भाऊ त्यातूनच पळत राहायचो. एवढ्या मोठ्या शेतात पाणी पसरायला बराच वेळ लागायचा. तोपर्यंत तात्या तीन दगडांच्या चुलीवर चहा करायला ठेवायचे. गुळाचा काळा चहा आम्हालाही मिळायचा. त्या वातावरणात तो खूप स्वादिष्ट लागायचा. थोडं खेळून झाल्यावर खोपटीत रेडिओ ऐकत बसायची. समोरच्या विहिरीवरच्या पिंपळाच्या झाडाला सुगरणीची खूप घरटी होती. त्याच्या आत-बाहेर चाललेली सुगरण पक्ष्यांची लगबग पाहण्यात वेळ मजेत जायचा. शेतात निंदणी, खुरपणी, तोडणी, पेरणी अशी कामं असली की बाहेरचे रोजंदारही कामाला असायचे. त्यातल्या बायका माझे खूप लाड करायच्या. माझ्या शहरी बोलण्याचं त्यांना फार कौतुक. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते कौतुक मला फार आवडायचं. दुपारचं जेवण मी खूपदा त्यांच्यासोबत करत असे. पांढऱ्या धोतराच्या कपड्यात बांधलेली भाकरी, त्यावर भुरका नाहीतर लोणचं, चटणी किंवा मिरचीचा ठेचा. त्यांचं हे जेवण त्यांनी झाडाला लटकून ठेवलेलं असायचं. सगळे जण पाटाच्या पाण्यात हात-पाय-तोंड धुऊन भाकरी खायला बसायचे. सोबत शेतातला कर्डीचा पाला, शेंगड्या, मुळा, कांदा असा सगळा बेत. माझ्या आजोबांचा शेतावर फार जीव. ही माझी धरणीमाय आहे असं ते म्हणायचे. शेतातल्या एका झाडाखाली पारावर मांडलेल्या देवतांचे दर्शन घेऊन आम्ही घराकडे निघायचो. घरी परतताना बैलांना काही जोर-जबरदस्ती करावी लागायची नाही. दादा आणि तात्या फक्त हलकेच दावं हातात धरून बसून राहायचे. बैल आपसूकच घराची वाट चालायचे.
संध्याकाळी घरी आल्यावर गप्पा मारत जेवणं व्हायची. मग रेडिओवर बिनाका गीतमाला इत्यादी गाण्याचे कार्यक्रम चालू राहायचे. उन्हाळ्याच्या दिवसात अंगणामध्ये बाजा टाकून आम्ही झोपायचो. रात्री दादा आम्हाला खूप किस्से, गोष्टी सांगायचे. स्वातंत्र्यापूर्वी आमचं गाव रझाकारांच्या ताब्यात होतं. त्यांच्या अत्याचारांनी, बंधनांनी इथल्या लोकांच्या आयुष्यावर पडलेला प्रभाव इतक्या वर्षानंतरही जाणवायचा. माझ्या आजीसकट तिच्या वयातल्या बहुतांश स्त्रियांना उत्तम पोहता, घोडा चालवता, झाडावर चढता येत असे. आपल्या सुरक्षेसाठी ही कौशल्यं त्यांना येणं अनिवार्य होतं. माझे आजोबा त्यांचे, माझ्या आजीचे पराक्रमाचे किस्से फार अभिमानाने सांगायचे. पुराच्या पाण्यात पोहत जाऊन किंवा १० वर्षाच्या वयात घोड्यावर एकटी जाऊन माझ्या आजीने कसा तिचा जीव वाचवला, हे किस्से ऐकताना अंगावर काटा उभा राहायचा. माझ्या आजोबांचं पूर्ण शिक्षण उर्दू माध्यमातून झालं. त्यांना खूप शेर, कविता मुखोद्गत होत्या आणि ते रंगवून सांगण्याची पद्धत फार सुंदर. तसंच राजा भोज आणि कवी कालिदास यांच्यातील समस्यापूर्ती (कोडी) तर इतकी अप्रतिम, मला ते अजूनही पाठ आहेत. दादांचे असे किस्से ऐकत ऐकत, आसमंतातल्या चांदण्या बघत दादांच्या हातावर डोकं ठेवून मी झोपून जायची.
दिवाळीच्या सुट्ट्यांची मजा काही औरच होती. कार्तिकाचा महिना आम्ही सगळ्या मैत्रिणी पहाटे काकडा आरती करण्यासाठी चंद्रमौळीला जायचो. आमच्या गावाच्या मध्यभागी मारुतीचं एक भलंमोठ मंदिर आहे आणि त्याच्या जवळच चंद्रमौळीच मंदिर आहे. या मंदिराच्या चारी भिंतींना विविध देवतांच्या दगडांच्या मूर्ती आणि मध्यभागी शंकराची पिंड आहे. पिंडीच्या वरचा छताचा भाग - म्हणजे मंदिराच्या छताचा बरोबर मधला भाग उघडा होता. त्यामुळे नैसर्गिक प्रकाश मंदिरात येत असे आणि अर्थातच रात्री चंद्राचा प्रकाश, म्हणूनच तर हे नाव. पहाटे चारला उठून आंघोळ करून काकडा आरतीची तयारी करायची. वाड्यात दुपारतीची दोन झाड होती. एक पांढरी दुपारती दुसरी लाल. ही फुलं ऊन चढायचं तसतशी उमलायला लागायची, त्यामुळे तर त्यांचं नाव दुपारती. पूजेच्या परडीत ही फुलं, निरांजन, फुलवाती, वस्त्रमाळ आणि कोऱ्या कपड्याच्या बनवलेल्या वाती म्हणजेच काकडे असायचे. सोबत एक कळशी भरून पाणी. फक्त सुट्ट्यांमध्ये भेटूनही या मैत्रिणींची माझी मैत्री फार घट्ट होती. आम्ही सगळ्या जणी आधी मारुतीच्या पारावर जमायचो. मग सगळ्या जणी जमल्या की चंद्रमौळीला जायचो. तिथल्या सगळ्या मूर्तींना धुऊन झालं की मग यथासांग पूजा करायची आणि शेवटी काकडे पेटवून त्यांची आरती करायची. आम्ही चंद्रमौळीमध्ये असतानाच उजाडायला लागायचं. हळूहळू तो प्रकाश मंदिरात पसरायचा. आम्ही केलेली पूजा, फुलांची आरास, पेटवलेली निरांजनं, उदबत्तीचा आणि कापराचा सुवास... फार विलोभनीय दृश्य होतं ते. गुलाबी थंडीमध्ये दुलईमधून बाहेर निघून आंघोळ करून इथं येण सार्थक होऊन जायचं.
या पूजेनंतर आम्ही सगळ्या जणी आवळीला जायचो. गावाजवळच्या एका शेतात हे आवळीचं झाड होतं. आम्ही त्या झाडाभोवती गोल बसायचो. त्या झाडाची पूजा करायचो आणि मग एक आवळा तोडून त्यावर फुलवात लावून त्या झाडाची आरती करायचो. नंतर आवळीचं एक पान तोडून त्याला थोडं वाकून गोलाकार करून केसांमध्ये लावायचो आणि मग गप्पा मारत मारत घरी परतायचो. चंद्रमौळीच्या त्या मंदिरासारखं आमच्याही आयुष्यात निसर्ग पसरलेला होता. सगळे ऋतू बिनधास्तपणे अंगावर घेत आम्ही आमचं बालपण मनसोक्त अनुभवलं. सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष अनुभव घेत घेत ते अधिकच समृद्ध होत गेलं. आठवणींची ही श्रीमंती मला आयुष्यभर पुरणार आहे.
प्रतिक्रिया
25 Aug 2020 - 9:24 am | दुर्गविहारी
मस्त ! हा काळ अनुभवता आला नाह,, पण निदान या धाग्यामुळे त्या काळाच्या दिनमानाचा अंदाज येतो आहे.
कालिदास आणि राजा भोज यांच्या समस्यापूर्तीही लिहून ठेवा. बऱ्याच असतील तर त्याचा धागा करा.
25 Aug 2020 - 9:38 am | नूतन
न्हाणीघराची "आयडीया"तर मस्तच.
वाचताना माझ्या आजीच्याही आठवणी जाग्या झाल्या.
25 Aug 2020 - 10:15 am | चौकटराजा
आजच्या काही सुखसोयी नव्हत्या अशा काळात रात्री चान्द्ण्यात झोपणे .किस्से ऐकणे अशा गोष्टी मनाची सम्रुद्धी मात्र वाढवीत होत्या. १९५० च्या सुमारास जन्माला आलेली आमची पिढी खरेच भाग्यवान त्याना घरचे निरसे दूध प्यायला मिळाले अन आता पिशवीतील सुद्धा ! उत्तम लेख ! उत्तम चित्रे !
25 Aug 2020 - 1:44 pm | सिरुसेरि
सुरेख आठवणी .
25 Aug 2020 - 1:48 pm | टर्मीनेटर
अप्रतीम लेखन!
सुंदर आठवणी, चित्रदर्शी लेखनशैली, फोटो सर्वच आवडले.
अशा गावात, अशा घरात, अशा माणसां बरोबर रहायला फार आवडेल...
25 Aug 2020 - 2:54 pm | चौथा कोनाडा
सुंदर आठवणी,अप्रतिम लेखन!
लेखन, फोटो दोन्ही आवडले.
25 Aug 2020 - 3:19 pm | Naval
खूप आभार सगळ्यांचे....@ दुर्गविहारी जी समस्यापूर्ती लिहून काढण्याची आयडिया मस्त, लवकरच धागा टाकेन.
25 Aug 2020 - 5:38 pm | गणेशा
अतिशय सुंदर आठवणी.. खुप आवडल्या..
तुमचे लेखन वाचताना, मन असेच मामाच्या, आत्याच्या, आमच्या गावाला भटकून आले..
शेत, घर, बाग, बैलगाडी, झाडे, माणसे, आज्जी आजोबा सारे एकदम डोळयांसमोर आठवून आले..
आता उन्हाळ्यात येथेही आकाशाखाली झोपताना हि त्या आठवणी येतातच..
तुमचे पुर्ण लेखन खुपच चित्रदर्शी आहे..
लिहीत रहा.. वाचत आहे..
26 Aug 2020 - 12:01 am | Naval
सगळ्यांचे खूप मनापासून आभार!!
26 Aug 2020 - 6:41 am | प्रचेतस
मस्त लिहिलंय एकदम
26 Aug 2020 - 8:57 am | सुमो
छान. लिहिलंय ही मस्त.
आवडलं.
26 Aug 2020 - 3:20 pm | अन्या बुद्धे
व्वा! फार सुंदर!
बाकी अनुभव घेतलेत अधुनमधुन कधीतरी पण
पहाटेची एखाद खोलीपलीकडून येणारी जात्याची घरघर, असच काही अंतरावरून ऐकू येणार साधंच पण भावपूर्ण गायलेलं भजन, गोठ्यात जाग येऊ लागल्याने कानावर येणारी घंटांची किणकिण, खोलीत एखाद्या हल्लेल्या कौलातून येणारा मऊ सोनेरी प्रकाशाचा कवडसा आणि आपण थंडीत गोधडीत नीज आणि जागेपणाच्या सीमारेषेवर गुरगुटून हे अनुभवतोय.. हा सुखसोहळा राहूनच गेलाय अजून..
सुंदरच लिहिलंत..
26 Aug 2020 - 3:48 pm | संजय क्षीरसागर
तुमच्या जगण्यानं तुमचं अंतर्बाह्य सगळं व्यक्तिमत्वच बहारदार झालं आहे. अशाच लिहित रहा.
26 Aug 2020 - 11:27 pm | बिपीन सुरेश सांगळे
सुंदर लेखन न फोटो तर भारीच
27 Aug 2020 - 12:46 am | चित्रगुप्त
बालपणीच्या सोनेरी आठवणींबद्दलचे खूपच सुंदर लिखाण. आता पार अस्तंगत झालेले वातावरण तुम्हाला लहानपणी मनमुराद अनुभवायला मिळाले, हे भाग्य काही औरच.
यावर स्वतंत्र लेख लवकरच लिहावा ही विनंती.
27 Aug 2020 - 12:49 am | चित्रगुप्त
या गावाचे नाव काय, आणि तुमचा तो वाडा अजून उभा आहे का ? तुम्ही वर्णिलेला काळ साधारणपणे केंव्हाचा आहे ? नंतरच्या काळात परत गावी जाणे झाले का ?
31 Aug 2020 - 5:35 am | Naval
हा काळ साधारण १९८६ चा, हा वाडा अजुन ही आहे खूप बदल झाले आहेत आता. माझं काही वर्षात तिकडे जाणं झालं नाही.
28 Aug 2020 - 5:37 pm | सुधीर कांदळकर
लेखन. विहिरीतले चंद्रदर्शन सुरेख. आजीची सौंदर्यदृष्टी विशेष आवडली. सारवणाचे फराटे सौंदर्याने ओढणे छानच. वैलावरच्या वरणाचा दरवळ जाणवला.
छान! धन्यवाद.
31 Aug 2020 - 5:46 am | Naval
आपल्याकडून उत्स्फूर्तपणे लिहिण होईल कधी अशी वाट बघत बसण्यापेक्षा विषय आणि समय मर्यादा निश्चित असली की नक्कीच लिहून होत हे माझ्यापुरतं तरी निश्चित झालं, त्यामुळे मिपा चे खूप आभार आणि तुमच्या सगळयांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
1 Sep 2020 - 11:00 am | रातराणी
सुरेख लिहलंय. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी केलेली सगळी धमाल आठवली.. आजी, आजोबा, शेत, गुरंढोर, मळ्यातलं घर सगळं नजरेसमोर उभं राहिलं.. आजोबा जाऊन खूप वर्षं झाली, गेल्या वर्षी आजी गेली. त्या दोघांच्या आठवणींनी पोटात तुटलं आणि आपण स्वतः कितीही मोठे झालो तरी आजीआजोबांचं आपल्या जीवनातलं स्थान अढळ असतं हेही जाणवलं.
1 Sep 2020 - 11:30 am | तुषार काळभोर
अत्यंत प्रभावी, डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं असं लिहिलंय...
लिहित राहा..