श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणींच्या आठवणी

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in लेखमाला
24 Aug 2020 - 7:00 am

1

४२चा सुमार असावा. ठाण्यात गडबड होती. कलेक्टर कचेरीवर मोर्चा निघणार होता आणि अर्थातच तो मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न होता. भेटून देणं दूरच, पण कुणाला कचेरीच्या आसपासही फिरकू न देण्याचे आणि मोर्चा लांब, दूरवर अडवण्याचे हुकूम होते. कडेकोट बंदोबस्त होता. पण इतका बंदोबस्त असतानाही अचानक एक तरुणी थेट कलेक्टसाहेबाच्या केबिनमध्ये विजेसारखी शिरली आणि पकडायला आलेल्या शिपायांनी ताब्यात घेण्यापूर्वीच तिने साहेबाच्या पुढ्यात बांगड्या भिरकावल्या आणि ती गरजली, "जर मोर्च्याला सामोरं जायची भीती वाटत असेल, तर हातात बांगड्या भरा." त्या धाडसी मुलीचं नाव होतं यमूता‌ई साने. मी लहान असताना आ‌ईने ही गोष्ट मला सांगितली होती आणि अर्थातच मला ती फार थरारक वाटली होती.

मिपाकरांनो, ’आठवणी’ हा लेखन विषय पाहताच मला प्रश्न पडला की माझ्यासारखा सुमार मनुष्य काय मोठ्या आठवणी लिहिणार? मग मी म्हटलं की आपल्या आ‌ई-वडिलांनी आजी-आजोबांनी सांगितलेल्या आणि आपलं बालपण समृद्ध केलेल्या अनेक आठवणी आपल्यापाशी आहेत, तर त्याच सांगाव्यात. म्हणून ’आठवणींच्या आठवणी’.

माझी आ‌ई काय आणि आजी म्हणजे तिची आ‌ई काय, दोघीही प्रेमळ असल्या तरी प्रेमाची पद्धत वेगळी होती. सोन्या बबड्या असलं काही नव्हतं. बरोबरच आहे म्हणा. जिनं कमी वयामुळे सही करता येत नाही त्या वयापासून काम केलं होतं, जी घराला गरज आहे म्हणून बोर्डीसारख्या परगावात कामासाठी दोन महिने एकटी जा‌ऊन राहिली होती. का, तर त्या पैशातून घराचं तीन महिन्यांचं वाणसामानचं बील भागणार होतं, ती परखड स्वभावाची झाली तर नवल नाही. चार बहिणी व दोन भा‌ऊ अशा सहा मुलांतली ती सर्वात मोठी आणि जबाबदार.

आजी म्हणजे आ‌ईची आ‌ई, जिचा सहवास मला खूप काळ लाभला, अगदी माझ्या मुलालासुद्धा लाभला. तिच्याही तोंडुन मी अनेक हकीकती ऐकल्या आहेत, ज्या अजूनही लक्षात आहेत. आजी म्हणजे अन्य म्हातार्‍यांसारखी देव देव करणारी नव्हती. तिचे देव वेगळे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा भगतसिंग, सुभाषबाबू, गांधी ही तिची दैवतं. पैकी सावरकर आणि सुभाषबाबूंवर विशेष श्रद्धा. सुभाषबाबू इंग्रजांच्या हातावर तुरी दे‌ऊन निसटले, तेव्हा ’उडाला सुभाष राघूपरी ’असं काहीतरी गाणं खूप लोकप्रिय झालं होतं, असं ती सांगायची. तिचे प्राणपक्षी तिचा देह सोडून उडाले ते नेताजी सुभाष जयंतीच्या मुहूर्तावरच!

एकदा आ‌ईबरोबर बाजारात भाजी आणायला गेलो असता एक गृहस्थ भेट्ले. "अरे, हे भागवत, नमस्कार कर" असं म्हणताच मी हात जोडले होते. ते गेल्यावर मी लगेच आ‌ईला विचारलं की हे कोण? आ‌ईनी सांगितलं की "देशभक्त होते, ४२मध्ये ते भूमिगत होते." त्यांच्या अटकेची हकीकत आ‌ईने सांगितली. श्री. प.स. भागवत हे भूमिगत होते, अर्थातच पोलीस मागावर होतेच. एक दिवस पोलिसांना खबर मिळली की भागवत ठाणे स्टेशनवर येणार आहेत. आणि ते आलेही, मात्र कोळ्याच्या पोशाखात. त्यांना ओळखणाऱ्या स्थानिक फौजदाराला त्यांचा संशय आला. तो फौजदार हळूच यांच्या मागे पोहोचला आणि त्याने दबक्या आवाजात हाक मारली, "भागवत..." त्या बेसावध क्षणी प.स. पटकन मागे वळले, फौजदाराची खातरी पटली आणि भागवतांना बेड्या पडल्या.

आईने सांगितलेली आणि मला भारावून टाकणारी एक आठवण म्हणजे आईच्या आजोळच्या घरी - म्हणजे भिवंडीला बाबू राजेंद्रप्रसाद आले होते ती. ४२-४३चा काळ असावा. माझे आजोबा राजकारणात नसले, तरी समाजकारणात अवश्य होते. गावात काही कार्यक्रम असला, कुणी मोठी व्यक्ती येणार असली तर त्यासाठीच्या व्यवस्था समितीत ते असायचे. निर्मळ मन व वागणूक, उगाच मी आणि माझ़ं करणार नाहीत आणि दिलेली जबाबदारी चोख पार पाडणार याची खातरी; त्यामुळे आलेल्या पाहुण्याच्या स्वागताचं काम अनेकदा त्यांच्याकडे असायचं. एकदा एका कार्यक्रमाला डॉ. राजेंद्रप्रसाद आले होते आणि आजोबांनी त्यांना घरी पायधूळ झाडायची विनंती केली, अगदी गळच घातली. घर तिथून जवळच होतं. आपण कोण, आलेला मनुष्य किती मोठा, तो आपल्यासारख्या सामान्य माणसाकडे कशाला येईल असे विचारही अजोबांच्या भोळ्या मनात आले नाहीत. आणि आश्चर्य म्हणजे डॉ. राजेंद्रप्रसादांनी अगदी दोनच मिनिटं येण्याचं मान्य केलं. प्रत्यक्ष बाबू राजेंद्रप्रसाद येतात म्हणताना बरोबर कार्यकर्त्यांचा लवाजमा. आजोबा त्यांना घेऊन आले आणि घरात एकच धावपळ उडाली. आई तेव्हा अगदीच शाळकरी मुलगी होती. पण घरातल्या कुणालाच असा कुणी नेता आपल्या घराला पाय लावेल याची कल्पनाच नव्हती. आजोबांचे धाकटे बंधू राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते होते. आई सांगते की टोपी, बंद गळ्याचा कोट आणि दाट मिश्या असलेले डॉ. दिवाणखान्यात एका लोखंडी खुर्चीत बसले होते आणि घरातली मंडळी पुढे खाली बसली होती. जाताना मागच्या बाजूने बाहेर पडताना त्यांना गाय बांधलेली दिसली आणि त्यांना आनंद झाला. ते असं काहीसं म्हणाले की "ज्या मुलांना घरच्या गाईचं दूध मिळतं ती भाग्यवान." आई सांगायची की तेव्हा आम्हा भावंडांना डॉ. राजेंद्रप्रसाद कोण हे काही माहीत नव्हतं आणि आपल्या घरी येऊन गेलेले हे पाहुणे पुढे आपले राष्ट्राध्यक्ष होणार आहेत याची सुतरामही कल्पना नव्हती.

आईकडून ऐकायला आणखी एक गोष्ट आवडायची, गोष्ट म्हणजे अर्थातच खरोखर घडलेला प्रसंग. त्या काळात - म्हणजे ४०-४२च्या काळात पारले सांताक्रूजच्या सारखे गजबजलेले नव्हते. दाट झाडी आणि तुरळक वस्ती. रेल्वे स्थानकावरही अशी गर्दी नसायची. एक दिवशी एक गोल पातळ नेसलेली व पदर लपेटून घेतलेली, गोरी, चांगल्या घरची एक तरुणी स्थानकावर गाडीची वाट पाहत उभी होती. हातात पितळेचा मोठा टिफिन. त्याच वेळी एक फौजदार आणि एक शिपाई अशी जोडी तिथे आली. सहज आले होते की गस्तीला, कुणास ठाऊक. त्या मुलीला पाहताच ते फौजदार जवळ गेले आणि त्यांनी तिला विचारले की कुठे निघाली आहे? एकटीच आहे का? तिने सांगितले की तिची म्हातारी आ़जी ठाण्याला एकटीच राहते आणि ती आजारी असल्याने ती डबा घेऊन जात आहे. तिला एकटीला जाता येईल का? अशी पृच्छा केली आणि बरोबरच्या शिपायाला त्या मुलीला गाडीत बसवून दे असं सांगत ते निघुन गेले. गाडी आली, ती मुलगी गाडीत शिरली, गाडी सुटली आणि तिने सुटकेचा नि:श्वास टाकला. त्या मुलीच्या डब्यात जरा 'वेगळाच खाऊ' होता. निरोपाच्या चिठ्ठ्या, काडतुसं, बाँबचा मसाला असलंच काहीतरी.... डबा ठाण्याला पोहोचल्यावर एका ठरलेल्या व्यक्तीकडे द्यायचा. ती व्यक्ती कोण, तो डबा कुणाकडे जायचा हे तिला माहीत नव्हतं. ती तरुणी म्हणजे आईची सख्खी काकू! राष्ट्र सेवा दलात असलेल्या काकाची बायको. तिने साधारण एका वर्षात अशा १२-१३ फेर्‍या केल्या होत्या. कुणी म्हणयचं ते सामान हुतात्मा मारुतीकुमारांना जायचं, कुणी म्हणायचं ते सामान माथेरानच्या भाई कोतवालांकडे बॉम्ब बनवण्यासाठी जायचं. काकू आजीला म्हणजे आईच्या त्या काकूला स्वातंत्र्योत्तर काळात तिच्या कार्यासाठी सन्मानित केलं गेलं. १९९७मध्ये ती व यमूताई साने यांची सह्याद्री वाहिनीवर मुलाखत झाली होती.

१९७८-७९च्या सुमारास आ‌ई हुतात्मा भा‌ई कोतवालांवर कादंबरी लिहायचं म्हणत होती. दर वर्षी २ जानेवारीला सिद्धगडावर हुतात्मा कोतवाल जिथे गोळ्यांना बळी पडले तिथे श्रद्धांजलीचा कर्यक्रम असतो, असं समजल्यावर मी आ‌ईबरोबर सिद्धगडावर गेलो होतो. तिथे आम्हाला हुतात्मा कोतवालांचे काही सहकारी भेटले, जे प्रत्यक्ष चकमकीच्या वेळी तिथे होते. श्री. चांदोबा देहेरकर, क्षीरसागर, भाई वैद्य अशा अनेकांची भेट झाली आणि त्या थरारक हकिकती ऐकायला मिळाल्या. उगाच खर्च हो‌ऊ नयेत म्हणून बंदुका आणि काडतुसे वेगवेगळी ठेवली जायची आणि नेमका त्याने घात केला, कारण डीएसपी हॉल अचानक तिथे पोहोचला आणि चकमक सुरू झाली, तेव्हा बंदूक एकाकडे तर काड्तूस दुसऱ्याकडे असं झालं होतं. काही जण गुहेत, तर कुणी दगडाच्या खोबणीत पाय पोटाशी घे‌ऊन निपचित दडून राहिले, ते वाचले. मात्र त्या हल्ल्यात भा‌ई आणि हिराजी पाटील हुतात्मा झाले. तिथेच भा‌ईंचे बंधू पिंटण्णा व पत्नी इंदूता‌ई यांचीही भेट झाली. पुढे आम्ही त्यांना माथेरानलाही जा‌ऊन भेटलो.

बाबा किंवा आजोबा यांच्यापेक्षा आ‌ई आणि तिची आ‌ई यांनी सांगितलेल्या आठवणी अधिक. आजी आजोबांविषयी भरभरून सांगायची. एकत्र कुटुंब, कूळ कायद्यात जा‌ऊन उरलेल्या तुट्पुंज्या जमिनी यामुळे नोकरीखेरीज पर्याय नव्हता. आजोबा शिक्षक झाले. पुढे त्यांना एक चांगली संधी मिळाली. जवळच्याच एका इंजीनियरिंग कंपनीत त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि बरे दिवस आले. मात्र अचानक एक वादळ आलं. एक दिवस ते मालकाच्या केबिनमध्ये बसले असता एक कर्मचारी आत आला. त्याच्या हातात एक लखोटा होता. तो लखोटा मालकांच्या हातात देत तो अजिजीने म्हणाला की तो लखोटा कंपनीच्या नावे नसून मालकांच्या नावे आला होता, पण ते लक्षात न आल्याने त्याने अन्य टपालाबरोबर तोही अनवधानाने उघडला होता. बाप रे! मालकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ते तरातरा उठले आणि नुसते अपशब्द उच्चारून थांबले नाहीत, तर त्यांनी त्या कर्मचाऱ्याच्या मुस्कटात भडकावली. समोर बसलेले आजोबा अवाक हो‌ऊन बघत होते. त्या कर्मचाऱ्याने नंतर युनियनकडे तक्रार केली. प्रकरण वाढलं. आजोबांची साक्ष काढली, तेव्हा त्यांनी जे जसं घडलं ते तसं सांगितलं. मालक खूप दुखावले गेले आणि त्यांनी आजोबांना ताकीद दिली की पुढे प्रकरण न्यायालयात गेलं, तर तू काही माहीत नाही, असं सांग. मालक असंही म्हणाले की त्यांनी मास्तरकी करणाऱ्या आजोबांना मॅनेजर केलं आणि हे उपकार आजोबांनी जाणले पाहिजेत, नपेक्षा चालतं व्हावं. आयुष्यात कधीही खोटं न बोलणाऱ्या आजोबांनी खोटं बोलायला जमणार नाही असं सांगितलं. आजोबांची नोकरी गेली. पुढे मालकांनी त्या कर्मचाऱ्याला काही दे‌ऊन सगळं प्रकरण मिटवलं, त्याने तक्रार मागे घेतली. मग मालक गावातल्या एका प्रतिष्ठित गृहस्थाकडे गेले, जो आजोबांच जवळचा मित्र होता आणि त्यांनी असा प्रस्ताव मांडला की बाळासाहेबांना (आजोबांना) सांगा त्यांना संसार आहे, मुलं बाळं आहेत तेव्हा नोकरी नसणं परवडणारं नाही. सबब आजोबांनी माझी माफी मागावी, दिलेली साक्ष मागे घ्यावी आणि काही झालंच नाही अशा थाटात पुन्हा हजर व्हावं. पण आजोबांनी बेकारी, कुटुंबाची जबाबदारी या कशाचीही पर्वा न करता स्पष्ट नकार दिला. झालेली आबाळ आजी विसरली, पण या घटनेने तिला आपल्या पतीचा कायमचा अभिमान वाटला.

आ‌ई आजोबांच्या सुसंस्कृतपणाच्या अनेक गोष्टी सांगायची. ही माणसं वेगळ्याच मातीची. आजकाल अस्थिर व स्पर्धात्मक जगात प्रत्येकाला स्ट्रेस असतो. घरात ताणतणाव निर्माण होतात. मात्र पत्नी, सहा मुलं - त्यांची शिक्षणं, लग्न आपलं भावी आयुष्य हे सगळं डोळ्यापुढे दिसत असतानाही त्या भल्या गृहस्थाने घरात कधी आदळआपट केली नाही की मुलांवर राग काढला नाही. त्या वेळी आमच्या आजोबांकडे एका विद्यार्थ्याचा एक वार होता. आताची परिस्थिती पाहता एकदा आजीने त्यांना विचारलं की आपण त्या विद्यार्थ्याला दुसरीकडे सोय पाहायला सांगू या का? आजोबांनी नकार दिला, म्हणाले, "आपल्याला आणखी एक मूल असतं तर आपण काय केलं असतं?" हे सांगताना आ‌ईच्या डोळ्यात आपल्या वडिलांचा सार्थ अभिमान दिसायचा. तेही दिवस गेले. पुढे आजोबांना आणखी चांगली नोकरी मिळाली.

रागीट व तापट असणारे आजोबा आपल्या मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत, ती जगात सन्मानाने जगायला लायक व्हावीत यासाठी प्रयत्नशील असयचे. मुंब‌ईला एकदा क्रिकेट मॅच होती, तेव्हा आजोबा एक दिवस अर्ध्या मुलांना व दुसऱ्या दिवशी उरलेल्या मुलांना सामना पाहायला गेले होते. जोडीला इराण्याकडचा ब्रून मस्का! मे महिन्यात मुलांना सुट्ट्या लागल्या की ते सर्वांना घे‌ऊन गावाच्या घरी जायचे. सकाळी उठून सर्वांची लांब रपेट. मग शेकोटीत टाकलेल्या कैऱ्या खाणं, मग मुलांना एखाद्या चांगल्या इंग्लिश कथेचा कादंबरीचा अनुवाद. दुपारी मुलांच्या स्पर्धा, तर रात्री गावाबाहेरच्या देवळात जायला कोण कोण तयार आहेत असं आव्हान.

स्त्रियांचे हकक , समानता वगैरे अलीकडॆ ऐकायला मिळालेल्या गोष्टी आमचे आजोबा त्या काळात - म्हणजे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी अनुसरत होते, असं आ‌ई नेहमी सांगायची. आजीला जेव्हा चार दिवस बाहेर बसावं लागत असे, तेव्हा आजोबा तिला नगर वाचन मंदिरातून पुस्तकं आणून देत असत व सांगत असत की तिला ही जरा विश्रांती घ्यायची आणि काही वाचन करायची उत्तम संधी आहे. पहिल्या निवड्णुकीच्या वेळी भिवंडीचे कांग्रेस नेते, जे पुढे खासदार झाले, आणि जे आजोबांचे मित्र होते, ते आजोबांना आवर्जून सांगायला आले की बाबा रे, वहिनींना मतदानाच्या दिवशी त्या अमुक एक बूथवर पाठव. भिवंडीत मुस्लीम खूप. मुस्लीमबाहुल असलेल्या भागात निवड्णुकीत बूथवर कुणीतरी धीट महिला असणे आवश्यक होते, कारण बुरखा पांघरून पुरुष येण्याची शक्यता होती. संवेदनाशील विषय असल्याने मतदानाला आलेल्या बुरख्यातील महिलांना ’ए बा‌ई , चल बुरखा हटव आणि चेहरा दाखव’ असं ठणकावून सांगणारी महिला तिथे गरजेची होती, पुरुषांना मज्जावच होता. आणि आमच्या आजीबा‌ई गेल्या तिकडे!.

आजीच्या काही कथा मोठ्या रंजक असायच्या. कधी गोडाचा शिरा केला की मला हमखास आजी आणि तिची शिऱ्याची कथा आठवते. जवळपासच्या गावात जमिनीवरून दोन जणांत काही वाद झाले आणि लाठ्याकाठ्या घे‌ऊन हाणामाऱ्या करण्यात त्याचं पर्यवसान झालं. गावचा एक जमीन मालक यात जबर जखमी झाला. गडी त्याला उचलुन घे‌ऊन आले. वैद्याला बोलावणं गेलं. डोक्याला खोक पडली होती, अंगावर कोयत्याच्या जखमा होत्या. वैद्याने मलमपट्टी केली, औषध दिलं आणि खास सूचना दिली - याला रोज चांगला वाटीभर तरी साजूक तुपातला गोड शिरा द्या. काही दिवसातच त्या जखमा अशा काही वेगाने भरू लागल्या की अखेर वकिलांनी सांगितलं की हे खाणं बंद करा, नाहीतर जखमा भरून आल्या तर मोठीच पंचा‌ईत हो‌इल आणि मारहाण झाली होती हेच सिद्ध करणं अशक्य हो‌ईल.

आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की आ‌ई-आजीच्या आठवणी आहेत, तर बाबा आणि आजोबांच्या का नाहीत? आणि असं वाटणं साहजिकच आहे. पण आमचे बाबा फार अबोल, भिडस्त आणि आजोबांना (आ‌ईचे वडील) अल्झायमरने ग्रासलेले, त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या आठवणी विशेष नाहीत. मात्र आमच्या बाबांना मुंब‌ईची खडा न खडा माहिती. त्यांचा जन्म १९२७चा आणि १९३६ साली ते मुंब‌ईला आले. त्यांना सर्व विषयातील विपुल माहिती, पण सांगायची शैली नाही, शिवाय स्वभाव संकोची.
बाबा पुढच्या महिन्यात ९४व्या वर्षात पदार्पण करतील, पण अजूनही स्मरणशक्ती उत्तम आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक आंदोलनं, सभा-बैठका तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यांनी जवळून पाहिली आहे, अनेक सभांना हजेरी लावली आहे. ते दादरच्या पालन सोजपाल चाळीत लहानाचे मोठे झाले. समोरासमोर दोन अजस्र चार मजली चाळी आणि एका टोकाला मधोमध पक्कं छप्पर असलेली गॅरेजेस आणि समोर विस्तीर्ण पटांगण, यामुळे सभांना हे आदर्श ठिकाण होतं. त्यामुळे गॅरेजच्या छताचं व्यासपीठ अनेक दिग्गजांनी गाजवलं होतं. चाळीत नेते यायचे, तसे संत-महंतही यायचे - आधुनिक संत गाडगे महाराज. काहीसे नास्तिक असलेल्या बाबांचं हे आवडते दैवत. बाबा सांगतात की गाडगेबाबांचं कीर्तन असेल त्या दिवशी स्वत: गाडगेबाबा आणि त्यांचे शिष्य सकाळीच ये‌ऊन झाडून काढायला सुरुवात करायचे आणि बघता बघता ते विशाल पटांगण लख्ख करून टाकायचे. मग चाळकऱ्यांना हात जोडून सांगायचे की "मायबाप, आज कीर्तन आहे, मेहेरबानी करून कचरा टाकू नका."

झालंच तर साक्षात शिवाजी पार्क हाकेच्या अंतरावर! त्यामुळे जवळपास सर्व दिग्गज नेत्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली होती. त्यांनी शिवाजी पार्कची एक खास आठवण सांगितली, ती अशी - संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोरात होता. आचार्य अत्रे, भा‌ई डांगे, एस एम, नाना पाटील सर्व नेते कंबर कसून मैदानात उतरले होते. त्या वेळी मोरारजी देसा‌ई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मोरारजीं शिवाजी पार्कवर सभा घेणार असल्याचे समजताच संयुक्त महाराष्ट्र समितीने ’जनता कर्फ्यू’चे जनतेला आवाहन केले. सभेला कुणीही जायचे नाही! त्या सभेला खरोखरच लोक शिवाजी पार्कापर्यंत जा‌ऊनही आजूबाजूला घोटाळत राहिले, पण मैदानात सभेला सर्वांनी पाठ फिरवली आणि सभेला मोकळं मैदान पाहावं लागलं. कोरोनानिमित्त पंतप्रधानांनी जेव्हा जनता कर्फ्यूचं आवाहन केलं, तेव्हा मला हे आठवलं.

अशीच एक आठवण म्हणजे बाबा बसमधून येत असताना पोलिसांनी वाहतूक थांबवली, सर्व वाहनं बाजूला घ्यायला लावली. बाबा वरच्या मजल्यावर बसले होते. काही वेळातच उघड्या मोटारीतून नेहरू, क्रुश्चेव आणि बुल्गानिनसह मोठा ताफा गेला. पाहुणे रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या लोकांना हात हलवून दाद देत होते. पुढे वर्तमानपत्रात पाहुण्यांनी कौतुकाने म्हटल्याचं आलं होतं की "आम्ही एरवी काचबंद सुरक्षित गाड्यांमधूनच फिरतो, पण उघड्या मोटारीतून असं निर्धास्तपणे फिरायची संधी त्यांना भारतात मिळाली."

उत्तम मार्क असणाऱ्या बाबांना परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर कॉलेजला न जाता नोकरी करणं भाग होतं. ते एका मुलाखतीला गेले, तेव्हा गणितात जवळपास पैकीच्या पैकी मार्क पाहून मुलाखत घेणाऱ्याने त्यांचा अर्ज परत केला होता, म्हणाला की "अरे, तुझ्यासारख्या मुलाने शिकायला हवं, कशाला नोकरी करतोस?" हे सांगताना मात्र एरवी निर्विकार वा हसतमुख असणाऱ्या बाबांच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट वेदना दिसायची. ४० सालच्या आसपासच्या भयानक मंदीची अनेक वर्णने त्यांच्याकडून ऐकली आहेत. त्या काळात रोज जेवायला परवडत नाही, म्हणून त्यांचा एक मित्र ’दोन आणे अनलिमिटेड रा‌इस प्लेट’मध्ये एक दिवसाआड जेवायचा आणि एका वेळेला १८ पोळ्या खायचा! अनेकांनी घरची जबाबदारी, भावंडांची शिक्षणं यासाठी लग्न केली नव्हती, असं बाबा सांगतात. मात्र दुसरं महायुद्द सुरू झालं आणि रेशनिंग खातं जोमात आलं आणि त्यायोगे हजारो बेकारांना नोकऱ्या मिळाल्याचं बाबा सांगतात. ते सांगतात की त्या वेळेला पालिकेतली नोकरी फार मोठी समजली जायची. पालिकेत ५ रुपये पगार जास्त आहे, म्हणून त्यांचा एक मित्र रिझर्व बेंकेची नोकरी सोडून पालिकेत आला होता!

असो. आमचं आयुष्य समृद्ध करणार्‍या या मनोरंजक आणि बोधक आठवणी!

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

24 Aug 2020 - 8:46 am | सुधीर कांदळकर

अशा आठवणी. आजोबांची नोकरी सोडन्याची आठवण खासच. आता जीवनमूल्ये बदलली. त्या मुलीच्या डब्यात बाँब वगैरे होते. आपल्या डब्यात आठवणींचा चवदार मेवा. आवडला. धन्यवाद.

गणेशा's picture

24 Aug 2020 - 10:54 am | गणेशा

लेखन अप्रतिम झाले आहे...

आठवणींच्या आठवणी खुप आवडल्या..
त्याच बरोबर इतिहासाच्या काही untold stories कळाल्या.
स्वातंत्र्यपूर्व काळातील काही चित्रे डोळ्यासमोर अवतरली..

लिहीत रहा.. तुमच्या कडे अश्या गोष्टींचा खजिनाच आहे असे वाटते..
आणखिन लिहा..

कुमार१'s picture

24 Aug 2020 - 12:13 pm | कुमार१

आठवणींच्या आठवणी छान !

अन्या बुद्धे's picture

24 Aug 2020 - 12:52 pm | अन्या बुद्धे

खास आठवणी.. खोटं बोलायला नकार देणारे आणि त्याही स्थितीत वारावरच्या मुलाची जबाबदारी निभावणारे आजोबा.. भिडलं मनाला..

चित्रगुप्त's picture

24 Aug 2020 - 2:38 pm | चित्रगुप्त

आठवणींचा हा प्रकार खूपच भावला. जुन्या काळातले खूप लोक तत्वनिष्ठ असायचे. बहुतांश लोकांकडे पैसा जेमतेमच असल्याने पैशाची किंमत प्रत्येकाला कळायची. काटकसरीने जगण्याचे बाळकडूच जणू प्रत्येकाला मिळालेले असायचे. तेंव्हा कोणी कल्पनाही केली नसेल, की करमणुकीचा, खर्‍या-खोट्या माहितीचा, चैनीच्या महागड्या वस्तूंचा अखंड धबधबा पुढील काळात प्रत्येकावर कोसळत रहाणार आहे, आणि त्यात तत्वनिष्ठा, काटकसर वगैरे मूल्ये वाहून जाणार आहेत.
या सर्व सुंदर, मनोज्ञ आठवणींचा खजिना इथे उघडा केल्याबद्दल अनेक आभार.
.
त्याकाळी सगळ्यांनी उसने स्मितहास्य चेहर्‍यावर आणून कॅमेर्‍याकडे बघायचे वगैरे प्रकार नसायचे असे वरील फोटोवरून दिसते.

.
शांता आपटे (कुंकू)

'न पटणारी गोष्ट' या नारायण हरि आपटे यांच्या कादंबरीवरून १९३७ साली व्ही. शांताराम यांनी बनवलेला 'कुंकू' (हिंदीत 'दुनिया न माने) त्याकाळी अतिशय गाजला होता. या चित्रपटातील दोन दृश्ये. माझ्या लहानपणी हा सिनेमा सहकुटुंब बघितल्याचे आठवते.
.
केशवराव दाते (कुंकू)

टर्मीनेटर's picture

24 Aug 2020 - 4:11 pm | टर्मीनेटर

व्वा! फार छान लिहीलंय.

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2020 - 5:48 pm | चौथा कोनाडा

आजोबांचा काळ, १९४२ च्या चळवळीच्या कहाण्या अतिशय रोचक आणि बोधक आठवणी आहेत !
गेला तो काळ, गेला तो आदर्शवाद अन गेली ती पिढी !

नॉस्टालजिया लेखन आवडले हे वेगळे सांगायला नको !
सर्वसाक्षीजी, एका सुंदर कालखंडात नेल्याबद्दल धन्यवाद !

सिरुसेरि's picture

24 Aug 2020 - 8:39 pm | सिरुसेरि

छान लेख . ------ आयुष्य समृद्ध करणार्‍या या मनोरंजक आणि बोधक आठवणी! +१००

बिपीन सुरेश सांगळे's picture

24 Aug 2020 - 11:43 pm | बिपीन सुरेश सांगळे

ग्रेटच

चौकटराजा's picture

25 Aug 2020 - 9:55 am | चौकटराजा

आजकाल आजोबा नातवंडाबरोबर रहात नाहीत . ( आपले चित्रगुप्त अपवाद ) .राहिले तरी संवाद नाही. जिथे मुलगा व वडील यान्चाच फारसा संवाद नाही इथे आजोबा नातवाचा असणार कसा ? अर्थात काही कुटुम्बे याला अपवाद असतील .असो अशा पार्श्वभूमीवर आपल्या आठवणी वाचल्या आणि " भरून पावलो " अशी भावना निर्माण झाली. यात काही राजकीय सन्दर्भ आल्याने तर लेखन अधिक सखोल झालेय !
बाबा पुढच्या महिन्यात ९४व्या वर्षात पदार्पण करतील, पण अजूनही स्मरणशक्ती उत्तम आहे.
अशा बाबाना भेटून त्याना बोलते करायला नक्कीच आवडेल !

सर्वसाक्षी's picture

25 Aug 2020 - 7:46 pm | सर्वसाक्षी

सर्व वाचकांचे आभार. प्रतिसाद देणार्‍यांचे खास आभार.
चौ.रा. साहेब, व्य. नि. पाठवत आहे

सुमो's picture

26 Aug 2020 - 9:22 am | सुमो

वेगळ्याच काळात घेऊन जाणारे मस्त लेखन.

खूप आवडले.

सस्नेह's picture

27 Aug 2020 - 5:49 pm | सस्नेह

त्या काळातील नैतिक मूल्ये आणि आताच्या काळातली (?) यांच्यातील फरक प्रकर्षाने जाणवला.
स्नेहा

स्मिताके's picture

28 Aug 2020 - 11:35 pm | स्मिताके

आवडले. आणखी लिहा.

सर्वसाक्षीजी ,बाबा 94 वरशाचे होतील,भाग्यवान आहात,पण अबोल बाबा यांची मुलाखत लवकरात लवकर घेऊन,दुसरा कोणी शब्दबद्ध करेल असे लवकरच पहा.स्वातंत्र्याच्या व जुन्या मुंबईच्या आठवणी, कारण बाबांना मुंबईची खडा न खडा माहिती. तसेच वयस्कर माणसांना संभाळावेही लागते घरातील सर्वाना मिळून ,त्यानची काही पथ्ये, तब्बेत ,आपण व घरातील सर्व सांभाळता खरेच कौतुक आहे.
नूतनमा

कुंकू सिनेमा माझाही अत्यंत आवडता, बरेचदा पाहिला शांत आपटेनची वरील पोझ कॉमन, खूप आवडतेही, जुन्या काळाची साधी ,सोज्वळ पोझ, विशेष मेकअप नाही,मस्त!!

विनिता००२'s picture

31 Aug 2020 - 5:21 pm | विनिता००२

मस्त आठवणी :)

प्राची अश्विनी's picture

30 Sep 2020 - 6:17 pm | प्राची अश्विनी

आठवणी आवडल्या. Nostalgic.