खुसखुशीत करंज्या (साठ्याच्या)
गणपती गौरींच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत साठ्याच्या करंज्यांची रेसिपी देत आहे.
साहित्य :
१) मैदा - २ वाट्या
२) मोहनासाठी तूप
३) सुके खोबरे किसून - २ वाट्या
४) सुका मेवा (काजू, बदाम, मनुका)
५) पिठीसाखर - १ १/२ वाटी ( तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता)
कृती : मैदा चाळून घेऊन त्यात मोहनासाठी तूप घालून घेणे. येथे जोपर्यंत पिठाचा मुटका होत नाही, तोपर्यंत मोहन घालणे आवश्यक आहे. साधारण ३-४ चमचे तूप लागेल. आता पाणी घालून पीठ मळून घेणे. पीठ जास्त सैल किंवा घट्ट नसावे, मध्यमच असावे. आता मळलेल्या पिठाला १०-१५ मिनिटांसाठी आराम द्यावा - अर्थात झाकून ठेवावे.
दुसरीकडे मंद आचेवर किसलेले खोबरे भाजून घ्यावे, जास्त करपू देऊ नये. खोबरे भाजल्यामुळे ते खुसखुशीत होते. सुका मेव्याचे बारीक काप करून घ्यावेत. आता पिठीसाखर, खोबरे व सुका मेवा एकत्र करून त्याचे सारण करून घ्यावे.
साठ्याकरिता - ४ चमचे तूप (वितळलेले नको) व ४ चमचे तांदळाची पिठी एकत्र करून फेटून घ्यावे. मिश्रण अगदी हलके होईपर्यंत फेटणे आवश्यक आहे. पिठी नसेल, तर कॉर्नफ्लॉवर चालेल.
आता मैद्याच्या पोळी लाटतो तशी पोळी लाटून घेणे व त्यावर साठा पसरवून दुसरी पोळी ठेवणे. पुन्हा त्यावर साठा लावून तिसरी पोळी ठेवून व वर परत साठा लावून त्याची गुंडाळी करत जाणे. ह्या गुंडाळीचे समान काप करून त्याच्या पुर्या लाटून सारण भरून करंजी करून घेणे आणि तेलात मध्यम आचेवर तळून घेणे.
फोटोमुळे समजणे सोप्पे जाईल, म्हणून स्टेप बाय स्टेप फोटो दिले आहेत.
आणि हे फायनल बघा किती लेअर्स आहेत छान व खुस्खुशीत :)
प्रतिक्रिया
22 Aug 2020 - 8:46 am | गणेशा
अप्रतिम..
साठ्याच्या.. असे म्हणतात करंजीला हे माहित नव्हते.
22 Aug 2020 - 12:47 pm | टर्मीनेटर
करंजी हा आवडता प्रकार असल्याने अर्थातच ही रेसिपीही आवडली !
23 Aug 2020 - 8:23 pm | प्रशांत
तोपासु
22 Aug 2020 - 12:48 pm | कंजूस
छान.
22 Aug 2020 - 12:55 pm | प्रचेतस
पिवशी अगदी सुगरण आहे.
मस्त पाकृ
22 Aug 2020 - 1:00 pm | गणेशा
हो, :-)
पिवशी लयच सुगरण झालीये आजकाल..
22 Aug 2020 - 1:12 pm | महासंग्राम
https://twitter.com/misalpav/status/1297076016276373505
लाईक शेयर & फॉलो करा
22 Aug 2020 - 5:28 pm | Bhakti
यम्मी!! मस्त!!
22 Aug 2020 - 5:57 pm | चौथा कोनाडा
व्वा, एकदम भारी,
शेवटचे दोन फोटो पाहून पाहून तोंडाच्या तोंडाला पाणी सुटले !
22 Aug 2020 - 6:07 pm | तुषार काळभोर
शेवटचे फोटो जीवघेणे.
22 Aug 2020 - 10:34 pm | सौ मृदुला धनंजय...
Awesome
23 Aug 2020 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रयोग करायला सांगितले आहे. आमच्याकडे तांदळाची पिठी नसते, काल गणपतीपूजनाला आमच्याकडे करंजीही होती.
आपली करंजी कुरकुरीत वाट्तेय. तेव्हा, करंजी आवडली. आभार.
-दिलीप बिरुटे
23 Aug 2020 - 11:41 am | राघव
तोंपासु! शेवटचे फोटू खल्लास आहेत!!
साठ्याच्या करंज्या हा शब्दप्रयोग प्रथमच वाचनात आला. काय अर्थ?
23 Aug 2020 - 12:27 pm | पियुशा
@ राघव जी , आपण जे तूप न तांदूळ पीठी फेटूंन घेतलय ना त्या मिश्रणला साठा किंवा साटा म्हणतात या मिश्रनाने करंजीला छान लेयर्स सूटतात न करंजी एकदम खुसखुशीत होते ,साध्या पद्धतीने केलेल्या करंजी ताज्या छान लागतात पण नंन्तर वातड किंवा मऊ पडतात ह्या प्रकार करुण बघा सगळ्यांना आवडनार नक्की ! बाकी सर्व वाचकांचे मनापासून आभार
24 Aug 2020 - 2:47 pm | चित्रगुप्त
वा. फोटोतील करंज्या बघून तोंपासु.
'साठ्याच्या' म्हणजे मला वाटले होते की खराब न होता दीर्घकाळ साठवून ठेवता येतील अश्या.
या करंज्या किती दिवस चांगल्या रहातात ? फ्रिजात ठेवाव्यात की बाहेर ?
24 Aug 2020 - 3:05 pm | पियुशा
एयर टाइट डब्यात भरून 10 ते 15 दिवस सहज टिकतात फ्रिज मध्ये ठेवायची गरज नाही , पण 4 दिवसा वर पुरतील तर ठेवाल ना ;) लगेच फस्त होतात .
25 Aug 2020 - 12:07 pm | सुमो
छानच दिसताहेत करंज्या.