तर त्याचं झालं काय मंडळी, मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं तसं , सगळ्या पनीर रेसिपी करायला घ्यायच्या असं मनाने ठरवलं होतं. त्यामुळे ही पण रेसिपी पनीरची करायची असं ठरवलं. आता होममिनिस्ट्रीला आवडणारी दुसरी रेसिपी करावी म्हणून तिचा फेव्हरिट पनीर टिक्का मसाला युट्युब वर बघितला.पण त्यातही पुन्हा झालं तेच! आम्हाला पोथीनिष्ठा अशी मुळी मानवतच नाही ,याचा प्रत्यय घ्यायचा तो आलाच. त्यामुळे दोन-तीन वेगवेगळ्या रेसिपी पाहून त्याचं कॉम्बिनेशन मनात तयार झालं आणि ती भाजी तिखट झाली पाहिजे अशी जी होम मिनिस्टर ची फर्माईश होती त्याप्रमाणे थोडा जाळ काढायचा ठरवलाच!!!
मग केली सुरुवात दुसऱ्या दिवशीच्या त्याच आमच्या दिव्य बालकलीलांसह येणाऱ्या रम्य सकाळी! पनीर आदल्या दिवशीच करून फ्रिजमध्ये लावून ठेवलेलं होतं.मागच्या एपिसोडला सांगितलं त्याच पद्धतीने घरगुती पनीर केलं होतं. बाकीची तयारीही रात्री लावून ठेवलेली होती. आणि आमचे बालक उठल्यानंतर त्रास देणारच असे मनात गृहीत धरून पहाटे 5ला सकाळी साडेसहाला खेळ करायला सुरुवात केली. त्यामुळे एका तासात सर्व काम फत्ते झाले.
भल्या पहाटे 5ला उठलो तेंव्हा म्हटलं आधी पनीर मॅरीनेट करावं ,म्हणजे पनीरचे तुकडे, सिमला मिरची आणि कांद्याचे चौकोनी काप, त्यांच्या मेरीनेशनसाठी 2चमचे दही, बारीक चिमूट मीठ, 1चमचा गरम मसाला, अर्धा चमचा तिखट , किंचित हळद असं घेतलं ते सर्व एकत्र करून त्यात पनीर,सिमला मिरची व कांद्याचे काप मस्त चमच्यानि सावकाश फिरवून घेतले आणि मग ही उटणं लागलेली सामुग्री फ्रिजाला लाऊन मी स्नानास गेलो.
नन्तर मग पहिली सगळी तयारी करायला घेतली. सगळे खडे मसाले काढून घेतले. तेजपत्ता काळी मिरी लवंग दालचिनी इलायची. मग आलं लसूण कांदा टोमॅटो काजू हिरव्या मिरच्या दही अशी बाकीची सर्व जय्यत तयारी लावून घेतली आणि येक कडक चा मारून केली मग सुरुवात! हर हर महादेव...!
प्रथम आमच्या खास पाट्या वरवनट्यावर काळीमिरी लवंगा दालचिनी एकत्र बारीक कुटूनगरगटून घेतलं. मग तसच इलायची पण बारीकवून घेतली. आणि मग यात मला यु ट्युबतल्या एकीची आवडलेली टोमॅटोच्या पोटात मिरची आणि भिजवलेले काजू याची प्युरी करायची आवडलेली पद्धत वापरली..आणि आधी ती मिक्सरला काढून घेऊन मग लगोलग कांद्याची जाडसर प्युरी काढून घेतली. आलं लसून पेस्ट पण करून घेतली.
आणि केला सुरू मग दुसरा अंक.. हुरररररर!!!!
पहिल्यांदा पॅन तापवला आणि मग म्यारीनेट केलेले पनीर सिमला मिरची व कांद्याचे काप मस्त फ्राय करून घेतले..
मग त्या फ्रायला बाजूस काढून
त्याच प्यानात चांगलं 3 मोठ्ठे चमचे तेलं सोडलं. मग जिरं तडतडवून तेजपत्ता उजळवून घेतला. त्यांनी लाली धरायच्या आत लवंग दालचिनी कालिमिरीची पूड टाकली
तिचा वास ठसक्यात आल्यावर कांद्याची पेस्ट सोडली तिलाही मसाल्याशी मस्ती करायला लावून एकदा आच बारीक केली आणि झाकण मारलं. 5मिनिटांनी काढलं..आतलं ब्रम्ह मसाल्याची वाट पहात होतच
मग किचन किंग मसाला लाल तिखट धने पूड इलायची पावडर इत्यादी अन्य मसाले त्यात मारून लगोलग थोडंस्स बेसन त्यातच फ्राय क्येलं. ही हाटील वाल्यांची ग्रेव्ही दाट करायची ट्रिक हाय..ती यु ट्युबावर कळली व्हती, ती वापरली.मग लगेच टोमॅटो प्युरी दही हे टाकून 2 मिनिट नॉनस्टॉप ग्रेव्ही फिरवत राहिलो..
त्या दह्याच ह्यात नीट ध्यान लागावं म्हणून हे करतात (म्हणे!) . असो.. तस केलं आणि मग परत इंडक्शनची आच थोडी वाढवून वर झाकण मारून मी दुसरा कडक चा घेतला..मधेच ग्रेव्ही एकदा पाहून त्यात आवश्यक तेव्हढं पाणी एडवल,चव घेतली तर जरा जास्त आंबट वाटली मग थोडं क्रीम टाकलं आणि परत आच मंद करून झाकण मारलं.
मग पनीर व बाकीचे फ्राय जिन्नस घालून पुन्हा 5मिनिटांसाठी झाकण मारलं..
तोपर्यंत होमिनिस्ट्री जागी झालती.. ती उठल्यावर तिला जो याचा पहिला दरवळ आला आणि मुख प्रफुल्लित जाहलेलं पाहिलं आणि लढाई जवळ जवळ जिंकली अशी भावना मनात झाली. मग 5 मिनिटात इंडक्शन मंदचा बंद वर नेऊन मी आमच्या बालकास उठवायला तिकडे सरकलो..
मग पुढे 11 वाजता जेवताना ताट लावायला घेतल्यावर रश्श्याचा कलर पाहून
पुन्हा तीच पावती तिच्याकडून मिळाली..
आणि चव घेतल्यावर तर ती खुश होऊन म्हणाली वन्स मोअर!!!
तेंव्हा स-मस्त बाप्ये मंडळी , तुम्हालाही असाच वन्स मोअर हवा असेल तर करून बघा हा खेळ.. मजेत जाईल मग वेळ!
ह्या रेशीपीची चव चटपटीत तिखट अशी लागते.. मूड फ्रेशर आहे एकदम.
भेटू मग पुन्हा, अश्याच एका रेशिपीत!
जय कोरोना! जय लॉकडाऊन! जय ओपनअप!
प्रतिक्रिया
17 Jul 2020 - 11:24 pm | सुचिता१
रेसिपी उत्तम , फोटो तर अती उत्तम!!
17 Jul 2020 - 11:26 pm | mrcoolguynice
रेसिपी मस्त.
गरम मसाला कोणत्या ब्रँडचा वापरता ?
18 Jul 2020 - 12:36 am | अत्रुप्त आत्मा
बादशाही
18 Jul 2020 - 8:36 am | प्रचेतस
व्वा व्वा, एकदम भारी, भाजीला रंगही छान आलाय.
पण पोळीबरोबर मजा नाय, ह्या भाजीला नान किंवा पराठाच हवा.
बाकी भाजी ताजी ताजी वापरलीत की मार-केट यार्डातून आणलेली १० दिवस पुरवलेली?
18 Jul 2020 - 10:21 am | तुषार काळभोर
लेख, पाक्रु, फोटो आवडले.
मटणाचा रस्सा झक मारतोय तुम्च्या टिक्का रश्श्यासमोर!!...
असंही आता चारमहिने पनीर, वाटाणा, मेथी, चालू राहणार आहे. असा टिक्का रस्सा असेल तर कशाला मटनाची आठवन यील!
18 Jul 2020 - 2:50 pm | श्वेता२४
तोंपासु. नक्की करुन बघणार!
22 Jul 2020 - 10:34 am | अत्रुप्त आत्मा
सुचिता १,मिस्टरकूल जिनियस, प्रचेतस, पैलवान, श्वेता२४ :--- सगळ्यांचे आभार. व धन्यवाद.
30 Jul 2020 - 9:04 pm | अनिरुद्ध.वैद्य
विकांती ट्राय करतो!
रस्सा एक नंबर!
15 Aug 2020 - 7:24 pm | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद.
2 Aug 2020 - 12:52 am | मनो
आमचे दिव्य बालक त्याच्या आवडीचा पदार्थ बनवताना .... गुर्जी, काही वर्षे थांबा, मग हे ही दिवस येतील .... :)
15 Aug 2020 - 7:23 pm | अत्रुप्त आत्मा
हही हही ही!
15 Aug 2020 - 9:33 pm | चित्रगुप्त
मस्तहो गुर्जी, पण जागोजागी हे काय आहे ? काहीतरी गुप्त सांकेतिक भाषेतील गिच्मिड दिसते आहे, उदाहरणार्थः
content.fnagfbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/96425833_2927048010714799_8236736401635278848_n.jpg?_nc_cat=100&_nc_sid=8024bb&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=271g2_LHoewAX_CZ8fZ&_nc_ht=scontent.fnag1-3.fna&tp=14&oh=f90137694512ea7bd3f15aef91773132&oe=5F3613B1
https://scontent.fnag1-3.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/96519327_...
16 Aug 2020 - 8:20 am | मनो
गुर्जीनी आपल्या फेसबुक अकाऊंटमधून (कारण fbcdn आहे त्या लिंकमध्ये) फोटो टाकले होते, ते वेगळ्या जागी हलले आहेत, किंवा delete केले आहेत, आणि आपल्याला आता फक्त त्यांच्या लिंका दिसतायत.