नयनरम्य लोभी

Primary tabs

Vivek Phatak's picture
Vivek Phatak in भटकंती
13 May 2020 - 9:18 pm

साधारण जुलै महिन्यात मला विजय गव्हाणेचां मेसेज आला की लोणावळा ते भीमाशंकर ट्रेकला तुम्ही यायला उत्सुक आहात का. ट्रेक सप्टेंबर महिन्यात जाणार होता आणि स्वच्छंदी ट्रेकर्सने हा ट्रेक आयोजित केला होता. माझा अजुन एक मित्र वैभव सुध्दा जायला तयार होता. मी ह्या ट्रेकबद्दल गूगल वर वाचले होते. हा साधारण ७५ किमीचा जंगल ट्रेक आहे आणि तो पूर्ण करायला दोन दिवस लागतात. ह्याचे व्हिडिओज खूप सुंदर होते त्यामुळे माझी जबरदस्त इच्छा होती हा ट्रेक करायची. ह्यापूर्वी मी एकही रेंज केलेला नव्हता आणि ह्या ट्रेकर्स ग्रुप बरोबरचा माझा पहिलाच ट्रेक असणार होता.

जुलै ते ऑगस्ट १९ ह्या दोन महिन्यात मी ५-६ ट्रेक केले जसे की गोप्या घाट ते शिवथरघळ, भोरगिरी ते भीमाशंकर, लिंग्या घाट ते कुर्डू गड, तिकोना वगैरे. पण मी अधिरतेने वाट पाहत होतो तो ह्या लोभी ट्रेकची जो जाणार होता २१-२२ सप्टेंबर १९ ला. ह्या वर्षी पावसाळा खूपच लांबला होता आणि पाऊसही खूप झाला होता. अशा लांबच्या ट्रेकला इतर पावसाळी ट्रेक सारखी गर्दी नसते. कारण एकतर खूप लांबचा पल्ला गाठायचा असतो आणि त्यासाठी भरपूर शारीरिक क्षमता लागते. आमचा ट्रेक लीडर विशाल धरून ११ लोक जमलो.

मी २० सप्टेंबरला औरंगाबादहून निघून, बाणेरला घरी जाऊन रात्री ९.३० पर्यंत शिवाजीनगर स्टेशनवर पोचलो. १० पर्यंत एक एक करून सगळे शिलेदार जमा झाले. सगळ्यांच्या एकमेकांशी ओलखी झाल्या. १०.१५ ला लोणावळा लोकल पकडुन ११.३० पर्यंत लोणावळ्याला पोचलो. सगळे लोक पहिल्यांदाच भेटत होते. पण ट्रेकिंग ची मनापासून आवड असल्यामुळे गाडीत खूप गप्पा झाल्या जणू की खूप दिवसांची ओळख होती. रात्रीचे जेवण/खाणे, ट्रेकला जायचे म्हणून लवकर झाल्यामुळे, सगळ्यांनाच थोडी भूक लागली होती. एका उडप्याच्या हॉटेलमध्ये, अर्धवट लावलेल्या शटर खालून सगळे आत घुसलो. कारण १२ वाजत आले होते आणि बाहेर पोलीस ची गाडी फिरत होती. मस्त गरमा गरम डोसा/उत्तप्पा वर ताव मारून रात्री साधारण १२.३० ला आमची वळवंड गावाकडे मस्त गप्पा मारत पायपीट सुरू झाली. वाटेत लहान लहान वस्त्यावर कुत्री मोठमाठ्याने भुंकुन आमचे स्वागत करत होती. विशाल आम्हाला ट्रेक चे अनुभव सांगत होता. मधेच त्याने कातळधार धबधब्याकडे (उल्हास व्हॅली)जाणारा रस्ता दाखवला. अधूनमधून आकाशात चंद्रदर्शन होत होते, रातकिड्यांची किरकिर चालू होती, पाऊस पडून गेलेला होता, आजूबाजूचे धबधबे दिसत नव्हते पण खळाळत्या पाण्याचा आवाज निरव शांतता भेदत होता. तुंगारली dam ला वळसा घालून, फनसराई गाव पार करत, राजमाची रस्ता सोडून आम्ही वळवंद गावाच्या रस्त्याला लागलो. रात्रीच्या अंधारात चिनिम ची फुले चमकत होती. काहींनी फोटो काढायचा प्रयत्न केला. मजल दर मजल करत रात्री ३.३० ला वालवंड गावात पोचलो. तिथे आधीच एक ग्रुप आलेला होता.

आम्ही एका मंदिराच्या व्हरांड्यात पथारी पसरली. काही जण व्हारांड्याच्या खालच्या अंगणात झोपले. थोड्या वेळात पावसाची मोठी सर आली. खाली झोपलेल्याची एकच तारांबळ उडाली. बाजूला एक छोटेसे देऊळ होते. त्यात ते दाटीवाटीने झोपले. साडेचार पाचला अजुन एक मुंबईचा ग्रुप आला. तेही जिथे जागा मिळेल तिथे झोपले. मी फारतर अर्धा तास झोपलो असेन. 6 वाजता उठलो. रात्रीच्या अंधारात आजूबाजूचे सृष्टी साैंदर्य दिसले नव्हते. आता उजाडताच हिरवाईने नटलेले समोरचे डोंगर, सभोवार पसरलेले मखमली कुरण बघून स्तिमित झालो. मग थोडेसे गावात फिरून, मस्त कांदा पोहे खाऊन आणि चहा पिऊन पुढे मार्गस्थ झालो.आज वलवंड ते पडरवाडी पर्यंतचा प्रवास. साधारण ३५-३७ किमीचा पल्ला गाठायचा होता. गावातून निघाल्या बरोबर एका लहानशा कॅनॉलच्या निमुळत्या वळणदार भिंतीवरून चालत निघालो. पुढे एक चढण चढून घनदाट जंगलातून ढाक बहिरी किल्याकडे निघालो. इथे विशालने सांगितले की हे जंगल लवकरात लवकर पार करूया कारण इथे अस्वल असण्याची शक्यता असते. मग काय आम्ही वेगात एकमेकांशी काहीही न बोलता ते जंगल पार केले आणि मोकळ्या पठारावर आल्यावर एकदम हायसे वाटले. बाहेर आल्यावर निळ्याशार आकाशाच्या आणि हिरव्यागार डोंगरांच्या बॅक ग्राउंडवर समोर ढाक बहिरी दिसत होता, लांबवर राजमाची, ड्युक नोज, मांजर सुंभ्याचा डोंगर आणि आजूबाजूला असंख्य पिवळी सोनकीची फुले डुलत होती. मधूनच काही जांभळी फुले आणि त्यावर उडणारी फुलपाखरे. हवा अतिशय स्वच्छ आणि सुखद होती. आम्ही आमच्याहीपेक्षा उंच कारवीच्या जंगलातून, डोंगराच्या अगदी कडेकडेच्या पाऊलवाटेने निघालो. पुढे वाटेवर बिबट्याच्या अगदी ताज्या पाऊल खुणा दिसल्या. आम्ही त्यांचे निरीक्षण करून फोटो काढले. बहुतेक अगदी काही वेळापूर्वी तो तिथून गेला असावा. पुढे एका ओढ्या जवळ थोडा पाणी आणि खादाडी ब्रेक घेतला. खूप फोटो काढले आणि जवळपास अर्ध्या तासाच्या ब्रेक नंतर पुढे निघालो.पुढे ढाक किल्याच्या आधी वाट दरीत उतरून पुढच्या डोंगरावर चढत होती, पण आम्हाला दरीत उतरणारी वाट दिसत नव्हती. तिथे वाट शोधण्यात थोडा वेळ गेला. तिथेही आम्ही खूप फोटो काढले. प्रत्यकाचे फेसबुक डीपी साठी फोटो काढून झाल्यावर खाली उतरायला सुरुवात केली. उतरणारी वाट खूप निमुळती आणि खूप खाच खळग्यांची होती. दोन्ही बाजूला कारवी आणि जांभळ्या फुलांची काटेरी झुडपे होती. काटेकोरांटीला कशी बोंडे असतात आणि त्यात केशरी फुले येतात तशी काटेरी बोंडे असलेली झुडपे खूप होती. उतरताना हातापायाला खूप काटे टोचत होते. शेवटी एकदाचे पठारावर आलो. आता पुढचा डोंगर चढून ढाकच्या जंगलात शिरलो. ढाक किल्याला यापूर्वी आलो होतो जांभीवली कडून ह्याच जंगलातून. पुढे एका ठिकाणी झाडावर "भीमाशंकर कडे" अशी पाटी टांगली आहे असे माहित होते. त्यामुळे त्या पाटीकडे लक्ष होते. पुढे जंगलातून जाताना ती पाटी दिसली आणि आम्ही त्याप्रमाणे उजवीकडे वळलो. आता परत छोटा डोंगर चढून कुसुर पठाराकडे जायचे होते. चढ चांगलाच दमवणारा होता त्यामुळे वर चढल्यावर थोडे थांबलो पाणी प्यायले आणि पुढे निघालो. वर एक गुराखी मामा भेटले. त्याचाशी गप्पा मारताना त्यांना विचारले ह्या जंगलात अस्वल, बिबटे आहेत का. तर ते म्हणाले अस्वल नाही पण बिबटे आहेत. पण बिबट्या फार लाजाळू असतो आणि माणसांपासून दूरच राहतो. गाई म्हशींच्या पिल्लांना किंवा छोट्या प्राण्यांना तो लक्ष करतोआता ४-५ किमीचे लांबलचक कुसूर् पठार पार करायचे होते. ह्या पठाराचा आडवा पसारा १७-१८ किमीचा आहे. आम्हाला उभे अंतर जे की ४-५ किमी आहे ते पार करायचे होते. ह्या पठारावर पावसानंतर असंख्य जांभळा तेरडा फुलतो. नजर जाईल तिथपर्यंत असंख्य जांभळी फुले वाऱ्यावर डुलत होती. पठारभर एकच रंग, जांभळा. पठारावरील मार्गक्रमण संपता संपेना. किती तरी वेळ चालतच होतो तरी पठार संपायचे नावच घेईना. शेवटी एक जंगल लागले. खाली जमिनीवर खूप पाला पाचोळा, काटक्या होत्या. तरीही त्यावरच सर्वांनी पाठ टेकली. थोडे चाऊ म्याऊ खाल्ले. तिथे जंगलात वाटेच्या कडेला दोन झाडांमध्ये झाडाच्याच मुळाचा झोका तयार झाला होता. त्यावर आम्ही सगळ्यांनी झोका खेळला. झोका जास्त जोरात घेता येत नव्हता कारण मागे खूप उतार होता.


जंगलातून बाहेर आल्यावर आमचा मार्ग थोडा चुकला. कुसुर पठारावर शेवटी एक मनोरा आहे. त्याला उजव्या बाजूस ठेऊन आम्हाला पुढे जायचे होते. पण आमचे थोड्या वेळाने तिकडे लक्ष गेल्यावर पाहिले तर तो डाव्या बाजूस होता. तिकडे झाडांवर आधीच्या ट्रेकर्सनी खुणे करिता रिबिनी बांधलेल्या होत्या. त्यापण दिसेनात. थोडी शोधा शोध केल्यावर आम्हाला योग्य ती वाट सापडली आणि आम्ही त्या मनोर्या जवळच्या धनगर वाडीत पोचलो. एका गर्द सावलीच्या झाडाखाली पडी घेतली. तो पर्यंत तिथल्या मामांनी थंडगार पाण्याची घागर आणून ठेवली. त्या थंडगार पाण्याने आम्ही तहान भागवली तो पर्यंत त्यांनी मस्त ताक करून आणले. त्यामुले आमची मस्त क्शुधा शान्ति झाली. प्रत्येकाने एक दोन ग्लास ताक प्यायले. पाण्याच्या बाटल्या थंड पाण्याने भरून घेतल्या, मामांना योग्य तो मोबदला देऊन कसूर पठारा वरून खाली कुसर गावात उतरायला सुरुवात केली. एव्हाना दुपारचे दोन वाजले होते. वाळवंड हून निघून ६.३०/७ तास झाले होते. एव्हाना आम्ही खाली कूसुर गावात असायला पाहिजे होतो. तिथे एका मावशी कडे जेवण सांगितले होते. उशीर झाला होता. विशालने त्यांना फोन करून १/१.३० तासात पोचतो असा निरोप दिला. आम्ही ४ पर्यंत डोंगर उतरून त्यांच्याकडे गेलो. फ्रेश होऊन मस्त पिठलं भाकरीचे जेवण केले. अर्धा तास आराम केला. इथून पुढे तळपेवाडीपर्यंत १३ किमीचा डांबरी रस्ता होता. त्यामुळे विशालने एक जीप सांगितली होती. आमच्या पैकी दोघे जण येथूनच पुण्याला परत गेले. आता आम्ही ९ लोक उरलो. तळपेवाडीपर्यंत जीप मध्ये मस्त डुलकी लागली. साधारण ५.३० वाजता तळपेवाडीत पोचलो. तिथे मस्त चहा घेतला. आम्हाला रात्री मुक्कामाला पदरवाडीला जायचे होते. तळपेवाडीहून वांद्रेखिंड मार्गे हे अंतर साधारण २/२.३० तासांचे होते.


६ वाजता तळपेवाडीहून वांद्रे खिंडीकडे निघालो. शेतात काम करणारी लोकं आम्हाला वांद्रे खिंडीकडे जाणारी वाट हातवारे करून दाखवत होते. वाटेत एक खूप मोठा धबधबा लागला. तिथे थोडासा वेळ घालवला. एव्हाना अंधार पडायला लागला होता. अजुन आम्ही खिंडी पासून बरेच दूर होतो. जोरात पावसाला सुरुवात झाली. आम्ही ताबडतोब रेन जॅकेट चढवली. रस्ता दाट जंगलातून जात होता. अंधार पण पडला होता. आम्ही आमच्या विजेरीच्या प्रकाशात खिंड चढत होतो. ७.३० ला आम्ही खिंडीत पोचलो. थोडा पाणी ब्रेक घेतला आणि पलीकडच्या बाजूने खिंड उतरायला सुरुवात केली. लांबवर गावचे दिवे दिसत होते. पण बराच वेळ उतरून सुध्दा ते दिवे जवळ यायच्या ऐवजी अजुन लांबच जात होते. अंधारामुळे काही कळत नव्हते. विशालने आम्ही ज्यांच्याकडे होम स्टे करणार होतो त्यांच्या मुलाला सोपानला फोन लावला. त्याला आम्ही साधारण खुणा सांगितल्या त्या प्रमाणे तो थोड्या वेळात समोरून टॉर्च घेऊन आला आम्हाला घ्यायला. त्याला बघून आमचा जीव भांड्यात पडला. पदरवाडी गाव समोरच्या दाट झाडीत लपले होते त्यामुळे ते आम्हाला दिसत नव्हते. त्या नंतर आम्ही तासभर भातखाचरातून, बांधावरून त्याला फॉलो करत घरी पोचलो तेव्हा ८.३० झाले होते.

घरी पोचल्यावर थोडे सोपानच्या आई बाबांबरोबर गप्पा झाल्या. ते आमची बराच वेळ पासून वाट पाहत होते. सकाळ पासून पायपीट केलेले बूट मोजे काढले. मस्त फ्रेश होऊन कपडे बदलून पाठ टेकली. त्यांनी पडवीच्या बाजूला, एक मोठी खोली होती हॉल सारखी, त्यामध्ये मोठी सतरंजी अंथरली होती. स्वयम्पाक होईपर्यंत १० वाजे पर्यंत मस्त झोप काढली. जेवनाच्या फक्कद बेत होता. बाजरीची भाकरी, भाजी, भात. मस्त जेवण केले. आम्ही झोपलेलो असताना विशाल आणि प्रथमेश ने चुलीवर सकाळ साठी गुलाबजाम बनवले.

सकाळी उठून लवकर आवरले. आजही जवळपास २०-२२ किमी पल्ला गाठायचा होता. सकाळी मस्त पोहे आणि रात्री केलेले गुलाबजाम असा नाश्ता वर फक्कड चहा झाला. बॅकपॅक व्यवस्थित भरली. त्या कुटुंबाबरोबर फोटो सेशन केले आणि ७.३०-८ ला पदरवाडी सोडले. ते काका आम्हाला थोडे लांबवर वाट दाखवायला आले आणि पुढची वाट समजाऊन परत फिरले. रात्री मस्त झोप झाल्यामुळे सगळ्यात उत्साह संचारला होता. आज अंतर कमी असल्यामुळे दुपारपर्यंत भीमाशंकर गाठू असा अंदाज होता. आजची घाटवाट ही खूप सुंदर, निसर्ग संपन्न होती. हवा ही खूप आल्हाददायक होती. सोनकीच्या फुलांचे ताटवे आजही आमच्या स्वागताला होते. मध्ये एक मस्त व्ह्यू होता. आम्ही चालत असलेला हिरवागार, सोनकीच्या फुलांनी बहरलेला डोंगर, खाली खोल दरी आणि समोर कोथळी गड, लांबवर डोकावणारा पदर गड आणि वर निळेशार आकाश. इथे आम्ही जवळपास तासभर थांबलो. यथेच्छ फोटो काढले. गवतात मस्त लोळलो.

तासाभराने भानावर आल्यावर निघालो. पुढे एक दीड तासाच्या पायपिटी नंतर जंगलातला देव खेतोबाचे छोटेसे मंदिर लागले. मंदिराच्या आजूबाजूला छोटे छोटे झरे वाहत होते. ते पाणी पिऊन बाटल्या भरून घेतल्या. इथे एका मोठ्या थोरल्या शिळेवर बसून सगळ्यांनी बरोबर आणलेला खाऊ संपवला. ह्या मंदिरात जाण्यासाठी थोडे मुख्य वाटे पासून, दाव्या बाजूस जाऊन खाली कच्या वाटेने उतरावे लागते. पुन्हा वर चढून मुख्य वाटेला लागताना आम्ही रस्ता चुकलो. विशालने download करून आणलेल्या गूगल मॅप वरून बरीच खटपट करून पुन्हा योग्य मार्गाला लागलो. पुन्हा पुढे जंगलात शिरताना तीन पायवाटा लागल्या. आता ह्यापैकी कोणती घ्यायची? परत गूगलबाबा कामाला आला. आम्ही मार्गक्रमण करत असलेला भाग इतका निर्मनुष्य होता आणि दाट जंगलाचा होता की कोणाला विचारायची सोयही नव्हती.

जंगलातून बाहेर आल्यावर लांबवर आम्हाला काही लोक ओढ्यावर कपडे धुताना दिसले आणि हायसे वाटले. त्या ओढ्याला दोन प्रवाह येऊन मिळत होते. एका प्रवाहाचे पाणी थंड होते तर दुसऱ्याचे कोमट होते. ओढा अजिबातच खोल नव्हता. माणूस त्यात बसला तर पोटा पर्यंत पाणी येत होते. मग काय आम्ही तास दीड तास त्यात यथेच्छ डुंबलो.
नंतर तो ओढा पार करून येळवली गावात पोचलो. एव्हाना दुपारचे ४ वाजत आले होते. ह्यानंतरचा रस्ता सरळसोट आणि सोपा होता. अर्ध्या तासात कमळजाईच्या छोट्याशा देवळाजवळ आलो. दर्शन घेतले आणि निघालो. खाली भोरगिरी गाव दिसत होते. भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक मी जुलै महिन्यातच केला होता. फक्त हा आमचा रस्ता दरीच्या उजव्या बाजूला आणि तो पलीकडच्या बाजूला. थोड्यावेळाने दोन्ही रस्ते मिळाले. वाटेत भीमा नदी क्रॉस करावी लागते. तिच्या प्रवाहात खाली एका गुहेत गुप्त भीमाशंकर चे छोटेसे मंदिर आहे. बहुतेक सगळ्यांनी त्यांचे दर्शन आधी घेतलेले होते. मीही मागच्या ट्रेकला दर्शन घेतले होते. ५.३० वाजत आले होते. पटापट राहिलेला मार्ग आक्रमत आम्ही ५.३० ला भीमाशंकरला पोचलो. ६ ला पुण्याला जाणारी शेवटची एसटी होती ती पकडायची होती म्हणून बाहेरूनच दर्शन घेतले. जेवण केले आणि बस पकडून पुण्याकडे मार्गस्थ झालो.

दोन दिवसात आमचे जवळपास ६५ किमी अंतर कापून झाले. हा ट्रेक इतका सुंदर, नयनरम्य आणि सुखावणारा होता की आम्हाला थकवा अजिबात जाणवला नाही. ट्रेकमध्ये खूप छान मित्र मंडळी मिळाली, खुप गमती जमती केल्या, खुप धमाल केली त्यामुळे ट्रेकच्या आठवणी कायम लक्षात राहतील. हा ट्रेक मला परत परत करायला नक्की आवडेल.

प्रतिक्रिया

उत्तम. ६० - ६५ किमि म्हणजे कुठे तरी दोन तीन भाग करता येतील का? लोणावळा - राजमाची फाटा - वांद्रे खिंड - भिमाशंकर ?

मी औरंगाबादचा आहे त्यामुळे त्या भागाची जास्त भौगोलिक माहिती नाही. पण काही लोक रात्री लोणावळा येथून सुरू करून साधारण ३/३.३० तासात वळवांडला पोचून मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी रात्री पदरवाडी ऐवजी अलीकडे म्हणजे तळपेवाडी ला मुक्काम करतात आणि पुढच्या दिवशी तळपे वाडी ते भीमाशंकर असा ट्रेक करतात.