तिरुपती दर्शन भाग ४

Primary tabs

AKSHAY NAIK's picture
AKSHAY NAIK in भटकंती
10 May 2020 - 8:11 pm

दिवस ७/०३/२०२०
आजच्या दिवसाची सुरवात तशी निवांतच झाली. सकाळी आठ वाजता सर्वांचे आवरून झाल्यावर आम्ही हॉटेल बाहेर पडलो. आजच्या दिवसात गोविंदराज स्वामी मंदिर, श्री कालहस्ती मंदिर आणी पद्मावती मंदिर या स्थळांना भेटी देण्याचे आधीच निश्चित केले होते. आमच्या हॉटेल जवळच श्री गोविंदराज स्वामी मंदिर होते त्यामुळे सर्वप्रथम येथे भेट देण्याचे ठरविले.
गोविंदराज स्वामी मंदिर हे तिरुपती रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मंदिराचा भव्य प्रांगण आणी दुरूनच दिसणारा गोपुरम येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. सकाळची वेळ असल्यामुळे मंदिरात गर्दी अजिबात नव्हती. मंदिराच्या आवारात अनेक उपदेवी देवतांची लहान मंदिरे आहेत. सर्वांचे दर्शन घेत आम्ही मुख्य देवतेच्या गर्भग्रहात पोहचलो. भगवान गोविंदराज स्वामींची योगनिद्रिस्त मूर्ती पाहून खूपच प्रसन्न वाटत होते. मूर्तीच्या अगदी जवळ जावून येथे दर्शन झाले. भव्य दिव्य अशी गोविंदराज स्वामींची मूर्ती जवळून पाहताना डोळ्यात सामावत नव्हती. गर्दी नसल्यामुळे अगदी छान दर्शन झाले. मंदिराबाहेर बऱ्यापैकी मोठी बाजारपेठ होती. घरी जाण्यापूर्वी काहीतरी येथून खरेदी करावी असे मनात आले होते. मात्र संध्याकाळी श्री कालहस्ती मंदिर आणी पद्मावती मंदिर पाहून लवकर आल्यावर खरेदी करू असे ठरवून पुढील नियोजनाप्रमाणे मार्गक्रमण सुरु ठेवले. आता सकाळचे दहा वाजत आले होते. जवळील एका हॉटेल मध्ये पोटभर नाश्ता केला. आणी तिरुपती बस स्थानकावर आलो.
breakfast
तिरुपती बस स्थानकावरून श्री कालहस्ती येथे जाण्यासाठी दिवसभर बसेस चालू असतात अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली होती. अनेक मिपाकर मंडळींनी देखील श्री कालहस्ती मंदिरा ला जरूर भेट द्या असे सुचविले होते. त्यामुळे येथे भेट देण्याची उस्तुकता होतीच. तिरुपती बस स्थानकावर पोहचल्यावर बस पकडेपर्यंत आमची खूपच दमछाक झाली. सर्व बसेस वर तेलगु अक्षरात त्यांच्या गंतव्य स्थानाबाबत माहिती होती. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक बसला “ये बस कहा जाती है ?” अशा तोडक्या मोडक्या हिंदी मध्ये आम्ही आतील प्रवाशांना विचारीत होतो. काही चेन्नई ला जाणाऱ्या गाड्यावर इंग्लिश मध्ये नावे होती. बाकी आम्हाला सगळी अक्षरे सारखीच दिसत होती. आमच्यातील एका महाभागाने google translate वापरून “श्री कालहस्ती” ला तेलगु मध्ये कसे लिहतात हे देखील करून पहिले मात्र हा देखील प्रयत्न फसला. शेवटी बस स्थानकावर कंट्रोलर नावाचा एक प्रकार असतो हे आमच्या लक्षात आले मग आम्ही त्याच्याकडे विचारपूस केली. तेथील साहेबांनी “nine” एवढेच सांगितले. त्यावरून श्री कालहस्ती ला जाणारी बस platform क्र ९ वरून सुटते असा अंदाज आम्ही बांधला आणी तो खरा ठरला. साधारण २० एक मिनिटे यासाऱ्या प्रकारात गेल्यानंतर आम्हाला बस मिळाली. श्री कालहस्ती मंदिर हे तिरुपती शहरापासून ४० किमी अंतरावर आहे. रस्ता चांगला असल्यामुळे पाऊण तासांनी बसने आम्हास श्री कालहस्ती मंदिराबाहेर सोडले. दुपारचे १२ वाजत आले होते.
bus stop
ऊन डोक्यावर चांगलेच तळपत होते. बसने जेथे आम्हास सोडले त्या stop च्या बाजूला एक लिंबूसरबत चा गाडा उभा होता. सरबत पिऊन घशाला थोडासा थंडावा दिला. त्यानंतर श्री कालहस्ती मंदिराकडे आम्ही पाय वळविले, लांबून पाहता मंदिर तसे साधारण वाटत होते. मंदिराच्या मुख्य गेट मधून आम्ही जसे आत शिरलो तसे आम्हाला चोहोबाजूंनी लागलेल्या लाईन दिसत होत्या. कोणती लाईन कशाकरिता आहे हे काही समजत नव्हते. येथे राहू केतू शांती पूजन करतात असे तिथे गेल्यावर कळले. राहू केतू शांती पूजेचे देखील अनेक प्रकार येथे बघावयास मिळाले. अगदी ५०० रुपये पासून २५००० रुपयेपर्यंत च्या पूजांचे दरपत्रक येथे लावले होते. पूजनाच्या दराप्रमाणे प्रत्येक पुजेची लाईन वेगवेगळी होती. आम्हाला केवळ लवकरात लवकर दर्शन करणे इतकेच हवे होते. त्यामुळे आम्ही कोणत्याही पूजेच्या फंदात न पडता शीघ्र दर्शन पास रुपये ५० प्रत्येकी खरेदी केले. आणी दर्शनाच्या लाईन मध्ये लागलो.
थोड्यावेळात आम्ही मंदिराच्या एका दुसऱ्या दरवाजा पर्यंत पोहचलो. मंदिराचा तो दरवाजा पाहूनच मंदिराच्या भव्यतेची पुसटशी कल्पना येत होती. हळूहळू आम्ही तो दरवाजा ओलांडून मुख्य मंदिरात प्रवेश केला. आम्ही जसे आतमध्ये प्रवेश केला तसे डोळे दिपणे म्हणजे काय याची अनुभूती झाली. मंदिराच्या सुंदरतेचे वर्णन शब्दातीत करणे केवळ अश्यक्य. मंदिराच्या आतील ती भव्यता पाहताना डोळ्यांना काय पाहू आणी काय नको असे झाले होते. अगदी बारीक कोरीव काम मंदिराच्या आतील प्रत्येक खांबावर केले होते. आतील प्रत्येक शिल्प पाहताना छायाचित्र काढण्याचा प्रचंड मोह झाला. मात्र परवानगी नसल्यामुळे छायाचित्रे काढता आली नाहीत. जसजशी आमची लाईन पुढे सरकत होती तसतसे मंदिरातील भव्यदिव्यता जवळून अनुभवता येत होती. काही खांबाना सोन्याचा मुलामा दिलेला होता त्यामुळे आपण कोणत्यातरी राजवाड्यात आहोत की काय असे वाटू लागले. थोड्याच वेळात आम्ही मुख्यदेवतेच्या गर्भग्रहा जवळ आलो. श्री कालहस्ती मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित आहे. शिवाचे हे रूप वायूलिंग स्वरुपात येथे विराजमान आहे. मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात त्या शिवलिंगाचे दर्शन घेवून आम्ही बाहेर पडलो. तिरुपती ला येऊन जर येथे भेट देता आली नसती तर मनाला रुखरुख लागून राहिली असती. दुपारचे २ वाजत आले होते, आम्हाला येथून पद्मावती देवी मंदिराला भेट देण्याकरिता जायचे होते. बस stop वर येताच बस मिळाली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या आसपास आम्ही पद्मावती मंदिराजवळ पोहचलो.
padmavati
पद्मावती मंदिराजवळ अन्नछत्र चालू होते. पोटात भूक देखील लागली होती. तांदळाच्या खिचडीचा पोटभर प्रसाद खावून आम्ही पद्मावती देवी च्या दर्शन लाईन मध्ये लागलो. येथे २० रुपयांचा दर्शन पास घेतल्यास प्रत्येक पासवर एक प्रसादाचा लाडू मिळतो. पास काढल्यामुळे १५ मिनिटात झटपट दर्शन झाले. येथील प्रसादाचा लाडू हा तिरुमला येथे मिळणाऱ्या प्रसादाच्या लाडूपेक्षा वेगळा आहे. अगदी छान चव आहे. येथे भेट दिल्यानंत आवर्जून चव पहावयास हवी. दुसरे म्हणजे दर्शन झाल्यावर बाहेर पडताना एका द्रोणामध्ये दहीभाताचा प्रसाद देखील बाहेर पडताना आम्हाला मिळाला. आम्हाला रात्री ११ वाजता रेनिगुंटा रेल्वे स्थानकावरून लातूर रोड कडे जाणारी गाडी पकडायची होती. हाताशी सहा तास होते. हॉटेलवर पोहचून थोडावेळ आराम केला. संध्याकाळी साधारण सात वाजता आम्ही हॉटेल मधून चेकआउट केले. तिरुपती सोडण्यापूर्वी घरच्यांसाठी थोडीफार खरेदी केली. भगवान बालाजी चा एक फोटो खूपच आवडला होता. मात्र किंमत विचारूनच तेथून काढता पाय घेतला. असो, गावाकडे जाणाऱ्या रेल्वेची वेळ होत आली होती. दुपारी उशिरा जेवण झाल्यामुळे आता भूकही नव्हती. मित्रमंडळी सोबत असल्यामुळे तीन दिवस अगदी छान मजेत गेले होते. पुन्हा कधीतरी अजून एकदा तिरुपती येथे भेट देण्याचे मनोमन ठरवून आणी भगवान व्यंकटेश्वराला पुन्हा एकदा स्मरण करून लातूरकडे जाणऱ्या रेल्वेने प्रस्थान ठेवले.

समाप्त ....

प्रतिक्रिया

आवडला लेख आणि सर्व लेखमाला.
एकूण राहू केतू सूर्यचंद्रासह मनुष्यांसही त्रास देतात.
रांग म्हटली की जाणे टाळतोच. तिरुपती आम्हास भेटणार नाही हे नक्की.

AKSHAY NAIK's picture

11 May 2020 - 11:39 am | AKSHAY NAIK

खूप आभार कंजूसजी !

पैलवान's picture

13 May 2020 - 6:12 am | पैलवान

कोणत्याही सहलीचं प्रवासवर्णन (विशेषतः दक्षिण भारतात) भरपूर फोटोंशिवाय अपूर्णच.
अजून फोटो असले तर नक्की टाका!

आम्ही तिरुपती शहरात गोविंद राज मंदिर, इस्कॉन मंदिर, कपिलेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर पहिले होते. वर डोंगरावर एका बास वाल्या बरोबर दोन हजार ठरवून अठरा जण पाच ठिकाणं फिरून आलो होतो.