लॉकडाऊन: तिसावा दिवस

सान्वी's picture
सान्वी in काथ्याकूट
23 Apr 2020 - 10:08 am
गाभा: 

नमस्कार मिपाकरहो,
सर्वप्रथम मला हा मिपावरील पहिलाच लेख लिहिण्याची संधी दिल्याबद्दल प्रशांतजी यांचे आभार. लॉकडाऊनला आता एक महिना उलटला आहे आणि आपण सारे याला बऱ्यापैकी सरावलो आहोत. सुरक्षा व्यवस्थेवरचा ताण वाढला आहे. डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ अहोरात्र झटताहेत. अर्थव्यवस्थेचं आणखी नुकसान टाळण्यासाठी शासनाने २० एप्रिलपासून काही उद्योगांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. मध्येच पालघर सारख्या दुर्घटना माणसाच्या असंवेदनशीलतेची जाणीव करून देत आहेत. कष्टकरी, नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, लहान मुले साऱ्यांचीच कसोटी पाहणारा हा काळ आहे. मध्ये एका live मध्ये मुख्यमंत्री म्हणाले त्याप्रमाणे काही न करता, बाहेरही न पडता घरी बसून राहणे यासारखी दुसरी शिक्षा नाही. पण तरीही आपण सर्वजण हे अरिष्ट एकदाचं कधीतरी टळेल या आशेने हे सारं सहन करतो आहोत.
निसर्ग आणि मानव यांच्यातला समतोल आणि सामंजस्य ढासळल्याचा हा ढळढळीत पुरावा आहे आणि अजूनही माणसाने आपला हव्यास आणि ओरबडण्याची वृत्ती सोडली नाही तर याहून गंभीर परिणाम नजीकच्या भविष्यात होण्याची शक्यता आहे. असो.
आता थोडं नोकरीबद्दल - एक राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीला आहे आणि 'अत्यावश्यक सेवा' म्हणून बँकेचे काम सुरू आहे. आधी जरा संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण होते, परंतू आता कर्मचाऱ्यांचे समूह करून प्रत्येक समूह २ दिवसांआड आणि मर्यादित वेळ असे शाखेचे स्वरूप निश्चित केले आहे. शाखेत महिलावर्ग जास्त असून प्रत्येकाच्या घरी ३ वर्षांखालील मूल आणि त्याला सांभाळण्यासाठी ज्येष्ठ अशी स्थिती आहे, त्यामुळे प्रत्येकजण अक्षरशः जीव मुठीत घेऊन कामाला येतो आहे कारण स्वतःपेक्षा आपल्यामुळे घरातल्या कोणाला संसर्ग झाला तर काय याची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. त्यात भरीस भर श्री मोदी साहेबांनी कोरोना बद्दल मदत म्हणून जन धन खात्यात रू. पाचशे जमा केले आहेत( सध्या फक्त स्त्रियांच्या खात्यात). तेव्हापासून आमच्याकडे लोक लॉकडाऊन चे कुठलेही नियम न पाळता, दुरदूरहून येऊन शाखेत गर्दी करून त्यांचा आणि आमचाही जीव धोक्यात घालत आहेत. ही मंडळी खरंतर खातं काढल्यापासून निद्रिस्त होती! दरम्यान आमच्या शाखेतील एका महिला अधिकाऱ्याच्या सोसायटी मध्ये जी बँकेपासून काही मीटर अंतरावरच आहे, तेथे एक कोरोनाबधित कुटुंब सापडले अजूनही २ केसेस सापडल्या, तेव्हापासून शाखेचा पूर्ण परिसर सील केला असून बँक मात्र चालू आहे.
आता थोडंसं घराबद्दल- घरी मी, यजमान, २ वर्षांचा मुलगा आणि २ महिन्यांसाठी आलेले परंतू लॉकडाऊनमुळे अडकलेले आईवडील आहेत. सगळ्यांचा मूड छान राहावा म्हणून वेगवेगळे खेळ खेळतो, गप्पांच्या मैफिली रंगतात, पत्त्यांचे डाव पडतात, गाण्यांच्या भेंड्या होतात, होमडिलिव्हरी देतो म्हणून जवळच्या एका दुकानदाराने दिलेला कॅरम दोनच दिवसांत डुगूडुगू हलायला लागला ! एरव्ही दुर्लभ असलेल्या सुट्टीचा आनंद घेतो आहोत. मुलासोबत मूल होऊन खेळणं हा उत्तम स्ट्रेसबस्टर आहे. U- tube वर छान गेम्स आहेत या वयातल्या मुलांसोबत घरी खेळण्यासाठी ते खेळलो. जात्याच स्वयंपाकाची आवड असल्यामुळे सगळ्यांच्या फर्माईश पूर्ण करताना खूप आनंद होतो. एरव्ही कधीही बनवल्या नसत्या अश्या खूप वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करून झाल्या. एक मात्र झालं, की कामवाल्यांशिवाय पण आपण घर आणि ऑफिस सांभाळू शकतो हा कॉन्फिडन्स आला ! अर्थात मिस्टरांची खूप मोलाची मदत मिळते. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन च्या पहिल्या आठवड्यात सगळ्या सोसायटीने मिळून आठ दिवस आपापल्या घरीच फुडपॅकेट्स तयार केले आणि काही पुरुष मंडळींनी त्याचे गरजूंना वाटप केले. तो अनुभव प्रसन्न करणारा होता, देण्यात खूप मजा असते. सकाळी आम्ही सगळे सोबत सूर्यनमस्कार घालतो, मजा येते. मुलाला घेऊन बागकाम, घरची आवराआवर केली त्यालाही आवडलं. लहान मुलांना आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त समज असते, त्याला एकदाच सांगितलं की बाहेर बाऊ आहे त्यामुळे तुला बाहेर खेळायला नेता येणार नाही, तर अजूनही त्याने परत कधी हट्ट केला नाही. बऱ्याच वर्षांनी मनासारखी वाळवणं घातली. मुख्य म्हणजे साठीच्या वडीलांपासून दोन वर्षांच्या मुलापर्यंत स्वतः होऊन कामाची वाटणी झाली, जो तो त्याच्याजोगं काम करतो धम्माल येते. अशाप्रकारे आहे त्या परिस्थितीत आनंद शोधणं एकीकडे सुरू असलं तरी पुढे काय होईल याची धाकधूक होतेच मनात…. खूप वर्षांनी एक कविता स्फुरली आणि लगेच कागदावर उतरवली जे खूप कमी वेळा जमलंय, सुचतं खूप पण लिहिलं जात नाही. त्या कवितेनेच लेखाचा समारोप करते..

इवल्याश्या सुक्ष्माचा अवघ्या विश्वाला विळखा
देव कुलूपात बंद, मनुष्य झाला पोरका ।।
अंधःकार वाटेवरी वाटे जणू दाटला
मी पणाचा गर्वाचा मागमूस न उरला ।।
तमाच्या या वाटेवर आता पडू दे प्रकाश
थिजलेल्या मनांना दे मोकळे आकाश ।।
उघड तुझी कवाडे, साऱ्यांस दे हिम्मत
गृहीत धरलेल्या श्वासांची आता कळली किंमत।।

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

23 Apr 2020 - 10:58 am | ज्योति अळवणी

वा... खूप सुंदर लेख!

कविता तर अप्रतिम

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2020 - 11:32 am | चौथा कोनाडा

समर्पक लिहिलंय !

एक राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीला आहे आणि 'अत्यावश्यक सेवा' म्हणून बँकेचे काम सुरू आहे. आधी जरा संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण होते, परंतू आता कर्मचाऱ्यांचे समूह करून प्रत्येक समूह २ दिवसांआड आणि मर्यादित वेळ असे शाखेचे स्वरूप निश्चित केले आहे. शाखेत महिलावर्ग जास्त असून प्रत्येकाच्या घरी ३ वर्षांखालील मूल आणि त्याला सांभाळण्यासाठी ज्येष्ठ अशी स्थिती आहे, त्यामुळे प्रत्येकजण अक्षरशः जीव मुठीत घेऊन कामाला येतो आहे कारण स्वतःपेक्षा आपल्यामुळे घरातल्या कोणाला संसर्ग झाला तर काय याची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. त्यात भरीस भर श्री मोदी साहेबांनी कोरोना बद्दल मदत म्हणून जन धन खात्यात रू. पाचशे जमा केले आहेत( सध्या फक्त स्त्रियांच्या खात्यात). तेव्हापासून आमच्याकडे लोक लॉकडाऊन चे कुठलेही नियम न पाळता, दुरदूरहून येऊन शाखेत गर्दी करून त्यांचा आणि आमचाही जीव धोक्यात घालत आहेत.

तुम्हा सर्व बँक कर्मचार्‍यांच्या कार्याला सलाम !
गर्दी करणार्‍या लोकांबद्दल काय बोलावे ? सर्वांचाच जीव धोक्यात घालतात !

कविता सुंदर आहे, आवडली !

गोंधळी's picture

23 Apr 2020 - 11:33 am | गोंधळी

कविता पण मस्त.

आशादायक बातमी------ ब्रिटनमधे कोरोनावरील लस बनली असुन तिचे आता माणसांवर प्रयोग चालु आहेत.
https://www.indiatoday.in/world/story/covid-19-human-trials-of-coronavir...

इतरांनी धडा घ्यावा असं आहे एकूण.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Apr 2020 - 11:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदम मस्त लिहिलंय. लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रातली मंडळी मिपावर लिहित आहेत. अनुभव समजून घेतांना आनंद वाटतो. बरं झालं तुम्ही बँकेत आहात हे समजलं. काही प्रश्न असले की इथे विचारता येतील असे समजतो. बाकी, तुम्ही लोक बँकेत जात आहात म्हणून आम्हा लोकांची सोय होते आहे, अडचणी येत नाहीत. बाकी ते मा.शेठ, इव्हेंट मॅनेजमेंटचे गुरु. कोणताही प्रसंग कॅश कसं करायचं ते शिकावं त्यांच्याकडून. जनधन योजनेचे पैसे काढायला टीव्हीवर लोकांच्या रांगा बघीतल्या. आता एकीकडे उपासमार होत असलेल्यांना काही फायदा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करुया पण फिझीकली डिस्टनसिंगचा बोजवारा उडतो आणि मग नवनवीन रुग्ण संख्या वाढलेली दिसते अर्थात ते काही एकच कारण नाही.

बाय द वे, तुम्हा लोकांच्या कार्याला सॅल्यूट आहेच. कविताही आवडली. इथेच म्हणालो की कुठे आठवत नाही. पहिल्यांदा पैसे, घर, गाडी, शौक, मस्ती याची किंमत शुन्य वाटली. सबकुछ है मगर कुछभी नही असं.

आमच्याकडे किलो किलोची उडदाची पापडं सुरु आहेत. आज भाजीपाला धूवून ठेवून दिलेला आहे. धान्य भरावे लागेल असे दिसते. मिपा पडीक आणि काही सिनेमांची ट्रेलरं बघून ठरवेन कोणती बघायची ती.

ता. क. शशक च्या धाग्यामुळे सर्व बोर्ड व्यापून जातो. चांगल्या कथा आहेत. मजा येते वाचायला. पण सध्या लॉकडाऊनचे धागे चांगले रंगत चालले होते मधेच काही तरी सुरु करतात. कोण करतं यार हे प्लानिंग. असो, संकेतस्थळावर वावरायला मिळतं हे आपलं नशीब. मिपा मालक चालक यांचे आभार.

-दिलीप बिरुटे

उग्रसेन's picture

23 Apr 2020 - 12:44 pm | उग्रसेन

राम राम ताईसाब. एक लंबरवारी लिवलय. एक सांगा, ब्यांकीतुन नोटा आनल्यावर नोटा धुन काढ़ायच्या की काय ते सांगा. काल सखुबाय ब्यांकेतुन पैशे घेवून आली. आन साबन पाण्याने नोटा धुन उनात वाळाय घातल्या.

आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
@ बिरुटे साहेब- माझ्या परीने आपल्या शंकांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
@बाबुराव- खरं तर खूप चांगला मुद्दा आहे. शक्यतोवर atm मध्ये जाताना ग्लोव्हज चा वापर करा. कारण atm हे संसर्गाचं एक कारण ठरू पहातंय. आणि आणलेली कॅश कुठेतरी दिवसभर ठेऊन मग वापरायला घ्या.

MipaPremiYogesh's picture

23 Apr 2020 - 5:53 pm | MipaPremiYogesh

खुप मस्त लिहिले आहे. सलाम तुम्हाला. तुनळि वरिल लिन्क्स एकडे देता येतिल का?

प्रचेतस's picture

23 Apr 2020 - 6:59 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.
आज दिवसभर खूप काम होतं ऑफिसचं. मग आता द वॉकिंग डेड चा दुसऱ्या सीजनचा शेवटचा भाग राहिला होता, तो पाहून झाला. आता परत ऑफिसचं काम.

सान्वी's picture

24 Apr 2020 - 12:03 am | सान्वी

@mipapremiyogesh https://youtu.be/w9Ttcf71wGo
https://youtu.be/mE5CzM5gJfw
https://youtu.be/x4j-tch5Me8
असे काही आम्ही घरी ट्राय केले. मुलाला आवडले आणि आमचाही वेळ छान गेला. अजूनही बरेच आहेत.

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2020 - 12:48 pm | चौथा कोनाडा

छान आहेत सान्वीजी या तिन्ही व्हिडीओतले खेळ. खुप उपयोग होईल यांचा.

जाताजाता: उद्गम कर (टीडीएस) कपात होऊ नये यासाठी १५एच/१५ जी हे नमुने भरुन द्यावे लागतात त्याची मुदत पुढ्म ढकलली आहे काय ? काय आहे शेवटची दिनांक ?

बघता बघता एक महिना होऊनही गेला.. लेखमाला चांगली चालू आहे.

प्रशांत's picture

24 Apr 2020 - 1:22 pm | प्रशांत

बघता बघता एक महिना होऊनही गेला.. लेखमाला चांगली चालू आहे

+१

रीडर's picture

24 Apr 2020 - 2:07 am | रीडर

छान लेख आणि कविता

अर्धवटराव's picture

24 Apr 2020 - 4:01 am | अर्धवटराव

बँक कर्मचारी देखील इतर अत्यावष्यक सेवांप्रमाणे रिस्क घेऊनच सेवा बजावताहेत. अनेकानेक धन्यवाद.
_/\_

चौकस२१२'s picture

24 Apr 2020 - 7:48 am | चौकस२१२

सानवीजी एक बँक कर्मचारी म्हणून एक प्रश्न होता .. हे ५०० रुपये जर खात्यात जमा झाले असतील तर भारतात बँकेचे डिजिटाईझशन बरेच झाले आहे तर मग शाखेत का जावे लागते लोकांना
चला धरून चालूय कि क्रेडिट कार्ड काही संगळ्यांकडे नाही आणि कोणाला पे टी एम किंवा पे पाल वैगरे मध्ये पडायचे नाही
असे हि धरून चालू कि खरेदीचे ठिकाण म्हणजे काही मोठा धंदा पण नाही कोपर्या वरचा किराणामाल वाला आहे ज्याच्याकडे
पण बँकेचे चे टर्मिनल आहे... तिथे ए टी एम कार्ड वापरून Electronic funds transfer at point of sale (EFTPOS) https://en.wikipedia.org/wiki/EFTPOS नाही का करता येत? वाण्याच्या कडे ? क्रेडिट कार्ड चा प्रश्न नाही खात्यतुन डायरेक्ट डेबिट
का अजून तेवढे डिजिटाईझशन/ जोडणी झाले नाहीये ? जेवढा बोलबाला झाला आहे ?
यासर्वातुन एक दिसून येते कि असे डिजिटाईझशन होणे जरुरीचे आहे, त्यामुळे वयवहार सोप्पं होतोच पण काळ्या पैशाची अर्थव्यवस्था कमी व्हायला मदत होतो (अर्थात अति दुर्गम भागात आणि वीज टंचाई मुले हे इतर देषांएवढे होणार नाही हे मान्य )
म्हणजे मग उगाच सरकार ला परत शिव्या नकोत ५०० दिले आणि जीव घेतला म्हणून !
का इथेही जनता " मोदींनी केलाय ना म्हणजे बेकार " अस राजकारण खेळणार ! ( हे तुम्हाला उद्देशून नाही )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2020 - 2:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काळ्या पैशाची अर्थव्यवस्था कमी व्हायला मदत होतो

चांगली आठवण केली. आज रात बारा बजहसे लॉकडाऊन रहेगा. ना आगा ना पिछा. अशाच एका रात्री आठवाजता नोटबंदी केली गेली आणि काळ्या पैशावाले आता कसे तुरुंगात जातील असे स्वप्न पाहून त्या रात्री अशी काही शांत झोप आली होती की विचारु नका. नंतर मात्र काळ्या पैशाने अर्थव्यवस्थेची काय वाट लागली ती आजही पाहतच आहोत. नोटबंदीमुळे काळ्या पैशाची अर्थव्यवस्था कमी व्हायला कशी मदत होते यावरुन आठवण झाली बाकी काही नाही.

सदरील प्रतिसाद आपणास उपप्रतिसाद असला तरी आपणास उद्देशून प्रतिसाद लिहिलेला नाही. केवळ काही आठवणी कशा भयंकर असतात ते आठवलं म्हणून पाठवलं. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

हे दोन वेगळे मुद्दे झाले सर. Dijitization आहे, आपल्या सारखे सुशिक्षित आणि पगारदार लोक डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स रेग्युलर वापरतो. आताही बँकेत जी गर्दी होते आहे ती रेग्युलर बचत खातेदारांची नाही तर जन धन खातेदारांची होते आहे. आता या लोकांचं म्हणाल तर हे खातेदार बव्हंशी अशिक्षित महिला आणि मजूर वर्ग वगैरे आहेत. आता पैसे मिळतायत म्हणून खडबडून जागे होऊन बँकेत येत आहेत. त्यांना ATM वापरता येत नाही. बऱ्याच लोकांचे अंगठे आहेत त्यांना नियमाप्रमाणे ATM देता येत नाही , असे आणि बरेच मुद्दे आहेत. या बहुतेक लोकांचे वापराविना खाते dormant झालेत, त्यांचे kyc renew केल्याशिवाय खात्यातून पैसे डेबिट करता येत नाही. आता अशा खातेदारांची खाती आधी ऍक्टिव्ह करून मग त्यांना पैसे द्यावे लागत आहेत.

चौकस२१२'s picture

26 Apr 2020 - 8:52 am | चौकस२१२

धन्यवाद आलं लक्षात..
बरं त्यातील पहिलाEFTPOS संबंधी ...देशातील कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड वापरून दुकानात पैसे भरता येतात का?

सान्वी जी भारी लिहिले आहे.. मस्त... तुमची वाक्य जरी फास्ट फास्ट पुढे सरकत असली तरी प्रत्येक वाक्य तुम्ही सांगता आहात ते चित्र स्पष्ट दर्शवित आहे..

देव कुलूपात बंद, मनुष्य झाला पोरका हि कवितेची ओळ खास आवडली

सान्वी's picture

26 Apr 2020 - 8:59 am | सान्वी

धन्यवाद गणेशा जी, खरंतर विस्तारभयामुळे जरा वेगवान लिहिलंय खरं...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2020 - 2:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सविस्तर अजून लिहा तुम्ही. बॅक आणि एकूनच जनतेचा अनुभव. कर्मचारी आणि नागरिक यांची देवानघेवाण. बँकेतले कर्मचारी सतत ग्राहकांना तुसडेपणाची वागणू़क देतात असे वाटत असते. दवाखान्यानंतर बँकेत सतत भितीयुक्त वातावरण असते. कर्मचारी तर इतकं मोजकं बोलतात की विचारु नका. महत्वाची जवाबदारी आणि काम असते, व्यक्तीगत तानतणावही असतात. सर्वच ठिकाणचे कर्मचारी कमी अधिक प्रमाणात थोडे डावे उजवे असतात पण, बँकेतल्या कर्मचारी जरा वेगळेच वाटतात. बँकेत महिला कर्मचारी असल्या तर जिथे चार प्रश्न विचारायचे असतात तिथे एक दोनच विचारावे लागतात. फाटकी नोट बदलून दुसरी द्या अशी म्हणायची हिम्मत उरत नाही.

सविस्तर दुसरा भाग लिहाच तुम्ही.....!

-दिलीप बिरुटॅ

प्रचेतस's picture

26 Apr 2020 - 4:27 pm | प्रचेतस

+१
बँकेतले विविध अनुभव अवश्य येऊ द्यात.

बँकेतल्या कामकाजावर नंतर कधी नक्की लिहीन. तुमचे अनुभव ऐकून हसू आलं. खरं तर कर्मचारी सुद्धा असंच सांगतील की काही लोक उलट बँक कर्मचार्यांशी अगदी उद्धटपणे वागतात आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी राडे करतात. असे खूप किस्से आहेत असो. माझ्या आतापर्यंत च्या नोकरीतल्या अनुभवांवर नक्कीच एक विस्तृत लेख लिहीन.

टर्मीनेटर's picture

14 May 2020 - 1:41 am | टर्मीनेटर

छान लेख!

निसर्ग आणि मानव यांच्यातला समतोल आणि सामंजस्य ढासळल्याचा हा ढळढळीत पुरावा आहे आणि अजूनही माणसाने आपला हव्यास आणि ओरबडण्याची वृत्ती सोडली नाही तर याहून गंभीर परिणाम नजीकच्या भविष्यात होण्याची शक्यता आहे.

याच्याशी १००% सहमत.