लॉकडाऊन: अठ्ठाविसावा दिवस

चिमी's picture
चिमी in काथ्याकूट
21 Apr 2020 - 9:00 am
गाभा: 

नमस्कार मिपाकर्स.
सध्या आपण सगळेच स्वप्नातही कधी विचार केला नव्हता अशा प्रसंगामधून जात आहोत. पण हा अनुभव खूप काही शिकवून जातो आहे.

साधारणपणे १६ मार्चपासून ऑफिसमधली वर्दळ कमी झाली होती. दोनच दिवसांत संपूर्ण ऑफिस रिकामे झाले होते. ज्यांचा माझ्यासारखाच वर्क फ्रॉम होमचा अजिबातच जुगाड झालेला नव्हता, ती २-४ डोकी दिसत होती. २० मार्चपर्यंत भरपूर हात पाय मारून देखील वर्क फ्रॉम होमची काहीच सोय झालेली नव्हती पण त्या दिवशी शेवटी साक्षात बॉसनेच सर्वांना तंबी देऊन सांगितले की, सोमवारपासून कोणीही ऑफिसला येण्याची जोखीम घेऊ नका. बऱ्याच प्रोजेक्टमध्ये ऑफिस सिस्टम लोकांच्या घरी पाठवून दिली होती. माझ्या मनात एकीकडे थोडा गिल्ट येत होता की आपण एवढे प्रयत्न करूनही ना ऑफिस सिस्टम घरी नेता येणार होती ना ऑफिस लॅपटॉप मिळाला होता ना रिमोट डेस्कटॉप कंट्रोल मिळाला होता. पण २ दिवसांतच अधिकृत लॉक डाऊन सुरु झाले आणि गिल्ट कुठल्या कुठे पळून गेला.

लॉक डाऊनचा पहिला आठवडा फुल्ल टू धमाल करण्यात गेला. जनता कर्फ्यूच्या दिवशी टाळ्या आणि घंटानाद झाला. अतिशय अभूतपूर्व अनुभव होता तो. त्यानंतर फेसबुकवर साडी चॅलेंज झाले. पिझ्झा/ पास्ता/ दाल बाटी अशा क्लासिफाईड डिशेस बनवून झाल्या. मकर संक्रांतीला आणलेले तीळ शिल्लक होते म्हणून तीळ-गुळाच्या वड्याही बनवून झाल्या. एका कोपऱ्यात ज्वारीची पिशवी १५-२० दिवसांपासून आज दळू – उद्या दळू म्हणून तशीच पडलेली होती. त्या ज्वारीचे करायचे तरी काय म्हणून यु ट्युबवर सर्च मारून २-४ भन्नाट रेसिपीज शोधून काढल्या. जवळ जवळ एकच रेसिपी ज्वारीचा पुलाव/ उपमा/ खिचडी म्हणून देण्यात आली होती. मग ज्वारीची खिचडी आणि ज्वारीच्या इडलीचे यशस्वी प्रयोग करण्यात आले.

सोसायटीमध्ये जिम, स्विमिंग पूल, गार्डन आणि जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आले. मग मात्र कधीही व्यायाम न करणाऱ्या मी घरातल्या घरात व्यायाम करायचे मनावर घेतले. सायकोलॉजीमध्ये २१ दिवसांच्या थेअरीप्रमाणे कोणत्याही गोष्टीची सवय होण्यासाठी २१ दिवस पुरेसे असतात असे म्हणतात. मी पण प्रयत्न करून बघायचे ठरवले. सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि साधी, सोपी योगासने करायला सुरुवात केली आणि नवल म्हणजे आता खरंच सवय होऊ लागली आहे, फक्त सकाळी
उठल्याबरोबर मोबाईलकडे हात जायला नको.

एकीकडे घर चकाचक आवरून झाले होते. पंखे पुसून झाले, पडदे धुवून झाले, चेहऱ्यावर वेगवेगळे लेप लावून झाले, अॅमेझॉन प्राईम वर भली मोठी वॉच लिस्ट बनवण्यात आली आणि रोज एक-एक चित्रपट उडवायला सुरु केले. दुसरीकडे ऑफिस सिस्टमसाठी पाठपुरावा करणे सुरूच होते, पण काही केल्या ते प्रकरण मार्गी लागत नव्हते. मग काहीतरी ज्ञानार्जन करावे म्हणून नेपोलियन बोनापार्टवरील ‘दिग्विजय’ हे पुस्तक वाचायला घेतले.

दुर्दम्य महत्त्वकांक्षी आणि विजिगीषु वृत्तीचा लढवय्या, अर्ध्या युरोपवर सत्ता प्रस्थापित करणारा बादशहा, आयुष्याची अखेरची वर्षे विजनवासात काढणारा एक बंदिवान... याच्या आयुष्यात याला कितीतरी जणांनी धोका दिला आणि फितुरी केली. कॉर्सिका या छोट्याश्या बेटावरचा साधा शिपाई ते फ्रान्सचा शहेनशहा - असा हा नेपोलियनचा प्रवास वाचण्यासारखा आहे.

मग लक्षात आले की आपल्या आयुष्यात आळस आणि मोबाईल या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर अचिव्ह करण्यासाठी भरपूर काही आहे.

एव्हाना करोना का कहर चारों ओर पसरायला लागला होता. सगळेजण सोशल डिस्टंसिंग गांभीर्याने घ्यायला लागले होते. घरात बसून झूम मीटिंग अॅपवर सगळ्या बहिण-भावांसोबत, कॉलेजच्या मित्र-मैत्रिणीबरोबर गप्पा मारून झाल्या होत्या. वर्क फ्रॉम होमचा नाद तर सोडूनच दिलेला होता. पण काही तरी value addition/ knowledge gain करावे म्हणून वेगवेगळे कोर्सेस शोधायला सुरुवात केली आणि अक्षरशः एक खजिनाच हाती लागला. लॉक डाऊनमुळे खूप सारे शॉर्ट टर्म ऑनलाईन कोर्सेस सुरु झाले होते. काय वाट्टेल ते शिकवतात. हो म्हणजे तुम्ही फक्त विषय सांगा, बेसिक चित्रकलेपासून वेब साईट बनवण्यापर्यंत आणि योगासनांपासून क्लाऊड कंप्युटिंगपर्यंत अनेक विषयांचे ऑनलाईन कोर्सेस आहेत.

Coursera वर Stanford Introduction to Food and Health हा कोर्स करायला घेतला. म्हणलं बघू तरी काय निरोगी आणि पौष्टिक खायला शिकवतात ते. हा कोर्स तसा चांगला आहे पण आपल्या भारतीयांसाठी अगदीच सर्वसाधारण आहे. आपले भारतीय अन्न आणि एकूणच खाण्यापिण्याच्या सवयी खूप चांगल्या आहेत. नशीब coursera फुकट आहे. युडेमी वरच्या कोर्सेस साठी तर वेगळा लेखच लिहायला लागेल.

आम्हांला ट्रेनिंगमध्ये बेसिक जर्मन भाषा शिकवली होती. पण नंतर जास्त कधी गरज पडली नव्हती. आता यु ट्युब वरून परत जर्मन भाषा शिकायला सुरु केली. नेमके तेवढ्यात एका मित्राने त्यांच्या ऑनलाईन पोर्टलसाठी लेख लिहून देशील का म्हणून विचारले. काम तसेही काही नव्हतेच. त्यामुळे त्याला २ लेख लिहून दिले. भारत-चीनच्या ‘रेझांग ला’ येथे झालेल्या युद्धावर लिहिलेला लेख सर्वांना खूप आवडला. आणखी असे लिखाण करायला कधी वेळ मिळतोय ते बघूया. विषयांची यादी तर बनवून ठेवली आहे आणि त्याच्यावरचे वाचन पण सुरु केले आहे. पण ह्या सगळ्यामध्ये जर्मन भाषा मागे पडली. Duolingo.com वरून वेळ मिळेल तशी प्रॅक्टीस करत आहे.

६ एप्रिलला अचानक ऑफिसमधून फोन आला, तुमच्या पर्सनल लॅपटॉपवर VM Ware हे सॉफ्टवेअर इंन्स्टॉल करा आणि तिथून तुमची ऑफिस सिस्टम वापरायला सुरु करा. ते बेटं सॉफ्टवेअर काही केल्या माझ्या लॅपटॉपवर इंन्स्टॉल व्हायला तयार होईना. सारखा आपला ‘इंन्स्टॉल फेल’ म्हणून एरर यायला लागला. बघता बघता पूर्ण टीमचे सॉफ्टवेअर इंन्स्टॉल होऊन कामही सुरु झाले होते. इकडे माझा गिल्ट परत डोके बाहेर काढत होता. कुठे चुकत होते काही कळत नव्हते. ज्यांच्याकडून मदत मदत अपेक्षित होती त्या सर्वांना फोन करून झाले होते. पण त्यांनाही काही क्लू मिळत नव्हता. त्याच सॉफ्टवेअरचे वेगवेगळे व्हर्जन इंन्स्टॉल करून बघितले. बॉस तसा निवांत होता. “नाही झाला तर नाही झाला इंन्स्टॉल, काही टेन्शन घेऊ नकोस” असे म्हणून दिलासा देत होता. खरच असा निवांत बॉस भेटायला काही तरी पूर्वपुण्याईच लागत असेल. इकडे माझाच गिल्ट मला स्वस्थ बसू देत नव्हता. कारण काम असो वा नसो बाकी पूर्ण टीम त्यांची सिस्टम वापरू शकणार होती आणि फक्त मीच अडकले होते. लॉक डाऊन १००% वाढणार ही बाब टेन्शन अजून वाढवत होती. सरतेशेवटी बॉसच्याच ओळखीच्या एका आय टी सपोर्टवाल्याने ते प्रकरण निस्तरून दिले आणि शेवटी १३ एप्रिलला एकदाचा माझा वर्क फ्रॉम होमचा बंदोबस्त झाला. आता चालू दे म्हणलं लॉक डाऊन कितीही दिवस.

एव्हाना लॉक डाऊन अंगवळणी पडले होते. तीळ-गुळाच्या वड्या संपल्या होत्या. झूम मीटिंग अॅप अनइंन्स्टॉल करून झाले होते. काही तरी हलके-फुलकेच बरे म्हणून शिरीष कणेकरांचे चहाटळकी संपवून सुरपारंब्या वाचायला घेतले. बाकी घरगुती फेसपॅक आणि लेपांमुळे ‘त्वचेचे आरोग्य’ सुधारत आहे. :) :) :)

ह्या लॉक डाऊनने देवावरचा आणि माणुसकीवरचा विश्वास तर वाढवला आहेचं पण छोट्या छोट्या गोष्टीतून कृतज्ञता व्यक्त करायला शिकवले आहे. सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना चहा नेऊन देणे असो, मेंटेनन्स बघणाऱ्या भैय्याला जेवणाचा डबा नेऊन देणे असो, कोणाचा एल.पी.जी. सिलिंडर वेळेवर आला नव्हता, कोणाचा पाण्याचा फिल्टर बंद पडला होता, असे एक ना दोन, अनेक प्रसंग घडून गेले. लोक नि:संकोचपणे आपल्या समस्या व्हॉटस्अपवर मांडत होते आणि जो तो आपल्याला परीने मदत करायचा प्रयत्न करत होता. कोणीतरी आपल्याला मदत करण्यासाठी झटत आहे हा विश्वासच खूप दिलासा देऊन जातो.

माझ्यासाठी सर्वांत मोठा फायदा म्हणजे माझा मिपाकरांसोबत परत संपर्क सुरु झाला. मिपाकर किसन आणि मोदकने माझ्या लॉक डाऊनमधल्या अनुभवावर लिहायला सांगितल्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस चढउतार होत आहेत. करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि त्या करायच्या ठरवल्या तर वेळ कमी पडेल. आपल्या मनाला आनंद देतील अशा गोष्टी करत राहू. आवश्यक ती काळजी आपण घेऊच पण त्यासोबतच जास्तीत जास्त समाधानी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करू.

_ चिमी

लॉक डाऊनमध्ये फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ऐकलेल्या आणि आवडलेल्या सेशन्सची लिंक :
- दुर्गविधानम by डॉ. मिलिंद पराडकर
https://www.facebook.com/Travorbis/videos/224309642235714/

- Amazing Namaste ह्या फेसबुक पेजवरील- An anthem in folk by Madhur Padwal

प्रतिक्रिया

कंजूस's picture

21 Apr 2020 - 10:56 am | कंजूस

अगदी व्यस्तच आहे तुमचा लॉकडाऊन!!

खाली दिमाग शैतान का घर म्हणून मुद्दाम व्यस्त ठेवला आहे दिनक्रम...

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2020 - 11:06 am | चौथा कोनाडा

लेख आवडला !
"घरून काम" साठी केलेली धडपड भारी वाटली !


आपल्या आयुष्यात आळस आणि मोबाईल या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर अचिव्ह करण्यासाठी भरपूर काही आहे.

+१

चिमी's picture

21 Apr 2020 - 7:37 pm | चिमी

धन्यवाद _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Apr 2020 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन खुसखुशीत आणि उत्साहाने भरलेलं आहे, वाचायलाही आवड्लं. बाकी, वर्क फ्रॉम होम मधे. मोबाईल टीव्ही काही अजूनही सुटत नै ये. आमच्याकडे कुटूंब पापड लाटण्यात व्यस्त आहेत. ऑनलाईन सर्टीफिकेट कोर्सचं आमच्याकडे फॅड आलंय. प्रत्येक महाविद्यालय जवळ जवळ याच्या नादी लागलंय. सुरुवाती सुरुवातील प्रमाणपत्र मिळतं म्हणून बरं वाटलं नंतर त्याचाही कंटाळा आला. किसन यांच्यामुळे काल 'कास्ट अवे' सिनेमा पाहिला, त्यांच्याच सहकार्याने पुन्हा '१२७ हवर्स' पाहिला. Cast Away हा सिनेमा आवडला. एका निर्जनबेटावर पोचल्यानंतरचा आणि परत आल्यावरचा संघर्ष अप्रतिम. फोटोग्राफी सुंदर आहे.

लिहिते राहा. येत राहा.

-दिलीप बिरुटे

चिमी's picture

21 Apr 2020 - 7:22 pm | चिमी

धन्यवाद.
टीव्ही दोन महिन्यांपासून बंद करून ठेवला आहे. अमेझोन प्राइम, MX प्लेयर, एअर् टेल XStream पुरून उरतात.
Cast Away अप्रतिम आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये 'पनीर नही मिल रहा है / चीज नही मिल रहा है' म्हणून तक्रार करणार्यांना आवर्जून दाखवावा असा.
असो.
हा अध्यायही लवकर संपेल अशी अपेक्षा करूया.
_/\_

प्रचेतस's picture

21 Apr 2020 - 1:09 pm | प्रचेतस

छान लिहिलं आहेस. लॉकडाऊनला भिण्यापेक्षा त्याला सकारात्मकतेने सामोरे जाणेच इष्ट आहे.

सध्या वर्क फ्रॉम होम जोरात सुरू आहे, तुम्ही घरी राहून काम करताय ह्याचा अर्थ तुम्ही २४/७ उपलब्ध आहात असंच गृहीत धरलं जातंय. इलाज नाही, काम चालूच राहते. अधूनमधून मिपाकरांसोबत बुद्धिबळ मॅच व्हायच्या हल्ली व्यस्ततेमुळे प्रमाण कमी झालंय. बाकी वाचन वगैरे चालू आहेच.

येत राहा, लिहीत राहा.

धन्यवाद प्रचेतस वल्ली ...

आम्ही तुमच्या हंपीच्या लेखमालेतील पुढील भागांची वाट बघत आहोत कधीपासून ...
लॉकडाऊनचा फायदा घ्या अन करून टाका पूर्ण...

माझीही शॅम्पेन's picture

21 Apr 2020 - 6:50 pm | माझीही शॅम्पेन

छान , खुसखुशीत लेख , बरेच दिवसाने पुनरागमन केलेलं दिसतंय

चिमी's picture

21 Apr 2020 - 7:26 pm | चिमी

धन्यवाद..
हो.. वाचनासाठी नियमित असते.. लिखाणासाठी पुनरागमन...

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

21 Apr 2020 - 7:41 pm | सौ मृदुला धनंजय...

छान लेख. सध्या सकारात्मक विचारांची आपल्याला खूप गरज आहे.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

21 Apr 2020 - 7:41 pm | सौ मृदुला धनंजय...

छान लेख. सध्या सकारात्मक विचारांची आपल्याला खूप गरज आहे.

चिमी's picture

22 Apr 2020 - 4:26 pm | चिमी

धन्यवाद _/\_

छान लेख.. फ्री ऑनलाईन कोर्सचा किस्सा टाक. ;)

बाकी लेख पण येऊदेत मिपावर.

हो, तो भारीच किस्सा झाला होता... बाकी ऑनलाईन कोर्सचे पेव फुटले आहे सध्या..
वेळ मिळेल तसा तो पण किस्सा टाकते ..

ज्योति अळवणी's picture

22 Apr 2020 - 11:14 pm | ज्योति अळवणी

खूपच छान लिहिलं आहे. खूप आवडला तुमचा लेख

प्रशांत's picture

24 Apr 2020 - 1:31 pm | प्रशांत

असेच लिहत रहा..

लेख भारी लिहिला आहे.. साधं सरळ पण तितकेच खुसखुशीत..
आता पर्यंत वाचलेल्या 3-4 धाग्यात हा धागा मला जास्त भावला..

@ बिरुटे सर,
Cast away चा जो हिरो आहे त्याचाच forrest gump हा सिनेमा नुकताच पाहिला तो पण खूप आवडला बघा जमल्यास

टर्मीनेटर's picture

14 May 2020 - 2:16 am | टर्मीनेटर

छान लिहिलंय,

युडेमी वरच्या कोर्सेस साठी तर वेगळा लेखच लिहायला लागेल.

१००% सहमत.

वामन देशमुख's picture

14 May 2020 - 9:48 am | वामन देशमुख

आपल्या आयुष्यात आळस आणि मोबाईल या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर अचिव्ह करण्यासाठी भरपूर काही आहे.

एक नंबर!

रच्याक, तुमचं चिमी हे सदस्यनाम मस्त आहे हं!