पूर्वतयारी
२०१६ मध्ये केलेल्या स्पेनच्या वारी नंतर काही छोट्या वगळता, कोणत्याच अशा सहलीचा योग आला नव्हता. त्यामुळे सहाजिकच मानसीच तुणतुण मागे लागल होत की कुठे तरी जाऊया. २०१८ च्या सप्टेंबर मधे लक्षद्वीपला जाऊ असा विचार आला पण बुकिंग मिळता दमछाक झाली याशिवाय मनाजोगत फिरता येण्याचा आनंद मिळणार नाही याची कल्पना आली होती. लक्षद्वीप सोबत केरळ पण फिरूया म्हटल तर मॅडम बोलल्या माझ सगळ फिरून झालय , मग मला काही सुचत नव्हत.
स्पेन मधे साधारण २ लाखाच्या खर्चात १५ दिवस फिरण जमल पण त्याला आता २ वर्ष उलटली होती, तेव्हा पुन्हा असा प्रयत्न कितपत जमेल याचा अंदाज येत नव्हता. तरीसुद्धा अधेमधे सिंगापुर , मलेशिया , सेशेल्स असली जुळवाजुळव करून बघत होतो. पण गणित जमत नव्हत.
एके दिवशी अचानक बँगकॉक पट्टायाचा विचार आला. टूर मधून गेलो तर ५ दिवसाचे १.४० लाख पटतच नव्हते. मग सहज विचार केला जर आपणच सगळ केल तर...नाहीतरी स्पेनचा अनुभव गाठीशी होता ...बघुया कस जमतय ते.
अखेरीस थायलंड फिरायचा विचार पक्का केला. आम्हाला शहरापासून दूर राहायाच होत , बीच वर मनसोक्त लोळायच होत , त्यामुळे बँकॉक चा पर्याय नाकारला पण त्याऐवजी फुकेत चा विचार पुढे आला. जाताना फुकेत आणि येताना को समुइ किंवा बँकॉक असे अनेक पर्याय चाचपडत होतो. सर्वात महत्वाच होत विमानच तिकीट ....ज्याच्यावर पुढच भवितव्य अवलंबुन होत.
नेहमी सारखी अंतरजाला वर शोधाशोध सुरू झाली. हो नाही करता करता सप्टेंबर मधे अचानक एक दिवशी मला तिकीटची किंमत कमी झाल्यासारखी वाटली, लगेच बुक करून टाकली. १३ जानेवारी २०१८ ते २७ जानेवारी २०१८ ..मुंबई ते फुकेत आणि फुकेत ते मुंबई अनुक्रमे...
दोन्ही वेळा लेओवर सिंगापूरला ...तब्बल ५ आणि ६ तास...सिंगापूरला हा मधला वेळ वापरात येतो...पण आम्हाला त्याची काही कल्पनाच नव्हती.....पुढे याविषयी बोलेनच...
या मधल्या काळात कुठे फिरणार..कस फिरणार ..वगैरे काही गोष्टींचा विचार काही केला नव्हता....पण ते पण वेळेवर सोडून रोजच्या कामाला लागलो.... वीसा ची माहिती काढली...मुंबई मधे कॉक्स अँड किंग्स (मंत्रालाया जवळ)मधे वीसा काढता येत होता... पण अजुन बराच अवकाश होता. एव्हाना कुठे राहायच याचा प्लान केला..यात एअरबीएनबी व बुकिंग डॉट कॉमची बरीच मदत झाली.
झाल तर मग... ३ दिवस फुकेत, पुढे ३ दिवस क्राबी , ३ दिवस को समुइ आणि अखेरीस ३ दिवस पुन्हा फुकेत....
खर तर इतके दिवस फुकेत मधे काय करणार प्रश्न होता पण तरी म्हटल की बघू तेव्हाच तेव्हा......
एव्हाना डिसेंबर आला होता व वीसाच काम बाकी होत ...एअर तिकीट , हॉटेल बुकिंग आणि चलनाची पावती अस सगळ गोळा करून वीसाचे दोन फॉर्म भरले. .. आणि जानेवारी मधे वीसा आला... तस आपल्या भारतीयाना वीसा ऑन अरायवल मिळतो पण आम्ही असा कोणताही घोळ करू इच्छित नव्हतो.
अजूनही काही प्रश्न होते...तिकडे फिरणार कस ....तेव्हा एका मित्रा कडून कळल की भारतीय लायसन्स वर थायलंड मधे गाडी चालवता येते...फक्त इंटरनॅशनल लायसन्स पण लागत....मग लगेच चक्र फिरवली आरटीओ मधे ,एका मित्राच्या माध्यमातून..... ते काम पण २ दिवसात झाल....
बरीच धाकधुक झाली....कारण वीसा ७ तारखेला हातात पडला होता....आणि मी पण या दिरंगाई बद्दल बर्याच बोलण्या खाल्ल्या....असो...
पासपोर्ट वीसा चलन बॅगा सगळ तयार झाल होत....मदिरेची सोय ड्युटी फ्री करू अस ठरल....
आता प्रतीक्षा १३ तारखेची.....!!!
(क्रमशः)
प्रतिक्रिया
17 Apr 2020 - 1:35 am | अभिनाम२३१२
पुर्वार्ध
भाग १ - मुंबई टू फुकेत वाया सिंगापूर आणि सिंगापूर टू फुकेत
रात्री ११.३५ च फ्लाईट होत . घरापासून विमानतळ २० मिनिटावर होता म्हणून काही टेन्शन नव्हत. मॅडमच्या सवयी प्रमाणे ३ तास आधी छत्रपती शिवाजी मुंबई विमानतळावर पोचलो. बोर्डींग पास व इमिग्रेशनचे सोपस्कार पार पडले व साधारण ९.३० वाजता आम्ही आत शिरलो.
मुंबई विमानतळ देखणा आहे पण प्रशस्त नाहीय...याची प्रचीती आम्हाला जर्मनीच्या विमानतळावर आली होती..असो..
ड्युटी फ्रीमध्ये मदिरेची सोय केली..आणि पिक अप फुकेतला .....आता वेळच वेळ होता फिरायला...बरेच लवकर निघालो होतो त्यामुळे जेवण राहील होत, शिवाय विमानमधे पण जेवण मिळणार होत म्हणून हलका नाश्ता केला ...माझा हा अवघा दुसराच विमान प्रवास होता...मानसी मात्र हॉँगकॉँगच्या प्रवासामुळे चांगलीच सरसावली होती....पूर्ण प्रवास हा सिंगापूर एअर लाईनचाच होता...त्यामुळे आता निर्धास्त झालो होतो... पुन्हा एकदा आकाशातुन चमचमती मुंबई दिसणार या विचाराने मी खुश झालो होतो....मानसी मात्र चांगी एअरपोर्ट वर काय काय बघायला मिळणार याची लिस्ट बनवत होती... आतपर्यंत दोनच वेळा विमान प्रवास झाला पण दोन्ही वेळा नावाजलेल्या एअरलाईन मधूनच...
वेळ साधारण १०ची.... फ्लाईट नंबर आणि गेट नंबर ची घोषणा झाली...लगेच सगळयांची गर्दी झाली...गरज नसताना अशी गर्दी का करतात हेच कळत नाही मला ....तब्बल पाऊण तास लाईन मधे उभ राहून आधीच चेकइन केलेली सिटच मिळणार ना....तरी या लोकाना घाई ... आम्ही आपले लाईन संपे पर्यंत वाट बघितली....
काही मिनिटतच लाईन कमी झाली तेव्हा आम्ही पण लगेच विमानात शिरलो. उड्डाणाच्या १५ मिनिट अगोदर विमानाचे दरवाजे बंद झाले, सुरक्षा सूचना झाल्या. यानंतरचा काळ फार कठीण होता कारण विमान टॅक्सीवे मधे तब्बल ३० मिनिट उभ होत....एकीकडे भूक लागली होती आणि दुसरीकडे मुंबई दर्शनची आस ....अखेरीस रनवे मिळाला आणि आम्ही उडालो ...
अवघा ५-७ मिनिटांचा नजारा .....चमचमणारी मुंबई आता मागे पडू लागली आणि आता बाहेर फक्त अंधाराच साम्राज्य होत...काही मिनिटातच जेवण आल...पोटोबा झालयावर ताणून दिली मस्त...म्हटल आता भेटू सिंगापूर मधे....मानसी मात्र सीट समोरील स्क्रीन मधे काहीतरी उगाच काहीस शोधत बसली.
साधारण ५.३० - ६ च्या सिंगापुर वेळेनुसार विमान सिंगापूरला लँड झाल...परत इमिग्रेशन चे सोपस्कार आणि आम्ही साधारण ७ वाजता चांगी एअरपोर्ट वर फिरायला मोकळे झालो. आमच पुढच फ्लाईट तब्बल ६ तासांनी म्हणजे दुपारी १.१० च होत. त्यामुळे खाणे पिणे आणि एअरपोर्ट फिरणे एवढेच काम उरले होते.
सिंगापूर एअरपोर्ट चांगलाच प्रशस्त आहे. एका टर्मीनल वरुन दुसर्या टर्मीनल ला जायला मेट्रो ट्रेन आहे. हा प्रकार फ्रॅंकफर्ट एअरपोर्ट ला पण बघितला होता. खूप सारे खाण्याचे पर्याय आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक गोष्टी सुद्धा .....त्यामुळे म्हटल आता बघून घेऊ येताना खरेदी करू..मानसी ला हा पर्याय पटला ..कॉफी , बर्गर आणि क्रॉसो अस खिशाला परवडतील असे जिन्नस खाऊन भटकंतीला लागलो. इकडे कॉमन लाऊंज पण खूप मोठे प्रशस्त आणि बर्यापैकी सोयीसुविधानी सज्ज आहेत. उदाहरणार्थ फ्री बॉडी मसाजर...थकलेल्या शरीराला तेवढाच निवांतपणा. त्यानतर आमचा मोर्चा वळला बटरफ्लाय पार्ककडे. एअरपोर्ट मधे एक बटरफ्लाय पार्क होत. तिकडे थोडा वेळ काढला ...जागोजागी छोटी छोटी झाड आणि लाईटिंग केल होत...किंवा नुकतच नवीन वर्ष सुरू झाल होत त्यामुळे कदाचित लाईटिंग दिसत होत....असो ..एअरपोर्ट चा शृंगार छान जमला होता.
आमच्या गोप्रो साठी एक हेड स्ट्रॅप घेतला ज्यातुन काढलेले फोटो पुढे येणार्या धाग्यात टाकेनच...आता हिंडून पाय दुखायला लागले होते व फुकेतची ओढ लागली होती. मग गुपचुप फुकेतच फ्लाईट जिथून सुटणार त्या गेट जवळ आलो.
नेहमीसारखी फ्लाईटची उद्घोषणा झाली आणि गेट उघडले व आम्ही विमानात शिरलो. काही वेळात विमान हवेत झेपावल आणि सिंगापूर मागे पडू लागल. फारच छोटा बेटाचा तुकडा आहे सिंगापूर ... पण अतिशय नीटनेटक वाटल ... आता फक्त २ तासांचा प्रवास राहिला होता...
इतके दिवस थायलंड विषयी ऐकून होतो आता प्रत्यक्ष अनुभवायची संधी मिळणार होती ..
तासभरा नंतर छोटी छोटी बेट दिसायला लागली ...व आता मॅप वर १०-१५ मिनिटांचा प्रवास राहिला आहे कळल...बाहेर अजूनही समुद्रच दिसत होता
काही क्षणात समुद्रा वरुन आम्ही जमिनीवर उतरलो ....बाहेर 'वेलकम टू फुकेत' चा बोर्ड दिसत होता...परत इमिग्रेशनचे सोपस्कार आणि फाइनली फुकेत ला पोचलो.... ड्यूटी फ्री मधून मादिरा घेतली आणि एअरपोर्टच्या बाहेर आलो .....आता खरी सुरवात झाली होती.
एअरपोर्ट च्या बाहेरच सिम कार्ड घेतल आणि घरी फोन करून खुशाली कळवली.
आमचा पहिला मुक्काम होता 'बान कोकोनट रिज़ॉर्ट' ....एअरपोर्ट पासून अर्धा तास दूर...तिकडे बाहेरच टॅक्सीवाले होते... थोडी घासाघिस केल्यावर ४०० बाथ वर सौदा पक्का केला. पहिलीच घासाघिस जिंकली त्यामुळे एकदम जग जिंकल्यासारख वाटल ....
फुकेत एअरपोर्ट मूळ शहरापासून बराच लांब आहे...किमान ४० किमी...आमच हॉटेलही शहराबाहेर एअरपोर्टपासून २७किमी होत..
एकदम गुळगुळीत ,स्वच्छ, टापटीप रस्ते ....कुठेही खडड्यांचा मागमूस नाही ...मुंबईतल्या माणसाला याच नवल का असु नये...लोक स्वतः हून रांगेची शिस्त पाळत होते....उगाच कोणी होर्न वाजवत नव्हत....
स्पेन सारखी इथली घर रॉयल नव्हती पण व्यवस्थित मांडणी केलेली होती...थायलंड मधे वर्षाचे बारा महिने पाऊस पडतो...पावसाळ्यात तर मुंबई सारखा धो धो कोसळतो...शिवाय हवेत दमटपणा पण असतो त्यामुळे घाम पाचविला पूजलेला असतो. टॅक्सीने आम्हाला हॉटेलपर्यंत सोडल नाही ...तर एका होटेल जवळच्या रिक्षा स्टॅंडपर्यंत सोडल... विचारल तर म्हणाला की आम्ही आत पर्यंत नाही सोडू शकत....(या गोष्टीचा मला खर तर राग आला होता ) .....पुढे एका मोपेड रिक्षाने आम्ही १० मिनिटा मधे पोचलो...
रिसोर्ट फोटो मधे दाखवल्याप्रमाणे एकदम छान होत....एका छोट्या गावात ....आजूबाजूला गर्द झाडी ....
रिसोर्ट म्हणजे खर तर ते एक घरच होत ज्याला रिसोर्ट मधे परिवर्तीत केल होत... मला हे रिसोर्ट एअर बिएनबि वर मिळाल होत. माझ मालकाशी आधीच बोलण झाल होत...त्याने मला तिथल्या केअर टेकर चा नंबर दिला होता. पोचल्यावर त्याने कुठून आलात वगैरे चौकशी केली. आमची रूम दाखवली. प्रशस्त नाही पण ठीकठाक मोठी होती.
गेटमधून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला प्रथम केअर टेकरच घर होत. तिथून पुढे मेन बिल्डींग ज्यात उजव्या बाजूला आमची आमची रूम...डाव्या बाजूला मालकाची खोली आणि त्याचा पुढे डाव्या बाजूलाच खुला किचन होता. किचनलाच लागून एक खुली डायनिंग रूम होती...तिथे मेन बिल्डींग संपली. आता बॅकयार्ड मधे स्विमिंग पूल व थोडी मोकळी जागा आणि त्याचा मागे २ रूम्स.... स्विमिंग पूल कडे फेसिंग अशा होत्या....काही क्षण अस वाटल की आपण कोकणातल्या घरातच आलो आहोत...फक्त थोड मॉडर्न घर होत...
मालकाच नाव आल्फ्रेड होत ....मुळचा जर्मनीचा होता तो ..आणि त्याचा केअर टेकर पण.... केअर टेकरच नाव आठवत नाही... पण तो सुद्धा जर्मन होता आणि त्याची पत्नी मात्र थायलंडची होती. त्याला इंग्रजी बोलता येत होत, पण तिचे इंग्रजीचे वांदे होते. पण तो तिला थाय भाषेत समजावून सांगत होता आणि ती पण विनातक्रार सर्व काही करत होती. घराचे काही नियम होते...जस की न्याहारी सकाळी १० पर्यंत मिळेल..स्वतः ला काही हव असेल तर शिजवायची परवानगी होती..मात्र मासे अजिबात वर्ज्य होते....एक पुस्तकांच कपाट होत....ज्यात जर्मन आणि इंग्लीश भाषांमधली बरीच पुस्तक होती. एकूणच घरासारख वाटत होत.
सर्व प्रवासाचा एक क्षीण आला होता त्यामुळे माझी रात्री जेवायची इच्छा मेली होती. एव्हाना संध्याकाळचे ७ वाजून गेले होते. जेवण्यापूर्वी थोडा वेळ आराम करूया अस म्हटल आणि अंग टाकल ...पण कसल काय ,जी झोप लागली ती तडक दुसर्या दिवशी सकाळीच जाग आली...
(क्रमशः)
मुम्बई एअर पोर्ट
सिंगापूर बटर फ्लाय पार्क
फूट मसाजर
एअरपोर्ट मेट्रो
कलरफूल चान्गि एअर पोर्ट
सिंगापूर शहर आकाशातून
मोपेड टमटम मधून प्रवास
बान कोकोनट रिसोर्ट
घरामागचा स्विमिन्ग पूल
घरातला किचन
आमची रूम
17 Apr 2020 - 6:18 pm | चौथा कोनाडा
हा भाग वाचायचा राहिला होता.
मस्त लिहिलंय ! पहिला भाग देखील आता वाचला. तिथं फोटो दिसत आहेत.
एकंदरीत भटकंती अतिशय रोचक होणार यात शंका नाही !
17 Apr 2020 - 6:54 pm | कंजूस
आता यामधलेही फोटो दुरुस्त करा.