मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
20 Mar 2020 - 11:56 am

आतापर्यंत गड-किल्ले, लेणी, मंदिरे पाहण्यासाठी बरीच भटकंती झाली होती. पण खर्‍या अर्थाने जंगल भ्रमंती अशी झाली नव्हती. नाही म्हणायला एकदा कॅम्प कोयना आणि एकदा आंबा घाटात प्रत्येकी २/३ दिवस मुक्कामी होतो. आंबा ते विशाळगड रस्त्यावर गव्याचे दर्शनही झाले होते. सह्याद्रीतील ह्या जंगलांचा प्रकारच वेगळा. गच्च हिरवी, काट्याकुट्यांची ही जंगले. इकडील जंगलांत वन्य प्राण्यांचा वावर फारसा नाहीच. अशातच मित्राने मेळघाट जंगल बघायला जायचा विचार मांडला. मेळघाट हे अमरावती जिल्ह्यात. अभयारण्याचा भाग प्रचंड विस्तृत, सातपुडा रांगेच्या दर्‍याखोर्‍यांनी भरलेला. इकडे वाघ असूनही त्यांचे दर्शन अतिशय दुर्लभ कारण विस्तृत परिसर, असमतल जमीन , उंच पर्वत, खोल दर्‍या, खाच खळगे, विपुल झाडी. वाघांना लपायला अनेक ठिकाणं. असे असले तरी येथे अन्य वन्य पशू भरपूर, ससे, सांबार, चौसिंगा, चितळ, नीलगाय, गवे, रानडुक्कर, अस्वल, कोल्हे, खोकड, कोळसुंद, बिबटे अगदी विपुल संख्येने. मेळघाटला १९६७ साली अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली आणि १९७४ हे जंगल हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलं गेलं. मेळघाट नावातच त्याचे वैशिष्ट्य आहे. घाटांचा मेळ. मेळघाटाचा विस्तृत परिसर चार विभागात विभागला गेला आहे. सेमाडोह, चिखलदरा, हरिसाल आणि शहानूर. शहानूर विभागात सुप्रसिद्ध नरनाळा आणि धारगड हे दोन किल्ले तर चिखलदरा विभागात गाविलगड हा किल्ला आहे. मेळघाट हे शुष्क पानगळीच्या जंगलात मोडतं आणि मुख्यतः येथे सागाची दाट झाडी आहेत. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्यात हे जंगल हिरवंगच्च असतं तर उन्हाळ्यात पानं गळून गेल्यामुळे हे जंगल दाट असूनही मोकळ भासतं आणि ह्याचमुळे विविध प्राण्यांचे दर्शन सहजी होतं.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा नकाशा

आम्हा तिघा मित्रांचं जायचं ठरलं आणि १ रात्र शहानूर आणि २ रात्र कोळकास येथे राहायचे बुकिंग मॅजिकल मेळघाट ह्या संस्थळावरुन केले. मेळघाटला पुण्याहून जायचे २ प्रमुख मार्ग आहेत. पुणे-औरंगाबाद-जालना-शेगाव-अकोट-शहानूर आणि पुणे -संगमनेर- चांदवड-धुळे-अंमळनेर-चोपडा-बर्‍हाणपूर-धारणी -कोळकास - सेमाडोह. पैकी आमचा मेळघाटातील पहिला मुक्काम शहानूर येथे असल्याने आम्ही जालना-शेगाव मार्गे जायचे ठरवले. सकाळी साडेसहाच्या आसपास निघालो. वाटेत नगरच्या आसपास मिसळ आणि चहासाठी एक थांबा घेऊन साडेदहाच्या सुमारास थेट तारा पान सेंटर, औरंगाबाद. साधे चटणी पान खाऊन आणि बांधून घेऊन दुपारी १२ च्या आसपास जालन्यास पोहोचलो. जालन्यापर्यंत रस्ता एकदम चांगला आहे. मात्र त्यापुढे शेगावपर्यंत रस्त्याची दुरवस्था आहे. पुढे चौपदरी रस्त्याचे काम चालू असल्याने बर्‍याच ठिकाणी एकच लेन चालू आहे आणि जागोजागी डायव्हर्जन्स. वाटेत चिखलीनजीक एका ढाब्यावर जेवण केले आणि खामगाव मार्गे साडेतीन/चारच्या सुमारास शेगावास पोहोचलो. शेगावात एक रात्र मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी पहाटे ४ वाजता निघून शहानूरला पहाटे साडेपाचची सफारी करणे आवश्यक होते त्यानुसार भक्तनिवासात चौकशी करण्यासाठी गेलो पण खोलीसाठी वेटींग असल्याने मंदिरानजीकच्या एका खाजगी लॉजमध्ये बुकिंग केले व ताजेतवाने होऊन मंदिरात जाण्यास निघालो. सुदैवाने मंदिरात अजिबातच गर्दी नव्हती. दर्शन अगदी ५ मिनिटातच झाले. तद्नंतर वरणभात, मटकी उसळ, पोळी, शिरा असा महाप्रसाद घेतला. दर्शन घेऊन परत लॉजवर येताच शहानूर येथील वनखात्याच्या श्री. स्वप्निल ह्यांच्याशी संपर्क केला, त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील रस्ता खराब असल्याने तुम्हाला यायला वेळ लागेल, तसेच त्या रात्री इतर काही बुकिंग नसल्याने तुमच्या मुक्कामाची सोयही होईल, शिवाय वाटेत येथे जेवण्यासाठी हॉटेलं आहात, तुम्ही ९ वाजेपर्यंत आरामात याल असे समजले. त्यामुळे शेगावातील बुक केलेला लॉज लगेच सोडायचे ठरवले. रिफंड काही परत मिळाला नाही मात्र त्यावर पाणी सोडून संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शेगाव सोडले. शेगाव ते अकोट हे अंतर जेमतेम ६० किलोमीटर आहे पण सर्वच रस्ता प्रचंड खराब असल्याने जवळपास दोन तास लागतात पोचायला. वाटेत एका ठिकाणी चहा घेऊन ८ च्या आसपास अकोट येथे पोहोचलो. अकोटपासून पुढे मेळघाटाच्या पायथ्याला पोपटखेड सुमारे १३ किमी. पोपटखेडवरुन दोन फाटे फुटतात, मुख्य रस्ता आपल्याला चिखलदरा/धारणी/सेमाडोह/अमरावती अशा विविध ठिकाणी घेऊन जातो तर उपरस्ता शहानूर येथे जाऊन संपतो. शहानूर येथे वनखात्याची मुक्कामाची उत्तम सोय आहे. आम्ही तेथे एक कॉटेज बुक केली होती. वनखात्याच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करुन ९ च्या आसपास रूमचा ताबा घेतला. ५ च्या आसपास महाप्रसादाचा आस्वाद घेतला असल्याने भूक अशी नव्हतीच. वनखात्याच्या अधिकार्‍यांकडे दुसर्‍या दिवशीच्या सफारींची चौकशी केली. शहानूर गेटमधून सकाळी आणि दुपारी प्रत्येकी ४ तासाची नरनाळा-धारगड , २/३ तासाची फक्त नरनाळा किल्ला सफारी, पूर्ण दिवसाची (८ तासाची) शहानूर नरनाळा धारगड आणि इतर जंगलभाग, आणि रात्र सफारी अशा विभिन्न सफारी आहेत. मेळघाट जंगल सफारीत स्वतःची एसयुव्ही असेल तर ती घेऊन जाता येते मात्र त्यासोबत त्यांचा गाईड बरोबर घ्यावा लागतो. स्वतःची गाडी असेल तर वनखात्याचे सर्व दर धरुन साधारण १३०० रु तर वनखात्याची ओपन जिप्सी हवी असेल तर प्रत्येक गाडीमागे साधारण २५००/३००० रु. लागतात. एका गाडीत ६ लोक (वाहनचालक आणि गाईड धरुन) सफर करु शकतात. आमची गाडी जरी होंडाची मोबिलिओ ही सेमी एसयुव्ही असली तरी तिचा ग्राउंड क्लियरन्स हा कमी असल्याने शहानूर भागातील तीव्र चढउतारांनी भरलेल्या खडबडीत रस्त्यांवर तिचा निभाव लागणार नाही असे तेथीलल वनाधिकार्‍यांचे म्हणणे पडले जे खरेच होते असे दुसर्‍या दिवशी सकाळी आम्हास कळून आलेच. तेव्हा पहाटे साडेपाचची जिप्सी ठरवून आम्ही लगेचच निद्राधीन झालो. व पहाटे पाचला उठून तयार होऊन बाहेर गेटवर जिप्सीची वाट बघत बसलो. पावणेसहाला ड्रायव्हर आणि वनखात्याचा गाईड आलेच आणि आमची पहिली सफारी सुरु झाली.
a

a

नरनाळा धारगड सफारी
शहानूर गावाच्या पाठीमागेच प्रचंड मोठा असा नरनाळा किल्ला बलदंडपणे उभा आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच साधारण एक दीड किलोमीटर अंतरावरच एक डांबरी रस्ता घाटमार्गाने थेट नरनाळा किल्ल्यावर जातो. तर सरळ जाणारा कच्चा रस्ता जंगलात शिरतो. ह्या कच्च्या रस्त्यावर अतीतीव्र चढउतार आहेत. ह्याच कच्च्या रस्त्याने डोंगर चढून गेल्यावर काहीसा सपाटीचा प्रदेश लागतो. तेथे पहिले दर्शन झाले ते गव्यांचे.

a

a

a

a

a

गव्यांचा कळपाचा हा लहानसा व्हिडिओ

इथून पुढे जाताच दाट झाडीआड चितळाचे दर्शन झाले.

a

a
नरनाळा धारगड रस्त्यावर कोअर भागात एक तलाव आहे तिथे आदल्या दिवशीच वाघाने शिकार केली होती. दुर्दैवाने आमच्या सफरीत आम्हाला वाघाचे दर्शन झाले नाही.

मध्येच एका नदीकाठच्या बांधावर पक्षी बकध्यान लावून बसले होते.

a

एका उंच चढावरुन गाडी पुढे जाताच चितळांच्या कळपाचे अनोखे दर्शन झाले.

a

a

इकडून पुढे जाताच जंगलातील सर्वात क्रूर प्राणी बघायला मिळाले ते म्हणजे कोळसुंद अर्थात रानकुत्रे (इंडियन ढोल). ही जमात अत्यंत तीक्ष्ण, अतीसावध, भक्ष्याला विविध बाजूंना घेरुन पळवून पळवून दमवतात आणि जीवंतपणीच त्यांचे लचके तोडायला सुरुवात करतात. वाघही शक्यतो ह्यांच्या नादी लागत नाही. जिथे रानकुत्रे दिसतात त्याच्या जवळपास वाघ असण्याची शक्यता नगण्य असते. एका टोळीत ८ ते १० रानकुत्रे असतात. आम्हाच चार रानकुत्रे दिसले, टोळीतले बाकीचे नुकतेच पुढे निघून गेले होते.

a

a

a

a

रानकुत्रे बघून पुढे निघताच आम्ही कोअर विभागातील वनखात्याच्या गोटुल उपहारगृहात नाष्ट्यासाठी थांबलो. ह्याचे लोकेशन अत्यंत जबरदस्त आहे. चहुबाजूंनी कुंपण आहे, पाठीमागे नदी. अजून इथे मुक्कामाची सोय नाही मात्र चहा, नाष्टा मिळतो.

a
तिथे जवळपास अर्धा थांबून चहा पोहे खाउन पुढे निघालो. वाटेत असंख्य हुप्पे दिसत होतेच.

a

a
साथीला मोरही होते

a

पुढे एका माळरानावर मेळघाटाची ओळख असलेला एक सर्वांगसुंदर पक्षी दिसला तो म्हणजे नीळकंठ अर्थात इंडियन रोलर बर्ड. ह्याचे उडणे अत्यंत मनोहारी असते. निळया रंगाच्या विभिन्न छटांचे दर्शन ह्याच्या उडण्यात होते.

a

a

a

a

a
आता आम्ही धारगड बाजूने परतीच्या प्रवासास निघालो. धारगड किल्ल्यावर जाण्यास परवानगी नाही. पायथ्याला धारेश्वर महादेवाचे मंदिर आहे आणि डोंगरात असंख्य कपारी आहेत. तिथे वाघ असण्याची शक्यता खूप आहे. वाटेत आम्हाला चौसिंग्यांचा कळप दिसला. हे तुलनेने लहान हरिण आहे, मस्तकावर चार लहानशी शिंगे असतात.

a

a

a

गोटुल-धारगड रस्त्याचा लहानसा व्हिडिओ

हा घाट ओलांडून पुढे जाताच नीलगायींचा कळप दिसला

a

a

a

कुरंग वर्गातील हे सावध प्राणी सतत सभोवतालच्या हालचालींचा अंदाज घेत असतात.

a

a

a

नीलगायींचा हा कळप बघून आम्ही साधारण साडेदहापर्यंत शहानूरच्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. आता दुपारी ३ च्या सुमारास जायचे होते नरनाळा किल्ला बघायला आणि रात्री वेध लागले होते मचाणावरील मुक्कामाचे, त्याविषयी पुढील भागात.

क्रमशः

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Mar 2020 - 12:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

वल्ली लेणी सोडून इतरही भटकंती करतात हे वाचून आनंद झाला.
इथेही कोणी दर्पणसुंदरी भेटली का?
पुभालटा..
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

20 Mar 2020 - 2:21 pm | प्रचेतस

धन्यवाद माऊली.
इथल्या रानात सांबार, चितळ, नीलगाई अशा सुंदर्‍या भेटल्या फक्त :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2020 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार, लेख चाळला. काही फोटो दिसत नाहीत. परमिशनचा घोळ असावा असे वाटते.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

20 Mar 2020 - 1:10 pm | प्रचेतस

गूगल फोटोजला पब्लिक अल्बम करायचा ऑप्शन मिळत नाहीये. तुम्ही बहुधा तुमच्या गूगल अकाउंटने लॉगिन केलं तर सर्व फोटो दिसू शकतील असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2020 - 1:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>गूगल फोटोजला पब्लिक अल्बम करायचा ऑप्शन मिळत नाहीये.
बाकीच्या फोटोंना जसे ऑप्शन मिळाला तसे प्रयत्न करून, सर्वांना फोटो दिसेल असा प्रयत्न करावा. होतो थोड़ा त्रास पण ते योग्य राहील असे वाटते.

>>>तुम्ही बहुधा तुमच्या गूगल अकाउंटने लॉगिन केलं तर सर्व फोटो दिसू शकतील असे वाटते.

सर्वांना फोटो दिसले पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करावेत.मला फोटो दिसावेत म्हणून मी असे कोणतेही व्यक्तिगत प्रयत्न करणार नाही. क्षमस्व.

-दिलीप बिरुटे
(स्पष्ट)

आता बघा बरं सर, फोटो दिसायलाच हवेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2020 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेळघाट ट्रीपचे फोटो आता दिसत आहेत. योग्य दुरुस्तींबद्दल सर्वप्रथम आभारी आहे.

प्रतिसादात वर उल्लेख आला तसा आपणास केवळ गड किल्ल्यांचेच वेड नाही तर अभयारण्य आणि तत्सम भटकंतीची आवड दिसते हे धागा पाहुन बरे वाटले. पहिल्या भागातील वर्णन छान. फोटोही अतिशय सुरेख आलेत. तुमचं फोटोचं कसब उत्तम आहे, हे सांगितलंच पाहिजे. मेळघाट ट्रीपमधील शहानुरचा प्रवास झकास. काही फोटोमागे जे ब्लर करुन फोटो अधिक स्पष्ट आलेत ते खूप आवडले. गवे, चितळ, मोर, रानकुत्रे (डेंजर वाटले) हरीण, मोर आणि सर्वात आवडले ते नीळकंठचे फोटो. झकास. नीलगाई पण मस्त आलेत. बाकी ते हुपे आमच्याकडे लै मरणाचे आहेत. अजिंठ्याच्या डोंगररांगा आणि परिसरातील पाणी आटलं की हे हुपे गावात येतात आणि पाण्याच्या टाकीचे झाकण फोडून पाणी पितात. रुम मधे घुसतात तो वेगळा विषय.

बाकी, व्याघ्रप्रकल्पात पुढील भागात वाघाचे दर्शन होईल असे वाटते. तुम्हा सहकार्‍यांचा एखादा फोटो टाकायला हरकत नव्हते, असेही वाटले. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

ता.क. अजून ते व्हीडीयो पाहिले नाहीत, ते पाहून खरडवहीत कळवीन. फोटो काढतांना ते कॅमेरा, शटर, स्पीड अशी काही माहिती दिली तरी एक वाचक म्हणून माझी हरकत असणार नाही.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

23 Mar 2020 - 6:17 am | प्रचेतस

साधे फोटो काढलेत हो, शटर स्पीड वगैरे काही वापरलं नाही.

हे अभयारण्य पर्यटन सुरू केलंत ते छान.
-------------
>>>गूगल फोटोजला पब्लिक अल्बम करायचा ऑप्शन मिळत नाहीये. >>>> आँ? इकडे मोबल्यातून होतंय आणि तुम्हाला नाही सापडत? (( मी फायरफॉक्स ब्राऊजरने वेबसाइटने photos dot google dot com वापरतो. , शिवाय मोबल्यातले जीमेल अकाउंटने लॉगिन करत नाही. फोटो डिलीट होत नाहीत.))

प्राणी फुकट दिसत नाहीत, खटपट करावी लागते. कधीकधी हॉटेलच्या बुकिंगवर पाणी सोडावे लागते. हे अमच्या बजेटात बसत नाही म्हणून अभयारण्यांकडे फिरकत नाही.
(स्पष्ट)
--------
बाकी औरंगाबादला कोणकोण भेटलं?

सध्या अभयारण्यांचे प्रवेश दर खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. खरेच परवडत नाही हे. ताडोबाची एक सफर (कमीत कमी ४ सफारी) करायची तर ४ जणांमध्ये मिळून ५०००० लागतात.

बाकी औरंगाबादेस कुणीच भेटलं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2020 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पन्नास हजार रुपये लागतात ? बाप रे...! आपल्यासारख्या समर्थ लेखकांचे वर्णनात आमचं समाधान होतं.

बाकी औरंगाबादेस कुणीच भेटलं नाही.

जब किसी से कोई गिला रखना,
सामने अपना आईना रखना,
मिलना जुलना जहॉ जरुरी हो,
मिलने जुलने का हौसला रखना.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

23 Mar 2020 - 6:19 am | प्रचेतस

व्याघ्र पर्यटन हल्ली खूपच ग्लॅमराईझ झाल्यामुळे प्रचंड महाग झालंय. एका ओपन जीप सफारीलाच किमान ४००० रु लागतात आणि अशा ४/५ होत असल्याने ते महागच होत जातं .

आहा. अतिउत्तम. कितीतरी प्राणी पक्षी दिसले तुम्हाला. नशीबवान आहात. पुभाप्र..

कंजूस's picture

20 Mar 2020 - 4:00 pm | कंजूस

फोटो दिसले.
आता तुमच्या डोळ्यांनी पाहू अभयारण्ये.
सगळे फोटो आवडले.

प्रशांत's picture

20 Mar 2020 - 5:38 pm | प्रशांत

सर्व फोटो आवडले

आदेश007's picture

20 Mar 2020 - 8:46 pm | आदेश007

वल्ली शेठ,

सुंदर लेख आणि फोटो. रान कुत्र्यांचे फोटो बघून नागझिरा अभयारण्यात त्यांनी सांबराची केलेली शिकार डोळ्यांसमोर आली. फक्त १५ मिनिटात त्यांनी सांबर फस्त केले होते.

पुढील वर्णनाच्या प्रतीक्षेत. धन्यवाद

प्रचेतस's picture

23 Mar 2020 - 6:20 am | प्रचेतस

नागझिराचं २५ एप्रिल ते २९ एप्रिल बुकिंग केलं आहे. आता करोनाच्या पार्श्वभूमीवर जाता येतंय का नाही ते सांगणं कठीण झालंय.

नागेश्वर (चिपळूण - चोरवणे - कोयना अभयारण्य -वासोटा) इथे चोरवणेकडून गेलो होतो. मला सर्वांनी घाबरवले - अस्वलं, गवे आहेत. पण कुणीच दिसलं नाही. एखादा वाघ उरला आहे. अस्वलांसाठी पाणवठे बांधले आहेत व जवळच खाण्याकरता फळे वगैरे वनखात्याचे लोक ठेवतात. अस्वलं तिथेच घुटमळतात व दुसरीकडे जात नाहीत. पुन्हा एकदा जायचा विचार आहे.
(चोरवणेकडून कुणी अडवत नाही आणि कोयना जलाशय पार करावा लागत नाही.)

प्रचेतस's picture

23 Mar 2020 - 6:22 am | प्रचेतस

कोयना चांदोली रिजनमध्ये अस्वलं खूपच कमी झालीत. गवे आहेत पण ते ही ऐन धारेवर नाहीत.

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2020 - 12:57 pm | चौथा कोनाडा

वाह, सुंदर भटकंती ! प्राणी-पक्षांचे अप्रतिम फोटो ! (आपण तर गव्यांच्या फोटोवर फिदा)
तपशील दिल्यामुळे वर्णन ही खासच !
बऱ्याच दिवसांनी प्रचेतस याचा धागा आल्या मुळे करीनाकल्लोळावर मस्त उतारा मिळाला !

नागझीऱ्या सहलीची वाट पाहतो. तोपर्यंत करोना संपू दे. ब्याकड्रापमध्ये सोनेरी गवत छान दिसते.
(( Photo metadata viewer app by syrupy तुमच्या फोटोचे exit/metadata दाखवते. ते नोटमध्ये शेअर करून कॉपी पेस्ट करता येईल. तशी बरीच apps आहेत. डिटेलमध्ये gps ही देतात. Modify file चा नाही दाखवत.))

कंजूस's picture

23 Mar 2020 - 2:49 pm | कंजूस

ओडिओ सुद्धा घ्या.

दुर्गविहारी's picture

24 Mar 2020 - 8:56 am | दुर्गविहारी

अतिशय सुंदर माहिती आणि तितकीच अप्रतिम छायाचित्रे ! पुढील भाग लवकर पोस्ट करा. उत्सुकता वाढली आहे.

चौकटराजा's picture

24 Mar 2020 - 1:06 pm | चौकटराजा

आजच परण्डा किल्याचा एक व्हिडिओ पाहिला. सध्या होम स्टे मुळे एकूणच भारतातील किल्ले ( पडके असले तरी प्रेक्षणीय ) यांचे विडिओ पहाण्याचा सपाटा लावलाय ! आताच चित्रदुर्ग पाहून झाला. त्यात वल्ली बुवांची ही डोळ्याचे पारणे फेडणारी भेट ! मस्त वृत्तान्त व फोटो ! काही अगदी एन जी मधे यावेत असे ! अनेक वर्षापूर्वी केलेल्या ननद्कानन सफारी ची आठवण या निमित्ताने आली .

अनिंद्य's picture

27 Mar 2020 - 2:23 pm | अनिंद्य

फोटो छान आलेत, सोनेरी गवताच्या बॅकग्राऊंडवर प्राणी उठून दिसत आहेत.
पु भा प्र

किल्लेदार's picture

5 Apr 2020 - 5:07 am | किल्लेदार

छान...
पुभाप्र ...

आपल्याकडे मोकळेपणाने फिरता येण्यासारखी जंगलं कमीच. त्यातलं एक मेळघाट. पाच-सहा वर्षांपूर्वी पेंच प्रकल्पाला भेट दिली होती ते काही दिवस जंगलात मुक्काम करावा या हेतूने. पण तिथला "बाजार" बघितला आणि सरळ दुसऱ्या दिवशी अमरावतीची बस पकडली आणि तिथून मेळघाट गाठले. पाच दिवस कोलखास मधल्या फॉरेस्ट रेस्ट हाऊस मध्ये निवांत गेले. रानगवे भरपूर दिसले.

नरनाळ्याचेही फोटो येऊ द्यात. फार पूर्वी बघितला होता. त्या वेळी डिजिटल कॅमेरे नसल्यामुळे फोटो फार काढता आले नाहीत. किल्ल्यावर पायी भटकंती केल्यामुळे थोडे बिचकायलाही होत होते कारण नरनाळा जंगलाच्या ऐन सीमेवर आहे.

प्रचेतस's picture

5 Apr 2020 - 12:05 pm | प्रचेतस

धन्यवाद.
पेंच, ताडोबा बाजारीकरण झालंय पूर्ण. मेळघाट अजूनही खूप अस्पर्श आहे. कोळकाजचे फॉरेस्ट गेस्ट हाऊस तर जबरदस्त. आम्ही तर इंदिरा गांधी ज्या खोलीत राहिल्या होत्या त्याच खोलीत होतो.

जेम्स वांड's picture

8 Apr 2020 - 1:02 pm | जेम्स वांड

उत्तमच मेजवानी मांडलीत, काय पण निसर्ग दाखवला देवा आनंद झाला. खासकरून ती रानकुत्री उर्फ कोळसुंद उर्फ धोल पाहून फारच मजा आली. मी आजवर काही अशी जंगलं वगैरे फिरलो नाहीये पण तुमच्या धाग्याने ते करायची एक आग लागली आतमध्ये. त्यातही आता मेळघाट तर बादली जंत्रीत सर्वात वर पडलं!. विदर्भात अजून काय काय आहे बघण्यासारखे ते पण जरा अजून विस्तृत येऊ देत.

प्रचेतस's picture

8 Apr 2020 - 4:22 pm | प्रचेतस

मेळघाट सोडून विदर्भ अजून काहीच पाहिला नाही, खरं तर आता २५ एप्रिलला नागझिरा प्लान होताच, त्यात रामटेकची प्राचीन मंदिर, बौद्ध स्तूप हे देखील करणार होतो पण आता ते सगळं रद्द.