भाग ४ प्रतापगडाची_उलटलेली_बाजी -अफ़झलखान निघाला विजापुरहून …

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
14 Mar 2020 - 6:38 pm
गाभा: 

अफ़झलखान निघाला विजापुरहून …

भाग ४

विडा उचलला

बडी साहेबीणनी अफ़झलखानाला विजापूरच्या राजवाड्यात खलबतखान्यात बोलावून घेतले. 'आम्ही तुमची शिवाच्या बंदोबस्ताच्या मोहिमेवर नेमणूक करत आहोत. आपल्याला कोण हवे ते सरदार, जनावरे, पैसा अडका, वगैरेवर विचार करून खर्चाचा अहवाल सादर करा. तो आम्ही मंजूर करू. बशर्ते सिवा जिंदा दरबारमधे घेऊन या. किंवा त्याची लाश आमच्या हवाले करा. कामाला लागा.' असा आदेश दिला.' मला सरदारांशी बोलून कारवाईचा आराखडा मंजूर करायला वेळ द्यावा.' त्या प्रमाणे सर्व तयारी झाल्यावर दरबारात अफ़झलखानानाने विडा उचलून मोहिमेची जबाबदारी स्वीकारली. सैनिकी आवेशात,' हे काम मला दिलेत म्हणजे फत्ते झाले आहे असे समजा' असे हात वर करून आश्वासन दिले.

अफ़झलखानाची स्वतःची सेना मे शेवटच्या आठवड्यात म्हणजे सन १६५९ च्या तारीख २५ सुमारास विजापूरहून निघायला *८ किमी दूर तोरवीला सज्ज झाली. नंतर जागोजागी किल्लेदार, सरदार आणि त्यांच्या सैन्याला समावेत घेत विजापूरहून (विजयापुरा)निघाली.
जेंव्हा निघाली तेंव्हा ती **१० हजार घोडदळ होते व त्या समावेत खानपानसेवा, तंबू, डेरे वाहक, जनावरांच्या देखरेखीचे नोकरवर्ग, किरकोळ सामान, कापड, दागिने व्यापारी, बाजार बुणगे ***अंदाजे १५ हजार होते. वाटेत मिळालेल्या सैन्यात पायदळ प्रामुख्याने होते.
*राजधानीत सैन्याला असे मोठ्या संख्येने संचलन करायला मनाई असते. कदाचित बंड करून सत्ता काबीज करायचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणून राजधानीबाहेर मोकळ्या जागेत सैन्याला एकत्र जमवून वाजत गाजत जायचा संकेत असतो. आठवत असेल, इजिप्तमधे कैरो राजधानीत संचलनाच्या बहाण्याने अन्वर सादात यांची हत्या करण्यात आली होती.
** याला टीथ टू टेल रेशो मधून पहावे लागेल. हवाईदलात एका विमानाच्या सॉर्टीला पूर्ण करायला २० जणांचे हात असतात. असे मानतात.
*** अशा संख्या गणिताच्या भाषेतून न मानता ढोबळ मानाने पहाव्या लागतात. सध्याही एखाद्या फ्लाईंग स्क्वाड्रनच्या विमानांची संख्या त्यातील मेनटेन्ससाठी, मिशनमधे दुसऱ्या एयरफिल्डवर तैनात केलेल्या, वगैरे वगळता कमी न मोजता केली जाते. तसेच सुट्ट्या, आजारी रजा, नवे कोर्सेस करायला गेलेले हे वगळता मनुष्यबळ कमी जास्त होत राहते.

विजापुर ते पंढरपूर मार्ग

तिथे वेगवेगळ्या सरदारांच्या सैन्याचे जथ्थे एकामागोमाग एक लावले गेले. मूसाखान, अंबरखान, याकूतखान, हसनखान वगैरे पठाण गटातील बड्या सरदारांचे हत्ती, उंट आपापल्या सैन्याच्या निशाणांच्या रंगीत पताकाधारींच्या मागे होते, यांच्या पाठोपाठ अफ़झलखानाचे खासे पथक खानाच्या शानदार हत्तीच्या मागे मागे लगटून होते. नंतर रणदौलाखानचा (Sr) मुलगा (धाकटाJr), रहमतखान उर्फ रुस्तम ई ज़मान हे दख्खन (शिया) गटाचे, सिद्दी हिलाल व अन्य सिद्दी गटाचे सैन्य लावले होते. मराठा गटातील नाईक पांढरे, नाईक घोरपडे, खराडे, मंबाजी भोसले, कल्याणजी जाधव, काटे, घाडगे सरदारांची फौज भाषेच्या गरजेचे प्रमाणे पुढे मागे होत राहिली. सगळे रस्तारुंदी प्रमाणे घोळक्याने जात होते. लष्करी परेडची शिस्त, आखीवपणा नव्हता. कोणाही सैनिकाला ठराविक असा पोषाख नव्हता. जो तो आपल्या घरच्या मळखाऊ कपड्यात हजर असे. डोक्याला मात्र प्रत्येकाच्या काहीना काही बांधलेले असे. त्यावरून तो उझबेगी आहे का इराणी किंवा तुर्क का पश्तूनी कबिल्यांचा आहे ते साधारण कळून येत असे. यासर्वांना ‘पठाण’ म्हणून सरसकट म्हटले जात असे. पण त्यांची आपापसात भांडणे, मारामाऱ्या होत तेंव्हा ते शिव्या देताना आपण ‘खास’ कोणत्या कबिल्याचे ते कळून येई!

विजापूरहून निघताना पंढरपूर पर्यंत जाता जाता आपल्यातील कडव्या सरदारांनी ठरलेल्या मार्गातून दूरच्या बाजारपेठा, मंदिरे, नदीच्या काठावरील सधन गावे, कसबे, यावर हल्ला करून नासधूस करून मंदिरातील, पेठांतील संपत्ती हस्तगत करावी असे आदेश होते. मुस्लिम धर्मातील कलमे न आचरणाऱ्यांवर धाक दाखवून त्यांच्याकडील वास्तू, मूर्तींना विद्रूप करून दगडात देव (अल्ला) नसतो. असे बिंबवण्याचा प्रयत्न करत पुढे जायचे असे ठरले होते. अफ़झलखानाला पूजास्थानांची, मंदिरांची नासधूस करण्यात इतका रस असता तर त्याने फक्त त्यासाठी वेगळी मोहीम करून तसे जास्त प्रभावीपणे केले असते. पण आपण भरपूर सेनेसह आदिलशाहाच्या हुकुमाने कामगिरीवर निघालो आहोत हे गावोगावी कळवायला हा सोपा जाहिरात करायचा सैनिकी राजकारणाचा डाव होता.

मंगळवेढ्याहून सैन्य पाठवून सोलापूर, तुळजापूरला लुटले.

पंढरपूरच्या वाटेवर अफज़लखानाने मंगळवेढ्याला तळ पडल्यावर आधी ठरल्याप्रमाणे काही कडव्या पठाण सरदारांना तुळजापुरला जायची आज्ञा केली. त्यांनी वाटेत (सोलापूर) संदलापुरला किल्यातून रसद मिळवली. सिद्धेश्वराच्या मठात धुमाकूळ घातला व ते पुढे निघाले. तुळजापूरच्या बाजार पेठेत सैनिकांना नासधूस केली. भवानी मंदिराची व मुख्य मुर्तीची विटंबना करत मंदिर परिसरातील व्यावसायिकांना, पुजारी - भोपे यांना सतावून, धन वसूली करून ते पंढरपूरला खानाच्या ताफ्यात सामिल झाले. या दहशतीची बातमी ‘सिवा’च्या कानावर पोहोचेल अशासाठी काही मराठा हलकाऱ्यांना ढोल, तुताऱ्यांसह गावा-गावातून जाताना दहशतीचे वातावरण तापवायला पाठवून दिले.

अफ़झलखानाचा फौजफाटा विजापुरहून १४० किमी पार करून पंढरपुराला पडावाला आला. त्याने आपल्या देखरेखीत विठ्ठल मंदिराचा ताबा घेतला. व्यापारी, गाभाऱ्यातील पुजारी - बडवे, उत्पात यांच्या कडून छबीन्याच्या चाव्या घेऊन ते साफ केले गेले, सराफ, अन्य धनिकांकडून बऱ्याबोलाने वसूली केली. मंदिराची मुख्य मुर्ती हाती न लागल्याने काहींना जिवे मारून व धमकावून शोधायचा प्रयत्न केला. त्याचे सैनिकी ध्येय लढाईचे असल्याने तुळजापूरहून सरदार लूट घेऊन सुखरूप परत येत असल्याची बातमी ऐकून त्याचा पुढचा टप्पा सुरु झाला.

तोपर्यंतच्या हेरांकडून काढलेल्या बातम्यावरून सिवा कुठे लपायचा प्रयत्न करेल यावर मधून मधून आपल्या बरोबरच्या सरदारांशी मसलत करून होता. माळशिरस, फलटण, लोणंद जेजुरी, सासवड मार्गे पुरंदर किल्ल्याला जायची वाट कमी चढउतारांची, सोपी होती. असे या भागातून आधीच्या लढ्यात भाग घेतलेल्यांचे मत पडले. साधारणतः दररोज १० किमी या संथ वेगाने १० ते १२ जून पर्यंत पंढरपुरानंतरचे अंतर कापत सैन्य जत्था जात होता. त्यातील टेहळणी पथक सुरक्षिततेचा आढावा खानाला सादर करत होते. वाटेत लागणाऱ्या गढ्यांतील शेतसाऱ्यातून मिळालेले धान्य, वैरण वापरून सैनेच्या खाण्याची सोय लावली जात होती. घोडे, उंट, बैल यांना चरायला सोडले जाई तर हत्तीसाठी गवताचे भारेच्याभारे, कणकेचे जाड जाड रोट खायला तयार करायला खानसाम्यांना जुंपले होते. आसपासचे गाव-पाटील, कुलकर्णी आपापली हजेरी लावून त्यांच्या तैनातीतील बारगीरांची वर्णी खानाच्या सैन्यात लावायला पुढाकार घेऊन होते. हळू हळू सेनेचा आकार फुगत राहिला.

हेरांच्या बातम्यानुसार पुरंदरच्या आसपास सैन्याची जमवाजमव होत नसून तिथले सैन्य हलवून राजगडाकडे जात आहे. पावसाळ्यात जंगलातील किल्ल्यात लपून राहायला सिवा ठरवत असावा. खानाच्या अनुभवानुसार सिंहगड किंवा राजगड, तोरणा यापेक्षा जास्त सिवा प्रतापगडाला सटकायची शक्यता जास्त आहे. असे विचारांती ठरले आणि मार्ग बदलून म्हसवड, दहिवडीच्या वाटेने सैन्य पुढे जाऊ लागले.

मसलती आणि मनसुबे

जंगलातील किल्ल्यावर जायला लागले तर वाईच्या आपल्या परगण्यात पावसाळ्यात राहायची सोय करायला बरे पडेल. शिवाय (बत्तीस)शिराळे मुकासा आपल्या ताब्यात आहे. तिथले सैन्य आपल्या कामाला येईल. आदिलशाहीकडून नेमलेल्या पन्हाळ्याच्या किल्लेदारावर जरब बसवून आपला पित्त्या किल्लेदाराला नेमून आपल्या मुलांना पुढेमागे तिथे नेमून नवी राजधानी करायला शक्य होईल असा त्याचा विचार होता. आपल्या माहितीतील बरेच हाताखालचे वाईतील हुशार, अनुभवी रहिवासी, अन्य लोक मदतीला असतील. सिवाला वाटाघाटीला बोलावण्यातून पुढील चाल ठरवायला सोईचे होईल. सिवाला पकडून नाहीतर मारून त्याचे प्रेत आदिलशाहच्या दरबारात पाठवले की अ़बेनळीच्या घाटातून पोलादपूरला कोकणात उतरून चौलचा (मुर्तजाबाद)आपला मुकासा मधल्या मुलाच्या ताब्यात राहील. बडा बेटा फाज़लखानाला दाभोळच्या बंदराला असलेली आपली जहाजे व इलाखा सुपूर्त करून निजामशाहीतील सिवाने लाटलेले कल्याणचा (मुरंजन) मामला, भिवंडीचा (इस्लामाबाद) मुकासा गढ्या, किल्ले आपल्या सरदारांकडून ताब्यात घेतले जातील. फिरंगींना कामाला लावून नवी जहाजे, गुराब यांचे पलटन तयार करून आपला दबदबा इतका तयार होईल की त्या नंतर पुढच्या ६ महिन्यात अली अदिलशाहला उडवून आपल्याला विजापुरात बस्तान बसवता येईल. औरंगजेबाविरुद्ध आग्र्यात बंदी शहाजहानने पुन्हा लढाई सुरु केली तर त्याची बाजू घेऊन आपले मुगलांशी संबंध सलोख्याचे राहतील.
खानाला पुढचे मनसुबे फक्त मनरंजन न राहता सत्यात उतरवायची शक्यता होताना दिसत होती.

त्याच्या मते सिवाने आपणहून एका गडावर लपून राहून चूक केली. वाईच्या पर्यंत येताना त्याने आपल्या सैन्याच्या जत्थावर वारंवार हमले करायचे सोडून दिल्याने त्याच्या बाजूच्या सरदाराचे मनोधैर्य खचून ते आपल्याकडे यायला उत्सुक होतील. पावसाचा जोर कमी झाला की देशावरील सिरवळ कोट मुकासा, बारामती मुकासा, इंदापूरचा कोट, चाकन किल्ला, लोहगड, जुन्नर, संगमनेर पर्यंत आपले सैन्य पाठवून सिवाला तिकडे जायला शक्य होणार नाही. फार करून सिवा सैन्यासह कोकणात पळून जाईल. दंडाराजापुरीचा सिद्दीमुळे त्याला कोकणातील पट्टीत खालून वरून दाबुन मारता येईल. इतके कष्ट करण्यापेक्षा सिवाला ‘तुला तुझ्या बापाने दिलेल्या मुलुखापेक्षा जास्त मुलुख ‘मुगल शहाजहानशी वाटाघाटीत देऊ असे गोडीगुलाबीने पटवून, एकटा पाडून त्याना खतम करायची संधी यावी यासाठी तो उत्सुकतेने ही मोहीम पावसाळ्यानंतर संपायची वाट पहात होता.

वाटेतील निंबाळकराला चेचले

म्हसवडपाशी खानाने शंभू महादेवाच्या डोंगर शिखरावरच्या देवस्थानला वाट वाकडी करून जायला आपल्या तिखट सरदारांना सैन्य देऊन पाठवले. तो स्वतः दहिवडीला पोहोचून तिथून मलवडीला गेला. तिथे त्याने सिवाच्या जवळच्या नातेवाईकांना त्रास देऊन त्यांना आपल्याकडे ओढायचे तंत्र वापरले गेले.

बजाजी नाईक निंबाळकरांची बहीण, संभाजी महाराजांची आई, सईबाई महाराजांची पत्नी होती. आदिलशाहीतील शहाजी राजेंच्या बरोबर असलेल्या घरोब्यातून सोयरिक केली होती. शहाजीराजांच्याशी वैयक्तिक वैरामुळे एका दगडात दोन पक्षी या न्यायाने, फलटणहून अपमानास्पद वागवत मलवडीला खानाच्या डेऱ्यात त्यांना नेऊन उभे केले. 'बजाजी नाईक, तू आतून सिवाला मदत करतोस? ' 'खरे सांग, नाहीतर तुला हत्तीच्या पायी देतो!' 'तू शपथ वाहा, की तू आमच्या बाजूने आहेस? नाहीतर तुझा सुन्ता करून मुसलमान करीन' ! खानाच्या सैन्यात इतके मराठा सरदार असले तरी फक्त बजाजी नाईक निंबाळकरांवर अशी आफत का यावी? राजकीय डावपेच म्हणून बजाजीला मोहरा बनवून सिवाला डिवचून ठेवून त्याचे भविष्यात देखील असेच होईल असे मनात भरवून देण्यात आले. बंगलोरला बसलेल्या शहाजी राजांना मुलाच्या मदतीला आला तर तुम्हाला, तुमचे जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराला नामशेष करून टाकले जाईल असाही तो संदेश होता.

निढळवरून जाताना खटाव सारख्या आडगावातील किल्ल्यात आपण यावे यासाठी तिथले पाटील, चौगुले, कुलकर्णी प्रयत्न केले होते, तिथे कोटात मुकासदार म्हणून खानाचा सत्कार करण्यात आला. सैन्य बंदोबस्तात दिले गेले. सिवाच्या बंदोबस्तानंतर अफ़झलखान सर्वेसर्वा होणार हे धडधडीत दिसत असल्याने वाटेतले सराफ, धनिक विक्रेते, मंदिरातले पंडित पुजारी, आसपासहून मुद्दाम येउन आपल्याकडून आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी धडपडत होते. जो जिंकेल त्याच्या बाजूने जयजयकार करणारे नोकरदार आपल्या निष्ठांना बदलत्या ठेऊन जीवनयापन करत होते. औंधच्या यमाईच्या डोंगरावरून दिसणार्‍या दूरवरच्या प्रदेशावर नजर टाकून खान आपल्या मनासारखे चालले आहे. यात समाधानी होता.

डोंगरांच्या कुशीत, शिखरावर चढून हे काफिर लोक गोल दगडावर पाणी घालून, जेजुरी, यमाई, भवानी, सारख्या देवळात जाऊन जाऊन मी मरायसाठी का मन्नत मानतात हे त्याला पडलेले कोडे होते!

वर्धनगडावर गडकऱ्याने खानाची भोजनाची बडदास्त सन्मानाने केली नाही हे त्याने लक्षात ठेवून आपल्या वाकनवीसाला, 'सांगा त्याला, आम्ही खूष नाही झालोय. पुन्हा इकडे जाणे होईल तेंव्हा कुचराई महागात पडेल!' असा दम द्यायला आज्ञा केली.

जेंव्हा उच्चपदाची नशा चढते तेंव्हा अहंकार फुगत जातो. सगळे तुच्छ वाटायला लागतात. इतरांच्या सल्ल्याची गरज वाटत नाही. एक सोपस्कार म्हणून सरदारांशी मसलत करायला लागते. पण शेवटी मी ठरवीन तेच होईल अशी मानसिकता होते. महान व्यक्तींना याच रोगाची लागण होते मग त्यांना मृत्यू शिवाय पर्याय नसतो!

अफ़झलखान आपल्या सैनेच्या जत्थासह पोहोचला वाईला…

जून महिन्यापासून पावसाचे ढगाळ वातावरण सगळीकडे पसरले होते. खानाने आपल्या सैन्यातील सरदारांना आपापले तंबू, जनावरे यांना घेऊन कोरेगावपासून पुढे पुढे जायला आज्ञा केली होती. भाकरवाडी, शिवथर, मर्ढे, पाचवड करत ते वाईच्या कृष्णा नदीच्या पात्राला मिळणाऱ्या ओढ्याच्या मागील जागेत पुर्वीपासूनच्या तयार गढीच्या आसऱ्याने तळ ठोकून राहायला लागले.

खानाच्याकडील छप्परबंद नोकरचाकरांनी खानाच्या शानदार राहण्याची सोय लागेपर्यंत खानाने रहिमतपुरात आपल्या मित्राच्या कोटात राहायला पसंत केले.

बड्या रणदुल्लाखानाला अफ़झलखान मानत असे. त्याच्या पश्चात वाईचा मुकासा (जहागीरदारी) अफ़झलखानाला मिळाला होता. जरी खान वाईला रहात नसला तरी त्याचे लक्ष सदैव वाईच्या राजकारणात असे. जावलीचा चंद्रराव मोरेवर त्याचा वरदहस्त होता. खोपडे भावातील भांडण सोडवण्यासाठी स्थानिकांना मध्यस्ती करायला लावून खोपडेला सिवाकडे जायला नको म्हणून प्रयत्न केले होते. मरहूम रणदुल्लाखानाचा मुलगा धाकटा रुस्तुम ई जहान उर्फ रहिमतखानाने बापाच्या नावाने कबर बनवल्यावर आधीच्या कुमठे(बु.) गावाचे नाव रहिमतपुर झाले. वाईला अफ़झलखान येत आहे म्हटल्यावर त्याच्याकडून गढीतील नोकरवर्ग दिमतीला दिला गेला. खावे, प्यावे, कला अदाकारांशी मौज मजा करत त्याचा श्रम परिहार केला जात होता. खानाला आपले नाव गावाला द्यायची हौस आहे हे जाणून रहमत खानाने चापलुसीची खेळी केली. रहिमतपूरला 'अफ़झलपूर' असे नवे नाव दिल्याचे घोषित केले. आदिलशाहच्या दरबाराकडून संमतीचा दर्शक सही सिक्क्याचा आदेश येण्यासाठी एक हलकारा पाठवला. खानाचे प्रस्थ वाढत आहे. त्याचा आपल्या गादीवर डोळा असू शकतो असा संदेशही गेला. वाईचा कोट सज्ज झाल्यावर खान रहिमतखानाला व त्याच्या सैन्याबरोबर घेऊन कोरेगाव-पाचवड करत वाईला १६५९ जुलैच्या १० तारखेपर्यंत पोहचला.

पावसाची रिपरिप, कृष्णा नदीच्या पात्रात आलेल्या पुराच्या पाण्याकडे पहात तो चुटक्या वाजवत काहीतरी धोरण आखत होता.

सिवा प्रताप गडावर आल्याच्या बातम्या ऐकून त्याने वाई गावातील अनुभवी कृष्णाजी भास्कर कुलकर्णींना बोलावून त्यांच्यावर कितपत विश्वास दाखवावा यांचा विचार विमर्ष आपल्या सरदारात केला. आणि पावसाळा संपायच्या आधी सिवाशी सामोपचाराने काय बोलावे? अटी काय लादाव्यात? कुठे भेटायला बोलवावे? कृष्णाजी भास्करवर सतत लक्ष ठेवायला कोणाला बरोबर जाऊ द्यावे? वगैरे चर्चा सुरू केली.

नकाशावर प्रत्यक्षात वाईचा कोट, आणि गढीचा भाग सध्याच्या संदर्भात कसा दिसतो?

{अधिक माहिती - *साधारणपणे घोड्याला ६ किलो गवत व ६ किलो इतर अन्न धान्य लागते तर माणसाला एक किलो अन्न लागते असा ढोबळ अंदाज बांधला तर १० हजार सैन्यास एक घोडीस्वार असतील असे धरले तर ७०मेट्रिक टन धान्य रोज लागेल. शिवाय हत्ती, उंट बैल इतर प्राणी व फौजेतले बाजारबुणगे पाहता अशा फौजेची धान्याची गरज दररोजची १०० मेट्रिक टन होत असावी. याशिवाय गवत वेगळेच! असे ३० हजारापेक्षा जास्त सैन्य आणि अवांतर नोकरचाकरांची संख्या असेल तर कितीच्या काय गणित जाईल?
संदर्भ - गजानन मेहेंदळे लिखित श्री राजा शिवछत्रपती भाग १ पान ४०३. }

……
पुढे चालू...

प्रतिक्रिया

अफझल खान हालला एकदाचा!
संपूर्ण वाचून लिहीन नंतर...

Rajesh188's picture

14 Mar 2020 - 8:05 pm | Rajesh188

मला त्या वेळच्या लोकांचे नेहमीच कौतुक वाटत.
आता ची वाई आणि परिसर ह्याचा विचार करून अंदाज केला तर वाई आणि बाजूची गाव ह्यांची लोकसंख्या १० हजाराच्या आताच असेल.
मग एवढ्या मोठ्या सैन्याला अन्न धांन, गवत,आणि बाकी गरजेच्या वस्तू वाई आणि त्याच्या बाजूची गाव पुरवू शकत नाहीत.
वाई पासून प्रतापगड जायचे झाले आणि कोणत्या ही मार्गाने जायचं झाले तरी डोंगर
चढून जण्या शिवाय पर्याय नाही. आता रस्ता
आहे त्या काळी असेल अस वाटत नाही.
मग हत्ती,बैलगाड्या आणि सैन्य साठी लागणारे प्रचंड सामान ते पण पावसात (त्या भागात प्रचंड पावूस पडतो)कसे घेवून गेले असतील.
आणि छत्रपती न कडून युद्ध नीत्ती म्हणून अनंत अडधले निर्माण केले असतील .
हे सर्व पार करून प्रताप गड ला पोचणे tas अवघडच.

माझ्या माहितीनुसार खानाला खाली येता यावे म्हणून मुद्दाम रस्ते बनवले गेले. जावळीमध्ये घुसणे तितके सोपे नव्हते.. प्रतापगड अगदी जावळी खोऱ्यात येतो का कल्पना नाही, पण तो तितकाच दुर्गम आहे.. परंतु पायी अंतर पाहिले हवाई मार्गाने तर सैन्यासकट पण 4-5 दिवस पुरत असतील.

हे रस्ते खान खाली उतरल्यावर बंद केले असे वाचल्याचे देखील आठवते.

वाई वरून प्रतापगड ला जायचे असेल तर जावळी खोर लागतच नाही .
डोंगरांच्या पायथ्या शी पसरलेले जावळी खोर .
आणि प्रताप गड चा रस्ता पसरणी च डोंगर चढला की महाबळेश्वर पर्यंत डोंगर माथ्यावरून आणि परत डोंगर दऱ्या तून असा बिकट आहे ..पांचगणी च्या पुढे प्रताप गड पर्यंत अतिशय घनदाट जंगल त्या कमी असावे कारण आत्ता सुद्धा तो परिसर तसाच आहे.

एकंदरीत रस्ता एकदम बिकट.
हत्ती,बैलगाड्या,तोफा,आणि कोणत्या ही अवजड प्राणी ,बैलगाड्या ह्यांच्या साठी कुचकामी.
फक्त घोड दळ आणि पायदळ हेच जावू शकतील.

वाई वरून प्रतापगड ला जायचे असेल तर जावळी खोर लागतच नाही .
डोंगरांच्या पायथ्या शी पसरलेले जावळी खोर .
आणि प्रताप गड चा रस्ता पसरणी च डोंगर चढला की महाबळेश्वर पर्यंत डोंगर माथ्यावरून आणि परत डोंगर दऱ्या तून असा बिकट आहे ..पांचगणी च्या पुढे प्रताप गड पर्यंत अतिशय घनदाट जंगल त्या काळी असावे कारण आत्ता सुद्धा तो परिसर तसाच आहे.

एकंदरीत रस्ता एकदम बिकट.
हत्ती,बैलगाड्या,तोफा,आणि कोणत्या ही अवजड प्राणी ,बैलगाड्या ह्यांच्या साठी कुचकामी.
फक्त घोड दळ आणि पायदळ हेच जावू शकतील.

रमेश आठवले's picture

14 Mar 2020 - 10:02 pm | रमेश आठवले

रोचक आणि माहिती पूर्ण लेखमाला. बायबल मधील डेव्हिड आणि गोलिआथ या गोष्टीची आठवण झाली. कर्नाटकात गुलबर्गा जिल्ह्यात अफझलपुर हे तालुक्याचे गाव आहे. हे नाव याच खाना मुळे पडले असेल का ?

योगविवेक's picture

16 Mar 2020 - 8:43 am | योगविवेक

एकटा डेव्हिड गोलिएथला लोळवतो. नंतर राजा बनतो. वगैरे गोष्टी चपखलपणे जमतात.

योगविवेक's picture

15 Mar 2020 - 6:31 pm | योगविवेक

त्याच्या मते सिवाने आपणहून एका गडावर लपून राहून चूक केली. वाईच्या पर्यंत येताना त्याने आपल्या सैन्याच्या जत्थावर वारंवार हमले करायचे सोडून दिल्याने त्याच्या बाजूच्या सरदाराचे मनोधैर्य खचून ते आपल्याकडे यायला उत्सुक होतील.

ओक सरांचे काय विचार आहेत?

शशिकांत ओक's picture

16 Mar 2020 - 7:41 am | शशिकांत ओक

सिवाला उकसावूून, भडकवून मैदानी प्रदेशात लढायला लावायचे हे खानाच्या बाजूने मांडलेल्या पटाचे उत्तर होते. त्याच्या बाजूने लढणाऱ्या मराठा सरदारांना त्याने या करता लवचिक धोरणाने पुढे - मागे ठेवले होते. की वेळ आली तर ते सिवाशी लढतील. बरोबर नेलेल्या तोफा, गोळे यांच्या मारण्याच्या कक्षेत त्यांना फिरते ठेवून सिवाची सैन्य शक्ति क्षीण करायची.
महाराजांच्या धोरणाची आखणीत बचावात्मक पवित्रा होता. पहाडी प्रदेश, ना माहिती रस्ते, चिंचोळ्या वाटा यातून सैन्यातील गुणात्मक संख्या बळ घटवायचे असेल आणि तर खिंडीतील वाटा उपयोग पडतात.
सिवा एका कोपर्‍यातील कोटात बसल्यावर आता शोधायला कुठे जायला नको हे बरोबर वाटत असले तरी सिवाने त्याच्या सोईच्या जागी ओढून कळत नकळत खानाला जाळ्यात ओढले. खानाच्या अनुभवानुसार तो यातून मात करायला समर्थ होता. शिवाय काम खानावर सोपवले होते. त्याला धोका पत्करून जाणे भाग होते.

कंजूस's picture

16 Mar 2020 - 6:11 am | कंजूस

वाचतोय. लेखमाला आवडली.