शेगाव दर्शन व माहूर यात्रा भाग ३

AKSHAY NAIK's picture
AKSHAY NAIK in भटकंती
11 Feb 2020 - 8:13 pm

शेगाव सोडण्यास साधारण दुपारचे १२ वाजत आले होते. शेगाव ते माहूर अंतर साधारण २०० किमी असल्यामुळे चार ते पाच तासात माहूर मध्ये पोहचू असे असे ग्रहीत धरले होते. मात्र शेगाव ते माहूर हा रस्ता माझ्या ड्रायविंग ची परीक्षा पाहणारा होता असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. गुगल वाल्या काकूंनी रेकमेंड केल्यामुळे मी शेगाव-उमरखेड-वाशीम-पुसद-माहूर हा मार्ग निवडला. शेगाव सोडल्यानंतर साधारण पन्नास एक किमी रस्ता चांगला वाटला. मात्र त्यानंतर रस्त्यांची अर्धवट चालू असलेली कामे आणि हातभर खड्डे यांचा सामना करीत मार्ग काढावा लागला.
सकाळी लवकर जेवण झाल्यामुळे थोडासा सुस्तावा जाणवत होता त्यामुळे एके ठिकाणी चहा घेवून पुढील प्रवास चालू ठेवला. आता माहूर येईपर्यंत कोठेही थांबायचे नाही असे निश्चित केले. कुटुंबासमवेत अनेक विषयांवर गप्पा मारत प्रवास चालू होता. संध्याकाळी चार च्या सुमारास रस्त्यावर भल्यामोठ्या प्रमाणावर मेंढ्यांचा कळप जाताना दिसला. नजर जाईपर्यंत मेंढ्या आणि शेळ्या दिसत होत्या. त्या मेंढ्यांना काबूत ठेवण्यासाठी पाच पंचवीस कुत्री आणि यासर्वांवर नजर ठेवण्यासाठी काही माणसे असा खूप मोठा लवाजमा अगदी कशाचीही तमा न बाळगता त्यांच्या निर्ढावलेल्या संथ गतीने पुढे जात होता. माझी तीन वर्षांची नुकतीच शाळेत जाणारी मुलगी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेंढ्या पाहून शीप-शीप असे ओरडू लागली. तिला भलती मजा वाटत होती. मात्र झालेल्या traffic मुळे जीव वैतागून गेला होता. त्यातही काही निष्णात मंडळी गाडीचा होर्न वाजवत त्या मेंढ्यांच्या कळपातून वाट काढत पुढे सरकत होती. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरी वर गरम कांदा भजी काढणे चालू होते. मग काय घेतली गाडी बाजूला आणी चहा सोबत गरम कांदा भजी वर मनसोक्त ताव मारला.
अर्धा तास या सगळ्या प्रकारात गेल्यानंतर रस्ता मोकळा झाल्याचे दिसले. त्यामुळे वेळ न दडविता प्रवास चालू ठेवला. माहूर ला पोहचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले. अंधार पडल्यामुळे आज काही रेणुका मातेचे दर्शन होणार नव्हते. त्यामुळे माहूरगडा च्या पायथ्याशी असलेल्या गावात एका हॉटेल मध्ये मुक्कामाची सोय केली. रात्रीचे जेवण घेवून लवकर झोपी गेलो.

दिवस ०४/०२/२०२० माहूर दर्शन आणी लातूर कडे प्रस्थान

आदल्या रात्री ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून दर्शन घेणे आणि शक्य तितक्या लवकर लातूर कडे प्रयाण करणे असा दिनक्रम ठरविला होता. त्याप्रमाणे आम्ही कुटुंबीय सकाळी सातच्या सुमारास तयार होऊन हॉटेलच्या बाहेर पडलो. सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न वाटत होते. गड चढण्यापूर्वी खाली एका चौकात चहा घेतला आणी गड चढण्यास सुरवात केली. वर जाण्यासाठी सिमेंटचा अगदी सुंदर रस्ता बनविण्यात आला आहे. अगदी दहा मिनिटात आमी रेणुका मातेच्या मंदिराजवळ येवून पोहचलो. मंदिराजवळ अनेक वानरे होती. माझी मुलगी त्यांना पाहून घाबरली आणि मला बिलगून बसली. रेणुकामातेचे नाव घेत पायऱ्या चढण्यास सुरवात केली. सोबत आई वडील आणी कडेवरील मुलगी यांना घेवून पायऱ्या चढावयाच्या असल्यामुळे मध्ये थोडे थोडे विश्राम घेत वर पोहचण्यास साधारण पंधरा एक मिनिटे लागली. मंगळवार चा दिवस असून देखील म्हणावी इतकी गर्दी मंदिरात नव्हती. अगदी काही क्षणात आम्ही देवीच्या गर्भगृहात प्रवेश केला. रेणुकामातेचे ते भव्य रूप पाहून अगदी भरून पावलो. बराच वेळ आई वडिलांसोबत रेणुकामातेसमोर बसून मन अगदी प्रसन्न वाटत होते.
माझ्या मुलीसोबत माझी आई

मंदिराबाहेर येवून थोडा वेळ काही छायाचित्र काढण्याचा मोह झाला. ती इथे डकवीत आहे. सुंदर निसर्गाचे ते मोहक रूप पाहण्यात एक तास गेला. त्यानंतर पायऱ्या उतरून आम्ही खाली उतरलो. आणी रेणुकामातेच्या मंदिरापासून साधारण ३ किमी वरील दत्त शिखर चे दर्शन घेनेसाठी रवाना झालो. दत्त शिखर नावाप्रमाणे एका उंच शिखरावर आहे. अर्थात गाडी मंदिरापर्यंत जात असल्यामुळे काही अडचण नव्हती. भगवान दत्तात्रेय या ठिकाणी निद्रेसाठी येतात अशी आख्यायिका त्यामुळे ऐकण्यास मिळाली. भगवान दत्तात्रेयांची जागृत धुनी देखील येथे आहे. दत्तशिखर मंदिर तसे मोठे आहे. माहूर ला आल्यावर येथे निश्चित भेट द्यायला हवी. यानंतर आम्ही आमचा मोर्चा दत्तशिखर मंदिरापासून २ किमी वर असलेल्या अनुसया माता मंदिराकडे वळविला. येथे पायऱ्या खड्या असल्यामुळे आणि पायऱ्यांची संख्या बरीच असल्यामुळे मी आणी माझे वडील माझ्या मुलीसोबत खाली थांबलो.
अनुसया माता मंदिरा बाहेरील छायाचित्र
अर्ध्यातासानंतर आई आणि माझी पत्नी दर्शन घेवून खाली आल्या. त्या दोघी येईपर्यंत मी मुलीला घेवून खाली असलेल्या माकडांचे खेळ पाहत वेळ काढला. आता दुपारचे ११ वाजत आले होते. आम्ही हॉटेल मध्ये पोहचलो. सर्व सामानाची आवरा आवर करून माहूर सोडण्यास १२ वाजून गेले. जेवण रस्त्यात कोठेतरी करण्याचे ठरवून माहूर मधून प्रस्थान केले. या दोन तीन दिवसात कुटुंबासमवेत घालविलेला वेळ खूपच अविस्मरणीय ठरला. मागील दोन लेखांत मिपाकर मंडळींनी दिलेली दाद आणी श्री कंजूस साहेब यांनी छायाचित्र टाकण्याबाबत केलेले मार्गदर्शन यामुळे पुढील लेखन करण्यास खूप उर्जा मिळाली. लवकरच कॉलेज मधील मित्र मंडळींसोबत तिरुपती येथे जाण्याचा बेत आखला आहे. तो अनुभव देखील आपणासोबत नक्की share करीन. सर्व मिपाकर मंडळींचे पुन्हा एकदा आभार.

समाप्त

प्रतिक्रिया

कंजूस's picture

12 Feb 2020 - 7:59 am | कंजूस

लेख छान.
-------------
लेख प्रकाशित करण्या अगोदर पूर्वदृष्यमध्ये तुम्हाला फोटो दिसत असले तरी आम्हाला दिसत नाहीत कारण ते गूगल फोटोजमधून शेअरिंग केलेले नाहीत.
ब्लॉगमध्ये टाकून प्रकाशित करण्याचा उपाय याचसाठी सांगितला होता. तोच वापरा।

प्रतिसादाबद्द्ल खूप आभार. फोटो टाकण्याबाबत पुढील वेळी अधिक काळजी घेवून प्रयत्न करीन.

प्रचेतस's picture

12 Feb 2020 - 10:46 am | प्रचेतस

माहूर खूप पूर्वी केलंहोतं. अगदी पुसटसं आठवतंय.
बाकी फोटो दिसत नाहियेत.

AKSHAY NAIK's picture

12 Feb 2020 - 10:55 am | AKSHAY NAIK

धन्यवाद !

श्वेता२४'s picture

12 Feb 2020 - 11:07 am | श्वेता२४

मंदिराच्या वेळा, राहण्याची सोय कशी होती किंवा याबद्दल अधीक माहिती सांगावी. अजून काही शुल्क,नियम किंवा विशेष लक्षात घ्यावयाच्या गोष्टी सांगितल्या तर जाणाऱ्यांना मार्गदर्शक ठरते. तिरुपती भेट पण नक्की लिहा. प्रवासाला शुभेच्छा.

शेगाव संस्थान च्या बाबतीत राहण्याची सोय अगदी उत्तम होती. सर्वसाधारण पणे सकाळी सहा पासून रात्री ९.३० पर्यंत मंदिर चालू असते. माहूर च्या बाबतीत संस्थान तर्फे राहण्याची कोणतीही सोय नाही. तेथे बुलढाणा अर्बन चे आणि MTDC चे देखील GUEST HOUSE आहे. इतर खासगी हॉटेल्स देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. मंदिर संस्थान च्या संकेतस्थळावर मंदिराच्या वेळेबाबत अधिक माहिती उबलब्ध आहे. पुढील वेळी लेख लिहताना आपण केलेल्या सूचना नक्की आमलात आणण्याचा प्रयत्न करीन. प्रतिसादाबद्द्ल खूप आभार.

कंजूस's picture

12 Feb 2020 - 2:01 pm | कंजूस

१ ) blogger dot com उघडा. तुमच्या gmail account मधल्या आईडीमुळे लॉगिन करावे लागणार नाही.
२) न्यु पोस्ट + करून फोटोच्या वरच्या लोगोवर टिचकी मारल्यास फ्रॉम >> गूगल फोटोज >> हेच दोन फोटो सिलेक्ट केले ते इकडे उमटतील.
३) पब्लिश बटण दाबल्यावर >> all post मध्ये हा ब्लॉग दिसेल. त्यातून फोटोवर क्लिक करून लिंक मिळवा.
४) ती दिलेल्या टेम्प्लेटात टाकून इकडे पेस्ट केले की आला फोटो. तीन मिनिटांत होईल.

AKSHAY NAIK's picture

12 Feb 2020 - 3:03 pm | AKSHAY NAIK

नक्की प्रयत्न करीन.

दुर्गविहारी's picture

12 Feb 2020 - 6:26 pm | दुर्गविहारी

तीनही भाग वाचून काढले , खुपच छान लिखाण ! मात्र भटकंतीचा आणि फोटो नाहीत हि कमी आहे. बाकी माझ्या मराठवाड्याच्या भटकंतीत नांदेड, कंदाहार आणि माहुर पाहीले होते. बहुतेक जण भाविक म्हणूनच माहुरला भेट देतात. पण घनदाट जंगलात तीन शिखरांचा माहुर डोंगर, तेथील साडे तीन शक्तीपिठांपैकी एक असलेले देवीचे स्थान, दत्त जन्मस्थान आणि अनुसुया शिखर याना बहुतेकजण भेट देतात. पण आणखी काही आवर्जून पहावीत अशी ठिकाणे परिसरात आहेत. देवीच्या मंदिराच्या समोरच्याच टेकडीवर असणारा रामगड हा देशमुखांचा किल्ला, तेथील महानुभाव पंथियाना पवित्र असणारा तलाव, चिनी दरवाजा हे सर्व पहाण्यासारखेच. पायथ्याशी गावात छोटे वस्तु संग्रहालय, उंबरखिंडीत पराक्रम गाजवलेल्या सावित्रीबाई देशमुख यांचा वाडा आणि गावाच्या पातळीखाली असणारी लेणी हे सर्व आवर्जून पहाण्यासारखे आहे. यावर सविस्तर लिहीणारच आहे.
बाकी तुम्ही आणखी लिहीत रहा.

AKSHAY NAIK's picture

12 Feb 2020 - 7:11 pm | AKSHAY NAIK

खुप खुप आभार !

अजिंक्यराव पाटील's picture

13 Feb 2020 - 1:54 pm | अजिंक्यराव पाटील

माहूरगड म्हणजे मामाचा गाव, पाऊस झाल्यानंतर लगेच गेलात तर माहूरगडची खरी मजा कळेल तुम्हाला. माहूरगडचे जंगल खूप मोठे आहे. मला नक्की दिवस माहिती नाहीत पण कोणत्यातरी पौर्णिमेला लोक माहूरची परिक्रमा करतात. परिक्रमेमध्ये माहूरच्या पायथ्यापासून सुरु करून संपूर्ण जंगलाला प्रदक्षिणा घालतात. परिक्रमा केली नसली तरी बरेच जंगल फिरून झाले आहे. जंगलात बिबटे, अस्वल मुबलक असल्याने खूप सावधपणेच फिरावे लागते. पुसदकडून येणाऱ्या घाटात स्वयंभू शिवपिंड आहे, ज्यावर १२ महिने झऱ्यासारख्या ओहोळातून पाणी पडत राहते. (पूर्वी एसटीतुन लक्षपूर्वक पाहिल्यावर हि पिंडी दिसायची, आता मंदिर बांधले आहे. मला तरी ते जुने रूपच अधिक आवडते.) तिथून पुढे गाव सुरु झाल्यावर डाव्या बाजूला सोनापीर दर्गा आहे. सोनापीर च्या थोडं पुढे पायी गेल्यावर पांडवलेणी लागतात. सहा खोल्यांसारख्या गुंफा, आणि सगळ्यांमध्ये एक एक मूर्ती आहे (पाच पांडव आणि द्रौपदी) पैकी भीमाची मूर्ती सगळ्यात मोठी. पूर्वी तिथवर पोचणे अवघड होते, पण आता पर्यटन विभागाने पायऱ्यांचा मार्ग बनवला आहे. झक्कास सिनरी दिसते इथून. दाताळा मोताळा तलाव, तलावावरून रेणुकादेवी मंदिरापर्यंत जाणारी पायवाट सगळे काही बघण्यासारखे, रेणुकादेवी गडावरून त्या वाटेने तलावावर अंघोळीस जायची/ जाते अशी आख्यायिका आहे. पहाटे पहाटे या तलावावर वाघ यायचे पूर्वी, आणि हीच भीती दाखवून आम्हाला फिरायला जाण्यास मनाई असायची. गावात अजून बघण्यासारखे म्हणजे देशमुख राजेंचा वाडा, विहीर, वस्तुसंग्रहालय इत्यादी. नंतर लागते देवदेवेश्वर मंदिर, (स्थानिक भाषेत देवदेवसरी) महानुभाव पंथीयांसाठी विशेष असे हे मंदिर फार गूढ आहे. एरवी साखळ्यांनी बांधलेले निपचित पडलेले लोक,ज्यात महिला, पुरुष आणि लहान बालके सुद्धा असतात, संध्याकाळच्या आरतीच्या वेळी मोठमोठ्याने "सोड दत्त्या सोड" म्हणत शिव्या देतात, आवारातल्या खांबावर चढतात, उड्या मारतात वगैरे अचाट प्रकार सुरु असतात. त्यानंतर रेणुकादेवी मंदिर, मंदिराबद्दल फार लिहिण्यासारखे उरले नाहीये, हो, आता गेल्या वर्षीच माहूरगडच्या नव्या पायऱ्या जिथे जुन्या पायऱ्यांना भेटतात, म्हणजे प्रवेशद्वारापुढचा भाग तिथे बिबट्याने गोंधळ घातलेला CCTV मध्ये कैद झालेला. अन्नाच्या शोधात आला असावा कदाचित. रेणुकादेवी मंदिराच्या मागच्या बाजूला परशुराम मंदिर देखील आहे, पण त्यासाठी विरुद्ध बाजूला पायी उतरावे लागते. गडाच्या समोर रामगड किल्ला आहे. किल्ल्याचा घेर फार मोठा, मी देखील अजून पूर्ण किल्ला फिरलेलो नाही. किल्ल्यातदेखील कालीमातेचे मंदिर आहे आणि त्याभोवतीच्या अनेक वदंता देखील. पूर्वी फार दुरावस्था होती किल्ल्याची, पण आताशा डागडुजी केली आहे.

माहूरगडाविषयी विशेष सांगायचे झाल्यास, गडावर जाणारा रस्ता पूवी खूप डेंजर होता. आधी तर लोक पायी जायचे. नंतर डांबरी रस्ता बांधण्यात आला, माहूरवरून जेव्हा पहिली एसटी गड चढली, तेव्हा त्या गाडीचा ड्रायव्हर मुसलमान होता आणि त्याने देवीचा जयजयकार करून गाडी सुरु केल्याचा किस्सा माहुरातले लोक सांगतात. हा रस्ता एवढा कठीण कि खूप अपघात व्हायचे. अर्थात वेग कमी असल्याने फार वाईट काही घडायचे नाही, मात्र गाडी बंद पडणे, तोल जाणे वगैरे.. गडावर जाणारे शेवटचे वळण तर पिन पॉईंट, आणि जवळपास ३० डिग्री एलेवेशन चा, पहिल्यांदा येणारा नवखा दुचाकीस्वार तिथे हमखास पडणार.. लहान असताना त्या वळणापाशी तासंतास बसून तिथे पडणारे लोक पाहणे हा देखील एक वाईट छंद होता आम्हा भावंडांचा! आता मात्र सिमेंट रस्ते आल्यापासून सगळं काही झकास झालेलं आहे. असो, लेखापेक्षा मोठा प्रतिसाद होईल सगळे लिहायला गेलो तर.. आवरतो.

चौकस२१२'s picture

13 Feb 2020 - 2:04 pm | चौकस२१२

तेव्हा त्या गाडीचा ड्रायव्हर मुसलमान होता आणि त्याने देवीचा जयजयकार करून गाडी सुरु केल्याचा किस्सा माहुरातले लोक सांगतात.

यावरून आठवलं.. एकदा विशाळगडाच्या पायथ्याशी बघितलेला "डोकेबाज" सर्वधर्म समभाव... गडावर "जागृत" दर्गा आहे ( हि खासियत भारतातातच.. सौदी मध्ये सांगितले तर अरबांना भोवळ येईल ) त्यामुळे गडावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही "भक्तिभावाने" जातात .. अर्थात हे अनेक ठिकाणी घडते त्यात काय नवल.. पण जिथून शेवटच्या पायऱ्या सुरु होतात तेथील दोन उद्जयोजकांनी मांडलेलं उदयॊग फार भारी होता
एका दगडाला शेंदूर फासलेले आणि आलेल्या भाविकांना ते १ रुपयाला हार विकत होते ( तोच तोच अर्थात ) आणि आवाहन काय तर.... "या म्हसोबा ( विरोबा कीव तत्सम) हार घालताय तर दर्ग्याचं बाबा पावतोय.... " १० तळे ४ फसत होते आणि हि दोघं रुपया रुपया जमवत होती... दोघांना ना ट्रम्प दादांच्या अप्रेन्टिस शो वर तेवहा असता तर पाठवायला पाहिजे हुतं.. लै भारी