व्हॉटसअॅप,फेसबुक,ट्विटर,मिपा आणि अशी अनेक आंतरजालीय समाजमाध्यमे जिथे चर्चा करता येते; ती बहुतांशी वेळा देशाच्या,राज्याच्या राजकारणावरील चर्चेने अोसंडून वाहत असतात.अगदी काही वेळा वैताग येईल इतका इतका वेळ अशा चर्चांवर दिला जातो.आपला आवडता पक्ष,आवडता नेता हाच आख्ख्या भारतात किंवा राज्यात कसा चांगला आहे.तोच कसा जनतेला सर्वाधिक चांगला न्याय देऊ शकतो यावर अटीतटीने मुद्दे मांडणं सुरु असतं.समोरचा आपला मुद्दा मान्य करत नाही हे बघून काहीजणांचा तोल ढळतो; मग नको त्या शब्दांत किंवा वैयक्तिक जीवनातील गोष्टींचा उद्धार करुन नामोहरम करण्याचाही प्रयत्न होतो.आवडता पक्ष,नेता हरला की राग,संताप होतो.यावरुन कोणी बोलले तर वाद ठरलेलेच.विशेषत: शहरी,शिकलेला मतदार या अशा आंजावरील राजकीय प्रचारात फार पुढे असतो.
बरं कुठल्यातरी एकाच ग्रुपात राजकारणावर बोललं तर समजण्यासारखं आहे पण प्रत्येक ग्रुपात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आवडता नेता,पक्ष,विचारधारा यांचं प्रमोशन करण्याची संधी साधली जातेच.हे करुन काय मिळत असावं? म्हणजे बघा की समजा तुम्ही बर्यापैकी शिकलेले आणि शहरी नोकरदार आहात.तुमचा आवडता पक्ष,नेता याची जमेल तितकी जाहिरात तुम्ही आंजावरील चर्चेतून करता आहात.आता तुमचा समज झाला की मी छानपैकी विश्लेषण मांडले आहे माझा आवडता राजकीय पक्ष हाच सर्वात चांगला का आहे.आता माझी ही पोस्ट फॉरवर्ड होत जाणार आणि निदान काही लोकांचा तरी दृष्टीकोन बदलून मी त्यांना माझ्या पक्षाला मतदान करायला भाग पाडणार.पण प्रत्यक्षात तसं होत असतं का?
आपल्या देशातील बहुसंख्य जनता ही किमान गरजा भागवण्यातच गुंग असते.त्यांच्या अपेक्षाही माफक असतात.यात कोण कोण आलं?अशिक्षित किंवा अल्पशिक्षित शेतमजूर,अल्पभूधारक शेतकरी,उद्योग,व्यवसाय आणि दुकानांमधले कामगार,कंत्राटी कामगार,धुणीभांडी अशी घरकामे करणार्या स्त्रिया, फिरते व्यवसायिक असा बराच मोठा वर्ग आहे.हे सगळे व्हॉटसअॅप,फेबुवरच्या चर्चा आणि विश्लेषणं वाचून मग सारासार विचार करुन मतदान करत असतील का? चर्चा वाचाव्यात इतका वेळ असतो का या लोकांकडे? कुटूंबाच्या किमान गरजा भागवता याव्यात निदान इतपत तरी पैसे मिळवणे हेच काम त्यांच्यासाठी मुख्य असते.मग हे भागेल इतपत पैसे जो पक्ष देईल,किंबहूना जो पक्ष जास्त पैसे देईल त्याच पक्षाला मतदान हे लोक मतदान करतात; नव्हे पैसे देणारे पक्ष कार्यकर्ते ते करवून घेतात.मतदानासाठी दारु,मटण,पैसे वाटप हे काही या देशाला नवीन नाही.हा झाला मतदारांमधला एक घटक.
अजून एक घटक म्हणजे अशिक्षित,अल्पशिक्षित गृहिणी.ज्यांना फक्त स्वयंपाक,धुणीभांडी,मुले सांभाळणे एवढेच काम असते.यातल्या बहुसंख्य स्त्रिया उरलेल्या वेळात टिव्हीवर मालिका बघण्यात वेळ घालवतात.त्यांना देशात,राज्यात काय चाललंय यात स्वारस्य नसते किंवा राज्यीय,देशीय राजकीय घडामोडींचा अर्थ लावणे जमत नाही.त्या तितका ताप डोक्याला करुन घेतच नाहीत.या राजकारण्यांचं रोज काही ना काही सुरुच असतं.मरु देत तिकडे.आम्हाला काय करायचंय असा विचार करुन आपल्या कामात,मनोरंजनात रमून जातात.
अजून तिसरा गट म्हणजे कुठेही कामाला जात नसलेले अशिक्षित,अल्पशिक्षित वृद्ध व्यक्ती.हे लोक आंजावरील चर्चा वाचत असतील किंवा सारासार विचार करुन मतदान करत असतील का? काहीजणांना विस्मरणाचाही थोडाफार त्रास असू शकतो.मग हे लोक मतदान कसं करतात तर घरातला कोणीतरी जे बटण दाबायला सांगेल ते दाबून येतात.पण प्रत्यक्ष मतदान करताना समजा चुकीचं बटण दाबलं गेलं तरी कोणतं बटण दाबायचं हे सांगणार्याला समजत नाही.ते मतदान करणार्या वृद्धालाही समजलं नाही तर? अनेकदा आपण वर्तमानपत्रात वाचतो अमुक खेड्यातल्या ९०/१०० वर्षाच्या वृद्धाचे मतदान.हे इतके जख्खड मतदार जे मतदान करतात ते खरच त्यांचं स्वत:चं मत असतं का?
म्हणजे आंजावर कितीही चर्चा झाली तरी विधानसभा, लोकसभेचा मतदानाचा कल ठरवतात ते हेच तीन प्रमुख घटक.
हे लोक खूप विचार करु सरकार निवडत नाहीत.किंबहूना गुणवत्ता पाहून सुयोग्य उमेदवार या लोकांकडून निवडला जाईलच याची शक्यता तशी कमीच.पण गंमत म्हणजे हे सगळे लोक मतदार मात्र आहेत बरं का! म्हणजे त्यांना व्यवस्थित विचार करुन कोणाला निवडायचं याचा निर्णय करता आला नाही तरीही हे लोक मतदान करु शकतात. कारण यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत. : )
शिवाय मतदानात नेहमी टक्केवारी चांगली असते ती ग्रामीण भागातल्या मतदारांची.७०/७५/८५% अशी.शहरी,महानगरी मतदार यात मागे असतो.मध्यंतरी पुण्यात फक्त ४०% मतदान झाले होते.
मग असं असताना राजकारणावर या ज्या आंतरजालीय चर्चा होतात त्या नक्की कोणासाठी असतात हा प्रश्न पडतो.खरंच काय फायदा होतो या अशा चर्चांचा?
प्रतिक्रिया
10 Jan 2020 - 10:56 am | प्रकाश घाटपांडे
खाज तर भागते ना!
10 Jan 2020 - 11:30 am | इरसाल
खुमखुमी, तोंडाची वाफ, दुसर्यांना हिणवणे, वड्याचं तेल वांग्यावर काढणे. इ.इ.इ.
10 Jan 2020 - 11:35 am | राघव
आंतरजालावर असं काही नाही.. लोकं वर्तमानपत्रांत, प्रवास करतांना, जेवतांना, काम करतांना.. सगळीकडे चर्चा करत असतात. :D
काही कारणं -
. माणसाला गप्पा मारायला आवडतात.
. स्वतःला स्वयंपाकात गती नसली तरीही स्वयंपाक दुसर्यांनी कसा करावा, हे सांगणारी भरपूर माणसं असतात.
. विषयाची आवड असणे आणि विषय समजणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे बर्याच लोकांच्या गावीही नसतं.
. वर्च्युअल जगात, पडद्यामागून, कोणाला कितीही शिव्या देऊन पळ काढता येतो. त्यात एक विकृत आनंद साठवलेला आहे. :P
. वर घाटपांडेकाका म्हणतात ती खाज आणि त्यासोबत माज ही सध्याच्या काळाची खास आभूषणे आहेत.
. सर्व समजतं पण काहीच करू शकत नाही या भावनेतून देखील लोकं व्यक्त होतात.
.
.
. अॅनालिसिस अॅण्ड इन्फरन्स ही एक खूप मोठी ईंडस्ट्री आहे. बुद्धीबळ खेळणार्यांच्या खेळाचं अॅनालिसिस करणारी मंडळी सांगतात ना, कोणाची कोणती चाल कुठे चुकली ते.. तेच आहे सगळीकडे. माझ्यासारखा माणूस नाही का उगाच येऊन दोन-तीन मुद्दे मांडून जातो [जसे आत्ता मांडलेत!!] तसे!
पण चर्चा करूच नये असा आपला रोख आहे का? तसे असल्यास चुकीचे आहे. योग्य पद्धतीनं व्यक्त होणारी लोकंही भरपूर असतात. लोकं पुर्वीही व्यक्त होत, पण व्यासपीठावरून व्यक्त होणं वेगळं असतं. आजकाल अनेक व्यासपीठं उपलब्ध असल्यामुळे ते जास्त जाणवतं इतकंच.
10 Jan 2020 - 11:49 am | उपयोजक
चांगली चर्चा जरुर व्हावी. : ) पण वर जे पोटार्थी लोक दिलेत त्यांच्यापर्यंत चांगलं विश्लेषण पोहचलं तरच उपयोग होईल ना? शिवाय चर्चेला कुठेतरी मर्यादा हव्यात.संधी मिळाली की आवडत्या पक्षाची जाहिरात वैताग आणते.
10 Jan 2020 - 1:15 pm | गणेशा
तुम्ही बरोबर बोलताय, याही पुढे जाऊन मला म्हणावेसे वाटते, तुम्ही जे लोक दर्शविले आहेत (पोटार्थी शब्द मी पहिल्यांदा ऐकला) त्यांच्या समस्या, त्यांच्या पर्यंत काय पोहचत नाही, काय काय गरज आहे असल्या मुद्द्यावरून राजकीय चर्चा व्हाव्यात..
त्यांच्या पर्यंत त्या पोहचत नाही असे आताचे जग मात्र राहिले नाही.
लोकसभे आधी आणि विधान सभे आधी मी उरुळी कांचन, आलेगाव, बारामती पिंपरी येथील तळागाळातील लोकांशी बोलताना जाणवत होते त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या यांची जान त्यांना आहे..
आणि असेच लोक कायम सत्ता पालट करत असतात, नेहमी एकाच पक्षाचे तळी भरणारे सगळे असते तर सत्ता, आमदार खासदार बदलले गेले नसते
10 Jan 2020 - 1:02 pm | गणेशा
राजकारणावर चर्चा जरूर व्हावी, उलट राजकीय मते प्रत्येकाला असतात आणि ती असावीच असे माझे मत आहे.
पण मीच आणि माझा राजकीय अंदाजच बरोबर आणि इतर सगळे चूक असे जेंव्हा माणूस समजू लागतो तेंव्हा ती चर्चा एका बाजूने जाते आणि वाद होऊ शकतो.
आजकाल लोक मुद्द्यावर बोलायचे सोडून, पक्षांवर बोलू लागलेत आणि आपण या पक्षाचा म्हणजे भारी असले काहीसे आजकाल आले आहे.. जर एखाद्या पक्षाचा एक मुद्दा चूक आहे आणि एक बरोबर असे त्याला वाटते तर त्याने तसेच बोलावे.. पण आजकाल काय होते आहे, कि पक्ष जो निर्णय घेईन तेच कसे बरोबर हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो.
सोशल मीडिया वर माझ्या सारखे माझे अनेक मित्र जे 2014पर्यंत कधी राजकारणावर सोशल बोलत नव्हते ते आता राजकारणावर बोलू लागलेत आणि याचे कारण आहे itcell चा सोशल मीडिया मध्ये चाललेला धुमाकूळ... ते जे दाखवतात तेच खरे नसते, पण तरी ते जाणूनबुजून पसरवतात... आणि याचा परिणाम होतो..
असो..
10 Jan 2020 - 1:22 pm | गवि
फायदा आहे. किमान चर्चाकर्त्याच्या घरच्या आणि हापिसातल्या इतरांची सुटका होते ना रोज तावातावाने मांडलेली जागतिक मते ऐकण्याच्या बोरिंग पीडेतून.
10 Jan 2020 - 1:35 pm | गणेशा
हा हा हा
10 Jan 2020 - 3:37 pm | उपयोजक
जाम हसतोय! : ))
10 Jan 2020 - 5:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
"राजकारणावर चर्चा करुन फायदा काय?" या विषयावर चर्चा करुन जो फायदा होईल तोच फायदा राजकारणावर चर्चा करुन होतो.
पैजारबुवा,
10 Jan 2020 - 11:30 pm | शा वि कु
:)
10 Jan 2020 - 11:53 pm | सौन्दर्य
आंतरजालावर चर्चेची गरज आहे असं मला वाटतं. कारणे खालील प्रमाणे
१) एखाद्या विषयाची जास्त माहिती मिळते.
२) इतरांचा दृष्टिकोन कळतो.
३) कित्येक वाहिन्या एकाच पक्षाचे म्हणणे लावून धरतात, चर्चेमुळे दुसरी बाजू कळते.
४) नॉलेज इज अ पॉवर असे म्हंटले जाते. चर्चेमुळे अभ्यास वाढतो.
५) कित्येक वेळा आपल्या काळाच्या अगोदर, कदाचित जन्माच्याही अगोदर, एखाद्या पक्षाची भूमिका काय होती, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय-काय केले, वगैरे कळते.
६) एखाद्या विषयावर जनमत जागृत करता येते.
चर्चेमुळे शेवटी साध्य काय होईल हा वादाचा मुद्दा असला तरी चर्चा व्हावी ह्या मताचा मी आहे.
11 Jan 2020 - 9:27 am | शाम भागवत
सहमत.
क्रमांक १,२,३ च्या संदर्भात उदाहरण द्यायचे झाल्यास,
काळंमाऊ मुळे लोकसत्ता वगैरेंचे म्हणणे लोकसत्ता विकत न घेता कळते. तर त्याची विरूध्द बाजू म्हात्रे व खरे या दोन डाॅक्टरांकडून कळते.
कित्येकवेळेस राग येईल या पध्दतीने मुद्दे मांडलेले असतात. त्यावेळेस आपल्याला राग आला तर त्याचा अर्थ मी तरी, “मुद्दा मांडणारा जिंकला व आपण हरलो” असा काढतो. मला हरायचे नसते. त्यामुळे या आभासी दुनियेत, मला राग आवरायला व समतोल व संयमी भाषेत विचार करायला अशा धाग्यांचा खूप फायदा झाला. वैयक्तिक जीवनात या कलेचा आपोआप उपयोग होतोच, हे वेगळे सांगणे नलगे. :)
बाकीचे जाऊ दे. पण नातेवाईक मंडळीत तरी राजकारणावर समतोल विचार करून शांतपणे बोलणारा व ऐकणारा म्हणून माझ्या म्हणण्याकडे गांभिर्याने पाहिले जाते.
कदाचीत हा माझा गैरसमजही असू शकेल.
:) :
11 Jan 2020 - 11:19 am | गणेशा
सौंदर्या आणि शाम भागवत
दोघांशी सहमत
11 Jan 2020 - 8:03 am | उपयोजक
सगळे मुद्दे मान्य! पण ही सगळी माहिती समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांपर्यंत पोहचून मतांचं पारडं फिरवण्यात पक्षी सुयोग्य उमेदवार निवडायला मदत झाली तरच फायदा आहे.अशिक्षित किंवा अल्पशिक्षित शेतमजूर,अल्पभूधारक शेतकरी,उद्योग,व्यवसाय आणि दुकानांमधले कामगार,कंत्राटी कामगार,धुणीभांडी अशी घरकामे करणार्या स्त्रिया, फिरते व्यवसायिक यांच्यापर्यंत ही चर्चा पोहचली आणि त्यांनी ती वाचली तरच उपयोग आहे.मोजक्या लोकांपर्यंत चांगल्या चर्चा,माहिती पोहचलीच नाही तर चर्चांचा फायदा काय?परिवर्तन घडायला हवं असेल तर या चर्चा त्या लोकांपर्यंत पोहचायला हव्यात.
11 Jan 2020 - 11:23 am | गणेशा
मग याला काय करावयास हवे?
सर्वांनी मिपा वाचले पाहिजे असा आदेश काढला पाहिजे? कि मिपा वर्तमान पत्र काढले पाहिजे? कि असे नसेल तर येथे चर्चाच करू नये?
11 Jan 2020 - 11:21 am | mrcoolguynice
मेटाचर्चा (meta discussion या अर्थी)
चांगली चालू आहे.