बुरहानपूर आणि महेश्वर - २ (अंतिम)

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
4 Nov 2019 - 8:02 pm

दिवस तिसरा - ०१ जून

सकाळी सगळे आवरून आणि सामान गाडीत टाकून आम्ही निघालो. आजचा पहिला थांबा होता ‘दर्गाह-ए-हकिमी’. दाऊदी बोहरा संत ‘अब्दुल कादीर हकीमुद्दीन’ यांना ज्या ठिकाणी दफन केले गेले ती ही जागा आहे. जगभरातून दाऊदी बोहरा समाजाचे लोक या दर्ग्याला भेट द्यायला येतात. इथे मागितलेली प्रत्येक मन्नत पूर्ण होते असा या लोकांचा विश्वास आहे. विस्तीर्ण आकारात पसरलेल्या या जागेत एक मोठी बाग आहे, भक्तांच्या निवासासाठीच्या, जेवणासाठीच्या इमारतीही आहेत. एकूणची जागेची स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. मुख्य दर्गा संपूर्ण संगमरवरात बनवलेला आहे. मुख्य दर्ग्याचा घुमट पाहून ताजमहालची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.


दर्गा पाहून आम्ही निघालो अहुखाना पहायला. १७ जून १६३१ रोजी आपल्या चौदाव्या मुलाला जन्म देताना मुमताज बेगम मरण पावल्यावर तिचं याच जागी दफन करण्‍यात आलं. नंतर तिचं थडगं उत्तर प्रदेशातील आग्रा येथे यमुनाकाठच्या एका छोट्या बागेत आणि शेवटी २२ वर्षांनी (१६५३ मधे) ताजमहाल बनून झाल्यावर तिथं हलवण्यात आलं.

अहुखाना शहराबाहेर आहे. सीमाभिंत बांधणे ही गोष्ट सोडली तर या वास्तुकडे पुरातत्त्व खात्याचे संपूर्ण दुर्लक्ष झालेले दिसते. एकासमोर एक उभ्या दोन इमारती आणि त्यांच्यामधे असलेली पाण्याची टाकी, आहुखाना म्हणजे काय, तर बस्स एवढेच. त्यातही एका इमारतीचे छत गायब आहे. ऊन, वारा, पाऊस यांचबरोबर प्रेमविव्हळ युवकांनी आपल्या प्रेमिकांची नावे उकरून इमारती खराब करण्याला हातभार लावला आहे. अर्थात, पूर्वी असे नव्हते - इतिहास सांगतो की या दोन इमारतींच्या आजूबाजूला सुंदर बाग होती आणि तिच्यात हरिणे विहार करत असत.

घड्याळात साडेदहा होत होते, ऊनही भाजू लागले होते, तेव्हा आहुखान्यात १५/२० मिनिटे रेंगाळून आम्ही निघालो. बुरहानपुरमधे पहायच्या ठिकाणांच्या आमच्या यादीत पुढचे ठिकाण होते ‘खुनी भंडारा’. सोप्या शब्दांत सांगायचे तर ही आहे एक पुराणकालीन नळयोजना. जमिनीत खोदलेल्या गुहांद्वारे पाणी इकडून तिकडे नेण्याची सोय. पण दुर्दैवाने आम्ही तिथे होतो तेव्हा या गुहा पहायला जमिनीच्या पोटात नेणारे उद्वाहक (Lift) बिघडले होते, तेव्हा ‘खुनी भंडारा’ ठिकाण गाळून आम्ही निघालो असीरगढकडे!

बुरहानपूरच्या आणि असीरगढ हे समीकरण पक्के आहे, तेव्हा आम्ही तो पाहणार होतो हे नक्की. आमचं नशीब चांगलं की तो नेमका आम्ही निघालो होतो त्या महेश्वरच्याच वाटेवर होता, त्यामुळे तो पाहण्यासाठी आम्हाला वाट वाकडी करून जावे लागणार नव्हते. अर्ध्या तासात आम्ही किल्ल्याजवळ पोचलो. किल्ल्याच्या मध्यापर्यंत गाडी जाते - हा रस्ता मी आजपर्यंत गाडी चालवलेला सगळ्यात चिंचोळा रस्ता होता. गाडी जेमतेम मावेल इतकाच रूंद. सुदैवाने वरून कुठली गाडी आली नाही, नाहीतर मामला अवघड होता.

असीरगढ किल्ल्याला दख्खनचा दरवाजा म्हटले जाते - याचे कारण असे की इथून दिल्लीपर्यंतच्या भागाला मुघल शासक हिंदुस्तान म्हणत आणि इथून खालच्या भागाला दख्खन.


किल्ल्याकडे जाताना मला एक मजेशीर गोष्ट दिसली. अकबर, शहाजहान आणि औरंगजेब यांनी सत्ता कशी हस्तगत केली हे सांगणारे शिलालेख किल्ल्य्याच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे लावलेले दिसतात. हे म्हणजे आज एखाद्या शासकीय इमारतीवर निवडणुका कुणीकुणी जिंकल्या आणि सत्तापरिवर्तन कसेकसे झाले हे लिहिण्यासारखे आहे. हे शिलालेख का बनवले गेले असावेत?




दोन दगडी बुरुजात लपलेल्या एका प्रचंड लाकडी दरवाजातून आपण गडात प्रवेश करतो. दरवाज्यावरची धातूची फुलं लक्षवेधी आहेत. वर आल्यावर जामी मशिदीच्या दिशेनं आपण चालू लागलो की दोन्ही बाजूला अनेक इमारतींचे भग्नावशेष दिसत राहतात. पाच एक मिनिटात आपण जामी मशीदीजवळ पोचतो. हिची रचना तंतोतंत अगदी बुरहानपूरच्या जामी मशीदीसारखीच आहे. (यांचा वास्तुविशारद एकच तर नसेल?) दगडी इमारतीत एक हवाहवासा गारवा असतो, जामी मशिदही याला अपवाद नव्हती. मशिदीच्या झरोक्यांमधून गार वारा वहात होता. एखाद्या झरोक्यातून संपूर्ण गडाचं छानसं दृश्य दिसत होतं.

जामी मशीद पाहिल्यावर आम्ही परत फिरलो. खरंतर पुढं ‘फांसी घर’, ‘महादेव मंदिर’ अशी दोनतीन पहाण्यासारखी ठिकाणं होती, पण उन्हापुढं आमचा नाईलाज होता. आम्ही गाडीत बसलो आणि तो चिंचोळा घाट उतरून पुन्हा बुरहानपूर महेश्वर रस्त्याला लागलो. वाटेत एके ठिकाणी जेवण करून आम्ही महेश्वरला पोचलो तेव्हा पाच वाजून गेले असावेत. हॉटेलात गेलो आणि ताजेतवाने झालो. खरंतर अजूनही घाटावर जाण्याइतका वेळ होता, पण त्यासाठी आमच्याकडे ना उत्साह होता ना ऊर्जा. बाहेरून मागवलेलं जेवण आम्ही खोलीतच खाल्लं आणि तडक आडवे झालो.

दिवस चौथा - ०२ जून

सकाळी लवकर उठून नाष्टाही न करता आम्ही घाटाकडे निघालो. घाट हॉटेलपासून लांब नव्हता - पाऊण एक किलोमीटर असावा. त्यामुळे चालतचालतच. महेश्वर उत्तर भारतात दिसणा-या एखाद्या ठराविक खेड्यासारखंच एक खेडं होतं. छोटी, बुटकी, एकमेकांना चिकटून बांधलेली घरे, अरूंद गल्ल्या, उघडी गटारे, रस्त्यात खेळणारी मुले - सारे काही तसेच. दहा एक मिनिटात आम्ही घाटाजवळ पोचलो.

नदी हा गावात राहणा-या लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असतो, इथंही ते दिसून येत होतंच. काही म्हाता-या हातात पुजेची तबकं घेऊन कुठेतरी जात होत्या, एखादी तरूण स्त्री घाटावर बादलीतून आणलेले कपडे धूत होती, काही तरूण नदीत डुबकी घेत होते आणि एखादा म्हातारा नदीकडे शून्य नजरेनं पहात बसला होता. घाटावरून चालतचालत आम्ही पार शेवटपर्यंत गेलो. घाट असलेली अनेक शहरं भारतात आहेत, पण त्यांपैकी कशालाच महेश्वरची सर नाही. रूंद आणि लांबपर्यंत पसरलेला हा घाट आणि त्यावरची ती दगडी, भव्य, सुबक मंदिरं - दोन्हींपैकी काय जास्त सुंदर आहे ठरवणं अवघड आहे.

घाटावर एक फेरफटका मारून आल्यावर आम्ही एक जागा पकडली आणि पाण्यात पाय सोडून बसलो. भर उन्हाळ्यातही नदी अगदी दुथडी भरून वहात होती. पाणीही शुद्ध दिसत होतं. मला काही मासे आणि बदकं दिसली. ऊन जाणवायला लागल्यावर आम्ही निघालो. मंदिरं आतून बघायची राहिली होती, पण आमचा नाश्ता आणि आंघोळ अजून बाकी होती.

सगळं आटपून अकराच्या सुमारास आम्ही राजवाड्यात पोचलो. अहिल्याबाई होळकर यांचं वास्तव्य जिथं होतं ती ही जागा आहे. पारंपारिक मराठी वाड्यासारखी या राजवाड्याची रचना आहे. लाकडाचा वापर जाणवण्याइतपत आहे. (का कोण जाणे पण इथला एकही फोटो माझ्याकडे नाही. फोटो काढले नव्हते का ते गहाळ झाले, कोण जाणे!) अहिल्याबाई होळकरांच्या काळातल्या काही वस्तू इथे जतन करून ठेवलेल्या आहेत. इथे १५/२० मिनिटे घालवून आम्ही मंदिरांकडे निघालो.

घाटावरच्या या मंदिरांकडे पाहिलं आणि ‘पूर्वी इथे एकही दगड नव्हता - हे सगळं बांधकाम अहिल्याबाईंनी केलेलं आहे’ हे जाणवलं की थक्क व्हायला होतं. मी मोजली नाहीत पण ७/८ तरी मंदिरं असावीत. मंदिरं देखणी आहेतच पण त्यांच्यावरची कलाकुसर त्यांहून देखणी आहे. आणि मंदिरांवरच्या कोरीवकामाबाबतची एक गोष्ट मला सगळ्यात आश्चर्यकारक वाटली, ती म्हणजे हे कोरीवकाम अजूनही जसंच्या तसं राहिलेलं आहे - जणू कालच केलं गेलंय.


वातावरणातला उष्मा आता बराच वाढला होता. एक मंदिर पाहून दुस-याकडे जाईपर्यंत उन्हामुळं अंग भाजून निघत होतं. जर अजून काही वेळ उन्हात काढला असता तर मध्य प्रदेशात त्या वर्षी उष्माघातानं मरणा-या लोकांच्या संख्येत नक्कीच पाचनं वाढ झाली असती. हे महेश्वरवासी दरवर्षी हा भयानक उन्हाळा कसा सहन करतात कोण जाणे? आम्ही त्वरेनं हॉटेलकडे निघालो.

संध्याकाळी आम्ही ‘सहस्त्रधारा’ पहायला गेलो. नाव अगदी भारदस्त वाटत असलं तरी प्रत्यक्षात हा एक फुसका बार निघाला. नदीपात्रातल्या दगडधोंड्यांवरून वेगाने वाहणारी नदी आणि त्यामुळे तयार होणा-या हजारो धारा यामुळे या जागेला ‘सहस्त्रधारा’ म्हटले जात असावे. पण हे दगडधोंडे इटुकले पिटुकले आहेत आणि त्यांच्यावरून पडणा-या त्या धारा केविलवाण्या. आवर्जून जावे असं इथं काही नव्हतं. नदीच्या पाण्यात कचराही बराच होता. थोडक्यात, आवर्जून चुकवावं असं हे ठिकाण आहे.

रात्री गप्पा मारताना ‘उद्या परत जाऊयात का’ असा प्रश्न मी विचारताच सगळ्यांचेच उत्तर होकारार्थी मिळाले. खरंतर मूळ बेतानुसार आम्ही महेश्वरमधे तीन दिवस राहणार होतो. उद्या इथून १२० किमी दूर असलेल्या बाघ गुहा पहायच्या आणि परवा पुण्याला परत जायचे असे नियोजन होते. पण महेश्वरचा मुक्काम आटोपता घ्यावा असं वाटण्यासाठी बरीच कारणं होती. पहिली गोष्ट म्हणजे महेश्वरमधली पाहण्यासारखी सगळी ठिकाणे आमची पाहून झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे महेश्वरमधे प्रचंड उकडत होते. आमची खोली वातानुकूलित होती हे खरे, पण जरा बाहेर पडलो की घामाच्या धारा वहात होत्या. जर फक्त खोलीतच बसून रहायचे आहे तर मग इथे राहण्यात काय हशील? तिसरी गोष्ट म्हणजे बाघ गुहा चांगल्या होत्या ख-या, पण खास त्यांच्यासाठी २४० किमी प्रवास करावा इतक्याही नव्हे. आणि चौथी गोष्ट अशी की उद्या घरी गेलो की रविवारचा एक दिवस आम्हाला आराम करण्यासाठी मिळणार होता. त्यामुळे रविवारी घरी पोचणे नि लगेच सोमवारी ऑफिसला जाणे आम्हाला टाळता येणार होते. या सगळ्या कारणांमुळे उद्याच घरी जायचे ठरले.

दिवस पाचवा - ०३ जून

सकाळी लवकर उठून आणि सगळं आवरून आम्ही घाटावर पोचलो. काल राहून गेलेल्या आणि काल विशेष आवडलेल्या मंदिरांना भेटी दिल्या, फोटो काढले. घाट हळूहळू जागा होत होता. स्नान करणा-या भाविकांची, मंदिरातल्या पुजा-यांची, होडीवाल्यांची धावपळ सुरू होत होती. मी नर्मदामैय्येकडे पाहिलं. ती आपल्याच नादात वाहत होती. कालही वाहिली होती आणि उद्याही वाहणार होती. अशीच.

परतताना महाराष्ट्रात शिरल्यावर हे दोन किल्ले दिसले. मला त्यांची नावे माहीत नाहीत, जाणकारांनी सांगावीत.


परतीचा प्रवास कंटाळवाणा होता खरा, पण त्याला एक रूपेरी किनार होती - घरी गेल्यावर एक आख्खा दिवस आराम करायला मिळणार होता.

प्रतिक्रिया

सुरेख लिहिलं आहे. फोटो सुद्धा खूप आवडले.
आहुखाना म्हणजे काय?
ऐतिहासिक इमारती खराब करणं हा आपल्या लोकांचा राष्ट्रीय धर्म आहे असे वाटते कधी कधी :( असो.

भरपूर फिरा आणि आम्हांला अशीच प्रवासवर्णने वाचायला मिळूद्यात.

اهوی کوهی म्हणजे deer - हरीण. त्यावरून अहुखाना म्हणजे deer house असा अर्थ लावता येईल.

यशोधरा's picture

4 Nov 2019 - 9:33 pm | यशोधरा

धन्यवाद मनो.

महेश्वरकडून पुण्यात आला असाल तर ते अंकाई-टंकाईचे जोडकिल्ले असू शकतात, मनमाडच्या जवळचे.

ते अंकाई-टंकाईचेच किल्ले आहेत, आणि सर्वात शेवटच्या फोटोतील सुळका म्हणजे हडबीची शेंडी.

जॉनविक्क's picture

4 Nov 2019 - 10:23 pm | जॉनविक्क

जरा पेरिमिटर कमी करून बोला की राव

एक_वात्रट's picture

4 Nov 2019 - 10:50 pm | एक_वात्रट

महाराष्ट्रात आल्यावर दिसले हे किल्ले.

गुल्लू दादा's picture

4 Nov 2019 - 11:09 pm | गुल्लू दादा

पण अशिरगड वर अन्याय केलाय तुम्ही अस वाटते...त्यातल्या तलावाचे फोटो, फाशीघर, महादेव मंदिर यायला हवे असे वाटत होते.. महादेव मंदिराची कथा म्हणजे, तिथे रोज सकाळी 4 च्या दरम्यान अश्वत्थामा येऊन पूजा करतो असे म्हणतात. आतल्या पिंडीजवळ गोकर्णाचे ताजे फुल आम्ही सुद्धा पाहिलंय.
विशेष म्हणजे आजूबाजूला कुठेही त्याचा वेल दिसत नाही.आतमध्ये विटांचे बांधकाम सर्व इंग्रजांनी केलंय. बाकी दगडी बांधकाम पुरातन आहे. किल्ल्यावर जमिनीत मोठाल्या टाक्या आहेत. त्यांची तोंडे उघडीच आहेत. खाली पाहून नाही चाललो तर गेलो समजायचं खाली. अश्या घटना होऊ नयेत आणि इतरही काही कारणामुळे 4 वाजेनंतर कोणाला थांबू देत नाहीत किल्ल्यावर. जाताना लागणारे कडाचे जंगल आम्ही पायी फिरलो होतो. कडाचा डिंक गोळा करत. बाकी छान झालाय लेख. धन्यवाद

हे आणि इतर ओंकारेश्वर, मांडू, इंदौर, उज्जैन सह सहल केली आहे. प्रत्येक ठिकाणी एकेक दिवस राहिलो आहे. घाटावरच्या किल्ल्यात हातमाग केंद्र आहे . उघडेच होते पण मंगळवारी विणकरांना सुटी असते. कसे विणतात ते पाहता आलं नाही.

इकडे ( विशेषत: स्थानिक) श्रावणात फिरतात. पर्यटक नोव्हेंबर ते फेब्रुवारी (शिवरात्रीफर्यंत). नंतर तापू लागते.

जालिम लोशन's picture

24 Nov 2019 - 10:10 pm | जालिम लोशन

सुरेख

पद्मावति's picture

25 Nov 2019 - 12:38 pm | पद्मावति

सुरेख वर्णन आणि फोटोज.

मुक्त विहारि's picture

27 Nov 2019 - 3:37 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

27 Nov 2019 - 3:46 pm | मुक्त विहारि

धन्यवाद