गंदीकोटा आणि बेलम गुहा - १

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
14 Oct 2019 - 9:43 pm

मला फिरायला प्रचंड आवडतं. आणि फिरण्याखालोखाल मला काही आवडत असेल तर ते प्रवासवर्णनं वाचणं. हाताशी भरपूर रिकामा वेळ असावा, एखाद्या सुंदर जागेचं रसाळ भाषेत केलेलं प्रवासवर्णन समोर असावं, आणि हातात कॉफीचा कप असावा, अहाहा, क्या बात है!

असाच एकदा मी (ऑफिसात काम करण्याऐवजी) प्रवासवर्णनं धुंडाळत बसलेलो असताना अचानक एक वेगळं प्रवासवर्णन समोर आलं. ‘गंदीकोटा आणि बेलम गुहा’ या दोन जागांचं. ही नावं तेव्हा मी पहिल्यांदाच ऐकत होतो. मी ते फोटो पाहिले आणि वेडाच झालो. अशा काही जागा आपल्या भारतात आहेत यावर ते फोटो समोर नसते तर मी विश्वासच ठेवला नसता. तेव्हा लगेच सुरू झालं त्यांची माहिती काढायचं काम. जागा जवळच म्हणजे आपल्या शेजारच्याच राज्यात (आंध्र प्रदेश) होत्या. खूप लांब जायचं नसेल तर माझं पहिलं प्राधान्य असतं ते रेल्वेला. तेव्हा लगेचच ती चाचपणी केली. नशिबाने या जागांपासून रेल्वेस्टेशन जवळच होतं आणि पुण्यातून सीएसटीएम - चेन्नई एक्स्प्रेस ही सोयीची गाडीही होती, तेव्हा तिनेच जायचं ठरवलं. बेत असा ठरला:

शुक्र: पुणे ते मुड्डनुरू रेल्वेने, रेल्वेत मुक्काम.
शनि: सकाळी मुड्डनुरूला पोहोचणे, तिथून खाजगी वाहनाने गंदीकोटा, गंदीकोटा स्थलदर्शन, गंदीकोटा मुक्काम.
रवि: खाजगी वाहनाने गंदीकोटा ते बेलम गुहा, बेलम गुहा ते ताडिपत्री, ताडिपत्री ते पुणे रेल्वेने, रेल्वेत मुक्काम.
सोम: सकाळी पुण्यात पोहोचणे.

ई-पत्रे नि फोनाफोनी केल्यावर घरातले पाच जण यायला तयार झाले.

आम्ही ज्या गाडीने प्रवास करणार होतो तिचे पुणे हे सुरुवातीचे स्टेशन नव्हते आणि मुड्डनुरू शेवटचे. शिवाय या गाडीला एकच 3AC डबा होता, तेव्हा 3AC तिकीटे मिळणे अवघड होते. आणि झालेही तसेच. 3AC तिकीटे आरक्षित करायला गेल्यावर ती मिळाली प्रतिक्षायादीतली. तेव्हा जाता येता स्लीपर क्लासने प्रवास करावा लागणार हे स्पष्ट झाले. सुदैवाने ती तिकीटे अजून उपलब्ध होती, तेव्हा ती काढली. गंदीकोटा येथे आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळ (APTDC)चे हरिथा हॉटेल आहे. (किंबहुना गंदीकोटा येथे राहण्याचा तोच एकमेव पर्याय आहे.) त्याचेही बुकिंग करून टाकले. आता सुरू झाला कंटाळवाणा वाट पाहण्याचा कार्यक्रम.

दिवस १

अखेर तो दिवस उजाडला (हे वाक्य प्रत्येक मराठी प्रवासवर्णनात असायलाच पाहिजे का?) ऑफिसातून थोडा लवकर निघालो आणि घरी पोचलो. बॅग भरून तयार होतीच. निघालो. आपली रेल्वे आता काही मिळत नाही असे वाटून रक्तदाब वाढणे ते रेल्वे स्थानकावर २० मिनिटे आधी पोचणे हा माझ्याबाबतीत हमखास होणारा प्रकार या वेळीही झालाच. आमच्या फलाटावर पोचलो आणि आमच्यासमोर एक अपघात होता होता वाचला. एका काकांनी धावत्या रेल्वेतून फलाटावर उडी मारली. बरं, मारली ते मारली, तीही चक्क रेल्वे जात होती त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून. होणार काय? काका धडामदिशी फलाटावर आदळले आणि धडपडले. माझ्या बहिणीने त्यांना सावरले म्हणून, नाहीतर काकांची पुण्यतिथी त्या दिवशी पक्की होती.

गाडीत स्थानापन्न झाल्यावर दिसलं की गाडी ब-यापैकी स्वच्छ होती. (कदाचित मुंबईहून नुकतीच सुटल्यामुळे असेल.) अर्थात् ती तशी राहणार नाही याची खबरदारी प्रवासी घेत होतेच. आम्ही जेवून घेतलं आणि झोपायची तयारी केली. आम्ही काही चहाबाज मात्र सोलापूरपर्यंत जागणार होतो - तिथे चहा पिऊन मगच झोपायचा आमचा बेत होता. अर्थात्, तो चहा प्यायल्यावर झोपलो असतो तर परवडलं असतं असं वाटलं ही गोष्ट वेगळी.
महत्वाचे: हे व खालील सगळी चित्रे टिचकी मारून मोठी पाहता येतील.
आमची गाडी:

सोलापूर रेल्वे स्टेशन:

दिवस २

ऊठलो आणि मस्तपैकी चहा मारला. रूळांचा खडखडाट आणि भणाणतं वारं या दोन गोष्टींचा त्रास असूनही ब-यापैकी झोप झाल्यानं आम्ही ताजेतवाने झालो होतो. नशिबाने गाडीही (जवळपास) वेळेवर धावत होती. नऊला आम्ही मुड्डनुरू स्थानकावर उतरलो. हे एक (अजूनही झोपेत असलेलं) गोड, चिमुकलं स्टेशन होतं. पण बाहेर आलो तर सगळा शुकशुकाट. बहुतेक वेळा रेल्वेस्टेशनबाहेर आलो की गाड्यांचे चालक आपल्यावर तुटून पडतात आणि आपलं अपहरण करतात - इथे असं काही नव्हतं. जीप, टॅक्सी असं काही नव्हतंच, फक्त ४/५ पियागो रिक्षा होत्या. इकडे तिकडे विचारल्यावर इथून २० किमी दूर जम्मलामडुगूला बसने जा आणि तिथून गंदीकोटाची बस पकडा असा सल्ला मिळाला. आता आमच्याकडे सामान होतं आणि वेळही कमी होता. तेव्हा बसच्या फंदात पडणं आम्हाला परवडणारं नव्हतं. तेव्हा आम्ही तिथल्या एका रिक्षावाल्याला गाठलं आणि घासाघीस करून सौदा पटवला. अर्थात हा एक चुकीचा निर्णय होता हे लवकरच आम्हाला कळून चुकलं. आम्ही (वजनदार) सहा जणं (अधिक रिक्षावाला) आणि आमचं सामान हे ओझं गाडीला पेलवत नव्हतं. त्यात जवळपास सगळा रस्ता चढाचा. गाडी अगदी मेटाकुटीला आली. एका चढावर तर पुढे बसलेले आम्ही दोघं उतरलो आणि सरळ चालू लागलो. शेवटी हाहू करत आम्ही गंदीकोटाला पोचलो तेव्हा तब्बल सव्वा तास उलटून गेला होता.

मुद्दनूर रेल्वे स्टेशन:

आमची सवारी:

रस्त्यात दिसलेला मेंढपाळ:

हॉटेलमधे पोचल्यावर आम्ही खोल्या ताब्यात घेतल्या आणि पहिल्या आंघोळी उरकल्या. गंदीकोटा स्थलदर्शन दोन टप्प्यांत करण्याचा आमचा विचार होता. पहिल्या टप्पात गंदीकोटा किल्ल्यातले अवशेष आणि दुस-या टप्पात गंदीकोटाची घळ. पहिला टप्पा जेवणाआधी होता तेव्हा आम्ही लगबगीने खोल्यांबाहेर पडलो आणि जेवणाची ऑर्डर द्यावी म्हणून भोजनकक्षात गेलो. ‘रोटी, सब्जी वगैरा रातको मिलेगा, अभी सिर्फ पोंगल मिलेगा’ हे ऐकल्यावर लोकांचे चेहरे उतरले, पण काही इलाज नव्हता.

गंदीकोटाचा किल्ला हॉटेलवरून अर्धा किमी असावा. ऊन भाजून काढत नसले तरी अंगावर गुदगुल्याही नक्कीच करत नव्हते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लिंबांची शेती होती. लिंबाची एवढी उंच झाडं मी तरी पहिल्यांदाच पहात होतो. गडाच्या आत जाण्यासाठी दरवाज्यांची श्रुंखला आहे. ३-४ दरवाजे असावेत. गडाच्या आत वस्ती आहे. त्यामुळे इतस्तत: फेकलेला कचरा, उघडी गटारे, इकडेतिकडे फिरणा-या कोंबड्या, कुत्री हे सगळे सुंदर प्रकार अर्थातच आत आहेत.

गंदीकोटा गावातील घरे

गंदीकोटाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही प्रकारच्या वास्तुंची सरमिसळ. इथ माधवराया स्वामी मंदिर, रघुनाथस्वामी मंदिर आहे आणि जामी मस्जिदही.

शेवटच्या दरवाज्यातून आत आलो की पहिला समोर येतो तो एक दगडी मनोरा. नंतर येते ती ही पाय-यापाय-यांची दगडी वास्तू. आतून पाहूनही हिचे काम काय असावे याचा पत्ता मात्र आम्हाला लागला नाही. नंतर आम्ही गेलो धान्यभांडारात. हे मात्र कमालीचे सुंदर होते. प्रचंड उंचीची ही इमारत पाहून युरोपातल्या चर्चेसची आठवण येत होती. इथे विलक्षण थंडावा होता आणि काही बोलताच प्रतिध्वनी येत होता.

धान्यभांडार:

1

नंतर आम्ही शिरलो जामी मशिदीत. मशिदीच्या आत एक कडूनिंबाचे झाड आहे. वारा मंद वहात होता आणि झाडाची पाने सळसळ करत होती. झाडाला बांधलेली गाय शांतपणे समोरचा चारा खात होती. आम्ही सोडलो तर मशिदीत बाकी कुणी पर्यटक नव्हते. ३/४ गावकरी सावलीला येऊन बसले होते तेवढेच. एकंदरीत वातावरण, हात डोक्याखाली ठेवून मस्त ताणून द्यावी असे होते. पण ते सुख आमच्या नशिबात नव्हते. दहा पंधरा मिनिटे रेंगाळून आम्ही निघालो.

जामी मशिद:

पुढचा थांबा होता माधवरायास्वामी मंदिर. हे मंदिर मात्र मला सगळ्यात जास्त आवडले. एक तर हे सुस्थितीत आहे आणि त्यात कोरीवकामाचीही रेलचेल आहे. एका मोठ्या गोपुराखालून आपण मंदिरात प्रवेश करतो. मुख्य मंदिराभोवती थोडी जागा सोडून ज्यातून चालता येईल असे मोठमोठे व्हरांडे आहेत. मंदिरात उभ्या घोड्यांचे कोरीवकाम पाहून हंपीची आठवण येत होती. ही असली मंदिरं मला आवडतात. मंदिर कसे हवे, तर तिथे भक्त आणि देव यांचा खाजगी संवाद होईल असे. अरे मी काय म्हणतोय ते तरी देवाला समजायला हवं की नको? आपल्या पुण्यात, कधीही जा, देवळं आणि हॉटेलं आपली भरलेलीच.

माधवरायास्वामी मंदिर:

थांबावेसे तर वाटत होते, पण काय करणार, भूक लागली होती, तेव्हा निघालो. येताना अगदी हसतहसत पार झालेला रस्ता आता भर दुपारी मात्र चांगलाच त्रासदायक वाटत होता. आमच्यापैकी २/३ जणांना स्थानिक वाहनांकडून ‘लिफ्ट’ मिळाली. माझ्यासारख्या काही कमनशिबी लोकांना मात्र चालतच हॉटेल गाठावे लागले.

जेवून आणि थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही परत पाचला निघालो. गंदीकोटाच्या त्या प्रसिद्ध घळीकडे जाण्यासाठीही सकाळच्याच रस्त्याने जावे लागते. सकाळी पाहिलेली सगळी ठिकाणे पार करून आम्ही घळीजवळ पोचलो. इथे मात्र गर्दी होती. जवळपासच्या लोकांचे हे फिरायला येण्याचे आवडते ठिकाण असावे.

गंदीकोटाच्या घळीला ‘भारताचा ग्रॅंड कॅन्यॉन’ असे म्हटले जाते आणि ते १०० टक्के खरे आहे. गंदीकोटाला लागून असलेल्या पन्ना नदीच्या पाण्याने जमिनीची धूप झाली आणि ही घळ बनली. (हे व्हायला अर्थातच लाखो वर्षे लागली.) नदीचे पात्र आता जवळपास १०० फूट खाली गेले असावे. गमतीची गोष्ट म्हणजे नदीचा अलीकडचा काठ मंद उताराचा (जो उतरून नदीपात्रापर्यंत जाता येते) तर पलीकडचा काठ मात्र अगदी सरळसोट आहे. सरळसोट म्हणजे एखादा दगड अगदी उभा कापल्यावर दिसेल तसा.

मोठमोठे दगड पार करून आम्ही पार कडेपर्यंत आलो. सूर्य अस्ताला चालला होता. आकाशातला पिवळा प्रकाश कुठेकुठे लालसा होताना दिसत होता. नदी दूरवरून वाहत येताना दिसत होती. पक्षी घराकडे परतत होते. रम्य तरीही गूढ, मनात कसलीशी हुरहुर निर्माण करणारे दृश्य होते ते.

पार अंधार पडल्यावर आम्ही उठलो. वाटेत एका टपरीत चहा मारला आणि हॉटेलवर पोचलो.
चहा टपरी:

रात्रीचे जेवण (आमच्या कल्पनेपेक्षा) फारच चांगले निघाले. अर्थात् एका सुंदर दिवसाची सुंदर सांगता झाली.

प्रतिक्रिया

मस्त, पुढील भागास शुभेच्छा

जव्हेरगंज's picture

14 Oct 2019 - 10:34 pm | जव्हेरगंज
जालिम लोशन's picture

14 Oct 2019 - 10:40 pm | जालिम लोशन

सुरेख

ढब्ब्या's picture

14 Oct 2019 - 11:18 pm | ढब्ब्या

छान परिचय

पद्मावति's picture

15 Oct 2019 - 12:54 am | पद्मावति

वाह, फारच मस्तं.

कंजूस's picture

15 Oct 2019 - 10:08 am | कंजूस

वाह, फारच मस्तं. यासाठी घरातले पाच जण तयार हे आणखी मस्त.

संजय पाटिल's picture

15 Oct 2019 - 10:19 am | संजय पाटिल

मस्त वर्णन...
आणि सुंदर फोटो.....

अनिंद्य's picture

15 Oct 2019 - 11:53 am | अनिंद्य

अनवट, सुंदर जागा; राखलेही सुस्थितीत आहे.
फोटोचे 'अँगल' विशेष आवडले.

फोटो खूप छान आलेत माधवरायास्वामी मंदिराचे, पुलेशु.

चौथा कोनाडा's picture

15 Oct 2019 - 3:22 pm | चौथा कोनाडा

वॉव, भन्नाट आहे ! वाचताना आपणच सोबत प्रवास करतो आहोत असं वाटलं !
सुंदर फोटो आनि चित्रदर्शी लेखन, शैली देखिल सुंदरच !
किल्ला आणि कॅनयॉन दोन्ही भारी आहेत, या ठिकाणांबद्दल पहिल्यांदाच वाचले.
इथं गेलंच पाहिजे सवड काढून !

एक_वात्रट _/\_

उपेक्षित's picture

15 Oct 2019 - 4:32 pm | उपेक्षित

उत्तम प्रवासवर्णन + एकसो एक फोटो

सतिश पाटील's picture

15 Oct 2019 - 5:02 pm | सतिश पाटील

लिखाण आणि ठिकाण दोन्ही आवडले.
जाण्याची इच्छा झाली.

भुमन्यु's picture

15 Oct 2019 - 6:52 pm | भुमन्यु

खूपच सुंदर वर्णन केलंय. आता हुरहूर लागली आहे इथे जाण्याची

जुइ's picture

15 Oct 2019 - 8:12 pm | जुइ

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले. नदी आणि त्यामुळे निर्माण झालेली घळी पाहून ग्रॅन्ड कॅनियनची आठवण झाली.

सुंदर जागा आहे ही... पुणे - हंपी - गांदिगड - हैदराबाद - पुणे असा एक ट्रॅक करता येईल

कृपया गंदिगड च्यााऐवजी गांदिकोटा वाचावे