फिश टँक ठेवणे

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
7 Oct 2019 - 10:40 pm

फिश टँक

प्राणी पाळणे म्हटले की कुत्रा, मांजर ,पोपट, ससा हे लगेच आठवतात. आता वन्यजीव कायद्याने पोपट,ससा,कासव,मोर वगैरे पाळणे शक्य नाही. त्यातूनही पळवाट म्हणजे पोपटांचे काही प्रकार भारतीय प्रजाति नाहीत  त्या पाळू शकतो. लहान मुलांकडून बऱ्याचदा कुत्रा मांजर पिलांसाठी हट्ट होतो पण इमारतीमधल्या ब्लॉक्समध्ये कठीणच जातं. घरात कुणीतरी कायम असावं लागतं. आणखी एक प्राणी आहे, तो म्हणजे मासा. फिश टँक नावाच्या काचेच्या पेटीतले फिरणारे मासे त्या दुकानात बघितल्यावर कधी वाटते की अशी टँक ठेवायची का घरात? जमेल का आपल्याला ते संभाळायला? वास येणार नाही ना? दहा बारा दिवस सुटीवर बाहेर गेलो तर मासे जगतील का? तर अशा या शोभेच्या मासे पाळण्याच्या छंदाविषयी हा धागा.

माझा हा छंद शाळेत असताना ( '७०) मध्ये सुरू झाला. काही वर्गमित्रांकडे मासे, पोपट, पांढरे उंदीरसुद्धा होते. "अरे, तू सुरू कर, करतो मदत" या बोलीवर एका अॅसीडच्या ( कार ब्याटरीची) छोट्या बरणीत दोन गप्पी मासे आले.  त्यावेळी मित्रांना विचारूनच बदल व्हायचे. पुढे एक काचेचा छोटा टँकच एकाने दिला. 12x9x9 इंचाचा. यामध्ये मग एक गोल्डफिश ठेवला. एकच मासा. तो सात वर्षं जगला. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे मासे ठेवून पाहिले. पण गर्दी  कधीच केली नाही. हवेचा पंप आणल्यावर थोडे मासे वाढवले. पंप बंद केला की पाण्यातली हवा कमी पडायची. मासे वर यायचे आणि कल्ले जोरजोरात हलायचे. मग पाणी बदलावे लागायचे.

निगा -
माशांची विष्टा आणि  न खाल्लेलं अन्न टाकीतच तळाला राहाते. ते कुजताना खूप ओक्सिजन लागतो. त्यामुळे खाणे कमी घालावे लागते. मी पोळीचा चुरा किंचिंत घालत होतो. ते खाणारेच मासे ठेवावे लागत. एंजल, किसिंग गुरामि, फाइटर हे मासे दिसायला छान असले तरी पोळी खात नसत. किडे ( बारीक गांडुळं) खायचे. मग ते देऊन टाकले. माझा गोल्ड फिश बरा होता, कणकेच्या गोळ्याही मटकावायचा. छोट्या टँकवर जास्ती काळजी घ्यावी लागते.

माहिती पुस्तकं -
कॉलेजला जाऊ लागल्यावर ब्रिटिश काउन्सल लाइअब्रीचा सभासद झाल्यावर या छंदावरच्या पुस्तकांचे घबाडच हाती आले. माशांची नावे, त्यांच्या सवयी, झाडे, अशी बरीच माहिती वाचून कळली. फोटोही भरपूर. तेव्हा अशी महागडी हार्डकवर पुस्तके कोण विकत घेणार? वाचल्यावर पहिलं महत्त्वाचं लक्षात आलं की टँक आणि पाणी सीझन्ड ( स्थिर) करायला पाहिजे. मग मासे सोडायचे.

पाणी आणि आक्सिजन. -

त्यासाठी पाणी भरून झाडं मिळवली आणि लावली. लावायची म्हणजे झाडांचा खालचा भाग एका दगडाला बांधून ठेवयचा. कारण मोठे मासे ती ओढतात. खाली बारीक खडीचा एक दीड इंचाचा थर द्यायचा. समजा हातातून दगड निसटला तर तो थेट खालच्या काचेवर आदळत नाही. चारपाच झाडे इकडे तिकडे ठेवायची. झाडं वाढण्यासाठी सूर्यप्रकाश लागतो. खिडकीची जागा चांगली. एक दोन तास ऊन आले तर झाड वाढतय असं दिसू लागतं. घराच्या आत टँक ठेवला तर कृत्रिम उजेड द्यावा लागतो. हे काम जरा जोखमिचं आणि लक्ष ठेवावे लागणारं असं आहे. म्हणजे असं की इलेक्ट्रीक वायर आणि पाण्याचा संबंध येता कामा नये. शिवाय पाण्याचे तापमान फार वाढता कामा नये. खूप उजेडाने शेवाळ लगेच वाढतं. मला या लाईटपेक्षा खिडकी बरी वाटली. नैसर्गिक प्रकाश उत्तम. इथे रात्री मासे पाहता येत नाहीत परंतू ते शांत झोपतात. ट्युबच्या उजेडाने दचकतात. पंधरा वीस दिवस वाट पाहायची. झाडं थोडी वाढताहेत असं दिसलं की मासे सोडता येतात. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे शहरातील नळाने येणाऱ्या पाण्यात निर्जंतुक करण्यासाठी जो क्लोरिन वायू मिसळलेला असतो तो गेलेला असतो. नळाच्या पाण्यात काही मासे लगेच मरतात या क्लोरीनमुळे.

माशांचं समाजजीवन, आरोग्य.

आपण एका छोट्याशा जागेत पाच दहा मासे ठेवतो तेव्हा त्यांचा एकमेकांशी सहवास सुखाचा असावा लागतो. एखादा दादागिरी करणारा मासा इतरांना किंवा दुसऱ्या एखाद्याला पाठलाग करून चावतो का हे लगेच पाच सहा तास लक्ष ठेवून पाहावे लागते. तसं दिसल्यास त्यास वेळीच काढावे लागते.

पाणी खराब, फार गरम असल्यास त्यांना त्रास होतो. लगेच बाहेर काढावे लागते. मासे सोडल्यावर ते लगेच तळाशी जाऊन शांत बसले, कल्ले भराभर हलत नसले तर ते उत्तम लक्षण आहे. आक्सिजन भरपूर असला की त्यांचे कल्ले सावकाश हलतात.

आपल्या घरी आलेली काही लहान मुले टँकच्या काचेवर जोरजोरात ठोकून माशांना पळवतात. त्यांपासून सावध असावे.

तर आता आपला टँक तयार आहे. झाडे आणि मासे एकमेकास आक्सिजन आणि कार्बन डाई आक्साइड वायूंची देवाणघेवाण करत राहिल्याने एकप्रकारचा संतुलितपणा राहतो. रोज दोनवेळा निरिक्षण करून एखादा मासा अस्वस्थ दिसल्यास त्याला बाहेर काढावे लागते. पसरट ट्रेमध्ये चार पाच इंच पाण्यात तो बरा होतो.

खाद्य ---

लगेच पहिल्या दिवशी खाणे देण्याची गरज नसते. मासेविक्याने भरपूर खायला घातलेले असते. दुसऱ्या दिवसापासून तयार गोळीबंद फिशफुड पाण्यात टाकले की मासे खातात. याचे तंत्र शिकावे लागते. किंचीत पाण्यात या बारीक टणक गोळ्या दोन मिनिटे भिजवून वाटून टाकणे उत्तम. फक्त एकदाच सकाळी टाकावे. ते दिवसभरात माशांनी संपवले पाहिजे. नाही तर कमी टाकावे. उरलेले कुजून पाण्यातला आक्सिजन भराभर संपवतात. गप्पी, ब्ल्याक मॉली आणि काही इतर मासे शेवाळही खातात. त्यांना दहा पंधरा दिवस फिशफुड दिले नाही तरी शेवाळ्यावर जगतात.
जिवंत खाद्य माशांना फार आवडते पण त्याचेही तंत्र आहे.
----------
या छंदावरच्या लेखाला सुरुवात केली आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. पंप,फिल्टर,नवनवीन रंगीत प्रकारचे मासे, इतर जलचर, फिश टँक रिपेरिंग इत्यादी. यावर युट्युबवर विडिओज तसेच माहिती देणाऱ्या वेबसाईटसही खूप आहेत. तुम्हीही तुमची माहिती द्या, प्रश्न विचारा. तंत्र जमले तर हा छंद खचितच आनंद देतो, घराची शोभा वाढवतो.

फोटो १ )
सध्याचा टँक. यात तीन प्रकारची झाडे आहेत.
झाडे वाळूमध्ये/खडीमध्ये चांगली वाढत नाहीत. एका डब्यात मातीमध्ये लावून ती सावकाश खाली ठेवली आहेत. टँक बाल्कनीत आहे, दोन तास ऊन पडते. दोन टेट्रा आणि दोन (खोटे)डॉलर मासे आहेत. ते बराच वेळ तळाशी लपूनच बसतात.

फोटो २ )
पाण्यावर तरंगणारी पाने कमळाची ( वॉटर लिली) आहेत. त्याने आडोसा तयार होतो.

((( फिश टँक साईज
किती इंची टँकमध्ये किती पाणी राहील.
12x12x12=1728 cubic inches=1cu foot = 7.481 us liquid gallon=28.3 litres

1.34 cubic foot = 10 gallons

15x12x10. =1800 cu inches= 1+~ cu ft= 30litre

16x12x9 = 29litre
24×20x15 = 4 cubic foot

24x18x12 = 3 cubic foot =5184cu inch
2 cu ft = 3456 cu inch
24x12x12 =3456 cu inch = 2 cu ft =56 lit
18x12x10 =1.25cu ft =~10gallons =~35 litres
18x12x9 = 32 litre (1.1cu ft)
18x12x12 = 42.3 litres
साधारणपणे पंचवीस लिटर्स पाण्याने भरलेला टँक उचलून दुसरीकडे ठेवता येतो. त्यापेक्षा मोठा असल्यास पाणी कमी करूनच हलवता येईल.
12 inch diameter fish bowl volume =4x22x12x12x12÷3÷7÷8= 905 cu inches = 0.5 cu ft = 14 litres.
Less (2÷3)( 22÷7×h.square) (3×r-h)
(2÷3)(22÷7×2×2)(3×6-2)
(2÷3)(22×2×2÷7)(10)
2×22×2×2×10÷3÷7
22×80÷21
~80 cu inch
905-80 = 825 cu inch
= 0.477 cu ft
=~13 lit.

3.785x7.481=28.3

1 gallon = 231 cubic inch

1 gallon = 3.785 litre
2 gallon = 7.6 litre
3 gallons = 11.4 litre
4 gallons = 15.1litre
5 gallons = 19 litre

6 gallons = 22.7 lit
7 gallons = 26.5
8 gallons = 30.25
9 gallons = 34
10 gallons = 37.85

7.481x231 =1728 cubic inch
12x9x9. = 972 cu inch = 0.56cu feet = 15 litres =4 gallons
5 gallons = 1155 cu inches.
12x10x10= 1200. cu inches.
15x12x12 = 35 lit )))

बरेचसे रंगीत मासे अमेझोन नदीतले किंवा सिंगापुरकडचे पूर्वी इकडे आयात केले आहेत. आता पैदास इकडेच होते. झाडेही तिकडचीच. आपल्याकडे तळ्यामधले मासे चंदेरी असतात. टँकसाठी शोभत नाहीत. पण झिंगे टाकले तर ते तळाचे उरलेले फिशफुड खाऊन साफ करायला मदत करतात.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

8 Oct 2019 - 10:59 am | तुषार काळभोर

लेखमाला आहे का? वा!!

माशांचे प्रकार (सचित्र) , समाज जीवन - कोणत्या प्रकारचे मासे एकत्र ठेवता येतात/ठेवू नयेत नयेत, हे वाचायला आवडेल.

कंजूस's picture

8 Oct 2019 - 12:19 pm | कंजूस

समाज जीवन - compatibility search केल्यावर तक्ते मिळतीलच. पण साधा नियम म्हणजे स्वस्त मासे आणि महागडे मासे ( discus डिस्कस वगैरे ) एकत्र ठेवूच नयेत कारण सरळ आहे महागडा मासा मरणे नुकसानकारक.

दुसरं म्हणजे मासे एकमेकांची पिलं खातात. पिलावर/अंड्यावर आलेला मासा वेगळा ठेवावा लागतो. काही मासे पिलंच घालतात तर काही अंडी घालतात. एका टँकने सुरुवात करतो पण नंतर एक टँक वाढतो याचे कारण हेच आहे.

काही मासे टेट्रा जातीचे एक समुहात राहायला पसंत करतात त्यास school म्हणतात. ते दिसायलाही छान वाटते. सर्वजण एकाच वेळी फिरतात.

मर्यादित जागेमुळे माशांचे नर एकमेकांशी भांडतात, दुबळ्याचा सतत पाठलाग होऊन तो मरतो.

एकाच दुकानातून आपण माशाची जोडी आणतो तेव्हा ती सर्व एकाच माशाची पिले असू शकतात. एकण सप्लायर मासे देऊन जात असतो. यांच्यापासून होणारी पिल्ले सशक्त निघत नाहीत. वेगळ्या ठिकाणाहून जोडी आणून अदलाबदल करणे हा उपाय आहे. त्यासाठी दूरच्या मित्राचे सहकार्य घेता येईल.

माशांच्या ठाणे शोधण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तळाशी ,आणि वरती खाणे शोधणारे ठेवल्यास टँकमध्ये न खाल्लेलं फिशफुड उरत नाही. शेवाळं खाणारेही हवेत.

चौकटराजा's picture

8 Oct 2019 - 12:58 pm | चौकटराजा

आमच्या घरी आज गेली ४ वर्शे फिश टॅंक आहे. लहान आहे. पहिल्यादा ८ मासे होते चार मेले . चिंगळी टेट्रा होते. पण उरलेले चार त्यात तीन गोल्ड फिश व एक शार्क आता वाढले आहेत. फिश वाल्याला म्हणालो " एक्सचेन्ज ऑफर " दे ,मराठी माणूस . नाही म्हणाला ." नवे घ्या म्हणतो ! " दहा दिवसांनी सर्व " माल " बाहेर काढून संपूर्ण टॅन्क धुतो .एअर पम्पातला फिल्टर साफ करतो .माशाना फिरण्याचा कंटाळा कसा येत नाही ?, खार कधी दमते ? माकडांच्या देहात तृप्तीची ढेकर द्यायची सोय निसर्गाने का केली नाही ? असे प्रश्न आहेत !

एक्सचेन्ज ऑफर कोणताच मासेवाला देत नाही. ते शार्क एकाने मला देऊन टाकले. वळवळणारे शार्क बघायचा फार कंटाळा येतो. मग मी दुधवाल्याकडून एक ट्रे आणला त्यात पाणी भरून खाली माती घातली. चिखलात मेक्सिकन स्पिअर झाड लावले. याची मुळे पाण्यात/चिखलात वाढतात आणि पाने वर हवेत येतात. सुंदर पांढरी फुलेही येतात. तर या टबात सोडले शार्क. ते आनंदात राहिले कारण नैसर्गिक पाणी, चिखल. कणकेचे गोळे खात. बाल्कनीत असल्याने ऊन मिळायचे.

माशाच्या लांबीच्या दहा बारा पट लांबी टँकची असावी लागते. म्हणजे चार इंची शार्कला चाळीस इंची टँक हवा.

कंजूस's picture

8 Oct 2019 - 2:18 pm | कंजूस

मेक्सिकन स्पिअर झाड
अंगणात तळे केल्यास कडेला हे झाड चिखलात लावता येते. जोमाने वाढते, छान दिसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2019 - 2:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन. असा फिश Tank करायचा वाटतो. पण मासे मरतात म्हणून ते टाळत आलो. पाणी वरचेवर बदलावे लागते का ?

आणि हौदात सोडलेले मासे जीवंत का राहात नाहीत ? त्या बद्दलही माहिती सांगावी. भयंकर वास येतो हौदाच्या पाण्याला आणि मासे मरतात हेही पाहिलं आहे.

-दिलीप बिरुटे

कोणत्याही टाकीत नव्याने मासे सोडताना ते मासे जर दुकानातून आणले असतील तर ती पिशवी सुमारे अर्धा तास हौदात किंवा फिष्टँक ज्यात मासे सोडायचे आहेत त्यातील पाण्यात आर्धा तास तशीच ठेवा जेणे करुन दोन्हीं पाण्याचे तापमान सारखे होईल ,मग मासेत्या पाण्यासह सोडा( तापमानातील फरक मासे सहन करत नाहीत)

हौद्यात अती शेवाळ असेल त्यामुळे पाण्यात ऑक्सिजन कमी असेल तर मासे टिकणे अवघड.

कंजूस's picture

29 Apr 2020 - 7:15 am | कंजूस

>>> हौद्यात अती शेवाळ असेल त्यामुळे पाण्यात ऑक्सिजन कमी असेल तर मासे टिकणे अवघड. >>>>

शेवाळाने मासे मरत नाहीत. ऑक्सिजन कमी होण्याचे कारण म्हणजे हौद सार्वजनिक असला तर येताजाता कुणी माशांसाठी अन्न टाकतो ते फार होऊन कुजते.

हौदाची खोली फार नसावी. एक फूट ठीक। पण लांबी रुंदी अधिक.

फिश ट्यान्कमध्ये मासे सोडताना नवीन माशांची पिशवी अर्धा तास तशीच पाण्यात ठेवावी हे बरोबर. पण अगोदरच असलेल्या माशांची प्रतिक्रियाही दोन तास बघावी लागते. तसेच गर्दी चालत नाही.
महागडे मासे पाळण्या अगोदर स्वस्त माशांवर प्रयोग करून ट्यान्क, पाणी, झाडे, ऑक्सिजन, स्वच्छता याचा चांगला अनुभव घ्यावा.

असा फिश Tank करायचा वाटतो.
इकडे फोटोत दिलेला माझा टँक दुकानात असतो तसा सुंदर मुळीच नाही. पण तो स्वतंत्र आणि कमी खटपटीचा आहे कारण ते शेवाळ . सर्व झाडांमध्ये शेवाळ हे सर्वात कार्यक्षम आक्सिजन बनवणारी वनस्पती आहे. शिवाय ते गप्पी जातीच्या माशांचे अन्न आहे. याच टँकमध्ये कोणताही हवेचा पंप /आणि पाणी फिल्टर न लावता तीस ब्लंयाक मोली ठेवले होते. ते सर्व तळाशी शांत बसायचे. भरपूर आक्सिजन आणि तोही पाण्यात विरघळलेला शेवाळच देते. मग एक युक्ती केली.दुसरा एक टँक घरात ठेवला. झाडे प्लास्टिकचीही चालतील. सजवला स्फटिकाचे गोटे ठेवून. बाल्कनीत ठेवलेल्या टँकातले चार मासे खाणे द्यायच्या अगोदर या शोभेच्या टँकात सोडायचे. पण तिथे खाणे अजिबात टाकायचे नाही. उजेड फार नसल्याने आणि खाणे न टाकल्याने पाणी लवकर खराब होत नाही. हे चार मासे दुसरे दिवशी बदलायचे. करून पाहा.

हौद - बहुतेक विटा सिमेंटचा बांधतात आणि नळाचे पाणी आले की यात साठवून ठेवतात तो असावा. गोची नळाच्या पाण्याने होते. मासे सोडण्यासाठी हौद खोल नसावा. विहिरीचे पाणी चालते. परंतू आजुबाजूच्या झाडांच्या मातीत वाळवीनाशक /सूत्रकृमिनाशक रसायन टाकले ( फ्युरान वगैरे )तर ते विहिरीच्या पाण्यात उतरते. अगदी पिपिएम लेवललाही मासे मारते.
शिवाय माशांना खायला घातलेले खाद्य खोल हौदात तळाला गेल्यावर तिकडे आक्सिजन कमी असल्याने तिकडे मासे फिरकत नाहीत. साताठ दिवसात तळाशी साचलेले खाद्य कुजून पाण्यातला आक्सिजन गायब होतो. मासे पाण्याच्या पृष्ठभागाशी आक्सिजनसाठी तोंड उघडमीट जोरात करत ल्हायल्हाय करत फिरताना दिसतात. अरे, यांना खाणे हवय समजून आणखी खाणे ( पोळीचा कुस्करा वगैरे ) टाकले जाते. आणि परिणाम आणखीनच वाईट होतो. बरं हौदात कोणी पाणवनस्पती लावत नाहीच.

उपेक्षित's picture

8 Oct 2019 - 5:27 pm | उपेक्षित

हायला कंजूस काका किती चौफेर व्यक्तिमत्व आहे तुमचे ? दंडवत घ्या आमचा _/\_

चौकटराजा's picture

8 Oct 2019 - 5:47 pm | चौकटराजा

आयुष्य खूप थाटात जगण्यासाठी खिसा मोठा असावा लागतो हे खरे पण फार नाही . मनात कल्पकतेचा ,उत्साहाचा झरा सतत वहावा लागतो . कंजूष काका हे पुरते जाणून आहेत .नेहमी नवीन शिकण्याची आस मरेपावेतो असेल तर म्हातारपण ही सुखावह व समृद्ध होते !

कित्येक पालकांना आपल्या लहान मुलांचा हा मासे पालनाचा छंद करावासा वाटला ते मिळालेल्या माहितीतून पुरा करू शकतील एवढी माहिती लेखातून मिळावी ही इच्छा आहे. त्यांना स्वतः करता येत नाही. टाकीचं वजन असते. ती अधुनमधून साफ करावी लागते.
दुकानात नवीन गिऱ्हाइक आले की टाकी, खडी,पंप, फिल्टर,खाणे, मासे असा बराच माल गळ्यात बांधतात. सुरुवातीला फक्त टाकी,खडी आणि झाडे एवढेच विकत घ्यायचे आहे. वर सांगितल्याप्रमाणे टाकीत पाणी घालून झाडे ठेवून पंधरा दिवस सेट झाल्यावरच दोन चार छोटे मासे ठेवावेत. घाई करू नये.

जालिम लोशन's picture

8 Oct 2019 - 11:40 pm | जालिम लोशन

वेगळ्या ट्रेमधे ठेवतांना त्या पाण्यामधे Teramycin नावाची pfizer ची कॅपसुल मिळते ती एक ऊघडुन त्यातील औषध पाण्यात मिसळावे व त्या पाण्यात अर्धा एक तास मासे ठेवावेत टेरामायसीन न मिळाल्यास Doxy नावाची दुसरी एक कॅपसुल मिळते ती वापरावी हे एक टेट्रासाक्लिन गटातील प्रतिजैविक आहे. जिवाणु, परोपजिवी किटाणु, बुरशी ह्या सारख्या रोगांच्या लागणी विरुध्द चांगले ऊपयुक्त आहे.नोंद करुन ठेवावे.

लहान मुलांसाठी टॅन्क तयार करायचे असेल तर एकाच माश्यापासुन सुरुवात करावी. मग पुढे जावुन त्यांच्या कलाने मोठी टाकी घेता येते.

माझा अनुभव ह्या बाबत एकदम चांगला आहे. माझ्या मुलीला (तेव्हा वय ३ वर्ष) मासा पाळायचा होता. सांभाळायला सोपा म्हणून बीटा (मराठी नाव माहित नाही) मासा निवडला. मी आधी एक टाकी(६ लिटर) , एक बीटा मासा, खडी, खाणे, आणि फिल्टर इतकेच घेतले. २ वर्षे तो मासा जीवंत होता.

त्याचे सगळे काम करताना मी लेकिला सोबत घेत होतो. कामे मोजकीच, महिन्यातुन एकदा टाकी साफ करणे, महिन्यातुन दोन वेळेस थोडे पाणी बदलणे, आठवड्यातुन ३-४ वेळेस खायला देणे. पुढे तो मासा मरण पावल्यावर, मी टॅन्क ठेवुन दिला.

पुढे वर्षभरात २-३ वेळेस तीने नवा मासा आणण्याबद्दल सुचवले, पण मी टाळले. एकदा फारच मागे लागल्यावर मात्र तीला 'तु त्याची काळजी घ्यायची' ह्या अटीवर मासा आणला. हा नवा बीटा मासा, 'सॅण्डी' आता २ वर्षाचा होईल. गेल्या २ वर्षात त्याची व्यवस्थीत देखभाल मुलीने केली. त्याला खायला घालणे, पाणी कमी झाल्यास टाकीत पाणी भरणे ही कामे ती नियमीत पणे करते (अधुन मधून आठवण करुन द्यावी लागते). पाण्याची टाकी मीच साफ करतो, पण वेळापत्रक लक्षात ठेवून ती माझ्याकडुन काम करवुन घेते. शिवाय तिने माश्यासाठी काही खोटी झाडे, घर वगैरे आणली आहेत , ती ते साफ करते.

यशोधरा's picture

8 Oct 2019 - 7:45 pm | यशोधरा

वाचते आहे..

सुधीर कांदळकर's picture

9 Oct 2019 - 7:50 am | सुधीर कांदळकर

मस्त विषय. आपण छान उपयुक्त सूचना दिलेल्या आहेत. दादरला अनेक विहिरी आहेत. त्यातल्या एखाद्या विहिरीतले पाणी आणून दोन आठवडे शिळे करून मग आम्ही टँकमध्ये ते सोडत असू.

ऑक्सिजन भरपूर असल्यावर मासे कल्ले कमी हालवतात हे आपले निरीक्षण फारच सुरेख. हे मला कळलेच नव्हते. पाणी बदलल्यावर ब्लॅक मॉली तळाशी जाऊन गपचूप बसतात हे पाहून मला खूप काळजी वाटे. गप्पी मासे इतर माशांच्या शेपट्या वगैरे पण फार खातात. किसिंग गुरामी, मिशीवाले ब्लू गुरामी एंजल, टेट्रा यांच्या हालचाली फारच सुंदर आणि मोहक वाटतात. वाचन चालू असतांना अधूनमधून कोकांब्यातून आणि अ‍ॅमेझॉन झाडांमधून होणार्‍या त्यांच्या हालचाली निरखत विचार करणे हा एक निखळ आनंद आहे. आणि हो. डॅफनीज आणि प्लॅस्टीकच्या जाळीदार भांड्यातले किडे पण छान दिसतात.

याच विषयावर आणखी वाचायला आवडेल.

धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Oct 2019 - 8:40 am | ज्ञानोबाचे पैजार

अपुर्‍या माहिती मुळे हा छंद जोपासायचा राहून गेला. बरेच दिवस मी या वर विचारच करतो आहे. मस्त्यपालनावर मधे दोनचार पुस्तके सुध्दा घेतली पण मासे मरतील या भितीने टँक विकत घेण्याचा धीर झाला नाही. काही मित्रांकडचे मासे आठ आठ दिवसात मेलेले व त्या नंतर टँक माळ्यावर जाउन पडलेले पाहिले असल्याने दोलायमान अवस्था होत होती. पण आता काकांचा हा लेख वाचून पुन्हा एकदा मासे पाळायचा विचार बळावत आहे. बघू...

पैजारबुवा,

नूतन's picture

9 Oct 2019 - 3:46 pm | नूतन

लेखमालेचा विषय आवडला. चांगली माहिती मिळतेय.

भंकस बाबा's picture

9 Oct 2019 - 6:41 pm | भंकस बाबा

मस्त विषय,
मी गेले 30 वर्षे मासे पाळत आहे. अनुभवाने ज्ञान वाढते या उक्तिने 30 वर्षे अव्याहत मासेपालन केले आहे. सध्या 4 फुटाचे दोन व 3 फुटाचा एक असे तीन टैंक आहेत. माझा अनुभव असे सांगतो की मोठा टैंक देखभाल करण्यास सोपे असते. सायफन पद्धतीने दर चारपाच दिवसांनी खालील घाण काढली की वर्षेभर पाणी बदलण्याची गरज पड़त नाही. पण कधी पाणी जास्त घाण होते तेव्हा सर्व मासे एका मोठ्या टबात काढून पाण्यात चमचाभर तुरटी टाकली की सर्व घाण खाली बसते , सायफन करून ती घाण काढून टाकावी. विश्वास ठेवा पाणी अगदी काचेसारखे साफ होते. बाकी माहिती नंतर टाकिन

भंकसबाबा लिहा तुमचे अनुभव.

भंकस बाबा's picture

9 Oct 2019 - 11:55 pm | भंकस बाबा

मी सुरुवात केली होती मासे पाळायला ती गप्पी माशानी. नंतर आमची हौस वाढत गेली. घरच्यानी पण चांगला पाठिंबा दिला. एक फुटाच्या टाकीनंतर तीन फुटाची टाकी घरी आली. तरी आमची हौस गप्पी, सोर्डटेल, मौली या माशांच्या पुढे जात नव्हती. हे मासे दिसायला सुंदर असले तरी यांचे आयुष्य छोटे असते. जेमतेम दीड दोन वर्षे हे मासे जगतात. त्या मानाने गोल्डफिश, ऑस्कर, गुरामी हे मासे चांगले दीर्घायुषी असतात. माझ्याकडे असलेल्या एका गोल्डफिशने तब्बल 6 पावसाळे बघितले होते. एक फ्लॉवरहॉर्न पाच वर्षे होता माझ्याकडे!
ज्याना पाणी बदलण्याचा कंटाळा येतो त्यांनी गुरामी जातीचे मासे पाळावेत , हे मासे जगायला कणखर व ऑक्सीजन पंप नसला तरी आरामात रहातात. शिवाय पाणी थोडे खराब झाले असेल तरी टिकून रहातात. पहिल्यांदा हे मासे पाळून अनुभव वाढवावा नंतर एंजेल, डिस्कस, फ्लॉवरहॉर्न, हे मासे पाळावेत. एंजल तसा स्वस्त मासा आहे, पण डिस्कस, फ्लॉवरहॉर्न हे मासे कमालीचे महाग आहेत. हौशी पालनकर्त्यानी कधीमधे कुर्ला(मुंबई) पूर्वेला असलेल्या होलसेल बाजाराला भेट द्यावी. पुष्कळश्या नवनवीन जाती व अनेक वरायटी येथे बघायला मिळतील.
आजकाल फ्रेम नसलेल्या टाकीची क्रेज आहे. इथे तुम्हाला फक्त चीनी बनावटीच्या टाकयाच मिळतील. कोणतीही भारतीय कंपनी अशा टाकया बनवत नाही.गेल्या वर्षभरात कोणी आले असेल तर ठावुक नाही.

लेख फार ज्ञानपूर्ण आहे यात काही शंका नाही . एकुलता एक गोल्डफिश 7 वर्षं टॅंक मध्ये एकटाच राहिल्याचं वाचून मात्र पोटात तुटलं .. मोठ्या फिश टॅंक मध्ये माशांचं आयुष्य समुद्रातील आयुष्याच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि शाश्वत असू शकतं म्हणून एक वेळ फिश टॅंक जस्टीफाईड मानले तरी एकट्याने राहून एकट्यानेच मरण्याची कल्पना फार वाईट वाटते ..

एका सर्कशीतल्या की अशाच कुठल्यातरी कॅप्टिव्हीटी मध्ये असलेल्या हत्तीचा फोटो आठवला .. हत्ती हे समूहजीवन जगणारे प्राणी ... त्या ठिकाणी अनेक वर्षं तो एकटाच हत्ती / हत्तीण ... एकटेपण असह्य झालं की तो आपल्या सोंडेत आपली शेपूट धरायचा ... म्हणजे एका खोलीत उर्वरित आयुष्य घालवायची शिक्षा झालेल्या माणसाने एकटेपणा असह्य होऊन आपलाच एक हात दुसऱ्या हातात घ्यावा आणि दुसऱ्या माणसाने तो धरला आहे अशी क्षणभर समजूत करून घ्यावी .. त्याप्रकारची कृती ....

https://pics.me.me/she-is-so-lonely-she-holds-her-own-tail-wild-24974491...

तुमच्या हौसेसाठी मासे अगदी ठेवायच्चेच असले तर किमान एका जातीचे किमान दोन या संख्येने ठेवायची मिनिमम सहानुभूती दाखवावी असं मला वाटतं ...

भंकस बाबा's picture

10 Oct 2019 - 4:24 pm | भंकस बाबा

प्रतिसाद दिल्याबद्दल
या गोल्डफिशसाठी मी तीन वेळा जोडीदार आणले, पण साहेबांना एकलकोंडे रहायची सवय झाली होती बहुतेक!
त्यांनी आणलेल्या जोडीदाराकडे ढुंकुंन ही पाहिले नाही. नंतर नवीन माशासाठी जोडीदार आणावे लागले.
आपण घरी पाळतो ते मासे बहुत करून गोड्या पाण्यातील असतात. आजकाल मरीन फिश ठेवायची प्रथा सुरु झाली आहे. पण यांना काटेखोर देखभाल व पैसे खर्च करावे लागतात. पण मरीन फिशमधे इतक्या विविधता आहेत की डोळ्याचे पारणे फिटते.
काही मासे एकलकोंडे रहाण्यास पसंद करतात. फ्लॉवरहॉर्न , बेटा फिश(फाइटर) हे मासे नेहमी एकटेच रहातात. काही मासे झुंडीने रहातात, टेट्रा, बार्ब, मौली या माशाना एकत्र रहायला आवडते. असे असले तरी काही वेळा यातील नर आपसात मारामारी करतात.

एकटेपणा-
एकुलता एक गोल्डफिश 7 वर्षं टॅंक मध्ये

आता केवळ छान छान केलेल्या गोष्टी सांगणे ही फसवणूक ठरेल. जे काही झाले ते सांगितले पाहिजेच. मासे आणि इतर प्राणी मुके असतात. ते बोलत नाहीत पण त्रास होतच असणार. नंतर जेव्हा टबात झाडे लावून मासे ठेवले तेव्हा ते फार तरतरीत वाटायचे.

मला बी लय इच्छा व्हती मासे पाळायची, सगळ्या मित्रां मध्ये मत्स्यपालनाची क्रेझच आली होती... पण हा मोह देखील टाळला !
मला सकर फिशची नेहमीच गंमत वाटत आली आहे ! काचेला तोंडाच बुच्चण लावुन गप पडुन असतोया.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- प्यार तुम मुझसे करती हो डोन्ट से नो... ;) :- Ghayal

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2021 - 2:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फिश tank होईल तेव्हा होईल पण पाच बाय पाच आकाराच्या हौदात काही तिलापिया मासे सोडले आहेत, १०० ग्राम वजन किंवा अधिक आहेत असे सात नग आहेत. मस्त विहार सुरु आहे. मुरमूरे खाद्य म्हणून सोडत आहे, अजून काय काळजी वगैरे...मदत करावी. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

म्हणजे तसं असेल तर मत्स्योत्पादनवाले चांगली माहिती देतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2021 - 5:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोड्या पाण्यातले आहेत, आपल्याकडे गोड्या पाण्यात या तिलापिया माशांचा फार सुळसुळाट झालाय. सकाळ पासून आत्ता पर्यन्त तरी चांगला प्रतिसाद आहे, पाण्याला वास येतोय. पाणी बदलून टाकेन लवकरच.

-दिलीप बिरुटे

म्हणजे यांच्या पिलावळीवर दुसरे मासे वाढवतात.

सरिता बांदेकर's picture

22 Jan 2021 - 5:57 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद. तुम्ही खूप सविस्तर माहिती दिली आहे.मी पण चुकत माकत, गुगलची मदत घेत ठेवल्या होत्या टॅंक. मी एकच टॅंक न ठेवता ४ छोट्या आणि एक मोठी टॅंक ठेवली होती.आजारी मासे वेगळे करायला त्यातली एक ठेवली होती.
माझा फ्लॅवर हॅार्न मासा आंधळा झाला.त्यावर खूप उपाय करायचा प्रयत्न केला पण त्याने एक कोपरा पकडून ठेवला आणि काही न खाता पिता तो गेला.
मी एक कासव पण पाळलं होतं. ते पण त्या माशांबरोबर खूप खेळायचं.ते पण आधळं झालं होतं पण ॲप्लीकॅप म्हणजे आपण जे डोळे आल्यावर डोळ्यात घालतो त्याने बरं झालं.
पण माशाला मात्र डोळ्यात औषध घालता आलं नाही. तो मासा आमच्याशी खूप खेळायचा.

कंजूस's picture

22 Jan 2021 - 6:09 pm | कंजूस

Pdf(5mb) link download

https://www.farmafrica.org/downloads/kmap/fish-farming-booklet.pdf

Tilapia fish farming. माहिती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2024 - 10:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
fishtank
मस्त मजेत राहा रे बाबांनो

कंजुसकाका तुमच्या नादी लागून फिश टँकचा कुटाना सेट केला. घरी येऊन फिश टँकचं काम फीश वाल्याने करुन दिलं. घरी भिंतीत कडप्पे होते त्यातलं एक काढून भिंतीत सेटप केला. काल नऊ मासे होते आज रस्त्यावर विक्रेता करणा-याचा एक घेतला दहा झाले. काम धंदे सोडून माशांच्या हालचाली पाहात राहिलो. नवीन असल्यामुळे तसं असावं. फिशफूडची एक पूडी दिली आहे, प्रती मासा चार दाणे खातील म्हणे सगळ्यांना मिळेल की नाही, याची काळजी लागली. मी आठ आठ दाणे टाकले. उपाशी नको बिचारे. फक्त बारीक बबल्स दिसत आहेत पाण्यात काय करावे ते समजत नै ये. त्यांनी दिलेली औषधे पाण्यात सोडली. हिटर लावलंय. ऑक्सीजनचं फिल्टर सुरु आहे. बाकी, भारी वाटतंय.

-दिलीप बिरुटे

सुरिया's picture

14 Dec 2024 - 6:34 pm | सुरिया

प्रती मासा चार दाणे खातील म्हणे सगळ्यांना मिळेल की नाही, याची काळजी लागली. मी आठ आठ दाणे टाकले. उपाशी नको बिचारे. फक्त बारीक बबल्स दिसत आहेत पाण्यात काय करावे ते समजत नै ये.

जास्त खाउ घातलेत. आता झाला ना ग्यास त्याना. त्याचेच बबल्स आहेत. इनो टाका टाकित चमचाभर. ;)

टर्मीनेटर's picture

17 Dec 2024 - 11:49 am | टर्मीनेटर

भारी वाटतंय.

अभिनंदन प्रा.डॉ... छान दिसत्ये टँक 👍

काम धंदे सोडून माशांच्या हालचाली पाहात राहिलो. नवीन असल्यामुळे तसं असावं.

😀 हरकत नाही, अतिशय सकारात्मक नाद आहे हा! माशांच्या हालचालींचे निरिक्षण करत रहा, मानसिक ताण-तणाव दूर होउन मन:स्वास्थ्य उत्तम राहिल आणि हळुहळु माशांचे मुड्स पण समजायला लागतील. फिशफूडच्या दाण्यांच्या जोडिला अधुन मधुन ब्लड वर्म्स पण त्यांना खायला देत रहा, माशांचे आरोग्य चांगले राहुन आयुष्यही वाढेल.
थोडा अनुभव वाढल्यावर मग ऑस्कर, डिस्कस, फ्लॉवरहॉर्न, अर्वाना, जायंट गुरामी वगैरेंपैकी एखाद्या जातीची निवड करुन आपला छंद आणखीन समृद्ध करा!

कंजूस's picture

13 Dec 2024 - 11:38 am | कंजूस

छान दिसत आहे फिश टँक.

१) काही मासे फिशफूड आवडीने खात नाहीत. अगदी निरुपाय म्हणून खातात. पण टाकलेलं खाणं तळाशी जमा होत राहातं. पाच सहा दिवसांनी कुजतं. बुडबुडे येतात. ऑक्सीजनचं यंत्र चालू आहे. त्यामुळे पाण्यातला ऑक्सीजन कमी होत नाही.
२) खालची खडी हलवून खात्री करा की न खाल्लेलं फूड आहे का?
३) जे फूड टाकायचं ते प्रथम एका वाटीत पाण्यात भिजवा अर्धा तास आणि मग ते पाणी टाका टँकात.
४) माशांची विष्ठा पंधरा दिवसांनी पाण्यात जमा होऊ लागते ती फार ऑक्सीजन खाते. अतिशय तरल कण फिल्टरने गाळले जातातच असं नाही. पण पाण्याला वास येऊ लागतो.
५) रोज दहा पंधरा टक्के पाणी काढून टाकून नवीन ( बाहेर चांगले चार दिवस उघडे ठेवलेले) टाकावे.
६) ती दोन झाडे खरी पाणझाडे आहेत का? प्लास्टिकचीही असतात. आडोसा देण्यासाठी. एका खडकाला( खोटा. प्लास्टिकच्या रंगीत पिशवीत वाळू भरून बनवलेला) झाडांचा झुपका बांधायचा. खरा दगड वापरून नये. हातातून पडल्यास तळाची काच फुटू शकते.

७) या माशांना थंडी (२८अंशाखाली) मानवत नाही. रात्री टँकवर ब्लँकेट टाकणे. पाणी गार होता कामा नये. टँक सेट केल्यावर खरा धोका पंधरा दिवसांनी सुरू होतो. लक्ष ठेवा. माशांची गर्दी नको. काही कारणामुळे ओक्सिजन बंद पडला तरी चार मासे राहू शकतात पण पंधरा नाही.

आपण मासे आणतो तेव्हा ते बऱ्याचदा एकाच जोडीची पिल्ले असतात. थोड्या महिन्यांनी दुसरीकडून तसलेच मासे आणले की ते वेगळ्या जोडीचे असण्याची शक्यता वाढते. मग ते जोडी जोडीने वेगळे ठेवल्यास पिले होऊ शकतात. पण फिशफुडवर वाढ होत नाही. जिवंत खाद्य भरावे लागते. तो खटाटोप असतो.

सर्वात सोपा पाळीव प्राणी म्हणजे मासे. कमीत कमी झंझट.

आणि इतरही व्याप हे माशांच्या बाबतीत नसतात (उदा. भुंकणे आणि शेजारी त्यांचा उपद्रव, मांजर इतरत्र जाऊन तोंड घालणे, उंदीर मारून घरात घाण, कुत्र्याला वेळेवर फिरवायला नेणे, त्यांची भांडी, आंघोळ घालणे, फार काळ घर सोडून जाता न येणे वगैरे) अशी समजूत उगीचच होती. तुम्ही म्हणताय ते वाचून आता हे भलतेच नाजूक आणि किचकट प्रकरण दिसते.

हो...

कुणाच्या नशिबी कुत्रा तर कुणाच्या नशिबी मासा.. मासे पालन करून बघीतले पण ते आमच्या घरी टिकले नाहीत.

आमच्या नशिबी कुत्रा आला. ह्या प्राण्याचे आणि आमचे सुर, वंशपरंपरागत जुळतात.

झंझट नको पण हौस करायची म्हणून....
१)फिश टँक बाल्कनीत ठेवला. तिथे सकाळचे ऊन अर्धा तास आणि बराच उजेड यावर काळे गप्पी पाळले. कृत्रिम उजेड नाही. पाणझाडे आणि शेवाळे भरपूर खाद्य आणि ओक्सिजन पाण्यात सोडतात. त्यावर ते मासे ( black molly) आनंदात वाढतात. भरपूर पिले होतात. ती कुणाला देऊन टाकायचो. ओक्सिजन यंत्र, फिल्टर यांची कटकट नाही. खाणे घालायचं नाही. घर बंद करून सात दिवस गेलो तरी विवंचना नाही.

पाणझाडे मात्र वाळूत सहज वाढत नाहीत. मातीच लागते. प्लास्टिक वाडग्यात माती भरून झाडे लावलेली. पाणी हल्ली नाही तर माती वर येत नाही, स्वच्छ राहाते.

पाणी तपासणी प्रयोगशाळेत काही मासे (तिलापिलिया )ठेवतात. कणखर मासे आहेत. Factory effluent टँकमध्ये भरून ते मासे सोडतात. त्यांना काही झाले नाही आणि जगले आठ दिवस म्हणजे पाण्याचं सांपल चांगलं समजलं जातं. ते मासे नंतर सोडून देतात . आमच्या डिपार्टमेंटला ते मिळत तेही ठेवले होते. त्यांना पिलेही होत. या माशांची मादी पिलांना तोंडांत सांभाळते. फार गंमत असते.

माझ्या एका मित्राने टँकमध्ये विविध पाणझाडांची बाग केली आहे. कार्बन डायऑक्साइड वायू सिलिंडरमधून द्यावा लागतो झाडं वाढवायला.

मजा असते एकेका छंदात. आपल्या वेळ आणि पैशाच्या ऐपतीप्रमाणे बरेच प्रकार करता येतात.

चौथा कोनाडा's picture

18 Dec 2024 - 2:11 pm | चौथा कोनाडा

व्वा... लै भारी धागा ! परिपुर्ण धागा ! मस्यपालनावर सविस्तर आणि सखोल चर्चा !
कंजुस यांचा अभ्यास किती खोल असतो या निमित्त पुन्हा दिसलं !
धन्यवाद !