आव्हान स्वीकारणार काय ?

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
4 Oct 2019 - 10:44 am
गाभा: 

नमस्कार मिपाकर !
आजकाल आंतरजालावर विविध प्रकारची चित्रविचित्र आव्हाने येत असतात आणि ती काही प्रसिद्ध व्यक्तींनी स्वीकारल्यामुळे अजून प्रसिद्ध होत असतात. मलादेखील मिपावर असाच काहीतरी उपक्रम व्हावा असे वाटते म्हणून हा प्रपंच.

आव्हान आपल्या सोयीच्या वेळेनुसार, दिवसानुसार पार पाडायचे आहे.
आव्हान स्वीकारणे आणी पार पाडणे यास अंतिम मुदत नाही पण तरी सोयीखातर ३१ ऑक्टोबर २०१९ ही तारीख ठरवुया.

आव्हान स्वीकारण्यासाठी काही अटी आहेत. त्या खालीलप्रमाणे.

१. कोणते आव्हान स्वीकारले आहे याची नोंद प्रतिसादात करायची आहे.
२. आव्हान स्वीकारल्यानंतर ते पुर्ण केले काय ? केल्यास ते पुर्ण करताना काय अनुभव आला ? त्रास झाला, आनंद झाला, विशेषकरुन मनात काय काय विचार आले हे थोडक्यात लिहायचे आहे.
३. आव्हान स्वीकारले, ते पार पाडण्याचा प्रयत्न केला पण ते काही कारणास्तव शक्य झाले नाही तर त्याची कारणी मिमांसा लिहावी. (वेळ मिळाला नाही हे कारण ग्राह्य धरले जाणार नाही.
४. आव्हान स्वीकारताना एखादे आव्हान हे आपल्या रोजच्या दिनक्रमाचाच एक भाग आहे तर ते स्वीकारु नये. (उदा. उपवास करा हे आव्हान असेल आणि तुम्हाला उपवास करायचा अनुभव आहे तर ते आव्हान स्वीकारु नये.
५. कोणतेही आव्हान आपल्या शरीरास अपायकारक वाटत असेल ते स्वीकारु नये. ही आव्हाने केवळ मानसिक कणखरपणा तपासण्यासाठी आहेत.

आता आव्हाने काय आहेत ?
१. आपण चहा, कॉफी, शीतपेये दररोज पित असाल तर किमान दोन दिवस त्याचा त्याग करणे. दररोज हा शब्द महत्वाचा. उदा. मी दररोज २ वेळा चहा पित असेन, मात्र शीतपेय कधीतरीच पित असेल तर शीतपेय आव्हानातून वगळा. जे पेय दररोज घेता ते वगळायचे आहे. तिन्ही पेये रोज घेत असाल तर तिन्ही वगळायचे आहेत.
२. कोणताही एक दिवस ३० मिनिटे मांडी घालून डोळे मिटून काहीही न बोलता (स्वत:शी देखील न पुटपुटता) बसून राहायचे आहे.
३. कोणताही एक दिवस कमीत कमी ३ तास एक शब्द देखील बोलायचा नाही.
४. कोणताही एक दिवस आंतरजाल, मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणावर काहीही वाचायचे नाही, बघायचे नाही, संगीत ऐकायचे नाही, फोनवर बोलायचे नाही (अगदीच जीवनमरणाचा प्रश्न असेल तर बोलायला हरकत नाही.)
५. कोणत्याही एका शनिवारी रात्री १० वाजता अंथरुणात जायचे, घरातल्यांशी गप्पा मारायला हरकत नाही, झोपी गेले तरी हरकत नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता उठायचे, ७ वाजेपर्यंत सगळे आवरायचे, केवळ उठून लोळत पडायचे नाही. रविवारचा दिनक्रम तुमच्या मर्जीप्रमाणे घालवायचा मात्र दिवसभरात झोपायचे नाही.रात्री कधीही तुमच्या सोयीनुसार झोपायला जाऊ शकता.
६. ज्या व्यक्ती उपवास करत नाहीत त्यांनी केवळ आव्हान म्हणून कोणताही एक दिवस निवडून उपवास करायचा आहे. उपवासाच्या दिवशी फळे, फळांचा रस, पाणी घेण्याची मुभा असेल. उपवास दुसर्‍या दिवशी सुर्योदयानंतर सोडायचा आहे.
७. आपणास कोणतेही व्यसन असेल, उदा. तंबाखू, सिगारेट, दारु, मावा, गुटखा तर कमीतकमी ३ दिवस त्या व्यसनापासून दूर राहायचे आहे.

आपण जीवनात अनेक आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करत असतो मात्र ती आव्हाने आपल्यावर लादलेली असतात. वरील आव्हानांचा उद्देश आपल्या मनाचा कणखरपणा तपासण्याचा आहे आणि आपले अनुभव शब्दबद्ध करुन इथे लिहा. त्याचा मला उपयोग होईल. आपण एकापेक्षा अधिक आव्हाने स्वीकारणार असाल तर आपले स्वागत आहे.

यातील कोणतेही आव्हान आपल्या दिनक्रमाचा भाग आहे किंवा ते सहजसाध्य आहे ते निवडू नये. या धाग्याच्या फलश्रुतीनंतर आपण अजुन आव्हानांचा विचार करु शकतो. त्यासाठी याच धाग्याचा पुढला भाग दुसरा कोणीही प्रकाशित करु शकतो.

मग आहे काय हिंमत ? स्वीकारता काय आव्हान ?

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

4 Oct 2019 - 11:30 am | जॉनविक्क

परंतू आव्हान क्रमांक 1,2,3,4,5,6,7 आधीच पूर्ण केलेली आहेत त्यामुळे सॉरी.

रच्याकने वाटले ब्लु व्हेल वगैरे वगैरे आव्हान आहे की काय ;)

सॉरी म्हणायची आवश्यकता नाही. उलट तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. आपण एखादे आव्हान सुचवू शकता. किंवा ५-६ आव्हाने एकत्रित करुन पुढचा धागा काढावा.

जॉनविक्क's picture

4 Oct 2019 - 11:42 am | जॉनविक्क

आपण एखादे आव्हान सुचवू शकता.

ठीक आहे, मी मिपाकरांना असे आव्हान देतो की त्यांनी सलग 52 तास संपूर्ण निर्वस्त्र रहावे. हे आव्हान आपण खाजगी अथवा जगाच्या पाठीवर जीथे कुठे कायद्याने याला परवानगि असेल अशा सार्वजनिक ठिकाणी पूर्ण करू शकता. या 52 तासात अगदी झोपतानाही संपुर्ण निर्वस्त्रता पाळणे बंधनकारक आहे.

आपला अनुभव व अभिप्राय अवश्य कळवा.

शुभेच्छा.

धर्मराजमुटके's picture

4 Oct 2019 - 12:06 pm | धर्मराजमुटके

धन्यवाद सर आपले आव्हान स्वीकारणे एकदम सोपे आहे मात्र त्यासाठी मला अनुसया बनावे लागेल जेणेकरुन घरातील मंडळींची लहान लेकरे बनवून त्यांच्यासमोर ५२ तास निर्वस्त्र राहता येईल. अथवा नागा साधू बनावे लागेल जे बनणे ३१ ऑक्टोबर पर्यंत अशक्य आहे :)
मी वर यादीत दिली आहेत अशी काही अवघड आव्हाने देता येतील काय ?

मी सोप्या सोप्या गोष्टीच आव्हानात्मक समजतो. माझी क्षमता तेव्हडीच.

हे काय आव्हान है का राव .. एकदा भेटून जा फेस तो फेस .. काही साक्षीदार हैत त्यांना भेटवून देतो .. तेच सांगतील या आव्हानाबद्दल आणि माझ्याबद्दलही ..

तमेच बोलो नी.

सुबोध खरे's picture

4 Oct 2019 - 12:38 pm | सुबोध खरे

वरील सर्व गोष्टी पूर्वी केलेल्या आहेत. त्यामुळे आता असं काही करण्यात फारसा हशील नाही असे वाटते.
१) मला चहा कॉफी लागतेच असं नाही. तेंव्हा त्यावाचून मुळीच अडत नाही.
२) सिगरेट तंबाखूजन्य कोणताही पदार्थ दारूला आयुष्यात स्पर्श केलेला नाही
३) एक उत्तम पुस्तक असेल तर तासन तास कुणाशीही न बोलता किंवा विद्युत उपकरणांचा वापर न करता सहज राहू शकतो
४) एका जागी ३० मिनिटं काहीही न करता बसणं अगदी सहज शक्य आहे
५) वर्षात २-३ वेळेस उपवास करतोच

प्रकाश घाटपांडे's picture

5 Oct 2019 - 10:38 am | प्रकाश घाटपांडे

५) वर्षात २-३ वेळेस उपवास करतोच >>>>>>> त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने करता का?

क्र १- पेय, आवडते पेय सोडणे. कठीण आहे. चहा पितो घरी असताना. बाहेर असलो तर दोन तीन वेळा घेतो.

हे करण्यामागचा उद्देश (काय साध्य करायचे) ते स्पष्ट पटलं तरच कोणी हे करु पाहील. भले ते उद्दिष्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करुन मनोरंजन मिळणे असं असलं तरीही काहीतरी साध्य अपेक्षित आहे.

उदा. व्यसनापासून दूर राहिल्याने आरोग्य.

पण-उदा. गप्प बसल्याने काय होणार? एका जागी न हलता अर्धा तास बसून काय साध्य होणार? इत्यादि, हे स्पष्ट असावं.

तुम्ही नेकेड अँड अफ्रेड मधील स्पर्धक बनण्याची तयारी करू शकता. तुमचे शारीरिक आरोग्य सुधारते* तसेच मनाची कणखरता देखील वाढीस लागते. ज्याचा फायदा तुम्हला तर्कशुद्ध विचार करण्यात आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात कमालीचा होतो*.

* एकदम 52 तास हे जमेलच अशी अपेक्षा न ठेवली तर ही प्रयत्नाने हे जमून जाईल.

स्वधर्म's picture

4 Oct 2019 - 2:45 pm | स्वधर्म

वरील बरीच आव्हाने विपश्यना कोर्स करताना बंधनकारक असतात. भोवतीच्या वातावरणामुळे ती फारशी अडचण न होता बहुतेकांना पाळता येतात. आपली प्रेरणा तीच आहे का?

धर्मराजमुटके's picture

4 Oct 2019 - 3:22 pm | धर्मराजमुटके

हे करण्यामागचा उद्देश म्हणजे आपण आपल्या मनाला लगाम घालून हे करु शकतो काय हे तपासणे आणि त्यादरम्यान आपल्या मनात काय विचार येतात हे बघणे आणी नोंदवणे हे आहेत. अर्थात यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांना काय साध्य होईल हे लगेच सांगणे अवघड आहे. कदाचित मला या प्रयोगात मदत करणारे स्वयंसेवक हवे आहेत यादृष्टीने याकडे बघता येईल. याव्यतिरिक्त अजून कोणतेही कारण दिले तर ते सगळ्यांना पटेलच असे नाही. मात्र या प्रयोगाच्या निष्कर्षांचा कोणताही गैरवापर केला जाणार नाही किंवा हे प्रयोग कोणालाही अपायकार असतील असे वाटत नाही याची खात्री देता येईल.

मला शिवीगाळ ना करता हे ५२ तास पूर्ण करायला आवडतील .. कर्मकठीण है पण करायला नक्की आवडेल ..

दुर्गविहारी's picture

4 Oct 2019 - 8:33 pm | दुर्गविहारी

;-)))))

हूस्स्स आणि फुस्सस हे शब्द ५२ तासादरम्यान वापरायला मात्र अनुमती असावी .. त्याच काय है हे शब्द वापरून थोडा तरी राग बाहेर येईल नाहीतर उगाचच त्रास आपल्यालाच व्हायचा ..

आव्हान स्विकाराव अस म्हणतोय आम्ही! बघु जमतय का प्रयत्न करुन. आमचं आव्हान मात्र थोड वेगळ आहे. सध्या निवडणुकांचा काळ असल्यामुळे कोणत्याही पक्ष,नेता,कार्यकर्ता यांच्याविषयी किंवा जागतिक राजकारण,भारत-पाकिस्तान,परराष्ट्र धोरण, मंदी इत्यादी विषयांकडे सरळ दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करण्याचे आव्हान स्विकारावेसे वाटतेय.दुर्लक्ष म्हणजे थोडक्यात असे कि त्या विषयाबद्दल वाचन,चर्चा इत्यादी टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार असुन या विषयांव्यतिरिक्त वैयक्तिक माझ्यासाठी काय महत्वाचे विषय असायला हवेत याकडे जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करावासा वाटतोय. बाकि सार्वजनिक चर्चेसाठी किंवा वैयक्तिक वाचनासाठी वरिल विषयां व्यतिरिक्त अजुन कोणते विषय महत्वाचे असायला हवेत याचाही होमवर्क करावसा वाटतोय. बघु प्रयत्न करून बाकि आव्हानाचे अनुभव ३१ आक्टो. ला शेअर करण्यात येतीलच.

आव्हान स्विकाराव अस म्हणतोय आम्ही! बघु जमतय का प्रयत्न करुन. आमचं आव्हान मात्र थोड वेगळ आहे. सध्या निवडणुकांचा काळ असल्यामुळे कोणत्याही पक्ष,नेता,कार्यकर्ता यांच्याविषयी किंवा जागतिक राजकारण,भारत-पाकिस्तान,परराष्ट्र धोरण, मंदी इत्यादी विषयांकडे सरळ दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करण्याचे आव्हान स्विकारावेसे वाटतेय.दुर्लक्ष म्हणजे थोडक्यात असे कि त्या विषयाबद्दल वाचन,चर्चा इत्यादी टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार असुन या विषयांव्यतिरिक्त वैयक्तिक माझ्यासाठी काय महत्वाचे विषय असायला हवेत याकडे जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करावासा वाटतोय. बाकि सार्वजनिक चर्चेसाठी किंवा वैयक्तिक वाचनासाठी वरिल विषयां व्यतिरिक्त अजुन कोणते विषय महत्वाचे असायला हवेत याचाही होमवर्क करावसा वाटतोय. बघु प्रयत्न करून बाकि आव्हानाचे अनुभव ३१ आक्टो. ला शेअर करण्यात येतीलच.

रविकिरण फडके's picture

4 Oct 2019 - 10:28 pm | रविकिरण फडके

मी एकदोन आव्हाने सुचवू इच्छितो.

१) एक संपूर्ण दिवस कुणावरही टीका करायची नाही. उदा. (त्रासदायक) शेजारी, (कुजकट) नातेवाईक, (आपल्याला सतत सुधारण्याच्या प्रयत्नात असलेली आपली) बायको किंवा (आपल्याकडे दुर्लक्ष करणारा आपला) नवरा , (आपमतलबी) मित्र, (संधीसाधू) सहकारी, (सवंग) मीडिया, (मुजोर) रिक्षावाले, (बेमुर्वतखोर) ड्रायव्हर्स अणि...(ह्या क्लासला विशेषण नाही) राजकारणी. [तुमच्या अनुभवाप्रमाणे/ निरीक्षणाप्रमाणे यादीत भर घालता येईल.]

२) अशी टीका करणे फक्त वाचेनेच नव्हे तर मनानेही टाळायचे. असा कोणताही विचार मनात आला की लगोलग तो दूर करून दुसऱ्या आनंदी गोष्टींकडे जाणीवपूर्वक मन वळवायचे.

३) हे एक दिवस जमले की दोन दिवस, मग तीन दिवस, असा कालावधी वाढवत न्यायचा.

टीप-१: टीका ह्या संज्ञेत साहित्यिक किंवा अन्य टीका (criticism/ review) अर्थातच अंतर्भूत नाही.

टीप-२: ह्यातले मला काहीही जमलेले नाही. म्हणजे प्रयत्नच केलेला नाही आजपावेतो. म्हणून मी स्वतःसाठी हे आव्हान स्वीकारीत आहे. Seriously!

ता. क. हे खरे तर एकच आव्हान आहे, फक्त त्याची degree क्रमाक्रमाने वाढवत नेली आहे, असे कुणाला वाटले तर हरकत नाही.

मला सकाळी उठल्यावर चहा पिताना पेपर वाचायची सवय होती. पेपर वाचल्याशिवाय चैनच पडायच नाही.

१९९० साली सहा महिने पेपर वाचायचा नाही असं ठरवल होतं. जमलं ही होतं.

त्यामुळे पेपर वाचला नाही तर काही अडत नाही हे लक्षात आलं होतं
:)

आजही पेपर वाचतो. पण जेव्हा मिळेल तेव्हां. काहीकाही वेळेस वाचायचा राहूनही जातो.

जालिम लोशन's picture

4 Oct 2019 - 11:36 pm | जालिम लोशन

बहुतेक ह्यालाच म्हणत असावेत.

दिवाळी अंक दिवाळीत वाचायचे नाहीत, फराळ करायचा नाही.

वकील साहेब's picture

5 Oct 2019 - 5:02 am | वकील साहेब

काही दिवस जगन्नाथ दीक्षित डाएट करण्याचा संकल्प करावा

नाखु's picture

5 Oct 2019 - 8:11 pm | नाखु

करीत आहे,मध्यंतरी किरकोळ अपघात झाला तेंव्हा नाईलाजाने खंडीत करावे लागले होते,मागील महिन्यात पुन्हा चालू केले आहे.
उत्तम परिणाम होत आहे,हे माझे मत आहे, इतरांना काय फरक पडला माहित नाही.
वजन कमी करणे हे उद्दिष्ट नव्हते तरी वजन पाच कि कमी झाले आणि कंबरपट्टा आकसण्याकरीता एक घर पुढे गेलाय

परिचयातील लोकांना सुद्धा माझ्यासाठी काहीच (चहा वगैरे) करावे लागत नाही यामुळे त्यांचा वेळ व श्रम वाचतात हा बोनस आहे.

जमेल का म्हणून करुन पाहणारा दिक्षितायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

जॉनविक्क's picture

5 Oct 2019 - 10:54 am | जॉनविक्क

सलग 17 दिवस बायकोशी फक्त आणी फक्त सत्य बोला.

खिलजि's picture

5 Oct 2019 - 4:22 pm | खिलजि

भौ , ह्ये करायला गेलो तर शीर्षक बदलावं लागेल लेखाचं . आव्हान स्वीकारणार काय ? ऐवजी " आत्महत्या करणार काय ? " असं ठेवावं लागेल .. ५२ तास दूर राहिले , ५२ मिनिटे जरी खार बोललो तरी घरी जालियनवाला बाग हत्याकांड व्हायचं .. उगाच माझ्यासारख्या डौलदार सिंव्हाचा वाढ व्हायचा रे . आणि तसेही सिंव्ह किती राहीलेयत जगात .. फार कमी .. तुला अजून कमी करायचे असतील तर तू सांगतो त्याप्रमाणे करावं लागेल आणि ५२ मिनिटात निकाल लागेल ..

सिंह नामशेष होणार नाही हे नक्की

खिलजि's picture

5 Oct 2019 - 5:18 pm | खिलजि

ह्ये बाकी खरंय

चौकस२१२'s picture

5 Oct 2019 - 11:26 am | चौकस२१२

आयष्यातील एका आव्हान आठवतंय...
नात्यातील एका व्यक्तीला अपघात झाला होता ती व्यक्ती जवळ जवळ डिड महिना जगेल कि वाचेल अश्या परिस्थिती होती... त्यावेळी
माझ्याकडून कुठलीच मदत होऊ शकत नव्हती, दूर राहत असल्यामुळे स्थानिक मदत करणे शक्य नवहते आणि इतर बरेच नातेवाईक जवळ पास असल्यामुळे त्याची जरुरी नवहती, त्या कुटुंबाला पैशाची मदत पण जरुरी नवहती, केली असती तर कदाचित आवडले पण नसते... मग करायच काय ...
एक गोष्टीचे आव्हान पत्करले.. ती व्यक्ती बरी होते पर्यंत आपण आपल्यालाआवडणारी एखादी गोष्ट वर्ज्य करणे... मी हाडाचा खादाड आणि त्यात वांग्याच्या भाजी पासून ते अगदी मगरीच्या मासा पर्यंत आपल्याला प्रिय .. मग ठरवले कि त्यातील मांसाहार वर्ज्य करायचा.. सुरवातीला अवघड गेले पण शेवटी जमले . खरे तर यात काही मर्दुमकी नाही, पण साधी गोष्ट सुद्धा अवघड होऊ शकते एक अनुभव एवढेच ...

कानडाऊ योगेशु's picture

5 Oct 2019 - 11:36 am | कानडाऊ योगेशु

पुढे काय झाले? व्यक्ती बरी झाली का?

चौकस२१२'s picture

5 Oct 2019 - 3:04 pm | चौकस२१२

हो झाली.. डॉक्तरांच्या आणि हॉस्पिटल च्या आणि मित्र, नातेवाईकांनी केलेल्या परिश्रमामुळे... माझ्य त्या बंधनामुळे नाही
हेल्मेट ला विरोध करणाऱ्यांना तेव्हापासून साष्टांग दंडवत घालावयास वाटतो XXXXXX

चौकस२१२'s picture

5 Oct 2019 - 11:28 am | चौकस२१२

जगेल कि जगणार नाही असे म्हण्याचे होते.. घाईत लिहिले क्षमा

जगन्नाथ दीक्षित डाएट करण्याचा संकल्प करावा
असं काही करण्याचे आव्हान सोडाच, विचारही करू शकत नाही. सतत चरत असतो.

ओम शतानन्द's picture

7 Oct 2019 - 10:52 am | ओम शतानन्द

अशक्यप्राय आव्हाने
१.दैनंदिन सर्व कामे करायची पण सलग ४ दिवस कुठलेही वाहन वापरायचे नाही ,
२. किमान २ दिवस कुठलेही विद्युत उपकरण वापरायचे नाही

धर्मराजमुटके's picture

7 Oct 2019 - 3:32 pm | धर्मराजमुटके

एखाद अपवाद वगळता मिपाकरांनी वर मी दिलेली सोपी आव्हाने कार्यबाहुल्यामुळे अथवा अन्य कोणत्या कारणांमुळे स्वीकारलेली दिसत नाही त्यामुळे आपण सुचविलेली आव्हाने कोणी स्वीकारील की नाही याबद्द्ल शंका आहे.

मित्रमंडळ, ओळखीच्या लोकांना वरील आव्हाने दिली आहेत. बघू या कोणी स्वीकारुन अभिप्राय देतात की नाही ते. अभिप्राय आले की येथे नक्की लिहिन.
आपण दिलेले पहिले आव्हान मी जेव्हा गावी जातो तेव्हा स्वीकारणे सहज शक्य होते. आमचे गाव रहदारीपासून थोडे लांब असते आणी गावी पोहोचल्यावर शक्यतो वाहनाचा वापर करत नाही. मात्र मी स्वत:च वर लिहिल्याप्रमाणे एखादे सहज स्वीकारण्याजोगे आव्हान असेल तर त्यात मजा नाही.

४ नंबर करणे अतिशय अवघड आहे किंवा शक्य नाही
७ - कोणतेही व्यसन नसल्याने ह्याचा काहीच उपयोग नाही.

बाकी मी हे आव्हान घेत आहे. ४ ऐवजी मी दीक्षित डायेट फॉलो करणे पसंद करेन किंवा साखर पूर्ण सोडणे.
७ ऐवजी दररोज नियमाने अर्धा तास व्यायाम करणे हे आव्हान घेणे पसंद करेन

वरील दोन गोष्टी चालत असतील तर मी घेत आहे.

मराठी कथालेखक's picture

10 Oct 2019 - 3:53 pm | मराठी कथालेखक

मला २००३ पासून दारु पिण्याची (महिन्यातून एखादे वेळेस) सवय आहे. पण २०१४ हे पुर्ण वर्ष (खरंतर आधीचा आणि नंतरचाही एक एक महिनासुद्धा) ठरवून दारु घेतली नाही. उद्देश हा होता की दारुमुळे जर शरीरावर दुष्परिणाम होतात तर एक वर्ष दारुपासून दूर राहून काही फायदे जाणवतात का हे बघायचे होते , जसे वजन कमी होणे , कार्यक्षमता वाढणे ई.. असे फायदे ठळकपणे जाणवले असते तर पुढेही दीर्घकाळ दारु सोडण्याची माझी तयारी होती मात्र असे कोणतेच फायदे ठळकपणे न जाणवल्याने पुन्हा हे आनंददायी पेय पिणे चालू केले

कुमार१'s picture

9 Nov 2019 - 11:00 am | कुमार१

त्यासाठी याच धाग्याचा पुढला भाग दुसरा कोणीही प्रकाशित करु शकतो>>>>

अशा माझ्या काही आव्हानांचा लेख मी इथे लिहिला आहे: