बाइक, पाऊस आणि कोकण

रिकामटेकडा's picture
रिकामटेकडा in भटकंती
26 Sep 2019 - 5:39 pm

रात्रीचे ८.३० वाजून गेलेले सततच्या पावसामुळे आधीच शांत असलेले कोकण गुडूगुप होऊन झोपून जायच्या मार्गावर होतं. स्वरुपानंद स्वामींच्या पावसच्या आश्रमातून बाहेर पडून समोरच आईस्क्रीम खात उभे होतो. पाउस पडतच होता. दुकानदार काळजीपोटी म्हणाला आता नका जाऊ पुढे रत्नागिरीत. मधल्या रस्त्याला बिबट्याने दोघा तिघांना जखमी केलंय. मी फक्त हं म्हटल आणि आईसक्रिम खाऊन झाल्यावर बाईक ला स्टार्टर मारला.

पहिला दिवस
गणपती सुटीमध्ये कोकणात बाईकवर जाउया असा विचार मी आणि बायकोने केला होता. गणपतीपुळे पर्यंत कार ने जाणं झाल होतं या वेळेस थोडा पुढचा पल्ला गाठावा आणि तोही बाईक ने असा जरा वेगळा (इतरांच्या भाषेत मूर्खपणाचा) विचार होता. वेधशाळेने भरपूर पाउस असा इशारा दिला होता. तरी शेवटी आगावूपणा करून ४ तारखेला ११.३० वाजता बदलापूर मधून आम्ही निघालोच. कोणतंच फिक्स डेस्टिनेशन ठरवल नव्हतं. कंटाळा आला किंवा जास्त त्रास वाटला तर थांबून घ्यायचं किंवा परत फिरायचं असा ओपन प्लान होता. लोणावळा येईपर्यत पावसाने चांगलाच दणका दिला. लोणावळा जुना हायवे म्हणजे मनशक्ती ची मिसळ अपरिहार्य आहे. मिसळ/ थालीपीठ चापून एकदा काय करायचं याचा आढावा घेतला. यश पण पुढे जायला तयार होती. त्यमुळे बाईक निघाली साताऱ्याच्या दिशेने. मधला काही वेळ पाउस उघडला होता खंबाटकी घाटात त्याने आम्हला परत पकडले ६.३० च्या सुमारास गच्च भिजून साताऱ्यात पोहचलो.

दुसरा दिवस
लवकर निघू म्हंटल तरी साताऱ्यातून निघायला 11 वाजलेच. पाऊस अगदीच बारीक बारीक होता. सगळी आयुधं चढवून बाईक कोल्हापूर दिशेने निघाली.
हायवे असल्याने 70 75 चा वेग राखत बुंगाट कोल्हापूर गाठलं.

5 रुपयात ’शाबु वड” या पाटीने आम्हाला थांबवलं एक प्लेट खाऊ अस म्हणत चक्क 5 प्लेट झक्कास साबुदाणा वडा हाणला. एकाला विचारला कोकणात जायचे आहे, त्याने अत्यंत शांतपणे 'जावा मग' असा दिशा न सांगता आशीर्वाद दिला. क्षणभर पुण्यात आलो का काय अस वाटून गेलं.
कोल्हापूर ओलांडून गाडी गगनबावड्या ला निघाली.आतापर्यत कृपा केलेल्या पावसाने गगनबाबवड्याच्या जोरदार हजेरी लावून मला विसरू नका असंच जणू सांगितलं
थोडा वेळ थांबलो बाजूला पण पाऊस आता कमी होत नाही आणि वेळ तर निघून जात आहे हे जाणवून भर पावसात गाडी सुरू केली. घाटातील धुके, पाऊस आणि रस्त्यातील खड्ड्यांचा मनसोक्त आस्वाद घेत पाचच्या सुमारास वैभववाडी गाठली.

तळेरे आले तेव्हा अंधार पडायला सुरवात झाली होती. पाऊस सोबतीला होताच, कुणकेश्वर गाठायला आजून 50 km ची दौड बाकी होती. आता मात्र शर्यत होती वेळेची आणि आजच्या गंतव्यस्थानची. त्यात माझ्या हेल्मेट ला काळी काच असल्याने ते झापड उघडून गाडी चालवावी लागत होती. अखेर 8 वाजता कुणकेश्वर ला पोहचलो. आणि जेवायची सोय होते की नाही ते आधी पाहिले कारण पावसामुळे आख्या गावात आम्ही दोघेच पर्यटक, भक्तनिवासात झोपायची सोय झाली.

दिवस 3 रा


पाऊस उघडल्यासारखा वाटत होता. किनाऱ्यावर असलेले मंदिर अजूनच सुंदर भासत होतं. मनोसोक्त फोटोसेशन झाल्यावर गाडी निघाली जयगड किल्ल्या कडे किल्ल्याच्या आधी पवनचक्क्या जवळून बघण्याचा योग आला मग किल्ल्यात पोहचल्यावर त्यात दीपगृह आहे हे समजले. लगे हात ते पण पाहून झाले.

जयगड जामंडे मार्गे विजयदुर्ग कडे मोर्चा वळला. विजयदुर्ग साठी मुख्य रस्त्यावरून 16 km आत जावे लागते . छोटासा पण उत्तम तटबंदी असलेला हा देखणा किल्ला आहे.

विजयदुर्ग च्या 2 km अलीकडे रामेश्वर मंदिर आहे. कोकणातली सगळीच मंदिरं तशी साधी व देखणीच पण या मंदिराकडे जायचा डोंगरात खोदून काढलेला पायऱ्यांचा रस्ता अफलातून आहे. विजयदुर्ग ला गेलात तर न चुकवण्यासारखं ठिकाण आहे हे.
विजयदुर्ग जवळील रामेश्वर मंदिराकडे जाणारी पायऱ्याची वाट.

रत्नागिरी गाठायचे होते. पावसाने सोबत सोडली नव्हती पण झोडपून पण काढलं नव्हतं. पावसच्या काही किलोमीटर अलीकडे छोट्या ठिपक्यासारखा पूर्णगड किल्ला आहे. तो पाहून येई पर्यत सूर्य अस्ताला गेला.
पूर्णगड

त्याच रस्त्यावर पावस असल्याने मंदिर बघणे आवश्यकच होते मंदिर बघून रत्नागिरी गाठायला 9 वाजून गेले. स्टॅण्ड जवळ चायनीज च्या वासाने आमची गाडी आडवली. पोटभर चायनिज खाऊन एकदा तिथेच राहू असा विचार केला परत बघितलं तर 25च km वर गणपतीपुळे असल्याचं मॅप सांगत होता. थोडी हिम्मत जमा करून आरे वारे करत गणपतीपुळ्यात दाखल झालो. या प्रवासात एक बाजूला कायम घोंगावणारा समुद्र साथ करत होता, रात्र, पाऊस, गरजणारा दर्या भन्नाट कॉम्बिनेशन.
पण आज पावसाने तशी मेहरबानीच केली होती.

चवथा दिवस.


शुचिर्भूत (कसला भारी शब्द आहे ना) होऊन आधी बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो. खवळलेला समुद्र मंदिराच्या पायरीपाशी येऊन धडकत होता. देवपूजे नंतर लगेच पेटपूजा. सगळं बिऱ्हाड आवरून खर तर परतीच्या प्रवासाला निघालो. गणपतीपुळ्यातील प्राचीन कोकण दर्शवणारे प्रदर्शन पाहून घेतले कोकणातील समाजजीवन विविध शील्पातुन मांड्ला आहे आणि काहीतरी खरेदी केलीच पाहिजे या न्यायाने एक पणती चे कासव किँवा कासवाची पणती घेतली.

आमच्याच शाळेतील एक कर्मचारी पुळ्या जवळील जकादेवी च्या जवळ राहतात आता त्यांच्या घरी गणपती दर्शन ला निघालो. जकादेवी पासून आतमध्ये त्यांच गाव आहे पार डॉगराच्या तळाशी असलेल्या त्याच्या गावी पोहचे पर्यत लोकं इतक्या दुर्गम जागेत कशी राहतात याच नवल वाटत होतं त्यांच्या वरताण म्हणजे त्या गावातून st वर येताना बघून मला st च खरच कौतुक वाटलं. गावात पोहचल्यावर ते गावात नसल्याची सुवार्ता समजली आणि छोटुस तोंड करून आम्ही परत तो घाट चढायला सुरवात केली.
निवळी फाट्याच्या अलीकडे एक मानवनिर्मित नवल आहे ते म्हणजे petroglyphs किंवा कातळशिल्प सुमारे 10000 वर्षांपूर्वी इथे रहात असलेल्या मानवाने या आकृत्या जमिनीवर कोरून ठेवल्या आहेत. जुलै मध्ये या भागात याविषयातले तज्ञ सुधीर रिसबुड यांच्या सोबत याचा फेरफटका मारला तेव्हा हे बघितल होतं. अगदी रस्त्यालागत असलेलं हे नवल पाहिलं
कातळशिल्प

मग हातखांबा- साखरपा करत आंबा घाटातुन कराड मार्गे साताऱ्यात दाखल झालो. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाने आदल्या दिवशी केलेली मेहरबानी काढून घेतली आणि दिवसभर प्रेमळ मित्रा प्रमाणे साथ दिली इतकी की साताऱ्याच्या आधी ओल्या अवस्थेतच हॉटेल ओलं करत रोटी आखा मसूर खायला लागला. एक बाजूला थंडी वाजतेय आणि पोटात गरम गरम रोटी मसूर जातोय.

पाचवा दिवस
सोमवारी कामावर जाताना जी मनाची अवस्था असते अगदी तीच अवस्था आज होती. पाय ओढत कामावर जावं लागतं तसा इथे मी अँक्सीलेटर पिळत घराकडे परतत होतो.
या प्रवासात अस लक्षात आलं की आपण ठरवलं तर पाऊस काही आपल्याला अडवू शकत नाही आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित स्वतंत्र प्लास्टिकच्या पिशवीत टाकूनही पाण्याने त्यात शिरायचा मार्ग शोधून काढला होता. सुरवातीला हलकी असणारी सॅक शेवटच्या दिवशी प्रचंड जड झाली.
कोकण नेहमीच आवडतं पण यावेळी भर पावसातल्या कोकणाने अजूनच लळा लावला. पावसाने पण मर्यादेत राहा सांगितलं त्याच बरोबर सांभाळून पण घेतले.
सोबतीणी ने कुरकुर न करता सगळा प्रवास एन्जॉय केला. ( त्याबदल्यात कमीत कमी महिन्याभराच्या dp च्या फोटो ची सोय करून घेतली) आणि अर्थात घरच्यांची साथ नेहमीप्रमाणे होती आई आण्णांनी पण आम्ही असे जाणार आहोत हे सांगितल्या वर कोणतीही अडकाठी किंवा शंका कुशंका ना काढता फक्त 'काळजी घ्या' या वाक्यात त्याची माया आणि जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांच्याच जीवावर कायम आमच्या या उड्या असतात.

अजून एक सफल संपूर्ण अशी ही भाद्रपदातील सहलीची कहाणी झाली. उतणार नाही मातणार नाही आणि फिरायचा हा वसा टाकणार नाही

प्रतिक्रिया

सुचिता१'s picture

26 Sep 2019 - 11:10 pm | सुचिता१

छान आहे भटकंती !! भर पावसाळ्यात बाइक वर कोकणात गेलात, तुमच्या हीमतीची दाद दिली पाहिजे. तुमच्या सहचरिणी चे विशेष कौतुक वाटले. फोटो ही मस्त. पण अनुभवाचे अजून विस्तार पुर्वक वर्णन हवे होते.

जव्हेरगंज's picture

29 Sep 2019 - 4:44 pm | जव्हेरगंज
जालिम लोशन's picture

26 Sep 2019 - 11:28 pm | जालिम लोशन

. ग्रेट.

जॉनविक्क's picture

26 Sep 2019 - 11:43 pm | जॉनविक्क

मी सुद्धा भर पावसात पावस, गणपतीपुळे, पुढे अगदी म्हापसा-(गोआ) अशी ट्रिप केलेली असल्याने हा अनुभव किती सुखद असतो याची नक्कीच माहिती आहे. थोडी औषधे आणी योग्य कपडे सोबत असतील तर अफलातून राईड आहे.

विशेषतः प्रदूषणामुळे पुणे मुंबईतली काळीढुस्स्सस हिरवाई आणी कोल्हापूर व पुढे कोकणातली दृष्ट टाकावी आणी लागावी अशी सर्वत्र आढळणारी पोपटी हिरवाई डोळ्यांचे पारणे फेडते.

कंजूस's picture

27 Sep 2019 - 4:26 am | कंजूस

कठीणच आहे हा ट्रिपल सीट प्रकार. ती मोठी स्याक पाठीला लावून बायकोने चारचार तास मागे बसायचे आणि सत्तरच्या स्पीडने पावसात दुचाकी दामटायची.
फोटो छान आहेत.

संजय पाटिल's picture

27 Sep 2019 - 12:27 pm | संजय पाटिल

ती मोठी स्याक पाठीला लावून बायकोने चारचार तास मागे बसायचे ....

अजून एक त्यांच्या छातडावर पण आहे....
पण खरच ग्रेट !!!!

श्वेता२४'s picture

27 Sep 2019 - 12:24 pm | श्वेता२४

व फोटो. तुमच्या दोघांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Sep 2019 - 2:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

सफारी मस्तच झाली आहे. सुखद हिरवाई सर्वत्र दिसते आहे. पण बाईकवरुन एव्ह्ढे जायचे म्हणजे कंबरेची वाट लागणार, विशेषतः पावसाळ्यात. बदलापुर हुन पनवेल वडखळ मार्गे कोकणात जायचे सोडुन हा उलटा मार्ग कुठुन घेतला राव? का मुंबई-गोवा हायवेचे हाल टाळायला असे केले?

बाकी हौसेला मोल नाही हेच खरे.

Rajesh188's picture

27 Sep 2019 - 2:36 pm | Rajesh188

पावसाळा आणि पावूस मला खूप आवडतो .
निसर्गाचे उतुंग रूप बघायचे असेल तर निसर्गात मिसळा काही आजारी वैगेरे पडत नाही .
तुमचं पावसातील प्रवास वर्णन लाजवाब

भारी भटकंती.. असे वारंवार भटकत असणार असल्यास सॅडल बॅग जरूर घ्या...

हेल्मेटे घातलेला फोटो कृपया डकवा हो.

विजुभाऊ's picture

27 Sep 2019 - 7:06 pm | विजुभाऊ

मायला मस्त माणूस आहात हो तुम्ही. ( सोबतीणीला अशा प्रवासासाठी पटवले ही सर्वात कठीणेस्ट गोष्ट कशी जमवलीत हे एकदा सांगाच . हवे तर व्यनीतुन सांगा)
लोणावळ्याला निघालेला माणूस सातारा कोल्हापूर गगनबावडा करत थेट कोकणात उतरतो तेही भर पावसात.
हेवा वाटतो तुमच्या आणि सहचरीण बाईंच्या जिंदादीलपणाचा. लैच भारी.
मुंबैत कधीतरी भेटूया. आपल्या कडून एक पार्टी लागू तुम्हाला

हेवा वाटतो तुमच्या आणि सहचरीण बाईंच्या जिंदादीलपणाचा. लैच भारी.

हायला

कोकणात आमचं वडिलोपार्जित घर आहे. होंडा युनिकोर्न घेऊन १२ वर्ष झाली. बजाजची डॉमिनार घेऊन २ वर्षे झाली तरी कोकणात मोटार सायकलवर जायचा बेत अजून ठरतोच आहे.

नवी कार घेऊन हि ८ महिने झाले तरी जाणं झालं नाही.

आता स्वतःची लाज वाटायला लागली आहे.

कोमल's picture

27 Sep 2019 - 7:55 pm | कोमल

भारी.
कोकणातला पाऊस अनुभवला आहे.
त्याला तुम्ही बाईकवर तोंड दिले. _/\_

आईची आन , काय खत्तर्नाक्क प्रवास लिखाण ... सुप्परडुप्पर हिट ... हे भव्यदिव्य काम आहे माझ्यासाठी तरी ..

सुधीर कांदळकर's picture

28 Sep 2019 - 9:28 am | सुधीर कांदळकर

एवढे ओझे घेऊन या पावसात वाईट रस्त्यावरून ६०-७० चा वेग. बापरे!

_/\_

लेखन आवडले. प्रचि पण छान. धन्यवाद.

उपेक्षित's picture

28 Sep 2019 - 1:03 pm | उपेक्षित

छानच होता वृत्तांत,
पण असे धाडस शक्यतो टाळावे कारण कोकणातला पाउस चांगलाच माहित आहे (माझी बायडी कोकणातलीच ) म्हणून काळजीपोटी सांगत आहे.

गेला बाजार मराठा आरक्षण आंदोलनावेळी बंद होता १ दिवस तेव्हा हापिस बंद ठेवाव लागल होत काय करायचं म्हणून काढली बायिक आणि बायडीला घेऊन पंढरपूर वारी करून आलो २ दिवसाची लयी मजा आली होती त्याची आठवण आली.

मस्त होतोय प्रवास, सर्व फोटो दिसत नाहीत.

खटपट्या's picture

29 Sep 2019 - 4:52 pm | खटपट्या

दिसले दिसले

अमचा शेजारी असाच गगनबावड्याला जायचा एका दमात दत्तजयंतीच्या आठवड्यात.

अरिंजय's picture

1 Oct 2019 - 3:35 am | अरिंजय

असल्या बाईकवर मागे बसणाऱ्याची कंबर लगेच अकडते. तरी सुद्धा त्यांनी एव्हढा मोठा पसारा पाठीवर टांगून एवढा सगळा प्रवास केला हे विशेष.

मृणमय's picture

1 Oct 2019 - 5:17 am | मृणमय

भन्नाट, खूप छान वर्णन आहे.
मागच्या वर्षी आम्ही ४२ डिग्री च्या उन्ह्याळ्याच्या सुट्टीत कॅम्पिंग केले होते.. त्याची आठवण झाली.

चौकस२१२'s picture

3 Oct 2019 - 5:37 pm | चौकस२१२

माफ करा आगंतुक सल्ला वाटेल पण राहवत नाही म्हणून सांगतो...चांगले हेल्मेट घाला हो. आणि ते सुद्धा दोघांनी! "पाठीमागच्याने घालायची सक्ती नाहीये " हे जरी खरे असले तरी अपघातात माणूस पडला तर इजा कोणालाही होऊ शकते . आणि अगदी माध्यम वेगात असताना सुद्धा मेंदूस दुखापत झाली तरी .. कुटुंबात अनुभवलंय म्हणून सांगतो ....

रिकामटेकडा's picture

4 Oct 2019 - 10:47 pm | रिकामटेकडा

सर्वानी केलेल्या कौतुका बद्दल मनापासून आभार . सहचारिणीला सुद्धा भटकंतीची आवड असल्याने ती सोबत यायला सहज तयार झाली.
@मोदक सॅडल बॅग नक्की घेणार आता. @कंजूस आणि @चौकस२१२ आम्ही दोघांनीही प्रवासात हेल्मेट घातले होते. या फोटो पुरते ते गाडीला मागे अडकवले आहे.आपण दाखवलेल्या आपुलकीमुळे खूप छान वाटले.

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Oct 2019 - 12:40 am | माम्लेदारचा पन्खा

आमचं एकेकाळचं गणपतीपुळे आणि श्रीवर्धनचं असंच बाईक राईडचं खूळ आठवलं .....

मी अजूनही जायला तयार आहे पण सौ नाही म्हणतात !

सतिश पाटील's picture

19 Oct 2019 - 11:55 am | सतिश पाटील

सॅडल बॅग मिळते बाजारात ४००० रुपयांपर्यंत. ती वापरा दुचाकीवर भ्रमंती करताना , फार सोयीस्कर पडते.

नन्दादीप's picture

15 Nov 2019 - 12:56 pm | नन्दादीप

मस्त भटकंती.. पण पावसात ते पण बाईक वरून कोकण शक्यतो टाळाच...खूप सारे खड्डे, रस्ते खराब यामुळे.

बाकी लेखात एक दोन दुरुस्त्या सुचवतो.
तुम्ही जो जयगड चा उल्लेख केलाय ते देवगड आहे. जयगड रत्नागिरी मध्ये आहे.
आणि ते जकादेवी नसून जाकादेवी आहे.