भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४
.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
१८ सप्टेंबर २०१८
बरोब्बर १ वर्ष १ महिना वाट पाहून झाल्यावर अखेरीस आम्ही फेरोंच्या देशात येऊन पोहोचलो. कैरो एअरपोर्ट वर बघण्यासारखं असं फार काही नाही, त्यामुळे एअरपोर्ट बाहेर पडायला जास्त वेळ लागत नाही. एअरपोर्ट वरून हॉटेलला जाण्यासाठी टॅक्सी घेतली. कारण कैरो एअरपोर्ट वरून शहरात जाण्याचा दुसरा सोयीचा पर्याय सध्यातरी नाहीये. संबंध कैरो शहरात मेट्रोच जाळं पसरलं असूनही एरपोर्टच्या भागात मात्र अजून तिचे रूळ पोहोचले नाहीयेत. पर्यटन हा मुख्य व्यवसाय असलेल्या या देशाच्या राजधानीत टॅक्सी व्यतिरिक्त कुठला सोपा पर्याय उपलब्ध नाही हि गोष्ट मनाला थोडी खटकली. कैरो एअरपोर्टवर टॅक्सीसाठी अव्वाच्यासव्वा भाव सांगितले जातात. तुम्हाला current rate ची थोडी कल्पना असेल आणि घासाघीस करू शकत असाल तर योग्य दर मिळवता येतो, नाहीतर खिशाला भगदाड पडलं म्हणून समजा. कैरोमध्ये प्रायव्हेट टॅक्सी ला पर्याय आहे उबर. पण कैरो एअरपोर्टवर मोफत वायफाय ची सुविधा नाही, आणि तोवर आपल्याकडे लोकल सिम कार्ड वगैरे पण नसतं, त्यामुळे प्रायव्हेट टॅक्सीला पर्याय नाहीच.
आमचं हॉटेल शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात, तहरीर चौकात होतं. तोच तहरीर चौक जिथे असंख्य मोर्चे, प्रदर्शने झालेली, आणि आजही होत असतात. सकाळी ट्रॅफिक अजिबात लागलं नाही आणि २० मिनिटात टॅक्सीवाल्याने हॉटेलच्या दारात सोडलं. आम्ही ठरवल्या प्रमाणे जे पैसे दिले ते त्याने घेतले आणि म्हणाला, "हे तर गाडी चे पैसे झाले. मला टीप?" आम्ही परत नम्र नकार चिकटवला.
इजिप्तमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा टीपसाठी विचारलं जातं. पण तुम्हाला त्यांची सर्विस असामान्य नसेल वाटली तर तुम्ही नकार देऊ शकता. फार काही फरक नाही पडत. पण जिथे काम आवडलं असेल तिथे टीप नक्की द्यावी.
"My Hotel Cairo" हे आमचं हॉटेल एका जुन्या इंग्रजांच्या काळातील इमारतीमध्ये आहे, इजिप्शिअन म्युझिअमच्या बरोब्बर समोर. हॉटेल वजा हॉस्टेल असं त्याचं स्वरूप. सकाळचे ६:३० वाजले होते. थोडा वेळ स्वागतकक्षात वाट पाहिली. ७ वाजता त्यांची रिसेप्शनिस्ट आली. तिला इंग्लिशचा गंध नाही. तिने मॅनेजर महमूदसोबत बोलून दुसऱ्या मजल्यावरची एक बरीशी रूम उघडून दिली. फ्रेश होऊन थोडा आराम केला तोवर महमूद पोहोचला होताच. योगायोगाने संजयसुद्धा याच हॉटेलला थांबला असल्याने महमूदची आणि त्याची ओळख होतीच. थोडी विचारपूस झाल्यावर त्याने कोरा चहा आणून दिला. आणि मला कधी नव्हे तो कोरा चहा प्रचंड आवडला.
महमूद: किती दिवस आहात तुम्ही मग इजिप्त मध्ये?
नवरा: १४ दिवस
महमूद: आणि काय काय बघायचं ठरवलं आहे?
मी: आज तर समोरचं म्युझियम बघू आणि वेळ मिळाला तर कैरोची कॉप्टिक बाजू बघू. बाकी गिझा, अॅलेक्झांड्रिया आणि बहारिया मरुद्यानाला पण जायचं आहे.
महमूद: मी करून देतो सगळी सोय. गिझा आणि अॅलेक्स साठी प्रायव्हेट टूर असेल बहारियाला मात्र तुम्हाला तिथे पोहोचेपर्यंत गाडी कोणासोबत तरी शेअर करावी लागेल.
नवरा: हो चालेल ना. काहीच हरकत नाही. किती अंदाजे खर्च येईल?
महमूद: टीप टीप.. टॅप टॅप (कॅल्क्युलेटर वर कसला हिशोब करायला लागला)
मी: आणि हो नुसतं गिझा नाही सक्कारा आणि दाहशुर पण करायचं आहे.
महमूद: अरे हो का.. बरं ### एवढे होतील सगळ्याचे.
मी: नाही जास्त होत आहेत. थोडे कमी कर.
हो नाही करत थोडी घासाघीस करत एका रकमेला आम्ही तयार झालो. कैरो मधील दिवसांचा प्लॅन परत बनवला गेला.
महमूद: तुम्ही आज कैरो बघा जेवढं शक्य असेल तेवढं. उद्या सकाळी ८.३० वाजता गाडी येईल गिझा-सक्कारा-दाहशुर साठी. तयार राहा. आज मला थोडं लवकर जायचं आहे उद्याच भेट होईल बहुदा आपली. आम्ही: ठीक आहे. भेटू उद्या मग.
गूगल मॅप वर जवळचं वोडाफोन स्टोअर शोधलं. ते तलात हार्ब चौकात होत. जवळ असल्याने चालतच निघालो.
तलात हार्ब चौक हा तहरीर चौकाच्या जवळचा दुसरा मोठा चौक. ६ रस्ते एकत्र येणाऱ्या ह्या चौकात जुन्या मोठ्या इमारती बघायला मिळतात. काही इमारतींवरचे नक्षीकाम इजिप्तवर इंग्रजांचे राज्य होते याची आठवण करून देते तर काही त्याही मागे जाऊन रोमन सत्तेची जाणीव करून देते. या सगळ्या इमारतींमधून विविध बँकांची कार्यालये आहेत. या चौकाला तलात हार्ब नाव देण्यामागचं कारण पण हेच. तलात हार्ब हे इजिप्ती अर्थशात्रज्ञ होते ज्यांनी नंतर "बंक मिस्र" अर्थात 'बँक ऑफ इजिप्त' या पहिल्या इजिप्ती बँकेची स्थापना केली. तलात हार्ब चौकात मध्यभागी त्यांचा पुतळा उभा आहे.
वोडाफोन मध्ये नवीन सिमकार्ड घेतलं आणि पोटोबा करायला "कझाझ" नावाच्या रेस्टॉरंट मध्ये पोहोचलो. महमूदच्या मते तिथले सँडविच फार चवदार असतात. एक फलाफल सॅन्डविच, एक फ़ुल (म्हणजे उकडलेल्या राजम्याला वाटून त्यात मीठ मिरची भुरभुरलेलं) सॅन्डविच आणि दोन श्वारमा घेतले. पहिल्या घासातच कझाझ वरचा विश्वास उडाला. मी श्वारमा बऱ्याच ठिकाणी खाल्ला आहे पण पुण्यातल्या 'मारकेश'पेक्षा सुद्धा वाईट कझाझ मध्ये होता. (नंतर एके दिवशी जवळच्याच फेलफेला नावाच्या हॉटेलमध्ये जेवलो तिथली चव फारचं छान होती) कझाझमध्ये कसंबसं जेवण उरकून आम्ही इजिप्शिअन म्युझिअम पाहायला निघालो.
संबंध इजिप्तमधील उत्खननात मिळालेल्या गोष्टी इथे हारीने रचून ठेवल्या आहेत. जुनी राजवट, मध्य राजवट आणि नवी राजवट अश्या भागांत साहित्य विभागून ठेवलेलं दिसतं. पण त्याच बरोबर असंख्य मस्तबा, शवपेट्या, दागिने, भांडी, मुखवटे यांची स्वतंत्र दालनेच इथे आहेत. इजिप्तच्या अवाढव्य बांधकामांची झलक इथे बघायला मिळते. मुख्य चौकात ठेवलेले उंचच उंच पुतळे आपलं स्वागत करतात.
पण इथले २ प्रमुख आकर्षण म्हणजे, रॉयल ममी रूम आणि तुत-अंखं-अमूनच्या थडग्यात सापडलेल्या सोन्याच्या गोष्टी.
रॅमसिस-२ च्या ममीसोबत अजून अंदाजे २५-३० ममी २ दालनात विभागून ठेवल्या आहेत. काचेच्या पेटीत बंद असलेले हेच ते फेरो होते ज्यांनी मिस्रचा सुवर्णकाल गाजवला. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा तो "सुवर्ण"काळ होता. सुदान, लिबिया मधून सोन आणून बनवलेल्या चीजवस्तू थडग्यात ठेवायला वापरणारे फेरो वेडेच म्हणायचे. याची खात्री पटते तूतच्या थडग्यातील वस्तू पाहताना. सोन्याचे दागिने, मुकूट, चपला, खंजीर, पलंग, खुर्ची, भांडी, शवपेटी, मुखवटा वगैरे तर झालंच पण हे सगळं त्याच्या ममी सोबत ज्या खोलीत ठेवलं होत ती सोन्याची, ती खोली ज्या मोठयाल्या बॉक्स मध्ये ठेवली होती तो बॉक्स सोन्याचा, त्याच्या बाहेरील दालनाची तावदानेपण सोन्याची.
लुटारुंच्या नजरेतून निसटलेलं हे सोन्याचं भांडार कार्टर ने १९२२ साली उघडलं आणि सगळ्या जगाचे डोळे दिपले. याबद्दल विस्ताराने नंतर कधीतरी, पण कार्टरच्या मेहनतीमुळे हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची ओळख पुन्हा एकदा नवीन नजरेने जगापुढे आली.
फोटो काढायचे तिकिट घेतले नसल्याने 'चोरी-छिपे' मारलेले हे काही क्लिक्स.
मनोमन तृप्त होऊन आम्ही दोघे अंदाजे ३ तासांनी बाहेर पडलो. सकाळी येतांना रिकामा दिसलेला तहरीर चौकातील रस्ता आता दुथडी भरून वाहत होता. प्रचंड ट्रॅफिक, गाड्यांचे हॉर्न, असंख्य पादचारी. भारतापेक्षा काही वेगळ दृश्य नव्हतं हे. पुढे वेळोवेळी मला भारत आणि इजिप्त मध्ये बऱ्याच ठिकाणी साम्य आढळलं त्यातील हा पण एक समान धागा.
म्युसिअम मधून बाहेर पडल्यावर एक स्थानिक माणूस येऊन आमच्याशी गप्पा मारू लागला. कुठून आलात, किती दिवसाची ट्रिप वगैरे. सुरवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तो मुख्य मुद्दयावर आला. इजिप्ती गिफ्ट्स आणि सुवेनिअरच्या दुकानासाठी तो काम करत होता. मलाही अशा दुकानाला एकदा भेट द्यायची होतीच. 'घ्यायचं काहीही नाही नुसतं बघ' अशी नवऱ्याने अट मला घातली आणि त्या बाबाच्या मागे आम्ही दुकानात गेलो. असंख्य अत्तरे, छोटे मोठे पिरॅमिड, दगडी मूर्ती, किचेन, फ्रिज मॅग्नेट वगैरे तर होतेच पण सोबत तुतच्या सोन्याच्या मुखवट्याच्या प्रतिमा, छोट्या शवपेट्या असं काहीही सापडत होतं. थोडक्यात समोरच्या म्युसिअम मधील सगळ्या गोष्टींच्या छोट्या कॉपीज. यामध्ये आम्हाला रुची नाही हे लक्षात आल्यावर आमची वरात वरच्या मजल्यावर वळवण्यात आली.
थंड AC आणि बसायला छान सोफा, मासा गळाला लावायचा पूर्ण बंदोबस्त केला होता तिथे. इजिप्तचे प्रसिद्ध पेय थंडगार करकाडे आमच्या समोर आणून ठेवलं गेलं आणि पपायरस च्या गुंडाळ्या उघडण्यात आल्या. पपायरस हा एका पाणवनस्पती पासून बनवला जाणारा कागद पूर्वी राजेशाही पत्र वगैरे पाठवायला वापरला जात असे. आता त्यावर चित्रे काढून सुवेनिअर म्हणून विकतात. खरंच अप्रतिम कलाकारी केली होती त्यावर. वेगवेगळे रंग वापरून फेरोंचे प्रसंग दर्शवले होते. कधी फक्त फेरो देवाला पूजताना तर कधी फेरो आणि राणी. विविध आकारात सुद्धा बनवलेले. अगदी लहान पोस्टकार्ड च्या आकारापासून ते भल्या मोठ्या गालिचाच्या आकारात पण. काही सकाळी वेगळं चित्र दाखवणारे आणि रात्री वेगळं, रेडियम वापरून बनवलेलं. काहींवर फार बारीक काम केलेलं तर काही उगीच रेखाटलेलं. या पपायरसनी मात्र मला भुरळ पाडली. प्रचंड घासाघीस करून, सांगितलेल्या किमतीच्या निम्म्याहून कमी किमतीत डील करून, नवऱ्याला मनवून एकदाची मी ते पपायरस घेती झाले. आम्ही दुकानातून बाहेर पडेस्तोवर आधी भेटलेल्या माणसाने अजून एक परदेशी मासा गळाला लावून दुकानात सोडला.
घेतलेल्या पैकी एक पपायरस
आता पुढे जायचं होत कॉप्टिक कैरो ला. पण नवऱ्याची तब्बेत भारतातून निघतांनाच थोडी नरम गरम होती, आता मात्र त्याला ताप चढू लागला होता. त्यामुळे पुढला प्लॅन रद्द करून सरळ हॉटेलवर परत आलो. ३-४ तास आराम केल्यावर काहीतरी खाऊ म्हणून परत तहरीर चौकात आलो. एका हाटेलात (हो हाटेलच हॉटेल नाही) कोशरी आणि पास्ता मागवला. दोन्ही मध्ये एकच टोमॅटो रस्सा टाकून दिला होता त्यामुळे चव सारखीच लागत होती. आंबट आणि थोडी खारट अगदी साधारण. रूमवर परत आल्यावर नवऱ्याने औषध खाऊन ताणून दिली आणि मी दुसऱ्या दिवशीच्या प्लॅनबद्दल थोडं वाचू लागले.
रात्री ११ च्या सुमारास नवरा तापाने पार फणफणला होता. ओल्या पट्ट्या कपाळावर ठेवून २-२ ब्लॅंकेट पांघरून त्याला कसाबसा झोपवत होते. पहाटे ३ च्या सुमारास ताप उतरला आणि मग कुठे माझा डोळा लागला.
क्रमशः
प्रतिक्रिया
20 Sep 2019 - 4:42 pm | श्वेता२४
सविस्तर वर्णन व फोटोही छान. अजुन येऊद्या.पु.भा.प्र
20 Sep 2019 - 8:05 pm | कोमल
धन्यवाद श्वेता२४!
20 Sep 2019 - 4:54 pm | यशोधरा
पपायरसचा फोटो दिसत नाही. एकूण वर्णन आवडले.
निदान दुसऱ्या देशात चोरी छिपे काही करू नये, असं वाटत. पकडले गेलात तर स्वतःच्या इज्जतीचा फालुदा होईलच, त्यासोबत, देशाच्या इज्जतीचाही.
20 Sep 2019 - 8:20 pm | कोमल
फोटो सुधारला आता यशो.
फोटोसाठी सक्ती ही मुख्यतः ममीच्या दालनात होती. तसे गार्ड पण असतात तिथे जागोजागी, पण बाकी म्युझियममध्ये तसा पहारा नसतो.
'चोरी छिपे' गमतीत म्हणाले. पण
हे नक्कीच पटतं.
गेल्या जुलैमध्ये हा विडीओ व्हायरल झाला होता पहा
20 Sep 2019 - 8:50 pm | यशोधरा
पपायरसवरील चित्र काय सुरेख आहे! केवळ ही खरेदी करायला मी तिथे जाईन! हे एकच चित्र घेतलं का?
त्या व्हिडीओबद्दल सहमत. किती वाईट होते ते! :(
22 Sep 2019 - 11:10 am | कोमल
घरासाठी हे अजुन एक घेतलेलं, बाकी नातेवाईकांना दिले.
20 Sep 2019 - 4:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं सुरू झाली आहे सफर.
काही फोटो, पब्लिक अॅक्सेस नसल्यामुळे, दिसत नाहीत.
20 Sep 2019 - 8:08 pm | कोमल
धन्यवाद एक्काकाका!
फोटोंमधील चुका सुधारल्या आहेत. एकदा नजर टाकावी.
21 Sep 2019 - 1:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता दिसत आहेत सर्व चित्रे. पपायरस सुंदर आहे.
20 Sep 2019 - 5:40 pm | टर्मीनेटर
कोशरी हा खाद्यपदार्थ मलाही अजिबात आवडला नव्हता...
बाकी छान चालू आहे, वर डॉक्टर साहेब म्हणल्याप्रमाणे काही फोटो दिसत नाहीयेत.
20 Sep 2019 - 8:23 pm | कोमल
हो ना!
आपण बहुतेक योग्य ठिकाणी नाही खाल्ली कोशरी.
जसं बाकरवडी खावी तर चितळेंचीच 😜
20 Sep 2019 - 8:34 pm | अनिंद्य
सचित्र वर्णन आवडले, आता पुढच्या भागांची प्रतीक्षा !
20 Sep 2019 - 11:45 pm | जालिम लोशन
लिखाण आवडले.
21 Sep 2019 - 9:13 am | प्रचेतस
हा भाग पण आवडला. छान लिहिते आहेस.
21 Sep 2019 - 9:25 am | सुधीर कांदळकर
आहे. चोरीछिपे प्रचि छान. चोरी छिपे घेतली आहेत हे कळते. तुरुंगात न जाता परतलात - अभिनंदन. पुन्हा असे करू नये हा फुक्कटचा अनाहूत सल्ला देतो. आद्य कागद अप्रतिम. त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले.
मस्त लेखमाला. धन्यवाद. अगोदरची सर्वसाक्षींची लेखमाला वाचली नव्हती ती वर आणल्याबद्दल देखील धन्यवाद.
21 Sep 2019 - 11:11 am | महासंग्राम
टर्मीनेटर यांच्या धाग्यात फलाफेल सॅन्डविचचं वर्णन वाचून परवा मोठ्या हौसेने ते सँडविच ऑर्डर केलं होतं पण खातांना श्राद्धाला करतात तसा उडदाचा वडा, पिटाब्रेड च्या नावाखाली लोणी नसलेला दावणगिरी डोसा इडलीच्या चटणीत बुडवून खाल्ल्याचा आला. :)
23 Sep 2019 - 8:56 pm | टर्मीनेटर
@ महासंग्राम - समजू शकतो....
पण बिलीव्ह मी, ईजिप्त मध्ये, कुठे निव्वळ कांदा आणि कोबी तर कुठे जोडीला फ्रेश फिगचे काप तर कुठे त्यांच्या जोडीला उकडलेली मिरची, काही वेगळ्या चटण्या किंवा सिझन प्रमाणे उपलब्ध भाज्यांचा वापर करून बनवलेले सलाड घालून बनवलेले फालाफेल सँडविच खाण्याची मजा काही वेगळीच होती....प्रत्येक ठिकाणची चव थोडी वेगळी पण आवडण्यालायक होती.
तो पदार्थ मला वाटत की फक्त ईजिप्त मधेच चांगला मिळत असावा, कारण मला भारतात व शारजा मध्ये आणि माझ्या पत्नीला युके मध्ये हा पदार्थ चांगला नाही मिळाला, निराशा झाली. त्याचे कारण मला वाटते एकतर फालाफेल बनवण्यासाठी वापरले जाणारे जिन्नस, ते बनवण्याची पद्धत आणि त्याचे ड्रेसिंग हे असावे.
रच्याक: पिटाब्रेड हा प्रकार अत्यंत वेगळा आहे, त्याचा आणी ईजिप्शियन फालाफेल सँडविचच्या ड्रेसिंगचा दुरान्वयेही संबंध नाही :)
*सबवेने मध्यंतरी फालाफेलचे काहि प्रकार सुरु केले आहेत, ते ट्राय करायचे बाकी आहेत! कदाचित चांगली चव मिळू शकेल.
21 Sep 2019 - 7:48 pm | चौकस२१२
फलाफल हे नेहमीच्या मिरची/ लसूण / कांदा या खास भारतीय पद्धती पासून वेगळे असल्यामुळे कदाचित एकदम आवडणार नाही परंतु आपण म्हणता एवढे अगदीच " ढ" नसते हो!संग्राम साहेब
खमंग चांगला डाळ वडा ( तिखट नाही थोडा तुरट ) त्याबरोबर नेहमीच्या सलाड बरोबर टबुली ( चिरलेली पार्सली/गव्हाचे दल ) आणि त्याबरोबर ताहिनी ( तिळाचे) किंवा त्झाकी ( दही काकडी कोशिंबीर जणू) .. हा हे खरा कि पिता पाव मात्र चांगल्या प्रतीचा पाहिजे ...
हा प्रकार लेबनी , ग्रीक . तुर्की , इतर काही आखाती देश या ठिकाणी मस्त मिळतो
22 Sep 2019 - 10:59 am | कोमल
धन्यवाद अनिंद्य, जालिम लोशन, प्रचेतस, सुधीर कांदळकर, महासंग्राम, चौकस२१२
@महासंग्राम, लेबेनिझ खाद्यपदार्थ चवीला खरंच छान असतात, पण आपल्याकडे ती चव साधता नाही येत कुणाला हा स्वानुभव.
23 Sep 2019 - 4:05 pm | adya82
Kiti INR/EGP kharcha kele te pan sanga... tyane clear idea yete... For e.g air tickets kitila padali, airport to hotel taxi che kiti zale... food chi roughly cost etc etc..
24 Sep 2019 - 3:48 pm | कोमल
खरं तर खर्च किती आणि कुठे करायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे असं निश्चित किती खर्च होईल हे मी नाही सांगू शकणार.
विमानाची तिकिटे तुम्ही कधी जाणार आहात आणि जाण्याच्या किती दिवस आधी बूक करत आहात त्यावर अवलंबून आहे.
विमानतळावरून शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी साधी टॅक्सीवाला जी रक्कम मागतो त्याच्या निम्मी किंवा त्याहून जरा जास्त रकमेवर पण सौदा ठरू शकतो.
आम्ही कायम स्थानिक जेवण जेवलो, ज्यात बरेच पैसे वाचतात, पण तेही तुमच्या चवी-ढवी वर फार अवलंबून असतं. आमच्या माहितीमधील एक कुटुंब पूर्व आशियाइ देशांत गेले असता त्यांना तिथलं जेवण रुचलं नाही, त्यामुळे तिथे जाउन पण ते भारतीय रेस्टोरंट मध्ये जेवले, १५० रुपयाला एक रोटी या प्रमाणे.
बाकी प्रवेशाच्या तिकीटांची रक्कम इजिप्तच्या टुरिझम वेबसाईट वर उपलब्ध आहे आणि ते वेळोवेळी अपडेट पण करत असतात.
23 Sep 2019 - 7:34 pm | उपेक्षित
थोडे स्पष्ट बोलतो ताई राग मानू नका पण वर्णन वाचताना खूपच नकारात्मक वाटले वर्णन, मान्य आहे कि गोष्टी खटकू शकतात पण काही वेळा 'जैसा देस वैसा भेस' असे वागावे लागते. छोट्या छोट्या गोष्टींकडे इग्नोर मारायचे हो ताई आणि वेन्जोय करायचे डेस्टिनेश.
असो उगाच तुमच्या धाग्यात माझा मिठाचा खडा नगु.
24 Sep 2019 - 3:31 pm | कोमल
थोडा गैरसमज झालेला दिसतोय. मला आलेले अनुभव फक्त मी इथे मांडत आहे. मग ते चांगले किंवा वाईट(माझ्या मते) दोन्ही असोत.
आणि राहिला जेवणाचा मुद्दा तर कधी कधी आपली हॉटेल निवडण्यात चूक होऊ शकते, आणि जर ते हॉटेल मला वडापावच्या नावाखाली मॅक आलू टिक्की खायला देत असेल किंवा श्वारमा च्या जागी चिकन फ्रँकी देत असेल तर मी नाही कौतुक करु शकत त्याचं. कझाझच्या पलिकडच्या गल्लीतच फेल्फेला मध्ये फलाफल सँडविच, उम्म अली वगैरे पदार्थ अप्रतिम मिळाले आम्हाला.
आणि मिठाचा खडा वगैरे काही नसतं हो, तुम्हाला पण गोष्टी नक्कीच खटकू शकतातच की. ते तुम्ही स्पष्टपणे मांडलेलं मलाही आवडलं.
पुढील भागांवर पण नजर टाकत रहा. आपण लिहिलेलं कोणीतरी वाचत आहे हे फार मोठे समाधान असते.
24 Sep 2019 - 7:46 pm | उपेक्षित
ज्ये बात...
धन्स समजून घेतल्याबद्दल ताई.
तसेच माझा खरच थोडा गैरसमज झालेला असू शकतो.
पुढील भाग लवकर टाका.
24 Sep 2019 - 8:15 pm | कंजूस
मी वाचतोय. परदेशी राहाणे खाणे याबाबत पूर्ण झीरो आहे.
पण ईजिप्तच्या इतिहासाचे तीसेक विडिओ युट्युबवरचे पाहिले आहेत. आता टुअरवाले तुम्हाला तिथे किती वेळ देतात आणि जाण्यायेण्याचे प्रवासाचे तास किती हे वाचतोय.
24 Sep 2019 - 10:34 pm | कोमल
धन्यवाद!
आम्ही टूरवाल्यां सोबत नव्हतो गेलो, त्यामुळे अजिबात पळापळ नाही झाली.
9 Oct 2019 - 9:52 pm | आमित_१९८८
केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेविषयी काही दुवा असेल तर पाठवा