जावे फेरोंच्या देशा - भाग १ : पूर्वनिरिक्षण

कोमल's picture
कोमल in भटकंती
14 Sep 2019 - 10:03 pm

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४

.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}

१८ ऑगस्ट २०१७

वालिद चा ई-मेल येऊन थडकला. जुजबी माहिती विचारली होती त्याने आधीच, किती जण आहात? किती दिवसांची टूर करणार आहात वगैरे. ती माहिती गोळाकरून त्याने आज एक रूपरेखा पाठवली होती ९ रात्री १० दिवस अशी. मी ज्या गोष्टी नक्की बघायच्याच आहेत असं कळवलं होत त्या त्याने १० दिवसांच्या प्लॅन मध्ये व्यवस्थित गुंफल्या होत्या. लाखभर रुपयाचं बिल होईल २ लोकांसाठी असं सुद्धा म्हणाला. पण जेव्हा "Excluded" अर्थात यात काय काय खर्च समाविष्ट केलेला नाही हे पाहिलं तेव्हा अजून दीड दोन लाख जास्त जाणार हे लक्षात आलं. 

३० ऑगस्ट २०१७

सासूबाईंचं विमानात बसायचं स्वप्न यावर्षी पूर्ण करूया असं ठरवलं आणि आमची इजिप्त ट्रिप रद्द करून त्यांना दुबई फिरवून आणू असं नवऱ्याचं आणि माझं एकमत झालं. वालिदला नम्र नकार कळवून आम्ही दुबईचे रिटर्न तिकीट बुक करायला सुरवात केली. 

८ डिसेंबर २०१७
जशी विमानाने दुबईच्या दिशेने आकाशात झेप घेतली आणि सासूबाईंचा चेहरा एखाद्या लहान मुली सारखा फुलला तसं इजिप्तला न जाऊ शकल्याचं दुःख पुण्याच्या रन वे वरचं मागे पडलं. 

पुढचे सहा सात महिने इजिप्तची राजकीय सद्य स्थिती काय आहे आणि कुठे कुठे बिनधास्त फिरू शकतो यावर नजर ठेवण्यात गेले. सोबतीला मिपा / माबो / ऐसी दर काही दिवसांनी पडताळून पाहत होतेच. कारण इजिप्त बद्दल प्रचंड माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे पण सगळी इंग्लिशमध्ये. आणि युरोपियन / अमेरिकन लोकांच्या दृष्टिकोनातून. भारतीयांसाठी फार कमी. त्यातून हिंदी / मराठीमध्ये काहीच नाही. मातृभाषेत किंवा 'मावशीच्या'भाषेत गोष्टी ऐका-वाचायला जेवढ्या छान वाटतात तेवढ्या आंग्ल भाषेत नाही वाटतं.

तरी यू-ट्यूबवर हिंदी मधील एक व्हिडिओ ब्लॉगर सापडला जो नुकताच इजिप्तला जाऊन आला होता. मराठीमध्ये तर मीना प्रभूंच्या इजिप्तायन शिवाय काहीच नाही. इजिप्तायनची पारायणे खूप वर्षांपूर्वी झाली होतीच. ते पुस्तकही खोक्यातून बाहेर निघालं. परत त्याची पारायणे झाली. 

पण मीना ताई इजिप्तला गेल्या होत्या २००४/०५ साली. जेव्हा हुस्नी मुबारक सत्तेवर होते. आणि २०११ मध्ये त्यांना सत्तेवरून पाडलेलं सगळ्या जगाने पाहिलं. जेव्हा त्या गेल्या होत्या तेव्हा इजिप्त पर्यटनात अग्रेसर होतं. किंबहुना त्यांचा सुवर्णकाल चालू होता असंच म्हणाना. २०११ नंतर सगळं चित्रंच पालटलं. २०११ मध्ये सत्तापालटाच्या रात्री लारा लोगन हिच्यावर झालेला सांघिक बलात्कार आणि जीवघेणा हल्ला, २०१२-२०१३ मध्ये पर्यटकांवर झालेले जीवघेणे हल्ले, विमानांवर झालेले हल्ले यांनी इजिप्तच्या पर्यटन क्षेत्राला पुरतं ढाळसून टाकलं.

इजिप्तची राजकीय उलथापालथ हा एका वेगळ्याच लेखमालेचा विषय होईल. आतापुरता वाचकांना अंदाज यावा म्हणून थोडक्यात सांगते. १९८१ साली राष्ट्रपती अन्वर सदात यांची हत्या झाल्यानंतर हुस्नी मुबारक सत्तेवर आले आणि चांगले २९ वर्ष ते इजिप्तचे राष्ट्रपती होते. तेव्हा इजिप्त मध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होत नसत. स्थानिकांनी केलेल्या दंगली मोर्चे यांमुळे २९ वर्ष कार्यकाळ बजावल्यानंतर अखेरीस जानेवारी २०११ मध्ये त्यांना पद सोडायला भाग पाडले गेले. २०११ मध्ये तात्पुरते सरकार येऊन २०१२ पासून presidential elections म्हणजेच राष्ट्रपती निवडणुकांना सुरवात झाली. २०१२ साली विरुद्ध उमेदवारापेक्षा अवघ्या १.७३% मते जास्त मिळवत विजयी होऊन मोहम्मद मोर्सी राष्ट्रपती झाले. मोर्सी हे मुस्लिम ब्रदरहूडचे सदस्य होते. त्यांनी घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे इजिप्त पुन्हा एकदा बंडखोरीच्या मार्गावर खेचले गेले. २०१३ मध्ये देशात परिस्थिती इतकी वाईट झाली की इजिप्तच्या सैन्यदलाला हस्तक्षेप करावा लागला आणि सैन्याचे मुख्य जनरल अब्देल फत्ताह अल-सीसी यांच्या नेतृत्वाखाली मोर्सी यांना पायउतार केले गेले. राष्ट्रपतींचा कार्यकाल ५ वर्षांवरून ४ वर्षे करण्यात आला आणि २०१४ मध्ये पुन्हा एकदा झालेल्या राष्ट्रपती निवडणुकांमध्ये सीसी हे तब्बल ९६.९१% मतांनी विजयी झाले. मार्च २०१८ मध्ये झालेल्या दुसऱ्या निवडणुकी मध्येही सीसी ९७.०८% इतक्या प्रचंड मतांनी विजयी झाले आणि सध्याचे राष्ट्रपती म्हणून पदावर आहेत.

एवढ्या सगळ्या घडामोडींमुळे UK Visa Advisory च्या मते  इजिप्त हे अजूनही (२०१८ मध्येही) "against all but essential travel" या लिस्ट मध्ये आहे. नवऱ्याचा पण यामुळे माझ्या प्लॅनला फार पाठिंबा मिळत नव्हता. तो आणि मी दोघेही जंग जंग पछाडत होतो. मी तर इंटरनेट वर विविध प्रकारच्या माहिती वर लक्ष ठेऊन होतेच. TripAdvisor वर सतत पडीक राहू लागले. आणि मग खात्री होत गेली कि जेवढं दाखवलं जात आहे तेवढं भयानक चित्रं आत्ता तरी नाहीये. पण भविष्याचं काही सांगता येत नाही. त्यामुळे इजिप्तचा सीरिया होण्याआधी याची देही याची डोळा सगळं पाहून घेऊ असं ठरलं. 

३ जून २०१८

"आमच्या मिपावर सगळं असतं" असं दरवेळी मोठ्या गर्वाने सांगत फिरणाऱ्या मला इजिप्त विषयात पार नापास केलं. शेवटी मनाचा हिय्या करून ट्रीपची पहिली पायरी चढलो. मुंबई-कैरो-मुंबई अशी "नॉन रिफ़ंडेबल" तिकिटे बुक करून टाकली. पुढचं पुढे बघू कसं मॅनेज करायचं ते, पण आता मागे तर फिरता येणार नाही हे पक्कं झालं. Egypt Docs नावाचा एक फोल्डर दोघांच्या गूगल अकाउंट ला शेअर करून टाकला आणि EgyptAir च्या तिकिटाने त्याची बोहनी झाली. 
आता पुढचा टप्पा नंतर! असं ठरवून मस्त पिरॅमिड्सची स्वप्नं पाहत झोपी गेले.

क्रमशः

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

15 Sep 2019 - 9:33 am | टर्मीनेटर

मस्त सुरुवात कोमल! पुढचे भाग लवकर येउदेत. आणि हो, फोटो टाकण्यात अजिबात कंजूसी नको...😀

चौकटराजा's picture

15 Sep 2019 - 10:04 am | चौकटराजा

आपली लेखन शैली बरीचशी माझ्यासारखी वाटते आहे. त्यात तुम्ही निवडलेला देश हा वास्तुकलेच्या अभ्यासातील महत्वाचा देश आहे ,त्यामुळे आता उत्सुकतेने सर्व लेख वाचणार हे नक्की !

यशोधरा's picture

15 Sep 2019 - 10:57 am | यशोधरा

वा, मिपाचं इजिप्तायन!

अनिंद्य's picture

15 Sep 2019 - 6:44 pm | अनिंद्य

वा, ही लेखमाला वाचणार.

पुढील भागांमध्ये फोटो-नकाशे अवश्य डकवा.

पद्मावति's picture

15 Sep 2019 - 7:33 pm | पद्मावति

वाह...मस्तं सुरुवात. वाचतेय.

प्रचेतस's picture

15 Sep 2019 - 8:20 pm | प्रचेतस

मस्तच सुरुवात कोमले. इजिप्तविषयी अनिवार आकर्षण आहे. पटापट येऊ देत पुढचे भाग.

कोमल's picture

16 Sep 2019 - 11:42 am | कोमल

धन्स सगळ्यांना! _/\_
पुढच्या भागापासुन फोटो येतीलच. :)

टर्मिनेटर भावेंनी लेखमाला दिली आहे ती इराणची होती ? मी तर इजिप्त समजून वाचली.

यशोधरा's picture

16 Sep 2019 - 1:36 pm | यशोधरा

इजिप्तवरच होती.

श्वेता२४'s picture

16 Sep 2019 - 1:45 pm | श्वेता२४

"आमच्या मिपावर सगळं असतं" असं दरवेळी मोठ्या गर्वाने सांगत फिरणाऱ्या मला इजिप्त विषयात पार नापास केलं.
असं कसं?
टर्मिनेटरजींची इजिप्तवर अतिशय सविस्तर प्रवासवर्णन लेखमाला आहे.

जॉनविक्क's picture

16 Sep 2019 - 2:03 pm | जॉनविक्क

अत्यन्त आकर्षण आहे. पुभाप्र.

प्रचेतस's picture

16 Sep 2019 - 2:11 pm | प्रचेतस

टर्मिनेटर ह्यांच्या व्यतिरिक्त सर्वसाक्षी ह्यांनीही खूप पूर्वी मिपावर इजिप्त अगदी तपशीलवार आणले होते.

मिपा गुगलशोध फेलाफेल झालं असणार.
जाऊ द्या.
नुबिया (गोल्ड) दाखवा लवकर.

श्वेता२४'s picture

16 Sep 2019 - 2:14 pm | श्वेता२४

हे माहित नव्हतं आता हेही वाचेन. धन्यवाद प्रचेतसजी

हुश्श! एकूणात मिपा नापास नाही तर!