व्यापून दशांगुळे उरला..

अलकनंदा's picture
अलकनंदा in लेखमाला
2 Sep 2019 - 6:03 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}

p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}

a: {
color: #990000;
}

a:link {
text-decoration: none;
}

a:hover {
text-decoration: underline;
}

व्यापून दशांगुळे उरला..

"लोकसाहित्य सामान्यतः लिखित स्वरूपात संग्रहित करून ठेवण्याची पूर्वापार परंपरा नव्हती, तरीही लोकांच्या मुखी सतत वसल्याने ते टिकून राहिले, असे म्हणायला हरकत नसावी. संतांनी अध्यात्माचा प्रसार, प्रचार करण्यासाठी आणि बहुजन समाजामध्ये त्याची गोडी उत्पन्न करण्यासाठी तत्कालीन लोकगीतांच्या प्रकारांचा उपयोग केला, उदाहरणार्थ, अभंगरचना, ओव्या, भारुडे इत्यादी. संतांच्या निष्ठा जरी विठोबाच्या पायांशी वाहिलेल्या असल्या, तरी गणेशस्तवन, पूजन हासुद्धा त्यांच्या अभंग साहित्याचा अविभाज्य भाग आहे. लोकसाहित्यामध्ये आणि लोककलांमध्ये गणेशस्तवन, गणेशपूजन, स्तुती ह्यांचे वेगवेगळे आविष्कार बघायला मिळतात. दुधामध्ये साखर विरघळावी, इतक्या सहजतेने संतसाहित्य, गण, भारुडे ह्यांमध्ये त्याचे अस्तित्व उमटलेले आहे. लोककलांचे सादरीकरण गणेश आगमनाने सुरू होते."

संत ज्ञानेश्वरांनी गीतेवरील निरूपण सुरू करताना, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीस गणेशाची प्रार्थना करून त्याच्या रूपाचे अतिशय सुरेख वर्णन केले आहे. बुद्धिदात्या, विद्या, कला ह्यांचा अधिपती अशा गणेशाच्या रूपाची वेद वाड्.मयाबरोबर, साहित्य, कला आणि काव्याबरोबर सांगड घालण्याची कल्पकता दाखवली आहे. ॐकाराच्या तीन मात्रांना, म्हणजे अकार-उकार-मकार ह्यांना अकार म्हणजे गणेशाचे चरणयुगुल, उकार म्हणजे विशाल उदर आणि मकार हे त्याचे मुखरूप अशा उपमा दिल्या आहेत. ह्या तिन्ही मात्रा एकत्र येऊन जेथे शब्दब्रह्माची निर्मिती झाली, तेच हे आदिबीज, असे सांगत माउलीही त्यापुढे नतमस्तक होतात.

अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे ||
हे तिन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळले |
ते मियां गुरुकृपा नमिले | आदिबीज ||

ज्ञानेश्वरांचे समकालीन नामदेव महाराज यांनी मंगलाचरण अभंगात केलेले श्रीगणेशाचे ध्यान पाहा.

प्रथम नमु गजवदनु | गौरीहराचा नंदनु |
सकळ सुरवरांचा वंदनु | मूषकवाहनू नमियेला||

गणेशाचे कवतिक सांगताना महाराजांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. गणेशाच्या कृपेमुळे हराने एका बाणात केलेला त्रिपुरासुराचा वध, सटवाईने समुद्रात टाकल्यावर, प्रद्युम्नासाठी श्रीकृष्णाने केलेला विघ्नहर गणपतीचा धावा आणि तेव्हा रतीसह परतून आलेला प्रद्युम्न, युधिष्ठिराने संकटकाळात गणपतीपूजन केल्याने झालेली राज्यप्राप्ती. इंद्रादिक अष्टलोकपाल ह्यांनीसुद्धा केलेल्या गणेशपूजनाची महती वर्णन करताना महाराज म्हणतात,

म्हणवुनि सुरवरी केली पूजा। त्रिभुवनी आणिक नाही दुजा।।
विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा। भावे भजा एकदंता।।

गणेश आणि गायन, नर्तन कला ह्यांचे नाते, ह्या कलांवरील त्याचे मान्य केलेले प्रभुत्व, आधिपत्य नामदेव महाराजांच्या

गणेश नमू तरी तुमचा नाचणा। म्हणोनि नारायणा नमन माझे|| किंवा,
गाणे जरी म्हणो तरी गणेश सारजा। आणिक नाही दुजा तयां वांचूनी||

अशा अभंगांमधून कळून येते.

एकनाथ महाराजांनी गणेशाचे वर्णन भागवताप्रारंभी, एकमेव ह्या शब्दांत केले आहे. सर्व चराचर गणपतीमध्येच सामावले आहे, म्हणून सकलांचा सोयरा अशा गणपतीचे अतिशय लाघवी असे वर्णन एकनाथांच्या भागवत ग्रंथाच्या प्रारंभी आढळते.

एकपणें तूंचि आतां ।
एकीं दाविसी अनेकता ।
परी एकात्मता न मोडे ॥

तुकाराम महाराजांनी गणेश आणि विठ्ठल यांच्यामध्ये काहीही फरक नाही, हे प्रतिपादन केले आहे. मस्तकी केशर कस्तुरीची उटी धारण करून, हातात मोदकाची वाटी घेऊन नाचत नाचत येणाऱ्या गणपतीची आठवण तुकोबाराय आवर्जून काढतात.

गणराया लवकर येई । भेटी सकळांसी देई ||
अंगी शेंदुराची उटी । केशर कस्तुरी लल्लाटी ||
पायी घागुऱ्या वाजती। नाचत आले गणपती ||
अवघ्या गणाचा गणपती । हाती मोदकाची वाटी ||
तुका म्हणे शोधून पाहे । विठ्ठल गणपती दुजा नोहे ||

हा अभंग भारुडात, लळितात हमखास म्हटला जातो.

श्री रामदास स्वामींनी लिहिलेली गणपतीची आरती तर सर्वांमुखी आहे. दासबोधातील गणेशस्तवन म्हणजे भाषावैभवाचे सुरेख उदाहरण ठरावे. सर्व अज्ञान, भ्रम ह्याचे उच्चाटन करणारा, सर्व सिद्धींचे फळ देणारा आणि साक्षात बोध असे गणपतीच्या स्वरूपाचे वर्णन स्वामींनी केले आहे.

ॐ नमो जि गणनायेका । सर्वसिद्धिफळदायेका ।
अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरुपा ॥ १ ॥

त्याच्या रूपाचे वर्णन करताना, त्याला स्वामी सर्वांगसुंदर म्हणून संबोधतात. त्याच्या बुद्धीची कल्पना देण्यासाठी त्याला चौदा विद्यांचा गोसावी, सकळ विद्यांचे आगर संबोधून, त्याच्या कृपेनेच लेखक उत्तम गद्य पद्यरचना करून मोठ्या योग्यतेस चढतात, हे रामदास स्वामींनी आपल्या रचनेमध्ये प्रतिपादन केले आहे.

सगुण रुपाची ठेव |माहा लावण्य लाघव ।
नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥

ऐसा सर्वांगें सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु||

तैसी मंगळमूर्ती आद्या | पासूनि जाल्या सकळ विद्या |
तेणे कवी लाघव गद्या | सत्पात्रे जाले ||

संतसाहित्यातील गणेशाचे रूपडे मंगलमूर्ती, आद्यस्वरूपी, गणनायक असे आहे.

संतसाहित्याखेरीज लोकसाहित्यामध्येदेखील, नाटकाआधी ‘नांदी’, तमाशातील ‘गण’ आणि दशावतारातील ‘नमन’ झाल्यानंतरच पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्याची परंपरा आहे. गणपतीच्या रूपगुणांचे, लीलांचे आणि भावभक्तीचे वर्णन या काव्यांमधून केलेले असते. उदाहरणार्थ, हे गण पाहा,

१. रंगराज आज महाराज गणपती |
एकदंत वक्रतुंड|
हास्यवदन सरळशुंड|
फरशांकुश करिं प्रचंड|
दुर्वांकुर गंडस्थळिं दिव्य मिरविती||

किंवा

२. महाराज गवरिनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगळमूर्ती|
ठेविं कृपादृष्टि एकदंत दिनावर पुरती
हे स्वयंभु शुभदायका हे गणनायका गीतगायका अढळ दे स्फूर्ती
भव समुद्र जेणेंकरून सहजगति तरती
म्हणऊन लागतों चरणी गजमुखा
दे देवा निरंतर स्मरणींच्या सुखा
दूर करिं रे अंत:करणीच्या दुखा
जय हेरंब लंबोदरा स्वरूपसुंदरा स्वामिसहोदरा हे विघ्ननिवारी
मज रक्षिं रक्षिं सहकुटुंब सहपरिवारी
हे गणेश हे माधवा हे गवरिधवा लोकबांधवा मित्र तमारी

३. हे गणनायक सिद्धिविनायक,
वंदन पहिले तुला गणेशा,
रसिकजनांनी भरले अंगण व्हावे मनाच्या त्यांच्या रंजना,
लवकर यावे,
दर्शन द्यावे घ्यावे जवळी एकच आशा

शाहीर सगनभाऊ जेजुरीकर ह्यांनी लिहिलेले हे गण पाहा,

१. रंगरूप ज्ञानकळा, अगाधही तुझी लिला
सरळ सोंड वक्रतुंड हे गजानना
सभेमध्ये यावे तुम्ही ।।
पायी घुंगरू वाजताती, सभेमध्ये नाचताती
द्यावी मला ज्ञानमती, कुलभुषणा||
ऋद्धी सिद्धी तुझे हाती, पाव मला गणपती,
सगनभाऊ स्मरती चित्ती सभारंगणा||

२. शेंदूर चर्चित मुकुट विराजित । मस्तकी दूर्वा वाहू
अंकी शोभे देवी सरस्वती । गोड ध्यान हे पाहू
अनन्यभावे पदमलाने । शरण चला जाऊ ।।

पारंपरिक लोककलेमध्ये गणपतीला आद्यपूजेचा मान दिलेला आहे. रंगभूमीच्या ह्या आद्यदैवताचे दर्शन आल्हाददायक आहे.

लोककलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून गणेशाची आराधना केली आहे. गोंधळ, भारूड, दशावतार, लळीत, कलगीतुरा, पोवाडा, तमाशा, लावणी, खडी गंमत अशा विविध लोककलांच्या प्रकारांत आणि लोकसंगीतांत गणेशस्तुती आणि वर्णन करण्यात आलेले आहे. शाहीर पठ्ठे बापूराव यांनी ‘आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो!’ असे म्हटले आहे. ‘लवकर यावे सिद्ध गणेशा, आतमधी कीर्तन वरून तमाशा, माझा भरवसा तुम्हावर खासा, विघ्न पिटविशी दाही दिशा’ अशी प्रार्थनाही त्यांनी गणपतीला केली आहे.

शाहीर राम जोशी यांनी ‘ गौरीनंदना, अमरवंदना, दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ठेवी कृपादृष्टी एकदंत दीनावर पूरती’ असे वर्णन केले आहे. शाहीर प्रभाकर यांनी ‘गौरीसुता लंबोदरा ये, सिंदूर मर्दन विघ्नहरा ये, मती दे गजानना परशुधरा ये, गीत प्रसंगी रे करी आज सिद्धी गातो, आधी तुला विघ्नहरा ये’ म्हणत गणेशवंदना केली आहे. शाहीर होनाजी बाळा म्हणतात, ‘गजवदन बहुत गोजिरे, मस्तकी बरे दुर्वाकुर तुरे, चतुष्करी चित्रविचित्रे मूषकध्वज, लंबोदरा सिंदूरध्यान जे जपती मंत्रे, भजियेला एकदंत सिद्धिविनायक, तो सुखदायक हे गुणनायक हृदयी धरती’.

जागरण, गोंधळ, भराड, गण हे लोककला सादर करण्यापूर्वी, प्रारंभी सादर होणारे प्रकार. यामध्ये आणि कलगी-तुर्‍यामध्ये गणेशाला वंदन करतात. कलगीपक्ष तुरापक्षाचे शाहीर गणाच्या उत्पत्तीसंबंधी परस्परांना कूट प्रश्‍न विचारतात. ही कुटे‌ आध्यात्मिक स्वरूपाची असतात. पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड यांचे गण उदाहरणे म्हणून सांगता येतील. ‘गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर ठेवला कोणासाठी’ ह्या पठ्ठे बापूराव यांच्या प्रश्नाला, ‘गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू यक्षिणीप्रति', हे उत्तर दुसर्‍या गणातून भाऊ फक्कड यांनी दिले आहे. गणांची निर्मिती करताना ह्या गणांद्वारे परस्परांना आव्हान देण्याचा गानप्रकार म्हणूनही ह्या रचनाकारांनी गणांचे उपयोजन केले. पठ्ठे बापूरावांचा हा गण पाहा,

लवकर यावे सिद्ध गणेशा
आतमधी कीर्तन वरूनी तमाशा
माझा भरवसा तुम्हावरी खासा
विघ्न पिटविशी दाही दिशा
झेंडा मिरवशी आकाश पाताळी
वैरी करिती खाली मिशा
पठ्ठे बापूराव कवीच्या कवनी
बाजारबुणग्याचा झाला हशा

गणांतील गणपती वेगवेगळी रूपे धारण करतो. कधी बालरूप, कधी विद्याधिपती, सकळकलांधिपती, तर कधी विघ्नविनाशक, गौरीनंदन.

शंकरराव जाधव-धामणीकर यांनी शब्दबद्ध केलेले रूप पाहा-

१. आज वंदन करितो, गौरीनंदन
नवविध विद्या करितो भक्ती
भक्तासी द्यावी मुक्ती
हीच आमुची सर्व शक्ती लावितो पणा॥
चौदा विद्येचा गणपती। चौसष्ट कला तुझे हाती
बालकासी द्यावी स्फूर्ती । गावया गुणा॥
नमो तुज सरस्वती । ब्रह्म वीणा घेऊन हाती।
स्वर गायनाने डुलती सभा रंगणा
शाहीर शंकर करी गर्जना । रक्षी रक्षी भक्ताजना।
बबन नामदेव दावा । अंतरी खुणा

२. या गणा या या रणा या। विघ्न हारा या तारा या॥
तुझ्याच स्मरणी जग हे तरले। अखंड व्यापुनी त्रिखंड उरले।
दुखंड मनाला कधी न पुरले। पाखंड मनाला माराया॥
काम, क्रोध अनिवार । होतो मजवर मारा फार।
पडेल कार्याचा हा भार। जडल रोग तो बाराया ॥
ॠद्धि-सिद्धीचा तू सागर। दु:ख क्लेश हाराया।
विकल्पबुद्धीचा हा घोर। ज्ञान अमृत पाजावा॥
कवि शंकर म्हणे कृपासिंधु। दीननाथा दीन बंधू।
वारंवार तुजशी वंदू । दु:ख क्लेश हाराया॥

भारुडासारख्या आध्यात्मिक लोककलाप्रकाराचे मूळ स्वरूप भक्तिनाट्य असे आहे. भारुडाचा प्रारंभही गणेशस्तवनाने होतो. गणपती, ऋद्धि-सिद्धी, सरस्वती ही सोंगे काढली जातात. भारुडातला गण असा –

तुज नमो नमो ओमकार स्वरूपा
ओमकार स्वरूपा नमो नमो ओमकार स्वरूपा
ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुज नमो
तुज नमो नमो ओमकार स्वरूपा

स्त्रीगीतांत, भोंडल्यासारख्या खेळांमध्येदेखील गणपतीची गाणी आहेत. ‘ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा’ ह्या गाण्याने गणपतीचे स्मरण करत भोंडल्याची सुरुवात होते. ओव्यांमधून गणराय डोकावतो.

एकुणिसावी माझी ओवी, एकूण एक करा|
संसारीं नित्य स्मरा, गणेराया||

एकविसावी माझी ओवी, एकवीस मोदक|
तेणे सिद्धिविनायक, सुप्रसन्न||

किंवा, ह्या.

आधी नमन करू
देव गणपती
शारदा सरस्वती
मोरावरी ॥१॥

मोरया रे देवा
तुला दुर्वांची आवडी
एकविसांची जुडी
बाळासाठी ॥२॥

मोरया रे देवा
लाडू घे सोंडेवरी
पुत्र दे मांडीवरी
उषाताईला ॥३॥

मोरया देवाला
केले दुर्वांचे आसन
झाला मोरया प्रसन्न
भाईरायाला ॥४॥

मोरया रे देवा
तुला लिंपीन शेंदूर
पुत्र दे सुंदर
उषाताईला ॥५॥

मोरया रे देवा
तुला जास्वंदीचे फूल
मांडीये देई मूल
उषाताईला ॥६॥

मोरया रे देवा
सारी विघ्ने ही हाकावी
तान्हे बाळाला राखावी
दूरदेशी ॥७॥

मोरया रे देवा
सारी विघ्ने कर दूर
निर्विघ्न माझा कर
संवसार ॥८॥

आणा गणेशाला
गणेशचतुर्थीला
देईल सुदबुद्धीला
तान्हे बाळ ॥९॥

आणावा गणेश
विघ्ने तो करी दूर
सुखाला येवो पूर
गोपू बाळाच्या ॥१०॥

आणावा गणेश
त्याला वाहू हिरव्या दुर्वा
प्रार्थू मनोरथ पुरवा
गणराया ॥११॥

आणावे नारळ
करीन एकवीस मोदक
देव सिद्धिविनायक
कृपा करो ॥१२॥

संकष्ट चतुर्थी
आहे माझा नेम
भाचा सांगेन ब्राह्मण
गोपू बाळा ॥१३॥

संकष्ट चतुर्थी
चंद्र दिसतो हिरवा
सखी वेचते दुरवा
पूजेसाठी ॥१४॥

पंढरीच्या वाटेवर चालताना, गणपतीच्या आठवणीत गायली जाणारी ओवी,

पहिली माझी ओवी गणराया गणपती|
देवाच्या सभेला सारजा बाई गं व्हती||
दुसरी माझी ओवी गणरायाला गायिली|
देवाच्या सभेला उभी सारजा राहिली||

ह्या धनगरी बाजाच्या ओव्या,

आधी नमिला गणपती सरस्वती सारजाबाई|
हात जोडूनी नमितो पायी ठेवितो डोई||
म्हणे म्हसकू महादू शरण तुम्हां मी येई|
गाव तुमच्या चरणापाशी ठाव देई||

संगीत नाटकांतील नांदींमधूनही गणपतीचा उल्लेख आहे. संगीत शाकुंतल नाटकातील ‘पंचतुंड नररुंडमाळधर पार्वतीश आधी नमितो, विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मग तो’ ही नांदी, बाळ कोल्हटकर यांच्या वाहतो ही दुर्वाची जुडी नाटकातील ‘गजाननाला वंदन करुनी, सरस्वतीचे स्तवन करोनी, मंगल शिवपद मनी स्मरोनी, सद्भावाने मुदित मनाने, अष्टांगाची करुनी ओंजळ, वाहतो ही दुर्वाची जुडी' या नांदी प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रासारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या राज्यात वेगवेगळ्या लोककला पूर्वीपासून ते आजही सादर होताना दिसतात. नृत्य, नाट्य, संवाद, लोकगीते, नमन, खेळे ह्या माध्यमांतून खेडोपाडी वसलेल्या समाजाच्या जीवनाचा पट, बोलीभाषा, रोजचे आयुष्य उलगडत जाते.

लोककला विचारात घेतल्या तर त्यांमध्ये कोकणातील़ नमन (खेळे), शक्तीतुरा (जाखडीनृत्य) हे प्रकार प्रसिद्ध आहेत. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील नमन (खेळे) लोकप्रिय आहेत. गणपतीचे आगमन, साथीला मृदुंगाचा ठेका, ढोलकीचा ताल, त्या साथीने सादर होणारी गवळण, काल्पनिक अथवा पौराणिक वगनाट्य हे सारे नमनाचा भाग असते. नमनामध्ये सोंगे असतात. सोंगात प्रथम मान गणपतीचा. गणपतीपूजन व गाणे होते. गणेश पूजनात गणेशाची आख्यायिका असते. दिवाळीपेक्षाही महत्त्वाचे असे होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातले खरेखुरे उत्सव. भाताची लावणी संपलेली असते आणि उत्सवांसाठी शेतकरी मोकळाच असतो. भातलावणी संपता संपता घरोघरी गणपती येतात.

जाखडी म्हणजे बाल्या नृत्य. गावामधल्या प्रत्येक वाडीत जाखडीचा संच असतो. आठ गडी फेर धरून वादकांच्या भोवती नाचतात. ढोलकी आणि घुंगरू ही पारंपरिक वाद्य आणि आधुनिक ढंगाची गाणी यांचा मेळ जाखडीत असतो. गणा धाव रे, हे ह्या प्रकारातील गाणे लोकप्रिय आहे.

दशावतार हा कोकणातला लोकप्रिय नाट्यप्रकार. दशावताराचे उल्लेख दासबोधातही मिळतात. समर्थांनी त्याविषयी म्हटले आहे, ते असे -

खेळता नेटके दशावतारी। तेथे येती सुंदर नारी।
नेत्र मोडिती कळाकुसरी। परी अवघे धटिंगण॥

दशावतारी मुख्य नाट्य सुरू व्हायच्या आधी नमन सुरू होते.

पतीया तुझे नाम स्मरणे हो
हे जिताम ता थय्या

सूत्रधाराकडून गणपतीचे स्तवन सुरू होते, आणि आणि चादरीच्या आडून गणपती, ऋद्धी, सिद्धी रंगमंचावर येतात.

नमन गणराया पहिले नमन गणराया
ऐसी गजवदनाची ज्याने भक्ती केली साची हो
म्हणून रामदास लागे तुझ्या चरणी हो
गणपतीया तुझे नाम स्मरणे हो
हे जिताम ता थय्या ता

आणि या नमनानंतर पूर्वरंग रंगायला सुरुवात होते.

कोकणात दशावतार, तर देशावर लळीत. लळीत म्हणजे जुन्या, पुरातन काळाचे नाटक. सांगलीतील पटवर्धनांच्या गणेशमंदिरातील लळिते, पुणे जिल्ह्यातील उंबरज, पिंपळगाव परिसरात सादर होणारी लळिते, मराठवाड्यात अंबेजोगाई, अंबड परिसरातील लळिते प्रसिद्ध आहेत. लळितात ऋद्धी, सिद्धी असतात. लळितातील विदूषक आणि सूत्रधार गणेशासंबंधी मजेशीर, थट्टेखोर सुरात टिंगल मस्करीवजा बोलतात, पण ते आंतरिक भक्तीच्या उमाळ्यापोटी असते. जणू देवाला प्रेमाने बांधून ठेवण्याचा प्रयत्न. देवात आणि आपल्यात काहीच फरक नाही, तू तोच मी आणि मी तीच तू, ह्या जाणिवेपोटीचे ते प्रेम आहे. ‘तुजमज नाही भेद, केला सहज विनोद’ ही आंतरिक जाणीव आहे.

असाच एक लोकनाट्याचा प्रकार आहे, दंडार. चंद्रपूर जिल्ह्यातील ह्या नाट्यप्रकारात संवादापेक्षा गाण्याची भर जास्त असते. साधारण दिवाळीनंतर गावागावात दंडारीचे प्रयोग सुरु होतात. ‘दंड’ म्हणजे शेत आणि ‘डार’ म्हणजे डहाळी. हातात झाडाच्या अनेक ‘डहाळ्या’ घेऊन नृत्य करणे म्हणजे ‘दंडार’ असा उल्लेख विविध ग्रंथात आढळतो. ह्यात 'बैठी दंडार’ ‘खडी दंडार’ आणि ‘परसंगी दंडार’ असे प्रकार आढळतात. नाट्य सुरू होताना, सुरुवातीस मुख्य सूत्रधार प्रेक्षकांमधून मार्ग काढत रंगमंचावर उपस्थित होतो. त्याच्यामागून विदूषक हातात दोन डहाळ्या हलवत प्रवेश करतो आणि नाट्याला सुरुवात होते. प्रथम गणपतीचा प्रवेश आणि स्तुती होते, आणि गणपतीची आरती गायली जाते. हा दंडारीचा पूर्वरंग होय. त्यानंतरच्या भागात खडे सोंग, विनोद व झडत्या सादर करण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्रातील लोककलेचा विचार करता, तमाशाला विसरून कसे चालेल?

सातवाहन काळात प्रतिष्ठान - पैठण येथे रतिनाट्यासारखे कलाप्रकार सादर करण्याची प्रथा होती, त्यात तमाशातील गण प्रकाराचे मूळ आहे, अशी मान्यता आहे. ह्या नाट्याची सुरुवात मंगलचरणाने करत. हाच तो गण. मंगलचरणामध्ये गायली जाणारी स्तुतिगीते म्हणजेच गण होय. पहिला गण शंकर आणि पार्वतीचा, दुसरा गण लक्ष्मी आणि नारायणाचा व तिसरा गण गणपतीचा अशा प्रकारची स्तुतिगीते गायली जात.

शाहीर हैबती घाटग्यांनी गणेशाला वंदन करण्यासाठी स्तुतिपर गणाच्या रचना केलेल्या आहेत. ओळी खालीलप्रमाणे –

श्री गजानन गणपती । मंगलमूर्ती
द्यावी मज मती समारंभाला । हो ।

त्याचप्रमाणे शाहीर पठ्ठे बापूराव ह्यांनी आपल्या गणात गणपतीचे सांकेतिक स्वरूपात कसे पारंपरिक वर्णन केलेले आहे, ते पाहा.

गण माझ्या अंगणी नाचीत आलेला सारथी बनीला।
माझ्या मनाचा पाझर खणला-चौदा विद्येचा दृपद
नवरस-गायनी खूप रंग जमला। कवने केली
बागायत खरी पानस्थळ, नवे जिराइत।
पठ्ठे बापूराव कवितेचा पटाईत खूप रंग जमला।।

गणपतीला आद्य दैवत मानत, त्याच्यावर गणाच्या स्वरूपात अशी स्तुतिगीते लिहिली गेली आहेत. भारूड, लळीत, दशावतार, तमाशा आदी कलाप्रकारांप्रमाणेच चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या आदी प्रकारांमध्येही गणेशाचा धावा केलेला असतो.

असा हा लोकसाहित्यात, नाट्यात आणि नृत्यात रमलेला गणराय. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दक्षिणेकडे, झालेच तर राजस्थान इत्यादी ठिकाणीसुद्धा तो जनमानसात वंदनीय आहे आणि तेथील लोकसाहित्यातदेखील त्याचे अस्तित्व उमटले आहे.

त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

प्रचि श्रेयनिर्देश: आंतरजालावरून साभार, प्रताधिकारमुक्त.

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

2 Sep 2019 - 9:15 am | यशोधरा

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे |
माथा शेंदूर झरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे ||
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे |
गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे ||

लोकसाहित्यात, नाट्यात आणि नृत्यात रमलेला गणराय आवडला.

तुषार काळभोर's picture

2 Sep 2019 - 10:15 am | तुषार काळभोर

खूप आवडला!!

अलकनंदा's picture

4 Sep 2019 - 4:09 pm | अलकनंदा

अरे वा! धन्यवाद आपले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2019 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख !

पद्मावति's picture

2 Sep 2019 - 12:46 pm | पद्मावति

सुरेख लेख.

खूप सुंदर लेख! गण ह्या प्रकाराशी माझी ओळख झाली ती 'मंगल गाणी-दंगल गाणी' ह्या अल्बम मुळे. त्यातलं  शुभ मंगल चरणी गण नाचला   हे माझं ऑल टाईम फेवरीट गाणं!
माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद _/\_

अनिंद्य's picture

2 Sep 2019 - 7:15 pm | अनिंद्य

साहित्य-लोकजीवनातल्या गणेशरूपाचा आढावा सुंदर.

प्रचेतस's picture

3 Sep 2019 - 8:39 am | प्रचेतस

लोकसाहित्यातून आलेल्या गणेशाचा उत्तम आढावा घेतलेला आहे. माहितीपूर्ण लेख.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Sep 2019 - 1:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

खुपच आवडला लेख
पैजारबुवा,

स्वाती दिनेश's picture

4 Sep 2019 - 12:52 pm | स्वाती दिनेश

उत्तम लेख,
लोकसाहित्यातला बाप्पा आवडला.
गणपतीची कितीतरी लोकगाणी, श्लोक, आरत्या यांच्या आठवणी ताज्या झाल्या.
स्वाती

अलकनंदा's picture

4 Sep 2019 - 4:10 pm | अलकनंदा

वाचक व प्रतिसादकांचे आभार.

नाखु's picture

4 Sep 2019 - 9:30 pm | नाखु

संग्राह्य लेख, गणपतीच्या सर्व लोक साहित्य,संत साहित्य याचा उत्तम धांडोळा घेतला आहे आणि सकल विद्यांचा मुख्य का तेही अलगदपणे उलगडून दाखवले आहे.

व्यासंगाशी नतमस्तक नाखु पांढरपेशा

प्राची अश्विनी's picture

10 Sep 2019 - 7:57 am | प्राची अश्विनी

+१११

नूतन's picture

15 Sep 2019 - 2:22 pm | नूतन

छान आढावा.

मदनबाण's picture

15 Sep 2019 - 5:20 pm | मदनबाण

माहितीपूर्ण लेखन !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiqui