१७ ऑगस्टच्या सकाळी लेह ला निलेश च्या घरी उतरलो. निलेश नुब्रा व्हॅली मधल्या प्रतापपूरला गेला होता. तो दुपारी आला. पहिला दिवस पूर्णपणे झोपण्यात आणि निलेश शी गप्पा मारण्यात मजेत गेला. समुद्रसपाटीपासून जवळजवळ साडेअकरा हजार फूट उंचीवर असल्यामुळे लेह च्या हवेत प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन ची कमतरता आहे. जसजसं उंच जाऊ तसतसं हवेतलं प्राणवायूचं प्रमाण कमी कमी होत जातं. त्यामुळे अश्या ठिकाणी नवख्या व्यक्तीला मळमळ, चक्कर येणे, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे निदान २४ तास तरी पूर्णपणे आराम आवश्यकच असतो. आपल्या शरीराला तिथल्या हवेशी जुळवून घ्यायला हा एवढा वेळ द्यावा लागतो. अगदी लेह मध्ये राहणारा माणूस जरी खाली जम्मू वगैरे ला जाऊन आला तरी त्यालाही निदान दिवसभराचा आराम लागतोच लागतो. आपल्याला हा असा काही त्रास तर नाही ना होत हे चाचपून बघत निलेशच्या घरी स्वस्थ बसून राहिलो. चहा, नाश्ता, जेवण सर्व काही वर खोलीवर आलं. त्यामुळे घराचा उंबरठा ही ओलांडला नाही. आधीच मुंबई हून निघताना मला सर्दीने पकडलेलं आणि तिथे पोहोचल्यावर नाक, घसा अजूनच खराब झाला होता. तिथल्या लोकांच्या मते लेह च्या हवेत आज नेहमीपेक्षा जरा गारठा जास्त होता. आम्हाला काही ऊन पडलेलं दिवसभरात दिसत नव्हतं. इथे कल्याण-मुंबई मध्ये रोजच्या गोंगाटाला सरावलेल्या आमच्या कानांना तिथली शांतता अगदी खटकत होती. पण आम्ही लडाख मध्ये पोहोचलो आहोत या कल्पनेनेच आम्हाला दोघांनाही 'जाम भारी' वाटत होतं.
आम्ही कारगिल ला जाणार आणि तिथल्या जवानांना भेटणार म्हणून आईने तिच्या शाळेतल्या दुसरी, तिसरी, चौथी च्या मुलांना सैनिकांना देण्यासाठी शुभेच्छापत्रं-भेटकार्डं बनवून आणायला सांगितली होती. साधारण अशी २०० रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाची शुभेच्छापत्रं आम्ही लेह ला घेऊन आलो होतो. रात्री निलेशसोबत आम्ही ती वाचत बसलो. काही काही खूप छान होती तर काही काही विनोदी सुद्धा होती. त्यातली काही निवडक पत्रं आम्ही सकाळी न्यायच्या बॅगेत भरली. सोबत आईने दिलेल्या राख्या ही घेतल्या. आमचे दोघांचे रेनकोट, अंगावरच्या जॅकेट शिवाय अजून २ जाकीटं, काही औषधं, थोडा खाऊ वगैरे बॅगेत भरलं आणि झोपायला गेलो. खरं तर अगदी शुक्रवार-शनिवार पर्यंत कारगिल ला जायची पर्यटकांना परवानगी मिळत नव्हती म्हणे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरक्षेचं कारण होतं की कारगिल मध्ये होत असलेल्या विरोधाचं कारण होतं ते त्यांनाच माहीत. पण आमच्या नशिबाने रविवारी आम्हाला तिथे जायला मिळणार होतं. आता लडाखचा खरा प्रवास सुरु व्हायला केवळ ६-७ तास बाकी राहिले होते.
ठरल्याप्रमाणे सकाळी ६ च्या आधीच चारचाकी गाडी घेऊन Taar Yashi Thankpa उर्फ ताशी घराखाली हजर होता. लेह ला रात्रीपासून बारीक बारीक पाऊस पडत होता. त्यामुळे थंडी जरा जास्तच वाजत होती. आम्ही दोघांनी आमचे आवडते 'यंग इंडिया' चे टीशर्ट घातले होते. गाडीतून निघालो तेव्हा पावसामुळे खिडकीच्या काचा बंद ठेवाव्या लागत होत्या. काचेवर पाणी जमा होत असल्यामुळे बाहेरचं काही विशेष दिसत नव्हतं. अशातच आम्ही लेह सोडलं. काही मिनिटांतच आम्ही 'मॅग्नेटिक हिल' च्या स्पॉट वर येऊन पोहोचलो. गियर न्यूट्रल वर ठेवून गाडी बंद केली की गाडी आपोआप समोरच्या टेकडीच्या दिशेने उताराच्या विरुद्ध दिशेला चढत जाते. त्याचं प्रात्यक्षिक दाखवून झालं. मी कुठेतरी वाचलं होतं की हा प्रकार म्हणजे नजरेचा भ्रम आहे म्हणून. मला ते पडताळून पाहायचं होतं. पण त्यासाठी मी ओळंबा किंवा तत्सम पातळी योग्य आहे की नाही हे पाहणारी काहीही उपकरणं सोबत नेली नव्हती. मी थोडे काही वायफळ प्रयत्न करून पाहिले आणि सोडून दिले. त्या तिथल्या पावसात मला ओलं व्हायचं नव्हतं आणि मला आजच्याच दिवशी द्रास वरून लेहला परतायचं होतं. एकूण जाऊनयेऊन साधारण साडेपाचशे किलोमीटर चा प्रवास होता आणि कुठेही वेळ वाया घालवणं हे परवडणारं नव्हतं.
या राष्ट्रीय महामार्ग १ म्हणजेच लेह-श्रीनगर महामार्गावरून आम्ही पुढे निघालो. 'पत्थरसाहिब गुरुद्वाराचं' बाहेरूनच दर्शन घेतलं. हळूहळू पाऊस कमी होत गेला. माझ्या बाजूची खिडकीची काच उघडली आणि उजवीकडचे डोंगर व डावीकडची खळाळून वाहणारी सिंधू नदी पाहू लागलो. काही अंतर गेल्यावरच सिंधू आणि झंस्कार यांच्या संगमाची जागा आली. उतरून दृश्य डोळ्यांत आणि पटकन कॅमेऱ्यात साठवून घेतलं आणि पुन्हा गाडीत बसलो. इथे या ठिकाणी रिव्हर राफ्टिंग करतात म्हणे. किरण ने तर नुसतं हे ऐकूनच "नको बाबा!" म्हणत गाडीत बसल्या बसल्याच अंगावरचं स्वेटर आणखी घट्ट लपेटून घेतलं.
इथे लडाख मध्ये बहुतांश भाग हा डोंगरी असल्यामुळे साहजिकच सगळे रस्ते वळणावळणाचे. आपल्याकडे घाट तश्या त्यांच्याकडे खिंडी. लेह हून कारगिल ला जाताना 'फोटूला' आणि 'नमिकाला' अश्या दोन खिंडी लागतात. तिथल्या भाषेत खिंडीला 'ला' असं संबोधतात. लेह पासून १२९ किमी अंतरावर आपण 'फोटूला' पास च्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचतो. हे ठिकाण साडेतेरा हजार फूट उंच आहे.
तिथून उतरून पुन्हा डोंगर चढत ३७ किमी अंतरावर १२१९८ फूट उंचावरच्या नमिकाला पास वर पोहोचतो. लडाख चं वैशिष्ट्य म्हणजे दगडांचे, डोंगरांचे भरपूर वेगवेगळे प्रकार. काही अगदी फिकट पिवळे, तर काही किरमिजी. काही राखाडी तर काही थोडेसे जांभळे. काही तर वरपासून खालपर्यंत अखंड घसरगुंडी वाटावी असे तिरक्या कडेचे. तिथले खडक आपल्या इथल्या सारखे कठीण न वाटता अगदी भुसभुशीत वाटतात. पण आपण चालत असतो तो रस्ता अश्याच भुसभुशीत डोंगरात खोदलेला असतो हे आपल्या नंतर ध्यानात येतं. फोटो काढण्यात जास्त वेळ न दवडता, शक्य तितकी दृश्यं डोळ्यांत साठवत आम्ही कारगिल कडे मार्गक्रमणा करत होतो. लेह पासून ९५ किमी वर असलेल्या 'खल्सीत' गावात जाऊन थोडं थांबलो. तिथला 'थुप्का' हा प्रकार चाखून पाहिला. चांगला पौष्टिक वाटला. तिथून लेह पासून ११५ किमी असलेल्या 'लामायुरू' गावातल्या मॉनेस्ट्री कडे नजर टाकत पुढे जात कुठेही न थांबता साधारण १ च्या सुमारास कारगिल मध्ये येऊन पोहोचलो.
लडाख हा सैनिकी आणि सामरिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा प्रांत आहे. अनेक ठिकाणी आम्हाला रस्त्यात भारतीय सैन्याचे लहान-मोठे तळ लागत होते. काही महत्वाच्या ठिकाणी चौक्या वगैरे होत्या. सैन्याची वाहनं रस्त्यावरून जाताना दिसायची. सगळे सैनिक हसतमुख होते. एखाद्या चौकीवर एखाद्या सैनिकाशी बोलण्याची वेळ आली तर 'जय हिंद' ने सुरुवात व्हायची आणि निरोप ही 'जय हिंद' म्हणूनच घेतला जायचा. लेह जिल्हा हा बौद्धबहुल आहे आणि कारगिल जिल्हा हा मुस्लिमबहुल. कारगिल शहरात थांबण्यासारखं, पाहण्यासारखं काहीही नाही. हॉटेल्स मधूनही बहुतांश मांसाहारीच जेवण मिळतं. त्यामुळे थांबून काही खाण्याचा प्रश्नच येत नव्हता. ताशी ने कारगिल मार्केटमधून गाडी काढली. कारगिल सोडता-सोडता एक रस्त्यावरची पोलीस चौकी लागली. नेहमीप्रमाणे त्याने इथेही गाडी थांबवली आणि आमच्या दिशेने येणाऱ्या जम्मू-काश्मीर पोलिसाला त्यांच्या लडाखी भाषेत सांगितलं, "द्रास ला चाललो आहे."
तो ही त्याच भाषेत "अच्छा, द्रास ला चालला आहेस! ठीक आहे जा." असं शांतपणे म्हणाला.
ताशीच्या मागे मी बसलो होतो. माझ्याकडे वळून हात थोडा उंचावून हसून म्हणाला "चलो, ठीक है।"
मी ही हसून, हात थोडा उंचावून त्याला म्हणालो, "जय हिंद!"
तो ".....!!!"
जे 'जय हिंद' मला त्याच्याकडून अपेक्षित होतं ते तो अजिबात बोललाच नाही! फक्त मान बारीकशी हलवली, बस्स. मला ही बाब चांगलीच खटकली. ताशी ने लागलीच गाडी पुढे काढली. आपल्याच देशात राहून आपल्याच देशाला आपलं न मानणं म्हणजे काय, ह्याची प्रचिती मला पहिल्यांदाच स्पष्टपणे आली होती. ती ही एका पोलिसाकडून. पुढे एका ठिकाणी मला एका बंद घरावर "SAVE 370" असं लिहिलेलं ही दिसलं. तिथे म्हणे कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात निदर्शनं झाली. पण आज सगळी शांतता होती. साधारण तासाभरातच कारगिल पासून ५४ किमी असलेल्या द्रास ला आम्ही पोहोचलो. ताशी ने थेट तिथल्या युद्ध स्मारकासमोर (War Memorial) गाडी थांबवली.
गाडीतून उतरताच समोर लक्ष वेधून घेत होता उंचच्या उंच आणि मोठ्ठा असा आपला भारतीय राष्ट्रध्वज. आम्ही त्या दिशेने निघालो. वॉर मेमोरियल च्या दरवाज्यातून आत जाताच आमचं नाव-गाव एका वहीत लिहिलं गेलं. आम्ही सगळा परिसर न्याहाळत होतो. दरवाज्याच्या थेट समोर मध्यभागी एक रस्ता होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लहान लहान तिरंगी झेंडे तिरके लावले होते. त्यांच्या मध्ये कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या काही सैनिकांचे अर्धपुतळे लावलेले होते. डावीकडच्या प्रांगणात एक लढाऊ विमान ठेवलं होतं आणि उजवीकडच्या प्रांगणात काही तोफा ठेवल्या होत्या. मधला रस्ता थेट स्मारकाकडे जात होता आणि स्मारकाच्या मागे तो प्रचंड उंच आणि भव्य असा तिरंगा वरच्या निळ्याशार आकाशात घुसून डौलाने फडकत होता. ह्या इथल्या वातावरणात मुळातच एक भारलेपण होतं. ९९ चं कारगिल युद्ध अगदी थेट ह्याच भूमीवर झालं होतं. डावीकडे थोडं दूर टायगर हिल दिसत होतं. समोरच्या भव्य झेंड्याच्या बरोबर मागच्या डोंगररांगेत तोलोलिंग शिखर होतं. आम्ही उभे होतो त्याच जागी कदाचित शत्रुसैन्याचा एखादा तोफगोळा आला असेल, आपल्या एखाद्या सैनिकाचं रक्त सांडलं असेल, युद्धातल्या मोहिमांची आखणी झाली असेल, युद्ध संपल्यावर विजयी जल्लोष सुद्धा कदाचित इथेच झाला असेल! आम्ही उभे होतो ती साक्षात समरभूमी होती! आमच्या सोबत आत आलेल्या इतर काही पर्यटकांना एकत्र घेऊन तिथल्या एका सैनिकाने थोडक्यात माहिती सांगायला सुरुवात केली. बाजूच्या खोलीत कारगिल युद्धावर आधारित एक छोटासा चित्रपट दाखवला जाईल असं त्याने सांगितलं. त्याला आम्ही सोबत आणलेल्या राख्या आणि शुभेच्छापत्रकांबद्दल विचारलं. त्याने एका बाजूच्या तिकीट खिडक्यांकडे बोट दाखवत सांगितलं, "उधर बडे सहाब बैठे है, उनको दे देना।"
आम्ही त्या चित्रपटाच्या तिकिटाची चौकशी करायला त्या खिडकीवर गेलो. आमच्याशिवाय ते तिकीट काढणारं त्यावेळी तिथे कोणी नव्हतं. मग तिथला सैनिक आम्हाला बाजूच्या एका मोठ्या खोलीत घेऊन गेला आणि आमच्यासाठी २० मिनिटांचा व्हिडीओ चालू करून बाहेर गेला. कारगिल च्या चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा कसा आणि कधी घेतला इथपासून, लढाई कशी कशी होत गेली, कोण कोण सैनिक कसे कसे लढले, कुठल्या कुठल्या टेकड्या कधी कधी घेतल्या गेल्या, कोणाकोणाला शौर्य पदकं मिळाली हे सगळं त्यात दाखवलं होतं. काही खरे फोटो, काही खऱ्या व्हिडीओ क्लिप्स, काही नाट्य रूपांतर असं वापरून तो छोटासा चित्रपट बनवलेला होता. लडाखला आल्यापासून ऐकलेल्या अनेक जागांचा त्यात उल्लेख होत होता. युद्धाचं स्वरूप अगदी तपशीलवार समजत होतं. आपल्या भारतीय सैनिकांनी दाखवलेलं दुर्दम्य साहस आणि जबरदस्त शौर्य पाहून त्यांच्याबद्दल चा अभिमान शतपटीने वाढला होता. मनातल्या भावना उचंबळून येत होत्या आणि हुतात्मा झालेल्या सैनिकांची नावं आणि कथा ऐकून त्या अश्रूंवाटे बाहेर पडू लागल्या होत्या. ज्या वातावरणात आम्हाला एक जिना केवळ चढला तर धाप लागत होती, सलग फक्त अर्धा मिनिट सुद्धा धावण्याची आमच्या अंगात ताकद शिल्लक राहिली नव्हती अश्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ आपल्या आईचं-मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी डोंगरशिखरावर बसलेल्या शत्रूच्या गोळ्या छातीवर झेलत आपले हे शूर सैनिक ही शिखरं चढून गेले आणि फक्त तेवढंच नाही तर शत्रूसैन्याला हाकलून लावायचा भीमपराक्रम करून दाखवला. ही कामगिरी केवळ अतुलनीयच! इथे बसून हे असं सगळं लिहायला, वाचायला बरं वाटतं, पण प्रत्यक्षात हे नक्की काय आहे हे तिथे द्रासला गेल्याशिवाय अनुभवास येत नाही, येऊ शकत नाही. "आम्ही तुम्हा शूर सैनिकांना विसरणार नाही" अशा अर्थाचं गाणं त्या चित्रपटाच्या शेवटी होतं. अत्यंत जड अंतःकरणाने ते पाहिलं आणि डोळे पुसत त्या खोलीच्या बाहेर पडलो.
पुन्हा त्याच मघासच्या खिडकीवर जाऊन आम्ही आणलेल्या राख्या आणि शुभेच्छापत्रकांबद्दल सांगितलं. आता तिथे दोघे सैनिक बसले होते. ते तिथून उठून बाहेर आले. आम्ही त्या शुभेच्छापत्रकांपैकी एक बाहेर काढलं आणि त्यांना दिलं. त्यांना ते आवडलं. आम्ही या आमच्या खोलीत हे लावू, असं ते म्हणाले.
ही बहुतकरून पत्रं मराठी भाषेत लिहिली आहेत असं आम्ही त्यांना सांगितलं. ते दोघेही हिंदी भाषिक होते.
"कोई बात नही, वहां उपर पहाडोंपे हमारे जो मराठी भाई बैठे है, उन्हे हम ये दे देंगे। वहां उन्हे पुरा दिन-रात बैठना पडता है, तो उस स्थिती मे उन्हे ये एक टाईमपास के तरह हेल्प करेंगा. इन्हे देखके, पढके उनको अच्छा लगेगा, उनका दिल बहलेगा।"
मी त्यांना अजून एक शुभेच्छापत्र काढून दाखवलं. त्यावरचा मराठीत लिहिलेला मजकूर छान होता.
मी त्यांना म्हंटलं, "मै ये आपको हिंदी मे पढके दिखाता हूं।"
मी वाचायला सुरुवात केली.
"हमारे लिये यहाँ घर पे मनानेके लिये सब त्यौहार रहते है, मगर आपके लिये वहां सीमापे कोई त्यौहार..........."
मला पुढे बोलवेना. गळा दाटून आला, समोरची अक्षरं अंधुक दिसायला लागली. मी ते पत्र मिटून त्यांच्या हातात देऊन टाकलं. सगळी पिशवीच त्यांना देऊन टाकली. काहीही न बोलता राख्यांचा जुडगा काढला, एक राखी स्वतः घेतली आणि एक किरणला दिली. एका सैनिकाच्या हातावर मी बांधली. माझ्या गालांवरून ओघळणारे अश्रू थांबत नव्हते. राखी बांधून झाल्यावर का कोण जाणे पण मला त्या सैनिकाला आलिंगन द्यावंसं वाटलं. ते त्याच्या प्रोटोकॉल मध्ये बसत होतं की नाही माहीत नाही, पण त्याने मला अडवलं नाही. किरण ने दुसऱ्या सैनिकाला राखी बांधली. आमचे दोघांचेही शब्द खुंटले होते. मग त्यांनीच बोलायला सुरुवात केली, "हमने ये देखा है की यहां आनेवालोमेसे ९०% लोक महाराष्ट्र से रहते है। आपके वाहांके लोगोंमे देशभक्ती और ये जगह देखनेकीं चाह बहोत है।" आम्ही हसलो. त्यांच्यासोबत एक सेल्फी घ्यायची विनंती केली. त्यांनी ती मान्य ही केली.
पुढे कुठल्याही सैनिकाचा राखी बांधताना फोटो न काढण्याच्या अटीवर त्यांनी आम्हाला तिथे उपस्थित असलेल्या इतर ४-५ सैनिकांना राखी बांधायची परवानगी दिली. तेवढ्या राख्या बाजूला काढून बाकीच्या सर्व आम्ही त्यांना देऊन टाकल्या.
पुढे मुख्य स्मारकाची वास्तू बघायला निघालो. तिरक्या लावलेल्या झेंड्याच्या मधून काही पावलं चालत जात आम्ही मुख्य स्मारकासमोर पोहोचलो. तिथेही एक सैनिक कायम उभा होता. किरण ने त्याला राखी बांधली. स्मारकाच्या मागे झेंडा आणि झेंड्याच्या मागे कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सर्व सैनिकांची नावं लिहिली होती.
डाव्या बाजूच्या प्रांगणात १९४८ पासूनच्या अनेक सैनिकांच्या समाधी बांधल्या होत्या.
आणि उजव्या बाजूच्या प्रांगणात युद्धाबद्दलच्या छायाचित्र आणि दस्तऐवजांची प्रदर्शनी बनवलेली होती. ह्या सर्वांचं दर्शन घेत घेत २ तास कधी निघून गेले आम्हाला पत्ता लागला नाही. बाहेर पडता पडता सव्वाचार झाले होते. उर्वरित दिवसात आम्हाला लेह पर्यंतचं २७० किमी अंतर कापायचं होतं. आपल्या सर्वांचं प्राणपणाने रक्षण करणाऱ्या ह्या सर्व भारतीय सैनिकांना मनोमन नमस्कार करून आणि त्यांना सतत प्रेरणा देत डौलाने आकाशात फडकणाऱ्या आपल्या राष्ट्रध्वजाला सलाम करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
क्रमशः
प्रतिक्रिया
30 Aug 2019 - 3:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर अनुभव, सुंदर वर्णन !
30 Aug 2019 - 5:06 pm | विनिता००२
डोळ्यांतून अश्रू ओघ्ळू लागले . सलाम त्या वीरांना...आणि त्यांना भेटलेल्या तुम्हांला पण!!
30 Aug 2019 - 5:43 pm | श्वेता२४
पुढील भाग वाचायची उत्सुकता आहे.
30 Aug 2019 - 9:44 pm | पद्मावति
खुप सुंदर अनुभव __/\__
30 Aug 2019 - 11:25 pm | जॉनविक्क
31 Aug 2019 - 12:41 am | जालिम लोशन
+१
31 Aug 2019 - 6:56 am | सुधीर कांदळकर
उत्कटतेने लिहिले आहे. छान. आवडले. धन्यवद.
31 Aug 2019 - 10:06 am | अमर विश्वास
शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,
वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा...।
1 Sep 2019 - 7:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय सुंदर....!
-दिलीप बिरुटे
4 Sep 2019 - 12:15 pm | हकु
पुढचे भाग टाकायला अडचण येत आहे. एरर येत आहे. सर्वांना हीच अडचण येत आहे का?
1 Sep 2019 - 7:52 am | यशोधरा
वाचते आहे..
2 Sep 2019 - 4:11 pm | प्रभू-प्रसाद
"हमने ये देखा है की यहां आनेवालोमेसे ९०% लोक महाराष्ट्र से रहते है। आपके वाहांके लोगोंमे देशभक्ती और ये जगह देखनेकीं चाह बहोत है।"
--- देशभक्ती आणि सैनिकांप्रती आदरभाव यांची ज्योत अखंड तेवत राहो.....
4 Sep 2019 - 9:16 pm | किल्लेदार
मस्त....
7 Sep 2019 - 7:14 pm | खिलजि
छान लिवलंय ओ.. मस्तच मनाला भिडलं लिखाण तुमचं
8 Sep 2019 - 9:34 am | श्वेता२४
फोटो व वर्णन मनाला भिडले अगदी. पु. भा. प्र