सफर लडाखची भाग १ - 'अखेर ठरलं...'

हकु's picture
हकु in भटकंती
28 Aug 2019 - 2:46 pm

फिरायला आवडणाऱ्या महाराष्ट्रातल्या अनेक तरुण पोरापोरींच्या 'ड्रीम डेस्टिनेशन' यादीमध्ये गेल्या काही वर्षांत वरच्या क्रमांकावर असलेल्यांपैकी एक म्हणजे लडाख! चक्क 'गोव्याच्या' बरोबरीने लडाख आपलं स्थान या यादीत राखून आहे. मात्र जी गत पोरांची गोवा ठरवताना होते अगदी तशीच गत लडाख ठरवताना सुद्धा होतेच. बरेचदा हे 'ड्रीम डेस्टिनेशन' ड्रीम मध्येच राहतं आणि प्रत्यक्षात यायचं काही नाव घेत नाही. पोरं पोरी कॉलेजात जायला लागली, गृप बीप जमले की गोव्यात बॅचलर पार्टी करायच्या आणि लडाख मध्ये 'बाईक राईड' करायच्या चर्चा सुरू होतात. गोव्यात पार्ट्या करणं काही फारसं स्वस्त नसलं तरी लडाख च्या तुलनेत नक्कीच हलकं पडतं. मग मोर्चा तिकडे वळतो. कॉलेज जीवनात खिसे जरा बरे असले तर सुट्ट्यांमध्ये पोरं गोव्याला जाऊनही येतात, मात्र जर ते तेव्हा राहिलं तर पुन्हा काही तो योग जुळून येत नाही. नोकऱ्या वगैरे लागलेल्या असतात आणि सुट्ट्यांचे वांदे झालेले असतात. मग कधी एकत्र भेटले तर पुन्हा ते जुने प्लॅन्स बाहेर निघतात आणि "नाही यार... या वेळी नाही जमते!.." असं हळहळत विषयावर पडदा पडतो. आमचं ही असंच झालं. ते गोवा ही ठरलं नाही आणि लडाख ही जमलं नाही. बरेचदा भेटायचो, हुक्की यायची आणि 'येत्या जून मध्ये लडाख नक्की!' अशा शपथा घेतल्या जायच्या. लेह ला जाऊन बाईक ने फिरायचं की कल्याणहून बाईक वरून जायचं यावर जोरदार चर्चा रंगायच्या. पण एकमत काही व्हायचं नाही. शेवटी तो जून, जुलै, ऑगस्ट निघून जायचा आणि ट्रिप साठी बँकेत आरडी काढून जमवलेले पैसे दुसरीकडेच कुठेतरी खर्चून जायचे. पुन्हा 'काहीही झालं तरी पुढच्या जून मध्ये लडाख नक्की!' म्हणत पैसे जमवायला सुरुवात व्हायची.
अशात वर्षं निघून गेली. माझ्या लग्नाच्या वेळीच माझ्या बिनलग्नाच्या (किरण सोडला तर) मित्रांनी डाव साधला आणि गोव्याला जाऊन भरपूर मजा करून आले. माझ्यासाठी गोव्यातल्या बॅचलरेट चा विषय कायमचा निकालात निघाला. भक्ती, आरती, विनीत, कार्तिक च्या बरोबर तर गोवा इतक्या वेळा ठरून मोडला की आता तो आकडा नीट आठवत ही नाही. मग पुन्हा वेध लागले लडाख चे. मित्रांनी मागच्या वर्षी इज्जतीत लडाख ठरवलं, मात्र मला या वेळी बायकोशिवाय जायचं नव्हतं आणि बायकोला काही सुट्टी मिळत नव्हती. वर्षं २०१८ निघून गेलं. प्रणित तर श्रुती ला घेऊन आधीच जाऊन आला होता. नंतर कुशल, अमित, प्रथमेश, सागर आणि किरण अजून ३ मित्रांना घेऊन लडाख फिरून आले आणि या ही वर्षी माझं ते राहिलंच. आता राहिले विनीत, कार्तिक आणि योगेश. योगेश चे लडाख च्या बाबतीत आम्हाला न झेपणारे प्लॅन्स आहेत. ते तोच करू जाणे.
दर वर्षी प्रमाणेच 'या वर्षी लडाख नक्की' हा संकल्प होताच पण जून निघून गेला तरी काही योग दिसेना. जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात शमिश, प्रसाद, कौस्तुभ, सुशांत, आशुतोष आणि रोहन सुद्धा जाऊन आले. २ वर्षांसाठी लेह ला बदली झालेल्या आमच्या निलेश कडे राहून आले. पण माझं काही जमेना. लडाख ला फिरायला जाण्याचा सिझन संपत आला आणि हे ही वर्षं लडाख शिवायच जाणार हे समोर दिसू लागलं. पण तरीही आशा काही पूर्ण सोडली नव्हती. निलेश कडे सिझन ची, वातावरणाची चौकशी केली, माझ्या ऑफिस मध्ये बॉस ला सुट्टी साठी पटवलं, बायकोला विश्वासात घेतले आणि मनातल्या मनात लडाख ची योजना आकार घेऊ लागली. नेहमीप्रमाणे आईचा पाठिंबा होताच. फक्त किरणला तिच्या सुट्ट्यांसाठी झगडायचं होतं. तिने त्याची पूर्ण तयारी दाखवली आणि मी १ ऑगस्ट ला संध्याकाळी श्रावण प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर १७ ऑगस्ट चं पहाटेच्या विमानाचं मुंबई ते थेट लेह असं तिकीट काढून मोकळा झालो.
आमची तयारी सुरू या झाली आणि तेव्हढ्यातच 'अमरनाथ च्या यात्रेकरूंना परत बोलवलं!' अश्या बातम्या येऊ लागल्या. तिथल्या भारतीय सेनेच्या हालचाली आणि तंग वातावरणाच्या बातम्या ऐकून माझे नातेवाईक, मित्रमंडळी काळजीत पडली. पण लडाख ला काश्मीर सारखी स्थिती अजिबात नाही हे निलेश कडून कळलं आणि निश्चिन्त राहिलो. जम्मू-काश्मीर मध्ये काहीतरी जबरदस्त शिजतंय हे अख्ख्या जगाला दिसतच होतं पण काय ते कळत नव्हतं. आणि अचानक अमितभाईंनी पहिल्या श्रावणी सोमवारी कलम ३७० आणि ३५अ रद्द केल्याचा बॉम्ब टाकला. ६ तारखेला त्यावर शिक्कामोर्तब झालं आणि देशाच्या बहुतांश भागला आनंदीआनंद झाला. अशातच ६ तारखेला लडाख चे तरुण तडफदार खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांचं ताबडतोड भाषण ऐकलं आणि मी लडाख च्या अजूनच प्रेमात पडत गेलो. आत्तापर्यंत जम्मू, काश्मीर, लडाख, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली भिन्न-भिन्न संस्कृती, तिथल्या वेगवेगळ्या समस्या यांचा खरंच फार काही अभ्यास नव्हता माझा. मात्र यंदा आमच्या लडाख सफरीला तो सगळा भाग केंद्रशासित प्रदेश बनल्याची खूप मोठी पार्श्वभूमी होती. रोजच्या बातम्या वाचून, ऐकून नवीन नवीन माहिती मिळत होती आणि जे वाचतोय, ऐकतोय ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची उत्कंठा वाढू लागली होती.
अख्खा लडाख जम्मू-काश्मीर पासून वेगळा होऊन गेला होता, पण माझ्या बायकोची काही सुट्टी मान्य होत नव्हती. तरीही शेवटी भांडून भांडून ती शुक्रवारी ऑफिस मधून निघाली, रात्री १० वाजता घरी आली आणि ११ वाजता आम्ही विमानतळाकडे जायला निघालो. पहाटे ४ वाजता विमान मुंबईहून उडालं आणि ६.३० वाजता लेह ला उतरलं. कुशोक बकुला रिनपौछे विमानतळावर मी आणि किरणने पाय ठेवला. कित्येक वर्षांपासूनचं आमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरत होतं. आमची लडाखची सफर सुरू झाली होती.

क्रमशः

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

28 Aug 2019 - 3:34 pm | अमर विश्वास

विमानाने का होईना .. लेह ला पोचलात .. acclimatize व्हायला वेळ लागतो ..
Enjoy the trip
पुढचा वृत्तांत येउद्यात

हकु's picture

30 Aug 2019 - 12:56 pm | हकु

नक्कीच.

कंजूस's picture

28 Aug 2019 - 3:40 pm | कंजूस

चला सुरू झाली सहल. मग काय तिकडे बाईक भाड्याने घेतली फिरायला?

हकु's picture

30 Aug 2019 - 12:56 pm | हकु

बाकी ३ दिवस चारचाकी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 7:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेकदा अडकून बसलेली लडाख सफर झाली एकदाची सुरू ! हे झ्याक झालं

आता पुढच्या भागापासून भरपूर फोटोंसह बैजवार वर्णन येऊ द्यात. कसं?

हकु's picture

30 Aug 2019 - 12:57 pm | हकु

लवकरच टाकतो आहे.

जालिम लोशन's picture

28 Aug 2019 - 11:01 pm | जालिम लोशन

येवु द्या.

टवाळ कार्टा's picture

29 Aug 2019 - 1:12 pm | टवाळ कार्टा

आयाया.....लडाख राहिले आहे माझे....मुंबई - दिल्ली - लेह - श्रीनगर - मनाली - चंदिगढ - मुंबई असे बाईकवरून भटकायचं आहे....नशीबाने बायडीलापण बाईक मस्त चालवता येते...फक्त शिंची बाईक विकत घ्यायची आणि सुट्टी मॅनेज करायला मुहूर्त लागत नाहीये

युफोरिक's picture

29 Aug 2019 - 1:56 pm | युफोरिक

Difficult situation :p

होईल होईल. नक्की होईल. :-)

डिटेलात लिहा. कुठे राहिलात, कुठे फिरलात, काय आणि कुठे खाल्लेत, इतर अनुभव.

हकु's picture

30 Aug 2019 - 12:58 pm | हकु

लिहितोच सविस्तर

नंदन's picture

29 Aug 2019 - 1:38 pm | नंदन

सुरुवात उत्तम झाली आहे. पुढील वर्णन वाचायची उत्सुकता आहे - निवांत, बैजवार येऊ द्या पुढचे भाग!

हकु's picture

30 Aug 2019 - 12:58 pm | हकु

लवकरच टाकतो पुढचा भाग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Sep 2019 - 7:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे